Wednesday, November 13, 2013

मंगल मंगळ - भाग ४

शंभर वर्षांपूर्वी मंगळ या ग्रहासंबंधी जास्त तपशीलवार माहिती मिळालेली नव्हती, पण मंगळावरसुद्धा दिवस-रात्र, उन्हाळा-हिंवाळा, जमीन-वातावरण वगैरे असल्यामुळे हा ग्रह बराचसा पृथ्वीसारखा आहे एवढे नक्की झाले होते. त्यामुळे तिथेसुद्धा जीवसृष्टी निर्माण झाली असण्याची शक्यता काही शास्त्रज्ञांनी वर्तवली आणि विज्ञानकथा (सायन्स फिक्शन) लिहिणा-यांच्या प्रतिभेला पंख फुटले. त्यांच्या कल्पनाशक्तीला बहर आला आणि मंगळावरील काल्पनिक प्राण्यांच्या जीवनावरील कथाकादंब-यांचा पाऊस पडायला लागला. मंगळावरचे हे जीव माणसासारखेच असतील का? त्यांनासुद्धा नाक, कान, डोळे, हातपाय वगैरे अवयव असतील का? असल्यास किती असतील? त्यांना कदाचित वेगळ्याच प्रकारचे अवयव असतील आणि त्यातून आपल्याला माहीतही नसलेल्या वेगळ्याच संवेदना मिळत असतील का? त्यांनाही मेंदू, हृदय, बुद्धी आणि मन असेल का? त्यांचा मेंदू आपल्यापेक्षा जास्त विकसित असेल का? ते सुद्धा पृथ्वीवर काय चालले आहे याबद्दल विचार करत असतील का? त्यांना आपल्याबद्दल काही माहिती असेल का आणि ती किती असेल?  असे एक ना दोन, शेकडो प्रश्न उभे करून त्यांची आपापल्या मनाने आणि कल्पनेनुसार उत्तरे देण्याचा प्रयत्न या लेखकांनी केला. उडत्या तबकड्यांमध्ये बसून ते पृथ्वीवर येऊन गेल्याच्या वावड्यासुद्धा अनेक वेळा उठल्या.

दुर्बिणीतून मंगळाची पहाणी करत असतांना शास्त्रज्ञांना त्याच्या पृष्ठभागावर काही सरळ रेषा दिसल्या. निसर्गातल्या नद्या, नाले, नैसर्गिकरीत्या तयार होणारी द-याखोरी, यासारख्या गोष्टी पृथ्वीवर तरी कुठेच अशा सरळ रेषेत नाहीत. जगभरातल्या सगळ्या देशांमध्ये त्या वेडीवाकडी वळणे घेतांना दिसतात, मग मंगळावर तरी त्या सरळ रेषेत कशा असू शकतील? तिथल्या बुद्धीमान जीवांनी किंवा महामानवांनी मुद्दाम खणून तयार केलेले हे प्रचंड आकाराचे कालवे असू शकतील असे पिल्लू कोणी तरी सोडले आणि मंगळवासीयांबद्दलचे कुतूहल जास्तच वाढले. ही अफवासुद्धा निदान काही दशके चालली. या सगळ्या रेषा मंगळावरील भूमीवर प्रत्यक्षात अस्तित्वात नसून तो एक प्रकारचा दृष्टीभ्रम होता हे नंतर झालेल्या संशोधनामधून सिद्ध झाले. याचा अर्थ फक्त पृथ्वीवरच मृगजळ दिसत नाही, अगदी मंगळावरसुद्धा एक प्रकारचे मृगजळ दिसले आणि त्याने भल्याभल्या शास्त्रज्ञांना चकवले म्हणायचे! 

एकादा मनुष्य अत्यंत वक्तशीर असतो तेंव्हा त्याच्या जाण्यायेण्यावरून लोक घड्याळ लावतात असे म्हंटले जाते. सू्र्य आणि चंद्र यांचे आकाशामधील परिभ्रमण असेच इतके नियमितपणे अचूक होत असते, की कुठल्याही प्रकारच्या घड्याळाच्या आधीपासून त्यांच्या चलनाच्या आधारावर कालगणना केली जाऊ लागली आणि आजवर केली जात आली आहे. हे दोघेही कधीच वाटेत क्षणभरही थांबत नाहीत. ते आकाशमार्गे अविरत चालत असतात. कधीही त्यांनी उलट दिशेने जाण्याचा तर प्रश्नच नाही. बुध, गुरू, शुक्र आणि शनि हे ग्रह आपापली गती थोडी बदलत असतात, पण त्याचे प्रमाण कमी असते आणि फार बारकाईने पाहिल्याखेरीज ते जाणवत नाही. याचे कारण बुध आणि शुक्र रात्रीचा थोडाच वेळ आकाशात दिसतात आणि गुरू व शनि अत्यंत मंद गतीने त्यांचे निरीक्षण करण्यातच उभा जन्म जातो. मंगळ हा ग्रह मात्र बराच अनियमितपणा दाखवत असतो आणि त्याला समजून घेण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पहावी लागत नाही किंवा खास दुर्बिणीचीही गरज पडत नाही. साध्या डोळ्यांनासुद्धा तो जाणवतो. मंगळ हा आगळा वेगळा ग्रह कधी वेगाने राशीचक्रातून पुढे सरकतांना दिसतो, तर कधी सुस्त होऊन रेंगाळत असतो आणि कधी कधी तर चक्क उलट पावलांनी मागे मागे जात असतो. काही वेळा तो खूप तेजाने उजळलेला दिसतो तर कधी बराच फिकट झालेला असतो. त्याच्या अशा प्रकारच्या दिसण्यामुळे त्याचा माग ठेवणे शास्त्रज्ञांना जरा अवघडच वाटत होते. हे सगळे बदल कशामुळे होत असतील याचे कारणही त्यांना समजत नव्हते.

भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्या ग्रहांना महाशक्तीशाली देव मानले गेले असल्यामुळे ते आपापल्या मर्जीनुसार कसेही वागायला मोकळे होतेच, शिवाय माणसांचे जीवनसुद्धा त्यांच्या राजीखुषीवर अवलंबून असते असे म्हंटल्यावर त्यांच्या वाटेला जाण्याचे धैर्य कोण आणि कशाला दाखवील ? त्यातून मंगळ हा तर शीघ्रकोपी ग्रह ! त्याच्या अनियमित वाटणा-या गतीचे रहस्य शोधून काढण्याचा प्रयत्न कोण करेल ? पश्चिमेकडील म्हणजे युरोपमधील देशात ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाल्यानंतर संपूर्ण जगात फक्त एकच परमेश्वर (गॉड) आहे असे मानले जाऊ लागले. त्यामुळे ग्रहांच्या कोपाला घाबरण्याचे कारण उरले नाही. त्यांच्या भ्रमणाची सविस्तर माहिती गोळा करणे आणि त्यावर विचारविनिमय, मनन, चिंतन वगैरे करून त्यातली सुसंगती शोधून काही शास्त्रीय सिद्धांत किंवा त्याविषयीचे नियम मांडणे शक्य झाले. पण आपली पृथ्वी संपूर्ण विश्वाच्या मध्यभागी नाही, सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणा-या अनेक ग्रहांमधली ती एक आहे हा विचार मात्र ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीच्या विरोधात आहे असा निर्णय प्रतिगामी विचारांच्या तत्कालिन धर्मगुरूंनी दिला आणि दोनशे वर्षे त्या विचाराला कडाडून विरोध केला. अखेर धर्मगुरूंची सत्ताच कमजोर झाल्यानंतर तो विचार आणि त्याला अनुसरून मांडलेला सिद्धांत सर्वमान्य झाला.




मुळात आभाळातले कोणतेही ग्रह अधून मधून वक्री होऊन उलट दिशेने का जातांना दिसतात यावर विचार करतांनाच सूर्यमालिकेची कल्पना शास्त्रज्ञांना सुचली होती आणि त्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर त्यातून मिळाले होते. मंगळाच्या बाबतीत वर दिलेल्या विचित्र गोष्टी का घडतात यासाठी वर दिलेली आकृती पाहू. या चित्रात दाखवल्याप्रमाणे मध्यभागी असलेल्या सूर्याला पृथ्वी आणि मंगळ हे ग्रह आपापल्या कक्षांमधून प्रदक्षिणा घालत असतात. पहिल्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे कोणे एके दिवशी सूर्य, पृथ्वी आणि मंगळ हे तीघेही एका सरळ राशीत आहेत असे समजले (तसे दर दोन वर्षात एकदा होत असते) तर एक वर्षानंतर सूर्याभोवती फिरून पृथ्वी पुन्हा पूर्वीच्याच जागी परत येईल, पण मंगळाला त्याच्या मोठ्या कक्षेमधून हा प्रवास करायला जवळ जवळ दुप्पट वेळ लागत असल्यामुळे एका वर्षानंतर तो आकृती क्र.२ मध्ये दाखवलेल्या जागी असेल. अर्थातच त्या वेळी पृथ्वी आणि मंगळ यांच्यामधले अंतर अनेकपटीने जास्त झालेले असेल. त्यामुळे आपल्याला तो आकाराने लहान आणि फिक्कट दिसेल. त्या काळात पृथ्वीवरून पाहता तो सूर्याच्या जवळ दिसत असल्यामुळे त्याच्या सोबतीने उगवेल आणि मावळेल आणि त्याच्या प्रखर उजेडात बहुधा दिसणारच नाही. यामुळे सुमारे महिनाभर आपल्याला मंगळ ग्रहसुद्धा बुधाप्रमाणे दिसलाच तरी क्वचितच दिसेल. याउलट जेंव्हा तो आकृती क्र.१ मध्ये दाखवलेल्या जागी असेल तेंव्हा तो पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे त्याचे बिंब मोठे आणि अधिक प्रकाशमान दिसेल आणि सूर्याच्या विरुद्ध दिशेला असल्याकारणाने रात्रभर दिसत राहील. अमक्या अमक्या तारखेला मंगळ ग्रह चंद्राइतका मोठा दिसणार आहे अशा प्रकारच्या वावड्या अनेक वेळा उडवल्या जातात, माझे काही मित्रसुद्धा असा ईमेल्स मला फॉरवर्ड करतात आणि दरवेळी ते कसे अतिरंजीत आहे हे मला त्यांना समजाऊन सांगावे लागते असे घडत आले आहे. 

पृथ्वी आणि मंगळ हे ग्रह आपापल्या कक्षांमधून सतत पुढे पुढे जात असतात. त्यामुळे पृथ्वीवरून पाहतांना आपल्याला मंगळ हा ग्रह पृथ्वीच्या सापेक्ष गतींने जातांना दिसत असतो. पृथ्वी आणि मंगळ हे दोन्ही ग्रह आकृती क्र.१ मध्ये दाखवलेल्या जागी असतांना एकाच दिशेने (आकृतीमध्ये वरच्या बाजूला) जात असतात आणि त्यात पृथ्वीची गति थोडी जास्त असल्यामुळे आपल्याला मंगळ ग्रह उलट दिशेने मागे मागे जात आहे असे दिसते. रस्त्यावरून जातांना आपण एकाद्या मोटारीला ओव्हरटेक करून पुढे जातो तेंव्हा ती गाडी मागे जात आहे असे मोटारीमधून पाहणा-याला वाटते तसे हे आहे. याच्या उलट हे ग्रह आकृती क्र.२ मध्ये दाखवलेल्या जागी असतील तर ते उलट दिशांना (आकृतीमध्ये पृथ्वी वरच्या बाजूला आणि मंगळ खालच्या दिशेला) जात असल्यामुळे आपल्याला मंगळ हा ग्रह दुप्पट वेगाने जातांना दिसेल. रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या माणसापेक्षा मोटारीत बसलेल्या माणसाला समोरून येणारी गाडी जास्त वेगाने येत आहे असे वाटते, तसेच हेही आहे. अशा प्रकारे निरनिराळ्या कालखंडात हे दोन ग्रह ज्या जागांवर असतील त्यानुसार आपल्याला मंगळाचा वेग कमी किंवा जास्त होतांना दिसतो. तो कमी कमी होत शून्यावर येऊन मंगळाने दिशाच बदललेली आपल्याला दिसते. त्याच प्रमाणे यथावकाशाने त्याचा उलट दिशेचा वेग पुन्हा कमी होत शून्यावर येऊन तो पुन्हा दिशा बदलतो आणि मूळ दिशेच्या मार्गी लागतो म्हणजे नेहमीप्रमाणे पुढे जाऊ लागतो. हा ग्रह वेगांने पुढे जात असतांना एकादी रास महिनाभरातच ओलांडून पलीकडे जातो तर कधी एकाद्या राशीत हळू हळू दहा पंधरा दिवस पुढे गेल्यावर मागे वळून हळूहळू सरकत आधीच्या राशीत प्रवेश करतो, तिथे काही दिवस घालवल्यावर घूम जाव करून पुन्हा पुढे सरकत पूर्वीच्या जागी जाऊन आणखी काही काळानंतर त्याच्या पुढल्या राशीत जातो. हे करतांना पाचसहा महिनेही उलटून जातात. हे सगळे दर दोन वर्षांच्या कालावधीत घडत असल्यामुळे निरीक्षकांना ते सहजपणे जाणवते.

पृथ्वीपेक्षा एवढा लहान असूनसुद्धा मंगळाकडे फोबोस आणि डीमॉस नावाचे दोन दोन चंद्र आहेत, पण ते आपल्या चंद्रासारखे सुंदर गोल नसून बेढब ओबडधोबड आकारांचे आहेत आणि आकाराने ते फक्त काही किलोमीटर्स इतके लहान आहेत. त्यामुळे त्यांना मोठ्या उल्का (अॅस्टरॉइड) असेसुद्धा म्हणता येईल. त्यातला फोबोस हा उपग्रह मंगळाभोवतालच्या आकाशात पश्चिमेकडून पूर्वेकडे अशा उलट दिशेने फिरत असतो आणि फक्त ११ तासात त्याला पूर्ण प्रदक्षिणा घालतो. डीमॉस हा उपग्रह सुमारे ३० तासात प्रदक्षिणा घालत असला तरी मंगळ ग्रह स्वतःभोवती साडेचोवीस तासात फिरत असल्यामुळे तो उपग्रह आभाळातून खूप हळूहळू सरकतांना दिसतो आणि रोज रोज न उगवता तब्बल साडेपाच दिवसांमध्ये एकदाच उगवतो पावणेतीन दिवस आणि रात्री आभाळात इकडून तिकडे जातो आणि मावळल्यानंतर पुन्हा पावणेतीन दिवस त्याचा पत्ताच नसतो. 

माणसाने चंद्रावर किंवा त्याच्या जवळपास जाऊन संशोधन करण्याच्या अनेक मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्यानंतर मंगळाकडे आपला मोर्चा वळवला. अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांनी मंगळाकडे याने पाठवली. काही युरोपीय देशांनी संयुक्तपणे मोहिमा राबवल्या. आजमितीला मंगळाच्या भूमीवर फिरत असलेली दोन स्वयंचलित वाहने (रोव्हर्स) आणि त्याच्या भोवताली आभाळात फिरत असलेले तीन कृत्रिम उपग्रह असे पृथ्वीवरील पाच दूत मंगळावर हजर आहेत आणि तिकडची माहिती पाठवत आहेत. जपान आणि चीन या देशांनीसुद्धा मंगळावर आपापली याने पाठवण्याचे प्रयोग केले होते, पण ते यशस्वी ठरले नाहीत. आता दिवाळीमध्ये आपल्या भारताने एक मंगलयान अवकाशात उडवले आहे. अजून पर्यंत ते पृथ्वीच्याच कक्षेत आहे, वर्षभरानंतर मंगळावर जाऊन पोचणार आहे. त्यासंबंधीची माहिती मी एका निराळ्या लेखमालिकेत द्यायचे ठरवले आहे. त्याची पूर्वपीठिका समजण्यासाठी मंगळ या ग्रहाची माहिती या लेखमालिकेत दिली आहे.


.  . . . . .  . . . . . .  . . (समाप्त)    

No comments: