परवा रिमोटशी चाळा करतांना एका चॅनेलवर आयुर्वेदावर चर्चा होत असलेली दिसली. त्यात एक विदुषी सांगत होती, "आजकाल घरोघरी वॉटर फिल्टर बसवायचे एक फॅड निघाले आहे. हे अॅक्वागार्डचं पाणी फार शुद्ध असतं असं हे (मूर्ख) लोक समजतात. पण आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहता ते पाणी अशुद्धच असते कारण त्यावर अग्निसंस्कार झालेला नसतो. पिण्याचे पाणी तापवून प्यावे असे आयुर्वेदात सांगितले आहे. अग्नीमधली ऊर्जा, पावित्र्य आणि इतर गुणधर्म त्या क्रियेमध्ये पाण्याला मिळतात, ते संस्कार घेऊन ते पाणी पोटात गेल्यानंतर त्याच्यामुळे जठराग्नीला चालना मिळून अन्नाचे चांगले पचन होते. फिल्टरच्या पाण्यात हे अग्नीचे गुण तर नसतातच, शिवाय ते पाणी कोळशाबिळशामधून (अॅक्टिव्हेटेड कार्बन) जात कदाचित जास्तच दूषित होत असेल. वगैरे वगैरे... या बाई दिसायला तर माझ्या मुलाच्या वयाच्या वाटत होत्या, पण त्यांची भाषा मात्र माझ्या आईच्या काळातली होती, त्यातही खास आयुर्वेदातले काही 'शास्त्रीय' शब्द मिळवून त्या बोलत होत्या.
माझी आई आयुर्वेद शिकलेली नव्हती, तिला सायन्सचा गंधही नव्हता, पण परंपरागत शिकवणींमधून ती योग्य अशा ब-याच गोष्टी करत असे. उदाहरणार्थ आजारी माणसाला किंवा लहान बाळांना द्यायचे पिण्याचे पाणी ती नेहमी तापवून देत असे. त्याच्यामागे कोणते शास्त्रीय कारण आहे याचा विचार ती करत नव्हती. तसे करायचे असते एवढेच तिला पक्के माहीत होते. मुळात 'शास्त्र' किंवा 'शास्त्रीय' या शब्दांचेच तिच्या शब्दकोषातले अर्थ फार वेगळे होते. "उपासाला रताळे चालते, पण बटाटा चालत नाही, सकाळी आंघोळ करूनच पाणी भरायला पाहिजे, पारोशाने भरले तर ते अपवित्र होते. स्वयंपाकाला ते चालत नाही, अनशापोटी किंवा उभ्याने पाणी पिऊ नये, जेवतांना फक्त उजव्या हाताच्या बोटांचा उपयोग करावा, अन्नाच्या पातेल्यालासुद्धा डाव्या हाताचा स्पर्शही होता कामा नये." असले कित्येक पारंपरिक नियम "असं शास्त्रात सांगितलंय्" असे म्हणून ती स्वतः पाळत असे आणि ते पाळायला आम्हाला सांगत असे. हे नियम शिकवणे मुलांना चांगले वळण लावण्यातला भाग आहे असे तिला वाटत असे. तिच्याबरोबर त्यावर वाद घालण्यात अर्थ नसायचा.
"अग्नीमध्ये पावित्र्य असते, शिवाय तो इतर गोष्टींनाही पावन करतो म्हणून त्याला 'पावक' असेही म्हणतात." असे माझी आई सांगत असे. सोने अग्नीमध्ये तापवल्याने त्यात मिसळलेले अन्य हिणकस पदार्थ जळून जातात आणि शुद्ध बावनकशी सोने झळाळून उठते, यापासून ते सीतामाईच्या अग्निपरीक्षेपर्यंत बरीचशी उदाहरणे तिच्याकडे होती. शिवाय साधे दुधाचे उदाहरण घेतले तर ते वेळोवेळी उकळवून ठेवले नाही तर ते नासते. आमटी भाजी वगैरेंनाही तापवल्याने त्यांना अग्नी टिकवतो वगैरे वगैरे. पाणी उकळवल्यामुळे त्यातले रोगजंतू मरतात हे शास्त्रीय कारण मी शाळेत शिकलो होतो. पाण्याला रूम टेंपरेचरपासून बॉइलिंग पॉइंटपर्यंत तापवतांना दिलेली ऊर्जा ते थंड होईपर्यंत वातावरणात निघून गेलेली असते हे सुद्धा नंतर समजले. अग्नीच्या 'संस्कारा'मधून पाण्याला यापेक्षा जास्त काही मिळत असेल असे मला तरी वाटत नाही. अॅक्वागार्डमध्ये अत्यंत सूक्ष्म छिद्गांचे गाळणे असते. पाण्यात न विरघळलेला सगळा गाळ त्यामध्ये असलेल्या काही सूक्ष्म जीवजंतूंसकट त्या फिल्टरमध्ये अडकून राहतो आणि स्वच्छ पाणी बाहेर निघते. त्यानंतर अल्ट्राव्हायोलेट किरणांचा उपयोग करून त्या पाण्याला निर्जंतुक करण्यात येते. उकळल्यामुळे केलेले पाण्याचे निर्जंतुकीकरण जास्त परिणामकारक होते, पण त्यासाठी जास्त खटाटोप करावा लागतो आणि इंधन जाळावे लागते. याचा विचार करता रोजच्या उपयोगासाठी ते सोयीस्कर वाटत नाही, त्या मानाने वॉटर फिल्टर खूप सोयिस्कर असतो आणि अगदी पूर्णपणे नसले तरी ब-याच चांगल्या प्रमाणात रोगजंतूंपासून संरक्षण देतो. काही विशिष्ट रुग्णांसाठी अत्यावश्यक असेल तेंव्हा मात्र त्यांना उकळलेले पाणीच दिले जाते. पण "आयुर्वेदाच्या काळात अॅक्वागार्ड नव्हते म्हणून ते सदोष, काही कामाचे नाही" असे त्या तज्ज्ञ विदुषींच्या तोंडून ऐकल्यामुळे तिचे विचार किंवा माहिती किती संकुचित होती हे लक्षात आले आणि मला आयुर्वेदाबद्दल वाटत असणारा आदर मात्र थोडा कमी झाला.
संस्कार या शब्दाचा सोपा अर्थ "चांगला बदल" असा करता येईल. नीतीमत्ता, प्रामाणिकपणा, विनम्रपणा यासारखे चांगले गुण मुलांच्या मनात रुजावेत आणि त्यांनी सुस्वभावी सज्जन बनावे असा चांगला बदल त्यांच्यावर केल्या जाणा-या संस्कारांमध्ये अपेक्षित असतो. पोरवयातल्या अल्लडपणाला थोडी मुरड घालून विद्याध्ययनाची सुरुवात करून देण्यासाठी मौंजीबंधन हा संस्कार केला जातो. अजाण बालकात चांगला बदल करून त्याला ज्ञानमार्गावरला विद्यार्थी करायचे असते. मुंजीच्या वेळी त्यासाठी त्या मुलाने काही प्रतिज्ञा करायच्या असतात. तसेच गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी आणि संसार सुखी व्हावा या उद्देशाने काही शिस्त पाळावी यासाठी त्या वर आणि वधूने विवाहसंस्कारात काही वचने द्यायची असतात. या दोन्ही धार्मिक विधींमध्ये होम आवश्यक असतो. यातल्या प्रतिज्ञा आणि वचने अग्नीच्या साक्षीने उच्चारायची असतात. यात अग्नि म्हणजे नुसता जाळ किंवा ऊष्णता नसते, तर तो ईश्वराचे दृष्य आणि परिणामकारक असे रूप असतो. अग्नीसाक्ष केलेली प्रतिज्ञा आणि दिलेले वचन पाळणे बंधनकारक आहे आणि त्याचे पालन न केल्यास देवाची फसवणूक केल्यासारखे आहे, असा धाक त्यातून घातला गेला तर त्याचे पालन अधिक चांगल्या प्रकारे होईल अशी कल्पना होती. यात प्रत्यक्ष अग्नीचा त्या बटूवर किंवा वधूवरांवर कसलाच परिणाम किंवा संस्कार होत नाही. तो फक्त साक्षीला असतो. पुढे या संस्कारांचे कितपत निष्ठेने पालन केले जाते हे आपण पहातोच आहोत आणि ते न करणा-याला जाब विचारायला अग्निनारायण कधीच पुढे येत नाही.
कडाक्याच्या थंडीत घेतलेली शेकोटीची ऊब सोडली तर माणूस अग्नीपासून दूर राहून तिची धग टाळतच असतो. पण निर्जीव वस्तू किंवा पदार्थावर त्याचे होणारे परिणाम पाहून त्यांचा उपयोग करून घेत असतो. बर्फाला आंच दिली तर त्याचे पाण्यात रूपांतर होते आणि पाणी उकळून त्याची वाफ होते. त्या वाफेला बंदिस्त जागेत कोंडले असेल तर ती थंड झाल्यावर तिचे पुन्हा पाणी होते आणि त्याला गोठवले तर बर्फ तयार होतो. अशा प्रकारचे बदल परिवर्तनीय असतात. तांदूळ शिजवल्यावर त्याचा भात होतो पण भाताला थंड करून पुन्हा तांदूळ तयार होत नाहीत. हा अपरिवर्तनीय बदल आहे. याला आपण अग्नीचा तांदळावर झालेला संस्कार म्हणू शकू. पोलादासारख्या काही धातूंना गरम करून वेगाने थंड केल्याने त्यांचे गुणधर्म बदलतात. पण अग्नीच्या संस्कारामुळे अग्नीचे गुण भातात किंवा पोलादात उतरले असे म्हणणे हास्यास्पद आहे. कोणतीही तापवलेली वस्तू ऊष्ण असतांना तिला स्पर्श केल्यास चटका बसेलच, या अर्थाने अग्नीचा एक गुण त्या वस्तूमध्ये तात्पुरता येतो. आग विझल्यानंतर ती आग रहातच नाही, पण ती तापवलेली वस्तू थंड झाल्यावर शिल्लक राहते. तापवल्यामुळे तिच्यात झालेला बदल परिवर्तनीय असल्यास ती वस्तू थंड होताच मूळ रूपात परत येते आणि ते बदल अपरिवर्तनीय असतील तर एक नवी वस्तू जन्माला येते.
मनुष्याच्या जीवनातला शेवटचा संस्कार हिंदू धर्मानुसार अग्निसंस्कार किंवा दाहसंस्कार असतो. यात त्याचे निर्जीव शरीर नष्ट होऊन पंचत्वात विलीन झाल्यामुळे त्यातून बाहेर पडलेल्या आत्म्याला त्याची ओढ शिल्लक रहात नाही आणि तो मागे वळून न पाहता पुढच्या मार्गाला लागतो असे समजले जाते. मुळात आत्मा अस्तित्वात असतो की नाही आणि तो असलाच तर त्याचे पुढे काय होते किंवा होत नाही याची खात्री करायला काहीच मार्ग नाही.

No comments:
Post a Comment