माझ्या लहानपणी घरात टीव्ही नव्हता आणि शाळेत होमवर्क देत नसत. रात्रीची जेवणे आठ साडेआठपर्यंत उरकायची आणि लगेच निजायची तयारी सुरू व्हायची. पाऊस किंवा कडाक्याची थंडी नसली तर मुलांची अंथरुणे गच्चीवर घातली जायची आणि अंथरुणावर पडूनच गप्पा गोष्टी, थट्टामस्करी करत आम्ही झोपी जात होतो. काळ्याशार आभाळात चमचमणा-या चांदण्याच तेवढ्या डोळ्यासमोर असत. त्यातले ठळक दिसणारे ग्रह, तारे, राशी, नक्षत्रे वगैरेंची नावे विचारून आणि ऐकून घेतली होती. रोजच्या पाहण्यातून त्यांची उजळणी होऊन त्यातली बहुतेक नावे लक्षात राहिली होती. गल्लीतल्या आणि आजूबाजूच्या भागातली माणसे नेहमी जशी रोज पाहून आपल्या ओळखीची होतात, कुठल्या घरात कोण माणसे राहतात ते ठाऊक असते, त्याप्रमाणे सगळे ग्रह माझ्या ओळखीचे झाले होते. त्यातला मंगळ ग्रह रोज केंव्हा उगवतो, केंव्हा माथ्यावर येतो आणि केंव्हा मावळतो? वगैरेची सर्वसाधारण माहिती असायची. पण या काळात तो अमक्याच राशीत का असतो? किंवा तो पुढे सरकत काही काळाने वेगळ्या राशीत का जात असतो? अशा प्रकारचे प्रश्न तेंव्हा पडत नसत. एका सर्वसामान्य लहान मुलाकडून ते अपेक्षित नव्हतेच.
पण खूप प्राचीन काळापासूनच जगभरातल्या अनेक विद्वान आणि कर्तृत्ववान लोकांनी अतीशय चिकाटीने आणि बारकाईने आकाशातल्या ग्रह ता-यांचे आयुष्यभर निरीक्षण केले. काही विशिष्ट उपकरणांचा उपयोग करून त्या ग्रहांच्या आकाशातल्या स्थानांची अत्यंत सूक्ष्म अशी मोजमापे त्यांनी निरनिराळ्या वेळी घेतली, त्यातून मिळालेल्या आकड्यांवरून काळ काम वेगाची गणिते मांडली आणि त्यातून त्या ग्रहांच्या आकाशामधल्या भ्रमणासंबंधीची सूत्रे आणि कोष्टके तयार केली. भविष्यकाळात कोणता ग्रह कोणत्या जागी केंव्हा जाईल याचा अंदाज त्या माहितीच्या आधाराने त्यांना करता येऊ लागला आणि प्रत्यक्ष निरीक्षणावरून तो बरोबर असल्याची खात्री करून घेणे शक्य झाले. अशा रीतीने खगोलशास्त्राचा (अॅस्ट्रॉनॉमीचा) विकास होत गेला. त्याच काळात जमीनीवर घडत असलेल्या मुख्य घटनांची आकाशातल्या ग्रहांच्या भ्रमणाशी सांगड घातली जाऊ लागली आणि यातून ज्योतिषशास्त्र (अॅस्ट्रॉलॉजी) तयार झाले. आकाशातले ग्रह अमक्या अमक्या ठिकाणी असल्यामुळेच जमीनीवर त्या घटना घडल्या असेही समजले जाऊ लागले आणि त्याच्या आधाराने भविष्यवाणी केली जाऊ लागली, शुभ अशुभ लाभदायक, हानीकारक वगैरे संकल्पना रूढ होत गेल्या. पुढल्या कालखंडात भारतात तेच शास्त्र अधिकाधिक लोकप्रिय होत गेले आणि आकाशाचा शास्त्रीय अभ्यास करण्याचे खगोलशास्त्र मात्र मागे पडले. मंगळ हा आकाशात भ्रमण करणारा लाल रंगाचा सुंदर ग्रह न राहता कुंडलीतला उपद्रवकारी पापग्रह ठरला.
कोपरनिकसने सूर्यमालिकेची कल्पना मांडली, केपलर आणि गॅलीलिओने ती निर्भयपणे आणि खूप त्रास सोसून ठामपणे जगापुढे ठेवली आणि न्यूटनने त्याला वैचारिक बैठक दिली. हे सगळे मी एका वाक्यात लिहिले असले तरी त्यात सुमारे दोनशे वर्षांचा कालखंड गेला. दुर्बिणीचा शोध लागल्यानंतर मात्र आकाशातल्या इतर ग्रहता-यांबरोबरच मंगळाचेही निरीक्षण करण्याला वेग मिळाला. अधिकाधिक शक्तीशाली दुर्बिणी तयार करण्यात आल्या आणि मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावरील पर्वत, डोंगर, द-याखोरी वगैरेंचे लहानसहान तपशीलसुद्धा पहाता आले. निरनिराळ्या प्रकारची इतर उपकरणेही तयार होत गेली आणि मंगळावरील दृष्य माहितीशिवाय तिथल्या निरनिराळ्या ठिकाणचे निरनिराळ्या वेळचे तपमान (टेंपरेचर), तिथल्या दगडमातीमधील तसेच तिथल्या वातावरणातले रासायनिक घटक (केमिकल काँपोझिशन) आणि त्यांची मूलतत्वे (एलेमेंट्स) अशी अनेक प्रकारची अद्भुत माहिती पुढील संशोधनामधून मिळत गेली.
पृथ्वीप्रमाणेच मंगळाचा पृष्ठभागसुद्धा खडकाळ जमीनीने व्यापलेला आहे, तिथे वातावरणसुद्धा आहे, पण ते अत्यंत विरळ आहे आणि त्यात मुख्यतः कार्बन डायॉक्साईड हा वायू आहे. मंगळाचा व्यास पृथ्वीच्या निम्म्यापेक्षा किंचित जास्त असल्यामुळे भूमितीच्या नियमानुसार त्याच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ सुमारे पाव हिश्श्याहून थोडेसे जास्त आणि घनफळ एक अष्टमांशाहून जास्त म्हणजे सुमारे एक सप्तमांश इतकेच आहे आणि त्याची घनतासुद्धा पृथ्वीपेक्षा कमी असल्यामुळे त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या एक नवमांश इतके कमी आहे. यामुळे मंगळाच्या जमीनीवरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरच्या मानाने सुमारे तीन अष्टमांश इतकेच आहे. असे असले तरी हिमालयाहूनसुद्धा उंच असे पर्वत त्यावर आहेत आणि खूप मोठमोठे खोल खळगे आणि द-याही आहेत, पण सध्या तरी तिथल्या जमीनीवर वाहणारे द्रवरूप पाणी अस्तित्वात नसल्यामुळे त्या खळग्यांचे महासागर झालेले नाहीत. तिथे समुद्रच नसल्यामुळे समुद्रसपाटी कशी ठरवणार? एका सरासरी पृष्ठभागाची कल्पना करून त्याच्या तुलनेत पर्वत किती उंच आहेत आणि मोठाले खळगे किती खोल आहेत ते ठरवले जाते. मंगळाच्या जमीनीवरील खडकांमध्ये अनेक भागात लोखंडाचे खनिज (हेमेटाइट) असल्यामुळे आपल्याला हा ग्रह लालसर दिसतो, पण दुर्बिणीमधून पाहिल्यास पिवळी, सोनेरी, करडी. हिरवट वगैरे अनेक रंगाच्या छटा त्याच्या इतर भागात दिसतात. मंगळावर ज्वालामुखी पर्वत आणि वाळवंटेही आहेत, पण सगळा ग्रहच ओसाड असतांना कशाला वाळवंट म्हणतात कोण जाणे ! कदाचित त्या भागात खडक नसतील, चहूकडे बारीक वाळू किंवा मातीचे थर पसरलेले असतील.
पृथ्वीप्रमाणे मंगळ ग्रहसुद्धा स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याला प्रदक्षिणा घालत असतो. मंगळावरचा (त्याने स्वतःभोवती फिरण्याचा) एक दिवस साधारणपणे आपल्या २४ तासांहून फक्त सुमारे अर्धा तास जास्त एवढाच असतो, यामुळे मंगळावर होणारे दिवस आणि रात्रसुद्धा साधारणपणे आपल्या एवढेच असतात. पण हा ग्रह सूर्यापासून पृथ्वीच्या मानाने बराच म्हणजे जवळ जवळ दीडपट दूर असल्यामुळे त्याला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी मात्र पृथ्वीच्या जवळ जवळ दुप्पटीपेक्षा थोडा कमी इतका वेळ लागतो. पृथ्वीप्रमाणेच मंगळाचा आंस (अॅक्सिस) सुद्धा त्याच्या कक्षेशी कललेला असल्यामुळे मंगळावरही दिवस आणि रात्र लहान मोठे होत राहतात आणि उन्हाळा व हिवाळा असे दोन ऋतू असतात. तिथल्या जमीनीवर समुद्र, नद्या, तलाव किंवा पाणीच नसल्यामुळे त्यांचेपासून ढगही होत नाही, पाऊसही पडत नाही आणि त्यामुळे तिथे पावसाळा मात्र नसतो. मंगळाचे उत्तर आणि दक्षिण ध्रुवदेखील नेहमी पार गारठलेले असतात आणि ते मात्र पाण्याच्या बर्फाने आच्छादलेले आहेत आणि त्यावर सुका बर्फ (ड्राय आईस) म्हणजे गोठलेला कार्बन डायॉक्साइड वायू या पदार्थाचे काही थरही असतात. मंगळाला सूर्यापासून मिळणारा प्रकाश आणि ऊष्णता पृथ्वीच्या मानाने अर्ध्याहूनही कमी असल्यामुळे तिथल्या इतर भागातले सरासरी तपमानसुद्धा शून्य अंशाच्या खूप खाली असते. त्यामुळे तिथे द्रव स्वरूपातले पाणी सहसा मिळणार नाही. याचा अर्थ मंगळावर पाणी आहे, पण ते गोठलेल्या रूपात असते आणि मुख्यतः त्याच्या ध्रुवांजवळ आहे आणि कदाचित त्याचे साठे जमीनीखाली दडले असावेत अशीही शंका आहे. तिथल्याही हवेत पाण्याची थोडीशी वाफ असते आणि तिचेही गोठून हिमकण बनलेले ढग मंगळावर दिसतात.
दर वर्षी हिवाळ्यात हिमालयातल्या शिखरांवर बर्फ साठत जाते आणि उन्हाळ्यात ते वितळल्यामुळे गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा वगैरे नद्यांना पूर येतात. मंगळ ग्रहाच्या ध्रुवप्रदेशातसुध्दा वर्षातला अर्धा भाग दिवस आणि अर्धा भाग रात्र असते. मंगळावरचे हे अर्धे वर्ष आपल्या दहा बारा महिन्यांइतके दीर्घकाळ असते. त्यातल्या उन्हाळ्यात सतत पडणा-या सूर्यकिरणांमुळे सुक्या बर्फाचे काही थर वितळून त्यातला कार्बन डायॉक्साईड वायू तिथल्या वातावरणात मिसळतो आणि हिवाळ्यात याच्या उलट हवेतला हा वायू गोठून ध्रुवप्रदेशात साठत जातो.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments:
Post a Comment