Friday, December 14, 2012

बाराचा महिमा आणि .... भाव

मुलाचा जन्म झाल्यापासून बारावे दिवशी त्याचे बारसे करतात. बाराव्या दिवशी त्याचे नामकरण करण्यासाठी मुहूर्त पहावा लागत नाही म्हणून त्या दिवशी बारशाचा समारंभ करतात असे म्हणतात. आतासारखी सगळ्या प्रकारच्या मुहूर्तांची माहिती देणारी जाडजूड छापील पंचांगे पूर्वीच्या काळात मिळत नसत. ज्योतिषविद्या जाणणा-या कोणा विद्वानाने आधी बाळाची जन्मतिथी, वेळ, प्रहर वगैरे पाहून त्याची पत्रिका तयार करायची आणि त्यातली राहू, केतू, शनि, मंगळ वगैरेंची स्थाने पाहून त्याच्या कुठल्याही शुभकार्यासाठी मुहूर्त काढायचा हे जरा अवघड असेल.
नुकतेच जन्माला आलेले बाळ फारच नाजुक असते आणि त्याची आईसुध्दा अशक्त झालेली असते. त्यांच्याकडे सगळे लक्ष पुरवून त्यांना संपूर्ण विश्रांती देणे अत्यंत आवश्यक असते, शिवाय त्या वेळेस जंतुसंसर्गाचा धोका जास्त आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे ते टाळणे गरजेचे असते. अशा कारणांमुळे घरात कुठल्याच प्रकारच्या समारंभाची धांदल असणे उचित नसते. पूर्वीच्या काळात घरात नवीन मूल जन्माला आल्यास सोयर पाळले जात असे. चार दिवस निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर पाचवे दिवशी त्या बाळासाठी जिवतीमातेची पूजा केली जात असे. यावरूनच "अगदी सुरुवातीपासून असलेली गोष्ट" या अर्थाने 'पाचवीला पूजलेली' हा वाक्प्रचार पडला. त्यानंतर आणखी आठवडाभराने बारशाचा समारंभ केला जात असे. तोपर्यंत बहुतेक बाळे आणि बाळंतिणींच्या तब्येती सुरळीत झालेल्या असत. त्यांच्या सगळ्या वैद्यकीय तपासण्या करून त्यांना फिटनेस सर्टिफिकेट देऊ शकणारे डॉक्टर त्या काळात नसायचे. बहुतेत लोकांच्या  अनुभवावरून बाराव्या दिवशी बारसे करण्याची प्रथा पडली. बारा हा आकडा अशा प्रकारे जन्मापासूनच आपल्या जीवनात येतो.

पुढे त्या बाळाचा दर महिन्याला वाढदिवस होत राहतो. असे बारा महिने झाल्यावर मासिक वाढदिवस थांबतात आणि वार्षिक सुरू होतात. आकाशातल्या सूर्य आणि चंद्र यांच्या निरीक्षणामधून वर्ष आणि महिने यांच्या द्वारे कालगणना करणे सुरू झाले. त्यामुळे एका वर्षात बारा महिने असणे हे सूर्यचंद्रांनी ठरवले. बहुधा त्यावरून प्रेरणा घेऊन आकाशामधील तारकापुंजांचे बारा गट करून आकाशगोलाची बारा राशींमध्ये विभागणी करण्यात आली. दिवस आणि रात्र यांचेही बारा बारा भाग करून दिवसाची विभागणी चोवीस तासांमध्ये केली गेली. एकपासून चोवीसपर्यंतचे इतके सगळे आकडे पटकन समजणे आणि लक्षात ठेवणे थोडे कठीण असल्यामुळे घड्याळांच्या डायलची रचना करतांना त्यात फक्त बाराच तास दाखवले गेले. दिवस आणि रात्र यांच्यातला फरक उघड असल्यामुळे घड्याळात पाहून अकरा किंवा चार वाजलेले दिसले तर त्या वेळी ते दिवसाचे की रात्रीचे हे सांगण्याची सहसा गरज नसते. आपले जीवन आजकाल घड्याळाशी बांधले गेले आहे आणि त्यातला बाराचा आकडा सारखा आपल्या नजरेसमोर येत राहतो.

माझ्या लहानपणी प्राथमिक शालेय शिक्षण हे अक्षरे आणि अंक यांच्या ओळखीपासून सुरू होऊन त्यातच बराच काळ रेंगाळत असे. आधी अक्षरे, शब्द, वाक्यरचना वगैरेंमधून भाषा साधारणपणे समजायला लागल्यानंतर त्या भाषेतून इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान यासारखे विषय शिकवावेत असा विचार त्यात होता आणि माझ्या मते तो बरोबर होता. अक्षरओळखीमध्ये अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः हे बारा स्वर आणि कखगघङ पासून षसहळक्षज्ञ पर्यंत सगळी व्यंजने शिकून झाल्यावर ककाकिकीकुकूकेकैकोकौकंकः ही बाराखडी आणि त्यानंतर किंवा तिच्या सोबतीने ख ग घ वगैरे इतर व्यंजनांच्या बाराखड्या गिरवल्या जात. निदान दोन वर्षे तरी मी स्लेटच्या पाटीवर सगळ्या बाराखड्या गिरवल्या आहेत. या बाराखड्या गिरवून गिरवून त्यातील प्रत्येक अक्षराचा आकार डोळ्यात बसला की कोठलाही शब्द पटकन वाचता किंवा लिहिता येतो. त्यानंतर अर्थ समजो वा न समजो, कुठलेही वाक्य, उतारा किंवा पान वाचायला अडचण येत नाही. बाराखड्यांच्या गिरवण्यामधून बारा हा शब्द आणि अंक मनावर खोलवर खोदला गेला.  


इंग्रज लोकांना बारा हा आकडा फारच आवडत असावा. आता त्यांनीही दशमान पध्दत अंगिकारली असली तरी त्यांच्या पूर्वीच्या चलनात १२ पेन्स म्हणजे एक शिलिंग असायचा. त्यावरूनच त्यांनी भारतात सुरू केलेल्या चलनात सुध्दा बारा पै म्हणजे एक आणा असायचा. पै या नाण्याचा उपयोग माझ्या आजोबांच्या काळात होत असे. आता पै हे फक्त एक आडनाव राहिले आहे. लांबीरुंदी मोजण्यासाठी असलेल्या परिमाणात बारा इंचांचा एक फूट असतो. आता इग्रजांनी मेट्रिक पध्दत स्वीकारली असली तरी अमेरिकन लोक अजून फूटपट्ट्या वापरतात. अजूनही सगळीकडे बारा नगांना एक डझन म्हणतात. होमिओपाथी या चिकित्सापध्दतीत बारा मुख्य क्षार असतात.

आपल्या पूर्वजांनाही बारा आकडा आवडत असे. देशभरात शंकराची लक्षावधी देवळे असतील, पण त्यातली बारा ज्योतीर्लिंगे प्रसिध्द आहेत आणि सर्वाधिक पवित्र व जागृत देवस्थाने मानली जातात. सूर्याच्या बारा नावांनी त्याला बारा सूर्यनमस्कार घालतात. गणपतीच्या बारा नावांची दोन स्तोत्रे आहेत. अनेक गावांची नावे बारा या शब्दापासून तयार झालेली आहेत, जसे महाराष्ट्रात बारामती, उत्तर भारतात बाराबंकी आणि काश्मीरात बारामुल्ला. आणखीही असतील, पण ही तीम गावे बातम्यांमध्ये येत असतात.

ही सगळी बारा या अंकाचे महत्व दर्शवणारी उदाहरणे आहेत. पण बारा याच संख्येचा उपयोग निगेटिव्ह अर्थानेही केला जातो. एकाद्याचे वाटोळे होण्याला त्याचे बारा वाजले म्हणतात. व्यापार व्यवसायात एकाद्याला खूप मोठा तोटा झाला तर त्याने लाखाचे बारा हजार केले असे म्हणतात. एकाद्याची किंमत कमी झाली की तो बाराच्या भावात गेला. हा वाक्प्रचार कदाचित 'चीपर बाय डझन Cheaper by dozen' वरून आला असेल. 'केल्याने देशाटन .. मनुजा चातुर्य येतसे फार' असे सुभाषित आहे. पण या चातुर्याचा उपयोग कोणी इरसाल बनण्यात किंवा लबाडीमध्ये करत असेल तर तो (किंवा ती) बारा गावचे पाणी पिऊन आला (आली) आहे असे बोलले जाते.
या ना त्या कारणाने आणि अर्थाने बाराचा आकडा नेहमी आपल्या आसपास कुठे तरी फिरत असतो.

No comments: