Tuesday, February 26, 2013

मराठी भाषा

भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती। तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

सर्व भाषांमध्ये संस्कृत ही प्रमुख, गोड आणि दिव्य भाषा आहे असे या सुभाषिताच्या पहिल्या चरणात म्हंटले आहे. या भाषेत सुभाषितांसारखे मधुर आणि बोधप्रद श्लोकही आहेत, रामायण महाभारतासारखी महाकाव्येही आहेत, वेद, उपनिषदे, स्तोत्रे वगैरे धार्मिक वाङ्मयही आहे आणि शाकुंतलासारखी उत्कृष्ट नाटकेही आहेत. या प्राचीन भाषेमधील शब्दांचे भांडार अपरिमित आहे आणि अर्थपूर्ण असे नवे शब्द तयार करण्याचे सामर्थ्य या भाषेत आहे, मराठी किंवा हिंदीसारख्या तिच्या कन्यांना नवनवीन शब्दांचा पुरवठा संस्कृतमधून आजही होत असतो. उदाहरणार्थ काँप्यूटर आणि इंटरनेट या शब्दांसाठी काढलेले संगणक आणि आंतर्जाल हे प्रतिशब्द संस्कृतजन्यच आहेत. असे सगळे असले तरी किंबहुना त्यामुळेच ही महान भाषा शिकणे सोपे नाही. तिचा अभ्यास करण्यासाठी खूप चिकाटी आणि परिश्रम यांची गरज असते. त्यामुळेच संस्कृत ही शास्त्री, पंडित, विद्वान वगैरेंची भाषा वाटते. ती सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर आहे. 

ही परिस्थिती आजचीच नाही तर आठशे वर्षांपूर्वीसुध्दा अशीच होती. व्याकरणाच्या नियमांनी बध्द अशी संस्कृत भाषा समाजातल्या मूठभर लोकांची मक्तेदारी झाली होती. संस्कृत भाषेमधल्या शब्दांचे अपभ्रंश होत गेले, त्यातले काही शब्द लुप्त झाले, इतर भाषांमधून काही शब्द घेतले गेले, अशा रीतीने त्यात बदल होत होत मराठी, हिंदी, बंगाली, गुजराथी वगैरे अनेक निरनिराळ्या भाषा आणि त्यांची विविध रूपे भारताच्या निरनिराळ्या भागात निर्माण झाली होती. महाराष्ट्रातील सामान्य लोकांच्या भाषेला मराठी असे नाव पडले होते.  "संस्कृत भाषा जनांसी कळेना, म्हणून नारायणा दया आली." आणि देवाजीनेच ज्ञानेश्वर अवतार घेऊन भगवद्गीतेचे मराठी भाषेत निरूपण केले. असे एका अभंगात म्हंटले आहे. ते महान कार्य करतांना ज्ञानेश्वर माउली म्हणतात, "माझा मराठाचि बोलू कवतुके, तरी अमृता पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन।" मराठी भाषेबद्दल ते लिहितात, "जैसी पुष्पामाजी पुष्प मोगरी, की परिमळामाजी कस्तुरी, तैसी भाषांमाजी साजिरी, मराठीया।" त्या काळात प्रचलित असलेल्या बोलीभाषेतून शब्दांची अचूक निवड करून संत ज्ञानेश्वरांनी उच्च दर्जाचे लेखन केले. त्यानंतरच्या काळात मराठी भाषेत आणखी बदल होतच गेले आणि सामाजिक वातावरणही बदलत गेल्यामुळे त्यांनी सोपी म्हणून लिहिलेली पण साजिरी अशी अलंकारिक मराठी भाषा आज आपल्याला नीट समजत नाही. आताच्या काळात ती समजण्यासाठी ज्ञानेश्वरीच्या 'सार्थ' आवृत्या काढाव्या लागल्या. पण ते लेखन वाचण्यासाठी सुध्दा तशा प्रकारच्या वाचनाच्या सरावाची आवश्यकता असते आणि वाचकाने साक्षर आणि सुशिक्षित तर असायलाच हवे.

खेड्यांमधली काही जनता अजून निरक्षर आहे. माझ्या लहानपणी खेड्यांमध्ये शिक्षणाच्या सोयीच नसल्यामुळे बहुतेक सगळेच ग्रामीण लोक निरक्षर असायचे. तरीही ते आपसात भरपूर बोलत असत. त्यांच्या आजूबाजूच्या भागातली जमीन, डोंगर, नद्या, त्यातल्या वनस्पती, पशुपक्षी, माणसे, शेजारी पाजारी, आप्तेष्ट, मित्र, ते स्वतः याबद्दल त्यांना जे वाटत असेल, त्यांचे अनुभव, त्यांना वाटणारा आनंद, दुःख, आश्चर्य, भीती, चिंता वगैरे सगळे ते लोकसुध्दा बोलण्यामधून व्यक्त करतच असत, आजही करतात. त्यांच्या वापरातले शब्द, वाक्यरचना वगैरे गोष्टी ते कोठल्याही शाळेत न जाताच आपल्या आजूबाजूच्या लोकांचे बोलणे ऐकून त्यातून शिकतात. त्यांच्या बोलीला कुठले नाव आहे किंवा नाही हेसुध्दा ते सांगू शकणार नाहीत आणि त्यातल्या प्रत्येक बोलीला वेगळे नाव असण्याची काही गरजही नाही. संभाषण अर्थपूर्ण होण्यासाठी एकाने सांगितले ते ऐकणा-या इतरांना समजले एवढेच पुरेसे आहे. पण त्या ऐकणा-यांनी ते सांगणे आणखी काही लोकांना सांगितले, त्यांनी आणखी कोणाला अशा प्रकारे ते पसरत गेल्यानंतर त्याचा अर्थ बदलू शकतो किंवा त्यातून चुकीचा अर्थ निघू शकतो. पण एका भागात रहाणारे लोक एकमेकांचे बोलणे ऐकून ते शिकतात आणि तसेच बोलतात यामुळे त्या भागात त्यातल्या शब्दांच्या अर्थाबद्दल सर्वसाधारणपणे सहमती असते. अशा प्रकारे बोली बनतात.

प्रत्यक्ष बोलण्याऐवजी काही लिहून ठेवायचे असेल आणि नंतर कधी तरी ते वाचतांना वाचकाला ते समजायचे असेल तर त्यासाठी काही नियमानुसार ते लिहिणे गरजेचे असते. वाचकाला काही समजलेच नाही तर तो मजकूर लिहून ठेवण्याचा काही उपयोग होणार नाही. यात आणखी एक मेख अशी आहे की लिहिणारे आणि वाचणारे सगळे लोक एकाच भागात आणि एकाच काळात रहाणारे असतीलच असे नाही. त्यामुळे हे नियम स्थळकाळानुसार शक्यतो बदलू नयेत. अशा प्रकारे शाश्वत प्रकारच्या काही नियमांनुसार केल्या गेलेल्या अभिव्यक्तीच्या या माध्यमालाच 'भाषा' असे नाव दिले गेले. त्याचा अभ्यास करणा-या विद्वान मंडळींच्या विचार विनिमयातून ठराविक नियमांचे पालन करून लिहिल्या जाणा-या 'प्रमाणभाषा' ठरवल्या गेल्या आणि मुद्रण, प्रकाशन वगैरे व्यवसाय सुरू झाल्यानंतर प्रकाशित होणारे सर्व वाङ्मय लेखकांनी त्यानुसार लिहावे असे ठरले गेले. ही प्रक्रिया दीर्घ काळ चालत असते. मराठी नावाची अशीच एक प्रमाणभाषा शालेय शिक्षण देतांना सर्व विद्यार्थ्यांना शिकवली जाते आणि तिच्या माध्यमातून इतर सारे विषय शिकवले जातात. ही प्रमाणभाषा शिकलेले महाराष्ट्रात किंवा त्याच्या बाहेर, अगदी परदेशात रहात असलेले मराठी भाषिक लोक ते लेखन वाचून त्याचा अर्थ समजून घेऊ शकतात.

असे असले तरी प्रत्यक्ष जीवनात संभाषण करतांना कोणालाही काही तरी सांगायचे किंवा विचारायचे असते आणि ते ऐकणा-याला कळावे हा उद्देश असतो. संभाषणामधले बोलणे व्याकरणशुध्द आहे की नाही, ते अलंकारिक आहे का वगैरे विचार करायला वेळ नसतो आणि त्या गोष्टींना महत्व नसते. तेंव्हा ही प्रमाणभाषा बाजूला ठेवून त्या भागात प्रचलित असलेली भाषा सगळे लोक बोलतात. सावंतवाडी, डहाणू, चंद्रपूर आणि सोलापूर या गावांमधले लोक एकमेकांशी निरनिराळ्या स्थानिक बोलींमध्ये बोलतात, शिवाय मुंबईपुण्यासारखी शहरे आणि लातूर किंवा सिंधूदुर्ग जिल्ह्यातले एकादे बुद्रुक किंवा खुर्द अशा ठिकाणी राहणा-या लोकांच्या बोलण्यात येणारे शब्द आणि त्यांचे उच्चार यात बराच फरक असतो. कथा, कादंब-या, नाटके, चित्रपट वगैरेंमध्ये प्रत्यक्ष जीवनाचे प्रतिबिंब दाखवतांना निरनिराळ्या खेड्यातल्या किंवा शहरातल्या लोकांचे संवाद त्यांच्या बोलीमध्येच लिहिले किंवा बोलले जाऊ लागले. काही लेखकांनी ग्रामीण भाषेतच लिहायची शैली निवडली आणि वाचकांनाही ते आवडले. त्यातल्या बोलीभाषा प्रमाणभाषेपासून मात्र खूपच वेगळ्या असतात.

बोलतांना आपण बहुतेक वेळा कामापुरतेच बोलत असतो, पण लेखन करतांना त्यात लालित्य आणले जाते. ते वाचल्यामुळे वाचकाला आनंद मिळावा, स्फूर्ती मिळावी, त्याचे मनोरंजन व्हावे, त्याने थरार अनुभवावा, त्याच्या ज्ञानात भर पडावी, त्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे सापडावीत, त्याला सावध करावे, मार्गदर्शन मिळावे असे अनंत प्रकारचे उद्देश लेखकाच्या मनात असतात, त्याच्या कल्पनेच्या भरा-या त्याच्या लेखनात उतरतात आणि हे साध्य करण्यासाठी भाषा हे माध्यम जितके समृध्द असेल तितके ते लेखन प्रभावी ठरते आणि त्या लेखनातून ती भाषा अधिक समृध्द होते. साहित्यकृतींमधली ही मराठी भाषा रोजच्या बोलण्यापेक्षा किती तरी वेगळी असते.

मराठी भाषेतले असे इतके प्रकार दिसत असतांना यातली कोणतीही एक भाषा मराठी आहे असे म्हणता येणार नाही. आज जी प्रमाणभाषा मानली जाते तीच फक्त मराठी आहे असे म्हंटले तर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आदी कवींनी इतिहासकाळामध्ये केलेल्या महान रचना कोणत्या भाषेत आहेत? आजच्या प्रमाणभाषेत (किंवा हा लेख जसा लिहिला आहे तसे) आपण एकमेकांशी कधी तरी बोलतो का?  "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी।।"   असे लिहितांना कवीवर्य स्व.सुरेश भट यांना कोणती मराठी अभिप्रेत होती? ज्या कवीवर्य स्व.कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाचे दिवशी आपण हा जागतिक मराठी दिवस साजरा करत आहोत त्यांनी मराठी असे भाषेचे नाव न घेता लिहिले आहे, "माझ्या मातीचे गायन, तुझ्या आकाश श्रुतीनी, जरा कानोसा देऊन, कधी ऐकशील का रे।"   मातीतून म्हणजेच या भूमीवरील माणसांच्या बोलण्यातून निघालेले स्वर आकाशातल्या परमेश्वराने लक्षपूर्वक ऐकावेत अशी प्रार्थना त्यांनी या गीतात केली आहे. मातीतून आलेले हे गायन कोणत्या मराठी भाषेतले असेल?

मला तरी असे वाटते की वर दिल्याप्रमाणे सर्व बोलींचा आणि विविध प्रकारच्या लेखनाचा मराठी भाषेमध्ये समावेश होतो. आईला कोणी माय म्हणेल, कोणी अम्मा, कोणी मम्मी, मॉम, तर कोणी आई असेच म्हंटले तरी सर्वांसाठी ती एकच असते. त्याप्रमाणे प्राचीन, आधुनिक, शहरी, ग्रामीण, संस्कृतप्रचुर, इंग्रजाळलेली, हिंदी, गुजराथी, कानडी शब्दांची फोडणी दिलेली अशा अनेक रूपांमध्ये आपली मराठी भाषा आपल्याला ऐकायला मिळते. त्यातली एकच शुध्द आणि इतर सगळ्या अशुध्द असा अट्टाहास धरण्यात काही अर्थ नाही. उद्याचा जागतिक मराठी दिवस हा मराठीच्या या सगळ्या रूपांचा आहे. या सगळ्यांनी मराठी भाषेला समृध्द बनवले आहे. असा विचार केला तर मराठी भाषेच्या भविष्याबद्दल चिंता वाटणार नाही. तिचे रूप बदलत गेले तरी निराळे अस्तित्व टिकूनच राहणार आहे.

Monday, February 25, 2013

जागतिक मराठी दिवस


दरवर्षी २७ फेब्रूवारी हा दिवस 'जागतिक मराठी दिवस' म्हणून साजरा केला जातो. हे कधीपासून ठरले हे मला माहीत नाही, पण चार वर्षांपूर्वी मी याच ब्लॉगवर त्यानिमित्य एक लेख लिहिला होता. मराठी प्रथम भाषा (मातृभाषा) असणार्‍यांच्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे. त्या वेळी सुध्दा मराठी बोलणार्‍या लोकांची एकूण लोकसंख्या नऊ कोटी इतकी होती, आता थोडी वाढलीच असेल. मराठी भाषा सुमारे १३०० वर्षांपासून प्रचलित आहे असे आतापर्यंत मिळालेल्या ऐतिहासिक पुराव्यांवरून समजले जाते, पण त्याच्याही आधीचे काही नवे पुरावे मिळाले असल्याचे नुकतेच वर्तमानपत्रात वाचले. ते कितपत ग्राह्य आणि विश्वसनीय आहेत हे त्या विषयामधले तज्ज्ञच सांगू शकतील. महाराष्ट्राबाहेर गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू व छत्तीसगढ राज्यात आणि दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासीत प्रदेशातील काही भागात मोठ्या प्रमाणात मराठी बोलली जाते. पण मराठी भाषिक लोक अनेक राज्यात राहतात हे जितके खरे आहे, त्यापेक्षाही खूप मोठ्या प्रमाणात अमराठी भाषिक लोक महाराष्ट्रात राहतात हे जास्त महत्वाचे आणि आता जाचक वाटायला लागले आहे. भाषावार प्रांतरचना होण्याच्या आधीपासून मुंबईमध्ये मराठी लोकांची संख्या अमराठी लोकांपेक्षा कमी होतीच, पण महाराष्ट्र राज्य निर्माण होऊन पन्नास वर्षे उलटून गेल्यानंतर तिची टक्केवारी वाढण्याऐवजी आणखी कमी झाली आहे. नागपूर ही पूर्वीच्या मध्यप्रांताची राजधानी असल्यामुळे पूर्वीपासूनच तिथे मोठ्या प्रमाणात हिंदी भाषिक लोक राहतात, एवढेच नव्हे तर अनेक नागपूरकर सवयीने हिंदीमधून बोलतात. पण एका काळी पूर्णपणे मराठी असलेली पुणे आणि नाशिक यासारखी शहरेही आता कॉस्मोपॉलिटन होऊ लागली आहेत.

पण यामुळे मराठीचा -हास होऊ लागला आहे अशी जी चिंता व्यक्त केली जाते, किंवा ओरड केली जाते ती मला थोडी अतीशयोक्त वाटते. राज्यामधील किती टक्के लोक मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे असे सांगतात एवढा एकच निकष लावून ती अधोगतीला लागली आहे असे कसे म्हणता येईल? आर्थिक कारणांमुळे इतरभाषिक लोक मोठ्या संख्येने इकडे येऊ लागले आहेत. त्यांच्या येण्यामुळे येथील मराठीभाषिक लोकांची संख्या कमी होत नाही. तसेच अनेक मराठी लोक महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ लागले आहेत, तरीसुध्दा तिकडेही ते मराठीच राहिले आहेत. आणि या स्थलांतराला अलीकडे जास्त वेग आला असला तरी ते काही शतकांपासून चालले आहे.

दुसरी एक ओरड सध्या खूप जोराने होत आहे. ती म्हणजे मराठीभाषिक लोकांची मुले इंग्रजी माध्यमामधून शिकू लागल्यामुळे त्यांना मराठी भाषा लिहिता वाचता येत नाही. त्यामुळे आता यापुढे मराठी भाषाच शिल्लक राहणार नाही इथपर्यंत भविष्यवाणी करणारे महाभाग जिकडे तिकडे आग ओकत असतात. कदाचित त्यांच्या घरामध्ये असे होत असेलही, पण माझ्या आधीच्या पिढीमध्ये जितके लोक शुध्द मराठी भाषा बोलू किंवा लिहू शकत असत हे मी पाहिले आहे आणि माझ्या पुढील पिढीमधील किती मुले ते करू शकतात हे आता पाहतो आहे. लोकसंख्येत झालेली वाढ आणि शिक्षणाचा प्रसार या दोन्हींमुळे यात प्रचंड प्रमाणात भरच पडलेली मला दिसते. मराठी वृत्तपत्रांचा किंवा पुस्तकांचा खप कमी न होता तो कित्येकपटीने वाढला आहे आणि वाढत आहे. मराठी टीव्ही चॅनेल्सची आणि ती पहाणा-यांची संख्याही दिवसेदिवस वाढत आहे. आंतर्जालावरील मराठी संकेत स्थळे (इंटरनेटवरील वेबसाइट्स) आणि त्यांची सभासदसंख्या, मराठी अनुदिन्या (ब्लॉग्ज) वाढत आहेत. हे सगळे कशाचे द्योतक आहे?

आजकालचे लोक मराठी भाषा पूर्वीप्रमाणे नीट बोलत नाहीत असे काही लोकांनी वाटते. त्यांनासुध्दा मला हेच सांगायचे आहे की माझ्या लहानपणी जितकी माणसे शुध्द मराठी बोलत असत त्यांच्या अनेकपटीने अधिक लोक आता प्रमाणभाषेत बोलतांना दिसतात. उदाहरणार्थ आमचे घरकाम करायला येणारी बाई किंवा रस्त्यावर भाजी विकणारा माणूस माझ्या लहानपणी जितकी व्याकरणशुध्द मराठी भाषा बोलत असत त्याच्या तुलनेत तेच काम करणारे आजचे लोक खूप शुध्द बोलतात. मराठी भाषेत इंग्रजी आणि आता हिंदी शब्दांची भेसळ झाल्यामुळे ती भ्रष्ट होऊ लागली आहे असा ओरडा काही शिष्ट लोक करत असतात. त्यांचे तर मला नवल वाटते. रोजच्या उपयोगात नसलेले संस्कृत शब्द मराठीत घुसवले तर ती उच्च प्रतीची होते आणि प्रचलित असे परभाषेतले शब्द वापरले म्हणजे भेसळ हा कुठला न्याय झाला? सर्वांना समजतील अशा त्या नव्या शब्दप्रयोगानेसुध्दा भाषा समृध्दच होत असते. भाषा नदीप्रमाणे प्रवाही असते. नदीमधले पाणी त्याच्यातला थोडा जुना गाळ काठांवर सोडत जाते आणि नव्याने मिसळलेले पदार्थ घेऊन पुढे जाते. त्याचप्रमाणे कालमानानुसार परिस्थिती बदलते तशी भाषासुध्दा हळूहळू बदलत असते, तिच्यात नवे वाक्प्रचार येत असतात, नवे शब्द रूढ होत असतात. जसजशी आपली जीवनशैली बदलत जाते, आपण नव्या वस्तूंचा वापर करतो, त्यांच्या सोबतीने त्यांची नवी नावे येणारच. टूथपेस्टला दंतमंजन कसे म्हणता येईल? वाहक, चालक असले शब्द तयार करण्यापेक्षा ड्रायव्हर, कंडक्टर हे प्रचलित असलेले शब्दच लोक वापरणार. त्याबद्दल नाक मुरडण्यापेक्षा ते शब्द आपले झाले आहेत हे मान्य करणे प्रामाणिकपणाचे होईल.  

अशा प्रकारे थोडा समंजसपणा दाखवला तर मराठी भाषेला कसलाही धोका आहे असे मला तरी वाटत नाही. हा जागतिक मराठी भाषा दिवस कशा रीतीने साजरा होणार आहे आणि त्यामुळे तिची किती प्रगती होणार आहे हे मला ठाऊक नाही. निदान या दिवशी तिचे गुणगान करावे, रडगाणे गाऊ नये असे मला वाटते. कविवर्य स्व.सुरेश भट यांनी मोठ्या अभिमानाने मायमराठीचे केलेले गुणगान नक्कीच स्फूर्तीदायक आहे.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी ,
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या नहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी

येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलखात सादते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

नव्या दमाचे संगीतकार कौशल इनामदार यांनी या गाण्याला अप्रतिम चाल लावून ते अनेक गायकगायिकांकडून गाऊन घेतले आहे. या दव्यावर ते ऐकता येईल.
http://www.aathavanitli-gani.com/Song/Labhale_Amhas_Bhagya

जय मराठी! जय महाराष्ट्र!
 


Saturday, February 23, 2013

काळा घोडा (उत्तरार्ध)



काळा घोडा इथली जहांगीर आर्ट गॅलरी म्हणजे तर चित्रकलेची पंढरी आहेच, शिवाय जवळच एनजीएमए (National Gallery of Modern Art) ही खास नवचित्रकलेची गॅलरी आहे, शिवाय बजाज आर्ट गॅलरी आणि फुटपाथवरील पेव्हमेंट आर्ट गॅलरीदेखील आहेत. बाजूला सुप्रसिध्द आणि भव्य असे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (पूर्वीचे Prince of Wales Museum) आहे, त्याच्या आवारात पूर्वी बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटी होती, कदाचित अजूनही असेल. जहांगीर आर्ट गॅलरीच्या दुस-या बाजूला मॅक्समुल्लर भवनामध्ये इंडोजर्मन आर्ट सेंटर आहे, त्याच्या समोरील बाजूला असलेले र्‍हिदम हाऊस हे संगीताशी जुळलेले आहे आणि त्याच्या शेजारील कपूर लँपशेड हे दुकान खास वैशिष्ट्यपूर्ण अशा लँपशेड्ससाठी प्रसिध्द आहे. एके काळी दिवाणखान्याच्या सजावटीमध्ये छताला टांगलेल्या हंड्या, झुंबरे वगैरेचे जे महत्व होते ते आताच्या इंटिरियर डेकोरेशनमध्ये लँपशेड्सना आहे. रीगल सिनेमा थिएटरही जवळच आहे. अशा प्रकारे काळा घोडा हे ठिकाण मुंबईच्या कला आणि सांस्कृतिक जीवनाच्या केन्द्रस्थानी आहे असे म्हणता येईल.

याच कोप-यावर एस्प्लेनेड मॅन्शन नावाची एकोणीसाव्या शतकातली एक पुरातन इमारत आहे. मी या भागात नोकरीला असतांना रोजच या जीर्णावस्थेतल्या इमारतीच्या बाजूने जात येत होतो, पण मुंबई आणि भारताच्या सांस्कृतिक वाटचालीमध्ये त्या इमारतीला केवढे महत्वाचे स्थान आहे याची मला तेंव्हा कल्पनाही आली नाही. अलीकडे झालेल्या मिसळपावच्या कट्ट्यासाठी आम्ही काळा घोड्यापाशी जमलो असतांना रामदास यांनी सांगितले की भारतातला (त्या काळातल्या हिंदुस्थानातला) पहिला वहिला सिनेमाचा शो या इमारतीत दाखवला गेला होता. जेंव्हा चित्रपटच नव्हते तेंव्हा चित्रपटगृहे असण्याचा प्रश्नच नव्हता. अशा काळात कोणा हुशार आणि दूरदर्शी माणसाने इंग्लंडमधून सिनेमा दाखवण्याची यंत्रसामुग्री आणि काही फिल्म्स मागवून घेतल्या. मुंबई शहराच्या उभारणीच्या सुरुवातीच्या काळातले अत्यंत प्रतिष्ठित असे वॅटसन हॉटेल तेंव्हा या इमारतीत होते. त्या हॉटेलमध्ये ही पहिली इंग्रजी फिल्म दाखवण्यात आली. पडद्यावर हलणारी ही चित्रे लोकांना इतकी पसंत पडली की ते खेळ पहायला गर्दी होऊ लागली. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक स्व.दादासाहेब फाळके यांनीसुध्दा त्या इंग्रजी सिनेमावरून प्रेरणा घेतली आणि भारतात अशा प्रकारचे चित्रपट तयार करायचे ठरवले. त्यासाठी त्यांना कोणकोणती दिव्ये करावी लागली हे आपण 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' या सिनेमात पाहिले आहेच. सगळ्या अडीअडचणींवर मात करून त्यांनी तयार केलेला 'राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय सिनेमादेखील सर्वात आधी बहुधा त्या वॅटसन हॉटेलमध्येच दाखवला गेला असावा.

निव्वळ 'कला' या विषयाला वेगळा वाहून घेणारा उत्सव साजरा करण्याची कल्पना निघाली, तिला पाठिंबा मिळाला आणि ती प्रत्यक्षात उतरली तेंव्हा 'काला घोडा आर्ट्स फेस्टिव्हल' या नावाने तो उत्सव सुरू झाला आणि गेली काही वर्षे दर वर्षी तो साजरा होत आहे. महालक्ष्मी, प्रभादेवी, हाजी अली, माउंट मेरी यांच्या जत्रा, उरुस वगैरे धार्मिक मेळावे या मुंबईत पूर्वीपासून भरत आले आहेत. फेस्टिव्हल, कार्निवाल, मेला, उत्सव वगैरे नावाने असे इव्हेंट्स जगभरात सगळीकडे साजरे होत असतात, निरनिराळ्या निमित्याने प्रदर्शने, एक्झिबिशन्स भरवली जातात, कॉन्फरन्सेस, सेमिनार, वर्कशॉप्स वगैरे होत असतात. या सगळ्यामागे उत्साह, ऊर्मी आणि उत्सवप्रियतेचा भाग असतो. काला घोडा फेस्टिव्हलमध्येही या सगळ्यांमधला अंश दिसतो.

दर वर्षी या फेस्टिव्हलबद्दल वर्तमानपत्रात वाचण्यात आणि टेलिव्हिजनवर पाहण्यात येत असे आणि त्याच्याबद्दल कुतूहल वाटत असे, पण त्या कालावधीत कोठल्याही कामासाठी त्या बाजूला जायची गरज पडली नाही आणि हातातली महत्वाची कामे सोडून मुद्दाम त्यासाठी एक दिवस खर्च करणे शक्य नव्हते किंवा तेवढे जबर आकर्षणही वाटले नसेल. अलीकडच्या काळात ही सबब नव्हती, पण काही वेगळ्या अडचणी आल्यामुळे राहून गेले होते. या वर्षी मात्र मिसळपाववरील अज्ञात मित्रमैत्रिणींना भेटणे आणि काला घोडा फेस्टिव्हलमधले अनाकलनीय कलाविष्कार पाहणे असा 'टू इन वन' योग जुळून आला आणि आयत्या वेळी त्यात कसला खोडा न आल्याने ते करणे साध्यही झाले.

आजकाल दहशतवाद फार बोकाळला असल्यामुळे सगळीकडेच सुरक्षाव्यवस्था ठेवणे भाग पडते. हा फेस्टिव्हल ज्या जागेत साजरा होत होता, तिथे सगळ्या बाजूंनी उंच कुंपण घालून तिला बंदिस्त केले होते आणि सर्व बाजूंनी पहारा ठेवला होता. आत जाण्यापूर्वी प्रत्येक माणसाची आणि त्याच्या सामानाची तपासणी करूनच त्याला प्रवेश दिला जात होता. प्रवेश केल्यानंतर समोरच भारतीय सिनेमाचे शतक साजरे करणारे इन्स्टॉलेशन होते. गेल्या कित्येक वर्षांमधल्या गाजलेल्या सिनेमांमधल्या पात्रांची कटआउट्स त्यात लावली होती. यातली दृष्ये मॉडर्न नसल्यामुळे समजत होती आणि मदर इंडिया, मेरा नाम जोकर वगैरे पात्रांना सहजपणे ओळखताही येत होते.    


ज्यांना शिल्प असे म्हणणे कदाचित धार्ष्ट्याचे होईल अशा अनेक त्रिमिती आकृत्यांनी इन्स्टॉलेशन्स या नावाने बरीचशी जागा व्यापली होती. आत जाताच सुरुवातीलाच एका जागी सात आठ आडव्या रांगांमध्ये प्रत्येकी शंभर दीडशे बांगड्या मांडून ठेवल्या होत्या. त्यातल्या प्रामुख्याने फिक्या रंगांच्या बांगड्यांमध्ये अधून मधून काही गडद रंगांच्या बांगड्या पेरलेल्या होत्या. फिक्या पार्श्वभूमीवर गडद रंगाने काही आकृत्या काढल्या असाव्यात. पण मला तरी त्यांचा अर्थ समजला नाही. जवळच उभ्या असलेल्या दाढीधारी मिपाकराला यातून काय बोध होतो असे विचारताच त्यानेही ते आकलनाच्या पलीकडे असल्याचे सांगितले. त्याची दाढी तो कलाकार असल्याचे द्योतक नसावी एवढाच बोध मला झाला. का ठिकाणी रिकाम्या कॅन्सचा उंच बुरुज बांधला होता आणि त्यातच निरनिराळ्या रंगाच्या कॅन्स वापरून काही आकृत्या काढल्या होत्या. आणखी एका  ठिकाणी हजारो पाण्याच्या रिकाम्या बाटल्या एकावर एक रचून ठेवल्या होत्या, तर दुसरीकडे अशाच हजारो बाटल्या दोरांना लटकवून ठेवला होता. त्या माळांच्या आत शिरून त्यांना चहू बाजूला पाहण्याची सोयही ठेवली होती. दो-या आणि गाठोड्यांनी बनवलेला एक लांबलचक झोपाळा दोन झाडांमध्ये टांगला होता आणि त्याला अनेक टोप्या, खेळणी यासारख्या कित्येक वस्तू टांगून ठेवल्या होत्या.

तिथे ठेवलेली काही इन्स्टॉलेशन्स हातभर, काही पुरुषभर तर काही मोठमोठ्या खोल्यांएवढ्या आकाराची होती. त्यांच्यामधली विविधता मात्र अपूर्व होती. बांगड्या, बाटल्या, बुचे, स्टूल, खुर्च्या आदि अगदी वाट्टेल त्या वस्तूंपासून ती बनवली होती, त्यात एक स्कूटर, मोटर कार आणि ऑटोरिक्शासुध्दा निराळी रूपे घेऊन उभ्या होत्या. एका स्कूटरला मोठ्या किड्याचा आकार दिला होता. माऊसच्या आकाराचे डबे एकमेकांना जोडून त्यातून अनेक किडे बनवले होते. एका कारला चिल्लर नाणी चिकटवून दिली होती. अर्थव्यवस्थेत बदल हवा असा संदेश यातून दिला होता म्हणे.

यातली काही रूपे नयनमनोहर होती, काही थक्क करणारी होती, खोके बनवायच्या ब्राउन पेपरच्या सपाट व जाड पुठ्ठ्याचे निरनिराळे आकार कापून आणि ते एकमेकांमध्ये अडकवून तयार केलेला प्रमाणबध्द आकाराचा घोडा अप्रतिम दिसत होता. याच पध्दतीने तयार केलेल्या इतर सुबक आकृत्या त्याच्या आजूबाजूला ठेवलेल्या होत्या. झूल घातलेला आणि शिंगांपासून खुरांपर्यंत सजवलेला एक महाकाय नंदीबैल सुरेख दिसत होता. दहा फूट उंच मुंबईचा सुप्रसिध्द डबेवाला उठून दिसत होता.

काही शिल्पे विचार करायला लावणारी होती. सगळ्या बाजूंनी तारांनी गुंडाळलेली माणसे कदाचित नेटअॅडिक्ट लोकांची प्रतीके असावीत. नारीशोषणावर भाष्य करणारी कलाकृती विदारक तशीच हृदयस्पर्शी होती.

मोबाईल फोनवर बोलत असतांना कार चालवल्यामुळे अपघात होऊन मृत्यूमुखी पडणे ही दुर्दैवी घटना एका सूचक शिल्पातून चांगली ठसवली होती. DhAnda या सहा इंग्लिश अक्षरांच्या आकाराच्या स्काय स्क्रॅपर इमारतींच्या संचामध्ये प्रत्येक इमारतीत अनेक माणसांच्या आकृत्या चितारल्या होत्या आणि त्या उंच बिल्डिंग्जच्या पायाशी झोपडपट्टी वसलेली दिसत होती. त्यातून कसलासा सोशल मेसेज असणार.

कागद, पुठ्ठा, कापड, लाकूड, भुसा, प्लॅस्टिक, पत्रा वगैरे अनेक प्रकारच्या कच्च्या मालामधून तयार केलेला आणि अनेक डोकी असलेला एक राक्षसासारखा दिसणारा अगडबंब आकार होता, त्याच्या एका डोक्यावर शिंगे आणि ओठात चिरूटासारखे काही तरी धरलेले होते, पण त्याचा चेहेरा पाहून मला तरी भीती वाटण्याऐवजी त्याची (आणि इतक्या प्रयासाने त्याला बनवणा-या कलाकाराची) दया आली. अशी काही हिडीस आणि किळसवाणी शिल्पे होती. अनाकलनीय आणि अमूर्त अशा इन्स्टॉलेशन्सची संख्या फार मोठी होती. त्याबद्दल काहीही लिहिणे मला शक्य नाही.

काळाघोडा इथेच सुप्रसिध्द जहांगीर आर्ट गॅलरी असल्यामुळे आणि हा आर्ट फेस्टिव्हल असल्याने इथे मॉडर्न आर्टमधली चित्रेच मांडून ठेवलेली असावीत अशी माझी कल्पना होती. तशी त्या ठिकाणी बरीचशी चित्रे दिसली, पण एकंदर प्रदर्शनात त्यांचा वाटा कमीच होता. 

याशिवाय तिथे मोठी जत्रा होती. निरनिराळ्या आकारांच्या अनेक वस्तूंची विक्री होत होती. त्यात काही शोभेच्या वस्तू होत्या. त्यातसुध्दा शोकेसमध्ये ठेवण्याजोग्या, जमीनीवर उभ्या करून ठेवायच्या, भिंतींवर चिकटवून किंवा खिळ्यांना अडकवून ठेवायच्या, दारावर तोरणासारख्या बांधायच्या किंवा छतापासून लोंबत ठेवायच्या असे अनेक प्रकार होते. पूर्वी जमीनीवर पसरत असत तसले गालिचे हल्ली भिंतींना झाकण्यासाठी वापरतात. त्यामुळे वस्तू पाहून तिचा उपयोग नक्की कशा प्रकारे होणार आहे हे सांगता येत नाही.

या प्रदर्शनामधील दुकानांमध्ये उपयोगाच्या सुध्दा असंख्य वस्तू होत्या. त्यातसुध्दा रुमाल, पिशव्या, झोळे यापासून कपडे, दागीने, कप, बशा, किटल्या, सुरया वगैरेंचे अनंत प्रकार दिसत होते. त्यांच्या किंमती मात्र अव्वाच्या सव्वा ठेवलेल्या होत्या. सुबक आकाराचे आणि सुंदर नक्षीकामाने सजवलेले चार पाच संपूर्ण टी सेट जेवढ्यात येतील तेवढ्या किंमतीत एक वेडावाकडा मग आर्टिस्टिक म्हणून विकत घेणारे धन्य महाभाग पहायला मिळाले.   

या वस्तूंइतकेच तिथले काही प्रेक्षकसुध्दा प्रेक्षणीय होते. एकंदरीत पाहता दोन घटका मजेत घालवायला चांगली जागा होती. काला घोडा फेस्टिव्हलमध्ये संगीत, नृत्य, नाट्य वगैरेंचासुध्दा समावेश होतो, पण त्या ठिकाणी मोठा मंच आणि खूप प्रेक्षक बसू शकतील एवढी रिकामी जागा दिसली नाही. हे कार्यक्रम बहुधा दुस-या जागी आणि रात्री होत असावेत. ते आटोपून खूप उशीरा घरी परत जाण्याएवढा स्टॅमिना आता माझ्याकडे राहिला नसल्यामुळे, त्यापेक्षा ते दूरदर्शनच्या भारती वाहिनीवर पाहणेच मी पसंत करतो.

ज्या पुतळ्यामुळे काळाघोडा हे नाव पडले त्याची आता कोणाला आठवणही राहिली नसेल आणि नव्या पिढीला त्याची माहितीही असणार नाही. मुंबईतल्या फोर्ट भागामधला एक चौक एवढेच त्यांना माहीत असते. आता त्याच्या नावाने भरत असलेल्या फेस्टिव्हलमुळे एरवी तिकडे न फिरकणारेही एकाद दुसरी फेरी मारून येतात. त्यातून काळा घोडाला थोडी प्रसिध्दी मिळू लागली आहे.


या लेखामधील चित्रे मिपाच्या सौजन्याने दिली आहेत.



Wednesday, February 20, 2013

काळा घोडा (पूर्वार्ध)



मी सात वर्षांपूर्वी हा ब्लॉग सुरू तर केला, पण त्यावर काय लिहायचे हे ठरवले नव्हते. त्या काळात मी इंग्लंडमधील लीड्स या शहरात रहात असतांना आमच्या घरापासून जवळच एक 'ब्लॅक प्रिन्स'चा पुतळा होता. त्याला पाहून मला मुंबईच्या काळ्या घोड्याची आठवण झाली आणि त्या दोघांवर मिळून दोन परिच्छेद असलेला एक लहानसा लेख मी लिहिला होता. आज त्याच विषयावर विस्ताराने लिहिता येण्याएवढी माझी प्रगती झाली आहे.

मुंबईतला काळा घोडा तसा मला पन्नास वर्षांपासून ठाऊक आहे. मी शाळेत असतांना पहिल्यांदा मुंबईला आलो होतो तेंव्हा म्यूजियमजवळच्या हमरस्त्यात उभा असलेला हा 'काळा घोडा' दिसला होता आणि त्याचे विचित्र नाव ऐकून मला हंसू फुटले होते. त्याच्यावर आरूढ झालेल्या स्वारापेक्षा त्या घोड्यालाच जास्त महत्व मिळणे हे घोड्यांच्या शर्यतीत चालत असेल, पण या काळ्या घोड्यावर चक्क एक राजकुमार ऐटीत बसलेला होता हे त्या वेळी माझ्यासोबत असलेल्या कोणाच्या गावीही नव्हते! त्या गोष्टीला पन्नास वर्षे होऊन गेली.

मी नोकरीला लागलो तेंव्हा सुरुवातीला माझे ऑफीस गेटवे ऑफ इंडियापाशी होते. बोरीबंदर किंवा चर्चगेट यातल्या कोणत्याही बाजूने रोज ऑफीसला जातांना वाटेत काळा घोडा चौक पडायचाच, पण तिथे पूर्वी पाहिलेला 'काळा घोडा' मात्र तोपर्यंत अदृष्य झाला होता. त्याच्या पाठीवर स्वार झालेला एके काळचा 'प्रिन्स ऑफ वेल्स' मुंबईमधल्या कोणाच्याही मनातल्या आपल्या इतिहासातल्या चांगल्या आठवणींना उजाळा देत नसे किंवा उज्जवल भविष्यकाळ निर्माण कऱण्यासाठी कोणाला प्रेरणा देत नसे. त्यामुळे रस्त्यातून जाणा-या येणा-याला तो उमदा घोडाच उठून दिसत असे आणि त्या पुतळ्याला काळ्या रंगाच्या घोड्याच्याच नावाने ओळखले जात असे. तरीसुध्दा पारतंत्र्याच्या असल्या आठवणी लोकांच्या डोळ्यासमोर नकोत म्हणून त्याची रवानगी राणीच्या बागेजवळील भाऊ दाजी वस्तुसंग्रहालयाजवळच्या मोकळ्या जागेत झाली होती. त्या पुतळ्याच्या चौथ-यावर दुसरा एकादा पुतळा उभा करण्यापेक्षा तो पूर्णपणे काढून टाकून तिथे रहदारीसाठी मोकळी जागा केली होती. असे असले तरी त्या जागेला मात्र 'काळा घोडा' हे नाव चिकटून बसले होते ते कायमचेच. इतिहासकाळातल्या मुंबईच्या किल्ल्यातला एकादा बुरुज किंवा तटबंदीचा तुकडासुध्दा शिल्लक राहिलेला नसला तरीही मुंबईच्या त्या भागाला आजही 'फोर्ट' असेच म्हणतात, त्याचप्रमाणे त्याच 'फोर्ट'मधला 'काळा घोडा' हा नाका आजसुध्दा त्याच नावाने ओळखला जातो. अमराठी लोकांना 'ळ' म्हणता येत नसल्यामुळे ते 'काला घोडा' म्हणतात एवढाच फरक झाला आहे.

जहांगीर आर्ट गॅलरी ही या चौकातली सर्वांना माहीत असलेली इमारत होती. नवचित्रकलेच्या बाबतीत ती सर्वात प्रसिध्द म्हणण्यापेक्षा 'जगप्रसिध्द' जागा होती. जागतिक पातळीवरील मोठमोठ्या नामवंत चित्रकारांच्या कलाविष्कारांची प्रदर्शने तिथे भरत असत. एकाद्या नवोदित कलाकाराला आपली कला तिथे प्रदर्शित करण्याची संधी मिळणे हीच मुळी नव्या गायकाला पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवात गायला मिळण्यासारखी अभिमानाची गोष्ट वाटत असे. ती चित्रे कोणी पाहिली आणि कोणाला आवडली वगैरेंबद्दल सांगायची त्यांना गरजच वाटत नसे. काही कलाकारांच्या यशस्वी कारकीर्दीमधली ही पहिली महत्वाची पायरी ठरली होती आणि तिथून त्यांनी पुढे अस्मानात भरारी मारली होती असे ऐकले होते. त्याच वास्तूमध्ये 'सॅमोवार' नावाचे मस्त रेस्तराँ होते. काही मोठे कलाकार दर सोमवारी तिथे येऊन भेटत असावेत असा पीजे त्या काळात प्रचलित होता. इतर खाद्यगृहांपेक्षा वेगळे असे वातावरण तिथे असायचे आणि तिथल्या रुचकर खाद्यपदार्थांच्या किंमती त्या काळातल्या उडपी किंवा इराणी रेस्टॉरंटपेक्षा जास्त असल्या तरी आटोक्यात वाटात असत. जवळच असलेल्या ताजमहाल हॉटेलच्या दरवानासमोरून आत जायची हिम्मत जेंव्हा आम्हाला होत नव्हती अशा काळात दोन तीन महिन्यातून एकाद वेळा मित्रांसमवेत सॅमोवारमध्ये जाऊन खाऊन येणे परवडायचे. पिंजारलेले केस, वाढलेली दाढी, अंगात खूप डगळ किंवा आखूड झब्बा असल्या अवतारातले एक दोन जण तिथे बसून आम्हाला अगम्य अशा भाषेत काहीतरी बोलतांना हटकून दिसायचे. त्यांचे फोटो कदाचित कुठेतरी पाहिले असल्याचे कुणाला तरी आठवायचे आणि मग तो " 'हा' आहे कारे?" किंवा "बहुतेक 'तो' असेल" अशा अटकळी बांधल्या जायच्या. या गोष्टींना आता चाळीस वर्षे उलटून गेली असली तरी यात काही बदल झाला आहे की अजून ती गॅलरी आणि ते रेस्तराँ यातले सगळे तसेच आहे कोण जाणे! त्यात एक नवी भर मात्र पडली आहे. जहांगीर आर्ट गॅलरीच्या फुटपाथवरच आता चित्रकलांचे वेगळे प्रदर्शन भरू लागले आहे.

काळ्या घोड्यालाच र्‍हिदम हाऊस नावाचे प्रसिध्द दुकान आहे. जेंव्हा मी त्या भागात रोज जात असे त्या काळात टीव्ही आणि टेपरेकॉर्डर अजून यायचे होते. एलपी डिस्कसुध्दा नव्हती. ताटाएवढ्या मोठ्या आकाराची गाण्याची रेकॉर्ड फक्त तीन मिनिटे वाजत असे. जुन्या किंवा नव्या कुठल्याही गाण्याची रेकॉर्ड र्‍हिदम हाऊसमध्ये मिळण्याची खात्री होती. र्‍हिदम हाऊसमध्ये असलेल्या साउंडप्रूफ खोल्या हे त्या दुकानाचे एक वैशिष्ट्य होते. बाहेर मांडून ठेवलेली कोणतीही रेकॉर्ड उचलून आपण आत न्यावी, तिथल्या फोनोग्रामवर ती वाजवून ऐकावी आणि पसंत पडली तर खरेदी करावी अशी व्यवस्था तिथे होती. या सोयीचा दुरुपयोग करून फुकट गाणी ऐकायला कोणी तिथे येत नसल्यामुळे आणि ही सोय त्या काळातल्या ग्राहकांच्या गर्दीला पुरेल एवढ्या प्रमाणात असल्यामुळे ते शक्य होते. पुढील काळात कॅसेट्स निघाल्यानंतरसुध्दा काही काळ तरी ती चालत होती. किती तरी कॅसेट्स मी अशा ऐकून विकत घेतल्या. मुंबईतल्या इतर भागामधल्या हॉलमध्ये होणा-या गायनाच्या किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमाची तिकीटे आणि पाससुध्दा काळा घोडा इथे र्‍हिदम हाऊसमध्ये किंवा त्याच्या आसपास मिळत असत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची कार्यालये मंत्रालयात आहेत, पूर्वी त्याचे नाव सचिवालय असे होते. लोकशाहीमध्ये जनतेपुढे असलेले प्रश्न आणि त्यांची गार्‍हाणी सादर करण्यासाठी तिने मंत्र्यांकडे जाणे साहजीक आहे. यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने जमा होऊन, मोर्चे काढून मंत्र्यांना भेटायला जाणे ओघाने आले. पण या समस्या इतक्या जास्त आणि गहन असतात की कोणी ना कोणी असे जाणे ही रोजची गोष्ट झाली. कधी गिरणी कामगार, तर कधी बँकेतले कर्मचारी, कधी बीईएसटीचे नोकर तर कधी टॅक्सी ड्रायव्हर्स, कधी दुकानदार तर कधी फेरीवाले, कधी भाडेकरू तर कधी झोपडीवाले, याशिवाय निरनिराळे राजकीय पक्ष, धार्मिक, जातीय, भाषिक किंवा इतर अराजकीय संघटना आपापली गार्‍हाणी, निषेधाचे खलिते, मागण्या वगैरे घेऊन येत असत. यात मुंबईतले लोक असतच, शिवाय संपूर्ण महाराष्ट्रामधून लोकांचे लोंढेच्या लोंढे येऊन थडकत असत. या सर्वांना थेट सचिवालयापर्यंत जाऊ देणे फारच अडचणीचे किंवा धोक्याचे झाल्यामुळे त्यांच्यासाठी ठराविक जागा आखून दिली गेली. या सर्वांनी काळा घोडापर्यंतच यावे, तिथे बसून किंवा उभे राहून घोषणा द्याव्यात, तिथे वाटेल तेवढा आरडाओरडा करावा, पण त्यांनी पुढे जायचे नाही असे निर्बंध घातले गेले. मोर्चामधील इतर सर्व लोक काळाघोडापाशी थांबून रहात आणि त्यांचे निवडक नेते किंवा प्रतिनिधी मंत्र्यांपर्यंत जाऊन त्यांना भेटून आपली निवेदने सादर करत असत. यामुळे अनेक वेळा या चौकात गोंधळ चाललेला असे, कधी कधी तो अनावर झाला तर लाठीचार्ज, अश्रूधूर वगैरे होत असे, क्वचित प्रसंगी गोळीबाराची वेळ येत असे. यामुळे सामान्य नागरिकांना दुरूनच अंदाज घेऊन वेगळ्या वाटेने जावे लागत असे. अशा कित्येक आठवणी या काळ्या घोड्याशी जुळलेल्या आहेत. गेल्या वीस पंचवीस वर्षांमध्ये मला त्या बाजूला जायची फारशी गरज पडलेली नसली तरी या परिस्थितीत विशेष बदल झाला असेल असे वाटत नाही.

.  . . . . . . . . . . . (क्रमशः) 

Tuesday, February 19, 2013

छत्रपती शिवाजी महाराजांची गीते

आज शिवजयंतीनिमित्याने छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम. त्यांची काही सुप्रसिध्द गीते आज सादर करीत आहे. या सर्व गीतांना पं.हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत दिग्दर्शन लाभले आहे आणि लतादीदींच्या मधुर आवाजाने त्यांना अजरामर केले आहे. ही काव्येसुध्दा अलौकिक व्यक्तींनी लिहिलेली आहेत. ही सर्व गाणी आणि इतर काही गाणी शिवकल्याणराजा  या आल्बममध्ये आहेत
https://www.youtube.com/watch?v=jGev5X9YgbQ

यातले अंगाईगीत शब्दप्रभू स्व.राम गणेश गडकरी यांनी सुमारे सत्तर ऐंशी वर्षांपूर्वी लिहिले आहे.



दोन पदे शिवरायांच्याच काळातल्या समर्थ रामदासस्वामींनी लिहिली होती आणि चारशे वर्षांनंतरसुध्दा ती टिकून राहिली आहेत आणि आपल्याला महाराजांच्या काळात घेऊन जातात.


---------
एक गीत शिवछत्रपतींच्या काळातल्या भूषण या कवीने हिंदी भाषेत लिहिले आहे.
सेर सिवराज है
इंद्र जिमी जम्भ पर बाड्व सुअम्ब पर
रावण सदम्भ पर रघुकुलराज है ||१||
पौन बरिवाह पर | संभु रतिनाह पर |
ज्यो सहसबाह पर | राम द्विजराज है ||२||
दावा द्रुम दंड पर | चिता मृग झुंड पर |
भूषण बितुंड पर | जैसे मृगराज है ||३||
तेजतमअंस पर | कान्ह जिमी कंस पर |
त्यों म्लेंछ बंस पर| सेर सिवराज है ||४||
-कविराज भूषण
--------------

दोन पदे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अशीच सत्तर ऐंशी वर्षांपूर्वी लिहिली आहेत. त्या पारतंत्र्याच्या काळात  त्यांनी तत्कालीन जमतेला शिवाजी महाराजांच्या उदाहरणाने एक आदर्श राजा दाखवला आहे.



या गीतांशिवाय खाली दिलेली अप्रतिम गीते या आल्बममध्ये आहेत . यातली दोन कविवर्य कुसुमाग्रजांनी आणि एक कवि शंकर वैद्य यांनी लिहिले आहे.

सरणार कधी रण 

सरणार कधी रण प्रभू तरी
हे कुठवर साहू घाव शिरी

दिसू लागले अभ्र सभोती
विदीर्ण झाली जरी ही छाती
अजून जळते आंतर ज्योती
कसा सावरु देह परी

होय तनूची केवळ चाळण
प्राण उडाया बघती त्यातून
मिटण्या झाले अधीर लोचन
खङग गळाले भूमीवरी

पावन खिंडीत पाऊल रोवून
शरीर पिंजेतो केले रण
शरणागतीचा अखेर ये क्षण
बोलवशील का आता घरी

__ कुसुमाग्रज 
------------------
॥ वेडात मराठे वीर दौडले सात ॥ 
“श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ १ ॥
“ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील
माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात!”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २ ॥
“वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ३ ॥
“जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ४ ॥
“ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा, सरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ५ ॥
“आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ६ ॥
“खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ७ ॥
“दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ८ ॥
- कुसुमाग्रज.
--------------

शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला

शिवप्रभूंची नजर फिरे अन् उठे मुलुख सारा
दिशादिशा भेदीत धावल्या खङगाच्या धारा
हे तुफान स्वातंत्र्याचे
हे उधाण अभिमानाचे
हे वादळ उग्र विजांचे
काळोखाचे तट कोसळले, चिरा चिरा ढळला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला

कडेकपारी घुमू लागले विजयाचे गान
जळल्या रानातूनी उमलले पुन्हा नवे प्राण
रायगडावर हर्ष दाटला, खडाचौघडा झडे
शिंगाच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे
शिवराय भाग्य देशाचे
हे संजीवन प्राणांचे
हे रुप शक्ति-युक्तिचे
हा तेजाचा झोत उफाळुन, सृष्टितुन आला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला

गंगा सिंधू, यमुना गोदा कलशांतुन आल्या
शिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या
धिमी पाऊले टाकित येता रुद्राचा अवतार
अधीर हृदयांतुनी उमटला हर्षे जयजयकार

प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस
सिंहासनाधिश्वर महाराजाधीराज शिवछत्रपती महाराज

शिवछत्रपतींचा जय हो
श्रीजगदंबेचा जय हो
या भरतभूमीचा जय हो
जयजयकारातुनी उजळल्या शतकांच्या माला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला
......  शंकर वैद्य

संपादन  दि. १८ृ०२-२०१९



Friday, February 08, 2013

मिसळपाव कट्टा २०१३ (भाग १ -४)

२०१३ साली झालेल्या मिसळपावकट्ट्यात मी सहभागी झालो होतो. मी आधी त्याचा सविस्तर वृत्तांत चार भागात लिहिला होता. माझ्या  एकंदर ब्लॉग्जची संख्या १००० वर मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतल्याने मी काही लेखांचे पूर्वीचे  निरनिराळे भाग एकत्र करायला घेतले आहेत. त्यानुसार आता हे सर्व भाग एकाच मथळ्याखाली पुन्हा प्रकाशित केले आहेत. नंतरच्या काळात मला मिसळपाववरच सहभाग घेणे जमले नाही. यामुळे आता या जुन्या आठवणीच राहिल्या आहेत. ....... २५.०३.२०१७
---------------------------------------------------------------

 February 08, 2013       मिसळपाव कट्टा २०१३ भाग १

मला मिसळ खूप आवडते, पण ती माझ्या रोजच्या आहाराचा भाग नाही, रुचिपालट म्हणून कधी तरी एकादी बशीभर मिसळच मी खाऊ शकतो. त्याचप्रमाणे मिसळपाव या संकेतस्थळाचा मी जवळजवळ सुरुवातीपासून सदस्य असलो तरी अधून मधूनच तिकडे डोकावतो. त्यातसुध्दा कधी माझ्या संगणकात शिरून बसलेले विषाणू (व्हायरस) किंवा स्वैपाकी (कुकीज) अडथळे आणतात, कधी मिपाचा सेवक (सर्व्हर) कामात अतीशय गढलेला असल्यामुळे माझ्याकडे लक्षच देत नाही आणि कधी आम्हा दोघांना जोडणा-या आंतर्जालावर सौर वादळ वगैरेंचे थैमान चाललेले असते. या सगळ्यांचा परिणाम एकच होतो, तो म्हणजे मला हवे तेंव्हा मी मिपाचे पान उघडू शकत नाही असेही वरचेवर होऊ लागले आहे. महिन्याभरापूर्वी एकदा माझ्या नशीबाने मी तिथपर्यंत पोचलो असतांना पाहिले की आजकाल काही गंभीर प्रकृतीचे किंवा माहितीपर लिखाणही तिथे प्रसारित होऊ लागले आहे. ते पाहून मीही उत्साहाने रक्ताभिसरण या विषयावरचा माझा एक नवा लेख चढवून दिला. त्यानंतर त्यावर आलेल्या प्रतिक्रिया वाचून त्याला आवश्यक असल्यास उत्तर देण्याची नैतिक जबाबदारी माझ्यावर आल्याने मी रोज दहादा प्रयत्न करून एकाद्या वेळा मिपावर जाऊ लागलो. काही वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांना परस्पर कोणीतरी उत्तरे दिली होती तर काहींना मी उत्तरे दिली. (वाचकांना अशा लेखांनी पिडण्यापेक्षा) मिपाने वेगळा मिपापीडियाच काढावा असाही एक प्रतिसाद आला होता. त्यातल्या तिरकसपणाकडे दुर्लक्ष करून मी आपले बेअरिंग सांभाळत त्यालाही गंभीरपणे उत्तर दिले.

हे सगळे करत असतांना इनिगोय यांच्या नावाने मौजमजा या सदराखाली मिपाकट्ट्याबाबत एक धागा वाचनात आला. इच्छुक सदस्यांनी एका रविवारी सकाळी ११ वाजता चर्चगेट स्टेशनपाशी जमावे आणि सर्वांनी मिळून त्या भागात गप्पा मारत चालावे फिरावे किंवा चालता फिरता गप्पा माराव्या असे त्याचे स्वरूप होते. या कट्ट्याला ज्यांना यायचे असेल त्यांनी आपला इरादा व्यक्तीगत निरोपाने कळवायचा होता. या धाग्यावर पहिल्या दिवशी आलेले बहुतेक सगळे प्रतिसाद थट्टामस्करीने भरलेले होते. त्यामुळे त्या धाग्याच्या हेतूबद्दल मनात थोडी शंका आली. कदाचित हे सगळे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी, त्यावर बोलाचीच फोडणी, वाटल्यास झणझणीत, वाटल्यास अळणी असा प्रकार असायचा. मिपाचे मालक वा चालक कोण आहेत हेच मला माहीत नसल्यामुळे त्यांच्या ऐवजी हा किंवा ही कोण इनिगोय हा असला कसला कट्टा भरवतेय् असा विचार मनात आला. कट्टा या शब्दाचा अर्थच मुळी पाय मोकळे करून निवांतपणे बसायची जागा असा होतो. खेडेगावांमध्ये वडापिंपळांचे पार असतात तसे शहरांमध्ये कट्टे. कट्टा म्हणताच शिवाजी पार्क मैदानाच्या सभोवती बांधलेला लांबलचक कट्टा आणि त्यावर घोळक्याघोळक्याने बसलेले मित्रमैत्रिणी डोळ्यासमोर येतात. कट्टा आणि चालताफिरता कसा असेल? हे विचार मनात आल्याने मला तेंव्हा त्याचे आकर्षण वाटले नाही. काही दिवसांनंतर पुन्हा मिपावर गेलो असतांना हा धागा टॉपला आलेला दिसला आणि हा चालताफिरता कट्टा खरोखरच भरणार असल्याची खात्री झाली. पण हा सर्वांसाठी आहे की उत्साही आणि धडधाकट तरुण मंडळींसाठी आहे? किती तास आणि किती किलोमीटर पायपीट करायचा त्यांचा विचार आहे? वगैरे शंका मनात येतच असल्यामुळे त्या विचारून टाकल्या. लगेच त्यांची उत्तरे मिळाली आणि त्याला हजर राहणे मलासुध्दा शक्य आहे हे समजल्यावर मी त्याला जायचा विचार केला.

बरेच वर्षांपूर्वी मी एकदा मनोगताच्या (अर्थातच बैठ्या) कट्ट्यावर गेलो होतो, तेंव्हा तो चांगला रंगला होता. मनोगतातली बहुतेक सगळी मंडळी मिसळपाववर आली आहेत हे माहीत असले तरी मला पूर्वी भेटलेल्यांची नावे काही यादीत दिसत नव्हती. तरीही मिपावरल्या नव्या मित्रांना पहावे, भेटावे, एक नवा अनुभव घ्यावा म्हणून मीही जायचे ठरवून टाकले आणि तसे कळवून दिले. एरवी आपण कोणाला भेटायला जातो तेंव्हा ती व्यक्ती आपल्या माहितीतली असते किंवा तिच्याकडे आपले काही काम असते. या वेळी यातले काहीच नव्हते. कट्ट्याला येणा-या संभाव्य सदस्यांची नावे फक्त अनोळखीच नव्हती तर त्यातली अनेक नावे त्यांनी स्वतःच धारण केलेली टोपणनावे होती. मनोगतवरसुध्दा हाच प्रकार होता त्यामुळे त्यातल्या एकेका मुखवट्यांच्या मागे असलेला चेहेरा पहायची उत्सुकता होती. उदाहरणार्थ विसोबा खेचर हे नाव धारण करणारा माणूस अंगापिंडाने चांगला भरलेला आणि शास्त्रीय संगीतातला दर्दी असेल असे कुणाला वाटेल? मी मिसळपावाचा नित्य वाचक नसल्यामुळे तिथल्या नव्या सदस्यांचे फारसे लिखाणही वाचलेले नव्हते. कट्ट्याला जाण्यासाठी मी कसलीच पूर्वतयारी केली नव्हती.

रविवारी सकाळी कट्टा भरणार होता, त्याच्या आदल्या दिवशी मिपावर गेल्यावर असे समजले की मिपाकरांनी एकत्र जमण्यासाठी चर्चगेट स्टेशन किंवा मुंबई सीएसटी स्टेशन असे दोन पर्याय उपलब्ध होणार आहेत. माझे निवासस्थान मध्य रेल्वेवर असल्यामुळे दुसरा पर्याय मला नक्कीच सोयीचा वाटला. मी लगेच तसे कळवले आणि तिथे पोचणा-या लोकांसाठी असलेल्या सूचना मला मिळाल्या. त्या सर्वांनी किसनशी संपर्क ठेवायचे ठरले होते. रेल्वे स्टेशनपाशी भेटायचे असल्यामुळे रेल्वेनेच जायचे मी ठरवले होते, पण सकाळी टीव्हीवरच्या बातम्या पहातांना हार्बरलाईनवर मेगाब्लॉक असल्याची बातमी आली, पण त्याचा तपशील समजला नाही. घरापासून स्टेशनपर्यंत जाऊन तिथे ती माहिती मिळवायची एवढा खटाटोप करण्यापेक्षा मी घरापासून बसनेच प्रवास करायचे ठरवले आणि थोडे आधी घरातून निघालो. सुटीचा दिवस असल्याने बसलाही गर्दी नव्हती. स्टॉपवर पोचताच लगेच एक बस मिळाली आणि रस्त्यातली वाहतूकही रोजच्या मानाने विरळ असल्यामुळे ती जलदगतीने चालत राहिली. ठरलेल्या वेळेच्या अर्धा तास आधीच ठरलेल्या जागेवर जाऊन पोचलो. एकट्यानेच इकडे तिकडे फिरत आणि एका बसस्टॉपवर बसून वर्तमानपत्र वाचत वेळ काढला.  

मला मिळालेल्या संदेशानुसार मी बरोबर ११ वाजता बृ.मुं.म.न.पा.च्या बहिर्गमनद्वारापाशी (एक्झिटगेटजवळ) जाऊन पोचलो. तिथे दोन तरुण उभे होते. त्यांच्या पाठीवरील हॅवरसॅकमुळे ते एमार किंवा आयटीवाले वाटत होते आणि मिपाचे सदस्य असण्याची दाट शक्यता होती.  त्यातला एकजण कानाला मोबाईल लावून बोलत होता आणि दुसरा ते लक्षपूर्वक ऐकत होता. ते बहुधा त्यांच्या मिपाकर मित्रांना ते केंव्हा पोचणार असे विचारत असतील असे मला वाटले. पण अचानक तो बोलणारा गृहस्थ एका दिशेला आणि दुसरा त्याच्या विरुध्द दिशेला चालले गेले. बहुधा त्यांना हव्या असलेल्या दिशा त्यांना फोनवरून मिळाव्या असाव्यात. मी बृ.मुं.म.न.पा.पासून तिथे येणार्‍या भुयाराच्या दारापर्यंत फेर्‍या मारत असतांना माझा भ्रमणध्वनी खणाणला. त्यावर किसनने माझी चौकशी केली. आणखी दोघांसह तो स्टेशनवर उतरला होता आणि लवकरच 'मीटिंग पॉइंट'ला पोचणार होता. आम्ही एकमेकांना पाहिलेले नसल्याने कसे ओळखणार हा एक प्रश्न होता. येतांना प्रत्येकाने पावाचा तुकडा सोबत आणावा आणि उंच धरावा असा एकादा आदेश किंवा एकादा कोडवर्ड दिलेला नव्हता. मग आम्ही एकमेकांच्या शर्टांचे रंग विचारून घेतले. त्यांची वाट पहात मी भुयाराच्या दारापाशी उभा राहिलो. किसनच्या सोबत रामदासही होते. मी त्यांना पूर्वी दोन वेळा भेटलेलो असल्यामुळे आम्ही दोघांनी एकमेकांना लगेच ओळखले. मग शर्टांच्या रंगांकडे पहाण्याची गरज उरली नाही.

.  . . . . . .  . . . . . . . . . . .  (क्रमशः)
----------------------------------------------------------------------------------------

February 11, 2013       मिसळपाव कट्टा २०१३ भाग २

मी रामदासबरोबर बोलत असतांना किसनला आणखी फोन येत होते. मिपाच्या 'आयडी'जची दुसरी तुकडी रेल्वे स्टेशनवर उतरली होती आणखी कोणी कोणी गाड्यांमध्ये प्रवासात होते वगैरे माहिती त्यातून मिळत होती. ते लोक लवकरच तिथे येऊन पोचणार होते. स्टेशनवर उतरल्यानंतर नेमके कुठल्याजागी भेटायचे, एकमेकांना कसे ओळखायचे वगैरे प्रश्न त्यांनाही पडलेले होतेच. समोरच एका उंच चौथ-यावर उभा असलेला फिरोजशा मेहता यांचा पुतळा दिसला. त्याच्या आसपास कोणी माणसे नव्हती, पण ती जागा सगळीकडून दिसण्यासारखी होती. तेंव्हा तिथे भेटायला सोपे जाईल असे वाटल्याने सगळ्यांना तिथे यायला सांगितले आणि त्यांना आपण दुरून लगेच दिसावे म्हणून आम्ही त्या पुतळ्यापाशी जाऊन उभे राहिलो. फेब्रूवारीचा महिना असला तरी मुंबईच्या हवेत मुळीच गारवा नव्हता आणि अकरा वाजून गेल्यानंतर सूर्याचे ऊन कोवळे राहिले नव्हते. तळपते ऊन आणि कडाक्याची थंडी वगैरे सोसत तो पुतळा वर्षानुवर्षे त्या जागेवर उभा होता, पण त्या पुतळ्याला ऊन सहन करण्याची जितकी सवय होती तेवढी मला नसल्यामुळे मी थोडासा वैतागलो. तिथून दहा पावलावरच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यद्वारापाशी (पोर्टिगोमध्ये) सावलीची जागा दिसली आणि माझे पाय तिकडे वळले. माझ्या सुदैवाने तिथे बसायला एक हातभर लांबीचा अगदी पिटुकला कट्टाही मोकळा मिळाला. मी तिथे एकटाच पेपर वाचत बसलो.

माझे साथीदार उन्हाची पर्वा न करता इतर लोकांच्या येण्याची वाट पहात पुतळ्याजवळ उभे राहिले होते, पण काही वेळानंतर मी एकदा वर्तमानपत्रातून मान वर करून पाहिले तर ते नजरे आड झाले होते. थोडे पुढे जाऊन पाहिले तर नव्याने आलेल्या आणखी काही सदस्यांसह ते भुयाराच्या दारापाशी जाऊन तिथल्या सावलीत उभे राहिले होते. त्यांच्यातल्या तीन चारजणांनी मिळून एक वर्तमानपत्र हातात धरले होते आणि ते त्यात लक्ष देऊन काही तरी पहात होते. ती इतकी इंटरेस्टिंग बातमी किंवा लेख पाहण्यासाठी मीही आपले डोके त्यात खुपसले तर त्यात माझ्या पूर्वीच्या ऑफीसचा लोगो दिसल्यामुळे माझी उत्सुकता अधिकच वाढली. लोगो पाहून ओळखण्याचे ते एक कोडे आहे असे समजले आणि त्यातले एक उत्तर तर मला पाहताक्षणी मिळाले होते. इतर कोड्यांची उत्तरे रामदास सांगत होते. त्यातल्या '3M' मधल्या तीन शिलेदारांची नावे त्यांनी सांगितली, ती माझ्या कानावर पडली खरी, पण मेंदूपर्यत पोचून त्यांची नोंद काही झाली नाही. माझ्या आयुष्यात मला त्यांची कधी गरज पडली नव्हती आणि पडण्याची शक्यताही नव्हती. मी त्यांच्या उपयोगी पडण्याची शक्यता त्याहून कमी होती. 'नेसले' 'अमुल' आणि 'आयडीडीबी' यासारखी काही ओळखीची नावेसुध्दा त्या कोड्यात होती. कोडे असलेला तो लेखच रामदास यांनी स्वतः लिहिला होता असे समजल्यावर कट्ट्याची एक आठवण म्हणून मी जवळच बसलेल्या विक्रेत्याकडून ते वृत्तपत्र लगेच विकत घेतले आपल्या पिशवीत ठेवले.

बोरीबंदरापासून काळा घोडा सर्कलपर्यंत सर्वांनी मिळून फिरत फिरत जायचे, थोडा वेळ 'काला घोडा फेस्टिव्हल'मध्ये घालवायचा आणि सर्वांनी एकत्र भोजन करायचे असा कार्यक्रम ठरला होता. चर्चगेटपाशी जमलेले लोक आधी आमच्याकडेच येणार असावेत अशी किसनची समजूत झाली होती. पण चर्चगेटहून काळा घोडा जवळ असतांना ते लोक उलट दिशेने सीएसटीकडे कशाला येत आहेत असे मला वाटले. कदाचित एकमेकांशी बोलण्यासाठी जास्त वेळ मिळावा असा त्यांचा विचार असेल, पण त्यांनी पुनर्विचार करून हुतात्मा चौकात आम्हाला भेटायचे ठरवल्याची बातमी मिळाल्यावर आम्हीही प्रस्थान केले. तोपर्यंत साडे अकरा वाजले होते आणि आणखी काही 'आयडी'ज आल्या होत्या. आधी आम्ही एकमेकांची ओळख करून घ्यायचे ठरवले, पण सर्वांची ओळख करून देऊ शकणारा कोणीही तिथे नसल्यामुळे प्रत्येकाने स्वतःची ओळख करून देण्यासाठी आपापला 'आयडी' म्हणजे मिसळपाववरचे नाव सांगितले.  त्यात कमालीची विविधता होती. एक पेशवाईतले 'घाशीराम कोतवाल' होते, त्यांच्यासोबतीला नाना फडणवीस नव्हते पण तिथे आलेल्या 'प्रथम'चे खरेच आडनाव फडणीस होते, सर्वज्ञ 'रामदास' काका तर होतेच, विलासराव, किसन, निखिल देशपांडे आणि 'मस्त कलंदर' आले होते, एक 'मिसळलेला काव्यप्रेमी' होता. 'निम' हा देखील बहुधा दुसरा निखिल असावा, कितीही डोके खाजवूनसुध्दा 'लिमाऊजेट' चा अर्थ काही लागला नाही. नंतर चर्चगेटहून येऊन मिळालेल्या ग्रुपमध्ये एक 'तीरशिंगराव माणूसघाणे' होते आणि एक 'प्रास' होता, 'आदिजोशी'ला सगळेजण 'अॅडी' म्हणत होते, 'सुझे' हा सुहास झेले होता. प्रमोद देव कधीकाळी 'अत्यानंद' होते, पण आता ते स्वतःच्या नावानेच वावरत होते. इनिगोयचा अर्थ लागायला मात्र फारसा वेळ लागला नाही. कस्तुरी आणि सुर(भी) होत्या. सुरच्या कडेवर लहानगी आर्या होती. या सदस्यांमधली काही टोपणनावे आणि त्यांची व्यक्तीमत्वे यांचा मेळ लागत नव्हता. ते पाहता 'झपाटलेला झंप्या', 'टकलू हैवान', 'सच्चिदानंदस्वरूप', 'ढ' असले कोठलेही नाव मी धारण केले असले तरी चालले असते. जिथे सगळे लोक स्वतःचे नावसुध्दा उघडपणे सांगत नव्हते, तिथे स्वतःबद्दल कोणी अधिक माहिती सांगेल अशी अपेक्षाही नव्हती. फक्त आपण कुठून आलो, कसे आलो वगैरे थोडीशी चर्चा झाली.

भुयारातून रस्ता ओलांडून पलीकडे जाताच तिथे एका स्टॉलवर मुंबईतला सर्वोत्तम 'काला खट्टा' मिळतो, तो प्राशन करून पुढे जायचा बेत रामदास यांनी सांगितला. माझ्यासकट सगळेजण तास दीड तास प्रवास करत दूरदूरच्या ठिकाणांहून आलेले होते. चालत्या फिरत्या कट्ट्याची पदयात्रा सुरू करायच्या आधी सगळ्यांनाच एका 'वेलकमड्रिंक'ची नितांत गरज होती. त्यामुळे कोणीही त्यावर उपसूचना मांडली नाही. ते पेय पिऊन आम्हाला थोडी तरतरी येईपर्यंत आणखी काही 'आयडी'ज येऊन आम्हाला मिळाल्या. त्यातल्या चिमुकल्या आर्याने लगेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

.  . . . . . .  . . . . . . . . . . .  (क्रमशः)

--------------------------------------------------------------------------------------------------

 February 15, 2013    मिसळपाव कट्टा २०१३ भाग ३

सीएसटी स्टेशन च्या समोर असलेल्या स्टॉलवर 'कालाखट्टा' पिऊन झाल्यानंतर तिथून आमचा 'हेरिटेज वॉक' सुरू झाला. अर्थातच रामदास हे आमचे मार्गदर्शक होते. त्यांनी एक चित्रमय पुस्तक आपल्या झोळ्यामधून काढून एका सदस्याला दिले. कदाचित ते पुस्तक मुंबईमधल्या ऐतिहासिक इमारतींबद्दल असेल आणि घरून निघण्याच्या आधी त्यांनी ते लक्षपूर्वक वाचले असेल, कदाचित त्यांनी ते स्वतःच लिहिलेही असेल. मुंबईचा फोर्ट भाग आणि तिथल्या इमारतींबद्दल त्यांना नक्कीच प्रचंड आणि सखोल ज्ञान होते. समोर दिसणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनची इमारत हाच वास्तुशिल्पाचा एक अद्वितीय असा नमूना होता. पूर्वीच्या काळातले सम्राट आणि बादशहा वगैरेंनी देवळे, मशीदी, राजवाडे वगैरेंसाठी भव्य इमारती बांधल्या होत्या पण रेल्वे स्टेशन यासारख्या काम करण्याच्या जागेसाठी आणि आम जनतेच्या रोजच्या उपयोगासाठी इतकी भव्य आणि सुंदर इमारत बांधली गेल्याचे हे आगळे आणि बहुधा भारतातले सुरुवातीचे उदाहरण असावे. या इमारतीवर असलेले घुमट निरनिराळ्या वास्तुशिल्पांच्या शैली दाखवतात, मध्यभागी असलेला सर्वात मोठा गोलाकार घुमट पौर्वात्य शैलीचा वाटतो, तर बाजूची लहान निमूळत्या आकाराची शिखरे जुन्या काळातील चर्चच्या टॉवरसारखी दिसतात असले बारकावे रामदास यांनी विशद केले. भारताचा राष्ट्रीय मयूरपक्षी इंग्लंडमध्ये सापडत नाही, पण त्याच्या आकृती खिडक्यांवरल्या जाळ्यांमध्ये कोरलेल्या असल्याचे त्यांनी दाखवले. या इमारतीचे बांधकाम चालले असतांना मध्येच त्याचा आर्किटेक्ट बदलला गेला असावा असा शेरा कोणीतरी मारला. इमारतीच्या मोठ्या कळसावरल्या मूळच्या लाइटनिंग अरेस्टरवर एकदा खरोखरच वीज कोसळल्यामुळे तो भग्न झाला होता. त्यानंतर जेजे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी त्याच्या खाली असलेल्या पुतळ्यासकट नवा विद्युतनिरोधक तयार करून तिथे बसवला ही माहिती दिली. त्या चौकामधून मी हजारो वेळा गेलेलो असूनसुध्दा त्या इमारतीच्या शिखरावर एक बाई (पुतळा) हातात विजेच्या तारांना जोडलेले त्रिशूल घेऊन उभी आहे हे यापूर्वी माझ्या ध्यानात आले नव्हते.

तीन चारशे वर्षांपूर्वी जेंव्हा आधी पोर्तुगीज आणि नंतर इंग्रज गोरे लोक मुंबईत रहायला आले होते त्या काळात त्यांनी बांधलेल्या वास्तूंच्या संरक्षणासाठी तटबंदी केली. बोरीबंदरपासून अपोलोबंदरपर्यंत पसरलेल्या भागात त्यांनी किल्ला बांधला होता. त्या तटबंदीचा एकादा लहानसा तुकडासुध्दा आता शिल्लक राहिला नसला तरी त्याचे 'फोर्ट' हे नाव मात्र आजही प्रचलित आहे. मुंबईच्या या फोर्ट भागातच आम्ही फिरणार होतो. या किल्ल्याच्या तटबंदीला ठेवलेली प्रवेशद्वारेही नामशेष झालेली असली तरी ती जुनी नावे त्या भागांच्या नावाने आजही प्रचलित आहेत. फोर्टमधून बोरीबंदरच्या दिशेने बाहेर पडण्याच्या द्वाराजवळ पूर्वी बाजार भरत असे. आजही तिथे अनेक दुकाने दाटीवाटीने उभी आहेत. या ठिकाणी पूर्वी 'बझार गेट' होते, आता तिथे 'बझार स्ट्रीट' आहे. फ्लोरा फाउंटनपाशी पूर्वी एक मोठे चर्च होते आणि त्याच्याजवळ 'चर्च गेट' होते. अशी माहिती घेत घेत आम्ही पुढे सरकत होतो.

बोरीबंदरहून निघालेला आमचा दहा बारा जणांचा घोळका गजगतीने हुतात्मा चौकाच्या दिशेने चालत राहिला. रविवार असल्यामुळे रस्त्यात फारशी वाहतूक नव्हती. फुटपाथ तर ओस पडले होते, पण त्यावरून चाललो असतो तर आम्हाला आजूबाजूच्या इमारती दिसल्या नसत्या आणि 'हेरिटेज वॉक'चा उद्देश सफळ झाला नसता. त्यामुळे आम्ही रस्त्याचा थोडा भाग अडवून त्यावरूनच चालत राहिलो. आमची संख्या आणखी मोठी असती तर तो कदाचित एकादा 'मोर्चा' वाटला असता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या प्रत्येक इमारतीचे नाव, त्याचा मूळ मालक कोण होता, ती इमारत कधी आणि कशासाठी बांधली गेली होती, त्या काळात कोणत्या कामासाठी तिचा उपयोग केला जात असे, आता तिथे काय चालते वगैरे इत्थंभूत माहिती रामदास सांगत होते. बोरीबंदरपासून फ्लोरा फाउंटनपर्यंतच्या रस्त्यावर बांधण्यात आलेल्या प्रत्येक इमारतीचे दरवाजे आणि खिडक्या यांना कमानी असल्याच पाहिजेत असा दंडक तत्कालीन सरकारने घातला होता आणि तो पाळला गेला होता. यातील अनेक इंग्रजांच्या काळातल्या खाजगी बँका आणि विमा कंपन्यांच्या मालकीच्या होत्या, काही कापसाच्या व्यापा-यांच्या किंवा गिरणीमालकांच्या होत्या. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्या बँका आणि विमा कंपन्या भारतीय उद्योगपतींच्या हातात आल्या आणि नंतर त्यांचे राष्ट्रीयीकरण झाले. तरीही अजून त्यातल्या काही संस्थांची ऑफिसे तिथे आहेत, इतर जागी दुसरी ऑफिसे आली आहेत. युरोपियन लोकांना राहण्यासाठी बांधलेले हॉटेल आता सरकारी पाहुण्यांसाठी उपयोगात येते आणि अत्यंत महत्वाचे खटले चालवणारे एक सुप्रसिध्द सरकारी वकील तिथे निवास करत होते. पूर्वी इंग्रजांना लागणा-या वस्तूंचे दुकान जिथे होते, त्या जागी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हँडलूम हाऊस आले. पूर्णपणे लाकडाने बांधलेल्या त्या इमारतीला आग लागल्याने ते जळून खाक झाले. त्याच्या बाजूला असलेली आणखी एक जुनी इमारत आगीत जळून गेली आहे, पण त्या जागेवर नवी बिल्डिंग बांधतांना जुन्या इमारतीच्या भिंतीचा थोडा भाग अवशेष म्हणून शाबूत ठेवला आहे. अशा प्रकारची खूप माहिती रामदास देत होते आणि माझ्यासह काही लोक त्यांची श्रवणभक्ती करत होते. काही लोक तत्परतेने त्या इमारतींचे किंवा त्यात दाखवलेल्या वैशिष्ट्यांचे सटासट फोटो घेत होते. काही जणांनी आपापले उपगट बनवून वेगळ्या चर्चा चालवल्या होत्या. काही मिनिटांच्या चालण्यानंतर आम्ही हुतात्मा चौकात येऊन पोचलो. चर्चगेटकडून आलेला मिपाकरांचा प्रवाह आमच्या प्रवाहात मिसळला.

एकमेकांना भेटून झाल्यानंतर आमचा थोडा मोठा झालेला घोळका 'काळा घोडा'च्या दिशेने चालू लागला. रामदासांचे ज्ञानसत्रही चालत राहिले. फ्लोरा फाउंटनला ज्या ठिकाणी आम्ही एकत्र आलो त्या जागी पूर्वी उघड्यावरच  शेअर बाजार भरत असे. त्यातल्या दलालांच्या आरडाओरड्याने सर्वांना त्रास होऊ लागला म्हणून त्यांना टाटांच्या बाँबे हाऊसच्या पलीकडे असलेल्या एका मोकळ्या जागेत हाकलण्यात आले. तिथेच पुढे 'दलाल स्ट्रीट' निर्माण झाली, बाँबे स्टॉक एक्स्चेंजची इमारत आणि नंतर त्याचा टॉवर उभा राहिला. रस्त्याच्या उजव्या अंगाला असलेल्या एचएसबीसीच्या इमारतीतील तळघरात हैदराबादच्या नवाबाच्या मालकीचा एक मोठा हिरा कडेकोट बंदोबस्तात ठेवला होता. तिथेच एक भिकारी रोज रात्री येऊन झोपत असे, पण पहारेक-यांना ते माहीतच नव्हते म्हणे. अशा काही सुरस गोष्टी त्यांनी सांगितल्या. मुंबई विद्यापीठाची (बाँबे युनिव्हर्सिटीची) दगडी इमारत बांधतांना तिथे बांधलेला क्लॉक टॉवर त्या काळात सर्वात उंच होता. ती इमारत बांधण्यासाठी ज्या शेठजीने अर्थसाह्य केले त्याने त्या मनो-याला 'राजाबाई टॉवर' असे नाव दिले. हा गृहस्थ भाटिया होता आणि मोठा व्यापारी होता. एका काळात मुंबईवर मालकी गाजवणारे हे भाटिया लोक आधी पंजाबकडून काठियावाडमध्ये आले आणि तिकडून मुंबईला आले. यामुळे त्यांची चेहेरेपट्टी इतर गुजराती लोकांपेक्षा वेगळी असते वगैरे वगैरे चौफेर माहिती रामदासजी सांगत होते. तोपर्यंत आमच्या पदयात्रेचा 'भोज्जा' म्हणजे काळा घोडा चौक आलाच.


.  . . . . . .  . . . . . . . . . . .  (क्रमशः)

--------------------------------------------------------------------------------------
 February 17, 2013     मिसळपाव कट्टा २०१३ भाग ४ (अंतिम)

मिसळपाववरल्या काही कट्टोत्सुक लोकांना सीएसएम किंवा चर्चगेट रेल्वे स्टेशनवर यायला उशीर झाला होता किंवा त्यांना पायी चालत जाण्याचा कंटाळा वाटला असावा असे काही जण थेट काळाघोडापाशीच आले. सगळे मिळून आता आम्ही वीस बावीसजण झालो होतो. कालाघोडा फेस्टिव्हलच्या संरक्षणासाठी आलेल्या पोलिसांची एक गाडी रस्त्याच्या कडेला उभी होती, तिच्याजळच एक लहानसे कडे करून आम्ही सगळेजण उभे राहिलो. पुन्हा एकदा सर्वांनी आपापली ओळख करून दिली, म्हणजे आपला आयडी सांगितला. आलेल्या प्रत्येक व्यक्तीने या वेळी तरी फक्त एकच आयडी सांगितला. मिपावर नेहमी हजर असणा-या लोकांनी त्यांचे लेख वाचले असतील, त्यांचे वाद, विवाद, संवाद वाचले असतील आणि त्यावरून त्या प्रत्येक आयडीची एक जालीय प्रतिमा त्यांच्या मनात निर्माण झाली असेल. त्या मुखवट्याआड असलेला चेहेरा आणि एकंदर व्यक्तीमत्व पाहण्याची उत्सुकताही त्यांच्या मनात असणार. या दृष्टीने ही ओळखपरेड खूप महत्वाची होती. या बाबतीत माझी पाटी पूर्णपणे कोरी होती. कुठल्याही विशिष्ट आयडीबद्दल माझे कोणतेच मत किंवा पूर्वग्रह नव्हता. मिपावर रोजच्या रोज अक्षरे, विरामचिन्हे, स्मितके आणि छायाचित्रे यांचा जो धो धो पाऊस पडतांना दिसतो तो पाडणारे कोण अवलिये आहेत याची मला उत्सुकता वाटते. त्यातल्या काही मुंबईकर लोकांना पहायला मिळावे एवढी माझी माफक इच्छा होती ती सफळ झाली. ही मंडळी याहून जास्त संख्येने येतील अशी माझी अपेक्षा होती, तसे झाले नाही, ते का झाले नाही याच्या कारणांच्या गवताचा ढीग मिपावर झालेला मी पाहिला होता. चालताफिरता कट्टा म्हणजे काय असतो हे पाहण्याची उत्सुकता होती. सर्वांबरोबर घोळक्यात चालतांना मला मजा आली होती, माझ्या ज्ञानात भर पडली होती, पण तो 'कट्टा' वाटला नव्हता.

तिथे जमलेल्या मिपाकरांपैकी तीन चार जणांना दुसरी महत्वाची कामे असल्यामुळे लवकर निघायचे होते. त्यापूर्वी एकदा सगळ्यांचे ग्रुप फोटो घ्यायचे ठरले. पोलिसांच्या वाहनाच्या पार्श्वभूमीवरच आम्ही सगळे पोज देत उभे राहिलो. तीन चारजणांनी आपापल्या कॅमेरांमधून आमची छायाचित्रे टिपली. अर्थातच स्वतःला सोडून इतरांच्या छव्या त्यांच्या कॅमेरांमध्ये बंद झाल्या. त्यातले काही सुंदर फोटो नंतर मिपावर चढवले गेल्याने सर्वांना पहायला मिळाले. आम्ही काळाघोडापाशी पोचेपर्यंतच दुपारचे साडेबारा वाजून गेले होते. ओळख आणि छायाचित्रणात आणखी पंधरा मिनिटे जाऊन पाऊण वाजायला आले. कट्ट्याचा पक्का कार्यक्रम असा ठरलेला नव्हताच. आता थोडा वेळ फेस्टिव्हलमध्ये फिरून सर्वांनी एकत्र जेवण करायचे होते. कालाघोडा फेस्टिव्हल ज्या जागेत भरले होते तिला चहू बाजूंनी पत्र्याच्या शेडने झाकलेले असल्यामुळे आत नेमके काय पहायला मिळणार आहे याची बहुतेक जणांना कल्पना नव्हती आणि ज्यांना त्याची माहिती होती ते लोक मौन पाळून होते. "बरोबर अर्ध्या तासाने सर्वांनी बाहेर येऊन याच जागी जमायचे." असा आदेश एका मॅडमने अधिकारवाणीने दिला. माझ्या आजूबाजूच्या सात आठ लोकांनी माना डोलावून त्याला अनुमोदन दिले. इतरांना ते ऐकू गेले की नाही आणि पटले की नाही कोण जाणे. आम्ही सर्वजण भराभर कुंपणाच्या आत जाण्यासाठी रांगेत उभे राहिलो.

एअरपोर्टवर असतो तसा सिक्यूरिटी चेक झाल्यावर आम्ही आत प्रवेश केला. चित्रांचे प्रदर्शन किंवा वस्तूसंग्रहालय अशासारख्या बहुतेक जागी त्या वस्तू ओळीवार मांडून ठेवलेल्या असतात आणि तिथे आलेले प्रेक्षक रांगेमधून त्या पहात पहात पुढे जातात. या उत्सवात एका मोकळ्या जागेत अनेक गोष्टी इकडे तिकडे पसरून ठेवल्या होत्या आणि त्यांच्या सभोवती फिरून त्या पहायच्या असल्याने त्याला कसलाच क्रम नव्हता. आत भरपूर गर्दी होती आणि त्यातला प्रत्येक जण त्याला जे काही आकर्षक वाटेल त्या दिशेने जात होता. अशा परिस्थितीत आमचा ग्रुपसुध्दा एकत्र राहणे कठीणच नव्हे तर अशक्य होते. काही क्षणामध्येच आमची पांगापांग झाली.

काळाघोडा इथेच सुप्रसिध्द जहांगीर आर्ट गॅलरी असल्यामुळे आणि हा आर्ट फेस्टिव्हल असल्याने इथे मॉडर्न आर्टमधली चित्रेच मांडून ठेवलेली असावीत अशी माझी कल्पना होती.  तशी बरीच चित्रे होती, पण एकंदर प्रदर्शनात त्यांचा वाटा कमीच होता. ज्यांना शिल्प असे म्हणणे कदाचित धार्ष्ट्याचे होईल अशा अनेक त्रिमिती आकृत्यांनी इन्स्टॉलेशन्स या नावाने बरीचशी जागा व्यापली होती. आत जाताच सुरुवातीलाच एका जागी सात आठ आडव्या रांगांमध्ये प्रत्येकी शंभर दीडशे बांगड्या मांडून ठेवल्या होत्या. त्यातल्या प्रामुख्याने फिक्या रंगांच्या बांगड्यांमध्ये अधून मधून काही गडद रंगांच्या बांगड्या पेरलेल्या होत्या. फिक्या पार्श्वभूमीवर गडद रंगाने काही आकृत्या काढल्या असाव्यात. पण मला तरी त्यांचा अर्थ समजला नाही. जवळच उभ्या असलेल्या दाढीधारी मिपाकराला यातून काय बोध होतो असे विचारताच त्यानेही ते आकलनाच्या पलीकडे असल्याचे सांगितले. त्याची दाढी तो कलाकार असल्याचे द्योतक नसावी एवढाच बोध मला झाला. तिथे ठेवलेली काही इन्स्टॉलेशन्स हातभर, काही पुरुषभर तर काही मोठमोठ्या खोल्यांएवढ्या आकाराची होती. त्यांच्यामधली विविधता मात्र अपूर्व होती. बांगड्या, बाटल्या, बुचे, स्टूल, खुर्च्या आदि अगदी वाट्टेल त्या वस्तूंपासून ती बनवली होती, त्यात एक स्कूटर आणि ऑटोरिक्शासुध्दा निराळी रूपे घेऊन उभ्या होत्या. यातली काही रूपे नयनमनोहर होती, काही थक्क करणारी होती, काही विचार करायला लावणारी होती, तर काही हिडीस आणि किळसवाणी होती. अनाकलनीय आणि अमूर्त अशा इन्स्टॉलेशन्सची संख्या फार मोठी होती. याशिवाय तिथे मोठी जत्रा होती. निरनिराळ्या आकारांच्या अनेक वस्तूंची विक्री होत होती. त्यात शोभेच्या वस्तू होत्या तशाच उपयोगाच्या सुध्दा होत्या पण त्यांच्या किंमती मात्र अव्वाच्या सव्वा ठेवलेल्या होत्या. सुबक आकाराचे आणि सुंदर नक्षीकामाने सजवलेले चार पाच संपूर्ण टी सेट जेवढ्यात येतील तेवढ्या किंमतीत एक वेडावाकडा मग आर्टिस्टिक म्हणून विकत घेणारे धन्य महाभाग पहायला मिळाले.

बाहेरून वाटली होती त्याच्या मानाने ही जत्रा लांबवर पसरलेली होती. तिथल्या एकाही दुकानात न शिरता ती फक्त वर वर पहात पहात दुस-या टोकापर्यत पोचण्यातच अर्धा तास संपून गेला होता. मागे फिरून बाहेर जाण्याचा मार्ग शोधून ठरलेल्या ठिकाणी परत जाण्यात आणखी थोडा वेळ गेला. यामुळे मला बाहेर यायला उशीर झाला असे वाटले होते, पण माझ्याआधी फक्त तीन चारजणच तिथे पोचले होते. एक एक करून आणखी काही लोक येत गेले, पण मिपाच्या ज्या सदस्यांनी या कट्ट्याचे आयोजन केले होते त्यांचाच पत्ता नव्हता. मुख्य म्हणजे इथून पुढे कुठे जायचे हेच मुळी ठरले नव्हते. त्या भागाची चांगली माहिती रामदास यांना होती, त्यामुळे त्यांच्या विचारानेच ते ठरणार होते, त्यामुळे आम्ही सर्वजण चातकाप्रमाणे त्यांची प्रतीक्षा करत होतो. त्या गर्दीत पुन्हा प्रवेश करून त्यांची शोधाशोध करण्यात काही अर्थ नव्हता. अखेर आमच्यातला एकजण मोबाईल फोनवरून त्यांच्याशी संपर्क साधू शकला. त्यांनी लगेच बाहेर येत असल्याचे सांगितले. पंधरा मिनिटे होऊन गेली तरी रामदास आणि त्यांच्यासोबत असलेले पाचसहा जण आलेच नाहीत. पुन्हा फोनवर बोलल्यानंतर कळले की ते परत यायला निघाले होते, पण तिथल्या चक्रव्यूहामधून बाहेर पडून आमच्यापर्यंत कसे पोचायचे या संभ्रमात होते. कारण बाहेर पडण्यासाठी असलेल्या वेगळ्या दरवाजामधून बाहेर पडल्यास तिथून आमच्याकडे येणारा रस्ताच नव्हता. या सगळ्या गोंधळातून निघून सर्वजण एकत्र गोळा होईपर्यंत दोन वाजून गेले होते.

फेस्टिव्हलच्या प्रांगणात खाद्यपेयांची अनेक दुकाने होती, पण सर्वांनी बाहेर आल्यानंतर एकत्र भोजन करायचे ठरले होते, शिवाय तिथे खाण्यापिण्यात वेळ घालवला असता तर आपल्याला बाहेर यायला उशीर झाला असता असा विचार करून बहुतेकजणांनी तो मोह टाळला होता. पण त्यामुळे पोटात कावळ्यांनी थैमान घातले होते. इतके सगळे लोक एका वेळी बसून जेवू शकतील अशी कोणती चांगली भोजनालये त्या भागात आहेत आणि त्यातली कोणती रविवारी उघडी असतील याचा विचार झाला. या बाबतीत आधीपासून काही ठरलेले नव्हते, टेबले राखून ठेवणे दूर राहिले, विचारविनिमयही झालेला नव्हता. त्यातल्या त्यात जवळ आणि सर्वांना ठाऊक असलेल्या सहकारी भांडाराच्या कँटीनमध्ये जाऊन पहायचे असे ठरले. तिथपर्यंत जाऊन ते चालू असलेले पाहिले आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. रविवार असल्यामुळे ऑफीसे बंद असली तरी पर्यटकांची गर्दी असल्यामुळे ते बरेचसे भरलेले होते. सर्वजण एकत्र बसू शकतील एवढी सलग जागा रिकामी होण्यापर्यंत वाट पाहण्याएवढा धीर कोणाकडेही नव्हता. त्यामुळे दोन तीन ठिकाणी जी टेबले मिळाली ती आम्ही ताब्यात घेतली आणि वेटरला बोलावून दोन प्रकारच्या भाज्या आणि रोट्यांची ऑर्डर दिली. त्या येण्यापूर्वी कांदा, लोणचे वगैरे जे काही टेबलावर आले त्यापासून खायला सुरुवात केली. लवकरच जेवण आले. ते चवीलाही तसे चांगले होते आणि आम्हाला चांगल्या भुका लागलेल्या असल्यामुळे अमृतासारखे वाटले. चार घास पोटात गेल्यानंतर हळूहळू गप्पागोष्टींना सुरुवात झाली. आता आम्हाला कसली घाई नव्हती आणि आमच्यानंतर येणा-यांची गर्दी नसल्यामुळे कँटीनवाल्यालाही काही अडचण नव्हती. सावकाशपणे इकडच्या तिकडच्या गप्पा मारत भोजन केले आणि कट्ट्याची यशस्वी सांगता झाली.

अर्थातच हा अनुभव प्रातिनिधिक नसणार. इतर वेळी याहून वेगळा अनुभव येत असेल. मी पहिल्यांदाच मिपाच्या कट्ट्यावर गेलो असल्यामुळे मला त्याची कल्पना नाही. आता पुढच्या कट्ट्याला बोलावले तर यायचे असे मी ठरवले आहे.

.  . . . . . .  . . . . . . . . . . .  (समाप्त)