Wednesday, April 09, 2014

गेले विमान कोणीकडे? - भाग ३ (अंतिम)


मलेशियन एअरलाइन्सच्या ज्या हरवलेल्या विमानाचे रहस्य गहन होत चालले होते, ते चालवणा-या वैमानिकांबद्दलही विचार केला गेला जाणे आवश्यक आणि साहजीक होते. त्या विमानाचा मुख्य वैमानिक (पायलट) कॅप्टन झहारी अहमद शाह आणि त्याचा सहाय्यक फरीक अब हमीद यांच्या घरांची झडती घेतली गेली. त्यात आक्षेपार्ह असे काही सापडले नाही असे सांगितले गेले. त्यांचा कोणत्याही दहशतवाद्यांशी थेट संबंध जोडता आला नसला तरी त्यामधून एवढे समजले की हा पायलट एक असामान्य माणूस होता. तो एक निष्णात आणि अनुभवी वैमानिक होताच, त्याने त्याच्या घरातच बोइंग विमानाचे एक सिम्यूलेटर तयार करून ठेवले होते.

विमानकंपन्यांकडे जे फ्लाइट ट्रेनिंग सिम्युलेटर्स असतात त्यात त्या विमानाच्या कॉकपिटची संपूर्ण प्रतिकृती असते. तिथली पॅनेल्स, बटने, जॉयस्टिक्स, लीव्हर्स, इंडिकेटर्स, डिस्प्लेज, रेकॉर्डर्स वगैरे सगळ्या गोष्टी, अगदी वैमानिकांच्या खुर्च्या सुद्धा जशा ख-या विमानात असतात तशाच्या तशा तिथे ठेवलेल्या असतात. विमानाचे इंजिन सुरू करणे, त्याचा वेग वाढवणे किंवा कमी करणे, विमानाला आभाळात उंचीवर नेणे किंवा खाली आणणे, त्याला डावीउजवीकडे वळवणे, जमीनीवरून हवेत उड्डाण करणे (टेक ऑफ) आणि आकाशातून खाली धावपट्टीवर उतरवणे (लँडिंग) वगैरे फ्लाइटसंबंधातल्या सगळ्या क्रिया त्या खुर्चीवर बसून करून पाहण्याची सोय असते. आणि प्रत्यक्षातल्या विमानात त्या क्रिया घडत असतांना त्यातल्या पॅनेलवर जे जे काही दिसावे ते सगळे अगदी तसेच आणि त्याच वेगाने, त्याच क्रमाने रियल टाइममध्ये सिम्युलेटरमधल्या पॅनेलवर दिसते. यासाठी खूप काँप्लेक्स इलेक्ट्रॉनिक सर्किट्स तयार करून ठेवलेली असतात. काँप्यूटर प्रोग्रॅम केलेले असतात, विमानाच्या उड्डाणाशी संबंधित असलेली काळ, काम आणि वेगाची सगळी गुंतागुंतीची समीकरणे इलेक्ट्रॉनिकली सोडवली जाऊन त्यानुसार या पॅनेलवर योग्य ती इंडिकेशन्स अचूकपणे मिळत जातात. ख-या विमानाच्या वैमानिकाला जी माहिती त्यांच्यामधून मिळत असते ती सगळी या सिम्युलेटरवर बसलेल्याला माणसालाही अगदी तशीच्या तशीच दिसते. ऊन, वारा, वादळ, पाऊस, ढग, धुके वगैरे नैसर्गिक बदल आणि त्यांच्यामुळे होत असलेला हवेच्या दाबातला फरक वगैरेंचे आभास या सिम्युलेटरमध्ये कृत्रिमरीत्या निर्माण करता येतात. त्यांच्यामुळे विमानाच्या हवेमधून उडण्यावर जे परिणाम होतात तेही त्या चालकाला समजतात आणि त्यानुसार योग्य त्या क्रिया करून त्याचे काल्पनिक विमान तो चालक चालवत राहतो. थोडक्यात म्हणजे प्रत्यक्ष विमान न चालवता ते चालवण्याचा सराव सिम्युलेटरवर करता येतो. प्रतिकूल परिस्थितीत किंवा आणीबाणीच्या प्रसंगी काय करायचे आणि त्यामुळे काय होते हे सगळे त्याला ट्रेनिंग सिम्युलेटरवर शिकायला मिळते. त्याने केलेल्या कृतीत काही गफलत झाली, त्याचे काही गोष्टींकडे दुर्लक्ष झाले तरी त्यामुळे गंभीर अपघात होण्याचा धोका यात नसतो, पण काय होऊ शकते हे दाखवले जाते आणि त्याची जाणीव मात्र होते.

अशा प्रकारचे फुल स्केल सिम्युलेटर तयार करण्यासाठी त्या विमानाचे भाग मिळायला हवेत, त्यामुळे ते घरी बनवता येणे मला तरी शक्य वाटत नाही. पण काँप्यूटरच्या स्क्रीनवर कॉ़कपिट किंवा विमानाचे चित्र किंवा आराखडा काढून त्याला काँप्यूटर प्रोग्रॅमनुसार गतीमान करता येणे शक्य असते. आजकालच्या काँप्यूटर गेम्समध्ये अनेक प्रकारच्या काल्पनिक मोटारगाड्या, विमाने किंवा रॉकेट्ससुद्धा उडवता येतात. नव्या वैमानिकांचे प्रशिक्षण हा सुद्धा कॅप्टन शाहच्या कामाचा भाग असल्यामुळे त्याला विमानाच्या सिम्युलेटर्सची खडा न खडा माहिती असणारच. त्या हुषार गृहस्थाने काँप्यूटर गेम्समधल्या विमानांचा उपयोग करून हा खास सिम्युलेटर तयार केला होता आणि हा त्याचा एक छंद होता म्हणे. पण त्यासाठी ख-या विमानाच्या भागांची मॅथेमेटिकल मॉडेल्स लागतील, खेळातल्या विमानांना चालवण्यासाठी तयार केलेले सॉफ्टवेअर मिळायला हवे, त्यात बदल करण्यासाठी लागणारे ज्ञान आणि कौशल्य हवे. हे सगळे त्याने एकट्याने जमवले की यात त्याचे काही साथीदार होते वगैरेंबद्दल कसलीही माहिती बाहेर आली नाही. आपल्या विमानाकडून नेहमीपेक्षा निराळी अशी कोणकोणती कामे करून घेता येतील हे त्याने या सिम्युलेटरचा उपयोग करून ठरवले असणे आणि त्याची प्रॅक्टिसही करून घेतली असणे शक्य आहे. पण हे सगळे नुसते तर्क आहेत. त्याने असा कसलाच रेकॉर्ड त्याच्या काँप्यूटरमध्ये शिल्लक ठेवलेला नव्हता.



त्या विमानाचा बाह्य जगाशी असलेला संपर्क तुटल्यानंतरसुद्धा ते विमान उडत राहिले होते आणि सुमारे तासाभरानंतर मलेशियाच्या पश्चिम किना-यापाशी रडारवर दिसले होते. जर विमानात झालेल्या एकाद्या अपघाताने तो संपर्क थांबला असता, पायलट आणि प्रवासी गतप्राण झाले असते किंवा बेशुद्ध पडले असते तर ते विमान अशा प्रकारे वळणे घेत उडत राहिले नसते. त्या दरम्यानच्या काळात कोणीतरी व्यक्ती नक्कीच ते चालवत असणार आणि ती व्यक्ती म्हणजे पायलटच असण्याची जास्त शक्यता होती. त्यानंतरसुद्धा सहा सात तास उपग्रहाकडून येणा-या पिंग नावाच्या संदेशाला या विमानाकडून उत्तर मिळत होते, या अर्थी ते बुडालेले किंवा नष्ट झालेले नव्हते. या सगळ्या निरीक्षणांचे सार काढून असे ठरवण्यात आले की मलेशिया सोडल्यानंतर ते विमान दक्षिणेकडे हिंद महासागरावर उडत राहिले असावे आणि अखेरीस (त्यातले इंधन संपल्यानंतर) ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेला कुठेतरी समुद्रात कोसळून बुडले असावे. मलेशियाच्या सरकारने अशी अधिकृत घोषणा करून नुकसान भरपाई, विम्याची रक्कम, वारसाहक्काची अंमलबजावणी वगैरेंची सोय केली आहे.

असे असले तरी मुळात त्या विमानाने चीनला जाण्याचा मार्ग सोडून दक्षिणेचा रस्ता का धरला? हा प्रश्न शिल्लक राहतोच. जोपर्यंत त्या विमानाचे अवशेष मिळत नाहीत, मुख्य म्हणजे त्यातला ब्लॅक बॉक्स सापडत नाही तोपर्यंत ते नष्ट झाल्याचा कसलाच प्रत्यक्ष पुरावा हाती लागला असे म्हणता येणार नाही. यामुळे प्रवाशांचे नातलग त्यावर विश्वास ठेवायला तयार होत नाहीत. अजूनसुद्धा ते कुठल्या तरी अज्ञात ठिकाणी सुखरूप असतील अशी एक वेडी आशा त्यांना वाटत होती, पण जसजसे दिवस गेले आणि कोणताच नवा सुगावा लागला नाही तसतशी ती शक्यता संपुष्टात येत गेली.

हे विमान हरवल्यानंतर अनेक प्रकारच्या अफवा उठल्या होत्या. अमेरिकेचा (यूएसचा) दक्षिण किनारा आणि वेस्ट इंडीजची बेटे यांच्या दरम्यानच्या समुद्रातल्या एका त्रिकोणी भागाला बर्म्यूडा ट्रँगल असे म्हणतात. त्या भागात जबरदस्त ताकत असलेल्या भुताखेतांची वस्ती होती. तिथे गेलेली जहाजे बेपत्ता होतातच, त्यांना शोधायला गेलेलेही परत येत नाहीत. अशा प्रकारच्या अफवा एका काळी पसरल्या होत्या. ती भुते काही काळ शांत राहिल्यानंतर आता आशिया खंडात हिंदी महासागराच्या या भागात रहायला आली असावीत आणि हे त्यांचेच काम असावे असे विधान कुणीसे केले असे म्हणतात. ते काम करणारी कोणी भुतेखेते नसून परग्रहावरून आलेली आणि समुद्राखाली असलेल्या पाताळात रहिवास करणारी मंडळी असावीत अशा कल्पना सायन्सफिक्शनची डूब देऊन वक्तवल्या जात होत्या. कदाचित त्यांनीही आपला मुक्काम आशियामध्ये हलवला असेल असे म्ङमायला हरकत नाही.

काही परग्रहवासी पाताळात दडून बसलेले असल्याची परीकथा आता जुनी झाली आहे. ते लोक प्लाइंग सॉसर्समध्ये बसून अवचित पृथ्वीवर येऊन धडकतात आणि तसेच भुर्रकन उडून जाऊन पुन्हा अदृष्य होतात ही कथा त्यापेक्षासुद्धा जास्त सुरस आणि जास्त प्रमाणात प्रचलित आहे. अशाच एकाद्या अतिविशालकाय फ्लाइंग सॉसरने मलेशियाच्या अख्ख्या विमानाला आभाळात वरच्या वर गिळंकृत केले असेल आणि आपल्यासोबत त्यालाही ते लोक आपल्या ग्रहावर घेऊन गेले असतील अशी आणखी एक फँटसी पसरवली गेली होती.

विमानात अचानक यांत्रिक बिघाड झाला असावा हा एक सर्वसाधारण तर्क झाला. पण त्यात नेमके काय झाले असेल?  विमानाच्या चाकाला कदाचित रनवेवरून धावतांनाच झालेल्या घर्षणामुळे आग लागली असेल आणि त्या चाकांना पोटात घेतल्यानंतर ती विमानात पसरली असेल, त्यातून निघालेल्या धुरामुळे वैमानिकासकट सगळी माणसे बेशुद्ध पडली असतील किंवा घुसमटून मरून गेली असतील. असा एक अंदाज केला जात होता. पण हे सगळे क्षणार्धात होऊ शकत नाही. त्या दरम्यान वैमानिकाने एसओएस किंवा कसलाच संदेश का पाठवला नाही? साधे गुड नाइट का म्हंटले? धुरामुळे सर्वात आधी संदेशयंत्रणा कशी खराब होईल? असे काही प्रश्न निघतात. 

हा अपघात नसून घातपात असला तर तो कोणी घडवून आणला असेल? त्यामागे त्याचा काय उद्देश असेल? याचा काही पत्ता लागत नाही. पुन्हा एकदा वैमानिकाचा विचार केला तर त्याला संदेशयंत्रणा निकामी करणे शक्य आहे, त्यानंतर विमानाची दिशा वळवून त्याला दक्षिणेकडे नेणेही शक्य आहे. पण त्याचे सहाय्यक, हवाई सुंदरी वगैरेंच्या ते लगेच लक्षात यायला हवे. मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे बहुतेक प्रवासी झोपले असले तरी त्यातले काही जण तरी नक्कीच जागे असतील. रात्रीच्या अंधारात बाहेर काही दिसत नसले तरी आपले विमान कुठे आहे हे समोर लावलेल्या स्क्रीनवर दाखवत असतात. त्यांना फसवून चीनच्याच दिशेने जात असल्याचे दाखवले गेले होते का? यातल्या कुणालाही शंका आली तर तो स्वस्थ कशाला बसेल? त्यांना न जुमानता विमानाला भलतीकडे नेणे वैमानिकाला किंवा ज्या कोणी त्याची जागा घेतली असेल त्याला शक्य असेल का?

त्याला हे सगळे शक्य झाले असे जरी समजले तरी मुळात त्या वैमानिकाने असले भलते सलते करण्याची आवश्यकताच काय होती? त्याला आत्महत्याच करायची असली तर त्यासाठी २३८ इतर माणसांची हत्या करण्याची काहीच गरज नव्हती. यापेक्षा सोपे अनेक मार्ग त्याला दिसले असते. त्यातूनही त्याला विमानअपघातातच मरायचे असले तर त्याला ते टेक ऑफनंतर लगेच करता आले असते. त्याने आत्महत्या केली असे न दाखवता तो एक अपघातच होता असे त्याला दाखवायचे असले तर त्यापासून त्याला काय फायदा होता? तो मरून गेल्यानंतर लोक काही का म्हणेनात? त्याने त्याला काय फरक पडणार होता? एका लेखकाने असे सुचवले आहे की त्या विमानाने पार अंटार्क्टिकापर्यंत पोचून तिथे कोसळावे. आता तिथला हिवाळा सुरू झाला असल्याने त्या विमानावर बर्फांचे ढीग जमत जातील आणि ते कायमचे अदृष्य होऊन जाईल. असा विचार केला गेला असावा. पण ते कशासाठी? वैमानिकाच्या ऐवजी त्याचा सहाय्यक किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने हे घडवून आणले असले तर तिच्याबद्दलसुद्धा हेच प्रश्न उपस्थित होतात. या शिवाय त्या व्यक्तीकडे हे करण्याइतके कौशल्य असेल का? हा आणखी एक प्रश्न उठतो.

अशी एक शक्यता दिसते की सुरुवातीला वैमानिकाने त्याच्या स्वतःच्या योजनेनुसार किंवा कोणाच्या दबावाखाली विमानाची दिशा बदलली, कदाचित त्या दुस-या व्यक्तीनेच हे काम केले असेल. पण  त्या वेळी त्यांची जी काही योजना होती ती सफळ होऊ न शकल्याने ते विमान दक्षिणेकडे भरकटत गेले असेल. 

काही लोकांना तर यापेक्षा वेगळ्या शंका आल्या. या विमानातल्या प्रवाशांपैकी कोणी गुप्तहेर असतील, त्यांना काही खतरनाक माहिती मिळाली असेल, त्यांच्यावर लक्ष ठेवणारे विरुद्ध देशाचे गुप्तहेरसुद्धा त्या विमानात बसलेले असतील. ती माहिती कोणाच्याच हाती लागू नये म्हणून ते विमानच गायब केले गेले असेल. वगैरे वगैरे अनेक अफवांचे पीक या काळात आले होते. ही आंतरराष्ट्रीय महत्वाची घटना असल्यामुळे जगातल्या सगळ्या मुख्य राष्ट्रांनी त्यात घालणे साहजीकच होते. विमान बोइंग या अमेरिकन कंपनीने बनवलेले होते, त्यातले बहुसंख्य प्रवासी चिनी नागरिक होते यामुळे या दोन महासत्तांचा थेट संबंध होता. भारतापासून ही घटना जवळच घडली होती, त्यामुळे विमानाचा शोध घेण्यासाठी भारतीय विमाने आणि आगबोटी धावून गेल्या. शोध घेण्याच्या जागेचा विस्तार होत गेला त्याप्रमाणे इतर अनेक राष्ट्रांनी त्यात भाग घेतला.

या सगळ्यांच्या प्रयत्नात सुसूत्रता आणणे आवश्यक असते आणि त्यासाठी प्रत्येकाने त्याला मिळालेली किंवा त्याच्याकडे असलेली सर्व माहिती जशीच्या तशी इतरांना देणे अपेक्षित असते. पण तसे केले तर मग त्या देशाची या बाबतीतली क्षमता सर्वांना समजेल तसेच त्यातल्या त्रुटीही समजतील आणि या बाबतीत गोपनीयता राखणे राष्ट्राच्या हिताचे असते. अशा प्रकारच्या मुद्द्यांमुळे सगळ्यांनी खुल्या दिलाने अगदी हातात हात घालूनच काम केले असे सांगता येणार नाही.  पण एकंदरीत पाहता गेल्या कित्येक वर्षांतली ही सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय पातळीवरची शोध मोहीम आहे असे म्हणता येईल, तरीही तिला अजून म्हणावे तेवढे यश मिळालेले नाही.

.  . . . . . . .  . . . . . . (समाप्त)

No comments: