Monday, February 25, 2013

जागतिक मराठी दिवस


दरवर्षी २७ फेब्रूवारी हा दिवस 'जागतिक मराठी दिवस' म्हणून साजरा केला जातो. हे कधीपासून ठरले हे मला माहीत नाही, पण चार वर्षांपूर्वी मी याच ब्लॉगवर त्यानिमित्य एक लेख लिहिला होता. मराठी प्रथम भाषा (मातृभाषा) असणार्‍यांच्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे. त्या वेळी सुध्दा मराठी बोलणार्‍या लोकांची एकूण लोकसंख्या नऊ कोटी इतकी होती, आता थोडी वाढलीच असेल. मराठी भाषा सुमारे १३०० वर्षांपासून प्रचलित आहे असे आतापर्यंत मिळालेल्या ऐतिहासिक पुराव्यांवरून समजले जाते, पण त्याच्याही आधीचे काही नवे पुरावे मिळाले असल्याचे नुकतेच वर्तमानपत्रात वाचले. ते कितपत ग्राह्य आणि विश्वसनीय आहेत हे त्या विषयामधले तज्ज्ञच सांगू शकतील. महाराष्ट्राबाहेर गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू व छत्तीसगढ राज्यात आणि दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासीत प्रदेशातील काही भागात मोठ्या प्रमाणात मराठी बोलली जाते. पण मराठी भाषिक लोक अनेक राज्यात राहतात हे जितके खरे आहे, त्यापेक्षाही खूप मोठ्या प्रमाणात अमराठी भाषिक लोक महाराष्ट्रात राहतात हे जास्त महत्वाचे आणि आता जाचक वाटायला लागले आहे. भाषावार प्रांतरचना होण्याच्या आधीपासून मुंबईमध्ये मराठी लोकांची संख्या अमराठी लोकांपेक्षा कमी होतीच, पण महाराष्ट्र राज्य निर्माण होऊन पन्नास वर्षे उलटून गेल्यानंतर तिची टक्केवारी वाढण्याऐवजी आणखी कमी झाली आहे. नागपूर ही पूर्वीच्या मध्यप्रांताची राजधानी असल्यामुळे पूर्वीपासूनच तिथे मोठ्या प्रमाणात हिंदी भाषिक लोक राहतात, एवढेच नव्हे तर अनेक नागपूरकर सवयीने हिंदीमधून बोलतात. पण एका काळी पूर्णपणे मराठी असलेली पुणे आणि नाशिक यासारखी शहरेही आता कॉस्मोपॉलिटन होऊ लागली आहेत.

पण यामुळे मराठीचा -हास होऊ लागला आहे अशी जी चिंता व्यक्त केली जाते, किंवा ओरड केली जाते ती मला थोडी अतीशयोक्त वाटते. राज्यामधील किती टक्के लोक मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे असे सांगतात एवढा एकच निकष लावून ती अधोगतीला लागली आहे असे कसे म्हणता येईल? आर्थिक कारणांमुळे इतरभाषिक लोक मोठ्या संख्येने इकडे येऊ लागले आहेत. त्यांच्या येण्यामुळे येथील मराठीभाषिक लोकांची संख्या कमी होत नाही. तसेच अनेक मराठी लोक महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ लागले आहेत, तरीसुध्दा तिकडेही ते मराठीच राहिले आहेत. आणि या स्थलांतराला अलीकडे जास्त वेग आला असला तरी ते काही शतकांपासून चालले आहे.

दुसरी एक ओरड सध्या खूप जोराने होत आहे. ती म्हणजे मराठीभाषिक लोकांची मुले इंग्रजी माध्यमामधून शिकू लागल्यामुळे त्यांना मराठी भाषा लिहिता वाचता येत नाही. त्यामुळे आता यापुढे मराठी भाषाच शिल्लक राहणार नाही इथपर्यंत भविष्यवाणी करणारे महाभाग जिकडे तिकडे आग ओकत असतात. कदाचित त्यांच्या घरामध्ये असे होत असेलही, पण माझ्या आधीच्या पिढीमध्ये जितके लोक शुध्द मराठी भाषा बोलू किंवा लिहू शकत असत हे मी पाहिले आहे आणि माझ्या पुढील पिढीमधील किती मुले ते करू शकतात हे आता पाहतो आहे. लोकसंख्येत झालेली वाढ आणि शिक्षणाचा प्रसार या दोन्हींमुळे यात प्रचंड प्रमाणात भरच पडलेली मला दिसते. मराठी वृत्तपत्रांचा किंवा पुस्तकांचा खप कमी न होता तो कित्येकपटीने वाढला आहे आणि वाढत आहे. मराठी टीव्ही चॅनेल्सची आणि ती पहाणा-यांची संख्याही दिवसेदिवस वाढत आहे. आंतर्जालावरील मराठी संकेत स्थळे (इंटरनेटवरील वेबसाइट्स) आणि त्यांची सभासदसंख्या, मराठी अनुदिन्या (ब्लॉग्ज) वाढत आहेत. हे सगळे कशाचे द्योतक आहे?

आजकालचे लोक मराठी भाषा पूर्वीप्रमाणे नीट बोलत नाहीत असे काही लोकांनी वाटते. त्यांनासुध्दा मला हेच सांगायचे आहे की माझ्या लहानपणी जितकी माणसे शुध्द मराठी बोलत असत त्यांच्या अनेकपटीने अधिक लोक आता प्रमाणभाषेत बोलतांना दिसतात. उदाहरणार्थ आमचे घरकाम करायला येणारी बाई किंवा रस्त्यावर भाजी विकणारा माणूस माझ्या लहानपणी जितकी व्याकरणशुध्द मराठी भाषा बोलत असत त्याच्या तुलनेत तेच काम करणारे आजचे लोक खूप शुध्द बोलतात. मराठी भाषेत इंग्रजी आणि आता हिंदी शब्दांची भेसळ झाल्यामुळे ती भ्रष्ट होऊ लागली आहे असा ओरडा काही शिष्ट लोक करत असतात. त्यांचे तर मला नवल वाटते. रोजच्या उपयोगात नसलेले संस्कृत शब्द मराठीत घुसवले तर ती उच्च प्रतीची होते आणि प्रचलित असे परभाषेतले शब्द वापरले म्हणजे भेसळ हा कुठला न्याय झाला? सर्वांना समजतील अशा त्या नव्या शब्दप्रयोगानेसुध्दा भाषा समृध्दच होत असते. भाषा नदीप्रमाणे प्रवाही असते. नदीमधले पाणी त्याच्यातला थोडा जुना गाळ काठांवर सोडत जाते आणि नव्याने मिसळलेले पदार्थ घेऊन पुढे जाते. त्याचप्रमाणे कालमानानुसार परिस्थिती बदलते तशी भाषासुध्दा हळूहळू बदलत असते, तिच्यात नवे वाक्प्रचार येत असतात, नवे शब्द रूढ होत असतात. जसजशी आपली जीवनशैली बदलत जाते, आपण नव्या वस्तूंचा वापर करतो, त्यांच्या सोबतीने त्यांची नवी नावे येणारच. टूथपेस्टला दंतमंजन कसे म्हणता येईल? वाहक, चालक असले शब्द तयार करण्यापेक्षा ड्रायव्हर, कंडक्टर हे प्रचलित असलेले शब्दच लोक वापरणार. त्याबद्दल नाक मुरडण्यापेक्षा ते शब्द आपले झाले आहेत हे मान्य करणे प्रामाणिकपणाचे होईल.  

अशा प्रकारे थोडा समंजसपणा दाखवला तर मराठी भाषेला कसलाही धोका आहे असे मला तरी वाटत नाही. हा जागतिक मराठी भाषा दिवस कशा रीतीने साजरा होणार आहे आणि त्यामुळे तिची किती प्रगती होणार आहे हे मला ठाऊक नाही. निदान या दिवशी तिचे गुणगान करावे, रडगाणे गाऊ नये असे मला वाटते. कविवर्य स्व.सुरेश भट यांनी मोठ्या अभिमानाने मायमराठीचे केलेले गुणगान नक्कीच स्फूर्तीदायक आहे.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी ,
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या नहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी

येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलखात सादते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

नव्या दमाचे संगीतकार कौशल इनामदार यांनी या गाण्याला अप्रतिम चाल लावून ते अनेक गायकगायिकांकडून गाऊन घेतले आहे. या दव्यावर ते ऐकता येईल.
http://www.aathavanitli-gani.com/Song/Labhale_Amhas_Bhagya

जय मराठी! जय महाराष्ट्र!
 


No comments: