Saturday, June 30, 2012

अभंग रंग

आज आषाढी एकादशीनिमित्य एक छान कार्यक्रम पहायला आणि मुख्य म्हणजे ऐकायला मिळाला. काणेबुवा प्रतिष्ठान कडून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात संगीताचार्य काणेबुवांच्या शिष्या मंजुषा कुलकर्णी पाटील, किशोरी आमोणकरांचे शिष्य रघुनंदन पणशीकर आणि स्व.जितेंद्र अभिषेकी यांचे चिरंजीव शौनक अभिषेकी या मुरलेल्या गायकगायिकांनी भाग घेतला होता. तबल्याच्या साथीला पं.विजय घाटे आणि पखवाजवर पं.भवानीशंकर हे त्यांच्यापेक्षाही प्रसिध्द असे आघाडीचे कलाकार होते, सारेगमपवरील अप्रतिम बांसुरीवादनाने घराघरात पोचलेले अमर ओक आणि टाळ या वाद्याच्या वादनामधील एकमेव तज्ज्ञ असलेले प्रख्यात आणि ज्येष्ठ कलाकार माउली टाकळकर हे सुध्दा साथीला होते. हार्मोनियमवर साथसंगत करणारे श्रीराम हसबनीस अजून प्रसिध्द झाले नसले तरी उत्तम वादन करीत होते. इतक्या सगळ्या गुणी कलाकारांनी एकत्र येऊन सादर केलेला हा कार्यक्रम लाजवाब होणारच !

शौनक अभिषेकी यांनी काही श्लोक गाऊन मंगलमय सुरुवात करून जय जय रामकृष्णहरी या नामाचा घोष सुरू केला आणि धार्मिक वातावरण निर्माण केले. विठ्ठलाच्या भजनाची सुरुवात रूपाचा अभंग गाऊन करायची वारकरी संप्रदायाची प्रथा आहे. त्यानुसार मंजुशाने संत ज्ञानेश्वरांच्या अभंगापासून या अभंगरंगाची पारंपरिक सुरुवात केली.

रूप पाहतां लोचनी । सुख जाले वो साजणी ।।१।।
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ।।२।।
बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठली आवडी ।।३।।
सर्व सुखाचे आगर । बाप रखुमादेवीवर ।।४।।
आषाढी आणि कार्तिकी एकादशीला सर्व विठ्ठलभक्त पंढरपूरच्या यात्रेला जातात. हे महात्म्य पंढरीलाच कां आहे याबद्दल नामदेव महाराजांचा अभंग शौनकने सादर केला.

आधी रचिली पंढरी। मग वैकुंठ नगरी॥१॥
जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर ॥२॥
जेव्हा नव्हती गोदा गंगा । तेव्हा होती चंद्रभागा ॥३॥
चंद्रभागेचे तटी । धन्य पंढरी गोमटी ॥४॥
नासिलीया भूमंडळ । उरे पंढरीमंडळ ॥५॥
असे सुदर्शनावरी । म्हणुनी अविनाशी पंढरी ॥६॥
नामा म्हणे बा श्रीहरी । आम्ही नाचु पंढरपुरी ॥७॥
त्यानंतर रघुनंदन पणशीकरांनी गायिलेला अभंग मी पूर्वी ऐकलेला नव्हता. यात संत एकनाथांनी नारायणाची विनवणी केली आहे.

अहो नारायणा, सांभाळावे अपुल्या दीना ।।
अमुची राखावा जा लाज, परोपरा हेचि काज ।।
सांभाळावी ब्रीदावळी, दया करुणाकल्लोळी ।।
एका जनार्दनी शरण, करुणाकर पतितपावन ।।
ज्ञानेश्वरांनी पाया रचला, नामदेवांनी ओसरी बांधली, एकनाथांनी खांब उभे केले या क्रमाने महाराष्ट्रातील संतांनी उभ्या केलेल्या मंदिराचा कळस संत तुकारामांनी रचला. त्यांचा एक सुप्रसिध्द अभंग मंजुषाने सादर केला. वाचा, नेत्र, कान, मन वगैरे सर्वांगाने विठोबाची भक्ती करावी आणि त्यात देहभाव हरपून जावे असे संत तुकोबांनी या अभंगात सांगितले आहे.

घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचें ॥१॥
तुम्ही घ्या रे डोळे सुख । पाहा विठोबाचें मुख ॥२॥
तुम्ही ऐका रे कान । माझ्या विठोबाचें गुण ॥३॥
मना तेथें धांव घेई । राहें विठोबाचे पायी ॥४॥
रूपी गुंतले लोचन । पायी स्थिरावले मन ॥५॥
देहभाव हरपला । तुज पाहता विठ्ठला ॥६॥
तुका म्हणे जीवा । नको सोडूं या केशवा ॥७॥

या कार्यक्रमाचे एक संयोजक आणि पुण्याचे उपमहापौर श्री. दीपक मानकर यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. मध्यंतरानंतर त्यांनी एक अलीकडच्या काळातले प्रसिध्द गाणे गाऊन घेतले. संत नामदेवांच्या या अभंगाला पारंपरिक भजनापेक्षा वेगळ्याच प्रकारची चाल लावून संगीतकार श्रीधर फडके आणि गायक सुरेश वाडकर या द्वयीने भक्तीसंगीताच्या क्षेत्रात एक वेगळे असे स्थान मिळवून दिले आहे.

विठ्ठल आवडी प्रेमभावो । विठ्ठल नामाचा रे टाहो ॥
तुटला हा संदेहो । भवमूळ व्याधीचा ॥
म्हणा नरहरी उच्चार । कृष्ण हरी श्रीधर ।
हेची नाम आम्हा सार । संसार करावया ॥
नेणो नामाविण काही । विठ्ठल कृष्ण लवलाही ।
नामा म्हणे तरलो पाही । विठ्ठल विठ्ठल म्हणताची ॥

मध्ययुगात होऊन गेलेल्या संतमंडळींनी पंढरीचे गुणगान केलेले आहेच, पण आजकालच्या युगातले कवी अशोकजी परांजपे यांनी जुन्या काळच्या भाषेत पंढरपूराचे सुंदर वर्णन केले आहे. शौनक अभिषेकी आणि रघुनंदन पणशीकर या दोघांनी मिळून हे गाणे फारच सुंदर गायिले.

अवघे गरजे पंढरपूर । चालला नामाचा गजर ।।ध्रु.।।
टाळघोष कानी येती । ध्यानी विठ्ठलाची मूर्ती ।
पांडुरंगी नाहले हो । चंद्रभागातीर ।।१।।
इडापिडा टळुनी जाती । देहाला वा लाभे मुक्ती।
नामरंगी रंगले हो । संतांचे माहेर ।।२।।
देव दिसे ठाई ठाई । भक्त लीन भक्तापायी ।
सुखालागी आला या हो । आनंदाचा पूर ।।३।।

पेशवाईत होऊन गेलेले शाहीर होनाजी बाळा यांनी लिहिलेली घनःश्यामसुंदरा ही अमर भूपाळी आणि सांगा मुकुंद कुणी हा पाहिला यासारखी गीते शांतारामबापूंनी काढलेल्या चित्रपटातून एका काळात लोकप्रियतेच्या आणि प्रसिध्दीच्या शिखरावर पोचली होती. त्यांनी लिहिलेले एक गाणे पं.सुरेश हळदणकरांच्या आवाजात प्रसिध्द झाले होते. त्यातली शब्दरचना यापूर्वी कधी लक्ष देऊन ऐकलेली नसल्यामुळे आतापर्यंत मी त्याला नाट्यसंगीत समजत होतो. ती गौळण आहे हे आज समजले. मंजुषाच्या गोड आवाजात तिचा अर्थही सुसंगत वाटला आणि समजला.

श्रीरंगा कमलाकांता हरि पदरातें सोड ॥
व्रिजवासी नारी । जात असो की बाजारी ।
कान्हा का मुरारी । अडविता का कंदारी ।
मथुरेची बारी । पाहू मजा हो गिरिधारी ।
विकुनी नवनीत दधि गोड । हरि पदरातें सोड ॥
ऐका लवलाही । गृहिं गांजिती सासुबाई ।
परतुनिया पाही । येऊ आम्ही ईश्वर ग्वाही ।
ग्यान देऊन काही । मग जाऊ आपले ठायी ।
पतीभयाने देहरोड । हरि पदरातें सोड ॥
विनवुनी कृष्णासी । शरणागत झाल्या दासी ।
आणिल्या गोपि महालासी । होनाजिरायासी ।
जा मुकुंदा सोड रे ॥

मुख्यतः शास्त्रीय संगीतातील सर्वश्रेष्ठ गायिका समजल्या जाणा-या किशोरीताई आमोणकरांनी काही अप्रतिम सुगम संगीतही गायिले आहे, त्यात भक्तीसंगीताला महत्वाचे स्थान आहे. त्यांचे शिष्यवर रघुनंदन पणशीकरांनी तुकारामाच्या या अभंगातून किशोरीकाईंची आठवण करून दिली. मंजुषाने गायिलेल्या तुकारामाच्याच घेई घेई माझे वाचे या अभंगात सांगितल्यानुसार आचरण केल्यानंतर भक्ताची काय अवस्था होते, ते या अभंगात सांगितले आहे.

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणें सोसें मन जालें हांवभरी । परती माघारीं घेत नाहीं ॥२॥
बंधनापासूनि उकलल्या गांठी । देतां आली मिठी सावकाशें ॥३॥
तुका म्हणे देह भारिला विठ्ठलें । कामक्रोधें केलें घर रीतें ॥४॥

संत चोखा मेळा यांनी लिहिलेला एक अभंग पं.जितेंद्र अभिषेकी यांनी एका काळी ज्याच्या त्याच्या ओठावर आणला होता. त्यांचे सुपुत्र शौनक यांनी आपल्या दणदणीत आवाजात त्याचा नाद सभागृहात घुमवला.

अबीर गुलाल उधळीत रंग । नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥१॥
उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जाती हीन ।
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन ।
पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥२॥
वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू ।
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ ।
विठ्ठलाचे नाम घेऊ हो‌उनी निःसंग ॥३॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती ।
चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग ॥४॥
विठ्ठल हा देव रामदासांना रामच वाटला होता, इतर अनेक संतांनी त्याला निरनिराळ्या रूपात पाहिले. संत तुकारामाच्या एका अभंगात त्यांनी त्याच परमेश्वराची अनेक रूपे दाखवली आहेत.

श्री अनंता, मधुसूदना, पद्मनाभा नारायणा ।।
सकल देवाधिदेवा, कृपाळू, वाली, केशवा ।
महानंदा, महानुभावा, सदाशिवा, सदंगरूपा ।
अगा ये सगुणा, निर्गुणा, जय जगचालिता, जगजीवना ।
वसुदेवदेवकीनंदना, बाळरांगणा, बाळकृष्णा ।
तुका आला लोटांगणी, मज ठाव द्यावा जी चरणी ।
हीच करितसे विनवणी, भावबंधनी, सोडवावे ।।
कार्यक्रमाची सांगता मंजुषाने संत कान्होपात्रा यांच्या या प्रसिध्द अभंगाने भैरवी रागात केली.

अगा वैकुंठीच्या राया । अगा विठ्ठल सखया ॥१॥
अगा नारायणा । अगा वसुदेवनंदना ॥२॥
अगा पुंडलिक वरदा । अगा विष्णू तू गोविंदा ॥३॥
अगा रखुमाईच्या कांता । कान्होपात्रा राखी आता ॥४।।
सर्वच गायक वादकांनी आपल्या कौशल्याची कमाल करून प्रत्येक अभंगाला टाळ्यांच्या कडकडात दाद मिळवली. अमर ओक यांनी बांसुरीवर अप्रतिम साथ दिलीच, शिवाय बहुतेक अभंगामध्ये आपले स्वतःचे सुरेख तुकडे वाजवून रसिकांची वाहवा मिळवली. मिलिंद कुलकर्णी यांचे निरूपण फारच छान होते. अनेक संत आणि अर्वाचीन कवींच्या रचनांमधील ओळींचा संदर्भ देत त्यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले होते.

बरेच दिवसांनी असा कानाला आणि मनाला तृप्त करणारा कार्यक्रम पहायची संधी मिळाली.



Thursday, June 28, 2012

पावसाची गाणी - भाग १


ये रे ये रे पावसा,
तुला देतो पैसा ।
पैसा झाला खोटा,
पाऊस आला मोठा ।।

ये गं ये गं सरी,
माझं मडकं भरी ।
सर आली धाऊन,
मडकं गेलं वाहून ।।

पाऊस पडतो रिम झिम,
अंगण झालं ओलं चिंब ।
पाऊस पडतो मुसळधार,
रान झालं हिरवंगार ।।

हे गाणे कोणी आणि कधी लिहिले हे मला ठाऊक नाही, पण मला बोबडे बोलता येऊ लागल्यानंतर आणि लिहिण्यावाचण्याच्या किंवा अर्थ समजू लागण्याच्या आधी या मधल्या शैशवकाळात केंव्हा तरी ऐकून ऐकून ते पाठ झाले आणि आजतागायत ते स्मरणात राहिलेले आहे. लहानपणी शिकलेल्या बडबडगीतांचा उगम कधीच माहीत नसतो आणि तो शोधावा अशी कल्पनाही सहसा कधी मनात येत नाही. 'येरे येरे पावसा' या गाण्याच्या मुळाचा गूगलवर शोध घेण्यचा प्रयत्न इतक्या वर्षांनंतर मी आता करून पाहिला. त्यात हे गाणे मला चक्क विकीपीडियावर सापडले, पण त्याच्याबद्दल कुठलीच माहिती मात्र मिळाली नाही. पण गंमत म्हणजे हेच्या हेच गाणे गेली निदान साठ वर्षे तरी असंख्य मराठी घरांमध्ये लहान मुलांना जसेच्या तसे शिकवले जात आहे. 'पैसा' हे नाणे तर कधीच चलनामधून हद्दपार झालेले आहे, माझ्या लहानपणीसुध्दा त्याला काहीच विनिमयमूल्य नव्हते. त्यामुळे हे गाणे रचले जाण्याचा काळ खूप पूर्वीचा असला पाहिजे. कदाचित माझ्या आजोबा आजींच्या काळात सुध्दा पावसाचे हे गाणे लहानग्यांना असेच शिकवले गेले असेल.
या गाण्याच्या पहिल्या दोन ओळींचा सुसंगत अर्थ लावणे कठीण आहे. "पावसाला पैसा कसा देणार?", "खोट्या पैशाला दुकानदार सुध्दा काही सामान देत नाही, मग तो घेऊन मोठ्ठा पाऊस कसा येईल?" असले प्रश्न बालगीतांबद्दल विचारायचे नसतात. तरीही असले निरर्थक वाटणारे गाणे अजरामर कसे काय झाले असेल? काव्य, संगीत वगैरेंचा विचार केला तर काही क्ल्यू सापडतील. या गाण्यात एकसुध्दा जोडाक्षर नाही किंवा बोजड शब्द नाही. लहान मुलांना ऐकून लगेच उच्चारता येतील असे मुख्यतः दोन तीन अक्षरांचे आणि सोपे असे शब्द आणि प्रत्येकी फक्त तीनच शब्द असलेली सोपी वाक्ये त्यात आहेत. हे गाणे 'एक दोन तीन चार' अशा चार चार मात्रांच्या ठेक्याच्या चार चार ओळींच्या कडव्यांमध्ये असल्यामुळे त्याला एक सिमेट्री आहे आणि कोणालाही ते ठेक्यावर म्हणतांना मजा येते. गाण्याच्या प्रत्येक दोन ओळींमध्ये यमक साधले आहे. किंबहुना या शब्दांची निवड बहुधा यमक साधण्यासाठीच केली आहे. कडव्यांच्या शेवटच्या ओळीत अनपेक्षित कलाटणी देणारे असे काही सांगून धक्का दिला जातो, त्यामुळे ते मनोरंजक वाटते.

लहानपणी अनेक वेळा ऐकून तोंडपाठ झालेले आणखी एक गाणे आहे,
नाच रे मोरा, अंब्याच्या बनात,
नाच रे मोरा नाच ।।

ढगांशि वारा झुंजला रे,
काळा काळा कापूस पिंजला रे,
आता तुझी पाळी, वीज देते टाळी,
फुलव पिसारा नाच ।।

झरझर धार झरली रे,
झाडांचि भिजली इरली रे,
पावसात न्हाऊ, काहितरि गाऊ,
करुन पुकारा नाच ।।

थेंबथेंब तळ्यात नाचती रे,
टपटप पानांत वाजती रे.
पावसाच्या रेघांत, खेळ खेळु दोघांत,
निळ्या सौंगड्या नाच ।।
पावसाचि रिमझिम थांबली रे,
तुझि माझि जोडी जमली रे,
आभाळात छान छान, सात रंगी कमान,
कमानीखाली त्या नाच ।।

या गाण्यातला मुखडा सोडला तर संपूर्ण गाणे पावसावरच आहे. आमच्या गावाला लागूनच आंबराई होती आणि त्यातल्या 'आम्रतरूंवर वसंतवैभवाचे कूजन' करणारे कोकीळ पक्षी आपले मधुर संगीत ऐकवायचे, पण मोर हा पक्षी मात्र त्या काळात फक्त चित्रातच पाहिला होता आणि आभाळात ढग आले की खूष होऊन तो आपला पिसारा फुलवून नाचतो असे ऐकले होते. त्याचे प्रत्यक्ष दर्शन मोठेपणीच झाले. ढग, वारा, पाऊस, तळे, झाडे वगैरे ओळखीचे असल्यामुळे त्यांचे संदर्भ समजत आणि आवडत होते. त्यामुळे मला तरी हे गाणे मोराबद्दल वाटायच्या ऐवजी पावसाचेच वाटायचे. अत्यंत लोकप्रिय गायिका आशा भोसले यांनी गायिलेले हे मजेदार गाणे महाकवी स्व.ग.दि.माडगूळकर यांनी देवबाप्पा या चित्रपटासाठी लिहिले आणि चतुरस्र प्रतिभेचे धनी असलेले स्व.पु. ल. देशपांडे यांनी याला चाल लावली वगैरे तपशील नंतर समजत गेले. माझ्या लहानपणीचे हे गाणे रेडिओ, टेलिव्हिजन, मुलांचे कार्यक्रम वगैरेंवर आजतागायत अधूनमधून ऐकायला येत राहिले आहे.
संथ लयीवर बराच काळ पडत राहणा-या पावसाला 'रिमझिम' असे विशेषण बहुधा 'येरे येरे पावसा' या गाण्यामधून पहिल्यांदा मिळाले असावे. कदाचित 'चिंब' या शब्दाशी यमक जुळवण्याच्या दृष्टीने 'रिमझिम' हा शब्द आणला गेला आणि तो कायमचा त्याला चिकटून राहिला. त्यावरूनच लिहिलेले माझ्या लहानपणच्या काळात गाजलेले एक गाणे खाली दिले आहे.

रिमझिम पाऊस पडे सारखा,
यमुनेलाही पूर चढे,
पाणीच पाणी चहूकडे, ग बाई,
गेला मोहन कुणीकडे ।।

तरुवर भिजले भिजल्या वेली,
ओली चिंब राधा झाली,
चमकुन लवता वरती बिजली,
दचकुन माझा ऊर उडे ग बाई,
गेला मोहन कुणीकडे ।।


हाक धावली कृष्णा म्हणुनी,
रोखुनी धरली दाही दिशानी,
खुणाविता तुज कर उंचावुनी,
गुंजत मंजुळ मुग्ध चुडे ग बाई,
गेला मोहन कुणीकडे ।।

जलाशयाच्या लक्ष दर्पणी,
तुझेच हसरे बिंब बघुनी,
हसता राधा हिरव्या रानी,
पावसातही ऊन पडे, ग बाई,
गेला मोहन कुणीकडे ।।


पहिल्या कडव्यात दिल्याप्रमाणे यमुनेला पूर येऊन सगळीकडे पाणीच पाणी झाले असतांना कृष्ण कुठेच दिसत नाही म्हणून यशोदेलाच त्याची काळजी वाटत असेल, कारण वेळी अवेळी यमुनेच्या काठी जायची खोड त्याला होती. यामुळे 'गेला मोहन कुणीकडे?' हा प्रश्न नक्की यशोदामैयालाच पडला असणार अशी माझी लहानपणी खात्री झाली होती. पुढल्या कडव्यांचा अर्थ समजायला मध्यंतरी बरीच वर्षे जावी लागली. गीतकार स्व.पी. सावळाराम, संगीतकार स्व.वसंत प्रभू आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या त्रयींनी मराठी रसिकांना दिलेली अनेक अप्रतिम गाणी अजरामर झाली आहेत. पी.सावळाराम यांनी वसंत प्रभू यांच्याच या गाण्यासाठी मात्र आशा भोसले यांची निवड केली होती हे विशेष.


. . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

पुढील भाग
पावसाची गाणी - भाग २

Friday, June 22, 2012

बँकेतले पैसे

माझ्या लहानपणची परिस्थिती खूपच वेगळी होती. वर्षभरासाठी लागणारे धान्य सुगीच्या दिवसात शेतामधून येत असे किंवा घाऊक प्रमाणात घरी आणून भरून ठेवले जात असे. दळणवळणाची फारशी साधने उपलब्ध नसल्यामुळे भाजीपाला, फळफळावळ वगैरे नाशवंत पदार्थ बाहेरून येण्याची शक्यताच नव्हती. त्यांचे ऋतूकालोद्भव उत्पादन मुबलक प्रमाणात निघत असे आणि "पिकते तिथे विकत नाही" ही म्हण या बाबतीत तंतोतंत लागू पडत असल्यामुळे ते लगेच उदार हाताने परिचितांमध्ये वाटून टाकले जाई. सर्दी, खोकला, अपचन यासारखे किरकोळ विकार तुळशी, ओवा, सुंठ, लवंग, दालचिनी वगैरे घरगुती उपायांनीच बरे होत असत. काडेपेटीसारखा एकादा अपवाद वगळता कोठलाही पॅकेज्ड माल घरी येत नसे. एकंदरीतच पहाता दैनंदिन आर्थिक व्यवहार अगदी कमी असायचे. पै न पैचा जमाखर्च घरोघरी लिहिला जात असे, पण वहीमधले एक महिनाभरासाठी पान पुरत असे.

गावात एकुलती एक (सहकारी) बँक होती. माझ्या वडिलांचे त्यात खाते असले तरी त्यातले व्यवहार इतके कमी असायचे की माझ्या आठवणीत तरी वर्षानुवर्षे घरात फक्त एकच पासबुक होते, त्या खात्याचे चेकबुक नव्हतेच. त्या काळात उत्पन्न सुध्दा कमीच असायचे आणि घरखर्च करून क्वचित कधी घसघशीत शिल्लक उरली तर ते पैसे भविष्यकाळातील अडीअडचणीच्या वेळी उपयोगासाठी बँकेत टाकले जात. अगदीच महत्वाची व अत्यावश्यक अशी नड कधी पडली तर निरुपाय म्हणून त्यातले थोडे पैसे काढून आणले जात असत. बँकेच्या खात्यात पैसे भरणे आणि काढणे रोखीमध्येच होत असे. मोठेपणी मला अडचण येऊ नये म्हणून शाळेतील वरच्या वर्गात असतांनाच बँक, पोस्ट ऑफीस वगैरे मधली बाहेरची कामे करायला सांगितले जाऊ लागले. हा सुध्दा माझ्या सर्वांगीण शिक्षणाचाच भाग होता. मलाही थोडा जास्तच उत्साह असल्यामुळे मी ती कामे आनंदाने करू लागलो. माझ्या नावावर बँकेत खाते नसले तरी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अकौंटसंबंधीची क्वचितच येणारी फुटकर कामे मी सांभाळू लागलो होतो. आपले पैसे बँकवाले सुरक्षित ठेवतात आणि ते सांभाळण्यासाठी आपल्याकडून काही न घेता उलट आपल्यालाच व्याज देतात याचे तेंव्हा आश्चर्य वाटत असे.

कॉलेज शिक्षणासाठी शहरात आल्यानंतर मात्र माझ्या नावावर बँकेत खाते उघडले. मी रोख पैसे आपल्याजवळ बाळगले तर ते वेंधळेपणाने हरवून टाकीन या कुशंकेने आणि हॉस्टेलमधील खोल्यांमध्ये ते कदाचित सुरक्षित राहणार नाहीत या भीतीमुळे घरातून डिमांड ड्राफ्टने पैसे येत. माझ्या खात्यावर ते जमा करणे आणि गरजेनुसार थोडे थोडे काढत राहणे यासाठी बँकेमध्ये वरचेवर जाऊ लागलो. नोकरीला लागल्यावर सुरुवातीला रोख पगार मिळत असे, काही काळानंतर तो परस्पर बँकेमधील खात्यात जमा होऊ लागला. त्यातले खर्च होऊन उरलेले जास्तीचे पैसे बँकेत साठायला लागले. त्यातूनच आवर्ती जमा योजना (रिकरिंग डिपॉझिट). मुदत ठेव (फिक्स्ड डिपॉझिट) वगैरेंची ओळख होत गेली. या वेळी खाते खोलतांनाच माझ्या नावाचे चेकबुक मिळाले. आयुष्यातला पहिला चेक मी कोणाच्या नावे लिहिला ते आता आठवत नाही, पण बहुधा माझ्या खात्यामधले पैसे काढण्यासाठी तो स्वतःच्या नावे लिहिला असण्याचीच शक्यता सर्वात जास्त आहे. हळूहळू घरभाडे, विम्याचे हप्ते, विजेचे बिल वगैरे खर्चांसाठी चेकचा वापर वाढत गेला.

चाळीस पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या काळात संगणक (काँप्यूटर) हा प्रकार फक्त प्रयोगशाळांमध्ये असायचा. बँकेच्या शाखांमध्ये लेजर नावाच्या अगडबंब आकाराच्या वह्या ठेवलेल्या असायच्या. प्रत्येक ठेवीदारासाठी त्यात एकेक स्वतंत्र पान असायचे. पैसे भरायचे असल्यास फॉर्म भरून ते कॅशरकडे द्यायचे, पैसे मोजून घेऊन झाल्यावर त्या फॉर्मवर शिक्का मारून कॅशर तो फॉर्म संबंधित कारकुनाकडे पाठवे आणि कारकून आधी लेजरमधील पानावर ते लिहून त्याची नोंद पासबुकावर करून देत असे. बँकेमधून पैसे काढायचे झाल्यास याच्या उलट क्रमानुसार हे काम होत असे. खातेदारांची संख्या वाढत गेली आणि त्यांची गर्दी होऊ लागली. लेजरबुकांची संख्याही वाढली आणि अनेक कारकुनांमध्ये ती वाटली गेली. खात्यांच्या क्रमांकानुसार आपले खाते पाहणा-या क्लार्ककडे चेक किंवा विथड्रॉवल स्लिप द्यायची, त्याच्याकडून टोकन घेऊन वाट पहात बसायचे आणि रोखपालाने (कॅशियरने) बोलावल्यानंतर त्याच्याकडून पैसे घ्यायचे अशी पध्दत रूढ झाली. आजसुध्दा अनेक बहुतेक सर्व लहान बँकांमधले काम याच पध्दतीने चालते.

प्रत्येक देवाणघेवाण करायच्यावेळी विशिष्ट लेजरबुक उघडून त्यातले ग्राहकाचे विशिष्ट पान शोधून ते उघडण्याची आवश्यकता संगणकीकरण झाल्यानंतर उरली नाही. कोणताही क्लार्क कोणाचेही खाते क्षणार्धात उघडून पाहू शकला आणि त्यात नवीन नोंद करू शकला. ग्राहकाचा वेळ आणि श्रम वाचवून शाखेमधील त्यांची गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने पैसे देणे किंवा घेणे हे कामसुध्दा कारकुनांनाच देण्यात आले आणि त्यांचे 'टेलर' असे नामकरण करण्यात आले. या नावामागचे गूढ काही मला कळले नाही. 'काही सांगणारा' किंवा 'शिंपी' असे या शब्दाचे दोन अर्थ निघतात, त्यातला कोणताच अर्थ सयुक्तिक वाटत नाही. बँकेच्या खात्यांमधील अनेक टेलर्सकडे भरपूर रोकड देऊन ठेवणे कठीण असल्यामुळे त्यावर एक मर्यादा घातलेली असते. विवक्षित मर्यादेपेक्षा जास्त रोकड जमा करायची किंवा काढायची असल्यास त्यासाठी वेगळे कॅशर असतात. चेक किंवा ड्राफ्टने पैशाची देवाणघेवाण होऊ लागल्यानंतर रोख पैशांचा वापर कमी होत गेला. बाजारात खरेदी केलेल्या वस्तूंची किंमत क्रेडिट कार्डाने देणे सुरू झाल्यानंतर रोख पैशाची गरज आणखी कमी झाली. त्यामुळे बँकांमधील रोखपालांचे काम कमी झाले, पण हे व्यवहार बँकांमार्फत होत असल्यामुळे इतर कर्मचा-यांचे काम वाढले.
आंतर्जालाने (इंटरनेट) इतर उद्योगांप्रमाणेच बँकांच्या व्यवहारात क्रांतीकारक बदल घडवून आणले. काँप्यूटरायझेशनानंतर बँकेच्या एका शाखेमधील कोणतेही खाते तिथला कोणीही अधिकारी पाहू शकत होता, इंटरनेटमुळे आता एका बँकेच्या जगभरातील कोणत्याही शाखेमधील कोणीही त्या बँकेच्या दुस-या कोणत्याही शाखेमधले खाते पाहू लागला. त्यामुळे बँकेतले पैसे काढण्यासाठी आपल्याच ब्रँचमध्ये जाण्याची गरज उरली नाही, आपल्या सोयीनुसार जवळच्या कुठल्याही शाखेत जाऊन आपल्या खात्यात पैसे भरता किंवा काढता येऊ लागले. इतकेच नव्हे तर नेटबँकिंगमुळे घरबसल्या आपल्या खात्यातले पैसे दुस-याच्या खात्यात जमा करणे शक्य झाल्यामुळे एकाने चेक लिहून देणे, दुस-याने तो वटवणे वगैरेची गरज राहिली नाही. विशेषतः निरनिराळी बिले भरण्याचे काम खूपच सोपे होऊन गेले. ज्या कामासाठी ऑफीसच्या वेळात दुस-या एकाद्या ऑफीसमध्ये जाणे आवश्यक असायचे ते काम घरबसल्या आपल्या सवडीनुसार केंव्हाही करता येऊ लागले.

जगभरात सर्व क्षेत्रांमधील यांत्रिकीकरण वाढतच गेले आणि जी कामे माणसे करत आली होती त्यातली अधिकाधिक कामे यंत्रांद्वारा होऊ लागली. नोटा मोजून देण्याचे काम करणारे यंत्र ज्याने निर्माण केले त्याच्या कल्पकतेला दाद दिली पाहिजे. त्यानंतर पैसे वाटप करण्याचे कामसुध्दा बँकांमधील कॅशियरच्या मदतीशिवाय यंत्रांद्वारे करता येऊ लागले. ही यंत्रे इंटरनेटने सर्व बँकांशी जोडलेली असल्यामुळे पैसे काढण्यासाठी आता आपल्या बँकेच्याच शाखेमध्ये जाण्याची गरजसुध्दा नाहीशी झाली. ज्या जागी कोणत्याही बँकेची शाखा नाही अशा जागीसुध्दा ही यंत्रे बसवण्यात आली आणि त्यामधून पैसे काढणे शक्य झाले.
बँकांमधील टेलरचे काम करणा-या या यंत्रांना 'ऑटोमेटेड टेलर मशीन' (एटीएम) असे नाव पडले ते कायमचेच. बहुतेक जागी ठेवलेली मशीने चोवीस तास उपलब्ध असतात. त्यामुळे त्यांच्या नावाचा 'एनी टाइम मनी' असाही अर्थ काढण्यात येऊ लागला. एका मराठमोळ्या माणसाने सांगितले की एटीएम चा अर्थ आहे 'असतील तर मिळतील'.

पन्नास वर्षांपूर्वी आमचे व्यक्तीगत आर्थिक व्यवहार अगदी कमी असायचे आणि मला बँकेत जाण्याची गरज क्वचितच पडायची. आज आर्थिक व्यवहारांचे प्रकार आणि संख्या अमाप वाढली आहे, जवळ जवळ पावलोपावली पैसे मोजावे लागत आहेत, आणि निरनिराळ्या प्रकारे ते बँकेमध्येच ठेवलेले असतात, तरीही आतासुध्दा बँकेत प्रत्यक्ष जायची गरज कमीच पडते. काय गंमत आहे?



Friday, June 08, 2012

वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिवस (भाग ५, अंतिम)

"हरित अर्थकारण, तुम्ही त्त्यात आहात का ?" (Green Economy: Does it include you?) हा यंदाच्या जागतिक पर्यावरण दिवसाचा मुख्य विषय आहे. 'हरित आर्थिक व्यवस्था' म्हणजे काय आणि तुम्ही त्यासाठी काय करायचे आहे याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (यूनोच्या) कार्यक्रमानुसार पर्यावरणाला कमीत कमी हानी व धोका पोचवत समस्त मानवजातीचा उध्दार करणे आणि त्यांच्यामधील सामाजिक सामंजस्य वाढवणे असा काहीसा त्याचा अर्थ होतो. थोडक्यात सांगायचे झाल्यास पर्यावरणाच्या प्रदूषणाला आळा घालायचा, निसर्गातली जैवविविधता राखायची, ऊर्जेची बचत करायची आणि हे सांभाळून अधिकाधिक जनतेसाठी उत्पन्नाची साधने निर्माण करायची. यासाठी अनुकूल अशी सरकारी धोरणे असायला हवीत आणि त्यासाठी सरकारच्या खजिन्यामधून निधी उपलब्ध करायचा हे आहेच, पण पुरेसे नाही. तुम्ही आम्ही सर्वांनी या कार्याला सक्रिय पाठिंबा द्यायला हवा. हे काम निरनिराळ्या आघाड्यांवर करू शकतो आणि करायला पाहिजे. त्यांची वर्गवारी खाली दिल्याप्रमाणे केली आहे.


१. इमारतींचे बांधकाम -

२. मासेमारी

३. वनसंरक्षण

४. वाहतूक

५. जलव्यवस्थापन

६. कृषि

७. ऊर्जा

८. पर्यटन

९. कच-याची विल्हेवाट

१०. कारखानदारी



प्रत्येक आघाडीवर काय काय करावे याबद्दल मार्गदर्शन केलेले असले तरी त्यात काही समान सूत्रे आहेत. कोठलेही काम करण्यासाठी संसाधनांची तसेच ऊर्जेची आवश्यकता असते. तसेच ती ऊर्जा मिळवण्यासाठी संसाधनांची गरज असते. कमीत कमी संसाधनांमधून जास्तीत जास्त लाभ मिळवावा ( कार्यक्षमता वाढवावी), संसाधने आणि ऊर्जा यांच्या वापरात बचत करावी, काहीही वाया जाऊ देऊ नये, कच-याचा शक्यतोवर पुनर्वापर (रिसायकलिंग) करावा. वगैरे वगैरे गोष्टी वरील प्रत्येक क्षेत्रात निरनिराळ्या उदाहरणाने दिल्या आहेत. मी लहान असतांना माझी आई नेमक्या याच गोष्टी आमच्या कानीकपाळी ओरडून सांगत होती. याशिवाय ऊन, पाऊस, वारा वगैरे जी नैसर्गिक संसाधने आपल्याला मिळत राहतात, त्यांच्या उपयोगावर भर द्यावा. भूमीगत खनिज पदार्थांचा साठा संपून जाऊ नये, तसेच आज पृथ्वीवर वावरणारे पशुपक्षी व वनस्पती नामशेष होऊ नयेत यासाठी त्यांच्याकडे मुद्दाम लक्ष पुरवायला हवे.
थोडक्यात सांगायचे झाल्यास काटकसर करा आणि निसर्गाकडे वळा.



. . . . . . . . . . . . (समाप्त)

Thursday, June 07, 2012

वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिवस (भाग ४)

जमीन, पाणी आणि हवा या तीन्हींचा समावेश पर्यावरणात होतो आणि माणसाच्या कृतींचा प्रभाव या तीन्हींवर पडतो. जमीनीवर पडणारा प्रभाव फक्त स्थानिक असतो, वाहत्या पाण्याबरोबर त्यावर पडलेला प्रभावसुध्दा पसरत जातो, वातावरणातील बदल क्षीण होत होत जगभर पसरतात. यामुळे वायुप्रदूषणाचा मुद्दा जागतिक झाला आहे आणि त्यामुळे त्यावरील उपाययोजना आंतरराष्ट्रीय पातळीवर ठरवल्या जात आहेत. हवेचे पृथक्करण केल्यास नत्रवायू (नायट्रोजन) आणि प्राणवायू (ऑक्सीजन) हे त्याचे मुख्य घटक असतात, त्याशिवाय अल्प प्रमाणात कर्बद्विप्राणील वायू (कार्बन डायॉक्साईड) सुध्दा असतो. सर्व वनस्पती दिवसा यातला थोडा थोडा कर्बद्विप्राणील वायू शोषून घेऊन प्राणवायू हवेत सोडतात, सर्वच प्राणी आणि वनस्पतीसुध्दा दिवसाचे चोवीस तास श्वसन करत असतात आणि या क्रियेत प्राणवायू शोषून घेऊन कर्बद्विप्राणील वायू हवेत सोडतात. लक्षावधी वर्षांच्या काळात या दोन्ही क्रियांमध्ये एक समतोल साधला गेला होता आणि त्यामुळे हवेमधील प्राणवायू व कर्बद्विप्राणील वायू यांचे प्रमाण स्थिर राहिले होते. पण गेल्या काही दशकांमध्ये कारखाने आणि स्वयंचलित वाहने यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्यामुळे कर्बद्विप्राणील वायूची निर्मिती खूप वाढली आहे आणि ती वाढतच आहे. उलट माणसाच्या हावेपोटी जंगलांची मोठ्या प्रमाणावर तोड होत असल्यामुळे वनस्पतींचे प्रमाण कमी होत आहे आणि त्यांची कर्बद्विप्राणील वायूपासून प्राणवायू तयार करण्याची क्षमता कमी होत चालली आहे. अशा प्रकारे वातावरणामधील संतुलन बिघडत आहे. शिवाय कारखान्यांमधून इतर काही प्रकारचे विषारी वायू बाहेर पडत असल्यामुळे त्यांचाही परिणाम वातावरणावर पडत आहे. ग्लोबल वॉर्मिंग या बिघाडात भूपृष्ठाचे सरासरी तपमान वाढल्यामुळे बर्फांच्या राशी वितळतील, त्यामुळे नद्यांना महापूर येतील, समुद्राची पातळी वाढल्यामुळे तो किना-यावरील जागा व्यापेल आणि मुंबई, न्यूयॉर्कसारखी महानगरे पाण्याखाली बुडून जातील वगैरे भीतीदायक चित्र उभे केले जात आहे आणि हे होऊ नये यासाठी कडक उपाययोजना सुचवल्या जात आहेत. शक्य तेवढी झाडे लावा, झाडे जगवा ही मोहीम सुरू झालेली आहेच.

या योजना चांगल्या आणि आवश्यक आहेत यात शंका नाही, पण त्यांच्या बाबत काही गैरसमजुती पसरवल्या जात आहेत, त्यांची माहिती असणे आवश्यक आहे. सगळ्या झाडांची सगळी पाने दिवसभर प्राणवायू तयार करत असतात आणि त्यामुळे घनदाट जंगले हे प्राणवायूचे मोठे कारखाने आहेत असे अनेक लोकांना वाटते, पण ते पूर्ण सत्य नाही. कर्बद्विप्राणील वायू शोषून घेऊन त्यापासून अन्न तयार करण्याचे काम करण्यासाठी झाडांना इतर काही गोष्टींची आवश्यकता असते. पाणी आणि सूर्यकिरणे हवीतच, शिवाय जमीनीतून काही क्षार मिळावे लागतात. हे नसले तर ते झाड उपाशी राहते आणि सुकून जाते. हे सगळे प्राप्त होत असले तरीही त्या झाडाला अन्नाची आवश्यकता असावी लागते. त्याची वाढ होत असतांना हे अन्न मोठ्या प्रमाणावर तयार होते, पण झाड पूर्ण वाढल्यानंतर त्याला अन्न निर्माण करण्याची तितकीशी आवश्यकता वाटत नाही. झाडांच्या सर्व भागांचे आयुष्य समान नसते. त्याचे खोड आयुष्यभर त्याच्यासोबत असते तर फुले एक दोन दिवसांपुरतीच असतात. बहुतेक झाडांची पाने पिकून झडून जात असतात आणि त्यांच्यी जागी नवी पाने येत असतात. त्यातही काही झाडे हिवाळ्यात पूर्णपणे निष्पर्ण होतात काही झाडांची पाने अंशतः गळतात. जंगलामध्ये हा झाडांच्या खाली पडलेला पालपाचोळा कुजून जमीनीत मिसळतो किंवा वणव्यात भस्म होऊन जातो. या दोन्ही क्रियांमध्ये त्यातून कर्बद्विप्राणील वायू बाहेर पडतो आणि हवेत मिसळतो. अशा प्रकारे वर्षभराच्या अवधीत जेवढा कर्बद्विप्राणील वायू ही झाडे हवेमधून शोषून घेतात तेवढाच तो परत करतात. त्यामुळे जंगलतोड करणे वाईट आहे आणि नवी राने वाढवणे चांगले आहे असे असले तरी हवेमधील कर्बद्विप्राणील वायूचे प्रमाण कमी करण्यासाठी ती काही काळापर्यंतच उपयुक्त असतात. एक कारखाना सुरू केला आणि त्याचा चहू बाजूला झाडे लावली की कर्बद्विप्राणील वायूची काळजी मिटली असे होत नाही. कुठल्याही झाडाची पाने तोडली किंवा फांद्या छाटल्या की लगेच पर्यावरणाचा नाश झाला असेही होत नाही. झाडाना नवे कोंब फुटतात, नवी पल्लवी येते, त्याची वाढ सुरू होते आणि त्याचा पर्यावरणाला लाभ सुध्दा होऊ शकतो.

गेल्या काही हजारो किंवा लक्षावधी वर्षांमध्ये पृथ्वीच्या पाठीवरील पशुपक्षी आणि वनस्पती यांचा एक समतोल साधला गेला होता. वनस्पतींच्या तुलनेत प्राणीमात्रांचे आकार आणि संख्या फारच लहान असल्यामुळे पृथ्वीच्या पाठीवरील कर्ब (कार्बन) हे मुख्यतः वनस्पतींमध्येच असते. भूपृष्ठावर उगवणा-या आणि नष्ट होणा-या वनस्पतींमध्ये साठलेले कर्बाचे प्रमाण हजारो वर्षांपासून स्थिर राहिले होते. पण लक्षावधी वर्षांपूर्वी जमीनीत गाडल्या गेलेल्या वनस्पतींचे रूपांतर दगडी कोळसा किंवा खनिज तेल, नैसर्गिक वायू (पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस) वगैरेंमध्ये होऊन गेलेले आहे. यंत्रयुगात ते जमीनीखालून बाहेर काढले जाऊ लागले आणि त्यांच्या ज्वलनातून निर्माण झालेला कर्बद्विप्राणील वायू हवेत मिसळत असल्यामुळे भूपृष्ठावरील कर्बाचे प्रमाण वाढत चालले आहे. ते शोषून घेऊन नव्या वनस्पतींमध्ये स्थिर करण्यासाठी प्रदीर्घ काळाचा अवधी लागेल. याचा विचार करून जे कारखाने अशा प्रकारे जगावर अधिक कर्बाचा बोजा टाकत आहेत त्यांनी कार्बन टॅक्स भरावा अशा प्रकारचे नियम पाश्चात्य देशात केले जात आहेत आणि इतर देशांनीसुध्दा ते करावे असा आग्रह धरत आहेत. उलट भारत आणि चीन यासारख्या देशांचे असे म्हणणे आहे की दर डोई उत्पादन किंवा विजेचा वापर यात ते पाश्चात्य देशांच्या तुलनेत खूप मागे आहेत, त्यामुळे त्यांनी असे कर लावले तर ते विकासाला बाधा आणतील यामुळे ते मागेच पडत जातील. यामुळे ते असल्या तरतुदी मान्य करणार नाहीत. अशा प्रकारे यात राजकारण आले आहे आणि सर्वमान्य धोरणे निश्चित होऊन त्यांची अंमलबजावणी होऊ लागेपर्यंत पर्यावरणावर होत असलेले दुष्परिणाम होत राहतील.

जमीनीवर होणारे परिणाम स्थानिक असल्यामुळे काही प्रमाणात त्या जमीनीच्या मालकालाच ते भोगावे लागतात. रासायनिक कीटकनाशके किंवा खतांमुळे जमीनीचा कस कमी झाला तर मालकाचे नुकसान होते, पण ती रसायने कृषीउत्पादनांमध्ये मिसळून ग्राहकांच्या पोटात जातात आणि त्यांच्या आरोग्याला अपाय करतात. शिवाय ही रासायनिक द्रव्ये तयार करणा-या मोठ्या कारखान्यांमुळे प्रदूषण होते, ऊर्जा खर्च होते वगैरे दोष त्यात आहेत. पण या द्रव्यांमुळे शेतक-याला थेट होणारा तात्कालिक लाभ अधिक आकर्षक असल्यामुळे त्यांच्याविरुध्द केलेली प्रचारमोहीम परिणामकारक ठरत नाही. रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खते वापरावी यावर पर्यावरणवाद्यांचा भर आहे. याबाबतीत अधिक मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे.

पाण्याचे प्रदूषण ही भारतात अत्यंत गंभीर समस्या बनली आहे. गंगेसारख्या एके काळी स्वच्छ निर्मळ पाण्यासाठी प्रसिध्द असलेल्या नदीला आता गटाराचे रूप आले आहे. ज्या काळात लोकवस्ती कमी होती आणि नदीत भरपूर पाणी असायचे त्या काळात गावोगावच्या ओढ्यानाल्यामधून नदीत येऊन पडणारा सेंद्रीय कचरा जलचरांकडूनच नैसर्गिक मार्गाने नष्ट केला जात असे. आता कचरा अपरंपार वाढत आहे, त्यात विषारी रसायने टाकली जात आहेत आणि जलचर जीवच नष्ट होत चालले आहेत. जनजागृती तसेच तंत्रज्ञान या दोन्ही आघाड्यांवर नेटाने प्रयत्न केल्यानेच हा प्रश्न आटोक्यात आणणे शक्य आहे. तसे नाही झाले तर त्यापासून होत असलेले दुष्परिणाम वाढतच जातील.

. . . . . . . . .. . . . . . . (क्रमशः)

Wednesday, June 06, 2012

वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिवस (भाग ३)

माझे शालेय शिक्षण संपेपर्यंत म्हणजे ज्या कालावधीत मी मराठी भाषा शिकून आत्मसात केली त्या काळात 'पर्यावरण' हा शब्द अजून प्रचलित झाला नव्हता. त्याचा उद्भव किंवा उद्गम नक्की कधी झाला हे मला माहीत नाही, पण त्याचा प्रसार मात्र नक्कीच अलीकडच्या काळात झाला आहे. मला कळायला लागल्यापासून निसर्ग, सृष्टी वगैरे शब्द ओळखीचे झाले होते. ग्रामीण भागात रहात असल्यामुळे घराबाहेर पडून कोणत्याही दिशेने दहा पंधरा मिनिटे चालत गेल्यावर पुढे नजर पोचेपर्यंत निसर्गाचेच साम्राज्य असे. किंबहुना चहूकडे वाढलेल्या वनस्पतींनी झाकलेल्या नैसर्गिक भूमीवर अधूनमधून तुरळक अशी मानवनिर्मित वस्ती दिसत असे. निसर्गाकडून मिळत असलेल्या ऊन, पाऊस, थंडी, वारा वगैरे गोष्टी जशा प्रकारे मिळतील त्यांच्याशी सलोखा करून त्यानुसार आपली राहणी ठेवली जात असे. अचानक उद्बवणा-या नैसर्गिक आपत्तींपासून आपला बचाव करणे हे सर्वात मोठे दिव्य असायचे. आपल्यासारख्या यःकश्चित प्राण्याकडून एवढ्या भव्य आणि बलवान निसर्गाला कसलाही धोका पोचू शकतो असे तिथे कोणी सुचवले असते तर इतरांनी त्याला नक्कीच वेड्यात काढले असते. त्या काळात परदेशातलीच काय पण भारतातील शहरांमधील परिस्थिती कशी आहे याची मला सुतराम कल्पना नव्हती. मानव प्राणी हा 'अनंत हस्ते' आपल्याला जीवनावश्यक गोष्टी पुरवणा-या 'विपुला च पृथ्वी' वर सर्वस्वी अवलंबून असलेला एक क्षुद्र जीव आहे अशी माझी पक्की धारणा झाली होती.

इंग्रजी भाषेतला 'एन्व्हायरनमेंट' हा शब्द त्या काळात निराळ्या अर्थाने ओळखीचा झाला होता. 'घर, शाळा वगैरे ज्या ठिकाणी आपण काही वेळ घालवत असू त्याच्या सभोवतालचे वातावरण' हा त्याचा अर्थ आजसुध्दा प्रचलित आहे. आजूबाजूची माणसे, त्यांचे आचार, विचार वगैरेंचा देखील यात समावेश होतो. 'एन्व्हायरनमेंट' या शब्दाचा 'आसपासची जमीन, हवा, पाणी' असा दुसरा संकुचित अर्थ आणि या अर्थाने 'पर्यावरण' हा या शब्दाचा नवा प्रतिशब्द आजकाल रूढ झाला आहे. निदान एकदा तरी हा शब्द वाचनात आला नाही किंवा कानावर पडला नाही असा एकही दिवस जात नाही इतका तो वापरून गुळगुळीत झाला आहे. पण त्या बरोबरच काही विपर्यस्त कल्पना किंवा माहिती पसरवली जात आहे.

'मानवाने निसर्गावर विजय मिळवला आहे' अशा प्रकारच्या वल्गना जितक्या पोकळ आहेत तितकीच माणसाने केलेली 'पर्यावरणाची चिंता' निरर्थक आहे. आजच्या जगामधील सात अब्ज माणसे आणि दोन तीनशे देश या सर्वांनी त्यांची सारी ताकत एकवटली तरीही निसर्गाची रूपे असलेल्या पंचमहाभूतांच्या सामर्थ्याच्या पुढे ती नगण्य ठरेल. सागराच्या लाटा किंवा सूर्यप्रकाश यातून क्षणाक्षणाला प्रकट होत असलेली किंवा धरणीकंपामध्ये काही सेकंदात बाहेर टाकलेली प्रचंड ऊर्जा पाहता हे लक्षात येईल. तेंव्हा आपल्यापेक्षा अनंतपटीने सामर्थ्यवान असलेल्या निसर्गाची आपण काळजी करतो असे म्हणणे हास्यास्पद आहे. पर्यावरणप्रेमी खरे तर त्यांच्या स्वतःच्या किंवा फार तर त्यांच्या वंशजांच्या चिंतेने व्याकूळ झाले आहेत असे म्हणता येईल.
बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि त्यात सारखे बदल होत असतात. सकाळ, दुपार, संध्याळ, रात्र असे रोज होणारे बदल, उन्हाळा, पावसाळा, हिंवाळा असे ऋतूंमधले बदल आणि भूपृष्ठात हळू हळू होत असलेले दीर्घकालीन बदल हे सारे निसर्गच घडवून आणतो. एका काळी ज्या ठिकाणी समुद्र होता तिथे हिमालयाची शिखरे झाली आहेत आणि एका काळी गर्द वनराई असलेला भूभाग आज वाळवंट झालेला किंवा समुद्राच्या तळाशी गेला आहे. डायनोसॉरसासारखे महाकाय प्राणी निर्माण झाले तसेच नामशेष होऊन गेले. इतर किती प्रकारचे जीव पृथ्वीवर राहून नष्ट झाले याची गणतीच करता येणार नाही. या सगळ्यांच्या तुलनेत पाहता मानवाच्या मूर्खपणामुळे किंवा हावरटपणामुळे आज पर्यावरणात पडत असलेला बदल अगदी मामूली म्हणता येईल.

निसर्ग हा नेहमी रम्यच असतो असे नाही. तो विध्वंसक रूपसुध्दा धारण करतो. दुसरी गोष्ट म्हणजे तो न्याय अन्यायाचा विचार करत नाही. एकाने त्याच्यावर आक्रमण केले तर तो त्याची शिक्षा त्यालाच करेल असे नाही. अगदी साधी गोष्ट पहायची झाली तर एका ठिकाणी समुद्रात भर टाकली तर दुसरीकडे कोठे तरी त्याचा परिणाम दिसेल. नदीच्या वाहत्या पात्रात घाण मिसळणारा वेगळाच असतो पण त्याचे वाईट परिणाम खालच्या अंगाला राहणा-या लोकांना भोगावे लागतात. हवेचे प्रदूषण करणारे एक असतात आणि त्याचा त्रास इतरांनाही झाल्याशिवाय रहात नाही. 'कराल तसे भराल' हा न्याय निसर्गाच्या बाबतीत नीटसा लागू होत नाही. यामुळे पर्यावरणाची काळजी घेणे ही सर्वांची जबाबदारी ठरते.
यंत्रयुगाच्या आधी माणसाची विध्वंस करण्याची क्षमता अगदी कमी होती. त्याने दोन हाताने केलेल्या लहान सहान नुकसानाची भरपाई निसर्ग आपल्या अनंत हस्तांनी सहजपणे करत होता. त्यामुळे निसर्गात होणारे बदल हे त्याच्याच नियमानुसार घडत असत आणि त्यात एक नियमितता होती. मानवांची उत्पत्ती आणि विनाश यातसुध्दा नैसर्गिक समतोल पाळला जात असल्यामुळे जगाची लोकसंख्यासुध्दा जवळजवळ स्थिर होती. गेल्या शतकात यात मोठा फरक पडला. लोकसंख्या वाढतच गेली, तसेच प्रत्येक माणसाच्या गरजा वाढत गेल्या. यंत्रांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून त्या भागवल्या जाऊ लागल्या, तसेच निरनिराळ्या प्रकारच्या नवनव्या वस्तूंचे उत्पादन होऊ लागले आणि त्यांचा उपभोग घेण्याचा हव्यास वाढत गेला. यासाठी लागणारा कच्चा माल जमीन, पाणी आणि हवा यातून काढून घेतला जाऊ लागल्यामुळे त्यांचे साठे कमी होत चालले आणि यांत्रिक क्रियांमधून निर्माण होणारा कचरा निसर्गाच्या स्वाधीन केला जात असल्यामुळे त्यांचा उपसर्ग होणे सुरू झाले. यातून होणा-या समस्यांवर निसर्ग आपल्या परीने मार्ग काढत असतो, पण तो माणसांच्या फायद्याचा नसल्यामुळे किंवा आपल्याला त्रासदायक वा धोकादायक असल्यामुळे आपण हैराण होतो. उदाहरण घ्यायचे झाल्यास मिठी नदीच्या किनारी राहणा-या लोकांनी तिच्या पात्रात टाकलेल्या कच-यामुळे ते अरुंद झाले म्हणून पावसाचे पाणी मुंबईच्या अन्य भागात पसरले आणि यापूर्वी कधीही जिथे पाणी तुंबत नव्हते तेथील लोकांना जलप्रलयाचा अनुभव घ्यावा लागला.



. . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)



Tuesday, June 05, 2012

वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिवस (भाग २)

माझ्यासारखा वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारा माणूस पुराणातल्या भाकडकथांवर कसा काय विश्वास ठेऊ शकतो? असा प्रश्न काही लोकांच्या मनात येईल. त्यामुळे माझी याबाबतची भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. माणसाच्या आयुष्यात भविष्यकाळात घडणा-या घटना आधीपासून ठरलेल्या नसतात, त्यामुळे त्यांचे अचूक भाकित करता येणे अशक्य आहे. हातावरील रेषा किंवा आकाशातल्या ग्रहांच्या भ्रमणाशी त्याचा काडीमात्र संबंध नसतो असे माझे ठाम मत आहे. सावित्रीच्या कथेमधल्या सत्यवानाचे आयुष्य अल्प असते असे भाकित त्या काळातील निष्णात ज्योतिष्यांनी केलेले असले तरीही त्याला अखेर चारशे वर्षांचे दीर्घायुष्य लाभते हा विरोधाभास आहे आणि पुढे असे होणार हे जर आधीच ठरलेले असले तर मग सावित्रीच्या कथेतील हवाच निघून जाईल, तिच्या गुणांना किंवा प्रयत्नांना काही मोलच उरणार नाही.

रेड्यावर आरूढ होऊन साक्षात यमराज तिथे येतात, सत्यवानाच्या शरीरामधून अंगठ्याएवढ्या आकाराचा त्याचा प्राण काढून घेऊन ते परत जायला निघतात, हे सगळे सावित्रीच्या डोळ्यांना दिसते. त्यांच्या मागोमाग तीही तीन दिवस तीन रात्री चालत राहते, यमाशी वाद विवाद संवाद वगैरे करून त्याला शब्दात पकडते आणि सत्यवानाचे प्राण त्याच्या ताब्यातून मिळवून घेते वगैरे कथाभाग विज्ञानाच्या कसोटीवर सत्य घटना ठरू शकत नाही. लहान मुलांना गोष्टी सांगतांना काऊ, चिऊ, वाघोबा, ससुला वगैरे प्राणी माणसांसारखे वागतात आणि बोलतात असे आपण सांगतो तेंव्हा ते खरे नसते हे त्यांनाही माहीत असते, पण मनोरंजक असल्यामुळे मुले त्या गोष्टी आवडीने ऐकून घेतात. नाटक, सिनेमा पाहतांना, कादंब-या वाचतांना त्यातल्या गोष्टी काल्पनिक असतात हे आपल्याला ठाऊक असते तरीही आपण त्यात गुंगून जातो. पुराणातल्या कथासुध्दा अशाच प्रकारे लोकांना आवडाव्यात यासाठी रंजक केलेल्या असतात. ही गोष्ट सुध्दा बहुतेक लोक जाणतात. आजकाल तर यमराज आणि त्याचे वाहन असलेला रेडा हे दोघेही विनोदाचे विषय झाले आहेत आणि त्यांची यथेच्छ कुचेष्टा केली जात असते. कोणालाच त्यांचे भय वाटत नाही. तेंव्हा पुराणामधील कथांमधले अक्षर न् अक्षर सत्य आहे असा अट्टाहास न धरता त्यांचे तात्पर्य आणि त्यातून मिळणारा बोध घेणे महत्वाचे आहे. ज्या कथांमधून असा बोध व मार्गदर्शन मिळते अशाच निवडक कथा एका पिढीकडून पुढच्या पिढीला सांगितल्या जात आपल्यापर्यंत आल्या आहेत आणि त्यांमध्ये असलेल्या मौलिक तत्वांमुळे त्या चिरकाल टिकून राहणार आहेत.

सावित्रीच्या कथेमधला अवास्तव भाग काढून टाकला तरीसुध्दा बरेच काही अद्भूत असे शिल्लक उरते. लाडात वाढत असलेली एक बुध्दीमान राजकन्या ज्ञानप्राप्तीचा मार्ग धरते आणि शिक्षण घेऊन शास्त्रनिपुण बनते, त्या काळात उपलब्ध असलेल्या अनेक विद्या ती संपादन करते. तिचे आईवडील या बाबतीत आडकाठी न आणता तिला प्रोत्साहन देतात. शिक्षणाद्वारे ती इतके उच्च स्थान गाठते की तिला योग्य असा पती शोधणे तिच्या पालकांच्या आवाक्याबाहेर होऊन गेल्यामुळे तिने आपला वर स्वतः शोधावा असे सुचवले जाते. या उद्देशाने देशोदेश धुंडाळल्यानंतर आंधळ्या आईवडिलांसोबत एका पर्णकुटीत राहणा-या रूपगुणसंपन्न आणि सुशिक्षित, सुसंस्कृत अशा सत्यवानाची निवड ती करते. हे स्थळ आईवडिलांना पसंत नसते. इतर काही लोकांनासुध्दा हे आवडत नाही किंवा सत्यवानाचा हेवा वाटला असेल. तो अल्पायुषी असल्याचे भाकित पसरवले जाते, पण सावित्रीचा निर्णय बदलत नाही. राजवाड्यामधील ऐशोआरामाचे जीवन सोडून ती पतीगृही जाते. त्याच्या नित्याच्या कामात त्याला मदत करते. जळणासाठी लाकडे गोळा करायला त्याच्यासोबत अरण्यात जाते. अपघातामुळे तो उंचावरून खाली पडून निष्चेष्ट होतो. गोंधळून न जाता धैर्याने तीन दिवस सतत प्रयत्नांची पराकाष्ठा करून ती त्याचे प्राण वाचवते. घोर निराशेच्या अंधारात सापडलेल्या सासूसास-यांना नवी दृष्टी देऊन त्यांचे वैभव मिळवून देते. हे सगळे अलौकिक आणि दिव्य आहे. ते सगळे खरोखर असेच घडले होते की नव्हते याला माझ्या दृष्टीने फारसे महत्व नाही. सावित्रीच्या कथेमध्ये भेटणारी ही नायिका मला अद्वितीय भासते. वर्षातून एकदा तिची कहाणी ऐकूनसुध्दा अनेकांना त्यातून नवा प्रकाश मिळण्याची शक्यता आहे.

आता आपण वटसावित्रीव्रताकडे पाहू. पहिल्या भागात मी लिहिल्याप्रमाणे आपल्या पूर्वजांनी खुबीने या निमित्य सर्व महिलांना वटवृक्षाकडे आकृष्ट केले आहे. वटवृक्षाचे वेगळेपण मी मागील भागात दाखवले आहेच. माझ्या कल्पनेनुसार पूर्वीच्या काळात सहज उपलब्ध असणारा हा वृक्ष एकंदरीतच वनस्पतीविश्वाचे प्रतीक मानायला हरकत नाही. मध्ययुगामध्ये अशी सामाजिक परिस्थिती निर्माण झाली होती की स्त्रियांना घराबाहेर पडणेच कठीण झाले होते. मंगळागौर, हरतालिका, व़टसावित्री यासारख्या व्रतांच्या निमित्याने त्यांना आपापल्या घराबाहेत पडून एकत्र जमायची संधी दिली गेली. त्यावेळी इतर महिलांवर छाप पाडण्यासाठी आणि जास्तीत जास्त चांगले दिसण्यासाठी नटणे, उंची वस्त्रे आभूषणे धारण करणे ओघानेच आले. सौंदर्यप्रदर्शनाचा हा महिलांचा आवडता भाग आज सुध्दा सर्वत्र उत्साहाने पाळला जातो असे मी काल पाहिले. घराबाहेर पडण्यासाठी नवरोबाची संमती मिळावी म्हणून हे सगळे त्याच्याच भल्यासाठी करत असल्याचा आव आणला गेला. म्हणजे त्याचा विरोध राहणार नाही. पुढील सात जन्म दर वेळी हाच पती मिळावा असे सांगण्यामुळे त्याचा अहंभाव जास्तच सुखावला जाईल अशी अपेक्षा होती. (अलीकडे मात्र हा आपल्यावर अन्याय असल्याची ओरड विनोदी नाटकांमध्ये होऊ लागली आहे.) सावित्री आणि सत्यवान दोघेही इतके पुण्यवान होते की एक तर त्यांच्यासाठी स्वर्गात जागा राखून ठेवल्या असतील किंवा त्यांना मोक्षप्राप्ती झाली असेल. त्यांच्या बाबतीत पुढील सात जन्मांचा प्रश्नच नसणार. सगळ्या बाजूंनी मोर्चेबांधणी करून झाल्यावर स्त्रियांना कोंदट माजघरातून बाहेर काढून मोकळ्या जागेत वडाच्या विशालकाय झाडाखाली जमवण्याचे योजले गेले. ज्येष्ठ महिना तसा कडक उन्हाचाच असतो. त्यात डेरेदार वटवृक्षाची शीतल सावली जास्तच आनंददायी वाटते. या निमित्याने त्या भव्य वृक्षाशी जवळीक निर्माण होते, आपुलकी वाटू लागते. कळत नकळत निसर्गाशी एक नाते जोडले जाते.

पूर्वीच्या काळात वडाची पूजा केल्यानंतर वटसावित्रीची कथा ऐकली जात असे. त्यात सुरस आणि चमत्कृतीपूर्ण कथानक आहेच, सावित्री आणि यमधर्म यांचा संवादसुध्दा असे. हिंदू धर्मशास्त्रांमधील अनेक मुद्दे यातून श्रोत्यांच्या कानावर आपसूक प़डत. पुराणातली सावित्री सर्व शास्त्रांमध्ये पारंगत होती, पण मधल्या काळात स्त्रियांना शिक्षणापासून वंचित केले गेले होते. व्रताचा भाग म्हणून अशा पोथ्यांचे श्रवण केल्यामुळे त्यांना धर्माचे थोडे ज्ञान मिळण्याची संधी मिळायची.



. . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

Sunday, June 03, 2012

वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिवस (भाग १)

वनस्पती जमीनीमधून पाणी आणि हवेतून कर्बद्विप्राणील (कार्बन डायॉक्साईड) वायू शोषून घेतात आणि सूर्यप्रकाशामधून ऊर्जा घेऊन या दोन साध्या अणूंचा संयोग घडवून आणून त्यातून सेंद्रिक (ऑर्गॅनिक) पदार्थांचे प्रचंड गुंतागुंतीचे अणू तयार करतात. या क्रियेमधून प्राणवायूचे विमोचन होऊन हा उपयुक्त वायू हवेत सोडला जातो आणि नव्याने तयार झालेले सेंद्रिय पदार्थ त्या वनस्पतीच्या निरनिराळ्या भागात साठवून ठेवले जातात. शाकाहारी प्राणी त्यांचे भक्षण करून आपला उदरनिर्वाह करतात आणि मांसाहारी पशू त्या प्राण्यांना गट्ट करतात. सर्वच प्राण्यांना जीवंत राहण्यासाठी आवश्यक असलेला प्राणवायू आणि अन्नपदार्थ अशा प्रकारे वनस्पतींपासूनच मिळतात. कोणताही प्राणी थेट हवापाण्यापासून आपले अन्न तयार करू शकत नाही. फक्त वनस्पतींना ते सामर्थ्य मिळाले आहे.

प्राचीन काळात जेंव्हा कारखानदारी अस्तित्वात नव्हती अशा काळात माणसाचे रोजमर्राचे जीवन पूर्णपणे निसर्गावर म्हणजे वनस्पती विश्वावरच अवलंबून होते. याची जाणीव आपल्या पूर्वजांना होती. झाडांना बोलता येत नसले तरी तेही सजीवच आहेत आणि त्यांचेबद्दल कृतज्ञपणा दाखवणे हे आपले कर्तव्य आहे हे सर्वांना समजावे आणि अधोरेखित केले जावे या हेतूने त्यांनी विविध वृक्षांना आपल्या धार्मिक परंपरांमध्ये महत्वाचे स्थान दिले. वड आणि पिंपळ हे वृक्ष आकाराने प्रचंड असतात. त्यांचे आयुष्य खूप मोठे म्हणजे शतकानुशतके असते. माणसांच्या अनेक पिढ्या त्यांच्या सावलीत सुखावतात तर त्याच्याही अनेकपटीने जास्त पक्ष्यांच्या पिढ्या या वृक्षांवर घरटी करून राहून जातात. बहुतेक सर्व मंदिरांच्या परिसरात वटवृक्ष किंवा पिंपळाचे झाड किंवा दोन्हीही लावली आणि टिकवून ठेवली जातात आणि मंदिरात देवदर्शनाला जाणारे भाविक या झाडांनाही नमस्कार करतात. अशी आपली संस्कृती आहे.

ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत केले जाते. वडाच्या झाडाची पूजा हा या व्रतातला महत्वाचा भाग आहे. पुराणकाळामधील सावित्री या महान पतिव्रतेने प्रत्यक्ष यमाशी नम्रतापूर्वक पण सखोल तात्विक वाद घातला, अनेक प्रकारे त्याची मनधरणी केली, कोणत्याही परिस्थितीत आपल्या पतीपासून विभक्त न होण्याचा आपला हट्ट सोडला नाही आणि यमाने हरण केलेले सत्यवानाचे प्राण चातुर्याने परत मिळवले अशी कथा आहे. या गोष्टीत सावित्रीचा निग्रह, तिचे पांडित्य आणि चतुराई दिसून येते. हे नाट्य एका वडाच्या झाडाखाली घडले असावे आणि एवढाच त्याचा संबंध या कथेशी असावा. वटवृक्षाप्रमाणे आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे आणि आपले सौभाग्य अखंड रहावे अशी मनोकामना या व्रताच्या निमित्याने व्यक्त करून व़टवृक्षाचे महत्व लोकांच्या मनावर ठसवावे अशा विचाराने ही परंपरा सुरू झाली असावी.

उद्या वटपौर्णिमा आहे. या निमित्याने स्त्रिया वडाची पूजा करतील, त्या झाडाला दोरा गुंडाळण्यासाठी त्याला प्रदक्षिणा घालतांना त्याचा बुंधा किती रुंद आणि मजबूत आहे हे त्यांच्या लक्षात येईल. विशाल वृक्षाचा भार पेलण्यासाठी त्याचा बुंधा बळकट असणे किती आवश्यक आहे हे त्यांना कळेल. जीवनातील कर्तव्यांचा बोजा पेलण्यासाठी खंबीरपणा कसा आवश्यक आहे याचा वस्तुपाठ त्यांना मिळेल. वडाची एक लहानशी फांदी तोडून घरी आणून तिची पूजा करणा-यांना यातले काहीच मिळणार, कळणार किंवा वळणार नाही. जी फांदी स्वतःच दोन चार दिवसात सुकून नष्ट होणार आहे किंवा त्याच्याही आधी म्हणजे दुस-या दिवशीच कच-याच्या ढिगा-यात टाकून दिली जाणार आहे ती कोणाला कसला संदेश, स्फूर्ती किंवा आशीर्वाद देणार?

शहरांमध्ये वडाच्या फांदीची पूजा करणे असे विकृत रूप या व्रताला मिळाले आहे. त्यासाठी आधीच वडाच्या झाडांच्या फांद्या तोडून त्यांना जायबंदी केले जात आहे. ज्याच्याबद्दल कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी ज्याची पूजा करायची, त्याच झाडाची या कारणासाठी मोडतोड करणे हा मूळ उद्देशाचा केवढा विपर्यास आहे? सावित्रीची कथा तर आता हरवून गेली आहे. तिने यमधर्माशी कसली चर्चा केली हे क्वचितच कोणाला माहीत असेल. पतीनिधनाच्या दुर्धर प्रसंगी तिने आपला तोल सांभाळून इतका सखोल तात्विक संवाद केला ही गोष्ट कोणाला माहीतसुध्दा नसेल.

या वर्षी वटपौर्णिमेच्या पाठोपाठ जागतिक पर्यावरण दिवस येतो आहे. तो नक्की कसा साजरा होणार आहे हे मला माहीत नाही. कदाचित त्या दिवशी पोपटपंची करून वृक्षांचे तोंडभर कौतुक केले जाईल. लेख लिहिले आणि वाचले जातील. वनस्पतीविश्वाशी ज्यांची ओळख पुस्तकी ज्ञानामधून झाली आहे असे लोक यात पुढाकात घेतांना दिसले तर मला यात आश्चर्य वाटणार नाही. पण पूर्वीच्या काळात अशा व्रतांच्या निमित्याने माणसांच्या मनात वृक्षवल्लींबद्दल आत्मीयता निर्माण केली जात होती तसे काही केले गेले तर ते पर्यावरणासाठी खरोखर उपयुक्त ठरेल.

. . . . . . . . . . . . .  (क्रमशः)

Friday, June 01, 2012

डेबिट कार्ड - एक अनुभव आणि त्यातून मिळालेले शहाणपण

क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वगैरेंमुळे आपले जीवन किती सोपे आणि सुखकारक झाले आहे असे मला वाटत होते. पण काल मला एक धक्कादायक अनुभव आला. पुणे येथील वारजे भागातील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रात मी पैसे काढायला गेलो. तिथल्या यंत्राने माझे कार्ड गिळून टाकले आणि वर पुन्हा "प्लीज इन्सर्ट युवर कार्ड" अशी विनंती केली. माझे कार्ड तर आधीच 'इन्सर्ट' केलेले होते. दरवाजाजवळ बसलेल्या रक्षकाला मी ही गोष्ट सांगितल्यावर त्याने दोन तीन बटने दाबून प्रयत्न केला आणि तो असफल झाल्यानंतर जवळच असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जायला सांगितले. दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या त्या शाखेत गेलो. तिथे उपस्थित असलेल्या अधिकारी महिलेने फोनवर कोणाशी बोलून चौकशी केली आणि मला माझ्या बँकेत (पंजाब नॅशनल बँकेत) जाऊन नवे कार्ड मिळवण्याबाबत कारवाई करायला सांगितले. वारंवार विनंती करूनसुध्दा बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनमध्ये अडकलेले माझे कार्ड परत मिळवण्याबद्दल ती काही सांगू शकली नाही. ते जवळ जवळ अशक्य आहे असेच तिच्या बोलण्यावरून जाणवले. ते एटीएम मशीन त्या शाखेच्या अखत्यारीत येत नाही, हे काम औटसोर्स केलेले असते असेही त्या बाईंनी सांगितले.

रिक्शा करून मी कोथरूड येथील पीएनबीच्या शाखेत गेलो. तेथील अधिकार्‍याने एक टोलफ्री नंबर दिला आणि तिथे फोन करून माझे कार्ड कँसल करायची कारवाई करावी आणि मुंबईला जाऊन माझ्या खात्यातून नवे कार्ड मिळवावे असे सांगितले. म्हणजे तेवढ्यासाठी मला लगेच मुंबईला जायला हवे. तो टोलफ्री नंबर मिळता मिळत नव्हता. दोन तास सतत प्रयत्न केल्यानंतर एकदाचा लागला आणि माझे पूर्वीचे कार्ड रद्द करण्याची कारवाई तीन तासात होईल असे आश्वासन मिळाले, पण ते केल्याची सूचना काही पुढील दोनतीन दिवसातही आलेली नाही.

या सगळ्या प्रकारात माझी काहीच चूक नसतांना मला जो त्रास भोगावा लागत आहे याबद्दल मी कोणाकडे तक्रार करावी याबद्दल कोणी मार्गदर्शन करू शकेल कां?



हा मजकूर मी मिसळपाव या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आणि दोन तीन तासातच त्याला आलेल्या प्रतिसादांमधून नवी माहिती मिळाली. ती थोडक्यात अशी आहे.

रिझर्व बँकेच्या आदेशानुसार गिळलेले कार्ड (स्वतःच्या बँकेखेरीज अन्य बँकांच्या एटीएम मधे अडकलेलं) हे त्या बँकेकडून सिक्युरिटीच्या कारणाने एक प्रोटोकॉल म्हणून कापून नष्ट केलं जातं. अनधिकृत वापर टाळण्यासाठी ही एक सेफ्टी अरेंजमेंट आहे.

ही समस्या फक्त मोटराईज्ड कार्ड रीडर्स असलेल्या मशीन्समधे येते. दोन प्रकारची यंत्रे असतात. मोटराईज्ड कार्ड रीडर आणि डिप कार्ड रीडर

मोटराईज्ड कार्ड रीडर मध्ये कार्ड आत घेऊन रीड केलं जातं.. ही योजना अत्यंत जुन्या मशीन्समधे केवळ शिल्लक असून ती आता कालबाह्य झाली आहे. ९५ % मशीन्स आता "डिप कार्ड" रीडरसहित येतात. यात कार्ड सरकवून पुन्हा बाहेर काढून घ्यायचं असतं. कार्ड रीटेन होणं ही गोष्ट यात होऊच शकत नाही.

पूर्वीच्या काळी मोटराईज्ड कार्ड रीडरमधे एकदाच कार्ड आत टाकून एकामागून एक दोनतीन ट्रान्झॅक्शन्स करता यायची. त्यामुळे एक ग्राहक निघून गेल्यानंतर आलेल्या दुस-या ग्राहकाने पहिल्या ग्राहकाच्या खात्यातले पैसे काढून घेतले अशा काही घटना घडल्या. हे टाळण्यासाठी काही काळानंतर प्रत्येक ट्रान्झॅक्शनला पुन्हा पुन्हा पासवर्ड विचारणे आणि तो देणे सक्तीचे झाले डिपकार्ड रीडरला एकदा कार्ड दाखवलं आणि काढलं की एकच ट्रान्झॅक्शन करता येतं, मग सेशन एण्ड. .. दुसर्‍या कामासाठी (उदा. मिनी स्टेटमेंट) पुन्हा कार्ड घालावे लागते. पण डिपकार्डमधे फ्रॉड्स करायला खूप कमी वाव राहतो ही बाजू महत्वाची.

तात्पर्य. आता यापुढे डिप कार्ड रीडर असलेल्या एटीएम मधेच कार्ड वापरत जावे.. विशेषत: अन्य बँकेच्या एटीएमवर असलात तर. तुमच्या स्वत:च्या बँकेच्या एटीएममधे कार्ड राहिल्यास ते कार्ड कॅश लोडिंग एजन्सीकडून गोळा करुन तुमच्या ब्रांचकडे परत पाठवलं जातं आणि तुम्ही चारपाच दिवसांनी स्वत:च्या मूळ ब्रांचमधून ते घेऊन जाऊ शकता.

एटीम आणि त्यातल्या कॅश मॅनेजमेंटचे काम काही दूरच्या ग्रामीण ब्रांचची एटीएम्स वगळता सर्वत्र आउटसोर्सच केलेले असते.


दुस-या एका वाचकाने अशी प्रतिक्रिया दिली.

मशीन म्हंटले की ते कधीतरी बिघडणारच. शंभर टक्के यशस्वितेची खात्री माणसाचीही देता येत नाही, मशीनची कशी देणार?

आपल्याला त्रास झाला की आपली प्रतिक्रिया तीव्र उमटते त्यात गैर नाही, पण अशा एखाद्या त्रासामागे किती वेळा सुरळित काम झाले याचा विचार केला तर त्रास थोडा कमी होतो आपला. बँका मॅन्युअल ट्रान्सॅक्शन करीत होत्या तेव्हा डुप्लिकेट सही करून किती फ्रॉड होत होते हे आज आपण विसरलो असलो तरी तेव्हाची बँकिंग व्यवस्था आजच्यापेक्षा सरस होती नि कम्प्युटरायजेशन मुळे हा असला त्रास आहे असे विधान करणारी फारच थोडी माणसे सापडतील (त्यातही पेन्शनर वगळाल तर ही संख्या नगण्य होईल.) नवी व्यवस्था नव्या संभाव्य चुका घेऊन येणारच, त्याच्या सकट ती व्यवस्था स्वीकारायला हवी. आपल्या रोजगाराच्या ठिकाणी आपली स्वतःची यशाची टक्केवारी (डुईंग इट राईट फर्स्ट टाईम.... ऑफ कोर्स विदाउट डिफाईनिंग राईट = व्हॉटेवर यू डू.) किती याचा विचार केला तर व्यवस्थांनाही चूक करण्याची मुभा आपण द्यायला हवी. शेवटी व्यवस्था देखील तुमच्या आमच्या सारख्या माणसांनीच उभ्या केल्यात ना.

या गृहस्थांचा काही गैरसमज झाला असावा. मशीनमध्ये चूक होणे शक्य आहे, पण उपभोक्त्याला त्यापासून फार जास्त त्रास होऊ नये असे माझे म्हणणे आहे. मशीन बिघडले तर त्याला पैसे मिळणार नाहीत इतपत ठीक आहे. पण त्याचे कार्ड कायमचे गडप करून टाकणे हे जरा अती झाले. आपले कार्ड अमूक मशीनमध्ये अडकून पडल्यास ते लगेच बाहेर काढण्याची काही व्यवस्था असायला हवी. हे फक्त माझेच म्हणणे आहे असे नाही तर या वेळी मी ज्या दोन बँकांना भेटी दिल्या त्यामधील अधिका-यांनीसुध्दा असे असायला हवे पण दुर्दैवाने तसे नाही असा अभिप्राय व्यक्त केला.

संजय क्षीरसागर या वाचकाने आपली ओळख दिली नाही, पण त्यांनी अधिकृत वाटेल अशी माहिती दिली. की बँक ऑफ इण्डियाने आरबीआय इंस्ट्रकश्न्सनुसार त्यांनी ते कार्ड क्रॅश केले आहे. आता रिप्लेसमेंट कार्ड बँकेकडून सहज मिळेल, तेंव्हा निर्धास्त रहा.

या एटीएम वरून आठवलं गेली अनेक वर्षे 'पीन नंबर उलटा एंटर केल्यावर मशीन मधून पैसे येतात आणि जवळच्या पोलीसांना सुद्धा माहिती जाते' असा एक भंपक मेल फिरत आहे. हा मेल मिळाल्यावर मी खरच नंबर उलटा देउन बघितला होता. अशी आठवण एकाने कळवली. मीसुध्दा ही भंपक मेल अनेक वेळा वाचली होती आणि एका ओळखीच्या बँक मॅनेजरकडून ती भंपक असल्याची खात्री करून घेतली होती.

पुढे जाऊन काही दिवस खरेच अशी काहीतरी योजना असावी असा प्रयत्न झाला, परंतु त्यात एकाहुन अधिक एजन्सीजचा - बँक, एटीएम उत्पादक, एटीएम चालक, टेलेफोन एजन्सी, होमलँड सिक्युरिटी इ. इ. - संबंध असल्याने नि मुख्यतः एटीएम चालवणार्‍या संस्थांनी (या बँकांनी ठेका दिलेल्या स्वतंत्र कंपन्या असतात) याबाबत आवश्यक ते बदल, उपाययोजना करण्यास असमर्थता दाखवल्याने बारगळला. ही सारी माहिती एका फोरमवर वाचण्यात आली होती. असे एकाने कळवले.


या सर्व प्रतिसादांना मी एकत्र उत्तर दिले.

"क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वगैरेंमुळे आपले जीवन किती सोपे आणि सुखकारक झाले आहे असे मला वाटत होते." असे मी सुरुवातीलाच लिहिले होते अर्थातच त्यांचा लाभ मी पुढेही घेणारच आहे. ही सारी व्यवस्थाच वाईट आहे असे मी सुचवलेले नाही किंवा त्याच्याकडे पाठ फिरवलेली नाही.

एकाद्या दुकानात किंवा हॉटेलात आपले कार्ड न चालणे, एकाद्या एटीएम मशीनमधून पैसे न मिळणे यासारखे अनुभव भारतात अधून मधून येत असतात. त्यावेळी पैशाची पर्यायी व्यवस्था कशी करायची याची आपण तयारी ठेवलेली असते. दोन वेळा माझे कार्ड एटीएम मशीन्समध्ये अडकले होते, पण ती यंत्रे ज्या बँकांच्या ज्या शाखांमध्ये ठेवली होती तिथे माझी खाती असल्यामुळे मला माझी कार्डे सुखरूपपणे परत मिळाली होती. या पूर्वानुभवामुळे या वेळचा अनुभव धक्कादायक वाटला आणि ही घटना परगावी झाल्यामुळे पर्यायी व्यवस्था करणे तितकेसे सोपे नव्हते.

मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि यंत्रांमध्ये बिघाड होण्याची कारणे, त्यांचे स्वरूप, परिणाम, त्यापासून होऊ शकणारे धोके वगैरेचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करणे हा माझ्या कामाचा भाग होता. एटीएम मशीन्सच्या बाबतीतल्या अशा य़ोजना माझ्या मते पुरेशा नाहीत. भारतातील बँकांच्या कार्यपध्दती सुरक्षिततेच्या दृष्टीने कदाचित अधिक चांगल्या असतील, पण उपभोक्त्याच्या दृष्टीने नक्कीच त्रासदायक आहेत. अशा प्रकारचे यांत्रिक बिघाड परदेशात सहसा घडत नाहीत आणि तसे झालेच तर त्यातून मार्ग काढण्यासाठी एक टेक्स्ट मेसेज किंवा ईमेल पुरेसा असतो आणि दिवसभरात नवे कार्ड मिळून जाते असे ऐकले आहे.
थोडक्यात सांगायचे झाल्यास क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वगैरे चांगली साधने आहेत. त्यांचा उपयोग करून घ्यावा, पण त्यावर सर्वस्वी अवलंबून राहू नये. दुकानात किंवा हॉटेलांत कार्ड स्वीप होते त्यात ते अडकून पडत नाही. एटीएम मशीनचा उपयोग करतांना डिप मशीनला अधिक पसंती द्यावी. मोटराइज्ड कार्ड रीडर असलेले मशीन टाळावे.