Tuesday, December 04, 2012

सहा डिसेंबर - एक अनुभव

सहा डिसेंबर ही तारीख आता येण्यातच आहे. या तारखेची खूप वर्षांपूर्वीची एक आठवण जागी झाली. त्या वेळी तीन किंवा चार डिसेंबरच्या रात्रीच्या ट्रेनने माझा मुलगा विदर्भातल्या एका गावी गेला होता. दुसरे दिवशी सकाळी तिथे पोचल्यानंतर तिथले काम दिवसभरात आटोपून संध्याकाळच्या गाडीने तो मुंबईला परतणार होता. परतीचे कन्फर्म्ड रिझर्वेशन केलेले होते. संध्याकाळी त्याने मला फोन केला आणि सगळी कामे सुरळीतपणे झाली असून ठरल्याप्रमाणे तो परतीच्या प्रवासासाठी स्टेशनला जायला निघाला असल्याचे त्याने सांगितले. 

तासाभराने पुन्हा त्याचा फोन आला. यावेळी त्याचा आवाज घाबराघुबरा वाटत होता. तो एवढेच म्हणाला, "मी सांगतो तो फोन नंबर लिहून घ्या आणि तुम्ही त्या नंबरावर मला लगेच फोन करा." एवढे सांगून त्याने फोन ठेऊन दिला. तो असे कां सांगतो आहे हे त्याने सांगितले नाही आणि ते विचारण्यासाठी सुध्दा त्याला फोन लावण्यात काही अर्थ नव्हता. याबद्दल विचार करण्यात वेळ न घालवता मी त्याने दिलेला नंबर फिरवला. दोन तीन प्रयत्नानंतर तो लागला. तो कोणत्या तरी दुकानातला किंवा हॉटेलातला फोन असावा, पण माझ्या मुलानेच उचलला आणि सांगितले, "बाबा, माझा मोबाईल पूर्णपणे डिस्चार्ज झाला आहे म्हणून मी हा नंबर दिला आहे. आज मी गाडी पकडू शकलो नाही, आता माझ्याकडे फारसे पैसे शिल्लक नाहीत आणि मला बरे वाटत नाही आहे. मी काय करू तेच समजत नाही."
"पण तुझ्याकडं परतीचं रिझर्वेशन होतं आणि तू तर गाडी पकडायला वेळेवर निघाला होतास ना?"
"हो, पण सहा डिसेंबरसाठी मुंबईला जाणा-या लोकांनी प्लॅटफॉर्म अगदी गच्च भरला होता, शिवाय गाडी येतांनाच शिगोशीग भरून आली होती. कुठल्याही डब्यात पाय ठेवायला जागा नव्हती. रिझर्वेशनच्या डब्यात देखील हीच परिस्थिती होती. माझ्या डब्याचा तर दरवाजासुध्दा कोणी उघडला नाही. टीसी वगैरेंचा पत्ताच नव्हता. जे लोक दाराला धरून लोंबकळत जाऊ शकत होते तेवढेच कदाचित पुढे गेले असतील. बाकीचे सगळे लोक खालीच राहिले. आता मी काय करू? मला काहीच समजत नाही."
मी विचार केला की पुढल्या गाडीमध्येही अशीच परिस्थिती असणार आणि शिवाय त्यात रिझर्वेशन नाही म्हणजे जास्तच त्रास होणार. किंबहुना त्या गाडीत गुसणेसुध्दा अशक्यच असणार. आणखी किती तासांनंतर किंवा दिवसांनंतर मुंबईच्या दिशेने जाणारी गर्दी कमी होईल ते सांगता येणार नाही. त्याला तोपर्यंत हॉटेलात राहणेही परवडण्यारखे नव्हते, त्याच्याकडे त्यासाठी पैसे नव्हतेच, एटीएम कार्ड वगैरे काही नव्हते आणि जातांना बरोबर नेलेल्या जास्तीच्या पैशाची आता गरज पडणार नाही अशा विचाराने त्याने त्यातले बरेचसे खर्च करून टाकले होते. त्यातून त्याची तबेतही बिघडली होती. त्याला मदत करण्यासाठी जरी मी लगेच जायला निघालो तरी मी तिकडे कुठल्या वाहनाने जाणार? आणि मला इतक्या दूर जाऊन पोचायलाही खूप वेळ लागणार. तोपर्यंत तो काय करेल? त्याच्या प्रश्नाला लगेच देण्यासारखे काही उत्तर माझ्याकडे नव्हतेच. त्यासाठी मी अर्धा तास वेळ मागितला आणि तोपर्यंत बसची काही सोय होते का याची चौकशी करायला सांगितले, पण ती नसणार हे मला माहीत होते. 
मी लगेच मुंबईतल्या दोघा तीघा नातेवाईकांना फोन लावून नागपूरात रहाणा-या त्यांच्या आप्तांची चौकशी केली. त्यातले कोणी त्या दिवशी तिथे होते, कोणी परगावी गेले होते, कोणाच्या घरी आता त्यांचा मुलगाच तेवढा रहात होता. त्या सगळ्यांचे फोन नंबर मी लिहून घेतले. त्यातल्या दोघांना मी साधारणपणे ओळखत होतो. त्यांना फोन लावून मी त्यांच्याशी बोलून घेतले आणि माझ्या मुलाने दिलेला फोन नंबर पुन्हा फिरवला.
माझा फोन येण्याची तो वाटच पहात होता. त्या वेळी तिथून मुंबईला किंवा पुण्याला जाण्यासाठी बसची काही व्यवस्था नव्हतीच, मुंबईपर्यंत येण्यासाठी खाजगी वाहन मिळणेही दुरापास्त होते. त्या नवख्या गावात तो कोणालाही ओळखतही नव्हता. मी आधी त्याच्या तब्येतीची चौकशी केली. ती थोडीशी बिघडली असली तरी तो हिंडूफिरू शकत होता. जास्त गंभीर अवस्था असली तर नागपूरहून कोणाला तरी तिथे जायला विनवावे लागले असते. त्या दिवशीच्या अती गर्दीमुळे तो माणूसही रेल्वेने जाऊ शकला नसताच. त्याला कार किंवा जीपची व्यवस्था करावी लागली असती. सुदैवाने त्याची आवश्यकता नव्हती हे ऐकून थोडा धीर आला. मी मुलाला समजावून सांगितले, "आता मुंबईकडे येण्याचा प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही आणि तिथे थांबून राहूनही काही उपयोग नाही. त्यापेक्षा तू उलट दिशेला जाणारी एकादी ट्रेन पकड आणि सरळ नागपूरला जा. त्या गाडीत बहुधा जास्त गर्दी असणार नाही आणि तुला तिच्यात जागा मिळेल. तिथे आपल्या ओळखीतले अमूक अमूक लोक राहतात, त्यांचे पत्ते आणि फोन नंबर लिहून घे आणि त्यांच्याकडे जाऊन धडक. मी त्यांना तसे सांगून ठेवले आहे. जे काही करायचे ते प्रकृतीला सांभाळून कर."
ती रात्र आम्ही अस्वस्थ अवस्थेतच कशीबशी काढली. त्यानंतर आम्हीही त्याला फोन करू शकत नव्हतो आणि त्यालाही ते शक्य झाले नाही. दुसरे दिवशी सकाळी त्याचा फोन आला. एका नातेवाईकाचा मुलगा त्याला उतरवून घेण्यासाठी नागपूरच्या स्टेशनावर आला होता. पण त्यांचेकडे काही अडचण असल्यामुळे तो त्याला दुस-या नातेवाईकांकडे घेऊन गेला. त्यांनी आपुलकीने त्याची सगळी काळजी घेतली आणि त्याला मुंबईला जाणा-या विमानात बसवून दिले. संध्याकाळपर्यंत तो सुखरूपपणे घरी येऊन पोचला. 

प्रत्यक्ष अनुभवातून तो काही धडे शिकला होता. प्रवासात केव्हा कसली अडचण येईल आणि त्यामधून पैशाची गरज पडेल ते सांगता येत नाही, त्यासाठी काही तरतूद किंवा पर्यायी उपाय नेहमी आपल्या खिशात बाळगायला हवेत आणि परत घरी येऊन पोचेपर्यंत ते सांभाळून ठेवायला हवेत. आजकाल क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम वगैरेंच्या सोयी खूप वाढल्या असल्याने हे काम थोडे सोपे झाले आहे. कोणता माणूस आपल्याला कधी आणि किती उपयोगी पडेल हे काही सांगता येत नाही. त्यामुळे आपल्या चांगल्या व्यवहाराने शक्य तितकी माणसे जोडून ठेवणे आपल्या फायद्याचे असते. 

तेंव्हापासून आम्ही कानाला खडा लावला, काहीही कारण असले तरी पाच सहा डिसेंबरला मुंबईकडे येणा-या ट्रेनमधून प्रवास करायचा विचार मनात आणायचा नाही.

No comments: