Friday, September 10, 2010

हरतालिका

आज हरतालिका किंवा बोलीभाषेत हरताळका आहे. देवीची पूजा तिच्या अनेक रूपात केली जाते, विशेषतः काली, दुर्गा, चामुंडा आदि रूपांमध्ये ती दुष्टांचा नाश करतांना दिसते, तर लक्ष्मीच्या रूपात सुखसंपत्ती देणारी आणि सरस्वती किंवा शारदेच्या रूपात ती विद्यादायिनी किंवा कलेची अधिष्ठात्री असते. या इतर रूपांमध्ये स्त्री व पुरुष दोघेही तिची आराधना करतात, पण हरताळका, मंगळागौर वगैरे कांही व्रते मात्र खास स्त्रीवर्गासाठी राखून ठेवल्या आहेत. त्यात त्यांचेसाठी १०० टक्के आरक्षण असते. अविवाहित मुली आपल्या मनासारखा वर मिळावा म्हणून हे व्रत करतात आणि विवाहित स्त्रिया मिळालेला नवरा सोबत रहावा म्हणून ती चालू ठेवतात. या दिवशी देवी पार्वतीची पूजा कराय़चे मुख्य कारण म्हणजे तिने अशी मनोकामना धरली आणि ती पूर्ण करून दाखवली. त्यामुळे तिचे वरदान मिळाल्यावर आपली इच्छा पूर्ण करायला ती मदत करेल अशी अपेक्षा धरणे साहजीक आहे.

कन्या वरयते रूपम् माता वित्तम् पिता श्रुतिम् असे एक सुभाषित आहे. आपल्या मुलीला कसली ददात पडू नये या दृष्टीने विचार करता तिचा नवरा गडगंज श्रीमंत असावा असे तिच्या आईला वाटते, तर त्या माणसाचा नावलौकिक चांगला असावा अशी मुलीच्या बापाची इच्छा असते. कन्येला मात्र या दोन्हीपेक्षा रूपाचे महत्व जास्त वाटते. पार्वतीच्या बाबतीत असेच दिसते. तिच्या पहिल्या जन्मात दक्ष राजा तिचा पिता होता आणि दुस-या जन्मात नगाधिराज हिमालय. आपल्या मुलीला धनवान आणि सामर्थ्यवान पती मिळवून देणे या दोघांनाही सहज शक्य होते आणि तसा प्रयत्न ते करत होते. पण उमा व पार्वती यांना मात्र शंकराशीच लग्न करायचे होते. तो कसा होता?
उसकी निशानी वो भोला-भाला, उसके गले में सर्पों की माला ।
वो कई हैं जिसके रूप, कहीं छाँव कहीं धूप, तेरा साजन है या बहुरूपिया
आणि
घोड़ा न हाथी करे बैल सवारी, कैलाश परवत का वो तो जोगी, अच्छा वही दर-दर का भिखारी

असा विचित्र वर तिला पिया म्हणून हवा हवासा वाटत होता. आणि आधी हे प्रेम एकतर्फीच होते. शंकराची प्राप्ती व्हावी यासाठी पार्वतीने तपश्चर्या केली. स्व.शांता शेळके यांच्या शब्दात सांगायचे झाले तर
भस्मविलेपित रूप साजिरे । आणुनिया चिंतनी, अपर्णा तप करिते काननी !।
वैभवभूषित वैकुंठेश्वर । तिच्या पित्याने योजियला वर । भोळा शंकर परी, उमेच्या भरलासे लोचनी ।।
त्रिशूल डमरू पिनाकपाणी । चंद्रकला शिरि सर्प गळ्यातुनि । युगायुगांचा भणंग जोगी, तोच आवडे मनी ।।
कोमल सुंदर हिमनगदुहिता । हिमाचलावर तप आचरिता । आगीमधुनी फूल कोवळे, फुलवी रात्रंदिनी ।।

तपश्चर्येने शंकर बधला नाही हे पाहून तिने भिल्लिणीचे रूप घेऊन त्याचे मन मोहून घेतले. हा देखील तपश्चर्येचाच एक भाग म्हणता येईल. त्यानंतर मात्र शिव आणि शक्ती यांचे मीलन झाले.

उमेच्या रूपात लग्न झाल्यानंतर ती माहेराला दुरावली होती. दक्ष राजाने एक मोठा यज्ञ केला त्यासाठी विश्वातल्या सर्व लहान मोठ्या लोकांना आमंत्रण दिले पण शंकराला दिले नाही. तरीसुध्दा माहेरच्या ओढीने तिने आपणहून तिथे जायचे ठरवले. पण अपेक्षेसारखे तिचे स्वागत झाले नाही, तिच्या नव-याचा अनादराने उल्लेख केला गेला. ही गोष्ट त्या मानिनीला सहन झाली नाही आणि तिने यज्ञाच्या कुंडात स्वतःची आहुती दिली. स्व.ग.दि.माडगूळकरांनी या प्रसंगाचे सुंदर वर्णन केले आहे.
मानभंग हाचि झाला मंडपी आहेर । उमा म्हणे, यज्ञी माझे जळाले माहेर ।।
माहेरीच्या सोहळ्यात, नाहि निमंत्रिले जामात । चहू दिशी चालू होते संपदेचे थेर ।।
लक्ष्मीचे जमले दास, पुसे कोण वैराग्यास । लेक पोटीचीही झाली कोप-यात केर ।।
आई-बाप, बंधु-बहिणी, दारिद्र्यात नसते कोणी । दीन दानतीचे सारे धनाचे कुबेर ।।
दक्षसुता जळली मेली, नवे रूप आता ल्याली । पित्याघरी झाला ऐसा, दिव्य पाहुणेर ।।
परत सासु-याशी जाता, तोंड कसे दावू नाथा । बोल ईश्वराचे झाले सत्य की अखेर ।।
प्राणनाथ करिती वास, स्वर्गतुल्य तो कैलास । नाचतात सिद्धी तेथे, धरूनिया फेर ।।
असो स्मशानी की रानी, पतीगृही पत्‍नी राणी । महावस्त्र तेथे होते सतीचे जुनेर ।।

या दोन्ही काव्यांमध्ये पौराणिक कथेतला दृष्टांत देऊन त्याची आधुनिक काळातल्या गोष्टींबरोबर सुरेख सांगड घातली आहे.

1 comment:

Anagha said...

हे खरं तर लहानपणी वाचलं होतं...आणि आत्तापर्यंत विस्मृतीत गेलं होतं. पुन्हा वाचताना आठवणींना उजाळा मिळाला.....धन्यवाद.