Wednesday, January 15, 2014

भीष्मपितामह, उत्तरायण आणि मकर संक्रांत


 मी लहान असतांना उत्तरायण हा शब्द फक्त भीष्मपितामहांच्या कथेमध्येच ऐकला होता. एरवी कधीसुद्धा कोणाच्याही बोलण्यातही तो येत नव्हता किंवा मी वाचत असलेल्या लिखाणामध्येही कधी डोकावत नव्हता. यामुळे भीष्मपितामह आणि उत्तरायण या शब्दांची जोडी झाली होती. हे उत्तरायण मकरसंक्रमणापासून सुरू होते एवढीच अधिक माहिती त्याच्या संबंधात समजली होती.

भीष्म हे महाभारतातले एक प्रमुख पात्र असामान्यांहून असामान्य असे आहे. सर्वसाधारण लोकांच्याच नव्हे तर लोकोत्तर अशा असामान्य माणसांच्या जीवनातसुद्धा आल्या नसतील इतक्या विचित्र घटना त्यांच्या खडतर आयुष्यात त्यांना पहाव्या आणि सोसाव्या लागल्या आणि कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले. त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळे काही वेगळ्याच वाटेने घडत गेले. त्यांची आई त्यांना जन्मतःच पाण्यात बुडवायला निघाली होती. "तू हे असं का करते आहेस बाई?" एवढासाच प्रश्न तिच्या नव-याने विचारल्यानंतर ती रुष्ट होऊन त्या बाळाला घेऊन तरातरा चालली गेली. त्या मुलाचे बालपण कसे गेले कोण जाणे, पण त्याला सगळी शास्त्रे आणि शस्त्रविद्या शिकवून सर्वगुणसंपन्न करून त्याच्या वडिलांच्या सुपूर्द केले गेले. त्यानंतर वडिलांना सुखी करणे एवढाच सिंगल पॉइंट प्रोग्रॅम घेऊन तो युवक देवव्रत त्यासाठी काय वाटेल ते करायला तयार झाला. आधी स्त्रीस्वातंत्र्याचा अतिरेक करणारी पत्नी आणि त्यानंतर तिचाही विरह यांच्याबरोबर सगळे आयुष्य घालवून झाल्यानंतर देवव्रताच्या पिताश्रींना उतारवयात प्रेम करावेसे वाटले. पण ते सफळ होणार नाही या विचाराने ते दुःखी झाले. त्यांना निदान आता तरी चार सुखाचे दिवस मिळावेत म्हणून तरुण देवव्रताने राजसिंहासनावरचा आपला हक्क तर सोडलाच, कधीही लग्नच न करण्याची भीष्मप्रतिज्ञा केली. शिवाय हस्तिनापूरचा जो कोणी राजा असेल त्याच्याशी एकनिष्ठ राहीन असे वचन दिले. वडिलांच्या मृत्यूनंतर आलेले सगळे राजे एकाहून एक नालायक निघाले तरी भीष्माला मात्र आपल्या वचनपूर्तीसाठी त्यांना पाठीशी घालावे लागले, त्यांचेच संरक्षण करत रहावे लागले.

महाभारत युद्धात पांडवांचा पक्ष न्याय्य आहे हे मनापासून पटलेले असले तरी भीष्माला कौरवांच्या सेनेचे सेनापतीपद सांभाळून त्यांचाच विजय व्हावा यासाठी लढावे लागले आणि ते इतक्या निकराने लढले की अर्जुनाच्या रथाचा त्यांनी चक्काचूर केला. "न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार" असे आश्वासन दिलेल्या श्रीकृष्णाला हातात रथाचे चाक घेऊन त्यांच्यावर धावून जावे लागले. अखेर श्रीकृष्णाच्या सूचनेनुसार अर्जुनाने शिखंडीला सारथ्याच्या जागी बसवले. तत्वनिष्ठ भीष्माचार्यांनी हातातले धनुष्य खाली ठेवले आणि शिखंडीच्या मागे दडून अर्जुनाने त्यांच्यावर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले नाही की तो थांबवण्याचा प्रयत्न केला नाही की रणांगणामधून पळ काढला नाही. त्याने सोडलेले बाण त्यांच्या शरीरात घुसत राहिले.

आपले सारे जीवन अर्पण करण्याच्या मोबदल्यात भीष्माला काय मिळाले? तर इच्छामरण ! त्याला स्वतःला जोपर्यंत इच्छा होणार नाही तोपर्यंत तो मरणारच नाही असा वर मिळाला. त्यामुळे त्याला युद्धामध्ये कोणीही मारूच शकत नव्हता, हस्तिनापूरच्या राजाच्या बाजूने तो लढाया लढत होता, त्या जिंकत होता आणि त्यातून धन, दौलत आणि राजकन्यांनासुद्धा जिंकून राजांकडे आणून देत होता. राजांची सगळी मदार भीष्मावरच असल्यामुळे आपल्यानंतर त्या राज्याचे काय होईल या चिंतेमुळे तो मरणाची इच्छासुद्धा करू शकत नव्हता. इतर माणसांच्या मनात ज्या प्रकारच्या इच्छा रूढपणे येत असतात, तशा भीष्मालाही कधी झाल्या असल्या तरी त्यांची पूर्ती मात्र कधीच होऊ शकली नाही. अखेरच्या क्षणी त्याने एकच शेवटची इच्छा बाळगली ती म्हणजे कधी प्राण सोडावा ही. या बाबतीत फक्त तो स्वतःच ठरवू शकत होता. त्याची कुठलीही कर्तव्ये, प्रतिज्ञा किंवा वचने त्याच्या आड येत नव्हती.

शिखंडीच्या आडून अर्जुनाने मारलेले अनेक बाण भीष्माचार्यांच्या शरीरामधून आरपार गेले तरी त्यांचे प्राण मात्र गेले नाहीत, कारण त्यांच्या स्वतःच्या इच्छेशिवाय ते जाऊच शकत नव्हते. पण शरीराच्या तशा छिन्नभिन्न अवस्थेत किती वेदना होत असतील त्या सहन करीत त्यांनी आणखी काही काळ जगत रहायचे ठरवले. अंगात शिरलेले बाण बाहेर न काढता त्यांच्या शय्येवर ते पडून राहिले. कारण काय तर त्यावेळी दक्षिणायन चाललेले होते. ते संपून उत्तरायण सुरू झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला तर ते स्वर्गात जातील असा त्यांचा विश्वास होता. या घटनेच्या दहाच दिवस आधी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतोपदेश केला होता, त्यात त्यांनी म्हंटले होते, "हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम्" म्हणजे "मृत्यू पावलास तर स्वर्गात जाशील." युद्धात मरण पावला तर क्षत्रिय स्वर्गात जातील असे त्या काळात मानले जात होते. म्हणजे तसा विचार केल्यास हे दक्षिणायन त्यांच्या स्वर्गात जायच्या आड येत नव्हते. ही गोष्ट सगळी शास्त्रे जाणणा-या भीष्माला माहीत नसेल का? दक्षिणायनात चाललेल्या त्या युद्धामध्ये जे लक्षावधी योद्धे मारले गेले ते सगळे नरकात गेले असतील का? त्यांनी जन्मभर केलेल्या पापुण्याचा हिशोब कुठे गेला? असले प्रश्न विचारायचे नसतात. यातला शाब्दिक अर्थ न घेता त्यात दडलेली रूपके किंवा अध्यात्म शोधायचे असते असे म्हणून ते टोलवले जातात. 

उत्तरायण आणि मकर संक्रांत यांचा संबंध कसा आणि कधी जुळला असेल हा सुद्धा संशोधनाचा विषय ठरेल. कोणत्याही वर्षातल्या मकर संक्रांतीपासूनच सूर्याने प्रत्यक्षात उत्तरेकडे सरकायला सुरुवात केली असे गेल्या दहा पिढ्यांमध्ये तरी झालेले नाही. पण प्रत्येक पिढीतल्या मोठ्या लोकांनी पुढल्या पिढीमधल्या मुलांना असेच सांगितले आहे. काल होऊन गेलेल्या संक्रांतीलासुद्धा असेच सांगितले जात होते. भूगोल किंवा खगोलशास्त्राच्या दृष्टीने या दोन निरनिराळ्या घटना असतात. दिवसांचे लहान किंवा मोठे होत जाणे यामुळे उन्हाळा आणि हिवाळा येणे हे चक्र दर वर्षी रिपीट होत असते. उत्तरायणामध्ये रोजचा सूर्योदय आदल्या दिवसाच्या मानाने थोडा आधी होतो आणि सूर्यास्त थोडा उशीराने होतो. यामुळे दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. याचप्रमाणे सूर्योदयाच्या वेळी त्याचे बिंब क्षितिजावरील ज्या बिंदूमधून वर येतांना दिसते तो बिंदू हळू हळू उत्तरेकडे सरकत असलेला दिसतो. दुपारी बारा वाजता माथ्यावर आलेला सूर्य बरोबर डोक्यावर नसतो, तो किंचित दक्षिणेच्या किंवा उत्तरेच्या बाजूला असतो. पूर्वेला सूर्योदय होतो असे म्हंटले जात असले तरी ते वर्षामधून फक्त दोनच दिवशी घडते. इतर सर्व दिवशी सूर्योदयाची जागा पूर्व दिशेच्या किंचित डावीकडे म्हणजे उत्तरेला किंवा थोडी उजवीकडे म्हणजे दक्षिणेच्या बाजूला असते. तिथून उगवल्यानंतर तो थोडा उत्तर किंवा दक्षिणेच्या बाजूनेच आकाशामधून फिरून पुन्ः थोडा उत्तर किंवा दक्षिणेच्या बाजूनेच मावळतीला टेकत असतो. २१ डिसेंबरच्या दिवशी ज्या ठिकाणाहून सूर्योदय होतो हे त्याचे दक्षिणपूर्वेकडले टोक झाले. त्यानंतर २२ डिसेंबरपासून तो बिंदू उत्तरेकडे सरकू लागतो म्हणून उत्तरायण सुरू होते. २२ डिसेंबर २०१२ रोजीच तसे ते होऊन गेले आहे. हे उत्तरायण सहा महिने चालेल. तोपर्यंत रोजचा सूर्योदय, त्याचे माथ्यावर येणे आणि असत हे बिंदू उत्तरेकडे सरकत जातील, दिवस मोठे आणि रात्री लहान होत जातील. त्यानंतर जून महिन्यातले लाँगेस्ट डे होऊन गेला की दक्षिणायन सुरू होऊन ते पुन्हा सहा महिने चालेल, अशा प्रकारे दर वर्षी याची पुनरावृत्ती होत जाईल. हे चक्र पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे घडते हे आपण भूगोलात शिकतो.

सूर्य आभाळात असतांना त्याच्या प्रकाशात इतर तारे दिसत नाहीत, पण भल्या पहाटे किंवा रात्री केलेल्या निरीक्षणावरून सूर्य कोणत्या राशीमध्ये आहे हे अचूकपणे ठरवता येते. आकाशातल्या बारा राशींमधून त्याला फिरून मूळ जागेवर येण्यासाठीसुद्धा एक वर्षाचा काळ लागतो. याचे कारणसुद्धा पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला एक वर्षाइतका म्हणजे सुमारे ३६५ दिवसांचा काळ लागतो हे आता आपल्याला माहीत झाले आहे. सूर्य हा मध्यभागी असून मंगळ, बुध, गुरू, शुक्र या ग्रहांप्रमाणेच पृथ्वीसुद्धा त्याला प्रदक्षिणा घालत असते हे गेल्या काही शतकांमध्ये शिकवले जात आहे. पण जमीनीवरूनच सूर्याचे निरीक्षण करून त्यावरून केलेल्या कालगणना त्याच्याही आधी  कित्येक शतके किंवा हजार वर्षांपूर्वीपासून उपयोगात आणल्या जात आहेत. सूर्याची सारी निरीक्षणे एक वर्षानंतर पुनः जशीच्या तशीच रिपीट होत असतात हे पाहून त्यावरूनच वर्ष हा कालावधी ठरवला गेला. 

पाश्चात्य लोकांचे सौर वर्ष ठरवतांना फक्त सूर्याचा विचार केला जातो. इस्लामिक लोकांचे चांद्रवर्ष असते. त्याचा या विषयाशी काहीच संबंध नसल्याने ते बाजूला ठेवू. भारतीय पंचांगांमध्ये चंद्राच्या कलेकलेने मोठ्या आणि लहान होत अदृष्य होण्याच्या कालखंडाचा महिना ठरवला गेला आणि अशा बारा महिन्यांचे एक वर्ष. पण असे चांद्रवर्ष आणि सौर वर्ष यांची सांगड घालण्यासाठी अधिक महिना आणला गेला. प्रत्येक महिन्याच्या अमावास्येला सूर्य आणि चंद्र दोघेही एका राशीत येतात. त्यात चंद्र पाठीमागून येतो आणि सूर्याला ओव्हरटेक करून पुढे जातो. असे दर महिन्यात घडत असते. सूर्याला एक राशी पार करायला सुमारे साडेतीस दिवस लागतात म्हणजे एक महिन्यानंतर तो पुढल्या राशीत असतो. तिथे असलेल्या सूर्याला गाठून पार करण्यासाठी चंद्राला सुमारे साडे एकोणतीस दिवस लागतात. यामुळे कधीकधी असे घडते की एका महिन्यातच ते दोन वेळा घडते. आधीच्या अमावास्येला ज्या राशीमध्ये सूर्य नुकताच गेलेला असतो त्याच राशीच्या दुस-या टोकाशी तो पुढल्या अमावास्येलासुद्धा असतो. त्यानंतरचा महिना अधिक ठरवला जातो. असा प्रकारे हा सांगड घातली जाते.

उत्तरायण आणि दक्षिणायन मिळून होणारा एका वर्षाचा कालखंड आणि सूर्याने बारा राशींमधून फिरून आपल्या मूळ जागी लागणारा कालखंड हे दोन्ही सुमारे ३६५ दिवस आणि सहा तास इतके असतात. स्थूलमानाने हे ठीकच असले तरी सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर असे दिसून येते की त्यात काही मिनिटांचा फरक असतो. वाढत वाढत ७०-७२ वर्षांमध्ये तो एका दिवसाइतका होऊ शकतो. दर वर्षी सूर्याचे मकर राशीत होणारे संक्रमण तीन चार वर्षांपूर्वी फक्त १४ जानेवारीलाच होत असे. आजकाल ते कधी १४ तर कधी १५ ला होते. या अनिश्चिततेचे कारण असे आहे की इंग्रजी कॅलेंडरमधला दिवस रात्रीच्या बारा वाजता सुरू होतो, तर भारतीय पंचांगांमधला दिवस सकाळी सूर्योदयाबरोबर होतो, शिवाय लीप ईयरमुळे इंग्रजी वर्ष कधी ३६५ तर कधी ३६६ दिवसांचे असते यामुळेही फरक पडतो. आणखी काही वर्षांनी ते फक्त १५ जानेवारीलाच होईल. सूर्याच्या राशीमधून फिरण्याच्या कालावधीवरून वर्ष ठरवण्याच्या पद्धतीला निरयन असे म्हणतात. भारतात ही पद्धत जास्त प्रचलित आहे. सूर्याचे उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे सरकणे यावरून ठरवले जाणारे वर्ष हे काही मिनिटांनी मोठे असते. याला सायन पद्धती म्हणतात. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये ही पद्धत वापरली जाते. पूर्वीच्या काळात तिकडेसुद्धा निरयन पद्धत होती, पण सातआठशे वर्षांपूर्वी ती बदलण्यात आली आणि कॅलेंडरमधल्या काही तारखा गाळून तोपर्यंत झालेल्या फरकाची पूर्ती करण्यात आली.  भारतीय विद्वानांना सायन पद्धत माहीत झाली होती, पण ऋतूचक्रापेक्षा सूर्याचे राशींमधले भ्रमण अधिक महत्वाचे वाटल्यामुळे त्यांनी निरयन पद्धतच चालू ठेवली.

अशा प्रकारे आता उत्तरायणाची सुरुवात आणि मकरसंक्रमण याच्यामध्ये आता २२-२३ दिवसांचे अंतर पडले आहे, पण कधी काळी ते एकाच दिवशी होत होते त्या काळातली समजूत मात्र अजून टिकून आहे.

No comments: