Wednesday, December 05, 2012

तेथे कर माझे जुळती - १२ - पं.जितेंद्र अभिषेकी

मी नोकरीसाठी मुंबईला आलो तेंव्हा मराठी संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन सुरू झाले होते. स्व.विद्याधर गोखले यांनी काही नवी संगीत नाटके लिहून ती रंगमंचावर आणली होती. त्यांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. पण त्या काळात आलेल्या मत्स्यगंधा या संगीत नाटकाने लोकप्रियतेचे शिखर गाठले. या नाटकाबरोबरच जितेंद्र अभिषेकी हे एक नवे नाव ज्याच्या त्याच्या तोंडी झाले.

स्वयंवर आणि सौभद्र या आद्य नाटकांपासूनच संगीत नाटक हे पौराणिक काळामधल्या कथेवर असावे असा संकेत निर्माण झाला होता. याला काही सन्माननीय अपवाद होते. मध्ये खूप वर्षे निघून गेल्यानंतरसुध्दा स्व.विद्याधर गोखले यांनीही आपली नाटके पौराणिक किंवा निदान ऐतिहासिक काळातील वातावरणाच्या पार्श्वभूमीवर लिहिली होती. मत्स्यगंधा हे नाटकसुध्दा महाभारतातील कथेवर आधारलेले होते. अशा पौराणिक काळातले जटाधारी ऋषिमुनी नेहमी महाज्ञानी, पंडित आणि धीरगंभीर प्रकृतीचे दाखवले जातात. त्याहून वेगळ्या प्रवृत्तीच्या कळलाव्या नारदमुनींच्या तोंडी दिलेले 'लग्नाला जातो मी द्वारकापुरा' या गीताचा अपवाद सोडल्यास इतर कोणा ऋषीने ताना पलटे घेऊन गाणे रंगवले असल्याचे मला तरी माहीत नव्हते. पण मत्स्यगंधा या नाटकातले पराशर मुनी नाटकाच्या पहिल्या अंकातच "देवाघरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम" असे गात गात प्रवेश करतात, "नको विसरू संकेत मीलनाचा, तृषित आहे मी तुझ्या दर्शनाचा" असे गात प्रेमयाचना करतात, "गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी, हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी" या गाण्यातून प्रेमाची पूर्तता करतात आणि त्यानंतर "साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वताची " असे गात अंतर्धान पावतात ते कायमचेच. सत्यवतीच्या जीवनातले नाट्य त्यानंतर सुरू होते आणि अखेरपर्यंत चालत राहते. पराशर मुनीचा त्यात पुन्हा कधी साधा उल्लेखदेखील होत नाही.

नाटकाच्या कथानकात पराशर हे पात्रच नसते तरी कदाचित चालले असते, पण हे नाटक इतके चालले ते मात्र प्रामुख्याने पराशरांच्या चार नाट्यगीतांमुळे आणि विशेषतः त्या गाण्यांना पं.जितेंद्र अभिषेकी या नवोदित संगीतकाराने दिलेल्या अप्रतिम चालींमुळे. रामदास कामत या गायक नटाने त्यात जीव ओतून त्यांना अजरामर केले हे सुध्दा खरे आहेच. पण त्यांचे शास्त्रीय गायनातले सामर्थ्य ओळखून आणि त्यांच्या दमदार आवाजात चांगली खुलेल अशी स्वररचना अभिषेकींनी या गाण्यांसाठी केली. सत्यवती ही या नाटकातली मध्यवर्ती भूमिका आशालता वाबगावकर या गुणी आणि कुशल अभिनेत्री वठवत असत. त्यांच्या गोड आवाजाचा पुरेपूर उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने त्यांना दिलेल्या गाण्यांना वेगळ्या प्रकारच्या मधुर चाली दिल्या होत्या. नाटकातले प्रसंग, गीतामधले भाव, नटनट्यांचे आवाज, त्यांची शास्त्रीय संगीतातली तयारी या सर्वांचा अभ्यास आणि विचार करून शिवाय ती गाणी लोकांना आवडावीत, त्यांना सहजपणे गुणगुणता यावीत अशा दृष्टीने त्यांना चाली लावण्याची अद्भुत किमया पं.अभिषेकी यांनी साध्य करून दाखवली होती. त्यानंतरही त्यांनी अनेक अजरामर ठरलेल्या नाट्यगीतांची संगीतरचना केली आणि मत्स्यगंधा हा एक योगायोग नव्हता हे दाखवून दिले.

देवल आणि किर्लोस्करांच्या काळात नाटक कंपनीतल्या सगळ्या लोकांचा मुक्काम एकत्र असायचा. नाटक मंडळींकडे एक गायनाचा मास्तर असायचा. संगीत नाटकातल्या पदांना चाली लावणे, नटांना ती पदे शिकवून त्यांच्या तालमी घेणे वगैरे कामे तो नित्यनियमाने करायचाच, शिवाय प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळीसुध्दा हजर राहून एकादे वाद्य वाजवत असे. त्या वेळी नाटकांना वेळेची मर्यादा नसल्यामुळे गायक नट ती पदे आळवून आळवून गात असत. शास्त्रीय संगीताचा गायक जसा एकेक राग असंख्य प्रकारच्या ताना घेऊन फुलवतो, त्याप्रमाणे हे गायक नटसुध्दा त्यांच्या कुवतीनुसार त्या पदांचा विस्तार एकाद्या बंदिशीप्रमाणे करीत असत. अभिषेकी ज्या काळात आले तेंव्हा अशा प्रकारच्या नाटककंपन्या राहिल्या नव्हत्या. नट, नट्या, वादक वगैरे मंडळी एकत्र रहात नसत. काळानुसार झालेल्या बदलामुळे आधी ठराविक वेळात तालीम करायची आणि एकदा नाटक बसले की त्याच्या प्रयोगांच्या वेळी भेटत रहायचे असा रिवाज पडला होता. नाटकाचा प्रयोग ठराविक वेळेत संपलाच पाहिजे हे आवश्यक झाले होते. या सर्व गोष्टींचे भान ठेऊन त्यानुसार संगीतरचना करणे हे काम अधिक कौशल्यपूर्ण झाले होते. ते केवळ दिग्दर्शन न राहता संगीताचे नियोजन झाले होते.

मी मुंबईला आलो तेंव्हा माझ्या मित्रांबरोबर दादरला शिवाजीमंदिराच्या जवळच रहात होतो. तिथे लावलेले आगामी नाटकांचे बोर्ड येता जाता पहायचे आणि आधीच तिकीटे काढून त्यातली बरी वाटणारी नाटके पहायची सवयच आम्हाला लागली होती. नाटकाच्या बोर्डावरले जितेंद्र अभिषेकी हे नाव वाचून ते नाटक आम्ही नक्की पहात होतो आणि आमची कधीच निराशा झाली नाही. त्या नाटकांमधली नाट्यगीते उत्तम असायचीच, ते नाटकसुध्दा दर्जेदार असायचे. संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी अभिषेकी त्या नाटकाची निवड चोखंदळपणे करत असावेत.

त्या काळातल्या बहुतेक सार्वजनिक गणेशोत्सवात शास्त्रीय संगीताचा एकादा तरी कार्यक्रम हमखास असायचा. दादरमध्ये सुध्दा काही ठिकाणी रस्त्यावरच गोणपाट अंथरून प्रेक्षकांना बसायची व्यवस्था केली जायची. आजकाल त्या भागात काय परिस्थिती आहे हे मी पाहिलेले नाही, पण त्या काळातली मोटारगाड्यांची आणि माणसांची संख्या खूप कमी असल्यामुळे हे शक्य असायचे. काही ठिकाणी त्या भागातल्या एकाद्या शाळेच्या सभागृहात कार्यक्रमाची सोय केली जात असे. रस्त्यावरला कार्यक्रम विनामूल्यच असायचा, सभागृहातल्या प्रोग्रॅमला नाममात्र तिकीट असायचे. आम्हाला ते सहज परवडत होते. मला आजसुध्दा शास्त्रीय संगीतातले काही कळते अशातला भाग नाही, त्या काळात तर त्यातले ओ की ठो समजत नव्हते. पण आमच्या एका रूममेटने शाळेत असतांना संगीताच्या एक दोन परीक्षा दिल्या होत्या एवढ्या भांडवलावर तो उस्तादगिरी करायचा. त्याच्या आग्रहाखातर त्याच्यासोबत आम्हीही अशा बैठकींना जाऊन बसत होतो. संगीताच्या क्षेत्रामधल्या बड्या बड्या प्रस्थांचे गायन अशा उत्सवांमध्ये जवळ बसून ऐकायला मिळाले. त्या काळात जितेंद्र अभिषेकी कदाचित एवढे जास्त प्रसिध्द झाले नसतील. दादर भागातल्या कुठल्या ना कुठल्या गणेशोत्सवात त्यांचे गायन हमखास असायचेच आणि आम्ही ते कधी चुकवले नाही.

आम्ही ऐकलेल्या अभिषेकींच्या गायनाच्या पहिल्याच कार्यक्रमाच्या वेळी योगायोगाने आम्हाला अगदी स्टेजच्या पुढ्यातच बसायला जागा मिळाली होती. अभिषेकींचा आवाज नैसर्गिक रीत्या पं.भीमसेन जोशी यांच्यासारखा बुलंद नव्हता किंवा स्व.सुधीर फडके यांच्यासारखा मुलायमही नव्हता. त्यांनी रियाजातून तो कमावला होता. गायनाच्या सुरुवातीला त्यांनी खर्जामध्ये व्हँ अशी सुरुवात केल्यावर आम्हाला हसू फुटले आणि विलंबित ऐकता ऐकता झोप यायला लागली. समोर बसलेलो असल्यामुळे एकमेकात बोलूही शकत नव्हतो. आमच्या आजूबाजूला बसलेल्या इतर नवख्या पोरांचीही अशीच अवस्था होती. असल्या मठ्ठ दगडांसमोर आपली अलौकिक कला सादर करतांना पंडितजींना किती यातना होत असतील याची कल्पना करता येणार नाही. पण  आमच्यासारख्या अज्ञानी लोकांकडे बिलकुल लक्ष न देता ते आपल्या गायनात तल्लीन होऊन गेले. त्यानंतर त्यांचे गायन पचनी पडत नसले तरी त्यांच्या मुखावरले भाव पहात राहिलो. दृत गतीत बंदिश सुरू झाल्यावर मात्र आपण काही तरी अपूर्व ऐकत असल्याचे जाणवले आणि नाट्यगीतांनी तर धमाल आणली. टाळ्यांच्या कडकडाटात सारा परिसर दुमदुमून गेला.

त्यानंतर मात्र माझ्या मनात त्यांच्या गायनाचे विलक्षण आकर्षण निर्माण झाले आणि दादरला असेपर्यंत मीही माझ्या मित्राबरोबर ते पहात आणि ऐकत राहिलो. अणुशक्तीनगरला रहायला गेल्यानंतर मराठी नाटके किंवा शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांची तिकीटे काढणे आणि दूरच्या नाट्यगृहात जाऊन ते पहाणे बरेच कठीण झाल्यामुळे ते कमी होत गेले. पण मध्ये अशी काही वर्षे निघून गेल्यानंतर आमची योगायोगाने स्व.शिवानंद पाटील आणि योजना यांच्याशी ओळख झाली आणि वाढत गेली. त्यांचे योजना प्रतिष्ठान अनेक सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करीत होते. त्या सर्व कार्यक्रमांना आमची उपस्थिती असायचीच, शिवाय इतर संस्थांतर्फे होणा-या शिवानंद पाटील यांच्या गायनालाही आम्ही शक्य तोवर जात होतो. शिवानंद पाटील हे पं.जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य होते आणि त्यांची नाट्यगीते, अभंग, भावगीते वगैरे त्यांच्या कार्यक्रमात जवळ जवळ तंतोतंत तशाच पध्दतीने गात असत. आम्ही ऐकलेल्या अभिषेकींच्या गाण्यांची यातून उजळणी होत राहिली. शिवाय टेलीव्हिजन आणि टेप रेकॉर्डरवर आम्ही ती ऐकत होतोच. एक दोन वेळा त्यांच्या कार्यक्रमालाही गेलो. काही काही वेळा योजना प्रतिष्ठानच्या कार्यक्रमालाही ते सन्माननीय आमंत्रित पाहुणे म्हणून उपस्थित असत. शिवानंद किंवा योजना यांच्यासोबत राहिल्यामुळे त्यांची भेट होऊन एकाद दुसरे वाक्य बोलणेही होत असे.

अशाच एका कार्यक्रमात मी त्यांना पाहिले तेंव्हा त्यांची प्रकृती काही ठीक दिसली नाही. त्यावेळी ते अजून पुण्याला रहायला गेले नव्हते की पुण्याहून त्या वेळी मुंबईला आले होते ते आता आठवत नाही. वजनाच्या प्रमाणात त्यांच्या अंगातली ताकत कमी झाली असल्यामुळे त्यांची हालचाल संथ झाली होती, त्यांना बोलतांना दम लागत होता. त्यानंतर ते पुन्हा धडधाकट झाले की नाही तेही समजले नाही. त्यांचे एक जवळचे आप्त श्री.गोडसे योजना प्रतिष्ठानच्या कामात भाग घेत होते आणि अधून मधून त्यांची भेट झाली तर त्यांचेकडून अभिषेकीबुवांची खुषाली कळत असे. पण नंतर आम्हाला त्या कार्यक्रमाला जाणेही शक्य होईनासे झाले. वर्तमानपत्रात त्यांच्याबद्दल जेवढे छापून येत होते किंवा टीव्हीवर दिसत होते तेवढाच संबंध राहिला. त्यांच्या निधनाची दुःखद बातमी ऐकल्यानर मात्र मन सुन्न होऊन गेले.

No comments: