Tuesday, October 29, 2013

अणू, रेणू आणि देवाचा कण - भाग १

मातीचे ढेकूळ नुसते हाताने चुरगाळले तरी त्याचा भुगा होतो, मातीच्या मानाने दगड बराच कठीण असतो, पण त्यालाही फोडून त्याचे तुकडे करता येतात, ते करतांना दगडाचा थोडा बारीक चुराही निघतो, करवतीने लाकूड कापतांना त्याचाही पिठासारखा भुसा पडतो, गहू, ज्वारी वगैरे धान्ये दळल्याने त्यांचे पीठ होते वगैरे नित्याचे अनुभव आहेत. कुठलाही घनरूप पदार्थ कुटून, ठेचून किंवा घासून त्याची पूड करता येते, ते करतांना त्या पदार्थाचे बारीक कण वेगवेगळे होतात. यातल्या प्रत्येक कणांमध्ये मूळ पदार्थाचे सगळे गुण असतात. पावसाचे पाणी लहान लहान थेंबांमधून पडते आणि आता थंडीच्या दिवसात सकाळी आपल्याला पानांवरले दंवबिंदू दिसतील. ते तर आकाराने खूपच लहान असतात. थोडक्यात सांगायचे तर जगातल्या सगळ्या वस्तूंचे रूपांतर त्यांच्याच सूक्ष्म कणांमध्ये होऊ शकते.

चिमूटभर साखरेतले निरनिराळे कण डोळ्यांना दिसतात आणि बोटाने त्यांना वेगळे करता येतात. त्याची पिठीसाखर केली तर तिचे कण मात्र डोळ्यांनाही वेगवेगळे दिसत नाहीत आणि त्यातल्या एका कणाचा वेगळा स्पर्शही बोटाला जाणवत नाही. डोळे आणि त्वचा या आपल्या ज्ञानेंद्रियांच्या जाणीवा सुमारे एक दशांश मिलिमीटरपेक्षा सूक्ष्म आकाराच्या पदार्थांना ओळखत नाहीत. नाक आणि जीभ मात्र अधिक संवेदनाशील इंद्रिये आहेत. डोळ्यांना न दिसणा-या कणांचा गंध किंवा रुची यावरून ती वस्तू ओळखता येते. पण एका मर्यादेच्या पलीकडे तेसुद्धा शक्य नसते. अनेक सूक्ष्म कणांनी मिळून तयार झालेली चिमूटभर पिठीसाखर एकत्रितपणे डोळ्यांना दिसते आणि बोटांना जाणवते. हीच साखर पेलाभर पाण्यात घालून ढवळली की ती पाण्यात विरघळून जाते आणि पूर्णपणे अदृष्य होते. साखरेमुळे त्या पाण्याला आलेला गोडवा जिभेला जाणवतो या अर्थी ती साखर नष्ट झालेली नसते, पण पाण्यात विरघळण्याच्या क्रियेत तिचे कण अत्यंत सूक्ष्म झालेले असल्यामुळे ते मात्र डोळ्यांना मात्र दिसत नाहीत.

पदार्थांच्या अशा प्रकारे होत असलेल्या विघटनाच्या गुणधर्मांबद्दल विचार करतांना काही तत्वज्ञान्यांना असे वाटले की जगातले सगळे पदार्थ मुळात सूक्ष्म अशा कणांच्या समुदायामधूनच बनत असावेत. असे असंख्य कण एकमेकांना चिकटून त्याचा आकार बनतो आणि त्यांच्यामधले बंधन तोडल्यास ते वेगळे किंवा सुटे होतात. कोणताही पदार्थ वायुरूप असतो तेंव्हा हे सूक्ष्म कण इतस्ततः सुटे फिरत असतात, पण तो द्रवरूप झाला की ते एकमेकांना सैलसर चिकटतात आणि घनरूपात ते एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात. उदाहरणार्थ पाण्याची वाफ हवेत सगळीकडे विरून जाते, द्रवरूप पाणी एकत्र राहते, पण त्याला स्वतःचा आकार नसतो आणि त्याला गोठवून बर्फ केल्यास त्याचा ठोकळा बनवता येतो. तो आपला आकार टिकवून ठेवतो. हे सगळे कशामुळे होते हा प्रश्न होता. एक अज्ञात शक्ती या कणांना एकमेकांशी बांधून ठेवत असते एवढेच माहीत होते.

"कुठल्याही पदार्थाचे लहान लहान तुकडे करत गेल्यास अशी एक वेळ येईल की त्याचे आणखी लहान तुकडे होऊ शकणार नाहीत" असा सिद्धांत कणाद या भारतीय तत्वज्ञान्याने (वाटल्यास शास्त्रज्ञाने म्हणावे) मांडला होता. पदार्थांच्या या सर्वात लहान कणाला त्याने 'अणू' असे नाव दिले होते. 'वैशेषिक' नावाची तत्वज्ञानाची एक शाखा कणादमुनींनी सुरू केली होती. 'नैनम् छिन्द्यन्ति शस्त्राणि" असा हा अविभाज्य अणू त्या तत्वज्ञानानुसार अमर असतो. दोन किंवा तीन अणूंचे गट असू शकतात, निरनिराळ्या पदार्थांचे अणू एकमेकांशी संयोग पावून त्यातून वेगवेगळे नवे पदार्थ उत्पन्न होतात असे प्रतिपादनसुध्दा कणादाच्या या तत्वज्ञानात होते असे म्हणतात. या सगळ्या गोष्टी रसायनशास्त्रातल्या प्राथमिक आणि मूलभूत तत्वांशी ब-याच प्रमाणात जुळतात. पारंपारिक भारतीय शास्त्रांनुसार माती, पाणी, उजेड, वारा म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू आणि त्याशिवाय आकाश ही पंचमहाभूते समजली जातात. विश्वामधील कोणताही पदार्थ यांच्यामधूनच तयार होतो असे मानले जाते. या पंचमहाभूतांच्या जोडीला दिक्, काल, मन आणि आत्मा यांचाही विचार करून अशा एकंदर नऊ तत्वांमधून सर्व सजीव तसेच निर्जीव सृष्टी निर्माण झाली आहे असे महर्षी कणादमुनींनी प्रतिपादन केले आहे. हे देखील ढोबळमानाने पाहता बरोबरच आहे, पण स्पष्ट अस्तित्व असलेली माती किंवा पाणी, विचार किंवा भावना यांनीच समजता येत असलेले मन आणि पूर्णपणे काल्पनिक संकल्पना असलेला आत्मा यांची अशा प्रकारे एकत्र मिसळ करणे सायन्समध्ये बसत नाही.

मूलद्रव्य (Elements), संयुग (Compounds) किंवा मिश्रण (mixtures) यापैकी एकात जगातील सर्व वस्तूंची गणना होते. हे सत्य कणादमुनींच्या काळात बहुधा प्रस्थापित झालेले नसावे. त्यामधील मूलद्रव्य आणि संयुग यांना विशिष्ट गुणधर्म असतात आणि त्यांचे मिश्रण केले तरी ते गुण टिकून राहतात. सर्व पदार्थांच्या या तीन वर्गात केलेल्या विभाजनामुळे त्यांचे सर्वात लहान कण या अर्थाने Atom आणि molecule  हे शब्द वापरात आले आणि या इंग्रजी शब्दांसाठी अणू, परमाणू, रेणू वगैरे मराठी प्रतिशब्द आता रूढ झाले आहेत. (त्यातसुध्दा अनुक्रमे परमाणू व अणू आणि अणू व रेणू असे दोन पाठभेद आहेत.) अणू या शब्दाचा कणादमुनींना अभिप्रेत असलेला अर्थ कशा प्रकारचा होता कोण जाणे, पण तो Atom किंवा molecule या शब्दांच्या सध्या प्रचलित असलेल्या अर्थांपेक्षा निश्चितपणे निराळा होता. अणू या कणादमुनींच्या संकल्पनेचा आकार, वजन, क्रमांक, विद्युत भार, त्याची अंतर्गत रचना अशा प्रकारची कसलीही शास्त्रीय माहिती कुणादमुनींच्या तत्वज्ञानात दिलेली आहे असे माझ्या अल्पशा वाचनात मला तरी कुठे आढळले नाही. अणू हे सर्व पदार्थांचे अतीसूक्ष्म असे कण आहेत असे मात्र बहुधा त्यांनीच पहिल्यांदा खूप पूर्वी सांगितले होते एवढे सर्वमान्य आहे. जगातले सगळेच ज्ञान ब्रह्मदेवाने वेदांमधून काही निवडक ऋषींना दिले होते असा ज्यांचा दृढ समज आहे अशा लोकांच्या दृष्टीने पाहता कणादमुनींनी देखील हे ज्ञान वेदाध्यनामधून प्राप्त केले असेल तर त्यांना अणूचे आद्य संशोधक म्हणता येणार नाही. शिवाय प्राचीन काळामधील काही जैन मुनी आणि डेमॉक्रिटस नावाचा ग्रीक फिलॉसॉफर यांनीसुध्दा परमाणू आणि अॅटम या सूक्ष्म कणांची कल्पना केलेली होती असेही सांगितले जाते. प्राचीन काळामधले हे सगळे प्रयत्न फक्त अचाट कल्पनाशक्ती आणि तर्कशुध्द विचार यांमधून केले गेले होते. प्रात्यक्षिके, प्रयोग, निरीक्षण, परीक्षण, गणित वगैरेंमधून त्यांना जोड देऊन ते विचार शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध केले गेले नव्हते, तसेच अणू, परमाणू, रेणू वगैरे शब्दांच्या व्यवस्थित शास्त्रीय व्याख्या केलेल्या नव्हत्या.

अणू हे सूक्ष्म सूक्ष्म म्हणजे नेमके किती सूक्ष्म असतात हे बहुतेक लोकांना माहीत नसते. अब्ज, खर्व, निखर्व, परार्ध वगैरे संख्यांचा नेमका अर्थही सहसा कोणाला समजत नाही. यापेक्षा तुलनेने असे सांगता येईल की भारताची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या कित्येक पट अणू धुळीच्या एका कणात असतात. अशा प्रकारच्या अवाढव्य संख्या १, २, ३, ४ असे करून मोजता येत नाहीत. त्यासंबंधी काही सिद्धांत मांडले जातात, त्यांच्यासोबत काही समीकरणे येतात, प्रयोगांमधून मिळालेल्या माहितीवरून किचकट आकडे मोड करून त्या ठरवतात. हे सिद्धांत आणि समीकरणे अनेक शास्त्रज्ञांनी तपासून पाहिल्यानंतर त्या आकड्यांना सर्वमान्यता मिळते. कणादमुनींच्या कालखंडात हे सगळे झाले असल्याचा निर्देश कुठे दिसत नाही. 



 . . . .  . . . . . . . . . . .  . . (क्रमशः)

No comments: