Saturday, April 24, 2010

प्रोफेश्वर

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः हा श्लोक लहानपणी पाठ केला होता त्या वेळी तो दत्ताचा श्लोक असे सांगितले गेले होते. आमच्या गांवातल्या शाळेत जेवढे स्थानिक शिक्षक होते ते सारे आपापली शेतीवाडी, घरेदारे, उद्योग व्यवसाय वगैरे सांभाळून जमेल तेंव्हा शाळेत येत असत आणि बाहेरून नोकरीसाठी आलेले गुरूजी संधी मिळाली की त्यांच्या घराकडे पळ काढीत आणि सावकाशपणे परत येत असत. शाळेचा शिपाई दर तासाचा टोला मारायचा. पण लगेच आधीच्या तासाच्या शिक्षकाने बाहेर जायचे, पुढच्या तासाच्या शिक्षकाने वर्गात येऊन शिकवायचे वगैरेची फारशी पध्दत नव्हती. विद्यार्थीसुध्दा जेंव्हा घरात त्यांचे काही काम नसले आणि त्यांचा धुडगूस असह्य झाल्यामुळे घरातल्यांनी त्यांना बाहेर पिटाळले तर शाळेकडे फिरकायचे. त्यामुळे अधून मधून शिक्षक आणि विद्यार्थी जेंव्हा योगायोगाने एकत्र येत तेंव्हा ज्ञानदानाचे थोडे काम होत असे. अशा परिस्थितीत ब्रह्मा विष्णू महेश्वर वाटावेत असे गुरू कुठे भेटणार?

कॉलेजमध्ये येणा-या नव्या मुलांना छळायची थोडी रीत त्या काळातही असायची, पण ते प्रकार फार काळ टिकत नसत, लेक्चरर आणि प्रोफेसरांची टिंगल मात्र पूर्ण काळ चालत असे. त्यामुळे आपण पुढे जाऊन प्राध्यापक व्हावे असे स्वप्नातसुध्दा कधीही वाटले नाही. इंजिनियरिंगच्या क्षेत्रात इतर चांगल्या संधी उपलब्ध असल्यामुळे सगळी मुले सहजपणे नोकरीला लागत असत. त्यातही ज्याला इच्छा असेल अशा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झालेल्या कोणीही येऊन कॉलेजात लेक्चररशिप मिळवावी अशी ओपन ऑफर असायची, तरीही त्या जागा रिकाम्या पडलेल्या असायच्या. मलासुध्दा ती जागा मिळवावी असे वाटले नव्हते आणि तशी आवश्यकताही पडली नाही.

जवळजवळ चार दशके तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करून निवृत्त झाल्यानंतर आरामात दिवस घालवत आलो आहे. तशी आणखी चार वर्षे होऊन गेल्यावर अचानक एका जुन्या मित्राचा फोन आला. सध्या एकमेकांचे कसे आणि काय चालले आहे याची विचारपूस झाल्यानंतर "तू फावल्या वेळात एक काम करशील का" असे त्याने मला विचारले. कुठल्याशा विद्यापीठात स्नातकोत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना व्याख्याने द्यायचे ते काम होते. मी तर आयुष्यात कधी हातात खडू धरून फळ्यावर लिहायचा विचारही मनात आणला नव्हता आणि एकदम एमटेकसाठी शिकवायचे! "कांहीतरीच काय सांगतो आहेस?" मी उद्गारलो. तो म्हणाला, "अरे आपण सेमिनारमध्ये पॉवर पॉइंटवर प्रेझेंटेशन करतो ना तसेच करायचे. तुला चांगले जमेल." त्याने जवळ जवळ गळच घातली. एक नवा अनुभव घ्यायचा म्हणून मी त्याला होकार दिला.

पण हे काम त्याने सांगितले तेवढे सोपे नव्हते. पुन्हा एकदा एकेका विषयासंबंधी अनेक प्रकारची माहिती गोळा करायची आणि तिची जुळवाजुळव करून मांडणी करायची हे थोडे किचकटच होते. त्यात आता ऑफीसचा आधार नव्हता, पण इंटरनेटमधून हवी तेवढी माहिती उपलब्ध होत होती. महिना दीड महिना प्रयत्न करून तयारी तर केली. मागच्या महिन्यात व्याख्याने देण्याचे वेळापत्रक ठरले आणि अस्मादिक गांधीनगरला जाऊन दाखल झाले. ठरलेल्या वेळी माझी ओळख करून देण्यात आली, "हे आहेत प्रोफेसर घारे."

No comments: