Thursday, April 03, 2014

गेले विमान कोणीकडे? - भाग १

एकादा माणूस नेहमीप्रमाणेच कालही ऑफिसला आला होता, त्याने दिवसभर मन लावून काम केले होते, तो सर्वांशी हंसतमुखाने भरपूर बोलला होता, त्यात काहीच वेगळेपणा दिसला नव्हता, पण त्यानंतर तो अचानक निधन पावला असल्याचे आज सकाळी ऑफिसात गेल्या गेल्या समजले तर सर्वांना केवढा जबरदस्त धक्का बसतो? मग ऑफिसातले सगळे लोक दिवसभर याचीच चर्चा करत राहतात. त्याचा मृत्यू नैसर्गिक कारणांनी झाला असला तर त्याची कारणे शोधली जातात, त्याने त्याची वैद्यकीय तपासणी कधी केली होती? त्यात काय निघाले होते? तो नियमितपणे औषधे घेत होता का? पथ्यपाणी सांभाळत होता का? त्याला कोणती व्यसने होती का? तो, त्याचे आईवडील, काका, मामा वगैरेंना कोणकोणत्या व्याधी होत्या? यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधून त्यातून त्या माणसाच्या अपमृत्यूचे कारण ठरवण्याचे प्रयत्न होत राहतात. त्याचे मरण जर अनैसर्गिक असले तर बहुधा अपघात, आत्महत्या किंवा खून यापैकी काहीतरी झाले असणार. काही वेळा त्यात संदिग्धता असते. त्या घटनेत नेमके काय झाले? ते कुणी पाहिले किंवा कुणाला किती आणि काय काय समजले? यावर चर्चा आणि त्यावरून उलटसुलट तर्ककुतर्क होत राहतात. अपघात तर नेहमी अवचितच घडत असतो, पण त्याला कोण किंवा कोणती परिस्थिती जबाबदार असेल? हा प्रश्न निघतो. आत्महत्या किंवा खून असल्यास ती कृती ठरवून आणि पूर्वयोजना करून केली गेली होती की काही तात्कालिक कारणामुळे ती तत्क्षणी घडली? वगैरे मुद्द्यांवर चर्चा होत राहते.

जर तो माणूस ऑफिसला आला नाही किंवा त्याच्यासंबंधी कोणाचा काही निरोपही आला नाही एवढेच झाले असले तर ते ऑफिसमधल्या त्य़ाच्या निकटच्या थोड्याच लोकांच्या लक्षात येते. इतरांना ते जाणवले तरी तो माणूस कदाचित कामासाठी दुसरीकडे गेला असेल किंवा त्याने सुटी घेतली असेल असेच त्यांना वाटते. थोडा वेळ त्याची वाट पाहून त्याच्या जवळच्या सहका-यांनी त्याच्या घरी चौकशी केली किंवा घरच्या लोकांनीच त्याची ऑफिसात चौकशी केली आणि या दोन्ही जागी तो नसल्याचे ध्यानात आले तर मात्र सगळ्यांचे धाबे दणाणते. घर आणि ऑफिस याव्यतिरिक्त त्याची कोणती ठिकाणे असू शकतील याची चर्चा आणि त्या दिशेने त्याचा तपास सुरू होतो. यातून त्याच्याबद्दल कुजबूज सुरू होते आणि ती वाढत जाऊन ऑफिसभर पसरते.

या परिस्थितीत तो फक्त परागंदाच झाला आहे की त्याचे काही बरेवाईट तर झाले नाही ना? अशा दोन शक्यता असल्या तरी कोणीही लगेच दुसरी शक्यता सहसा विचारात घेत नाही. पहिल्या शक्यतेचाच विचार करून तो आपल्या इच्छेने गायब झाला की तसे करणे त्याला प्राप्त परिस्थितीमुळे भाग पडले? तो चुकून कुठे हरवला असेल का? कोणी त्याला फसवून किंवा जोरजबरदस्ती करून पळवून नेले असेल का? अशा अनेक शक्यता त्यात असल्यामुळे त्या माणसाचे गेल्या काही दिवसांमधले वर्तन, त्याचे संभाव्य प्रेमसंबंध, कोणाशी असलेले वैर, आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक स्थिती, साथसंगत वगैरेंवर चर्चा करून कुठून कसला सुगावा लागतो का हे पाहिले जाते. हे करत असतांना त्यातून काहीच समजले नाही किंवा त्याच्या मरणाच्या शक्यतेचा काही धागादोरा मिळाला तर त्यासंबंधीचे वर दिलेले सगळे प्रश्न उपस्थित होतात. अर्थातच या बाबतीतले रहस्य उलगडण्यात खूप दिवस जातात, तरीही ते नक्की उलगडले जाईलच असे सांगता येत नाही. पण बरेच दिवस त्यावर चर्चा मात्र होत राहते. अशा प्रकारची घटना घडून गेल्यानंतर पहिले काही दिवस तरी रोज वेगवेगळ्या स्त्रोतांकडून ख-या किंवा खोट्या माहितीचे निरनिराळे तुकडे मिळत जातात, त्यात अनेक विसंगती असतात, पण ते तुकडे एकमेकांना जोडून त्यातून काही सुसंगत अर्थ शोधण्याचे प्रयत्न होत राहतात. अर्थातच त्यात एकवाक्यता असत नाही. पोलिसयंत्रणा त्यांच्या पद्धतीने त्यावर तपास करून शोध घेते ते वेगळे, पण त्याला बराच वेळ लागतो आणि त्यांचे निष्कर्ष सर्वांना समजतीलच असे सांगता येत नाही.

सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांच्या जीवनात अशा प्रकारचे प्रसंग अगदी क्वचितच घडत असले तरी त्यांचे नातेनाईक, मित्रपरिवार, सहकारी, शेजारीपाजारी वगैरेंपैकी कोणाच्या तरी बाबतीत असे काही घडल्याचे अनुभव बहुतेक लोकांना कधी ना कधी येत असतात. त्यांची झळ जवळच्या लोकांनाच लागते आणि माहितीही मर्यादित वर्तुळांमध्येच पसरते. पण जर त्या व्यक्तीचे नाव स्थानिक, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर बहुपरिचित असेल तर तिच्या संबंधातल्या बातमीलाही विविध माध्यमांमधून त्या प्रमाणात प्रसिद्धी मिळते. ती कथा रहस्यमय़ असल्यास तिच्या संबंधीचे लेखन किंवा वक्तव्य पुढील काही दिवस प्रसिद्ध होत राहते. अशा प्रकारच्या घटना बहुतेक लोकांच्या माहितीत असल्यामुळे त्या काळात होणा-या वेदना, काळजी, आशानिराशा, उत्कंठा, थरार, क्यूरियॉसिटी वगैरेंचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतलेला असतो. या कारणाने मी हे उदाहरण दिले आहे.

जे माणसाच्या बाबतीत घडते तेच थोड्याफार फरकाने विमानाच्या बाबतीतही घडते. एकाद्या आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानाला काही विपरीत झाले तर ती बातमी जगभरातल्या प्रसारमाध्यमांद्वारे लगेच जगभर पसरते. ग्वाटेमाला किंवा झिम्ब्वाब्वे अशा देशात ती घटना घडली तर आपल्याकडल्या वर्तमानपत्रात कुठेतरी एक लहानशी बातमी दिलेली असते. असे काही भारतात किंवा भारतीय विमान कंपनीच्या विमानाच्या बाबतीत घडले तर पहिल्या पानावरच मोठ्या अक्षरांच्या ठळक मथळ्यासह ती बातमी छापली जाते, शिवाय तिच्यासंबंधी अधिक वृत्तांत, मुलाखती, अग्रलेख वगैरे मजकूर इतर पानांवरही पसरलेला असतो. ते विमान कोसळले असल्यास ते तांत्रिक बिघाडामुळे घडते किंवा खराब हवामानामुळे. याची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली जाते इथपर्यंत वाचनात येते. पुढे त्या समीतीने दिलेल्या अहवालात काय लिहिले असते हे मात्र कधीही माझ्या वाचनात आलेले मला आठवत नाही.

एकादे विमान रहस्यमय रीतीने गायबच झाल्याची घटना फारच क्वचित घडते. एअरोडायनॅमिक्सच्या नियमांनुसार पाहिल्यास कोणत्याही विमानाचे दीर्घकाल आकाशातच भटकत राहणे केवळ अशक्य आहे. निदान त्यातले इंधन संपल्यानंतर तरी ते पृथ्वीच्या पाठीवर कुठे ना कुठे उतरले असणार किंवा कोसळले असणार एवढ्या दोनच शक्यता असतात, पण पृथ्वीच्या पाठीवरील निरीक्षणकेंद्रांमधून आणि उपग्रहांमार्फत सतत इतकी पाहणी चाललेली असते की यातल्या कोणत्याही घटनांची कोणालाही खबरबातच लागू नये असे क्वचितच घडू शकते. निदान असा समज आहे. पण कधीकधी कल्पनेपेक्षा प्रत्यक्ष भीषण असते असे म्हणतात. तशीच एक रहस्यमय घटना मागील महिन्यात घडली. या घटनेत नेमके काय घडले आणि ते कोणत्या क्रमाने घ़डले हे अजूनही निर्विवादपणे समोर आलेले नाही. यासंबंधी मला प्रसारमाध्यमांमधून घरबसल्या जेवढी माहिती ज्या क्रमाने मिळत गेली, त्यामधून कोणती कोडी पडत आणि उलगडत गेली हे या लेखात लिहिणार आहे.

दिनांक ७ मार्चच्या मध्यरात्रीनंतर ४१ मिनिटांनी म्हणजे ८ मार्च सुरू झाल्या झाल्या मलेशियन एअरलाइन्सच्या एका जम्बोजेट विमानाने मलेशियातल्या कौलालंपूर विमानतळावरून उड्डाण केले. या बोइंग ७७७ विमानात २२७ प्रवासी आणि पायलट, एअरहॉस्टेसेस वगैरे १२ कर्मचारी अशी २३९ माणसे होती. त्यांना घेऊन ते सकाळी साडेसहा वाजताच्या सुमाराला चीनमधल्या बैजिंगला पोचणार होते. या विमानाने अगदी व्यवस्थितपणे उड्डाण केले आणि ठरलेल्या दिशेने मार्गक्रमण करायला सुरुवात केली. त्याच्या प्रवासातल्या प्रगतीच्या सूचनाही मिळत गेल्या. पण सुमारे चाळीस मिनिटांनी काय झाले कोण जाणे? त्या विमानाचा जमीनीवरील यंत्रणांशी असलेला संपर्क तुटला तो कायमचाच!

एकादी व्यक्ती कारने पुण्याहून मुंबईकडे यायला निघाली असली आणि चारपाच तास होऊन गेल्यानंतरही ती इकडे येऊन पोचली नाही तर त्यामुळे कोणीही फारसा गडबडून जात नाही. ती व्यक्ती वाटेतल्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकली असेल किंवा वाटेत कुठेशी थांबली असेल असा विचार केला जातो. तिच्या सेलफोनचा नंबर फिरवून पाहिला आणि. फोन लागला नाही तरी कदाचित तो घरीच विसरून राहिला गेला असेल, स्विचऑफ केलेला असेल किंवा डिस्चार्ज झाला असेल असे वाटते. अशा प्रकारचे अनुभव आपल्याला नेहमी येत असतात. त्यामुळे तसे घडले असण्याची भरपूर शक्यता असते. काही वेळानंतर ती व्यक्ती किंवा तिचा निरोप येईल अशी अपेक्षा असते आणि बहुतेक वेळा ती पूर्ण होते. पण एकादी व्यक्ती दिल्लीहून विमानाने यायला निघाली असली आणि चारपाच तासात ते विमानच इकडे येऊन पोचले नाही असे कळले तर मात्र काळजाचा ठोका चुकतो आणि भयंकर काळजी वाटायला लागते, कारण आपल्याला कधीच असा अनुभव आलेला नसतो. शिवाय विमानाचा अपघात प्राणघातक असण्याची मोठी शक्यता असते. विमानामधील चालकांचा जमीनीवरील नियंत्रणकक्षाशी सतत संपर्क चाललेला असतो. त्यासाठी अत्यंत कार्यक्षम आणि भरोसेमंद अशी यंत्रणा ठेवलेली असते. विमान उडवण्याच्या आधी ती सगळी उपकरणे व्यवस्थितपणे काम करत आहेत याची खात्री करून घेतली जाते. यामुळे सेलफोनमध्ये येतात तसले बॅटरी संपली, रेंज नाही यासारखे प्रॉब्लेम्स विमानाच्या बाबतीत येऊ नयेत अशी साधार अपेक्षा असते. उडालेले विमान आकाशात नेमके कुठे आहे याचा वेध घेतला जात असतो.


यामुळेच जेंव्हा मलेशियाचे विमान बेपत्ता झाल्याचे कळले तेंव्हा त्या बातमीने जगभर हलकल्लोळ माजला. त्या विमानवरून शेवटचा संदेश आला तेंव्हा ते विमान मलेशियाचा किनारा सोडून समुद्रावर उडत होते आणि अजून व्हिएटनामपर्यंत पोचले नव्हते. त्यानंतरसुद्धा ते तसेच पुढे जात जात वाटेत कुठे तरी, बहुधा समुद्रातच कोसळले असावे असा प्राथमिक अंदाज केला जाणे साहजीकच होते. यामुळे त्या भागातल्या समुद्राची पाहणी सुरू झाली. देशोदेशींच्या ज्या कोणत्या नौका त्या भागात होत्या त्यांनी समुद्राचा तो भाग पिंजून काढला, तसेच आकाशामधून विमानांनी पण शोध घेतला. "कसलासा मोठा आवाज ऐकू आला." किंवा "कुठेतरी आग दिसली." अशा प्रकारची भोंगळ माहिती कुणी कुणी दिली असे म्हणतात, पण त्यात काही तथ्य आढळले नाही. त्या विमानाचा किंवा त्याच्या अवशेषांचा शोध चालतच राहिला.

 . . . . . . . . . . . . . . . .  . (क्रमशः) 

No comments: