Monday, December 15, 2008

झुकझुकगाडी - भारतातली आणि विलायतेतली -१

जगातले पहिले वाफेचे इंजिन इंग्लंडमध्ये तयार झाले तसेच त्यानंतर कांही वर्षातच पहिली रेल्वेगाडी इंग्लंडमध्ये सुरू झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यानंतर दोन तीन दशकातच मुंबई ते ठाणे ही रेल्वे सुरू झाली आणि लवकरच भारतभर रेल्वेमार्गांचे जाळे तयार झाले. भारत हा इंग्लंडपेक्षा आकाराने खूपच मोठा देश असल्यामुळे ते काम इंग्लंडमधल्या रेल्वेमार्गांपेक्षा नक्कीच मोठे असणार! या कामासाठी जी.आय.पी., बी.बी.सी.आय. यासारख्या अनेक खाजगी कंपन्या तयार झाल्या. त्यांनी आपापले मार्ग आंखून घेतले आणि त्यांवर त्यांच्या गाड्या धांवू लागल्या. मुंबईमध्ये काम करणा-या जी.आय.पी. आणि बी.बी.सी.आय. या कंपन्यांमध्ये फारसे सख्य नसावे. त्यामुळे त्यांनी एकत्र येऊन मुंबईसाठी एक समाईक केंद्रीय स्थानक बांधायचा विचार केला नाही. फक्त दादर या एका ठिकाणी दोन्ही रेल्वेंची वेगवेगळी स्थानके पुलाने जोडली होती व त्यावरून प्रवाशांना इकडून तिकडे जाण्याची सोय होती. जी.आय.पी. ची मध्य रेल्वे आणि बी.बी.सी.आय. ची पश्चिम रेल्वे झाल्यानंतर त्या परिस्थितीत अद्याप फारसा बदल झालेला नाही.
भारताला स्वातंत्र्य मिळून पंडित नेहरूंनी देशाचे नियोजन हांतात घेतल्यानंतर त्यांनी सगळ्या खाजगी रेल्वे कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले आणि त्यांचा सर्व कारभार भारत सरकारतर्फे चालू लागला. तसा तो आजतागायत सुरू आहे. कामाच्या विभागणीच्या सोयीसाठी रेल्वेचे स्थूल मानाने भौगोलिक पायावर विभाग करण्यात आले. रेल्वेचा व्याप जसा वाढला तसे दक्षिण मध्य, दक्षिण पूर्व असे नवे विभाग करण्यात आले. त्यातही मध्य आणि पश्चिम या दोन्ही रेल्वेंनी मुंबईतील आपली उपस्थिती कायम ठेवली आहे. मात्र आता वेगवेगळ्या विभागांतून आरपार जाणा-या अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या धांवू असल्याने प्रवाशांची सोय झाली आहे.

इंग्रजी अंमलाच्या काळात रेल्वेगाड्यांमध्ये पहिला, दुसरा, इंटर आणि तिसरा असे चार वर्ग असत. मेल किंवा एक्सप्रेस आणि पॅसेंजर हे गाड्यांचे दोन प्रकार असत. त्यानुसार त्यांचे भाड्याचे दर असत. वेगवेगळ्या खाजगी कंपन्या एकाच दराने भाडे आकारत होत्या किंवा त्यांत फरक होता हे मला माहीत नाही. त्यांची वेगवेगळी तिकीटे काढावी लागायची असे ऐकल्याचे आठवते. मी माझ्या आयुष्यातला पहिला रेल्वे प्रवास केला तेंव्हा त्यांचे राष्ट्रीयीकरण झालेले होते. पण निदान मिरज स्टेशनवर तरी मीटरगेजच्या पूर्वीच्या एम.एस.एम. रेल्वेच्या स्टेशनातून पूर्णपणे बाहेर पडून पंढरपूरला जाणा-या बार्शी लाईट रेल्वेच्या वेगळ्या स्टेशनात आम्ही गेलो होतो हे नक्की.

भारतीय रेल्वेने लवकरच इंटर क्लास बंद केला. त्यानंतर दुसरा वर्गही बंद करून तिस-या वर्गाला बढती देऊन दुसरा बनवले. पण तांत्रिक प्रगतीमुळे एअरकंडीशनिंग शक्य झाल्यामुळे एअर कंडीशन्ड हा एक वेगळा उच्च वर्ग निर्माण केला. पहिली कित्येक वर्षे त्यात फक्त पहिला वर्गच होता आणि त्याचे भाडे प्रचंड होते. बहुतकरून रेल्वेचे उच्चपदस्थ अधिकारी आणि इतर मोठ्या हुद्यावरील व्ही.आय.पी. लोकच त्यातून प्रवास करीत असत. त्यापूर्वीच किंवा त्याच सुमारास दुस-या वर्गातल्या प्रवाशांना रात्री झोपण्यासाठी स्लीपर कोच बनवले गेले. दूर जाणा-या गाड्यांची संख्या जसजशी वाढत गेली त्यात अधिकाधिक संख्येने स्लीपर कोच लागू लागले. त्याचा खात्रीपूर्वक लाभ घेता येण्यासाठी आरक्षणाची व्यवस्था सुरू झाली. आजकाल तर विना आरक्षण प्रवास करणे जवळजवळ अशक्यच झाले आहे. त्यासाठी अजून कांही गाड्यांमध्ये जनरल कंपार्टमेंट असतात, पण त्या शोधाव्या लागतात आणि त्यात प्रवेश करणेसुद्धा कर्मकठीण असते.

मध्यंतरीच्या काळात टू टियर स्लीपरला एअर कंडीशन्ड करून पहिल्या वर्गाचे भाडे त्याला आकारले जाऊ लागले. त्या वर्गाने जाणा-या प्रवाशांना वातानुकूलित थंडगार वातावरण किंवा पहिल्या वर्गाचा प्रशस्त डबा यांतून निवड करण्याची सोय ठेवली होती. ऋतुमानाप्रमाणे लोक आपापली निवड करीत असत. कांही वर्षांनी या दोन्हींची फारकत करण्यात आली. हळूहळू पहिल्या वर्गाचे डबे कमी कमी होत चालले आहेत आणि ते लवकरच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. कांही वर्षांपूर्वी थ्री टियर स्लीपरलाही वातानुकूलित करून एक नवा वर्ग निर्माण केला गेला. याचे तिकीट पहिल्या वर्गापेक्षा कमी असल्याने त्याला मध्यम वर्गाकडून वाढती मागणी आहे. राजधानी एक्सप्रेस सारख्या अतिजलद गाड्या सुरू झाल्या. त्यासाठी चेअरकार हा नवा वर्ग केला गेला. त्यात प्रवासाबरोबरच जेवणखाण्याची सोय रेल्वेतर्फे होत असल्याने त्याचा समावेश भाड्यात करण्यात आला.

त्यामुळे आता पॅसेंजर, मेल एक्सप्रेस किंवा सुपरफास्ट गाड्या, त्यातील वातानुकूलित किंवा साधा व पहिला किंवा दुसरा वर्ग, आरक्षित किंवा अनारक्षित असे अनेक प्रकार आहेत. त्यांसाठी तिकीटाचे वेगवेगळे दर आहेत. राजधानी किंवा शताब्दी एक्सप्रेस आणि पर्वतावरील रेल्वेगाड्या यांना वेगळ्या दरांची तिकीटे आहेत. पण एका प्रकारच्या गाडीतील एका वर्गातल्या प्रवासासाठी देशभरात कुठेही केंव्हाही समान दर आहेत. लहान मुलांना पहिल्यापासूनच अर्धा आकार होता. कांही वर्षांपूर्वी वृध्द व अपंग व्यक्तींना यात कांही टक्के सूट देण्यात आली आहे. वृध्द महिलांना देण्यात येणा-या सवलतीत अलीकडे वाढ केली आहे. त्यामुळे आता स्त्रीपुरुषांच्या भाड्यात फरक पडेल. गर्दीच्या आणि विनागर्दीच्या मोसमात वेगळ्या प्रमाणात भाडे आकारण्याचे सूतोवाच झालेले आहे. त्यामुळे एकाच प्रवासासाठी वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या दराने शुल्क आकारण्याची सुरुवात होणार आहे. परदेशात हे आधीपासून अस्तित्वात आहे. भारतातल्या विमानप्रवासात हे पूर्वीच सुरू झालेले आहे.
. . . . . . . . . . . . .. . . .(क्रमशः)

No comments: