Tuesday, February 28, 2012

शाश्वत ऊर्जा कार्यशाळा -भाग १ ते ५

भाग १

अलकासाठी औषधे घेऊन मी हॉस्पिटलकडे जात असतांना गेटजवळ समोरून भावे येतांना दिसले. आम्हा दोघांनाही थोडी घाई असल्यामुळे थोडीशी जुजबी विचारपूस करून आम्ही एकमेकांचे टेलीफोन नंबर विचारून घेतले आणि आपापल्या दिशांना चालले गेलो. दोन तीन दिवसांनी मला खरोखरच भाव्यांचा फोन आला. त्यांनी विचारले, "आता वहिनी कशा आहेत?"
"आता तिची तब्येत बरी आहे, उद्यापरवाकडे डिस्चार्ज मिळेल."
"तुम्हाला एक विचारायचं होतं, पण विचारावं की नाही असं वाटलं. "
माझी क्षमता आणि स्वभाव याबद्दल भाव्यांना साधारण कल्पना असल्यामुळे ते मला कसलाही अवघड प्रश्न विचारणार नाहीत याची मला होती. मी म्हंटलं, "विचारा ना. फार फार तर मला माहीत नाही असं सांगेन किंवा मला जमणार नाही म्हणेन."
" अणूऊर्जा या विषयावर चार शब्द बोलायचे आहेत."
"हा तर माझा आवडता विषय आहे. कुठं आणि कधी बोलायचं आहे?"
".... .... संस्थेचा एक कार्यक्रम आहे. त्यात त्यांना या विषयासाठी कोणीतरी जाणकार वक्ता पाहिजे आहे."  भावे त्या संस्थेचे नाव पटकन बोलून गेल्यामुळे माझ्या काही ते लक्षात आले नाही. बहुधा ती संस्था माझ्या परिचयाची असावी असे त्यांना वाटत असणार. मला त्यामुळे विशेष फरक पडणार नव्हता म्हणून मीही काही ते नाव विचारले नाही. त्यांना विचारले, "हा कार्यक्रम कुठं होणार आहे?"
"नाशिकला."
"जवळच आहे. एका दिवसासाठी अलकाची काळजी घेण्याची काही तरी व्यवस्था करता येईल."
"मग मी तुमचं नाव सुचवतो. संस्थेचे लोक तुमच्याशी संपर्क साधतील."
"ठीक आहे."

दोन दिवसांच्या आतच मला त्या कार्यशाळेच्या संयोजकांचा फोन आला. मला किती वेळासाठी, कुठल्या भाषेत आणि कोणासमोर बोलायचे आहे वगैरेचा अंदाज येण्यासाठी मी थोडी साधारण माहिती विचारून घेतली. पाठोपाठ त्यांचे ईपत्रसुध्दा आले.
"आमच्या विनंतीचा मान राखून आपली संमती दर्शवल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आपला संक्षिप्त परिचय आणि व्याख्यानाचा सारांशही त्वरित पाठवावा." अशा अर्थाचे काही तरी त्यात लिहिले होते. मी विचार केला, कसली विनंती आणि कसली संमती? मग मी सुध्दा तसाच मानभावीपणा दाखवत उत्तर दिले, "मला ही संधी दिल्याबद्दल मीसुध्दा आपला अत्यंत आभारी आहे. माझा संक्षिप्त परिचय आणि व्याख्यानाचा सारांश सोबत पाठवत आहे. आपल्या संस्थेसाठी मी हा पहिलाच कार्यक्रम करत असल्यामुळे व्याख्यात्यांना कोणत्या सुविधा पुरवल्या जातात याचा अंदाज मला मिळाला तर फार चांगले होईल." (साध्या रोखठोक भाषेत सांगायचे झाल्यास यायचे की नाही ते मला ठरवता येईल.)

चार पाच दिवस झाले तरी माझ्या पत्राला उत्तर आले नाही. "याला आपण व्यासपीठ दिले आहे तेवढे पुरे नाही का? आणखी काय द्यायची गरज आहे?" असा विचार ते लोक बहुधा करत असावेत असा अंदाज मी केला आणि ती गोष्ट विसरून गेलो. नोकरीत असेपर्यंत मी माझ्या ऑफीसचा प्रतिनिधी म्हणून जात असल्यामुळे सगळी व्यवस्था आपोआप होत असे. सेवानिवृत्त झाल्यानंतर ज्यांच्याकडून मला आमंत्रण मिळते ते करतात. याची संवय झालेली असल्याने मी त्यावर विसंबून होतो. योगायोगाने पुन्हा भाव्यांची भेट झाली. माझ्या पत्राची एक प्रत मी त्यांना पाठवली असल्यामुळे त्याचा मतितार्थ त्यांच्या लक्षात आला असावाच. तरीही चाचपून पहाण्यासाठी त्यांनी विचारले, "तुमचा कार्यक्रम नक्की झाला आहे ना?"
"मी त्यांच्या उत्तराची वाट पहातो आहे." मी सांगितले.
"आमची सेवाभावी संस्था असल्याकारणाने ती कोणाला मानधन वगैरे देऊ शकत नाही."
"मला त्याची अपेक्षाही नाही. मुंबईतल्या एकाद्या ठिकाणी कार्यक्रम असला तर मी तिथे सहज जाऊ शकलो असतो, पण नाशिकसारख्या नवख्या ठिकाणी मी कसा जाणार, कुठे थांबणार, तुम्हीच विचार करा."  तेसुध्दा माझ्यासारखेच सेवानिवृत्त अधिकारी असल्यामुळे आम्ही एकाच होडीतले वाटसरू होतो. संभाषणाचा चेंडू मी त्यांच्याकडे टोलवला.
"बरोबर आहे तुमचं, मी त्याबद्दल बोलून घेईन." भाव्यांनी आश्वासन दिले आणि ते पाळले.
त्या संस्थेच्या उच्च पदाधिका-यांकडून फोन आणि विरोप आला. त्यांची सेवाभावी संस्था असल्याकारणाने ते कोणाला मानधन वगैरे देऊ शकत नाहीत हा मुद्दा स्पष्ट करून माझा नाशिकला जाण्यायेण्याचा कार्यक्रम काय आहे याची विचारणा केली होती, तसेच माझ्या प्रेझेंटेशनची सॉफ्ट कॉपी २२ तारखेच्या आत पाठवून देण्याची विनंती केली होती. मीसुध्दा माझा मुद्दा स्पष्ट करून माझी जाण्या येण्याची तसेच राहण्याची सोय करण्याची विनंती त्यांना केली. (त्याखेरीज मी येणार नाही हे प्रच्छन्नपणे पण जवळ जवळ स्पष्ट केले.) त्यानंतर सारी चक्रे वेगाने फिरली. माझी सर्व सोय केली गेली असल्याची पुष्टी करण्यात आली, माझ्या प्रवासाची जबाबदारी एका कार्यकर्त्यावर दिली गेली तसेच माझ्या राहत्या घराचा पत्ता विचारून घेतला गेला.

त्यानंतर मात्र सारे काही कल्पनातीत सुरळीतपणे घडत गेले. कार्यशाळा सकाळीच सुरू होत असल्यामुळे आदल्या दिवशी दुपारी पुण्याहून निघून संध्याकाळी नाशिकला पोचणा-या वाहनामध्ये मला जागा दिली होती. दुपारी दीडच्या सुमाराला मला घेण्यासाठी ते वाहन आमच्या घराकडे येईल असे त्या कार्यकर्त्याने मला सांगितले आणि मी सुध्दा त्या वेळी प्रवासासाठी तय्यार होऊन बसलो असेन असे त्याला सांगितले.
तो दिवस नेहमीसारखाच उजाडला, पण अलकाची तब्येत ठीक दिसत नव्हती. दहा साडेदहाच्या सुमाराला तिला डॉक्टरांकडे नेले. तिचा रक्तदाब बराच वाढला असल्याचे निदान त्यांनी केले आणि तिला संपूर्ण विश्रांती घ्यायला सांगितले. माझी दुविधा मनःस्थिती झाली. नाशिकला जायचे की नाही हे ठरवता येत नव्हते. इतकी खटपट करून माझी जाण्यायेण्याराहण्याची व्यवस्था करून घेतल्यानंतर आता नाही म्हणणे मला बरे वाटत नव्हते. नोकरीत असतांना मी अशा वेळी एकाद्या चांगल्या सहका-याला पाठवून दिले असते, इथे आयत्या वेळी कोणतीही पर्यायी व्यवस्था करणे शक्यच नव्हते. शिवाय माझ्या मनातही इतर वक्त्यांची व्याख्याने ऐकण्याची इच्छा होतीच. दोन अडीच तासात अलकाला थोडे बरे वाटायला लागले. जवळच रहात असलेल्या एका पोक्त नातेवाइकांनी दिवसभर तिच्यासोबत राहण्याची तयारी दाखवली आणि मला निश्चिंत मनाने नाशिकला जायला सांगितले. मी आपली बॅग भरायला घेतली. दोन दिवसांचे कपडे आणि इतर आवश्यक गोष्टी बॅगेत कोंबेपर्यंत गाडी येत असल्याची सूचना आलीच. इतर सहप्रवासी आणि कार्यशाळेसाठी नेण्याचे साहित्य घेऊन नाशिकसाठी प्रस्थान केले आणि सुखरूपपणे तिथे जाऊन पोचलो.

माझ्या रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था केलेली होतीच. प्रख्यात संगणकतज्ज्ञ आणि वैज्ञानिक डॉ.विजय भटकर हे मुख्य पाहुणे आधीच येऊन पोचले होते. त्यांच्याशी माझी ओळख करून देण्यात आली. जेवणाच्या वेळी पंगतीला त्यांच्या बाजूला बसण्याचा मान आणि संधी मिळाली. इतरही अनेक सन्माननीय पाहुणे आणि यजमान मंडळी त्या खान्याला उपस्थित होती. जेवण तसे पाहता साधेच पण सात्विक व रुचकर होते. त्यात दिखाऊ बडेजावाचा भाग नव्हता, तसेच कोणाच्याही वागण्यात आढ्यता नव्हती. मनमोकळ्या गप्पागोष्टींनी भोजन रंगत गेले.

  . . . .. .. . . . . . . . . . . . .  . . . . . . . . . . . .  . . . . . . . . . . . . . . . . . . . .

भाग २

विज्ञान भारती या संस्थेच्या महाराष्ट्र विभागातर्फे शाश्वत ऊर्जा या विषयावर नाशिक इथे दोन दिवसांची कार्यशाळा घेतली गेली. तेथील सुप्रसिध्द भोसला मिलिटरी कॉलेज आणि इतर कांही विद्यालये, महाविद्यालये वगैरे चालवणारी सीएचएम एज्युकेशन सोसायटी आणि अशाच प्रकारचे विस्तृत शैक्षणिक कार्य करणारी काकासाहेब वाघ एज्युकेशन सोसायटी यांच्या पंखाखालील शिक्षणसंस्थांनी संयुक्तपणे या संमेलनाचे आयोजन केले होते. दि.२५ आणि २६ फेब्रूवारी २०१२ हे दोन दिवस भोसला मिलिटरी कॉलेजच्या विस्तीर्ण आवारातील मुंजे मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या सभागारात हा कार्यक्रम झाला. मला एका विषयावर चार शब्द सांगण्यासाठी म्हणून बोलावले गेले होते आणि जाणेयेणेराहणे वगैरेंची व्यवस्था केली गेली होती हे पहिल्या भागात आले आहेच. मला दोन्ही दिवस राहून कार्यशाळेमधील इतर व्याख्याने ऐकायला मुभा होती, त्याचा मी पुरेपूर उपयोग करूनही घेतला, पण त्यांचेसंबंधीचे कसलेच छापील कागद त्या वेळी वाटले गेले नाहीत. लवकरच ती सगळी प्रेझेंटेशन्स इंटरनेटवर पहायला आणि वाचायला मिळतील असे आश्वासन मिळाले होते. ते पाहून त्यावर सविस्तरपणे लिहायचे असे मी आधी ठरवले होते. पण अद्याप ते उपलब्ध झाले नसल्यामुळे आता ऐकलेले सारेच विस्मरणात जाण्यापूर्वी माझ्या आठवणीतून त्याबद्दल लिहिणे भाग आहे.

संमेलनाच्या कार्यक्रमाची सुरुवात नेहमीप्रमाणेच एका वेगळ्या सत्राने झाली. उद्घाटनाच्या या सत्रासाठी प्रमुख पाहुणे डॉ.विजय भटकर, दुसरे सन्मान्य पाहुणे श्री.प्रभाकर कुकडे आणि तीन्ही संस्थांचे सर्वोच्च पदाधिकारी मंचावर पहिल्या रांगेत विराजमान झाले. त्यांना सहाय्य करणारे पंधरा वीस दुय्यम पदाधिकारीगण उपस्थित होते ते मागील रांगांमध्ये बसले होते. दीपप्रज्वलनासाठी सर्व मंडळी उठून समईपाशी गेली, तिच्या वाती पेटवण्यासाठी आधी मेणबत्ती पेटवली गेली आणि सभागृहातले विजेचे सर्व दिवे गेले. काळोखामुळे समईमधील ज्योतींचा उजेड छान खुलून दिसत असला तरी मंचावरील मंडळींसाठी ते अडचणीचेच होते आणि नेमके कोण दीपप्रज्वलन करत आहे हे प्रेक्षकांना नीट दिसत नव्हते. अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ही नाट्यमय घटना घडली होती असे नंतर समजले. एक दोन मिनिटात वीज आली किंवा तिचा पर्यायी पुरवठा सुरू झाला. त्यानंतर दोन दिवस वीजटंचाई आणि भारनियमन यावर चर्चा होत राहिल्या, पण संमेलनाला त्यांचा प्रत्यक्ष फटका मात्र बसला नाही.

दीपप्रज्वलनाचा सोहळा आणि मान्यवरांचे स्वागत, सत्कार वगैरे झाल्यानंतर स्मरणिकेचे विधीवत प्रकाशन झाले. त्यानंतर श्री.प्रभाकर कुकडे यांचे बीजव्याख्यान (की नोट अॅड्रेस) झाले. भारतातील आणि महाराष्ट्रातील विजेची निर्मिती आणि पुरवठा, तसेच त्यातील वाढ आणि त्यापेक्षाही अधिक वेगाने होत असलेली मागणीमधील वाढ, त्यामुळे निर्माण होत असलेला तुटवडा वगैरेंच्या आकडेवारीची भेंडोळी सादर करून त्यांनी परिस्थितीचे गांभिर्य दर्शवून दिले. एका बाजूला वीजनिर्मितीत लक्षणीय वाढ होऊन आपण जगात पाचव्या क्रमांकावर आलो अशी चांगली परिस्थिती दिसत असली तरी अजूनही देशामधील पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घरे विजेपासून वंचित आहेत आणि तरीही ज्या गावांना किंवा घरांना विजेची जोडणी झाली आहे त्यांना पुरेशी वीज मिळतच नाही ही परिस्थिती दारुण आहे. उत्तर भारतात भार नियमन फार जास्त प्रमाणात होते अशी माझी समजूत होती, पण या बाबतीत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे हे ऐकून तर धक्का बसला. ग्रामीण विभागाला, विशेषतः शेतक-यांना मोफत किंवा अतीशय स्वस्त दराने वीज द्यावी लागत असल्याने आणि त्याचेही पैसे वसूल होत नसल्यामुळे सरकारी क्षेत्रामधील वीज कंपन्या डबघाईला आलेल्या आहेत हे सर्वश्रुत आहेच. श्री.कुकडे यांनी त्यांच्या भाषणात यावर एक उपाय सुचवला. गावागावांमध्ये किंवा शेतक-यांच्या त्याहून लहान समूहांमध्ये जैवऊर्जेवर (बायोगॅसवर) चालणारी जनित्रे बसवायची, शेतक-यांनी त्यांना नियमितपणे जैवकचरा पुरवायचा आणि मोफत वीज घ्यायची अशा स्वरूपाची ही योजना आहे. यामुळे खेडी विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होतील आणि मोठ्या विद्युत उत्पादन केंद्रांमधून निर्माण होणारी वीज कारखाने आणि नागरी ग्राहकांना वाजवी दराने पुरवता आल्यामुळे वीज कंपन्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. अशी असंख्य लहान लहान केंद्रे निर्माण करणे आणि ती कार्यक्षमतेने चालवणे तांत्रिक दृष्ट्या कितपत व्यवहार्य आहे हे अनुभवानेच ठरेल, पण जिल्ह्याजिल्ह्यामध्ये पायलट प्रॉजेक्ट्स करून ते यशस्वीपणे चालवून दाखवले तर इतर गावकरी पुढाकार घेऊन त्याचे लोण सगळीकडे पसरवतील.

डॉ.भटकरांचे नांव मी अनेक वेळा ऐकले होते, त्यांच्या संबंधी लिहिलेले बरेच वेळा वाचले होते तसेच त्यांनी लिहिलेले लेख आणि दिलेली भाषणे याबद्दलसुध्दा वाचले होते. त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदरयुक्त कुतूहल होते. त्यांचे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकण्याचा मात्र हा पहिलाच प्रसंग होता. ते सुध्दा अगदी समोर बसून ऐकण्याची संधी मला अनपेक्षितपणे मिळाली. एक उत्कृष्ट वैज्ञानिक आणि विचारवंत म्हणून त्यांचा परिचय आहेच, पण ते फर्डे वक्ते आहेत आणि अनेक विषयांना लीलया स्पर्श करत ते आवेशपूर्ण बोलत जातात. त्यांच्या बोलण्यातली सकारात्मकता मला खूप आवडली. प्राप्त परिस्थितीत अनेक अडचणी आहेत, पूर्वीही होत्या आणि पुढेही त्या येणार आहेत, पण त्यांचा जास्त पाल्हाळ न लावता त्या समजून घेणे आणि मुख्य म्हणजे त्यांच्यावर कशी मात करायची याचा विचार आणि कृती सतत करत राहणे यामुळेच आपण आणि आपला देश पुढे जाणार आहोत हे त्यांनी श्रोत्यांच्या मनावर छान बिंबवले. परम या महा संगणकाच्या बाबतीत त्यांनी स्वतः हे काम करून दाखवले असल्यामुळे त्यांच्या उक्तीला वजन प्राप्त झाले आहे. कार्यशाळेला उपस्थित असणा-यांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची संख्या मोठी होती. त्या सर्वांना डॉ.भटकरांच्या भाषणामधून नक्कीच खूप स्फूर्ती मिळाली असणार.

. . . . . . . . . . . . . .  . . . . . . . . . . .. . . . . . .

भाग ३

उद्घाटनाचा सोहळा पार पडल्यानंतर चहापान करून मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली. यात चार तांत्रिक सत्रे (टेक्निकल सेशन्स) होती. त्यातले पहिले सत्र 'ऊर्जा दृश्य' (एनर्जी सिनेरिओ) या विषयावर होते. यात मुख्यतः विजेच्या उत्पादनाबद्दल बोलले जाईल असे सांगितले गेले होते. खरे तर जलऊर्जा (हैड्रोइलेक्ट्रिक पॉवर) हे शाश्वत ऊर्जेचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. पावसाचे पाणी धरणात येत राहते आणि त्यामुळे वीज उत्पादनासाठी धरणामधून खाली सोडलेल्या पाण्याची भरपाई होत असते. विजेचे उत्पादन करतांना पाणी नष्ट होत नसल्यामुळे ते पाणी पुढे कृषी आणि इतर उपयुक्त कामांसाठी वापरले जाते. या ऊर्जानिर्मितीत जमीन, पाणी किंवा वातावरणाचे प्रदूषण होत नाही. या प्रकारे विजेचे उत्पादन गेली शंभरावर वर्षे होत आले असल्यामुळे त्यामधील तंत्रज्ञान आणि त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री चांगली परिचयाची आहे. पुनर्निर्मितीक्षम स्त्रोतांपासून (रिन्यूएबल एनर्जी सोर्सेसपासून) जगभरात आज जेवढी वीज तयार होत आहे त्यातील जवळपास नव्वद टक्क्यांएवढा सिंहाचा वाटा जलशक्तीचा असल्यामुळे त्याला या सत्रात अग्रस्थान मिळेल असे मला वाटले होते पण या वेळी तिचा समावेशच केला गेला नव्हता असे दिसले.

 औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्रांपासून जगातली तसेच भारतातलीसुध्दा निम्म्याहून अधिक वीज तयार होत असल्यामुळे ही शाश्वत ऊर्जा नसली तरी तिची दखल घेणे आवश्यक होते. या प्रकारच्या ऊर्जेच्या भविष्याबद्दल शंका उत्पन्न झाल्यामुळेच खरे तर ऊर्जेच्या इतर स्त्रोतांकडे लक्ष दिले जाऊ लागले आहे. त्यामुळे पहिला मान औष्णिक ऊर्जेला मिळावा अशी योजना होती. पण यावरील माहिती सादर करण्यासाठी श्री.कुकडे यांना चहापानानंतर लगेच मंचावर परत येणे शक्य झाले नसावे. हा कार्यक्रम आधीच तासभर उशीराने रेंगाळत चाललेला असल्यामुळे वेळ वाचवण्यासाठी सत्राध्यक्षांनी मला भाषणासाठी पाचारण केले आणि पंधरा मिनिटात आपले वक्तव्य संपवण्याची सूचना केली.

"सर्व उपस्थितांना नमस्कार!" एवढ्या तीनच शब्दात मी आपले नमन केवळ थेंबभर तेलात आटोपले आणि पूर्वपीठिका, प्रस्तावना, विषयाची ओळख वगैरेंना फाटा देऊन सरळ अणूगर्भात घुसलो. तिथे ही ऊर्जा कशा प्रकारे वास करत असते आणि तिला बाहेर काढल्यानंतर तिचे रूपांतर विजेत कसे केले जाते. इंधन (फ्यूएल), मंदायक (मॉडरेटर), शोषक (अॅब्सॉर्बर) आणि शीतलक (कूलंट) हे या केंद्रातील प्रक्रियांचे मुख्य घटक कोणते कार्य करतात, त्यांच्या द्वारे ही प्रक्रिया किती उत्तम प्रकारे नियंत्रित केली जाते, त्याशिवाय किती सुरक्षेचे उपाय योजलेले असतात वगैरे सारे समजावून सांगितले आणि या बाबतीतला आतापर्यंतचा जागतिक अनुभव, त्याबाबत केला जात असलेला खोडसाळ अपप्रचार आणि त्या बाबतीतील प्रत्यक्ष सद्यपरिस्थिती, त्यावर घेतले जाणारे आक्षेप आणि त्यांचे निराकरण, भविष्यकाळामधील योजना वगैरेंबद्दल माहिती दिली. सध्या निर्माण केली जात असलेली अणूऊर्जा युरेनियमच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे आणि त्याचे साठे संपण्याची दाट शक्यता असल्यामुळे ही शाश्वत ऊर्जा नाही असे असले तरी फास्ट ब्रीडर रिअॅक्टर्सद्वारे सध्या उपलब्ध असलेल्या युरेनियमचा उपयोग अनेक पटीने वाढवता येणे शक्य आहे आणि फ्यूजन रिअॅक्टर्स बनवणे साध्य झाले तर मग अणू ऊर्जेचे प्रचंड भांडार खुलेल वगैरे सांगितले. या पहिल्याच सत्रामधील हे पहिलेच भाषण असल्यामुळे श्रोत्यांची उपस्थिती चांगली होती आणि त्यांनी गोंधळ न करता ते माझे सांगणे शांतपणे ऐकून घेतले. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मी दिलेल्या उत्तरांनी त्यांचे समाघान झाले असावे असे मला तरी वाटले.

त्यानंतर श्री.संतोष गोंधळेकर यांनी अपारंपरिक ऊर्जा हा विषय घेतला. त्यांचा मुख्य भर जैवऊर्जेवर (बायोएनर्जीवर) होता. वनस्पती आणि प्राणिमात्रांची शरीरे ज्या असंख्य सूक्ष्म पेशींपासून बनतात त्यांचे रेणू (मॉलेक्यूल्स) मुख्यतः कार्बन, हैड्रोजन आणि ऑक्सीजन या मूलद्रव्यांनी भरलेले असतात. या सगळ्याला बायोमास असे म्हंटले जाते. झाडांची मुळे, खोड, फांद्या, पाने. फुले, फळे वगैरे भाग आणि त्यापासून तयार केले जात असलेले कागद व कापड यासारखे कृत्रिम पदार्थ, तसेच प्राणिमात्रांचे मृतदेह, मलमूत्र वगैरे सर्वांचा समावेश या बायोमासमध्ये होतो. हे जैव पदार्थ कुजतात तेंव्हा काही सूक्ष्म जंतू या पदार्थांच्या अवाढव्य रेणूंचे विघटन करून त्यापासून लहान लहान आणि साधे रेणू वेगळे करतात. त्यातून कार्बन व हैड्रोजन यांची मीथेनसारखी वायुरूप संयुगे (काँपौंड्स) निघतात. त्यांना बायोगॅस म्हणतात. या ज्वलनशील वायूला जाळून त्यामधून ऊर्जेची निर्मिती करता येते. हीच जैवऊर्जा झाली. हा बायोगॅस स्वयंपाकघरातला एलपीजी (लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस) आणि वाहनांमध्ये भरला जाणारा सीएनजी (काँप्रेस्स्ड नॅचरल गॅस) यांच्यासारखाच असतो. गोबर गॅसच्या स्वरूपात ही ऊर्जा खेड्यापाड्यांमधून उपयोगात आणण्याचे प्रयत्न बरेच वर्षांपासून चाललेले आहेत. अधिक मोठ्या प्रमाणात या गॅसचे उत्पादन करून त्यापासून विजेची निर्मिती केली तर त्यांमुळे भारत विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकेल असा विश्वास श्री,गोंधळेकर यांनी व्यक्त केला. अशा प्रयत्नांचे सूतोवाच श्री,प्रभाकर कुकडे यांनी त्यांच्या बीजभाषणात केले होतेच.

शहरामध्ये रोज गोळा होणारा टनावधी कचरा ही नगरवासियांपुढे असलेली एक मोठी समस्या आहे. त्याचे काय करायचे हेच उमजेनासे झाले नसल्यामुळे तो नष्ट करणे हेच महत्वाचे आहे. अशा वाया जाणा-या कच-यापासून बायोगॅसची निर्मिती केली तर त्याचेपासून सुटका होईलच, शिवाय त्यापासून ऊर्जा निर्माण करून तिचा वापर करता येईल. यामुळे शहरांसाठी हा उपाय अत्यंत उपयुक्त आहे. बायोगॅसच्या निर्मितीपर्यंत होणारा खर्च नगरविकासाखाली केला (म्हणजे गॅस फुकट मिळवला) आणि त्यापासून पुढे वीजनिर्मिती करण्याचा खर्च वीजग्राहकाकडून वसूल केला तर ती वीज माफक दरात प्राप्त करता येईल. या कारणाने शहरांमध्ये अशा प्रकारे ऊर्जेची निर्मिती करणे गरजेचे आहे असे माझेही मत आहे. शहरातला नागरिक टाकाऊ जैव वस्तूंचे काहीही करू शकत नाही किंवा त्या साठवूनही ठेवू शकत नाही, त्यामुळे त्यांचा योग्य प्रकारे निचरा करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर येते.

पण खेड्यांमधली परिस्थिती वेगळी आहे. भाजीची साले, फोलपटे, देठ, पालापाचोळा, उरलेले अन्न, गवत वगैरे गोष्टी जनावरांना खाऊ घातल्या जातात, त्यांचे शेण आणि उरलेला चुरा, भूसा वगैरेंचासुध्दा खत म्हणून किंवा ज्वलनासाठी उपयोग केला जातो. त्यामुळे जैव कच-यापासून मुक्ती मिळवणे हा तिथे इतका मोठा प्रश्न नाही. वीजउत्पादन करण्यासाठी भरपूर बायोमासाचा सतत पुरवठा करावा लागेल आणि तो उत्पन्न करण्यासाठी एलेफंट ग्रास, जट्रोपा यासारखी लवकर वाढणारी खास झाडे मुद्दाम लावून वाढवावी लागतील. अन्नधान्ये, तेलबिया, ऊस, कापूस, पालेभाज्या, फळफळावळ यासारख्या पिकांऐवजी शेतात ही झाडे लावली आणि त्यांच्यापासून तेवढेच किंवा जास्त उत्पन्न मिळवण्याची अपेक्षा बाळगली तर त्याला लागणारा खर्चसुध्दा विजेच्या उत्पादनखर्चात धरावा लागेल आणि ते केले तर ही वीज केवढ्याला पडेल याबद्दल माझ्या मनात शंका आहेत. काही संभाव्य आकडेवारी मांडून ती वीज स्वस्तातच पडेल असे भाकित श्री.गोंधळेकरांनी केले असले तरी हे प्रत्यक्ष अनुभव घेऊन सिध्द करावे लागेल.

सुरुवातीला ठेवलेले औष्णिक ऊर्जेवरील भाषण श्री.कुकडे यांनी त्यानंतर सादर केले. त्यांचा या क्षेत्रामधील दीर्घ अनुभव आणि ज्ञान यामुळे ते अर्थातच खूप माहितीपूर्ण होते. भारतात कोळशाचे प्रचंड साठे असले तरी त्याचा दर्जा आणि त्याचे उत्पादन पुरेसे नसल्यामुळे आपल्याला तो खूप मोठ्या प्रमाणात आय़ात करावा लागतो. खनिज तेल आणि वायू याबद्दल तर विचारायलाच नको. या बाबतीत आजच आपण तीन चतुर्थांश तेलाची आयात करतो आणि हा आकडा लवकरच नव्वद टक्क्यावर जाईल असे दिसते आहे. मध्यपूर्वेमधील अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे त्यांच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढत चालल्या आहेत. आपल्या परकीय चलनाचाच नव्हे तर राष्ट्रीय उत्पन्नाचा मोठा भाग त्यात खर्च केला जातो. या चित्रात सुधारणा होण्याची शक्यता तर नाहीच, ते दिवसे दिवस बिघडत जाणेच क्रमप्राप्त असल्यामुळे आतापासूनच आपण विजेच्या उत्पादनाच्या पर्यायी मार्गांचा अवलंब (अणुशक्तीसह) अधिकाधिक प्रमाणात करणे गरजेचे आहे हे त्यांनी सप्रमाण सिध्द करून श्रोत्यांच्या मनावर ठसवायचा चांगला प्रयत्न केला. नव्या औष्णिक विद्युतकेंद्रांसाठी आवश्यक असलेली जमीन आणि पाणी मिळवणेसुध्दा आता किती कठीण झाले आहे याची कल्पना त्यांनी दिली. तरीसुध्दा पुढील पन्नास साठ वर्षे तरी आपल्याला त्यावरच अवलंबून राहणे गरजेचे असल्यामुळे त्यातून मार्ग काढावेच लागतील हे त्यांनी स्पष्ट केले.

. . . . . . . . . . . .  . . . . . .  . . . . . ..  . . . .

भाग ४

कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी दुपारी झालेल्या दोन्ही सत्रांत अपारंपरिक (नॉनकन्हेन्सनल) ऊर्जेवर चर्चा झाली. त्यातील पहिले सत्र फक्त जैव ऊर्जेबाबत (बायो एनर्जी) होते आणि सौरऊर्जा (सोलर एनर्जी) व वातऊर्जा (विंड एनर्जी) यांची चर्चा दुस-या सत्रात झाली. सूर्यप्रकाशात झाडांची पाने हवेमधील कर्बद्विप्राणील (कार्बन डायॉक्साइड) वायू ग्रहण करतात आणि त्यामधील कार्बन अणूचा पाणी व इतर क्षारांसोबत संयोग घडवून त्यातून निरनिराळ्या सेंद्रिय (ऑर्गॅनिक) पदार्थांचे अणू तयार करतात. या प्रक्रियेत कर्बद्विप्राणील वायूमधील प्राणवायूचे (ऑक्सीजनचे) हवेत उत्सर्जन केले जाते आणि सूर्यप्रकाशामधील ऊर्जा सेंद्रिय पदार्थांमध्ये सुप्त रासायनिक ऊर्जेच्या (केमिकल पोटेन्शियल एनर्जी) स्वरूपात साठवून ठेवली जाते. हे सेंद्रिय पदार्थ झाडांच्या निरनिराळ्या भागांमध्ये पाठवून देऊन तिकडे ते साठवले जातात. त्यांच्यावरच जगातील इतर सर्व पशुपक्षी, कृमीकीटक, मासे वगैरे सजीवांचे प्रत्यक्ष किंवा परोक्ष रीतीने पोषण होते. या सेंद्रिय पदार्थांचे ज्वलन होत असतांना त्यांच्यामध्ये सुप्त असलेली ऊर्जा पुन्हा प्रकट होते. ही जैव ऊर्जा दोन प्रकारांने उपयोगात आणली जाते. मागील भागात दिल्याप्रमाणे सेंद्रिय पदार्थ कुजवून त्यातून जैव वायू (बायोगॅस) बाहेर काढून तो जाळणे हा अलीकडील काळातला उपाय आहे. लाकडाच्या किंवा सुकलेल्या पालापाचो-याच्या स्वरूपातील त्या पदार्थांनाच जाळून ऊष्णता निर्माण करणे हे माणसाला अग्नीचा शोध लागल्यापासून आजतागायत चालत राहिले आहे. भूगर्भामधील दगडी कोळसा आणि खनिज तेल हेसुध्दा लक्षावधी किंवा कोट्यावधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर जगत असलेल्या वनस्पतींपासूनच निर्माण झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या ज्वलनातून मिळणारी ऊर्जासुद्धा मुळात सौर ऊर्जेपासून तयार झालेली आहे असेही म्हणता येईल.

जैव ऊर्जेचा माणसाच्या कामासाठी उपयोग करण्यात तसे काहीच नवीन नसले तरी हा उपयोग अधिकाधिक कार्यक्षम रीतीने करण्याचे प्रयत्न चाललेलेच आहेत. शाश्वत ऊर्जेवरील कार्यशाळेच्या दुस-या तांत्रिक सत्रात यावरच उहापोह करण्यात आला. 'ग्रामीण भागासाठी जैवऊर्जा (बायोएनर्जी फॉर व्हिलेजेस)' या विषयावर किर्लोस्कर उद्योगसमूहाच्या श्री.नितांत माटे यांनी सादर केलेल्या भाषणात त्यांनी या विषयाचा आढावा घेतला. घनरूप, द्रवरूप (तेल) किंवा वायुरूप अशा कोणत्याही स्वरूपातील सेंद्रिय पदार्थांपासून ऊर्जा निर्माण करणे हे एक प्रकारे 'हरित तंत्रज्ञान (ग्रीन टेक्नॉलॉजी)' मानले जाते, ते 'पुनर्निर्मितीक्षम (रिन्यूएबल)' असल्यामुळे त्याचा उपयोग चिरकाल करता येईल. त्यामुळे होणारा ग्रामीण भागाचा विकास टिकाऊ स्वरूपाचा तसेच स्वावलंबी स्वरूपाचा असेल. वगैरे मुद्दे त्यांनी मांडले. किर्लोस्करांसारख्या मोठ्या उद्योगाने यात लक्ष घातले आणि यासाठी लागणारी कार्यक्षम तसेच उपयोग करायला सुलभ अशी यंत्रसामुग्री व उपकरणे तयार केली तर नक्कीच त्याचा ग्रामीण समाजाला चांगला फायदा होईल.

समुचित एन्व्होटेक कंपनीच्या श्री.रवीन्द्र देशमुख यांनी 'घरगुती ऊर्जेचा वापर (डोमेस्टिक एनर्जी अॅप्लिकेशन)' या विषयावर बोलतांना खेडी आणि लहान नगरे या भागात मुख्यतः स्वयंपाकात वापरल्या जाणा-या चुली, शेगड्या वगैरेंमध्ये सुधारणा करून त्या जास्त कार्यक्षम कशा करता येतात याबद्दल माहिती दिली. या सुधारणांमुळे इंधनाची बचत होईल, तसेच धुराचा त्रास होणार नाही आणि त्यामुळे होणारे हवेचे प्रदूषण कमी करता येईल असा तिहेरी लाभ होतो. याशिवाय गावामधील कचरा जाळून त्यापासून ऊर्जा निर्माण करण्याची उपकरणे व यंत्रसामुग्रीयुध्दा त्यांची संस्था पुरवू शकते. या प्रकारच्या संशोधनासाठी तिला 'अॅशडेन पुस्कार' मिळाले आहेत.

आरती (अॅप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट) या संस्थेमधून आलेले श्री.सिध्देश्वर यांनी 'ग्रामीण ऊर्जा शाश्वती (व्हिलेज एनर्जी सिक्यूरिटी)' या विषयावर बोलतांना आरती या संस्थेने या बाबतीत केलेल्या विविध प्रकारच्या कार्याची माहिती देली. भारतात दरवर्षी पन्नास कोटी टन एवढा जैव कचरा निर्माण होतो. त्या सर्वाचा सदुपयोग करून घेतल्यास ग्रामीण भागाला कधीच ऊर्जेची चिंता करावी लागणार नाही असे त्यांनी सांगितले. आरतीने बनवलेले 'सराय' शेगडी (स्टोव्ह), भट्ट्या वगैरेंची माहितीसुध्दा दिली.

'भगीरथ प्रतिष्ठान' या समाजोपयोगी संस्थेतर्फे (एनजीओकडून) कोंकणातील लहान गावांमध्ये खूप कार्य होत आहे. श्री.प्रसाद देवधर यांनी 'जैववायूतंत्रज्ञानाची सद्यपरिस्थिती आणि तिचा उपयोग (टेक्नॉलॉजी स्टेटस ऑफ बायोगॅस अँड इट्स अप्लिकेशन)' या विषयावर केलेल्या भाषणात त्याची समग्र माहिती थोडक्यात दिली. कोकणाच्या या भागामधील महिलावर्ग जळणासाठी लाकूडफाटा गोळा करणे, शेणाच्या गोव-या थापणे, त्या वाळवणे आणि ते जाळून त्यावर स्वयंपाक करणे यावरच दररोज निदान चार तास घालवतात. संस्थेने बांधून दिलेल्या आधुनिक बायोगॅस शेगडीवर फक्त एक तासात त्यांचा सगळा स्वयंपाक तयार होतो. अर्थातच उरलेल्या वेळात त्या कुक्कुटपालन, दूधदुभते यासारखे कोणतेही दुसरे उत्पादक काम करू शकतात. शिवाय स्वयंपाकासाठी लागणा-या इंधनाची बचत होतेच. अशा रीतीने ग्रामीण भागातील महिलावर्गाच्या राहणीमानात क्रांतिकारक बदल घडवून आणण्याचे महत्वपूर्ण कार्य करण्यासाठी त्यांची भगीरथ ही संस्था कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले एवढेच नव्हे तर अशा सुखी व समृध्द झालेल्या ग्रामीण महिलांची छायाचित्रेसुध्दा त्यांनी दाखवली.

गंगोत्री टेक्नॉलॉजीज या संस्थेतर्फे आलेल्या श्री.सुनील गोखले यांनी 'जैववस्तुमानाच्या चपट्या गोळ्यांच्या स्वरूपात स्वैपाकासाठी इंधन (बायोमास पेलेट्स अॅज कुकिंग फ्यूएल)' या विषयावर भाषण केले. लाकूडफाटा, पालापाचोळा किंवा इतर कोणताही बायोमास परंपरागत पध्दतीच्या चुलीशेगड्यांमध्ये जाळल्याने त्यामधील फक्त १० टक्के ऊर्जेचा उपयोग होतो आणि उरलेली ऊर्जा वाया जाते असे सांगून तिच्या लहान लहान चपट्या गोळ्या (पेलेट्स) बनवून त्या खास प्रकारच्या भट्ट्यांमध्ये जाळल्या तर त्यापासून मिळणा-या ऊर्जेचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करून घेता येतो असे प्रतिपादन त्यांनी केले. यज्ञ फ्यूएल सर्व्हिसेस या कंपनीच्या श्री.घारपुरे यांनी जैव कच-यापासून कांड्या बनवून त्याचा उपयोग करण्याची माहिती 'जैववस्तुमानाच्या कांड्यांच्या स्वरूपात कारखान्यांसाठी इंधन (बायोमास ब्रिकेट्स अॅज इंडस्ट्रियल फ्यूएल)' या विषयावरील भाषणात दिली. या दोन्हींमध्ये बरेच साम्य आहे. जैववस्तुमानाचा भुगा करून त्यांना यंत्रात घालून चेपून त्याच्या गोळ्या किंवा कांड्या बनवल्यास त्यांची साठवणूक आणि वाहतूक करणे, तसेच त्यांना शेगडी किंवा भट्टीमध्ये भरणे सोपे जाते आणि ते काम स्वयंचलित यंत्रांद्वारे करता येते. यातले पेलेट्सचे तंत्रज्ञान लहान प्रमाणावर आणि मुख्यतः घरगुती वापरासाठी असावे आणि ब्रिकेट्सचे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर आणि कारखान्यांसाठी असावे. सर्व प्रकारच्या भुशांपासून किंवा टरफलांपासून अशा पेलेट्स किंवा ब्रिकेट्स बनवण्याचे तंत्रज्ञान त्यांच्या कंपन्यांकडे आहे आणि त्याचा उपयोग व्यावसायिक तत्वावर करता येण्याजोगा आहे असे या दोघांनी सांगितले.

मुंबई आयआयटी मधील प्राध्यापक शिरीष केदारे यांनी 'प्रकाशऔष्णिक सौर ऊर्जा (एनर्जी फ्रॉम फोटोथर्मल) या विषयावरील व्याख्यानात सौर ऊर्जेचा उपयोग कारखान्यांमध्ये कसा केला जाणे शक्य आहे याचे विवेचन केले. रसायने, रंग, औषधे वगैरे तयार करणा-या अनेक प्रकारच्या कारखान्यांमध्ये चालणा-या प्रक्रियांसाठी लागणारी ऊष्णता बॉयलर्समध्ये खनिज तेल जाळून मिळवली जाते. त्यामधील २५० अंश सेल्सियसपेक्षा कमी तपमानावरील ऊष्णता निर्माण करण्यासाठी सौर ऊर्जेचा उपयोग करता येईल. उन्हात ठेवलेल्या विशिष्ट प्रकारच्या नळ्यांध्ये पाणी तापवून ते तप्त पाणी पुरेशा आकारांच्या पात्रांमध्ये (ड्रम्समध्ये) साठवायचे आणि ऊष्णता विनिमयस्कांद्वारे (हीट एक्स्चेंजरमार्गे) त्यामधील ऊष्णता संयंत्राला पुरवायची अशी योजना त्यांनी सांगितली. 'घरकामासाठी सौर ऊर्जा (सोलर एनर्जी फॉर हाउसहोल्ड)' या विषयावर दिलेल्या व्याख्यानात प्रिन्स फाउंडेशनचे श्री.अजय चांडक यांनी नवनवीन प्रकारच्या लहान मोठ्या सौरशेगड्या दाखवल्या. शाळांमधील मिडडेमील स्कीम, आंगणवाड्या, दवाखाने, धार्मिक स्थाने असा जागांवर लागणारी ऊर्जेची मोठ्या प्रमाणावरील गरज भागवण्यासाठी त्यांच्या संस्थेने प्रचंड आकाराच्या सौरशेगड्या बनवल्या आहेत. त्यात माणसांना उभे राहण्याची आणि ते करतांना त्याला ऊन लागू नये यासाठी त्याच्यासाठी छत्रछायेची व्यवस्थासुध्दा केली आहे. याची सौरपत्रे (सोलर पॅनेल्स) पाकळ्यांच्या आकाराची बनवलेली असल्यामुळे ती गाडीवरून ग्रामीण भागात नेणे शक्य होईल आणि त्यांची जोडणी करणे अत्यंत सोपे असल्यामुळे कोणत्याही अवजड यंत्रसामुग्रीशिवाय ती कोणीही करू शकेल.

श्री.अरविंद शिरोडे यांनी 'वातऊर्जेचे घरगुती उपयोग (विंड एनर्जी हाउलहोल्ड अप्लगकेशन्स)' या विषयावर केलेल्या भाषणात पवनचक्कीद्वारा विजेची निर्मिती करण्याबद्दल माहिती दिली. वा-याचा वेग कमीअधिक होत असतो, पण विजेचा दाब (व्होल्टेज) ठराविक मात्रेवर ठेवणे अत्यंत आवश्यक असते, त्याचप्रमाणे कामानुसार विजेचा प्रवाह (करंट) कमीजास्त प्रमाणात लागतो, पण वारा त्याच्या स्वतःच्या मर्जीनुसारच वाहतो. यामुळे उपलब्धता आणि आवश्यकता यांची सांगड घालणे या ऊर्जेच्या बाबतीत जवळजवळ अशक्य असते. त्यामुळे बॅटरीज, इन्व्हर्टर्स वगैरेंच्या सहाय्याने वातऊर्जेचा उपयोग करून घ्यावा लागतो. निदान भारतात तरी पावसाळा सोडल्यास एरवी रोज ठराविक काळ कडक ऊन असते. पण त्याच वेळी विजेची तेवढी गरज वाटत नसल्यामुळे सौरऊर्जेच्या बाबतीतदेखील या गोष्टी बहुतेक सगळ्या जागी काही प्रमाणात कराव्या लागतात.

या दोन्ही सत्रांमधील चर्चा ऐकतांना एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे आता खाजगी कंपन्या आणि सेवाभावी संस्था अपारंपरिक ऊर्जेकडे गंभीरपणे लक्ष देऊ लागल्या आहेत. यातून नफा मिळवणे हा खाजगी कंपन्यांचा उद्देश असतो आणि निदान 'ना नफा ना तोटा' या तत्वावर सेवाभावी संस्था चालवणे आवश्यक असते. त्यामुळे त्यांचे प्रयत्न व्यावहारिक (प्रॅक्टिकल) असण्याची अधिक शक्यता असते. पण अपारंपरिक ऊर्जेसंबंधीच्या प्रत्येक बाबतीत 'अनुदान', 'सहाय्य' किंवा 'कायद्यानुसार करावी लागणारी गोष्ट' अशा प्रकारचे उल्लेख येत होते. असल्या कुबड्यांवर या अपारंपरिक ऊर्जा अधिक काळ किंवा मोठ्या प्रमाणात उभ्या राहू शकणार नाहीत असे मला वाटते. सौर ऊर्जेपासून वीज तयार करण्यासाठी लागणारी सोलर पॅनेल्स किंवा पवनचक्कीमधील यंत्रसामुग्री यांचे उत्पादन करण्यासाठी आधी खूप ऊर्जा खर्च करावी लागते. ती ऊर्जा अन्य स्वस्त मार्गाने तयार करूनसुध्दा आपण स्वस्त दरात सौर किंवा वायुऊर्जा निर्माण करू शकत नसू तर त्याला फारसा अर्थ उरत नाही. फक्त सौर किंवा वातऊर्जेचाच वापर करून जर आपण त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री तयार करू शकलो आणि तिचा उपयोग करून मिळणारी वीज वाजवी भावात मिळाली तरच हा पर्याय ख-या अर्थाने स्वावलंबी म्हणता येईल आणि शाश्वत ठरेल. यासाठी तांत्रिक चमत्कार घडवून आणण्याची आवश्यकता दिसते.

जैवऊर्जा (बायोएनर्जी) या बाबतीत बरीच अधिक आशादायी वाटते. स्वयंपाकघरात होत असलेल्या ज्वलनाच्या पारंपरिक पध्दतींमध्ये सुधारणा करून त्यातून ऊर्जेची बचत करणे आणि प्रदूषण कमी करणे हे तर उपयुक्तच नव्हे तर अत्यंत आवश्यक आहे आणि ते शक्य होत आहे असे दिसते. युकॅलिप्टस किंवा सुबाबूळ ही जलद वाढणारी झाडे मोठ्या प्रमाणावर लावून आणि योजनाबध्द पध्दतीने त्यांची कापणी करून त्यापासून संततऊर्जा निर्माण करण्याची स्वप्ने वीस पंचवीस वर्षांपूर्वी पाहिली गेली होती. पण त्याबाबतीत निराशाच पदरी आली हा ताजा इतिहास आहे. त्यामुळे सुपीक जमीनीवर वृक्षांची लागवड करून त्यामधून ऊर्जा मिळवत राहण्याची कल्पना मला आजच्या घटकेला व्यवहार्य वाटत नाही. पण खनिज तेलाची उपलब्धता कमी होत गेली आणि त्याच्या किंमती अशाच वाढत गेल्या तर मात्र लवकरच जैवऊर्जा तुलनेने वाजवी भावात मिळू लागेल. यासाठी लागणारी सामुग्रीसुध्दा स्थानिक साधनांचा उपयोग करून स्वस्तात निर्माण करण्याचे यशस्वी प्रयत्न केले गेले आहेत असे भगीरथच्या उदाहरणावरून दिसले. टाकाऊ कच-याची विल्हेवाट लावण्याबरोबर त्यातून ऊर्जा निर्माण करणे तर नक्कीच लाभदायक आहे. त्याच्या मार्गात येणारे गैरतांत्रिक (नॉनटेक्निकल) अडथळे दूर करण्याची आवश्यकता आहे. यासाठी समाजाच्या प्रबोधनाची गरज आहे आणि ते करण्यासाठी उत्साही मंडळी पुढे येत आहेत असे आशादायक चित्र मला दिसले.

. . .. . . . . . .  . .  . . . . . . . . . . . . . . . .  . . . .


भाग ५

कार्यशाळेच्या दुसरे दिवशी म्हणजे २६ फेब्रूवारीच्या सकाळचा कार्यक्रम दोन तांत्रिक सत्रांमध्ये विभागला होता. ऊर्जाक्षेत्रात सध्या येत असलेल्या मुख्य अडचणींवर पहिल्या सत्रात चर्चा झाली. यात महावितरणचे श्री.जाधव, प्रयासचे श्री.चुणेकर, श्री.संदीप कुलकर्णी आणि श्री.आश्विन शेजवलकर यांनी प्रबंध सादर केले. आपल्याकडे विजेचा पुरवठा एकंदरीतच अपुरा आहेच, ज्या वेळी विजेला सर्वात जास्त मागणी (पीकलोड) असते तेंव्हा त्याचा फारच तुटवडा असल्यामुळे ती सर्व ग्राहकांना पुरवणे अशक्य असते. उपलब्ध असलेली वीज निरनिराळ्या ग्राहकांना आलटून पालटून दिली जाते. याला भारनियमन (लोडशोडिंग) असे भारदस्त नाव दिले गेले असले तरी त्यामुळे ज्यांना वीज मिळत नाही त्यांची प्रचंड पंचाईत व हानी होते. कारखान्यांमधील यंत्रे पूर्ण वेळ काम करू शकत नाहीत त्यामुले उत्पादनात घट येते. शेतीला वेळचे वेळी पाणी देता येत नाही. बहुतेक ठिकाणी ते रात्रीच्या अंधारातच देणे शक्य असते. त्या वेळी ते देणे अडचणीचे असते आणि वाया जाण्याचीही शक्यता असते. विजेचा दाब (व्होल्टेज) पुरेसा नसेल तर तिच्यावर चालणारी यंत्रे कार्यक्षम रीतीने चालत नाहीत किंवा लवकर बिघडतात.

आजच्या शहरी राहणीमानात विजेची चोवीस तास उपलब्धता गृहीत धरली आहे. घरांची बांधणी करतांना उजेड व वारा यांचा पुरेसा विचार केला जात नसल्यामुळे दिवसासुध्दा विजेचे दिवे लावावे लागतात आणि हवा खेळती राहण्यासाठी पंख्याची गरज पडते. नळाचे पाणी आधी पंपाने उंचावरील टाकीमध्ये चढवावे लागते. बहुमजली उत्तुंग इमारतीत वर रहायला छान वाटत असले तरी जिने चढणे व उतरणे नकोसे वाटते. त्यासाठी लिफ्टची गरज असते. रेफ्रिजरेटर आणि टेलिव्हिजनसारखी उपयुक्त किंवा मनोरंजनाची साधने विजेवर चालतात. घराघरांमधील पाटावरवंटा, उखळमुसळ वगैरेंची जागा मिक्सर ग्राइंडर किंवा फूडप्रोसेसरने घेतली आहे आणि बाथरूममधल्या गीजरने न्हाणीघरातल्या बंबाची हकालपट्टी केली आहे. वेळी अवेळी लोडशेडिंग झाल्यास ही सारी उपकरणे बंद पडतात. ती चालवायचीच असे ठरवले तर त्यासाठी पर्यायी विजेची व्यवस्था करावी लागते ती अतीशय महाग पडते.

मुळात भारनियमन करावेच लागणार नाही याची काळजी घ्यायची झाल्यास त्यासाठी विजेचा पुरवठा तरी वाढवावा लागेल (त्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न अपुरे पडत आहेत हे उघड आहे) किंवा विजेची मागणी कमी करावी लागेल. तसे करणे सर्वच दृष्टीने नक्कीच जास्त शहाणपणाचे आहे. ते करण्यासाठी उपलब्ध असलेल्या ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग करणे आवश्यक आहे. आज भारतात वापरली जाणारी बहुतेक सारी विजेची उपकरणे खूप जुन्या पध्दतीची आहेत. याहून जास्त कार्यक्षम असे एअर कंडीशनर, रेफ्रिजरेटर, पंखे वगैरे परदेशात तयार होऊ लागले आहेत, पण त्यांच्या किंमती जास्त आहेत. त्यामुळे त्या भारतात फारशा विकल्या जात नाहीत. काही प्रगत देशांमध्ये अकार्यक्षम वस्तू विकायला किंवा वापरायला परवानगीच मिळत नाही आणि दरमहा भरावे लागणारे विजेचे बिल कमी करण्याकडे बहुतेक सगळ्या ग्राहकांचे लक्ष असते. कदाचित आपल्याकडील घरगुती खर्चाच्या अंदाजपत्रकात अजून विजेच्या खर्चाचा हिस्सा फार महत्वाचा नसल्यामुळे वस्तू विकत घेतांना ग्राहक त्याचा विचार करत नसावा. दरमहा येणा-या खर्चापेक्षा वस्तूची किंमतच त्याला अधिक महत्वाची वाटते. देशामधील ऊर्जेचा वापर अधिकाधिक कार्यक्षम पध्दतीने करण्याच्या उद्देशाने ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशिएन्सी (बीईई) ही केंद्रीय संस्था स्थापन केली गेली असून ती या दृष्टीने चांगले काम करते आहे. पण त्याला यश मिळण्यासाठी ग्राहकांचे सहकार्य आवश्यक आहे. त्यासाठी प्रोत्साहन आणि दंड दोन्हींचा समावेश असलेले धोरण (कॅरट अँड स्टिक पॉलिसी) अंमलात आणावे लागेल. संख्येने कमी अशा काही मोठ्या कारखान्यांना ते लागू करणे शक्य आहे पण कोट्यावधी लहान लहान ग्राहकांना पकडणे कठीण आहे. या दृष्टीने प्रयत्न करण्याचे काही उपाय सुध्दा या सत्रात सुचवले गेले.

हाच धागा धरून ऊर्जा अक्षय्यता या विषयावर पुढील सत्रात चर्चा झाली. प्रा.कानेटकर, श्री.अमोल चिपळूणकर, श्री.निरंजन कोल्हे आणि श्री. पराग लकडे यांनी यात प्रबोधन केले. मुख्यतः ऊर्जेची बचत यावरच लक्ष केंद्रित करण्यात आले. सिमेंट, साखर, औषधे, रसायने वगैरेंच्या कारखान्यातील विविध प्रक्रिया उच्च तपमानावर होत असतात. ते तपमान निर्माण करण्यासाठी इंधन जाळले जाते. त्यातून बाहेर पडणारे ऊष्ण वायू धुराड्यामधून वातावरणात सोडले तर त्यांच्यात सामावलेली ऊर्जा वाया जाईलच, शिवाय त्यामुळे हवेचे प्रदूषणसुध्दा होईल. ते टाळण्यासाठी अनेक प्रकारच्या वेस्ट हीट रिकव्हरी सिस्टम्स या कारखान्यांमध्ये बसवल्या जातात. हे ऊष्ण वायू कशा प्रकारचे आहेत, त्यात धुराचे प्रमाण किती आहे वगैरे पाहून विशिष्ट प्रकारचे बॉयलर्स व हीट एक्स्चेंजर्स तयार केले जातात. ऊष्णता ही नेहमी अधिक तपमानाकडून कमी तपमानाकडेच वाहते. या तत्वानुसार या ऊष्णतेचा योग्य प्रकारे उपयोग केला जातो. उदाहरणार्थ बॉयलरमध्ये बाष्पीभवन करण्यासाठी पाठवले जाणारे पाणी आधीच तापवून घेतले तर त्याची वाफ करण्यासाठी बॉयलरमध्ये कमी ऊष्णता लागेल. कमी दाबाच्या वाफेचे उत्पादन, विजेची निर्मिती, रेफ्रिजरेशन इत्यादि अनेक प्रकारे ही ऊर्जा वापरली जाते. यामुळे कारखान्याची कार्यक्षमता वाढते आणि एकूण ऊर्जेचा खप कमी होतो.

आजकाल कोणताही कारखाना, कार्यालय, प्रयोगशाळा वगैरेचे शास्त्रशुध्द ऊर्जालेखापरीक्षण (एनर्जी ऑडिट) करता येते. हे करण्यासाठी अशा परीक्षकांच्या संघटना किंवा संस्था तयार झाल्या आहेत. बीईईतर्फे परीक्षा घेऊन या ऑडिटरांना प्रमाणपत्र दिले जाते. निवडक क्षेत्रासाठी हळूहळू हे परीक्षण आवश्यक केले जात आहे. नगरपालिकांचा पाणीपुरवठाविभाग, वीजनिर्मिती करणारी, तसेच विजेचे वितरण करणारी केंद्रे अशा काही ठिकाणीसुध्दा मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च होते. या सर्व जागांचे कसोशीने निरीक्षण केले आणि त्यात कुठे कुठे किती जास्तीची ऊर्जा खर्च होत आहे किंवा वाया जात आहे हे समजून घेतले तर त्यावर नियंत्रण करणे शक्य होते. यातल्या काही गोष्टी फक्त शिस्तबध्दपणे वागण्याने साध्य होऊ शकतात, काही गोष्टींसाठी किरकोळ स्वरूपाचे बदल करावे लागतात, तर काही गोष्टींसाठी मोठ्या सुधारणा कराव्या लागल्या तर त्यासाठी जास्तीचा खर्च करावा लागतो, कारखाना काही काळ बंद ठेवावा लागतो. ऑडिटरकडून या सर्वांचे विश्लेषण करून रिपोर्ट दिला जातो. आर्थिक लेखापरीक्षणात पैशाचा हिशेब पाहिला जातो, एनर्जीऑडिटमध्ये मुख्यतः तांत्रिक गोष्टी पाहिल्या जातात. उदाहरणार्थ पंपांची व विजेच्या मोटर्सची क्षमता आणि त्यांचा प्रत्यक्ष होणारा वापर, पाणी, वाफ किंवा हवा यांची गळती, धुराड्यावाटे बाहेर पडणा-या वायूंचे पृथक्करण, त्यातून इंधनाचे किती ज्वलन होत आहे याचा अंदाज वगैरे. आता याबाबत काही कायदे झाले आहेत. त्यानुसार लेखापरीक्षण करणे आणि त्यानुसार उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. मोटारगाड्यांनासुध्दा पीयूसी परीक्षण करून घ्यावे लागते. धूर ओकणारी वाहने चालत ठेवायला मनाई आहे. अशा प्रकारे ऊर्जेच्या गैरवापरावर नियंत्रणे आणली जात आहेत. युरोप अमेरिकेतील कायदे फारच कडक आहेत आणि त्यांची अंमलबजावमी उत्कृष्ट प्रकारे केली जाते. भारताला या बाबतीत अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

दुपारच्या सत्रात एक नवा प्रयोग करण्यात आला. घरगुती वापर, वीजनिर्मिती आणि वाहतूक यासाठी लागणा-या ऊर्जेसंबंधी विचारविनिमय करण्यासाठी तीन समूह बनवले गेले. प्रत्येक समूहात एक तज्ज्ञ मार्गदर्शक, प्राध्यापक किंवा प्राध्यापिका आणि बरेचसे विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा समावेश होता. त्यांनी निरनिराळ्या खोल्यांमध्ये बसून संबंधित विषयावर चर्चा केल्या. गेले दीड दिवस चाललेल्या व्याख्यानांचा विद्यार्थ्यांवर कितपत प्रभाव पडला याचा अंदाज आला असावा तसेच त्यांची थोडक्यात उजळणी झाली असणार. शिवाय काही नव्या कल्पनादेखील पुढे आल्या असतील. चहापानानंतर झालेल्या अखेरच्या सत्रात सर्व मंडळी पुन्हा सभागृहात एकत्र जमली. तीन्ही समूहातून एकेक प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी आपापल्या समूहात झालेल्या चर्चांचे अहवाल सादर केले. त्यानंतर मान्यवर मंडळींनी या कार्यशाळेचा आढावा घेतला. शिकलेले धडे लगेच विसरून जाऊ नयेत. आपापले घर, महाविद्यालय, वसतीगृह वगैरेंच्या परिसरात ऊर्जेची बचत आणि अपारंपारिक ऊर्जेचा उपयोग यावर प्रत्येकाने लक्ष द्यावे. प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी दरमहा किंवा शक्य तेंव्हा एकत्र येऊन त्यावर चर्चा कराव्यात आणि विज्ञान भारतीशी संपर्कात राहून त्यांच्या कार्याची माहिती देत रहावे. विज्ञान भारतीकडून त्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळतच राहील वगैरे सांगितले गेले.

पसायदानाने कार्यशाळेची सांगता झाली.

. . . . . . . . . . (समाप्त)

खुलासाः ही लेखमाला मला जेवढे समजले किंवा जेवढे माझ्या स्मरणात राहिले त्याची नोंद आहे. हा अधिकृत अहवाल नाही. मी विज्ञानभारती या संस्थेचा प्रतिनिधी नाही आणि या लेखमालेत व्यक्त केलेली मते माझी वैयक्तिक आहेत.

Thursday, February 16, 2012

माधवन नायर



दुसरे महायुध्द चालले असतांना मुंबईच्या रक्षणासाठी किंवा इथे बंडाळी झाली तर ती मोडून काढण्यासाठी ब्रिटिश सरकारने फौजेच्या काही तुकड्या तैनात केल्या होत्या आणि त्यांच्या राहण्यासाठी राहुट्या बांधल्या होत्या. बांद्र्याच्या बँडस्टँडजवळ अरबी समुद्रात घुसलेल्या जमीनीच्या एका लहानशा सुळक्यावर अशीच एक तात्पुरती छावणी उभारली होती. युध्द संपल्यानंतरही त्या झोपड्या (निसान हट्स) रिकाम्या पडलेल्या होत्या. अणुशक्ती विभागात प्रशिक्षण घेण्यासाठी येणा-या विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था त्यात केली गेली.

प्रशिक्षण प्रशालेमध्ये (ट्रेनिंग स्कूल) माझी निवड झाल्यावर मीही तिथे रहायला गेलो. आमच्या बॅचमध्ये काश्मीर ते केरळ आणि गुजरात ते आसामपर्यंत पसरलेल्या भारताच्या सर्व भागांमधून मुले आली होती. हजर होऊन नेमणूक पत्र आणि प्रमाणपत्रे वगैरे दाखवली की लगेच खोलीचा क्रमांक मिळत असे. ते आधीपासून ठरवले होते की क्रमानुसार जो जो येत गेला त्याला त्याला देत होते वगैरेची काही चौकशी न करता मिळालेल्या खोलीत मी जाऊन आपले सामान ठेवले. माझा सहरहिवासी (रूममेट) बंगाली होता. आजूबाजूच्या इतर खोल्यांमधूनसुध्दा निरनिराळ्या राज्यातून आलेल्या आणि निरनिराळ्या भाषा बोलणा-या मुलांच्याच जोड्या तयार झाल्या होत्या. मात्र आमच्या शेजारच्या एका खोलीत दोन्ही केरळीय मुले होती. ती थेट केरळपासून एकमेकांसोबत येऊन एकत्रच दाखल झाल्यामुळे आपोआप एका खोलीत आली होती की त्यांनी त्यासाठी मुद्दाम प्रयत्न केले होते कोण जाणे. त्या काळातले आमचे प्राचार्य केरळीय होते आणि त्या काळात मुंबईत सगळीकडेच मोठ्या संख्येने मल्याळी स्टेनो असायचे, तसे ते ट्रेनिंग स्कूलमध्येही असावेत. त्यामुळे कदाचित त्यांची मदत झाली असेल असे बोलले जात होते.
मराठी आणि कानडी या दोन भाषा मी लहानपणी घरातच शिकलो होतो, शालेय शिक्षणात हिंदी व इंग्रजी आल्या, सायन्स कॉलेजात असतांना मुख्यत्वे गुजराथी भाषिकांचा भरणा असलेल्या हॉस्टेलमध्ये राहिल्यामुळे ती भाषा अवगत झाली होती. इंजिनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये काही पंजाबी मुले होती, काही तामीळ किंवा तेलुगूभाषीसुध्दा होती. सत्यजित रे, मृणाल सेन वगैरेंचे बंगाली सिनेमे पाहणे ही त्या काळातली फॅशन असल्यामुळे त्या भाषेतले शब्द कानावर पडत होते. या सगळ्या भाषा समजत नसल्या तरी मला त्या ओळखता येत होत्या. मल्याळी भाषा मात्र मी पहिल्यांदा ऐकत होतो. आमच्या केरळी शेजा-यांकडे नेहमी त्यांचे आणखी काही मित्र येत आणि त्यांचे वाद, विवाद, संवाद वगैरे जोरजोराने चालत असे. लयबद्ध आणि सुरांना हेलकावे देत बोलली जाणारी ही भाषा ऐकायला मजेदार वाटत होती.

त्या दोघांपैकी उन्नीकृष्णकार्ता मेकॅनिकल इंजिनियरिंगच्या म्हणजे माझ्याच वर्गात होता आणि दुसरा माधवन नायर इलेक्ट्रिकल ब्रँचमध्ये होता. दोन्ही वर्गांना काही समाईक विषय होते, त्या क्लासला आम्ही एकत्र बसत असू. त्या काळात भारतात फारशी कारखानदारी नसल्यामुळे इंजिनियरांना कमी मागणी होती. परदेशी जाणे फार कठीण होते. अणुशक्तीखात्याचे जबरदस्त आकर्षण असल्यामुळे हजारोंनी अर्ज येत असत. त्यांच्यामधून निवडले गेलेले आमचे बहुतेक सगळेच ट्रेनी ए प्लस दर्जाचे होते. तरीसुध्दा प्रशिक्षण सुरू असतांना दर आठवड्यात होणा-या परीक्षांमध्ये त्यांना मिळणा-या मार्कांत खूप तफावत दिसत असे. फारच कमी गुण मिळवणा-या मुलांना एकादी ताकीद देऊन काढून टाकले जात असे. काही मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचे असे किंवा ही नोकरी करण्याची इच्छा नसे. बाँडमधून सुटका करून घेण्यासाठी अशी मुले मुद्दाम नापास होत असत. उन्नी आणि नायर हे दोघेही टॉप रँकिंगमध्येही येत नसत किंवा तळाशी जात नसत. वर्गाच्या सरासरीच्या जवळपास असत. ते दोघेही बोलण्यात स्मार्ट होते, पण अभ्यासावर फार जास्त मेहनत करण्याची त्यांना गरज वाटत नसावी.

ट्रेनिंग संपल्यावर प्रशिक्षणार्थींनी नियुक्तीसाठी विभाग निवडायचा असे आणि गुणवत्तेनुसार जो उपलब्ध असेल तो दिला जात असे. त्या वेळी तारापूर आणि रावतभाटा येथे अणुऊर्जाकेंद्रांच्या उभारणीचे काम सुरू झाले होते आणि त्यांचे बरेचसे काम मुंबईच्या हेडऑफीसमधून केले जात असे. प्रकल्पाच्या जागी किंवा मुख्य कार्यालयात नेमणूक होण्याची प्रत्येकाला इच्छा असे. थुंबा इक्विटोरियल रॉकेट लाँचिंग स्टेशन नावाची अणुशक्ती खात्याची एक लहानशी शाखा केरळमधील थुंबा नावाच्या गावात स्थापन होत होती. तिथे नेमके काय काम आहे याची कोणालाच कल्पना नव्हती. टेलीव्हिजन नसल्यामुळे वर्तमानपत्रे हाच माहिती मिळण्याचा एकमेव स्त्रोत होता आणि अग्निबाण, कृत्रिम उपग्रह वगैरेबद्दल कोणालाच विशेष माहिती नव्हती. अमेरिका, रशीया वगैरे देशातच असले काही काम चालते असे कधीतरी छापून आले तर आले. भारताकडे असल्या गोष्टी नव्हत्या. गरम वायूने भरलेले फुगे आभाळात उडवून विरळ वातावरणाचा अभ्यास करणे अशा प्रकारचे संशोधन त्या काळी थुंबा येथे चालते असे ऐकीवात होते. त्यामुळे कोणताही इंजिनियर तिथे जाण्यासाठी उत्सुक नव्हता. आमच्या केरळी मित्रांना काही खास माहिती समजली होती का हे माहीत नाही, पण घराशेजारी राहता येईल या उद्देशाने त्यांनी तिथे पोस्टिंग मागून घेतले. त्या काळात कोकण रेल्वे नव्हती आणि मुंबईहून केरळला जाणारी थेट रेल्वे गाडीसुध्दा नव्हती. मद्रास (चेन्नाई) मार्गे जावे लागत असे आणि चांगले दोन तीन दिवस प्रवासात जात. त्यामुळे त्यांना नोकरीसाठीच केरळला जाण्याचे किती आकर्षण वाटत असेल हे समजण्यासारखे होते.

त्यानंतरच्या काळात परिस्थिती आश्चर्यकारक झपाट्याने बदलत गेली. भारत सरकारचा स्वतंत्र अवकाश विभाग (डिपार्टमेंट ऑफ स्पेस) स्थापन झाला. स्पेस कमिशन अस्तित्वात आले आणि प्रचंड वेगाने त्याचा विस्तार झाला. माझे दोन्ही मित्र त्या विभागातल्या पहिल्या वहिल्या मोजक्या अधिकारीवर्गात असल्यामुळे जसजसा त्यांच्या खात्याचा विस्तार होत गेला तसतशी त्यांना एकाहून एक चांगली अधिकारीपदे मिळत गेली. अणुशक्ती खात्यात आम्ही रुजू होण्यापूर्वीच हजारावर माणसे होती. आम्हाला त्यांच्या मागेमागे राहूनच प्रवास करायचा होता. त्यांच्यातले जे लोक होमी भाभांच्या काळापासून होते त्यांचीसुध्दा अशीच झपाट्याने प्रगती होत गेली होती असे फक्त ऐकले होते. आम्हाला ती संधी मिळण्याची शक्यता नव्हती. तिकडे विक्रम साराभाई आणि सतीश धवन यांच्या अधिपत्याखाली नव्या अवकाश विभागाचा पाया घातला गेला आणि अब्दुल कलामसारख्यांचे सारथ्य मिळाल्यावर त्या इवल्याशा रोपाचा वेलू गगनावरी गेला. त्याबरोबर त्या वृक्षांच्या शीर्षस्थानावर असलेल्या व्यक्तींची उंची देखील वाढत गेली.

डिपार्टमेंट ऑफ स्पेस निराळे झाल्यानंतर आमचा त्याच्याशी कसलाही संपर्क राहिला नाही आणि तिकडे काय चालले आहे याबद्दल आम्ही अनभिज्ञ होतो. आमची नोकरी सुरू झाल्यानंतर पंधरासोळा वर्षांनी तिस-याच एका कारखान्यात अचानकपणे उन्नीकृष्णकार्ता भेटला. त्या वेळी मी माझ्या तिस-या बढतीची अजून अपेक्षा करत होतो. उन्नी आणि माधवन दोघांनाही चार चार प्रमोशन्स मिळून गेल्याचे त्याच्याकडून कळले आणि चाटच पडलो. माधवन तर एका संस्थेचा डायरेक्टर झाला होता असे त्याच्याकडून समजले. त्यांच्या प्रगतीच्या मार्गात तेच सर्वात पुढे असल्यामुळे जितक्या वेगाने त्यांना धावणे शक्य होते त्यानुसार तिचा वेग त्यांनीच ठरवायचा होता. या बाबतीत माधवनने आघाडी घेतली आणि सातत्याने ती सांभाळली. इस्रो आणि स्पेस कमिशनच्या अध्यक्षपदापर्यंत तो जाऊन पोचला आणि पद्मविभूषण पुरस्काराचा सन्मानही त्याला मिळाला. प्रशिक्षणाच्या काळात आमच्या शेजारच्या झोपडीत रहात असलेला हा आमच्यातलाच काहीसा अबोल आणि सामान्य वाटणारा मुलगा पुढे इतकी उंच भरारी घेणार आहे असे तेंव्हा कोणालाही वाटले नव्हते.

माधवन स्पेस कमिशनचा अध्यक्ष असतांनाच चंद्रयानाचे यशस्वी उड्डाण झाल्याने तो प्रखर अशा प्रकाशाच्या झोतात आला. त्याच्या सचित्र मुलाखती वर्तमानपत्रात आणि टेलीव्हिजनवर झळकू लागल्या. इतर व्हीआयपीजप्रमाणे तोसुध्दा जागोजागी व्याख्याने देऊ लागला, बक्षिससमारंभांमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून दिसू लागला. त्याचा उल्लेख ज्येष्ठ शास्त्रज्ञ असा होऊ लागला. हे वाचतांना गंमत वाटत असे आणि अभिमानसुध्दा वाटत असे.

काही दिवसांपूर्वी त्याचाही उल्लेख एका घोटाळ्याच्या संदर्भात आला. मग त्यावर त्याची आणि त्याच्यावर आरोप करणा-याची प्रतिक्रिया आली. त्या घोटाळ्याचे स्वरूप नीटपणे समजलेही नाही. त्यात अनियमितता दिसत असली तरी त्यामुळे कोणाला किती लाभ झाला असे काही छापून आले नाही. एका कंपनीबरोबर काही करार झाला होता, पण त्याची अंमलबजावणी न होताच तो रद्दबातल करण्यात आला असे काहीसे झाले असावे. स्पेस कमिशनच्या कारभारात सरकारी लाल फितीला अर्धचंद्र दिला आहे, निर्णयाची प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक केली आहे असे ऐकले होते. त्यांचे उदाहरण इतरांना दिले जात होते. त्या फास्ट ट्रॅक प्रक्रियेमध्ये कदाचित काही रूढ पध्दतींना फाटा दिला असेल आणि हेच नडले असेल अशीही शक्यता आहे. याबद्दल कसलीच माहिती नसल्यामुळे तर्क करण्यात अर्थ नाही. पण माधवनचा वर वर जात असलेला पतंग एका झटक्यात खाली कोसळला याचे वाईट वाटले. सरकारी कारभाराबद्दल तितकेसे चांगले जनमत नसले तरी अवकाश खात्याची प्रतिमा उज्ज्वल होती, ती मलीन झाल्याचे जास्तच खटकले.

Monday, February 13, 2012

तेथे कर माझे जुळती - १० श्री.दा.रा.खडके

एकोणीसशे सत्तरच्या सुमाराला देवनारजवळ अणुशक्तीनगर या वसाहतीची उभारणी सुरू झाली, तसेच मुंबई दूरदर्शनच्या प्रसारणाला सुरुवात झाली आणि अस्मादिकांचे शुभमंगल झाले. माझ्या जीवनावर सखोल प्रभाव करणा-या या तीन्ही गोष्टींचा एकमेकींशी काहीही संबंध नसला तरी त्यांचे जे एकत्रित चांगले परिणाम झाले त्यातूनच श्री.डी.आर.खडके या अफलातून गृहस्थाशी माझा परिचय झाला. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या ख्याल गायकीची विलंबित लयीमधील आलापांमधून होणारी सुरुवात नवख्यांसाठी कंटाळवाणी असते. त्यामुळे लग्नाच्या आधी मी सहसा त्या संगीताच्या वाटेला जात नसे. पण अलकाला संगीताची उपजतच विलक्षण आवड असल्यामुळे तिला शास्त्रीय संगीताचे जबरदस्त आकर्षण वाटते. मुंबई दूरदर्शनाच्या सुरुवातीच्या काळात पं.विजय राघव राव आणि सुहासिनी मुळगावकर हे निर्माते शास्त्रीय संगीताचे उत्तमोत्तम कार्यक्रम अत्यंत मनोरंजक पध्दतीने सादर करीत असत. ते सारे कार्यक्रम अलका न चुकता आणि तल्लीन होऊन पहात असे. त्यामुळे मलासुध्दा सूर, ताल, लय, राग वगैरेंची थोडी समज आली आणि शास्त्रीय संगीत ऐकण्यात गोडी निर्माण झाली. अणुशक्तीनगरमध्ये आम्ही रहायला गेलो त्या काळात के.एस.सोनी नावाचे एक सद्गृहस्थ तिथे रहात होते. त्यांनी स्वतःला शास्त्रीय संगीताच्या प्रसाराला वाहून घेतले होते. त्यात रुचि असणा-या लोकांना त्यांनी घरोघरी जाऊन शोधून काढले आणि त्यांना एकत्र आणून स्वरमंडल नावाची सार्वजनिक संस्था सुरू केली. थोडासा निधी गोळा करून आधी स्वतःच्या घरी आणि नंतर शाळेच्या हॉलमध्ये उदयोन्मुख गायक वादकांचे कार्यक्रम ठेवले. प्रतिष्ठित मंडळींना या कार्यक्रमाला आमंत्रित केले. एक उत्साही तरुण कार्यकर्ता म्हणून मी ही संगीताव्यतिरिक्त इतर किरकोळ कामे करून त्यात सहभाग घेत असे. अशाच एका कार्यक्रमात श्री.खडके हे सन्मान्य अतिथी म्हणून आले असतांना माझी त्यांच्याशी भेट झाली. ते एक रिटायर झालेले सी.आय.डी.चे मोठे अधिकारी आहेत आणि आता संगीताच्या क्षेत्रात त्यांचा दबदबा आहे एवढेच तेंव्हा समजले होते.

त्या काळातले नाट्यसंगीतामधले सुपरस्टार श्री.रामदास कामत हे सुध्दा पोलिस अधिकारी असल्याचे ऐकले होते. रंगभूमीवर मत्स्यगंधेला "नको विसरू संकेत मीलनाचा" असे म्हणत तिची आर्जवे करणे आणि "रेडच्या टायमाला फोर्स घेऊन तिथं पोचायचंच" असे हाताखालच्या अधिका-याला दरडावून सांगणे या दोन्ही गोष्टी ते करत असत. श्री.खडके यांचे नाव मात्र मी संगीत किंवा नाटकाच्या कार्यक्रमात किंवा टीव्हीवर कुठेच ऐकले नव्हते. कॉलेजचे शिक्षण घेत असतांना त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला होता, पण पोलिसखात्यात रुजू झाल्यानंतर सर्व लक्ष तिकडेच पुरवले. अनेक उत्तमोत्तम कामगि-या यशस्वी रीतीने बजावून पदोन्नती तसेच पदके मिळवली. त्यात इंडियन पोलिस पदक आणि राष्ट्रपती पदक यांचा समावेश आहे. खुद्द माननीय यशवंतराव चव्हाण आणि इंदिरा गांधी  यांच्याकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.
नोकरीच्या काळात संगीताची श्रवणभक्तीच करणे त्यांना शक्य होते, पण सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सारी कसर भरून काढली. पं.वामनराव सडोलीकर या जयपूर घराण्याच्या सुप्रसिध्द गायकांचे शिष्य होऊन बावीस वर्षे त्यांचे मार्गदर्शन घेतले. शंभर दीडशे श्रोत्यांसमोर शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम व्यवस्थितपणे सादर केला. पण गायक म्हणून मैफल गाजवणे हा त्यांचा उद्देश नव्हताच. शास्त्रीय संगीताचा स्वर्गीय आनंद स्वतः मिळवणे आणि अधिकाधिक लोकांना तो मिळवून देणे हे त्यांनी आपले जीवितकार्य ठरवले होते. चेंबूर येथील त्यांच्या राहत्या घराचा दिवाणखाना त्यांनी या कामासाठी उपयोगाला दिला. दर बुधवारी संध्याकाळी तिथे एक बैठक होत असे. कोणत्याही गायक किंवा वादकाने यावे आणि आपला कार्यक्रम त्यात सादर करावा अशी मुभा होती. असंख्य नवोदित कलाकारांना यामुळे एक मंच मिळाला. त्याशिवाय दर महिन्याच्या पहिल्या रविवारी एकाद्या मुरलेल्या कलाकाराला ते आमंत्रित करत असत आणि त्यांच्या गायन वादनाचा आस्वाद रसिक श्रोत्यांना घेता येत असे. हे सर्व पूर्णपणे निःशुल्क असे. कलाकाराला किंवा श्रोत्याला त्यासाठी मूल्य देण्याची आवश्यकता नसे.
जयपूर अत्रौली घराण्याचे मूळ पुरुष पै.अल्लादियाखाँ यांच्या पुण्यतिथीनिमित्य एक संगीत सभा भरवण्याचे खडके काकांनी १९७६ साली ठरवले आणि आतापर्यंत ३६ वर्षे हा उत्सव चालवला. सुरुवातीच्या काळात पं.वामनराव सडोलीकर आणि त्यांच्या कन्यका श्रुति यांच्या मुख्य आधारावर हा कार्यक्रम चालत असे. खडके काका दरवाज्यापाशी एका खुर्चीत बसून येणा-यांचे आगत स्वागत करताहेत आणि मंचावरील सर्व व्यवस्था, आयोजन, निवेदन वगैरे बाजू श्रुति समर्थपणे सांभाळते आहे असेच चित्र अनेक वर्षे मी पहात होतो. स्व.वामनराव आणि श्रुति यांचे गायन हा या उत्सवातला एक परमोच्च बिंदू असे. पुढे श्रुति सडोलीकर काटकर हिने संगीताच्या क्षेत्रात स्वतःचे असे खास आणि उच्च स्थान निर्माण केल्यानंतर तिला इतर कामांसाठी वेळ मिळणे कठीण होत गेले असणार. हळूहळू ती अदृष्य होत गेली. चेंबूर येथील बालविकास संघाच्या हॉलमध्ये गुढी पाडवा किंवा गुड फ्रायडे या सुमारास हा कार्यक्रम होत आला आहे. पहिली कित्येक वर्षे तो सलग चोवीस तास चालायचा. त्यामुळे दिवसाच्या आठही प्रहरांमधील रागांचा समावेश त्यात होत असे. कालांतराने सरकारी नियमांप्रमाणे तो वेळेत संपवणे आवश्यक झाले. हल्ली तो तीन दिवस संध्याकाळी आणि अखेरच्या (रविवारच्या) दिवशी सकाळी असा चार दिवस असतो. स्व.भीमसेन जोशी, स्व.कुमार गंधर्व, स्व.मल्लिकार्जुन मनसूर, स्व.गंगूबाई हंगल, पं.जसराज, श्रीमती किशोरी आमोणकर, श्री.यशवंत देव यासारख्या बहुतेक सर्व आजी माजी मोठ्या कलाकारांनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. हा कार्यक्रमसुध्दा विनामूल्य असतो. श्रोत्यांनी स्वेच्छा दिलेल्या देणग्या स्वीकारण्याची व्यवस्था असते. त्यातूनच पुरेसा निधी बहुधा जमत असावा. या समारंभातले कार्यक्रम इतक्या उच्च दर्जाचे असतात की ते ऐकल्यानंतर कोणाचाही हात खिशात जावा आणि सढळ हाताने देणगी दिली जावी असे होते. ज्या मोठ्या नामवंत कलाकारांना टाटा थिएटर किंवा नेहरू सेंटरसारख्या ठिकाणी खूप दुरून पहावे लागत असे अशा दिग्गजांच्या अगदी पुढ्यात बसून त्यांचे गायन ऐकण्याची संधी या महोत्सवात मिळाली.

दर वर्षी होणा-या अल्लादियाखाँ संगीत समारोहामध्ये श्री.खडके यांचे थोडा वेळ भाषण असे. श्रेष्ट भारतीय संगीत, महान संगीतकार, त्यांचे गुरू, कार्यक्रमात भाग घेणारे कलाकार, रसिक श्रोते वगैरेंचे गुणगान करून झाल्यानंतर ते आपले मनोगत व्यक्त करत असत. आता आपले वय झाल्यामुळे तरुण लोकांनी पुढे येऊन या कार्यक्रमाची धुरा सांभाळावी असे आवाहन त्यात असे. हे मी निदान वीस पंचवीस वर्षांपासून ऐकत आलो आहे. पण त्या काळापासूनसुध्दा सगळे तत्कालीन तरुण लोक आपल्या उदरनिर्वाहाच्या कामातच इतके गुरफटलेले असायचे की त्यांच्या प्रापंचिक कामासाठीसुध्दा वेळ काढणे त्यांना कठीण व्हायचे. उतार वयाकडे झुकलेले अनेक लोक सहाय्य करतांना दिसत, पण ते दीर्घ काळ टिकत नसावेत. खडके काकांच्या अपेक्षांची पूर्ती करणे सोपे नसणार. या समारोहाची कायम स्वरूपाची काही व्यवस्था खडके काका करू शकले की नाही याबद्दल संदिग्धताच राहिली.

त्यांनी वयाची नव्वद वर्षे पूर्ण केली त्यावेळी त्यांचा सातारा या त्यांच्या गावी जाहीर सत्कार केला गेला होता, त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी त्यांच्या लहानपणात घडलेल्या अनेक गोष्टींबद्दल सविस्तर सांगितले होते. अखेरपर्यंत त्यांची स्मरणशक्ती चांगली होती. नोकरी आणि कार्य या निमित्याने असंख्य माणसे त्यांच्या सहवासात आली असतील. तरीही समोरच्या माणसाची ओळख पटताच ते त्याच्याशी सुसंगत असे बोलत असत. काही महिन्यांपूर्वीच माझ्या एका मित्राच्या घरी झालेल्या संगीताच्या बैठकीला ते आले होते. वयोमानानुसार आलेला अशक्तपणा आणि मंद झालेली दृष्टी यामुळे कोणाच्या आधाराची शारीरीक गरज त्यांना भासत होती, पण त्या जोरावर ते हिंडत फिरत होते, तसेच सर्वांबरोबर बोलत होते. मागल्या वर्षीपर्यंत ते अल्लादियाखाँ पुण्यतिथी समारंभात उपस्थित होऊन शक्य तेवढा सहभाग घेतच होते. त्यामुळे ते शऱदांचे शतक झळकवणार असे वाटले होते. पण तसे झाले नाही. ते आम्हाला सोडून गेल्याची बातमी अचानक येऊन थडकली. त्यांच्या स्मृतीला शतशः प्रणाम.





Thursday, February 02, 2012

मदत

आजकाल आपण आपली बहुतेक सगळी महत्वाची कामे कोणा ना कोणाच्या सहाय्याने करत असतो. इतर लोकांनी त्यांची स्वतःची गरज, कर्तव्य किंवा त्यांना मिळणारा लाभ वगैरे गोष्टी पाहून आपल्याला सहाय्य करणे काही वेळा अपेक्षितच असते, त्यामुळे त्याचे विशेष वाटतही नाही. आधी आवळा देऊन पुढे कोहळा काढायचा किंवा परोपकार करून पुण्यसंचय आणि पापक्षालन करायचा हेतू काही लोकांच्या मनात असतो. कोणालाही मदत करतांना त्या माणसाचा आपल्याला काही उपयोग आहे का असा विचार बहुतेक लोक करतात. तशा प्रकारे केलेली मदत ही एका प्रकारची गुंतवणूक (इन्व्हेस्टमेंट) असते, त्यातून पुढे मागे काही फायदा मिळण्याची शक्यता असते. एकाद्या माणसाने केलेल्या मदतीची लगेच दुस-या रूपात परतफेड मागितली तर तो सौदा ठरतो. या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन निव्वळ माणुसकीच्य़ा भावनेनेसुध्दा इतरांना मदत करणारेसुध्दा अनेक लोक आढळतात. किंबहुना सगळेच लोक ते करत असतात. आपण दुस-याला मदत केली, तर तो तिस-याला, तो चौथ्याला अशी साखळी निर्माण होऊन एक चांगले सामाजिक वातावरण निर्माण होते आणि वेळप्रसंगी त्याचा आपल्यालासुध्दा फायदा होतो अशी मनोधारणा त्याच्या मागे असते. हे माणसांच्या अंतःप्रेरणेमधून घडते की त्यांच्यावर झालेल्या संस्कारामुळे याबद्दल नक्की सांगता येणार नाही. पण त्यामुळे त्यांना जमेल तेवढे ते दुस-यांच्यासाठी करत असतात. सहाय्य किंवा मदत या शब्दांचा आर्थिक आधार असा संकुचित अर्थ यात अभिप्रेत नाही. इतर अगणित प्रकारे आपण इतरांच्या उपयोगी पडू शकतो आणि पडतही असतो. दुस-याच्या कामाला हातभार लावणे, त्याला आवश्यक किंवा महत्वाची माहिती देणे, न समजलेले समजावून सांगणे वगैरेंपासून त्याला फक्त सोबत करणे किंवा त्याचे बोलणे ऐकून घेऊन त्याला आपले मन मोकळे करून देणे अशासारख्या लहान लहान गोष्टींची त्याला मदत होते.

व्यक्तीगत जीवन आणि व्यावसायिक जीवन यांना वेगळे ठेवावे आणि एकाचा उपसर्ग दुस-याला होऊ देवू नये असे बिझिनेस स्कूल्समध्ये शिकवले जाते. आपली व्यक्तीगत सुखदुःखे, राग, लोभ, चिंता वगैरेंचा परिणाम व्यावसायिक जीवनात घेतल्या जाणा-या निर्णयांवर होता कामा नये आणि ते घेतांना दया-माया, प्रेम-द्वेष वगैरेंना थारा न देता वस्तुनिष्ट विचार करायचा असतो. अर्थातच कामाच्या निमित्याने भेटणा-या माणसांशी कामापुरतेच संबंध ठेवायचे असतात. त्यांच्यात गुंतायचे नसते. पण प्रत्यक्षात मनाचे दरवाजे असे पाहिजे तेंव्हा उघडता किंवा मिटता येत नाहीत. निदान मला तरी तसे जमले नाही. ऑफीसात इतर चकाट्या पिटायच्या नाहीत हे पथ्य जरी मी कसोशीने पाळायचा प्रयत्न केला असला तरी न बोलून दाखवता सुध्दा आपुलकीचे बंध निर्माण होतच राहिले आणि निरोपसमारंभाच्या भाषणानंतर ते काही एकदम तुटले नाहीत. पूर्वी रोज भेटणारी माणसे भेटण्याची जागाच त्यानंतर राहिली नाही आणि एकंदरीतच त्यांच्या भेटीगाठी कमी कमी होत गेल्या, तसतसे ते बंध विरत गेले. माझ्या आधीपासून ऑफीसात असलेले ज्येष्ठ सहकारी तर आधीच सेवा निवृत्त झाले होते, माझ्या बरोबरीचे तसेच कनिष्ठ सहकारीसुध्दा एक एक करून निवृत्त झाले. माझ्याबरोबर प्रत्यक्ष काम करणारे कोणीच शिल्लक उरले नव्हते. त्यांच्या पुढच्या पिढीकडे सारी सूत्रे गेली होती आणि माझा त्यांच्याशी कधीच थेट संपर्क जुळला नव्हता. आमच्या बरोबर एका वसाहतीमध्ये राहणारे लोक पांगत गेले होते, कोणी दूरच्या उपनगरात रहायला गेले, कोणी परगावी किंवा परदेशी गेले आणि काही परलोकवासी झाले. टेलीफोन आणि इंटरनेटमुळे संपर्क साधणे शक्य असूनसुध्दा सगळेच जण संपर्कात राहिले नाहीत. जे ऑफीसात होत होते तेच काही प्रमाणात व्यक्तीगत जीवनातसुध्दा घडत गेले. मागली पिढी काळाआड गेली, पुढच्या पिढीमधील अनेक मंडळी परप्रांतात किंवा परदेशात चालली गेली आणि मुंबईत राहणा-या निकटच्या आप्तांची संख्या रोडावत गेली.

मागच्या आठवड्यात अलकाला बरे वाटत नव्हते म्हणून आमच्या इस्पितळाच्या बाह्यरुग्ण विभागात घेऊन गेलो. काही तपासणी करून झाल्यावर तिला उपचारासाठी अतिदक्षताविभागात (आयसीयू मध्ये) दाखल करावे लागले. पूर्वी केलेल्या काही चांचण्यांचे रिपोर्ट्स डॉक्टरांना हवे होते, पण ते घरी ठेवलेले होते. घरी जाऊन ते घेऊन येण्यासाठी निदान दोन तास वेळ लागला असता, पण आयसीयू मध्ये पेशंट असला तर त्याच्या जवळच्या आप्ताने बाहेर थांबणेही आवश्यक असते. या दोन्ही गोष्टींचा मेळ कसा घालायचा? आमच्या घरात त्यावेळी तिसरे कोणी नव्हतेच. बोलावल्याबरोबर पटकन येऊ शकेल असे जवळ राहणारेही कोणी नव्हते. त्यामुळे जवळ राहणा-या अलकाच्या दोन मैत्रिणींना विचारले. त्या तयार झाल्या आणि त्यातली एक लगेच धावत आली. तिच्याशी बोलून मी घरी जायच्या तयारीत होतो, तेवढ्यात दुरूनच मला पाहून एक जुना मित्र प्रसाद तिथे आला. तोसुध्दा नुकताच निवृत्त होऊन खारघरला रहायला गेला होता, शिवाय त्याची नव्वदीला आलेली आई त्याच्याकडे असल्यामुळे तिची काळजी घेण्यासाठी तिच्यासोबत राहणे त्याला आवश्यक होते. त्यामुळे इच्छा असूनसुध्दा मला मदत करणे त्या वेळी त्याला शक्य नव्हते.

"रात्री काय करणार आहेस?" या त्याच्या प्रश्नावर माझ्याकडे उत्तर नव्हते. दिवसभराच्या दगदगीनंतर मीसुध्दा थकून गेलो होतो आणि रात्रभर थांबून राहण्याएवढे त्राण आणणे मला कठीण होते. पण रिपोर्ट्स आणून दिल्यानंतरच मी त्यासाठी काही करू शकत होतो, ते सुध्दा हॉस्पिटलमध्येच राहून फोनवरच करायला हवे होते, त्यासाठी कोणाला जाऊन प्रत्यक्ष भेटणेही मला शक्य नव्हते. "तोपर्यंत मी थोडे प्रयत्न करतो" असे सांगून प्रसाद त्याच्या घराकडे गेला. तो नुकताच सेवानिवृत्त झालेला असल्यामुळे या वेळी ऑफीसात कोणत्या हुद्द्यावर कोण आहे हे त्याला ठाऊक होते. एक दोघांशी फोनवरच बोलून मला मदत हवी असल्याचे त्याने त्या मित्रांना सांगितले.
रिपोर्ट्स घेऊन मी हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत भरत, जयपाल आणि त्यागी तिथे हजर होते आणि माझी वाट पहात उभे होते. तीघेही मला दहा ते पंधरा वर्षांनी कनिष्ठ असल्यामुळे ते कधीच माझ्या थेट संपर्कात आले नसले तरी कामाची चर्चा करतांना त्यात सहभागी होत होते. तेवढ्या सहवासामध्ये त्यांनी जे काही अनुभवले असेल आणि त्यांच्या वरिष्ठांकडून माझ्याबद्दल जे ऐकले असेल तेवढाच आमच्यातला दुवा होता. पण त्यांनी अत्यंत आपुलकीने अलकाची आणि माझी विचारपूस केली आणि मला स्वतःला विश्रांती घेणेसुध्दा किती आवश्यक आहे हे सांगितले. हॉस्पिटलजवळच वसाहतीत राहणा-या एका आप्तांकडे मी जाऊन झोप घ्यायची आणि भरतच्या खात्यातला कोणी युवक येऊन त्याने रात्रभर माझ्याऐवजी हॉस्पिटलमध्ये राहायचे असे ठरले. अलकाची प्रकृती तशी ठीकच असल्यामुळे रात्री कसली गरज पडायची शक्यता नव्हतीच, पण तशी वेळ आलीच तर हॉस्पिटलमध्ये राहणारा मला लगेच बोलावून आणू शकत होता. भरत आणि त्याच्या साथीदारांनी तिथल्या तिथे एकमेकांशी बोलून नितिनकुमारची निवड केली आणि त्याला बोलावून घेतले. मी सेवा निवृत्त होऊन गेल्यानंतर तो नोकरीला लागला होता. त्यामुळे आम्ही कधी एकमेकांना पाहिलेसुध्दा नव्हते. पण भरतने सांगताच यत्किंचित कुरकुर न करता किंवा आढेवेढे न घेता यावेळी तो माझ्या मदतीला आला. आम्ही दोघांनी एकमेकांचे मोबाईल फोन नंबर घेतले आणि हॉस्पिटलमध्ये भेटायची वेळ ठरवली.
ठरलेल्या वेळी नितिन तयारी करून आला आणि रात्रभर हॉस्पिटलमध्ये बसून राहिला. रात्रभर झोप झाल्याने ताजे तवाने होऊन सकाळी मी हॉस्पिटलला गेलो. नितिनचे आभार मानून त्याला मोकळे केले आणि घरी पाठवून दिले. पुढे दिवसभर मी हॉस्पिटलमध्ये राहिलो होतो, पण इतर कोणी कोणी मध्ये येऊन मला सोबत करत किंवा थोडा वेळ सुटी देत राहिले. पुण्याहून उदय यायला निघाला होता, पण त्याला काही अनपेक्षित अडचणी आल्या. तोपर्यंत दुसरी रात्र आली. भरत माझ्या संपर्कात होताच. त्याने दुस-या रात्रीची व्यवस्थासुध्दा केली. नितिनच्याच वयाचा, त्याच्याप्रमाणेच माझी ओळख नसलेला संदीप त्या रात्री आला आणि रात्रभर हॉस्पिटलमध्ये माझ्यासाठी बसून राहिला. तिसरे दिवशी सकाळी उदय येऊन पोचल्यानंतर आम्हाला बाहेरच्यांच्या मदतीची आवश्यकता उरली नाही.
पण जेंव्हा मला मदतीची आवश्यकता होती आणि ती कोठून मिळेल हे देखील ठाऊक नव्हते, तेंव्हा दोन अनोळखी तरुण पुढे आले आणि कसलाही आविर्भाव न आणता मला हवी असलेली मदत करून गेले हे विशेष!