Sunday, January 12, 2014

स्मृती ठेवुनी जाती - ११ विनय आपटे


सुमारे चाळीस वर्षांपूर्वी मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाले त्या काळात त्याचे कार्यक्रम रोज फक्त चार तासाएवढेच असायचे. तेवढ्यातच मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये बातम्या, मुलाखती, चर्चा, समाजाचे प्रबोधन, माहिती देणे आणि मनोरंजन वगैरे सगळे चालत असे, शिवाय काही नियमित गुजराती कार्यक्रम आणि सिंधी, पंजाबी, बंगाली वगैरे अन्य भाषांमधले काही नैमित्यिक कार्यक्रम यांचाही समावेश असायचा. एकाहून जास्त भाषांमधल्या कार्यक्रमांचे नियोजन, निवेदन आणि त्यात प्रत्यक्ष सहभाग घेणारी काही चतुरस्र मंडळी त्या काळात दूरदर्शनवर काम करायची. सुहासिनी मुळगावकर, विजय राघव राव, तबस्सुम, टी पी जैन यांच्यासारखे मातब्बर कलाकार यातल्या काही कार्यक्रमांमध्ये जीव ओतून काम करायची. त्या काळाच्या सुरुवातीला भक्ती बर्वे आणि स्मिता पाटील ही नावे बाहेरच्या जगात फार मोठी नव्हती, पण पुढे त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात गरुडभरारी घेऊन यशाचे शिखर गाठले. अरुण काकतकर आणि विनय आपटे यांच्यासारखे उत्साही नवयुवक त्या काळात दूरदर्शनवर आले, त्यांना चांगल्या संधी मिळत गेल्या आणि त्यांनी त्याचे सोने करून या माध्यमावर आपला ठसा उमटवला. अरुणशी माझा आधीपासून परिचय होता, विनयचे नाव मी ऐकले नव्हते.

त्यापूर्वी मी जितक्या आपट्यांना पाहिलेले होते त्यातले बहुतेक सगळे गोरे पान, रूपाने सुरेख, मृदुभाषी किंवा गोडबोले, व्यवहारी, पॉलिश्ड, वेल मॅनर्ड वगैरे गुणांनी युक्त असे 'मोजून मापून कोकणस्थ' होते. नंतरच्या आयुष्यातसुद्धा या वर्णनात बसणारे काही आपटे माझ्या जीवनात आले. विनय आपटे मात्र त्या सगळ्यांपेक्षा खूपच वेगळा होता. मी त्याचे नाव पहिल्यांदा श्रेयनामावलीत वाचले तेंव्हा माझ्या वाचण्यातच काहीतरी गफलत झाली असावी असे मला वाटले होते. पण पुन्हा एकदा त्याचे नाव लक्षपूर्वक वाचल्यानंतर माझी खात्री झाली. विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे संयोजन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन वगैरे बाबतीत विनय आपटेचे नाव येत असेच, तो काही वेळा निवेदनही करत असे आणि नाटिकांमध्ये भूमिकाही करत असे. यामुळे तो 'पडद्याआडला कलाकार' न राहता छोटा पडदा चांगला गाजवत होता. नाटकातला 'चॉकलेट हीरो' किंवा त्याचा अतीप्रेमळ मित्र, भाऊ अशा प्रकारच्या सोज्ज्वळ भूमिकेत त्याला कधी पाहिल्याचे मला आठवत नाही. त्याने साकार केलेल्या भूमिकांमध्ये अनेक वेळा काही वेगळ्याच प्रकारची माणसे असायची. त्यांच्यात एक प्रकारचा रगेलपणा, उद्धटपणा, कावेबाजपणा, खुनशीपणा अशा प्रकारच्या गडद छटा असायच्या आणि विनय त्या अप्रतिम रंगवत असे. त्याचा रोल लहान असला तरी तोच अधिक प्रभावी होत असल्यामुळे लक्षात रहात असे. त्याने साकारलेल्या सज्जन माणसांच्या भूमिकांमध्येसुद्धा त्याच्या बोलण्यात आणि वागण्यात प्रचंड इंटेन्सिटी दिसत असे. त्या भूमिकात असतांना तो जे काही बोलतो आहे तो नाटकाचा भाग असला तरी त्यातली तळमळ किंवा कळकळ अतीशय खरी वाटत असे. कदाचित त्या भूमिकांमधून त्याची जी प्रतिमा तयार झाली होती तिचा परिणाम 'विनय आपटे' या व्यक्तीची जी प्रतिमा मनात तयार होत होती त्यावर झाला असण्याची शक्यता आहे. त्याची भूमिका असो वा नसो, त्याचे दिग्दर्शन किंवा निर्मिती असली तरी ती कृती उच्च दर्जाची असणार याची खात्री असायची आणि तो कार्यक्रम आम्ही आवर्जून पहात असू. अनेक वर्षे दूरदर्शनवर नोकरी केल्यानंतर त्याने तिला रामराम ठोकला आणि स्वतःचे स्वतंत्र करीयर सुरू केले. त्यानंतर तो दूरदर्शनवर अगदी रोज दिसत नसला तरी नाटके, मुलाखती वगैरेंमधून दिसत होताच.  

