Thursday, December 11, 2008

तेथे कर माझे जुळती - भाग १ - स्व.पांडुरंगशास्त्री आठवले


आयुष्यभर अबोल असलेली माणसेसुध्दा उतारवयात बडबडायला लागतात असे म्हणतात. अनुभवातून त्यांच्याकडे थोडेसे शहाणपण गोळा झालेले असते आणि ते इतरेजनांना द्यावे असे त्यांना त्या वयात वाटत असावे. परमेश्वराने माणसाला दोन कान आणि एकच जीभ दिली आहे यामागे त्याचा कांही उद्देश असावा असे मला पूर्वी वाटायचे आणि मी त्यांचा उपयोग त्याच प्रमाणात करत होतो. पण आपणहून लोकांना चार नाही तर निदान दोन गोष्टी तरी सांगाव्यात असे मलासुध्दा जेंव्हा वाटायला लागले त्याच सुमारास ब्लॉगच्या तंत्राशी माझी ओळख झाली. यातून शक्यतो नवे अनुभव मांडायचा प्रयत्न मी गेली अडीच वर्षे करतो आहे आणि त्याबरोबर तुलनेसाठी पूर्वीच्या काळातले संदर्भ देणेही चालू आहे. पण साठी उलटण्यापूर्वीचे जे साठवण स्मृतीत सांचून राहिले आहे त्याचे काय करायचे?

 सहज घरातले जुन्या फोटोंचे आल्बम चाळतांना त्यात कांही सुप्रसिध्द चेहेरे दिसले. माझ्या मनात त्यातल्या ज्या मोठ्या लोकांच्याबद्दल नितांत आदर आहे आणि वयाने लहान असलेल्या ज्या गुणी लोकांचे कौतुक करावे असे वाटते त्यांच्याबद्दल या सदरात दोन शब्द लिहायचे ठरवले. यातल्या एकेका व्यक्तीबद्दल ग्रंथ आणि अगणित लेख लिहिले गेले आहेत. त्या महान लोकांची समग्र माहिती थोडक्यात देणे मला शक्यही नाही आणि तसा उद्देशही नाही. "माझी या थोरांबरोबर ओळख होती." अशी शेखी मारण्याचे माझे वय आता राहिले नाही. फक्त माझ्या कांही जुन्या व्यक्तिगत आठवणी या निमित्याने मांडणार आहे. त्या कोणत्या क्रमाने येतील त्याला कांही महत्व नाही. जसे सुचेल व आठवेल तसे अधून मधून लिहीत जाईन. 

आज या मालिकेची सुरुवात स्व.शास्त्रीजींपासून करीत आहे. दत्तजयंतीच्या शुभदिवशी मला गुरुस्थानी लाभलेल्या या आदरणीय व्यक्तीमत्वाला सहस्र साष्टांग प्रणाम.परमपूजनीय स्व.पांडुरंगशास्त्री आठवले माझा शालांत परीक्षेचा निकाल लागला आणि आमच्या घरात यापूर्वी कधी कोणाला मिळाले नव्हते एवढे घवघवीत यश मला मिळाल्याचे समजले. पण दैवदुर्विलास असा होता की आमची आर्थिक परिस्थिती पूर्वी कधीही झालेली नव्हती एवढी त्या वेळी नाजुक झाली होती. त्यामुळे आता पुढे काय करायचे याचा विचार चाललेला असतांना एक सुवर्णसंधी चालून आली. ठाण्याजवळील 'तत्वज्ञान विद्यापीठ' नांवाच्या संस्थेत कांही गरजू आणि हुशार विद्यार्थ्याची दोन वर्षे राहण्याजेवण्याची सोय केली जाईल अशी अगदी छोटीशी जाहिरात वाचनात आली. ताबडतोब प्रयत्न केले आणि मला तिथे प्रवेशही मिळाला. 

मी तत्वज्ञान विद्यापीठात दाखल झालो ती आमची आठदहा मुलांची विज्ञानशाखेची पहिलीच बॅच होती. त्यापूर्वीपासून तेथे राहून तत्वज्ञान हा विषय शिकून बी.ए.चा अभ्यास करणारी तीन चार मुले तेथे होती. पित्याच्या मायेने आमची काळजी घेणारे आणि त्याबरोबरच तिथल्या सर्व नीतीनियमांचे कसोशीने पालन होत आहे याचीही सतत जातीने खात्री करून घेणारे अत्यंत मृदुभाषी असे दादाजी होते. स्वयंपाक करणारा एक 'महाराज' होता. फक्त एवढीच माणसे त्या परिसरात रहात होती. इतर कांही सज्जन तिथे येऊन थोडा वेळ त्या परिसरात घालवून आणि दादाजींशी बोलून परत जात होती. पण सतत कानावर पडणारे एक नांव तिथल्या अणुरेणूमध्ये भरलेले होते, तिथली प्रत्येक गोष्ट त्यांच्या इच्छेनुसार घडवली जात आहे, त्याची सर्व सूत्रे अप्रत्यक्षपणे त्यांच्या हातात असतात असे सांगितले जायचे, तो परिसरच त्या नांवाने भारला गेला असल्यासारखे वाटत होते, ते नांव होते 'शास्त्रीजी.' गुजराती मुले त्याचा उच्चार 'सास्त्रीजी'असा करीत.

आम्ही रहायला गेल्यानंतर दोन तीनच दिवसांनी "सास्त्रीजी आव्यो" अशी हाळी उठली आणि सारी मुले तसेच त्या वेळी उपस्थित असलेली सर्व मोठी माणसे एका दिशेने धांवत सुटली. तत्वज्ञान विद्यापीठाच्या परिसरातच एक छोटीशी सुरेख बंगली होती. तिथे आम्ही सारे जमलो. पांढरा स्वच्छ परीटघडीचा कुरता आणि धोतर परिधान केलेले शास्त्रीजी आंतून बाहेर येताच सगळेजण अहमहमिकेने त्यांच्या पाया पडले. मजबूत बांधा, भव्य कपाळ, तेजस्वी डोळे आणि प्रफुल्लित चेहेरा असे अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व त्यांच्याकडे होते. एक शब्दही न बोलता त्यांची मनावर खोलवर छाप पडत होती आणि ते बोलायला लागल्यावर त्यातला शब्द न शब्द सारे पंचप्राण कानात गोळा करून ऐकण्यासारखा होता. त्यापूर्वी मी कोणत्याही व्यक्तिमत्वाने एवढा प्रभावित झालो नव्हतो. तोंवर मी कधी 'मोठी' माणसे पाहिलीच नव्हती असेही म्हणता येईल.

आम्ही तिथे राहून काय करायचे आणि ते कां करायचे याचे मार्गदर्शन त्यांनी मोजक्या वाक्यात केले. आमच्यातली कांही मुले भुलेश्वर इथल्या'माधवबाग पाठशाळे'त जाऊन आली होती. प्रत्यक्ष शास्त्रीजींबरोबर 'वार्ता' करायला मिळाली म्हणून ती धन्य धन्य झाली.एकाद्या महान उस्तादाबद्दल बोलतांना गंवई लोक एका हांताच्या बोटांनी आपल्याच कानाला स्पर्श करतात. शास्त्रीजींच्याबद्दल बोलतांना त्यांचे नांव तिथे यापेक्षाही जास्त आदराने घेतले जात असे. त्यांचे पूर्ण नांव 'पांडुरंगशास्त्री आठवले' आहे, ते कोणी साधूसंन्याशी नसून संसारी गृहस्थ आहेत एवढी माहिती मिळायलासुध्दा आम्हाला खूप वेळ लागला.

 माधवबाग पाठशाळेत ते नियमितपणे प्रवचने करतात आणि त्यांचे विचार अनेक जागी चालणा-या स्वाध्यायकेंद्रातून लहानथोर सर्व वयोगटांतल्या मुलांमाणसांपर्यंत दर आठवड्याला पोंचवले जातात असे समजले. सोशल नेटवर्किंग हा शब्द मी तेंव्हा ऐकला नव्हता पण त्याचे प्रत्यक्ष उदाहरण समोर आले होते.शास्त्रीजींनी दिलेल्या व्याख्यानांच्या आधारावर कांही पुस्तके प्रसिध्द झाली होती. अनेक गुजराथी कुटुंबात त्यांचे भक्तिभावाने पठण केले जात असे. त्यांच्या प्रचंड संख्येने असलेल्या शिष्य किंवा भक्तपरिवारापुढे आम्ही नगण्य होतो. त्यामुळे आमच्यासाठी वेगळा वेळ देणे शास्त्रीजींना कठीण होते. पण माधवबाग पाठशाळेमार्फत अनेक स्तरावरील प्रशिक्षणशिबिरे तत्वज्ञान विद्यापीठात चालवली जात असत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जेंव्हा शास्त्रीजींचे प्रवचन असे तेंव्हा आम्ही ते आवर्जून ऐकत असू. 

त्यांचे प्रवचन विद्वत्तापूर्ण असेच पण वाणी अत्यंत रसाळ होती रोजच्या जीवनाशी निगडित असलेली उदाहरणे देऊन ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत. विज्ञानाचा अभ्यास करतांना मला जी चिकित्सक दृष्टी प्राप्त होत होती त्याच्याशी शास्त्रीजींचे धर्मशास्त्रावरील विचार विसंगत वाटत नव्हते. ते तर्काला धरूनच सांगत असत. उच्चनीचता, भेदाभेद, कर्मकांड, उपासतापास असल्या गोष्टींचा समावेश त्यात नव्हता. पण रोज नित्यनेमाने देवाची आराधना, प्रार्थना वगैरे करण्याची जी संवय तत्वज्ञान विद्यापीठात राहतांना लावून दिली गेली होती तीच पुढील शिक्षणासाठी तिथून बाहेर निघाल्यानंतर लवकरच सुटली. त्यानंतर मी दुस-या कोणाला कसले संस्कार देणार?तिथे तयार होऊन बाहेर पडलेल्या मुलांनी समाजात मिसळून सर्व लोकांमध्ये चांगले संस्कार पसरवावेत अशी जी किमान अपेक्षा आमच्याकडून होती ती पूर्ण झाली नाही.

 शिक्षण संपवून नोकरीला लागल्यानंतर पुन्हा तत्वज्ञान विद्यापीठाशी संपर्क साधून स्वाध्यायकेंद्रांच्या कामाला देण्यासाठी वेळही नव्हता. त्यामुळे मी त्या कार्यापासून दूर राहिलो.शास्त्रीजींनी सुरू केलेले कार्य गुजरात आणि महाराष्ट्रच नव्हे तर देशाबाहेरसुध्दा किती विस्तारले आहे या संबंधी वर्तमानपत्रात येणारे लेख वाचून त्याबध्दल समजत होते आणि आनंद होत होता. पण स्वाध्यायपरिवार आणि इतर कांही महापुरुषांनी उभे केलेले अशासारखे संघ इतके चांगले कार्य करीत असतांना समाजातला वाईटपणा वाढतच कां चालला आहे हे कोडे कांही उलगडत नव्हते. कदाचित हासुध्दा प्रसारमाध्यमांनी उभा केलेला बाऊ असावा, प्रत्यक्षात समाजपुरुष इतका दुष्ट नाही असेच असेल. निदान मला तरी आयुष्यात त्रास देणारी जितकी माणसे भेटली असतील त्यापेक्षा मदत करणारी माणसे जास्त संख्येने भेटली आहेत. 

मी तत्वज्ञान विद्यापीठात असतांना लक्षावधी लोकांना मार्गदर्शन करणारे परमपूज्य शास्त्रीजीं आणि पोरवयातला मी यांच्या आचारविचारांच्या स्तरांमध्ये जमीनीपासून आभाळापर्यंत इतके महद अंतर होते. त्यामुळे त्यांनी त्या वेळी नेमके काय सांगितले हे इतक्या वर्षानंतर मी आज शब्दात सांगू शकणार नाही. पण आपल्यातला चांगलेपणा सदैव जागृत असावा आणि आशावादी राहून नेहमी सकारात्मक दृष्टीकोण ठेवावा असे विचार करण्याची वृत्ती माझ्या कळत नकळत त्यातून निर्माण झाली असे म्हणता येईल. शास्त्रीजींच्या संपर्कात येण्याच्या पूर्वीसुध्दा लहानपणापासून माझ्या मनावर ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास आदींच्या उपदेशांचे विस्कळित असे संस्कार घरातून झाले होते, शास्त्रीजींना भेटल्यानंतर ते थोडे ऑर्गनाइज्ड झाले असावेत. प्रत्यक्षात भेट होऊनसुध्दा माझ्या मनातले त्यांचे स्थान खूप उंच आभाळात राहिले. फक्त माझ्या कॉलेजशिक्षणाची सोय ऐन वेळी केल्याबद्दल नव्हे तर मला एक चांगले जीवन दिल्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी राहीन.

2 comments:

sandip kothamire said...

नमस्कार सर
तुमचा लेख वाचला खुप छान
तूम्ही खुप भाग्यवान आहात पूजनीय दादांचे दर्शन झाले सहवास लाभला
दादांसोबतचा फोटो असेल तर send करा या ई-मेल वर sandip.kothamire@gmail.com

Anand Ghare said...

धन्यवाद.माझ्याकडे असलेला फोटो या ब्लॉगमध्ये दिलेला आहेच.