Tuesday, February 19, 2013

छत्रपती शिवाजी महाराजांची गीते

आज शिवजयंतीनिमित्याने छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम. त्यांची काही सुप्रसिध्द गीते आज सादर करीत आहे. या सर्व गीतांना पं.हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत दिग्दर्शन लाभले आहे आणि लतादीदींच्या मधुर आवाजाने त्यांना अजरामर केले आहे. ही काव्येसुध्दा अलौकिक व्यक्तींनी लिहिलेली आहेत. ही सर्व गाणी आणि इतर काही गाणी शिवकल्याणराजा  या आल्बममध्ये आहेत
https://www.youtube.com/watch?v=jGev5X9YgbQ

यातले अंगाईगीत शब्दप्रभू स्व.राम गणेश गडकरी यांनी सुमारे सत्तर ऐंशी वर्षांपूर्वी लिहिले आहे.दोन पदे शिवरायांच्याच काळातल्या समर्थ रामदासस्वामींनी लिहिली होती आणि चारशे वर्षांनंतरसुध्दा ती टिकून राहिली आहेत आणि आपल्याला महाराजांच्या काळात घेऊन जातात.


---------
एक गीत शिवछत्रपतींच्या काळातल्या भूषण या कवीने हिंदी भाषेत लिहिले आहे.
सेर सिवराज है
इंद्र जिमी जम्भ पर बाड्व सुअम्ब पर
रावण सदम्भ पर रघुकुलराज है ||१||
पौन बरिवाह पर | संभु रतिनाह पर |
ज्यो सहसबाह पर | राम द्विजराज है ||२||
दावा द्रुम दंड पर | चिता मृग झुंड पर |
भूषण बितुंड पर | जैसे मृगराज है ||३||
तेजतमअंस पर | कान्ह जिमी कंस पर |
त्यों म्लेंछ बंस पर| सेर सिवराज है ||४||
-कविराज भूषण
--------------

दोन पदे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अशीच सत्तर ऐंशी वर्षांपूर्वी लिहिली आहेत. त्या पारतंत्र्याच्या काळात  त्यांनी तत्कालीन जमतेला शिवाजी महाराजांच्या उदाहरणाने एक आदर्श राजा दाखवला आहे.या गीतांशिवाय खाली दिलेली अप्रतिम गीते या आल्बममध्ये आहेत . यातली दोन कविवर्य कुसुमाग्रजांनी आणि एक कवि शंकर वैद्य यांनी लिहिले आहे.

सरणार कधी रण 

सरणार कधी रण प्रभू तरी
हे कुठवर साहू घाव शिरी

दिसू लागले अभ्र सभोती
विदीर्ण झाली जरी ही छाती
अजून जळते आंतर ज्योती
कसा सावरु देह परी

होय तनूची केवळ चाळण
प्राण उडाया बघती त्यातून
मिटण्या झाले अधीर लोचन
खङग गळाले भूमीवरी

पावन खिंडीत पाऊल रोवून
शरीर पिंजेतो केले रण
शरणागतीचा अखेर ये क्षण
बोलवशील का आता घरी

__ कुसुमाग्रज 
------------------
॥ वेडात मराठे वीर दौडले सात ॥ 
“श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ १ ॥
“ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील
माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात!”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २ ॥
“वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ३ ॥
“जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ४ ॥
“ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा, सरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ५ ॥
“आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ६ ॥
“खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ७ ॥
“दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ८ ॥
- कुसुमाग्रज.
--------------

शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला

शिवप्रभूंची नजर फिरे अन् उठे मुलुख सारा
दिशादिशा भेदीत धावल्या खङगाच्या धारा
हे तुफान स्वातंत्र्याचे
हे उधाण अभिमानाचे
हे वादळ उग्र विजांचे
काळोखाचे तट कोसळले, चिरा चिरा ढळला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला

कडेकपारी घुमू लागले विजयाचे गान
जळल्या रानातूनी उमलले पुन्हा नवे प्राण
रायगडावर हर्ष दाटला, खडाचौघडा झडे
शिंगाच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे
शिवराय भाग्य देशाचे
हे संजीवन प्राणांचे
हे रुप शक्ति-युक्तिचे
हा तेजाचा झोत उफाळुन, सृष्टितुन आला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला

गंगा सिंधू, यमुना गोदा कलशांतुन आल्या
शिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या
धिमी पाऊले टाकित येता रुद्राचा अवतार
अधीर हृदयांतुनी उमटला हर्षे जयजयकार

प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस
सिंहासनाधिश्वर महाराजाधीराज शिवछत्रपती महाराज

शिवछत्रपतींचा जय हो
श्रीजगदंबेचा जय हो
या भरतभूमीचा जय हो
जयजयकारातुनी उजळल्या शतकांच्या माला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला
......  शंकर वैद्य

संपादन  दि. १८ृ०२-२०१९No comments: