Thursday, December 04, 2008

अमेरिका ! अमेरिका !! - भाग १



अमेरिकेत घडलेल्या घटना, तिथल्या नेत्यांची वक्तव्ये, सरकारची धोरणे, त्यानुसार इतर देशात होत असलेल्या कारवाया, आर्थिक क्षेत्रातल्या घडामोडी, एवढेच नव्हे तर हॉलीवुडचे चित्रपट, त्यातले कलाकार, अमेरिकेतले खेळाडू वगैरेसंबंधी भारतातल्या प्रमुख वर्तमानपत्रात रोजच्या रोज कांही ना कांही छापून येत असते. त्यात बातम्या असतातच, कांही लेख किंवा वाचकांची पत्रेसुध्दा असतात. अमेरिकेत जाऊन यशस्वी झालेल्या भारतीयांच्या गौरवगाथा हा एक नवा विषय हल्ली प्रसिध्दीच्या झोतात आला आहे. या रोजच्या वाचनामुळे अमेरिकेबद्दल कुतूहल वाटते, तिकडे जाऊन प्रत्यक्ष पहायची इच्छा होते आणि मला तर ते आपल्या आटोक्यात आहे असे पहिल्यापासून वाटत आले आहे.
मी इंजिनियरिंग कॉलेजात प्रवेश घेतला तिथे समाजाच्या विविध थरातले विद्यार्थी आले होते। त्यातल्या कांही मुलांचे पालक मोठमोठ्या हुद्यावर काम करत होते तर कोणाचे आई वा वडील परराष्ट्रीय कंपन्यांमध्ये किंवा विमान कंपनीत नोकरीला असल्यामुळे त्यांचे परदेशी जाणे येणे होते। इंजिनियरिंग ड्रॉइंगमधल्या आडव्या-उभ्या रेघा सुध्दा मारायला शिकायच्या आधीपासून "आपण तर एम एस करायला स्टेट्सला जाणार, तिकडेच मायग्रेट होणार" वगैरे गोष्टी ती मुले करायची। ज्याच्याकडे जेवढी बुध्दीमत्ता आणि शिक्षणाची आवड असेल त्या प्रमाणात त्या माणसाचे शिक्षण होते अशी एक गैरसमजूत त्या वयात माझ्या मनात होती. त्यामुळे जर कांही ही मुले पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जाणार असतील तर आपण तिथे जायलाच हवे किंबहुना तिकडे जाणारच असे त्या मुलांचे ज्ञान आणि अभ्यासातली प्रगती पाहिल्यानंतर मला वाटू लागले होते.

अमेरिकेसारख्या परदेशात जाऊन रहायचे असेल तर तिथली बोलीभाषा तसेच तिथे मिळणारे खाणेपिणे यांची ओळख करून घेणे आवश्यक होते. ही मुले त्यासाठी वेस्टएंड आणि अलका टॉकीजमध्ये लागणारे सारे इंग्रजी चित्रपट पहायचे आणि कँपातल्या हॉटेलात खादाडीसाठी जायचे. ही दुसरी गोष्ट फारच खर्चिक असल्यामुळे मला परवडण्यासारखी नव्हती आणि त्याची गरजही भासत नव्हती कारण घरातून निघून हॉस्टेलमध्ये रहायला गेल्यानंतर तिथल्या मेसमधले जेवण खाणे मला मुळीसुध्दा कठीण गेले नव्हते इतकेच नव्हे तर ते अन्न आवडू लागले होते. अमेरिकेत गेल्यावर तिकडच्या अन्नाची सुध्दा संवय होईल याची मला खात्री होती, पण तिकडची बोलण्यातली भाषा शिकणे मात्र आवश्यकच होते. तिथल्या प्रोफेसरांचे बोलणेच आपल्याला समजले नाही तर तिथे जाऊन शिकणार तरी कसे? या कारणाने त्या मुलांबरोबर मी सुध्दा इंग्रजी सिनेमे पाहू लागलो. कांही दिवसांनंतर मला ते समजायला लागले आणि इंग्रजी शिव्या तोंडात बसल्यानंतर तर माझा आत्मविश्वास भरपूर वाढला. त्यांनंतर मला त्या दे मार चित्रपटांचे आकर्षण वाटणे कमी झाले, प्रॅक्टिकल्सच्या सबमिशनचा बोजा वाढत गेला आणि परीक्षेचा अभ्यास वाढला यामुळे मला सिनेमे पहाण्यासाठी वेळही मिळेनासा झाला. त्यामुळे पुढे हा (अमेरिकेचा) अवांतर अभ्यास फक्त प्रसिध्द सिनेमे पाहण्यापर्यंत मर्यादित राहिला.

हळू हळू वरच्या वर्गातल्या मुलांच्या ओळखी झाल्या. कॉलेजच्या शेवटच्या वर्षातली जी मुले खरोखरच अमेरिकेला चालली होती त्यांची तयारी वेगवेगळ्या प्रकारे चालली होती. यूसिसमधून अमेरिकन कॉलेजांची व युनिव्हर्सिट्यांची माहिती मिळवणे, तिथे प्रवेश मिळवण्यासाठी फॉर्म मागवणे, पासपोर्ट व व्हिसाचे, तसेच टोफेल, गेट वगैरे परीक्षांचे फॉर्म आणणे, ते सारे फॉर्म भरून पाठवणे, प्रवेश आणि शिष्यवृत्तींसाठी शिफारसपत्रे मिळवणे, स्वतःच्या जन्माच्या दाखल्यापासून ते वाडवडिलांची इस्टेट आणि कमाई यांचे दस्तऐवजांपर्यंत कागदपत्रे जमा करणे, त्यांच्या प्रति काढणे इत्यादी सतराशे साठ बाबी त्यात होत्या. त्यातले बहुतेक काम त्या मुलांचे पालक किंवा काका, मामा वगैरे कोणीतरी करीत होते. माझ्या मागे असा कोणाचा पाठिंबा नव्हता आणि ते सगळे स्वतः करण्यासाठी लागणारा वेळ व पैसे खर्च करणे कठीण होते. त्यातूनही अमेरिकेतल्या विद्यापीठात प्रवेश मिळाला, फ्रीशिप, स्कॉलरशिप, असिस्टंटशिप वगैरे मिळून तिथे येणा-या खर्चाची सोय झाली तरीसुध्दा तिथे जाण्यासाठी विमानाचे तिकीट काढायलासुध्दा त्या काळात खूप म्हणजे खूपच पैसे पडायचे. माझ्या कॉलेजच्या संपूर्ण शिक्षणासाठी राहण्या व जेवण्यासकट जितका खर्च आला असता त्यापेक्षा जास्त किंमत विमानाच्या एका प्रवासाच्या तिकीटाची होती. हे पैसे कोठून आणायचे हा ही एक गहन प्रश्न होता. त्यात लक्ष घालण्यापेक्षा मन लावून अभ्यास करावा, परीक्षेत चांगले मार्क मिळवावेत, दोन तीन वर्षे नोकरी करतांना हळू हळू सारी कागदपत्रे जमवावीत आणि पैसे साठवावेत असा विचार करून पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्याचा बेत मी त्यावेळी पुढे ढकलला.
. . . . . . . . . . . . . .. .. . . . . .. . . (क्रमशः)

No comments: