Friday, November 08, 2013

मंगल मंगळ - भाग २

आपल्या पूर्वजांनी खूप पूर्वीच्या काळात मंगळ या ग्रहावरून 'मंगळवार' हे आठवड्यातल्या एका दिवसाचे नाव ठरवले होते. पण आज एकाद्या तरी मंगळवारी किती लोकांना त्या मंगळ ग्रहाची आठवण येते? भाविक लोकांना दर मंगळवारी मंगलमूर्ती मोरया आठवतो. त्या दिवशी ते गणपतीची पूजा, प्रार्थना, आराधना करतात, वेळात वेळ काढून त्याच्या देवळात जाऊन दर्शन घेऊन येतात. एकादी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेंव्हा तिला 'अंगारकी चतुर्थी' म्हणतात आणि त्या व्रताचे महात्म्य त्या वेळी अनेकपटीने वाढते. त्या दिवशी तर भल्या पहाटे उठून प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी रांग लावणा-या लोकांची संख्या हजारोंमध्ये असते, कदाचित आता ती लक्षांमध्ये गेली असेल. पण 'अंगारक' हा शब्द अंगार किंवा निखारा यावरून आला असून लाल रंगाच्या मंगळ ग्रहाचे ते एक नाव आहे ही माहिती त्यातल्या किती लोकांना असते? श्रावण महिन्यातल्या मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते. नवीन लग्न झालेल्या मुलींची पहिली मंगळागौर तर हल्ली एकाद्या हॉलवर गाजावाजा करून आणि अनेक आप्तेष्टांना आमंत्रण देऊन एकाद्या मंगल कार्यासारखी मोठ्या थाटामाटात साजरी होते. एरवीसुद्धा दर मंगळवार आणि शुक्रवारी अंबाबाईच्या देवळात दर्शन घ्यायला येणा-यांची गर्दी जरा जास्त असते. या सगळ्यात 'मंगळ' हा ग्रह मात्र कुठेच नसतो.

फक्त मंगळच नव्हे तर बुध, गुरू वगैरे आकाशातल्या कुठल्याच ग्रहाबद्दल आजकालच्या लोकांना फारशी उत्सुकता वाटत असावी असे दिसत नाही. शाळेत शिकतांना केंव्हातरी सूर्यमालिकेवर एकादा धडा शिकलेला असतो आणि 'बॉर्नव्हिटा क्विझ काँटेस्ट' किंवा 'कौन बनेगा करोडपती' यासारख्या एकाद्या कार्यक्रमात त्याबद्दल एकादा प्रश्न विचारला जातो तेंव्हा त्याचे नाव कानावर पडते यापलीकडे कोणाचाच आकाशातल्या ग्रहांशी कधीही संबंध येत नसावा. खगोलशास्त्रामध्ये (अॅस्ट्रॉनॉमीत) रस घेणारे लोक संख्येने कमी आहेत. मुद्दाम प्रयत्न करून रात्रीच्या आकाशातल्या चांदण्यांमधून या ग्रहांना शोधून त्यांचा मागोवा घेणारे उत्साही लोक मला तरी फारच क्वचित वेळा भेटले आहेत. हिल स्टेशनवर फिरायला वगैरे गेले असतांना रात्रीच्या वेळी एकादा ग्रह कोणाला अचानक आकाशात दिसला तर त्याला तो ओळखता तरी येईल की नाही याची शंका आहे. दिवसेदिवस वाढत चाललेला रात्रीच्या वेळचा पृथ्वीवरील कृत्रिम उजेड आणि हवेमधील धुळीचे व धुराचे कण यामुळे वातावरणात येत असलेला धूसरपणा यामुळे रात्रीच्या निरभ्र आकाशात चमचमणारे ग्रहतारे अधिकाधिक निस्तेज आणि फिकट होत चालले आहेत. त्यांना पाहण्याचे आकर्षण वाटेनासे झाले आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमधल्या काँक्रीटच्या जंगलातल्या घरांच्या खिडक्यांमधून आकाशाचा एक सहस्रांश भागसुद्धा दिसत नाही. नेमक्या तेवढ्याशा तुकड्यात येऊन कोणता ग्रह आणि किती तारे दर्शन देणार आहेत?

माणसाला नेहमीच अज्ञाताची भीती वाटत असते असे मानसशास्त्रज्ञ सांगतात. आकाशात घडत असलेल्या घटना आदिमानवाच्या आकलनाच्या पलीकडे असल्यामुळे सू्र्य, चंद्र, ग्रह, तारे, पर्जन्य, वीज या सगळ्यांपासून त्याला प्रचंड भय वाटत असे. त्यांना अज्ञात आणि अचाट शक्तीरूपी देव मानून त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी तो त्यांची प्रार्थना करायला लागला. विज्ञानामधील प्रगतीमुळे निसर्गाच्या या रूपांविषयी अधिकाधिक माहिती मिळत गेल्यानंतर त्याची भीती कमी होत गेली आणि त्यांना निरखून पाहून समजून घेण्याचे धैर्य तो करायला लागला. पण ग्रहांच्या बाबतीतली जवळीक संपुष्टात आल्यामुळे कित्येक लोक आता पुन्हा आदिमानवाप्रमाणे त्यांना घाबरायला लागले आहेत असे वाटते. याचा लाभ घेण्याचे प्रयत्न अर्थातच हुषार लोक करणारच. 

बहुतेक माणसे आता प्रत्यक्षातल्या ग्रहांबद्दल अशी उदासीन झाली असली तरी त्या ग्रहांची नावे मात्र वेगळ्याच प्रकारे रोज आपल्या कानावर पडत असतात किंवा नजरेसमोर येत असतात. आजकाल कुठलेही दैनिक, साप्ताहिक किंवा मासिक घेऊन पहा, बहुतेक वेळा त्यात कुठे तरी राशीभविष्य दिलेले असतेच. काही लोक तर हातात अंक पडला की सर्वात आधी त्या पानावर जातात. टेलिव्हिजनच्या बहुतेक वाहिन्या भविष्याचा रतीब रोजच्या रोज घालत असतात. ते सांगणारी अनेक तज्ज्ञ मंडळी आजकाल जागोजागी आपापली दुकाने मांडून बसली आहेत आणि त्यांचा सल्ला घेण्यासाठी आधीपासून अॅपॉइंटमेंट घेऊन जावे लागते. पटावर सोंगट्या मांडाव्यात तशा प्रकारे ही तज्ज्ञ मंडळी कुंडलीच्या बारा घरात नऊ ग्रहांना मांडून ठेवतात आणि त्यातले ग्रह यथावकाश एक एक घर पुढे सरकवत असतात. त्यातला प्रत्येक ग्रह जिथे असेल तिथून अलीकडे, पलीकडे, तिस-या, पाचव्या, आठव्या वगैरे इतर सर्व घरांपैकी कोणावर आपली मेहेरनजर किंवा कोणावर वक्रदृष्टी ठेऊन त्यातून काही तरी उत्पात घडवून आणत असतो. एकाच वेळी निरनिराळ्या घरांकडे पाहण्याची त्याची दृष्टी वेगवेगळी असते आणि उडी मारून तो ग्रह पुढच्या घरात गेला की लगेच सगळ्याची उलटापालट होते, एकादा ग्रह नव्या घरात जाऊन आनंदित होतो, तर एकादा रुष्ट होतो, उत्साही होतो किंवा वैतागतो वगैरे सुरस आणि चमत्कृतीपूर्ण गप्पा मारून त्यात ऐकणा-याला गुंगवून ठेवण्यात आणि त्यांच्या मनात ग्रहांविषयी भीती निर्माण करण्यात ते ज्योतिषी लोक पटाईत असतात.

खगोलशास्त्राचा विचार केला तर आकाशातला फक्त एक चंद्रच तेवढा दर दोन किंवा तीन दिवसांनी एका राशीमधून निघून दुस-या राशीत जातो, सूर्य, बुध आणि शुक्र हे ग्रह महिन्यातून एकदा पुढील राशीत सरकतात, गुरू आणि शनि एकेका राशीमध्ये अनुक्रमे एक वर्ष आणि अडीच वर्षे इतका दीर्घ काळ मुक्काम ठोकून बसलेले असतात आणि मंगळाच्या बाबतीत थोडी अनिश्चितता असली तरी तोसुद्धा दीडदोन महिने तरी एका राशीत वास्तव्य करत असतो. असे असतांना हे ज्योतिषाचार्य मात्र रोजच्या रोज किंवा दर आठवड्याला आपली भाकिते बदलत असतात आणि अमक्या तमक्या ग्रहांच्या भ्रमणामुळे ती बदलत असल्याचेही सांगतात.

शिक्षणाचा आणि विशेषतः विज्ञानाचा प्रसार वाढला की लोकांच्या अंधश्रद्धा आपोआप कमी होतील असे शंभर वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या थोर समाजसुधारकांना वाटत होते. आता साक्षरता भरपूर वाढली आहे आणि त्याच्या सोबतीने किंवा कदाचित त्याच्या आधाराने फलज्योतिष, वास्तुशास्त्र, फेंगशुई, न्यूमरॉलॉजी, टॅरॉट वगैरे अनेक तथाकथित 'विद्या' जास्तच फोफावत चालल्या आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने आणलेल्या टेलिव्हिजनमधून त्या घरोघर पोचत आहेत आणि जास्तच लोकप्रिय होत आहेत. मुख्यतः विज्ञानाच्या अभ्यासासाठी म्हणून तयार झालेल्या संगणकांचा उपयोग करून या तथाकथित 'शास्त्रां'च्या कामासाठी निरनिराळे खास सॉफ्टवेअर निघाले आहेत. कोणाचीही जन्मतारीख व वेळ सांगितली की आजचे ज्योतिषी लोक त्यांच्या काँप्यूटरवरून चार पाच प्रकारच्या कुंडल्या आणि दहाबारा पानांचे त्याच्या नावासकट भविष्य असलेले सुबक प्रिंटआउट काढून ते आकर्षक फोल्डरमध्ये घालून हातात देतात. ते घेणारे लोकसुद्धा आपल्याला अत्याधुनिक वैज्ञानिक संशोधनामधून निघालेले 'लेटेस्ट प्रॉडक्ट' मिळाले आहे या भावनेने खूष होतात. शिवाय 'व्हायब्रेशन्स', 'एनर्जी', 'नॅचरल फ्रिक्वेन्सी', 'वेव्ह लेन्ग्थ', 'रेझॉनन्स' यासारखे फिजिक्समधले आणि 'सिनर्जी', 'सिम्बियॉटिक' यासारखे वजनदार इंग्रजी शब्द आजकालचे 'गुरू' लोक आपल्या बोलण्यात अशा खुबीने पेरत असतात की शिकल्या सवरल्या लोकांचासुद्धा त्यांच्या सांगण्यावर आणि विद्वत्तेवर प्रचंड विश्वास बसावा. 

भविष्य वर्तवणा-या निरनिराळ्या विद्वान लोकांचे होरे अनेक वेळा वेगवेगळे दिसतात, एकाच दिवसाची चार वर्तमानपत्रे पाहिली तर त्यात चार दिशांना जाणारी भाकिते दिसतात, पण मंगळ या ग्रहाच्या बाबतीत मात्र बहुतेक सगळ्या ज्योतिषशास्त्रतज्ज्ञांचे बहुतेक वेळा एकमत असलेले दिसते. खरे तर मंगळ हा ग्रह त्याच्या नावाप्रमाणे शुभ, मंगलकारक, आनंददायी, लाभदायी वगैरे चांगला उपकारक ग्रह असायला हवा. पण ज्योतिषाचार्यांनी मात्र त्याला सर्रासपणे 'पापग्रह' असे ठरवलेले दिसते. त्यामुळे जास्त करून त्याची भीतीच घातली जाते. त्यातल्या त्यात तो कधी सौम्य असेल किंवा दाहक असेल, पण प्रेमळ आणि हितकारक मात्र सहसा कधी असणार नाही असा समज मंगळाच्या बाबतीत उगाचच पसरवला गेला आहे. लग्न ठरवतांना तर मंगळाला एकदम अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते. वर आणि वधू यांच्या जन्मपत्रिका पाहून त्या जुळवण्याचा प्रघात कधीपासून सुरू झाला आणि तो भारतातल्या कोणकोणत्या भागात कशा प्रकारे पाळला जातो कोण जाणे, पण मला समजायला लागल्यापासून निदान महाराष्ट्रात तरी त्या दोघांच्या पत्रिकेत मंगळ आहे की नाही हे आधी पाहतात. प्रत्येक जन्मकुंडलीमध्ये कुठल्या तरी घरात मंगळ असतोच, पण विशिष्ट चौकोन किंवा त्रिकोणात तो बसलेला असला तर "त्या व्यक्तीला मंगळ आहे" असे म्हणतात आणि इतरत्र असल्यास "त्याला मंगळ नाही" असे मानतात. मग त्याच्या किंवा तिच्यासाठी 'मंगळ' असलेलाच किंवा नसलेलाच जोडीदार शोधणे वगैरेमुळे अनेक चांगली स्थळे कटाप होतात. संख्याशास्त्रानुसार सुमारे ४० टक्के लोक 'मंगळी' आणि ६० टक्के 'अमंगळी' असतात. त्यामुळे मंगळ असलेल्यांना थोडा जास्त शोध घ्यावा लागतो. विशेषतः 'मंगळी' मुलीचे वडील जास्तच बेजार होतात. मुलीला 'मंगळ' असल्याकारणाने वारंवार नकार मिळालेल्या एका मुलीचे पिताश्री इतके वैतागले की त्यांनी मुलीच्या पत्रिकेची कॉपी काढतांना त्यातले 'मं' हे अक्षरच गाळून टाकले म्हणे. कुंडलीचा अर्थच बहुतेक लोकांना माहीत नसतो यामुळे यातला विनोदही त्यांच्यासाठी 'बंपर' असेल.

आजकाल अधिकाधिक मुले आणि मुली आपापसातच लग्न जमवायला लागली असल्यामुळे पत्रिका पाहणे, त्या जुळवणे वगैरेचे प्रमाण बरेच कमी झाले आहे, त्यामुळे मंगळाचा प्रभाव आणि भावही ओसरत चालला आहे. पुढे त्या दांपत्याचा संसार व्यवस्थित चालला तर कोणीही कसलीही चौकशी करत नाही. पण काही कारणाने त्यांच्यात काही बिनसले तर मात्र त्यांच्यातल्या एकाचे किंवा दोघांचेही आईवडील त्यांच्या कुंडल्या किंवा जन्मतारखा घेऊन आपापल्या तथाकथित तज्ज्ञांकडे धाव घेतात आणि योगायोगाने त्यांचे 'मंगळ अमंगळ' जुळत नसले तर सगळे खापर बिचा-या मंगळावर फोडून मोकळे होतात.

आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त आणि भास्कराचार्य यांच्यासारख्या महान भारतीय विद्वान शास्त्रज्ञांनी ग्रहांच्या आकाशमार्गावरील भ्रमणाचे विस्तृत आणि सूक्ष्म निरीक्षण केले होते आणि त्यावर चिंतन, मनन वगैरे करून काही महत्वाचे निष्कर्ष काढले होते, सिद्धांत मांडले होते आणि ते ग्रंथरूपात लिहून ठेवले होते. यातल्या कोणीतरी किंवा कदाचित सगळ्यांनीच मंगळाबद्दलसुद्धा काही माहिती लिहिली आहे असे म्हणतात. ते नेमके काय होते याची मला कल्पना नाही आणि मंगळ ग्रह म्हणजे दगडमातीचा एक प्रचंड आकाराचा निर्जीव गोळा अंतराळातल्या आपल्या ठराविक कक्षेत फिरत असतो असे त्यामधून ध्वनित होते किंवा नाही हे ही मला माहीत नाही. या शास्त्रज्ञांचे विचार लोकांपर्यंत पोचले असते तर बरे झाले असते. मंगळाला किंवा कोणत्याच ग्रहाला नाक, कान, डोळे, मेंदू, हृदय वगैरे कसलेही अवयव नसतात, त्यामुळे त्यांना राग, लोभ, आनंद, दुःख वगैरे काही होत नाही, त्यातले कोणीही कपट कारस्थान करून आपला घात करू शकत नाही किंवा प्रसन्न होऊन आपल्याला धनलाभ, पुत्रप्राप्ती वगैरे करून देत नाही ही वस्तुस्थिती लोकांना कळली असती, कोणीही कोणाला मंगळाचा धाक घालू शकला नसता, कोणीही त्यामुळे भयभीत झाला नसता आणि कोणीही आपल्या चुकीचा दोषही त्या आकाशातल्या मंगळाला दिला नसता. 


 . . . . . .  . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)


No comments: