Saturday, April 05, 2014

गेले विमान कोणीकडे? - भाग २

विमानाने हवेत उडतांना तरंगत रहावे यासाठी त्याला वजनाने अत्यंत हलके केलेले असते. त्याला अलगदपणे पाण्यावर उतरवले गेले आणि बाहेरचे पाणी त्या विमानात शिरले नाही तर ते विमान पाण्यावर तरंगत रहायला हवे. अशा प्रकारे समुद्रावर उतरवल्या गेलेल्या विमानातल्या सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढलेले मी एका जुन्या इंग्रजी सिनेमात पाहिले आहे. त्या सिनेमाच्या शेवटी असे नमूद केले होते की जरी यातली गोष्ट पूर्णपणे काल्पनिक असली तरी अशा प्रकारे प्रवाशांना वाचवण्याची क्षमता आणि कौशल्य खरोखरच सैन्यदलाकडे आहे. त्यानंतरच्या १०-१२ वर्षांमध्ये त्यात वाढच झाली असणार. मलेशियाचे विमानसुद्धा त्याच्या वैमानिकाने असेच अलगदपणे समुद्राच्या पाण्यावर उतरवले असले तर त्यातल्या प्रवाशांची सुटका करणे शक्य असावे अशी आशा वाटत होती.

प्रवासी विमानातल्या सीट्सच्या खाली एक लाइफ जॅकेट ठेवलेले असते असे नेहमी सुरक्षा सूचनांमध्ये सांगितले जात असे. देशांतर्गत प्रवास करतांना ही सूचना मला विनोदी वाटत असे आणि आपल्या खुर्चीच्या खाली खरोखरच हे जॅकेट ठेवले आहे का ते पहाण्याची इच्छाही कधी कधी होत असे. पण आंतरराष्ट्रीय प्रवासामध्ये ते नक्कीच ठेवले जात असणार. मलेशियाच्या विमानातल्या प्रवाशांनासुद्धा आणीबाणीच्या वेळी ते जॅकेट मिळाले असले आणि त्याचा वापर करून त्यांनी आपला जीव वाचवला असला तर ते समुद्रात तरंगतांना दिसतील आणि पाहणी करणा-या नौकांकडून वाचवले जातील अशी आशाही थोडी अंधुक असली तरी वाटत होती.

समजा त्या प्रवाशांचे नशीब एवढे चांगले नसले आणि त्यांचे विमान समुद्रात अत्यंत वेगाने धाडकन कोसळून तत्क्षणी तुटून फुटून गेले असले तर त्याच्या टाकीत नुकतेच भरलेले हजारो लीटर इंधन पाण्यावर सांडले असते. त्याचा भडका उडाला असला तर तो महाप्रचंड जाळ दुरूनही दिसला असता आणि भडका उडाला नसला तर त्या तेलाचे तवंग दूर दूर पर्यंत पसरले असते. शिवाय हे जंबो जेट विमानसुद्धा आकाराने महाकाय असते. पाण्याला धडकल्यामुळे त्याचे लहान लहान तुकडे होणार नाहीत. वाकडे तिकडे झालेले विमानाचे मोठे भाग शिल्लक राहिलेच असते. पण पहिल्या दिवशी केलेल्या टेहेळणीमध्ये यातले काहीच दिसले नाही. या शिवाय आणखी काही महत्वाचे मुद्दे होते. सुमारे तीस चाळीस हजार फूट उंचीवरून वेगाने चालणारे विमान एकादा दगड पडल्यासारखे क्षणार्धात सरळ खाली पडू शकत नाही. ते कुठल्याही कारणाने आकस्मिकपणे खाली खाली येऊ लागले तर वैमानिकाला कळणारच. अशा वेळी "अरे देवा!, हे काय होतंय्? कोणीतरी वाचवा हो." असा प्रकारचे उद्गार तो काढेल, जोरात किंचाळेल, तातडीने एसओएस (सेव्ह अवर सोल्स) मेसेजेस पाठवेल. पण त्याने यातले काहीच का केले नाही? त्याचा अखेरचा जो आवाज ऐकला गेला तो होता "गुड नाईट". या सर्वांवरून एकच निष्कर्ष निघत होता तो म्हणजे हे विमान ज्या ठिकाणाहून बेपत्ता झाले त्या जागेच्या आसपास आणि ज्या वेळी हरवले त्यानंतर लगेचच ते कोसळलेले नाही. पहिल्या दिवसभरातल्या विविध प्रकारच्या शोधाशोधीनंतर एवढे अनुमान जवळ जवळ निश्चित झाले होते. पण मग ते विमान कुठे गेले? आणि त्याचे काय झाले असावे? हे यक्षप्रश्न अनुत्तरितच होते.

या विमानातल्या २३९ प्रवाशांपैकी १५२ चीनचे आणि ५० मलेशियाचे नागरिक होते. उललेले ३७ उतारू निरनिराळ्या देशांचे रहिवासी होते. यातले पाच भारतीय होते, त्यातले चार मराठी भाषी आणि त्यातले तीन मुंबईचे होते. यामुळे या घटनेला इथल्या वृत्तपत्रांमध्ये ठळक अक्षरांत प्रसिद्धी मिळाली होती, त्या उतारूंची नावे आणि त्यांच्या नातलगांची माहिती छापून आली होती आणि त्यांच्याविषयी आत्मीयता वाटायला लागली होती. त्या विमानाच्या तपासासंबंधीच्या उलट सुलट बातम्या रोज छापून येत होत्या आणि त्यांच्याबरोबर वाचकांची मने आशानिराशेच्या हिंदोळ्यावर हेलकावे घेऊ लागली होती.  

या विमानाचा अपघात झाला नसला तरी त्याचे अपहरण होऊ शकले असते. अपहरण हे एक दुर्दैवी सत्य गेल्या काही वर्षांपासून जगासमोर आले आहे. ते टाळण्यासाठी अत्यंत किचकट अशी सुरक्षा व्यवस्थाही अंमलात आणली गेली आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये जाणा-या प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाची कसून तपासणी केली जाते. काही ठिकाणी तर डोक्यावरचे पागोटे, अंगावरचे डगले, कंबरेचा पट्टा आणि पायातले बूटसुद्धा काढून दाखवावे लागतात, पिण्याच्या पाण्याची बाटलीसुद्धा प्रवासात आपल्यासोबत नेता येत नाही. विमानप्रवासात आवश्यक असतील तेवढीच औषधे बरोबर नेता येतात आणि त्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन दाखवावे लागते. या सगळ्या दिव्यामधून कोणत्याही प्रकारचे घातक शस्त्र किंवा जालिम विष विमानात नेता येणे जवळजवळ अशक्य असते. यामुळे अपहरणाचे प्रमाण आता खूपच कमी झाले आहे. तरीसुद्धा या सगळ्यांवर मात करून ते करण्याचे प्रयत्नही चाललेले असतातच. कदाचित या वेळच्या अपहरणकर्त्यांनी एकादी नवीन शक्कल लढवली असण्याची शक्यता कमी असली तरी तिचा विचार करणे आवश्यक होते.

या विमानाच्या अपहरणाच्या शक्यतेसंबंधी आणखी काही माहिती मिळाली होती. त्यावरून एवढे सिद्ध झाले होते की ते विमान ज्या ठिकाणी असतांना त्याच्याशी असलेला संपर्क तुटला होता तिथून ते चीनच्या दिशेने नाकासमोर उत्तरेला न जाता झर्रकन डावीकडे वळून पश्चिमेच्या दिशेने पुन्हा मलेशियाच्या भूमीवरून उडत होते. उपग्रहांमार्फत मिळालेल्या काही माहितीच्या आधारावरून असे वर्तवले गेले की तिथून ते पुढे भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका वगैरे देशांच्या दिशेने पुढे जाण्याची शक्यता होतीच. त्यातल्या त्यात दोन मार्गांवरून ते गेले असण्याची अधिक शक्यता वर्तवली गेली होती. हे मार्ग नकाशात दाखवले आहेत.या विमानाचे अपहरण झाले असले तर ते कुणी आणि कशासाठी केले असेल? या प्रश्नावर विचार चाललेला होता. एकाद्या माथेफिरूंच्या लहान टोळक्याने ते केले असले तर त्यांनी विमानातल्या संदेशयंत्रणेचाच उपयोग करून आपल्या मागण्या मांडल्या असत्या आणि त्यांची पूर्ती न केल्यास सर्व प्रवाशांसह ते विमान उडवून देण्याची धमकी दिली असती. हे काम एकाद्या अतिरेक्यांच्या संघटनेचे असते तर त्यातल्या विमानाबाहेरच्या  सदस्याने किंवा प्रवक्त्याने या अपहरणाची जबाबदारी स्वीकारून मागण्या आणि धमक्या दिल्या असत्या. पण पहिल्या दिवसभरात असे काहीच घडले नाही. या विमानाचा संपर्क पहिल्या तासाच्या आतच तुटला होता आणि त्यामुळे ते आपल्या नियोजित मार्गाने जात नसावे याबद्दल दाट शंका निर्माण झाली होती. तरीसुद्धा पाच सहा तास कोणीही याची वाच्यता केली नाही. या विमानाची बैजिंगला पोचण्याची वेळ टळून गेल्यानंतर ते हरवले असल्याचे जाहीर केले गेले. कदाचित अपहरणकर्त्यांच्या निरोपाची वाट पाहून हे केले असण्याची शक्यता आहे.

११ सप्टेंबरला अमेरिकेत घडलेल्या अतिरेक्यांच्या कारवाईत विमानांचे अपहरण करून त्यांनी वर्ल्डट्रेडसेंटर, पेंटॅगॉन वगैरे प्रमुख इमारतींना आत्मघातकी धडका दिल्या होत्या. या वेळीसुद्धा मलेशियन विमानाने अशाच एकाद्या मोठ्या लक्ष्यावर धडक मारण्याचा बेत आखला असावा अशीही शंका आली होती. हा निश्चितपणे भारतातल्या एकाद्या महानगरावर किंवा सैनिकी स्थळावर हल्ला करण्याचाच प्रयत्न होता असे काही कांगावखोर भारतीयांनी तर छातीठोकपणे सांगून टाकले. सध्याच्या परिस्थितीत ते अशक्य वाटत नाही. कांही का असेना, पण कोणाचा असा बेत असला तरी विमानाने आकाशात उडत राहण्याची जास्तीत जास्त जी काही मुदत होती तेवढ्या काळात तो सफळ झाला नाही.

या विमानाचे अपहरण करण्याचा कट शिजला असावा या शंकेला पुष्टी मिळावी अशा काही गोष्टी समोर येत गेल्या. विमानातल्या सर्व प्रवाशांची यादी आणि पासपोर्टचे क्रमांक प्रसिद्ध केले गेले. त्यातला एक ऑस्ट्रेलियन आणि एक इटालियन गृहस्थ आपापल्या घरीच होते असे समजले. ते लोक क्वालालंपूरलाच गेले नव्हते. तिथून बैजिंगला जाण्याचा तर प्रश्नच उद्भवत नव्हता. या दोघांचे पासपोर्ट मागच्या किंवा त्याच्या मागल्या वर्षी चोरीला गेले होते. त्यांनी तशी व्यवस्थित नोंदही कागदोपत्री केलेली होती. मग त्यांच्या नावांनी विमानाची तिकीटे कशी निघाली, ती कोणी काढली वगैरे दिशेने तपास केल्यानंतर ते तोतये इराणी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले, इतकेच नव्हे तर त्यांची नावांसकट माहितीसुद्धा प्रसिद्ध झाली. हे सगळे फक्त एका दिवसात घडले यावरून तपास करणा-यांची कार्यक्षमता किती कौतुकास्पद आहे असे वाटते किंवा या सगळ्या गोष्टींची तपशीलवार खबरबात कोणी ठेवत असावा का अशी शंकाही येते. या इराण्यांच्याबद्दल जेवढी माहिती सांगितली गेली त्यावरून हे कृत्य त्यांचे नसावे असा निर्वाळा दिला गेला. हा निष्कर्ष म्हणजे एकादा भुरट्या चो-या करणारा चोर बँकेवर दरोडा घालून तिला लुटू  शकणार नाही अशा प्रकारचा होता. युरोपातल्या एकाद्या प्रगत देशात शिरकाव करून घेऊन तिथे आरामात रहायचे एवढाच त्यांचा उद्देश होता असे सांगितले गेले. पण त्यासाठी त्यांना चीनमध्ये जाण्याची काय गरज होती? त्या देशात अशा प्रकारे राहणे शक्यच नसतांना ते तिथे का जाणार होते? या प्रश्नांचा काही तर्कसंगत खुलासा होत नव्हता. विमानाचे अपहरण करण्यासाठी लागणारे धैर्य, निष्ठुरपणा, कौशल्य वगैरे गुण त्यांच्यात नव्हते एवढे वाटल्यास पटण्यासारखे वाटत होते. पण सगळ्या तज्ज्ञांनी हे मान्य केले त्या अर्थी या दोघांवरून संशयाची सुई बाजूला सरकवली गेली.

या विमानाचे अपहरण होण्याच्या शक्यतेबाबत मूलभूत शंका उत्पन्न करणा-या आणखी काही गोष्टी होत्या. अपहरण केलेले विमान मार्ग बदलून भलत्याच ठिकाणी नेले जात असले तरी ते अचानकपणे संपूर्णपणे अदृष्य होत नाही. त्याचा बदललेला मार्ग निरीक्षकांना समजत राहतो. अखेरीस त्या विमानाला अतिरेक्यांच्या मित्रपक्षाच्या एकाद्या विमानतळावर उतरण्यासाठी संपर्क साधावा लागतोच. आणि सध्याच्या जगात हे संदेश लपून रहात नाहीत. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, मायनामार, थायलंड वगैरे ज्या कोणत्या देशांवरून त्या विमानाने उड्डाण करण्याची शक्यता होती त्या सर्वांनी तसे काहीही घडलेले नाही असे अगदी निक्षून सांगितले. यात कोणी खोटेपणा केला असला तर तो उद्या त्यांच्या अंगलट येणारच याची कल्पनाही त्यांना नक्कीच असणार. त्यामुळे त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवता येईल.

हे विमान कुठेही सुखरूपपणे उतरल्याचे समजले नाही, कोसळल्याच्या खुणा दिसल्या नाहीत तर त्याचे हवेतच काही बरेवाईट झाले की काय अशीही एक शक्यता वर्तवली गेली. त्या विमानात ठेवल्या गेलेल्या शक्तीशाली बाँबच्या स्फोटाने त्याच्या ठिक-या ठिक-या उडून त्यांचे रूपांतर अगदी बारीक धुळीसारख्या कणांमध्ये झाले असेल किंवा त्यांची वाफ होऊन गेली असेल, एकाद्या क्षेपणास्त्राने त्याचा अचूक वेध घेऊन त्याला हवेतच जाळून खाक केले असेल अशा कल्पना मनात येणे साहजीक असले तरी असे घडण्याची शक्यता दिसत नाही. अशा प्रकारचा रासायनिक बाँब अस्तित्वात नाही. अणूबाँबचा उपयोग केला असता तर त्यातून निघणा-या विकिरणांनी आभाळ व्यापून टाकले असते आणि जगातल्या सगळ्या प्रयोगशाळांनी त्याची दखल घेतली असती. तसे काहीच घडले नाही. यामुळे ही शक्यताही फेटाळली गेली.

पण मग त्या विमानाचे काय झाले?
 . . . . . . . . . . . . . . . .  . (क्रमशः)  


No comments: