Sunday, December 09, 2012

पं.जितेंद्र अभिषेकी यांची नाट्यगीतेमाझे बीएआरसीतले एक सहकारी श्री.रमेश रावेतकर यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची आवड होती किंवा षौक होता असे म्हणण्यापेक्षा त्याचा ध्यास होता असे म्हणता येईल. प्रयोगशाळेतले काम आणि घर संसार सांभाळून ते चेंबूर येथील स्व.पं.दिनकर जाधव यांचेकडे जाऊन जयपूर घराण्याचे शास्त्रीय गायन शिकत तसेच घरी नियमितपणे रियाज करत. त्या काळातले जाधवबुवांचे शिष्य दर दीड दोन महिन्यात एकदा एकाद्या सुटीच्या दिवशी आळीपाळीने एकमेकांच्या घरी जमून गाण्याची मैफल जमवीत होते. अशा काही बैठका आमच्या घरीसुध्दा झाल्या. रावेतकर हे त्यातले एक स्टार परफॉर्मर असायचे. रिटायर झाल्यानंतर ते पुण्याला स्थाईक झाले आणि आमचा थेट संपर्क राहिला नाही, पण काही समाईक मित्रांकडून त्यांच्या प्रगतीची माहिती मिळत राहिली. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी पूर्ण वेळ शास्त्रीय संगीताच्या साधनेला वाहून घेतले होते आणि त्या क्षेत्रात चांगला जम बसवला होता. त्या क्षेत्रातल्या जाणकार लोकांनी त्यांना पंडित ही उपाधी दिली होती.

मागच्या महिन्यात मी पुण्याला गेलेलो असतांना वर्तमानपत्रात एक छोटीशी जाहिरात पाहिली. पं.जितेंद्र अभिषेकी यांची अजरामर झालेली नाट्यगीते, कित्येत वर्षांच्या कालावधी न भेटलेल्या  रावेतकरांची भेट आणि त्यांचे प्रभावशाली गायन ऐकणे असा त्रिवेणी संगम साधायचे ठरवले आणि उद्यान सभागृह कुठे आहे याची चौकशी करून ते गाठले. आम्ही तिथे पोचेपर्यंत कार्यक्रम सुरू होण्याच्या बेतात होता. "आज पं.जितेंद्र अभिषेकी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांचे शिष्य पं.रावेतकर त्यांची नाट्यगीते सादर करणार आहेत." या निवेदिकेने केलेल्या प्रस्तावनेमधला 'शिष्य' हा शब्द ऐकताच मी थोडासा दचकलो. रावेतकरांच्याबद्दलची इतकी महत्वाची बातमी यापूर्वी माझ्या कानावर आली नव्हती. पुढे कलाकारांची सविस्तर ओळख करून देतांना तिने सांगितले की त्यांनी एकलव्याप्रमाणे पं.अभिषेकी यांच्या गाण्याचे शिक्षण घेतले. बुध्दीमत्ता आणि कष्टाळू वृत्ती हे संशोधनासाठी आवश्यक असलेले गुण त्यांच्याकडे होतेच, शास्त्रीय संगीताचे ज्ञानही त्यांनी संपादन केले होते. पं.अभिषेकी यांच्या नाट्यगीतांचे व्यवस्थित विश्लेषण करून त्यातली विशिष्ट सौंदर्यस्थळे, बुवांच्या गायनातली खासियत वगैरे मधले सूक्ष्म बारकावे त्यांनी समजून घेऊन ते प्रयत्नपूर्वक आत्मसात केले होते हे त्यांच्या गाण्यातून जाणवत राहिले. वयोमानानुसार त्यांच्या गायनाला पडलेल्या मर्यादा सांभाळून त्यांनी ते गायन उत्कृष्ट रीत्या सादर केले. मी पुणेकर नसल्यामुळे "तुम्ही या गुरूंना कोणती गुरुदक्षिणा दिलीत?" असे विचारले नाही. पण आता ते पुणेकर झालेले असल्यामुळे "आम्ही चालवतो आहोत पुढे वारसा." असे चपखल उत्तर त्यांनी लगेच दिले असते. 

रावेतकरांनी आपल्या गायनाची सुरुवात एका रागमालेने केली. "हिंडोल रागमधुर" पासून सुरू होणा-या या रागमालेत पुढे भूप, छायानट, अलहैया बिलावल, शंकरा, हंसध्वनी, देस, तिलककामोद, बसंत, श्री, मारवा, सोहनी, भैरव, गुणकली, मालकंस, भैरवी, जौनपुरी, मधमास सारंग, बिभास वगैरे राग एकेका ओळीत एकापाठोपाठ एक करून येतात. त्या त्या रागाची ठळक ओळख एका ओळीत त्याच्या नावाबरोबर केली जाते. अशा प्रकारे भराभर राग बदलत त्या रागांचे वेगळे सूर अचूकपणे पकडणे अतीशय कठीण असते आणि भरपूर सराव केल्यानेच ते जमू शकते. स्व.पं.जितेंद्र अभिषेकी ही रागमाला त्यांच्या कार्यक्रमात गात असले तरी ती मुळात दुस-या एका पंडिताने रचली असल्याचे रावेतकरांनी सांगितले. स्व.शिवानंद पाटीलसुध्दा त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ही रागमाला अनेक वेळा छान गात असत आणि प्रत्येक वेळी त्यांना त्यावर टाळ्या मिळत. ही रागमाला एकाद्या मराठी नाटकात असेल असे मला वाटत नाही.

शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाची सुरुवात बहुतेक विद्यार्थी भूप रागाने करतात आणि त्यात थोडे प्राविण्य मिळवल्यानंतर सुरुवातीच्या काळातच यमन हा त्याचा मोठा भाऊ शिकतात असे म्हणतात. रावेतकरांनी यमन रागातलेच पहिले नाट्यगीत घेतले, "देवाघरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम". १९६४ साली रंगमंचावर आलेल्या मत्स्यगंधा या नाटकानेच अभिषेकी यांची कारकीर्द सुरू झाली होती. रामदास कामत यांनी गायिलेले त्या नाटकातले हे पहिलेच गाणे. वृंदावनी सारंग रागातले "साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वतांची" आणि खमाज रागातले "गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाठी" ही मत्स्यगंधा नाटकातली रामदास कामतांची आणखी काही गाणी कार्यक्रमाच्या पुढील भागात रावेतकरानी गायिली. मुलतानी रागातले "नको विसरू संकेत मीलनाचा" हे त्यातले एकच गाणे गायचे राहिले. बीएआरसीत काम करत असतांना रावेतकरांनी एका हौशी नाटकसंस्थेने बसवलेल्या मत्स्यगंधा या नाटकात पराशर ऋषींची भूमिका वठवली होती. तेंव्हापासून त्यांनी ही नाट्यगीते तयार करून ठेवली होती.

नटवर्य बालगंधर्व आणि मास्टर दीनानाथ यांनी गाजवलेला मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ माझ्या जन्माच्याही आधीच होऊन गेला होता. मी जेवढी संगीत नाटके पाहिली आहेत त्यात पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे कट्यार काळजात घुसली हे नाटक निर्विवादपणे सर्वोत्कृष्ट होते असे मला वाटते. हे नाटकच संगीत या विषयावर आधारलेले आहे. भिन्न शैलींमध्ये शास्त्रीय संगीत गाणारे दोन गायक आणि त्यांना एकत्र आणू पाहणारी एक गायिका ही यातली मुख्य पात्रे आहेत. या तीघांनी निरनिराळ्या शैलींमध्ये गायन सादर करावे अशा रीतीची स्वररचना पं.जितेंद्र अभिषेकी यांनी यातील गीतांसाठी केली होती. उदाहरणार्थ त्यातले "घेई छंद मकरंद" हे एकच पद दोन गायक दोन निरनिराळ्या पध्दतीने गाऊन त्यामधला फरक स्पष्ट करून दाखवतात. स्व.वसंतराव देशपांडे या चतुरस्र गायकाने त्यातली आक्रमक प्रकारे गाणा-या ज्येष्ठ गायकाची मुख्य भूमिका लाजवाब वठवली होती. मुद्दाम पं.जितेंद्र अभिषेकी आणि पं.वसंतराव देशपांडे यांच्यासाठीच हे खास नाटक लिहिले असावे असे वाटते. नाट्यसंगीताच्या कुठल्याही कार्यक्रमात कटार काळजात घुसली मधले कमीत कमी एक गाणे तरी यायलाच हवे. दिन गेले भजनाविण सारे, या भवनातिल गीत पुराणे, मुरलीधर श्याम, सुरत पियाकी न छिन बिसुराये, लागी कलेजवाँ कटार यासारखी एकाहून एक सरस अशी मराठी किंवा हिंदी गीते या नाटकात आहेत. रावेतकरांनी त्यातले "तेजोनिधी लोहगोल भास्कर हे गगनराज" हे उगवत्या सूर्याची प्रार्थना असलेले अप्रतिम गाणे सादर केले.

पं. वसंतराव देशपांडे यांनीच अजरामर करून ठेवलेले भीमपलासी रागातले "काटा रुते कुणाला" हे गाणे एक नाट्यगीत आहे हे ही कदाचित सर्वांना ठाऊक नसेल. हे बंध रेशमाचे या रणजीत देसाई यांनी लिहिलेल्या नाटकातले हे गीत मात्र कवयित्री शांता शेळके यांचे आहे. या गीताची कल्पना एका उर्दू गजलेवरून घेतली आहे असे मी एकदा वाचले होते. शांताबाईंनीच लिहिलेले "तुझा गे नितनूतन सहवास" हे यमन रागातले नाट्यगीत वासवदत्ता या नाटकात होते. हे नाटक आणि हे गीत फारसे गाजले नाही. त्या मानाने वसंत कानेटकरांच्या मीरा मधुरा या नाटकातले "स्वप्‍नात पाहिले जे ते राहू देत स्वप्‍नी" हे रामदास कामत यांनी गायिलेले गौडमल्हार रागातले पद जास्त लोकप्रिय झाले होते. पण ते भावगीतासारखे वाटते. धाडिला राम तिने का वनी या द.ग.गोडसे यांच्या नाटकातले पण राजा बढे यांनी लिहिलेले "कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्राला" हे पद पुरुष पात्राचे आहे, पण मी ते आशा खाडीलकर यांच्या कार्यक्रमात ऐकल्याचे मला आठवते. हे नाटक पहायला न मिळाल्यामुळे ते गाणे नक्की कोणाच्या तोंडी आहे ते मला माहीत नाही. हे गीत सूर्यवंश नावाच्या (मी न ऐकलेल्या रागात) असल्याचे रावेतकरांनी सांगितले. पं.जितेंद्र अभिषेकी यांनी स्वररचना केलेल्या या वेगवेगळ्या प्रकारच्या नाट्यगीतांची निवड रावेतकरांनी आपल्या कार्यक्रमात केली होती.

गोरा कुंभार या जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेल्या नाटकातली अशोकजी परांजपे यांनी लिहिलेली गीते त्यातले शब्द आणि त्यावर चढवलेला स्वरसाज या दोन्ही दृष्टीने अप्रतिम आहेत. इतिहासकाळात होऊन गेलेल्या गोरा कुंभारासाठी अशोकजींनी लिहिलेली "पाहू द्या रे मज विठोबाचे मुख, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, केशवाचे भेटी लागलेसे पिसे वगैरे गीते जुन्या संतकवींच्या अभंगांसारखी वाटतात. त्या नाटकातले जौनपुरी रागातले "अवघे गर्जे पंढरपूर" हे नाट्यगीत रावेतकरांनी या कार्यक्रमात घेतले होते.

मत्स्यगंधा या अभिषेकी यांच्या पहिल्या नाटकानंतर दोन वर्षांतच आलेले ययाती आणि देवयानी हे पौराणिक नाटकसुध्दा खूप गाजले होते. कविवर्य कुसुमाग्रज म्हणजेच प्रख्यात साहित्यिक स्व.वि.वा.शिरवाडकर यांनी लिहिलेल्या या नाट्यकृतीमधली "तम निशेचा सरला अरुण कमल प्राचीवर फुलले, प्रेम वरदान स्मर सदा, मी मानापमाना नच मानतो, यतिमन मम मानित त्या एकल्या नृपाला, सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिवसुंदरा, हे सुरांनो चंद्र व्हा" आदि सगळी गाणी तुफान गाजली होती, अजूनही ती अनेक वेळा आपल्या कानावर पडतात. कुसुमाग्रजांची अलौकिक साहित्यिक प्रतिभा आणि अभिषेकीबुवांची अप्रतिम स्वररचना या दोन्हींचा संयोग झाल्यामुळे त्या गाण्यांमध्ये सोनेपर सुहागा असे झाले आहे. त्यातले "सर्वात्मका सर्वेश्वरा" हे गीत भैरवी रागात आहे असे मी समजत होतो, पण त्याच नाटकात पुन्हा "तम निशेचा फुलला" ही दुसरी भैरवी कशासाठी घातली आहे असे मला वाटत असे. सर्वात्मका हे नाट्यगीत सादर करतांना रावेतकरांनी असे सांगितले की जौनपुरी आणि बिलासखानी तोडीमधल्या सुरात हे गाणे गुंफून त्यांच्या विशिष्ट पध्दतीने केलेल्या मांडणीतून भैरवीचा भास त्यात उत्पन्न केला आहे. मी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले नसल्यामुळे त्यावर काही बोलायचा मला अधिकार नाही. या कार्यक्रमाची सांगता रावेतकरांनी "दुर्दैवे आपण दुरावलो या देही" ही ओळ भैरवी रागात आळवून केली. मत्स्यगंधा नाटकातल्या "गुंतता हृदय हे" या गीतातली ही ओळ नाटकाच्या अखेरीस गाऊन प्रेक्षकांचा निरोप घेतला जातो अशी माहिती त्यांनी सांगितली.

अभिषेकी यांनी स्वरबध्द केलेल्या पुरुषनटांच्या गीतांमधली निवडक गाणी रावेतकरांनी या प्रोग्रॅममध्ये गायिली होती. याखेरीज स्त्रीपात्रांच्या तोंडी असलेली खूप प्रसिध्द गाणी आहेत. मत्यगंधा नाटकातली "गर्द सभोती रान साजणी, तव भास अंतरा झाला आणि अर्थशून्य भासे मज हा" ही आशालता वाबगावकर यांची गाणी, धाडिला राम तिने का वनी नाटकातले आशा खाडिलकर यांचे "घाई नको बाई अशी आले रे बकुळ फुला" हे गीत, हे बंध रेशमाचे या नाटकातली "का धरिला परदेश आणि विकल मन आज झुरत असहाय" ही बकुळ पंडित यांची नाट्यगीते अशी अनेक उदाहरणे देता येतील. पं.अभिषेकी यांच्या स्वररचनेचे एक वैशिष्ट्य रावेतकरांनी असे सांगितले की त्यांची गाणी पूर्वीच्या काळातल्या गाण्यांसारखी खूप काळ आळवून आळवून गायची नव्हती. तानांची भेंडोळीच्या भेंडोळी त्यात टाकायची नसत. पण प्रत्येक ओळींमध्येच लहान लहान तानांचे सुंदर तुकडे असलेल्या गोड जागा असतात. सिनेमातल्या गाण्यांप्रमाणे त्यांची गाणी जशीच्या तशीच गायली तर चांगली वाटतात. एकाद्याला शास्त्रीय संगीतातली रागदारी चांगली येते म्हणून त्याने त्यात आणखी भर टाकून लांबण लावली तर त्यातले सौंदर्य शिल्लक रहात नाही. पण गायकाचा कस लागेल इतक्या जागा त्यांनीच गाण्याच्या चाली बांधतांना त्यात पेरून ठेवल्या आहेत.

यामुळेच पं.अभिषेकींच्या नंतर त्यांच्या जवळपास सुध्दा पोचू शकेल असा दुसरा संगीतकार मराठी नाट्यविश्वाला मिळाला नाही.

1 comment:

sarita said...

खूप छान उपयुक्त माहिती.