श्री.सुधीर दामले त्या काळात 'नाट्यदर्पण' नावाचे एक मासिक चालवत होते. त्याला जोडून त्यांनी 'नाट्यदर्पण रजनी' सुरू केली. मराठी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातल्या विविध कलाकारांना त्या सोहळ्यात पुरस्कार दिले जात. हिंदी सिनेमाच्या क्षेत्रात 'फिल्मफेअर अॅवॉर्ड्स'चे जे स्थान आहे तेच मराठी कलाजगतात या 'नाट्यदर्पण सन्मानचिन्हां'ना मिळाले होते. त्या रजनीचा भव्य आणि दिमाखदार सोहळा दर वर्षी साजरा होत असे. मीसुद्धा तो कार्यक्रम सहसा चुकवत नव्हतो. माझा कलाक्षेत्राशी कसलाच थेट संबंध नव्हता, पण मराठ्यांच्या सैन्याबरोबर बाजारबुणगेही जात असत त्याप्रमाणे मीसुद्धा ओळखीच्या जोरावर त्या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या घोळक्यात शिरत होतो. त्या रात्री आपापल्या नाटकांचे प्रयोग न ठेवता झाडून सारे कलाकार त्या सोहळ्याला हजर रहात. त्यांना जवळून आणि त्यांच्या नैसर्गिक पेहरावात आणि स्वरूपात पहावे एवढाच त्यात उद्देश असायचा. त्या घोळक्यात विनय आपटे असायचाच आणि हमखास आपल्याकडे लक्ष वेधून घेतच असे. कोणा समायिक स्नेह्याने आमची कधी औपचारिक ओळख करून दिली होती की नाही हे मला नीटसे आठवत नाही, आमची क्षेत्रे वेगळी असल्याने संभाषणही झाले नसावे, पण माझ्या दृष्टीने तो एक 'माहितीतला माणूस' ('नोन परसन') मात्र झाला होता.

अशा प्रकारच्या खाजगी मेळाव्यातलाच एक प्रसंग माझ्या लक्षात राहिला आहे. त्या काळात त्याने दूरदर्शनमधली नोकरी सोडून स्वतंत्र बस्तान बसवले होते, पण त्याचे काही सहकारी मित्र अजून तिथे काम करत होते किंवा त्याच्या भाषेत सांगायचे झाल्यास 'पाट्या टाकत' होते. नव्या जीवनात विनयचे कसे काय चालले आहे? असे त्त्यांच्यातल्या कोणी त्याला विचारताच विनयने सांगितले, "अरे माझे काय विचारतोस? तू सुद्धा ही नोकरी सोडून स्वतंत्र हो, आज तुला जितका पगार मिळतोय् तितका इनकम टॅक्स तू पुढच्या वर्षी भरला नाहीस तर मी नाव बदलीन." त्या कलाकर मित्राने लगेच दूरदर्शनमधली 'सरकारी नोकरी' सोडली की नाही याचा पाठपुरावा काही मी केला नाही, पण ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर दूरदर्शनवर नाव कमावलेले होते अशातली काही नावे गळत गेली एवढे मात्र खरे.

पुढल्या काळात विनयने केलेली काही नाटके गाजली, मराठी चित्रपटांमध्ये तो दिसायचाच, काही वेळा अवचितपणे हिंदी सिनेमातसुद्धा दर्शन द्यायचा तेंव्हा अभिमान वाटत असे. त्याने अनेक चांगल्या कलाकारांमधले गुण पारखून त्यांना संधी दिली होती, मार्गदर्शन केले होते आणि पुढे आणले होते. त्यांच्या मुलाखतींमध्ये ते विनयचा आदराने उल्लेख करतांना दिसत. या क्षेत्रात त्याने स्वतःचे एक वेगळे उच्च स्थान तयार केले होते आणि ते टिकवून ठेवले होते. त्याच्या फक्त नावातच 'विनय' आहे असा विनोद काही वेळा केला जात असला, तरी त्याच्या वागण्यात अत्यंत आपुलकी आणि सौजन्य असल्याशिवाय त्याने इतकी माणसे जोडून ठेवलेली असणे शक्यच नाही.

टीव्हीवर वर्षानुवर्षे लांबण लावत चालवलेल्या बहुतेक मालिका मला कंटाळवाण्या वाटतात, मी कुठलीच मालिका न चुकवता आवर्जून पहात नाही. पण काही दिवसापूर्वीच एका मालिकेतली खास व्यक्तीरेखा साकार करतांना विनयला पाहिले होते आणि त्या मालिकेत तो रंगत आणणार याची खात्री वाटत होती. त्यानंतर अगदी ध्यानीमनी नसतांना एकदम त्याच्या देहांताचीच बातमी आली. असे काही घडू शकणार असेल अशी पुसटशी कल्पना कधी मनात आली नव्हती. आपल्याहून वयाने लहान असलेल्या कोणालाही असे अचानक सोडून जातांना पाहिले तर त्याचा जास्त धक्का बसतो. त्यातही तो त्या काळात सक्रिय असला तर तो आणखी तीव्र होतो आणि तो जर विनय आपटेसारखा 'त्याच्यासारखा तोच' असला तर मग ते पचवणे असह्य होऊन जाते. अशी अद्वितीय माणसे जी स्मृती मागे ठेवून जातात ती कधीच पुसट होण्यासारखी नसते.

No comments: