Saturday, February 23, 2013

काळा घोडा (उत्तरार्ध)



काळा घोडा इथली जहांगीर आर्ट गॅलरी म्हणजे तर चित्रकलेची पंढरी आहेच, शिवाय जवळच एनजीएमए (National Gallery of Modern Art) ही खास नवचित्रकलेची गॅलरी आहे, शिवाय बजाज आर्ट गॅलरी आणि फुटपाथवरील पेव्हमेंट आर्ट गॅलरीदेखील आहेत. बाजूला सुप्रसिध्द आणि भव्य असे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (पूर्वीचे Prince of Wales Museum) आहे, त्याच्या आवारात पूर्वी बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटी होती, कदाचित अजूनही असेल. जहांगीर आर्ट गॅलरीच्या दुस-या बाजूला मॅक्समुल्लर भवनामध्ये इंडोजर्मन आर्ट सेंटर आहे, त्याच्या समोरील बाजूला असलेले र्‍हिदम हाऊस हे संगीताशी जुळलेले आहे आणि त्याच्या शेजारील कपूर लँपशेड हे दुकान खास वैशिष्ट्यपूर्ण अशा लँपशेड्ससाठी प्रसिध्द आहे. एके काळी दिवाणखान्याच्या सजावटीमध्ये छताला टांगलेल्या हंड्या, झुंबरे वगैरेचे जे महत्व होते ते आताच्या इंटिरियर डेकोरेशनमध्ये लँपशेड्सना आहे. रीगल सिनेमा थिएटरही जवळच आहे. अशा प्रकारे काळा घोडा हे ठिकाण मुंबईच्या कला आणि सांस्कृतिक जीवनाच्या केन्द्रस्थानी आहे असे म्हणता येईल.

याच कोप-यावर एस्प्लेनेड मॅन्शन नावाची एकोणीसाव्या शतकातली एक पुरातन इमारत आहे. मी या भागात नोकरीला असतांना रोजच या जीर्णावस्थेतल्या इमारतीच्या बाजूने जात येत होतो, पण मुंबई आणि भारताच्या सांस्कृतिक वाटचालीमध्ये त्या इमारतीला केवढे महत्वाचे स्थान आहे याची मला तेंव्हा कल्पनाही आली नाही. अलीकडे झालेल्या मिसळपावच्या कट्ट्यासाठी आम्ही काळा घोड्यापाशी जमलो असतांना रामदास यांनी सांगितले की भारतातला (त्या काळातल्या हिंदुस्थानातला) पहिला वहिला सिनेमाचा शो या इमारतीत दाखवला गेला होता. जेंव्हा चित्रपटच नव्हते तेंव्हा चित्रपटगृहे असण्याचा प्रश्नच नव्हता. अशा काळात कोणा हुशार आणि दूरदर्शी माणसाने इंग्लंडमधून सिनेमा दाखवण्याची यंत्रसामुग्री आणि काही फिल्म्स मागवून घेतल्या. मुंबई शहराच्या उभारणीच्या सुरुवातीच्या काळातले अत्यंत प्रतिष्ठित असे वॅटसन हॉटेल तेंव्हा या इमारतीत होते. त्या हॉटेलमध्ये ही पहिली इंग्रजी फिल्म दाखवण्यात आली. पडद्यावर हलणारी ही चित्रे लोकांना इतकी पसंत पडली की ते खेळ पहायला गर्दी होऊ लागली. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक स्व.दादासाहेब फाळके यांनीसुध्दा त्या इंग्रजी सिनेमावरून प्रेरणा घेतली आणि भारतात अशा प्रकारचे चित्रपट तयार करायचे ठरवले. त्यासाठी त्यांना कोणकोणती दिव्ये करावी लागली हे आपण 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' या सिनेमात पाहिले आहेच. सगळ्या अडीअडचणींवर मात करून त्यांनी तयार केलेला 'राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय सिनेमादेखील सर्वात आधी बहुधा त्या वॅटसन हॉटेलमध्येच दाखवला गेला असावा.

निव्वळ 'कला' या विषयाला वेगळा वाहून घेणारा उत्सव साजरा करण्याची कल्पना निघाली, तिला पाठिंबा मिळाला आणि ती प्रत्यक्षात उतरली तेंव्हा 'काला घोडा आर्ट्स फेस्टिव्हल' या नावाने तो उत्सव सुरू झाला आणि गेली काही वर्षे दर वर्षी तो साजरा होत आहे. महालक्ष्मी, प्रभादेवी, हाजी अली, माउंट मेरी यांच्या जत्रा, उरुस वगैरे धार्मिक मेळावे या मुंबईत पूर्वीपासून भरत आले आहेत. फेस्टिव्हल, कार्निवाल, मेला, उत्सव वगैरे नावाने असे इव्हेंट्स जगभरात सगळीकडे साजरे होत असतात, निरनिराळ्या निमित्याने प्रदर्शने, एक्झिबिशन्स भरवली जातात, कॉन्फरन्सेस, सेमिनार, वर्कशॉप्स वगैरे होत असतात. या सगळ्यामागे उत्साह, ऊर्मी आणि उत्सवप्रियतेचा भाग असतो. काला घोडा फेस्टिव्हलमध्येही या सगळ्यांमधला अंश दिसतो.

दर वर्षी या फेस्टिव्हलबद्दल वर्तमानपत्रात वाचण्यात आणि टेलिव्हिजनवर पाहण्यात येत असे आणि त्याच्याबद्दल कुतूहल वाटत असे, पण त्या कालावधीत कोठल्याही कामासाठी त्या बाजूला जायची गरज पडली नाही आणि हातातली महत्वाची कामे सोडून मुद्दाम त्यासाठी एक दिवस खर्च करणे शक्य नव्हते किंवा तेवढे जबर आकर्षणही वाटले नसेल. अलीकडच्या काळात ही सबब नव्हती, पण काही वेगळ्या अडचणी आल्यामुळे राहून गेले होते. या वर्षी मात्र मिसळपाववरील अज्ञात मित्रमैत्रिणींना भेटणे आणि काला घोडा फेस्टिव्हलमधले अनाकलनीय कलाविष्कार पाहणे असा 'टू इन वन' योग जुळून आला आणि आयत्या वेळी त्यात कसला खोडा न आल्याने ते करणे साध्यही झाले.

आजकाल दहशतवाद फार बोकाळला असल्यामुळे सगळीकडेच सुरक्षाव्यवस्था ठेवणे भाग पडते. हा फेस्टिव्हल ज्या जागेत साजरा होत होता, तिथे सगळ्या बाजूंनी उंच कुंपण घालून तिला बंदिस्त केले होते आणि सर्व बाजूंनी पहारा ठेवला होता. आत जाण्यापूर्वी प्रत्येक माणसाची आणि त्याच्या सामानाची तपासणी करूनच त्याला प्रवेश दिला जात होता. प्रवेश केल्यानंतर समोरच भारतीय सिनेमाचे शतक साजरे करणारे इन्स्टॉलेशन होते. गेल्या कित्येक वर्षांमधल्या गाजलेल्या सिनेमांमधल्या पात्रांची कटआउट्स त्यात लावली होती. यातली दृष्ये मॉडर्न नसल्यामुळे समजत होती आणि मदर इंडिया, मेरा नाम जोकर वगैरे पात्रांना सहजपणे ओळखताही येत होते.    


ज्यांना शिल्प असे म्हणणे कदाचित धार्ष्ट्याचे होईल अशा अनेक त्रिमिती आकृत्यांनी इन्स्टॉलेशन्स या नावाने बरीचशी जागा व्यापली होती. आत जाताच सुरुवातीलाच एका जागी सात आठ आडव्या रांगांमध्ये प्रत्येकी शंभर दीडशे बांगड्या मांडून ठेवल्या होत्या. त्यातल्या प्रामुख्याने फिक्या रंगांच्या बांगड्यांमध्ये अधून मधून काही गडद रंगांच्या बांगड्या पेरलेल्या होत्या. फिक्या पार्श्वभूमीवर गडद रंगाने काही आकृत्या काढल्या असाव्यात. पण मला तरी त्यांचा अर्थ समजला नाही. जवळच उभ्या असलेल्या दाढीधारी मिपाकराला यातून काय बोध होतो असे विचारताच त्यानेही ते आकलनाच्या पलीकडे असल्याचे सांगितले. त्याची दाढी तो कलाकार असल्याचे द्योतक नसावी एवढाच बोध मला झाला. का ठिकाणी रिकाम्या कॅन्सचा उंच बुरुज बांधला होता आणि त्यातच निरनिराळ्या रंगाच्या कॅन्स वापरून काही आकृत्या काढल्या होत्या. आणखी एका  ठिकाणी हजारो पाण्याच्या रिकाम्या बाटल्या एकावर एक रचून ठेवल्या होत्या, तर दुसरीकडे अशाच हजारो बाटल्या दोरांना लटकवून ठेवला होता. त्या माळांच्या आत शिरून त्यांना चहू बाजूला पाहण्याची सोयही ठेवली होती. दो-या आणि गाठोड्यांनी बनवलेला एक लांबलचक झोपाळा दोन झाडांमध्ये टांगला होता आणि त्याला अनेक टोप्या, खेळणी यासारख्या कित्येक वस्तू टांगून ठेवल्या होत्या.

तिथे ठेवलेली काही इन्स्टॉलेशन्स हातभर, काही पुरुषभर तर काही मोठमोठ्या खोल्यांएवढ्या आकाराची होती. त्यांच्यामधली विविधता मात्र अपूर्व होती. बांगड्या, बाटल्या, बुचे, स्टूल, खुर्च्या आदि अगदी वाट्टेल त्या वस्तूंपासून ती बनवली होती, त्यात एक स्कूटर, मोटर कार आणि ऑटोरिक्शासुध्दा निराळी रूपे घेऊन उभ्या होत्या. एका स्कूटरला मोठ्या किड्याचा आकार दिला होता. माऊसच्या आकाराचे डबे एकमेकांना जोडून त्यातून अनेक किडे बनवले होते. एका कारला चिल्लर नाणी चिकटवून दिली होती. अर्थव्यवस्थेत बदल हवा असा संदेश यातून दिला होता म्हणे.

यातली काही रूपे नयनमनोहर होती, काही थक्क करणारी होती, खोके बनवायच्या ब्राउन पेपरच्या सपाट व जाड पुठ्ठ्याचे निरनिराळे आकार कापून आणि ते एकमेकांमध्ये अडकवून तयार केलेला प्रमाणबध्द आकाराचा घोडा अप्रतिम दिसत होता. याच पध्दतीने तयार केलेल्या इतर सुबक आकृत्या त्याच्या आजूबाजूला ठेवलेल्या होत्या. झूल घातलेला आणि शिंगांपासून खुरांपर्यंत सजवलेला एक महाकाय नंदीबैल सुरेख दिसत होता. दहा फूट उंच मुंबईचा सुप्रसिध्द डबेवाला उठून दिसत होता.

काही शिल्पे विचार करायला लावणारी होती. सगळ्या बाजूंनी तारांनी गुंडाळलेली माणसे कदाचित नेटअॅडिक्ट लोकांची प्रतीके असावीत. नारीशोषणावर भाष्य करणारी कलाकृती विदारक तशीच हृदयस्पर्शी होती.

मोबाईल फोनवर बोलत असतांना कार चालवल्यामुळे अपघात होऊन मृत्यूमुखी पडणे ही दुर्दैवी घटना एका सूचक शिल्पातून चांगली ठसवली होती. DhAnda या सहा इंग्लिश अक्षरांच्या आकाराच्या स्काय स्क्रॅपर इमारतींच्या संचामध्ये प्रत्येक इमारतीत अनेक माणसांच्या आकृत्या चितारल्या होत्या आणि त्या उंच बिल्डिंग्जच्या पायाशी झोपडपट्टी वसलेली दिसत होती. त्यातून कसलासा सोशल मेसेज असणार.

कागद, पुठ्ठा, कापड, लाकूड, भुसा, प्लॅस्टिक, पत्रा वगैरे अनेक प्रकारच्या कच्च्या मालामधून तयार केलेला आणि अनेक डोकी असलेला एक राक्षसासारखा दिसणारा अगडबंब आकार होता, त्याच्या एका डोक्यावर शिंगे आणि ओठात चिरूटासारखे काही तरी धरलेले होते, पण त्याचा चेहेरा पाहून मला तरी भीती वाटण्याऐवजी त्याची (आणि इतक्या प्रयासाने त्याला बनवणा-या कलाकाराची) दया आली. अशी काही हिडीस आणि किळसवाणी शिल्पे होती. अनाकलनीय आणि अमूर्त अशा इन्स्टॉलेशन्सची संख्या फार मोठी होती. त्याबद्दल काहीही लिहिणे मला शक्य नाही.

काळाघोडा इथेच सुप्रसिध्द जहांगीर आर्ट गॅलरी असल्यामुळे आणि हा आर्ट फेस्टिव्हल असल्याने इथे मॉडर्न आर्टमधली चित्रेच मांडून ठेवलेली असावीत अशी माझी कल्पना होती. तशी त्या ठिकाणी बरीचशी चित्रे दिसली, पण एकंदर प्रदर्शनात त्यांचा वाटा कमीच होता. 

याशिवाय तिथे मोठी जत्रा होती. निरनिराळ्या आकारांच्या अनेक वस्तूंची विक्री होत होती. त्यात काही शोभेच्या वस्तू होत्या. त्यातसुध्दा शोकेसमध्ये ठेवण्याजोग्या, जमीनीवर उभ्या करून ठेवायच्या, भिंतींवर चिकटवून किंवा खिळ्यांना अडकवून ठेवायच्या, दारावर तोरणासारख्या बांधायच्या किंवा छतापासून लोंबत ठेवायच्या असे अनेक प्रकार होते. पूर्वी जमीनीवर पसरत असत तसले गालिचे हल्ली भिंतींना झाकण्यासाठी वापरतात. त्यामुळे वस्तू पाहून तिचा उपयोग नक्की कशा प्रकारे होणार आहे हे सांगता येत नाही.

या प्रदर्शनामधील दुकानांमध्ये उपयोगाच्या सुध्दा असंख्य वस्तू होत्या. त्यातसुध्दा रुमाल, पिशव्या, झोळे यापासून कपडे, दागीने, कप, बशा, किटल्या, सुरया वगैरेंचे अनंत प्रकार दिसत होते. त्यांच्या किंमती मात्र अव्वाच्या सव्वा ठेवलेल्या होत्या. सुबक आकाराचे आणि सुंदर नक्षीकामाने सजवलेले चार पाच संपूर्ण टी सेट जेवढ्यात येतील तेवढ्या किंमतीत एक वेडावाकडा मग आर्टिस्टिक म्हणून विकत घेणारे धन्य महाभाग पहायला मिळाले.   

या वस्तूंइतकेच तिथले काही प्रेक्षकसुध्दा प्रेक्षणीय होते. एकंदरीत पाहता दोन घटका मजेत घालवायला चांगली जागा होती. काला घोडा फेस्टिव्हलमध्ये संगीत, नृत्य, नाट्य वगैरेंचासुध्दा समावेश होतो, पण त्या ठिकाणी मोठा मंच आणि खूप प्रेक्षक बसू शकतील एवढी रिकामी जागा दिसली नाही. हे कार्यक्रम बहुधा दुस-या जागी आणि रात्री होत असावेत. ते आटोपून खूप उशीरा घरी परत जाण्याएवढा स्टॅमिना आता माझ्याकडे राहिला नसल्यामुळे, त्यापेक्षा ते दूरदर्शनच्या भारती वाहिनीवर पाहणेच मी पसंत करतो.

ज्या पुतळ्यामुळे काळाघोडा हे नाव पडले त्याची आता कोणाला आठवणही राहिली नसेल आणि नव्या पिढीला त्याची माहितीही असणार नाही. मुंबईतल्या फोर्ट भागामधला एक चौक एवढेच त्यांना माहीत असते. आता त्याच्या नावाने भरत असलेल्या फेस्टिव्हलमुळे एरवी तिकडे न फिरकणारेही एकाद दुसरी फेरी मारून येतात. त्यातून काळा घोडाला थोडी प्रसिध्दी मिळू लागली आहे.


या लेखामधील चित्रे मिपाच्या सौजन्याने दिली आहेत.



No comments: