Friday, April 02, 2010

गुरुशिष्यसंवाद (उत्तरार्ध) -२

गुरू : रोजच्या आहारातल्या कांही गोष्टी आपली आवडनिवड आणि सोय पाहून मानव ठरवतो आणि कांही परमेश्वर किंवा निसर्गाने ठरवून ठेवलेल्या असतात हे आपण पाहिले. आता त्यांचे स्वरूप पाहू. तू कधीकधी घराबाहेर काही तरी खात असशीलच.
शिष्य : हो. रुचीपालटासाठी आम्ही उपाहारगृहांना भेट देत असतो.
गुरू : तिथे कांही वेगळे पदार्थ खात असाल.
शिष्य : अर्थातच.
गुरू : तू कधी परगावी जात असशीलच.
शिष्य : आमच्या शिबीरांना उपस्थित राहण्यासाठी परप्रांतातसुध्दा जात असतो.
गुरू : त्या स्थानी तुला कुठल्या प्रकारचे अन्न मिळते?
शिष्य : तिथल्या स्थानिक पध्दतीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आमच्या जेवणात असतात.
गुरू : तुझ्या लहानपणी खाल्लेले कांही विशेष पदार्थ तुला आठवत असतील.
शिष्य : हो. आजोळी गेल्यावर आमची आजी खास कोकणातले कांही छान पदार्थ करून खायला घालत असे. आता ते मिळणे दुर्मिळ झाले आहे.
गुरू : तेंव्हा प्रचारात नसलेले कांही नवीन पदार्थ तू आता पाहिले असशील.
शिष्य : ते तर उदंड झाले आहेत. इंग्रज लोक फक्त पावबिस्किटे मागे सोडून गेले होते, आता पिझ्झा, बर्गर, पाश्ता, मॅकरोनी .... असल्या पदार्थांनी नुसता उच्छाद मांडला आहे. कांही विचारू नका. आपले कट्टर शत्रू म्हणजे जे चिनी, त्यांची नूडल्स आणि मांचूरियन सुध्दा लोक मिटक्या मारून खायला लागले आहेत. स्वाभिमान म्हणून कांही उरलेलाच नाही.....
गुरू : त्यांचा देशद्रोह थोडा वेळ बाजूला ठेवू. जगाच्या वेगवेगळ्या भागात राहणारे लोक वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खातात असेच दिसते नाही का?
शिष्य : हो.
गुरू : देश तसा वेष अशी म्हणसुध्दा आहे, शिवाय लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात. या सगळ्या गोष्टी माणसांनी केलेल्या असल्यामुळे स्थान आणि काल यांच्याबरोबर त्या बदलत असतात. माणसांनी केलेले नियम, कायदे वगैरे गोष्टी समान आणि शाश्वत नसतात. त्या वेगवेगळ्या असतात आणि त्यात वरचेवर बदल होत राहतात. पण जगभरातली सारी जनावरे मात्र पूर्वीपासून चारा खात आली आहेत आणि भविष्यकाळातही गवताच्या कुरणात चरणार आहेत. आहार हे एक उदाहरण झाले. प्रकाशकिरण, ध्वनी, गुरुत्वाकर्षण, रासायनिक क्रिया, झाडांची वाढ वगैरे सर्व नैसर्गिक क्रियांना ही गोष्ट लागू पडते. त्याबद्दल निसर्गाचे नियम सगळीकडे समान असतात आणि काळासोबत ते किंचितही बदलत नाहीत. सृष्टीचे सर्व नियम स्थलकालातीत असतात. या नियमांचा अभ्यास विज्ञानात केला जातो.
शिष्य : विज्ञानातले नियम जर इतके शाश्वत असतात तर आइन्स्टाईनने न्यूटनला खोटे कसे ठरवले?
गुरू : आपल्याला असे ढोबळ विधान करून चालणार नाही.
शिष्य : म्हणजे?
गुरू : मी तुला एक उदाहरण देतो. आज तुला एका माणसाने कोणाच्या तरी भावाची ओळख करून दिली, उद्या दुस-या कोणी तुला सांगितले की "हा त्याच्या काकाचा मुलगा आहे", परवा तिसरा म्हणाला की "हा त्याच्या थोरल्या काकाचा मुलगा आहे", "हा त्याच्या मोठ्या काकाचा धाकटा मुलगा आहे" अशी माहिती चौथ्या माणसाने तुला तेरवा दिली. अशा प्रकारे त्यांचे नातेसंबंध अधिकाधिक स्पष्ट होत गेले, याचा अर्थ पहिले तीघे खोटे बोलत होते असा होत नाही. विज्ञानाची प्रगती देखील अशीच टप्प्याटप्प्याने होत आली आहे. मी दिलेल्या उदाहरणात चारच टप्पे आहेत, तर विज्ञानाच्या इतिहासातील प्रत्येक विषयात ते असंख्य आहेत. तुझ्या प्रश्नाचे पूर्ण उत्तर मिळण्यासाठी आधी न्यूटनने काय काय सांगितले होते आणि नंतर आइन्स्टाईनने त्यात कसली सुधारणा केली, याचा सखोल अभ्यास करायला हवा. आज आपण विज्ञानाची फक्त तोंडओळख करून घेत आहोत. आज मी तुला एवढेच सांगेन की न्यूटन आणि आइनस्टाईन यांचे सांगणे कदाचित थोडे वेगळे वाटले तरी निसर्गाचे नियम कांही बदललेले नाहीत. फक्त माणसाला त्यांचे झालेले आकलन वाढत गेले. यालाच विज्ञानातली प्रगती असे म्हणतात.
हे थोडेसे विषयांतर झाले. विज्ञानातील नियम आणि मानवीय नियम यात एक मोठा फरक आहे.
शिष्य : कोणता?
गुरू : माणसे कायदा करतात आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा निर्माण करतात, तरीही अनेक लोक त्याचे उल्लंघन करतात. तसे करणे त्यांना शक्य असते. निसर्गाचे नियम मात्र कोणीही कधीही मोडू शकतच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर विस्तवाला हात लावला तर त्याचा चटका बसणार किंवा पाण्यात दगड टाकला तर तो बूडणार असेच जगाच्या पाठीवर कुठेही होते, होत गेले आणि होत जाणार आहे.
शिष्य : हे मात्र बरोबर नाही हां! अहो, होलिका ज्या आगीत जळून भस्म झाली त्या आगीतून भक्त प्रल्हाद सुखरूपपणे बाहेर आला आणि रामनामाच्या महिम्यामुळे समुद्राच्या पाण्यात दगड तरंगले अशी किती तरी उदाहरणे आपल्याकडे घडलेली आहेत.
गुरू : अशी तुझी श्रध्दा आहे.
शिष्य : आपल्या पुराणांत तसे लिहिलेलेच आहे, ते घडले होते म्हणून तर इतक्या विस्ताराने लिहिले गेले असेल ना?
गुरू : उडणारे गालिचे आणि दिव्यातला राक्षस यांच्या सुरस आणि चमत्कृतीपूर्ण कथा अरबी भाषेत लिहिल्या गेल्या आहेत, म्हणून त्या सत्य घटना मानायच्या का?
शिष्य : पण पुराणे हे आपले धर्मग्रंथ आहेत. आपल्या पवित्र पुराणातल्या गोष्टींबद्दल तुम्ही शंका घेत असता, आणि त्या परक्या न्यूटन आणि आइन्स्टाईनवर तुम्ही का म्हणून विश्वास ठेवता?
गुरू : तुझे म्हणणे अगदी खरे आहे. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेऊ नये. अरे, हाच विज्ञानाचा अगदी प्राथमिक नियम आहे. केवळ अमक्या तमक्याने सांगितले म्हणून कोणतीही गोष्ट ग्राह्य मानता कामा नये असा वैज्ञानिक पध्दतीचा आग्रह असतो. त्या माणसाने जे कांही सांगितले आहे ते पुराव्यांच्या आणि तर्काच्या आधारावर तपासून घेऊन सिध्द झाल्यानंतरच त्याचा स्वीकार केला जातो. न्यूटन आणि आइन्स्टाईन यांनी जे जे कांही सांगितले ते त्यांच्या काळातदेखील लगेच कोणी मानले नव्हते. त्याची व्यवस्थितपणे छाननी करून झाल्यानंतर तत्कालीन विद्वानांना ते पटले आणि त्यांनी ते मानले.
शिष्य : म्हणून तुम्ही सुध्दा मानलेत. असेच ना? आम्ही सुध्दा आमच्या आचार्यांनी सांगितले म्हणून पोथ्यापुराणांवर विश्वास ठेवतो. मग आपल्या वागण्यात काय फरक आहे?
गुरू : खूप फरक आहे. या संशोधकांनी जे सिध्दांत सांगितले ते तर्काला धरून होते. प्रत्यक्ष अनुभवलेल्या विज्ञानाच्या नियमांचे खुलासेवार स्पष्टीकरण करणारे होते. त्यातल्या कोठल्याही नियमांचा भंग करणारे नव्हते. या सगळ्या गोष्टींवर अनेक वेळा झालेले विचारमंथन, त्याबद्दल निर्माण झालेल्या शंकांचे निरसन वगैरे पाहून झाल्यानंतर ते सिध्दांत मान्य करायला कांही हरकत नाही. पुराणातील ज्या चमत्कारांचे उल्लेख तू केलेस ते सृष्टीच्या नियमांच्या विरुध्द घडलेले वाटतात आणि ते कसे घडू शकले याचे काही स्पष्टीकरण मिळत नाही. विज्ञानाच्या अभ्यासात अशा गोष्टी कोणाच्याही सांगण्यावरून विश्वसनीय समजल्या जात नाहीत.
तुला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. न्यूटन, पास्कल वगैरे संशोधकांनी जे सिध्दांत मांडले त्यांच्या आधाराने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जी प्रगती झाली तिचा जेवढा लाभ मला मिळाला आहे तेवढाच तुलाही झाला आहे. त्याचप्रमाणे भारतीय वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनाचा लाभ परकीयांनाही मिळाला, यामुळे ते त्यांचेसुध्दा आहेत. विज्ञानाच्या जगात हे आमचे हे तुमचे असा संकुचित विचार केला जात नाही.
शिष्य : पण मग भारतीय वैज्ञानिकांनी लावलेल्या शोधांचे श्रेय युरोपियन लोकांना कां दिले जाते?
गुरू : एकादे उदाहरण सांग.
शिष्य : या न्यूटनच्या आधी हजारो वर्षांपूर्वी आपल्या लोकांना गुरुत्वाकर्षणाची माहिती होती.
गुरू : असे तुला वाटते. पण न्यूटनचा सिध्दांत तरी तुला माहीत आहे का?
शिष्य : हेच ना की झाडावरून सुटलेले फळ जमीनीवर पडते. आकाशात् पतितम् तोयम् यथा गच्छति सागरम् या श्लोकात काय वेगळे सांगितले आहे?
गुरू : अरे एवढी साधी गोष्ट शेंबड्या पोराने सुध्दा पाहिलेली असते. ते सांगायला न्यूटनची किंवा कोण्या महर्षीची गरज नाही. न्यूटनने यापेक्षा बरेच कांही जास्त सांगितले होते.
शिष्य : हो, त्या फळाला पृथ्वी आपल्याकडे आकर्षित करते. ही गोष्टसुध्दा आपल्या आर्यभट्टांनी की भास्कराचार्यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवली आहे.
गुरू : नक्की कोणी आणि काय लिहून ठेवले आहे हे तुला ठाऊक आहे का?
शिष्य : त्याची काय गरज आहे? जे कांही लिहिले आहे त्याचा अर्थ असा निघतो असे म्हणतात.
गुरू : त्यांनी काय लिहिले आहे हे तुला माहीत नाही, न्यूटनने कोणता सिध्दांत मांडला तेही माहीत नाही आणि तरीही तू सांगतोस की आपल्या पूर्वजांना तो माहीत होता.
शिष्य : तुम्ही सांगू शकता?
गुरू : हो. पृथ्वीने ओढून घेतल्यामुळे झाडावरचे फळ खाली पडत असावे असा तर्कशुध्द विचार न्यूटनच्या आधी अनेक लोकांनी व्यक्त केला असणार. त्याचा अर्थ त्यांना गुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत माहीत होता असा होत नाही. झाडावरचे फळ आणि झाडामागे दडलेला चंद्र या दोघांनाही पृथ्वी आपल्याकडे खेचून घेत असते, पण त्यातले फळ जमीनीवर येऊन पडते आणि चंद्र मात्र आभाळात फिरत कां राहतो यातले गूढ शोधता शोधता तो गुरुत्वाकर्षणाच्या सिध्दांतापर्यंत कसा पोचला हे मी तुला सविस्तर सांगू शकेन. हा सिध्दांत त्याने नुसता शब्दात सांगितला नव्हतातर एका समीकरणाच्या रूपात मांडला. फक्त पृथ्वीच नव्हे तर विश्वातील एकूण एक वस्तू एकमेकांना स्वतःकडे आकर्षित असतात या तत्वावर तो आधारलेला आहे आणि लाकूड पाण्यावर तरंगते, पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि लंबकाची आवर्तने ठरावीक लयीमध्ये होत असतात अशा अनेक निरीक्षणांचे स्पष्टीकरण त्यातून मिळते. यातले अवाक्षरही माहीत नसणा-या लोकांनी आपले ढोल बडवण्यात कोणाचे हंसू होत आहे?
शिष्य : या सगळ्याची मला कल्पना नव्हती.
गुरू : आता आली आहे ना? लक्षात ठेव. विज्ञानावर कांहीही बोलण्यापूर्वी त्यावर स्वतः विचार कर आणि कोणतेही विधान भक्कम आधारानिशी करत जा.

......... (समाप्त)

8 comments:

शिरीष said...

आपल्या संवादात मी शिष्याच्या जागी स्वतःला सामावून घेतले तर एवढेच सांगू इच्छितो कि दुसऱ्या ज्ञानी माणसाचा कच्चा शिष्य भेटल्यास साधारण असेच घडते...

त्यात त्या गुरुचा पराभव निश्चितच होत नसतो...

कोणत्याही क्षेत्रात आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जर दुसऱ्याचे अस्तित्व कमी लेखावे लागत असेल तर तो आपलाच पराभव असे सिद्ध होते...

ह्या निकषावरून पाहता आपला गुरुशिष्य संवाद कसा ठरवावा अशी चिंता मला पडली...

Prashant said...

सुंदर,

विज्ञानातल्या प्रगतीबद्दल सोप्या शब्दात कसे सांगावे, हे अतीशय उत्तम रीत्या मांडले आहे.

धन्यवाद.

Anand Ghare said...

शिरीष यास त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
हा दोन व्यक्तींमधला सामना नाही आणि त्यात हार किंवा जीत याला महत्व नाही. एक पूर्वग्रहाने पछाडलेला युवक विज्ञानाच्या मार्गावर चालत असलेल्या एका मनुष्याकडे येतो आणि तो माणूस त्याला विज्ञानाची पायाभूत तत्वे समजाऊन सांगतो अशी संकल्पना या काल्पनिक संवादात आहे.
संवाद वाचनीय व्हावा यासाठी त्यात थोडी रंजकता आणली आहे.
अशा दोन्ही प्रकारची माणसे मी पाहिलेली आहेत. शिष्याला मी मुद्दाम कच्चा बनवलेले नाही. त्याची बाजू मुळातच लंगडी आहे. त्याच्या बाजूने आपल्याकडे कांही सशक्त मुद्दे असलेच तर ते अवश्य मांडावेत.

शिरीष said...

मला वाटते शिष्याची पूर्वग्रहदुषित भुमिका इतपोतर ठीक. पण शिष्य अजून सिद्धहस्त दाखवून आपण हाच लेख अजून विस्ताराने पुनर्टंकित करावा... कारण असे शिष्यही आहेत की जे वादाच्या अनेक पायऱ्या व्यवस्थित सांभाळतात.

ह्या विषयावर मी वाचलेले एकच वाक्य विषयांतर करून लिहीतो.

"द गोल" ह्या कांदबरीतील मी ती कादंबरी न वाचता लिहितोय म्हणून तितकेच घ्यावे... जास्त नको.

सायन्स इज ह वे विच अलाउज अस टू अंडरस्टँड द फेनेमेनाज ऑफ द नेचर. असे काहीसे आहे ते... त्याचा कदाचित आपल्याला त्या विस्तारामध्ये उपयोग होईल असे वाटते...

आपण ह्या पद्धतीने अधिक चांगले लिहावे आणि आम्हांला शास्त्र (ज्याला आपण विज्ञान म्हणता) तुमच्या पद्धतीने सांगावे हीच शुभेच्छा...

Anand Ghare said...

धन्यवाद, शिरीष,
हा लेख लिहितांना माझ्या डोक्यात त्याचा आवाका एवढाच होता. माझ्या दृष्टीने गुरूला जे सांगायचे आहे ते महत्वाचे होते. सरळसोट कथन करण्यापेक्षा संवादाने ते जास्त रंजक वाटेल अशा कल्पनेने शिष्याचे पात्र त्याला कॉन्ट्रास्ट देण्यासाठी योजले होते.
तुमच्या सूचनेचा विचार करून कधी तरी एक वेगळा प्रयत्न करून पाहीन.

Anonymous said...

लेख आवडला.

Nile said...

घारे काका संवाद आवडला. खरंतर असाच एक अनुभव नुकताच एका मराठी संस्थळावर आला. न्युटनच्या (तिस-या) नियमाची अत्यंत चुकीची माहिती असताना तोच नियम वापरुन पुर्नजन्माचा खरे पणा सिद्धा करण्याचा प्रयत्न. असो.

-Nile

निळकंठ said...

kya baat hai kaka!!!!!!!!!!!!!!!!!!!