Wednesday, September 08, 2010

मराठी मातृदिनकाल सहज कॅलेंडर पहात असतांना दिसले की कालचा दिवस 'मातृदिन' होता. ते पाहून मला जरासे आश्चर्यच वाटले. तीन महिन्यापूर्वीच 'मदर्स डे' येऊन गेला होता. काही मुलांनी त्या दिवशी त्यांच्या मातांना भेटकार्डे पाठवली होती, तर कोणी आपल्या माताश्रींना घेऊन मॉल्समध्ये गेले होते आणि त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीच्या लिपस्टिक्स, क्रीम्स आदि सौंदर्यप्रसाधने त्यांना घेऊन दिली होती, कांही आयांनी तिथल्या रेस्तराँमध्ये आपल्या आवडत्या पदार्थांची खादाडी करून घेतली होती. मी ही त्या दिवसाच्या निमित्याने या ठिकाणी एक लेख लिहून मातांची महती सांगितली होती. आता लगेच पुन्हा कसा मातृदिन आला असा प्रश्न मला पडला. अर्थातच हा भारतीय किंवा मराठी संस्कृतीतला सण असणार हे उघड होते.

माझ्या आठवणीत तरी हा सण साजरा केलेला मला आठवत नव्हता. लहान असतो तर मी हा प्रश्न माझ्या आईला विचारला असता आणि तिने नक्की त्याचे उत्तर दिले असते. सणवार, व्रतेवैकल्ये या बाबतीत ती तर चालका बोलता ज्ञानकोष होती. सगळ्या कहाण्या तिला तोंडपाठ होत्या. तरीसुध्दा दर वर्षी श्रावण महिन्यात रोज संध्याकाळी घरातल्या मुलांना एकत्र बसवून त्या त्या दिवसाची किंवा तिथीची कहाणी मोठ्याने वाचायला ती सांगत असे आणि स्वतः शेजारी बसून भक्तीभावाने त्या ऐकत असे. वाचणा-या मुलाने चूक केली तर ती लगेच दाखवूनही देत असे. पण मला तरी कधी मातृदिनाची कहाणी वाचल्याचे आठवत नव्हते. संध्याकाळी टीव्ही पहातांना त्यातल्या एका मालिकेत पिठोरी अमावास्येचे व्रत करतांना दाखवले. आपल्या मुलांना उदंड आयुष्य लाभो या इच्छेने माता हे व्रत करतात एवढे त्यातून समजले. कधी कधी मनोरंजनातूनही ज्ञानात भर पडते असे म्हणतात ते यासाठीच.

आईला विचारण्याची सोय आता उपलब्ध नसल्यामुळे गुगलवर शोध घेऊन पाहिले. मातृदिन आणि पिठोरी अमावास्येसंबंधी त्रोटक माहिती मिळाली. आपण मदर्स डे ऐवजी मातृदिन का साजरा करू नये असा प्रश्नसुध्दा एका अनुदिनी लेखकाने विचारला होता. पिठोरी अमावस्येचे व्रत माता आपल्या मुलांसाठी करतात आणि मदर्स डे हा दिवस मुले त्यांच्या मातांसाठी साजरी करतात हा फरक त्याच्या लक्षात आला नसावा. "फादर्स डे आणि मदर्स डे करून जीवंतपणीच आपल्या आईबापांचे कसते दिवस घालता?" असा प्रश्न मकरंद अनासपुरे एका चित्रपटात आपल्या इंग्रजाळलेल्या मित्रांना विचारतो ते ही आठवले.

या मराठी मातृदिनाच्या दिवशी माता पिठोरी अमावस्येचे व्रत करतात. त्या दिवशी दिवसभर उपवास करून संध्याकाळी आठ कलशांवर आठ मातृका (देवीची रूपे) ठेऊन त्यांची आणि चौसष्ठ योगिनींची पूजा करतात आणि आपले सौभाग्य आणि विशेषतः मुलांसाठी आयुरारोग्य, सुखसंपत्ती वगैरे मागून त्यांच्यासाठी प्रार्थना करतात. व्रतासाठी केलेले पक्वान्न म्हणजे बहुधा पु-या डोक्‍यावर घेऊन "कोण अतिथी आहे काय?' असे विचारतात. एकेक मुलांनी मागून येऊन उत्तर द्यायचे. "मी आहे." आणि एक पुरी घ्यायची. अखेर आईने त्या सगळ्या मुलांना पक्वान्ने खायला घालायची. पूर्वी पूजेच्या मूर्ती पिठाच्या करीत सध्या तशी चित्रे मिळतात. या दिवशी नैवेद्यासाठी सगळी पिठाची पक्वान्ने बनवतात म्हणून या दिवसाला "पिठोरी अमावस्या' असे नाव पडले असणार.

पुराणकाळात एका स्त्रीला दरवर्षी श्रावण अमावास्येला एक मूल होत असे आणि लगेच ते मरून जात असे. त्याच दिवशी तिच्या आजे सास-याचे श्राध्द असे पण श्राध्दाला आलेले भटजी उपाशीच निघून जात असत. असे ओळीवार सात वर्षे झाल्यानंतर त्या स्त्रीच्या सास-याने तिला तिच्या नवजात अर्भकाच्या शवासकट घरातून हाकलून दिले. निराधार होऊन मरण्यासाठी ती बाई अरण्यात जाते. त्या निराश स्त्रीला रानात चौसष्ट योगिनी भेटल्या. तिने त्यांना आपले दुःख सांगितल्यावर "तुझी-मुले जगतील' असा योगिनींनी वर दिला. त्या वरामुळे त्या स्त्रीचे सर्व मुलगे जिवंत झाले. मग त्या स्त्रीने आपल्या पुत्रांसह घरी जाऊन चौसष्ट योगिनींची पूजा केली. अशी या व्रताची कथा आहे.

ज्ञात असलेली बहुतेक सगळ्या प्रकारची व्रते करणारी माझी आई हे व्रत का करत नव्हती असा विचार माझ्या मनात आला आणि त्याचे उत्तरही मिळाले. ज्यांची मुले जगत नाहीत अशा स्त्रिया पिठोरीचे व्रत करतात. सर्व स्त्रियांनी केलेच पाहिजे असे हे व्रत नाही. ज्यांची संतती जगत नाही, अशाच स्त्रियांनी हे व्रत करावे. आमच्या घरी हा प्रॉब्लेम नसल्यामुळे हे व्रत कधी झाले नाही.

यासंबंधी अधिक माहिती गूगलवर आणि खालील स्थळांवर मिळेल.
http://marathiakanksha.blogspot.com/2010/08/blog-post_18.html
http://www.khapre.org/portal/url/mr/sahitya/katha/pauranik/04/z71224225355(कहाणी.पिठोरीची).aspx

1 comment:

Meenal Gadre. said...

काका, तूमचा नातू खूपच गोड आहे. आणि परफेक्ट ‘घारे‘ सुध्दा!!