Tuesday, December 09, 2008

मुंबई ते अल्फारेटा (भाग ३)


विमानात रिकामा वेळ घालवण्यासाठी समोर ठेवलेल्या स्क्रीनशी खेळण्याचे चाळे सुरू केले. यापूर्वी मी टच स्क्रीन पाहिले असले तरी ते हाताळले नव्हते. ट्रायल अँड एरर करता करता थोडे जमायला लागले आणि त्यावर एक सिनेमा सुरू करून दिला. रोजची झोपायची नियमित वेळ केंव्हाच होऊन गेली होती आणि त्यानंतर जास्तीचे खाणे पिणे ही झाले होते. त्यामुळे बसल्या बसल्याच निद्राधीन व्हायला वेळ लागला नाही. जाग येईपर्यंत तो सिनेमा संपून दुसरा सुरू झाला होता. पहिल्या सिनेमातल्या पात्रांचे अखेरीस काय झाले ते समजले नाही. दुसरा चित्रपट कंटाळवाणा असल्याने बदलून तिसरा लावला. तो सुरू होऊन किती वेळ होऊन गेला होता कोणास ठाऊक पण सुरुवात पाहिली नसल्यामुळे सगळी धडपड कशासाठी चालली होती तेच कळत नव्हते. त्या सिनेमाचा मधला थोडा भाग पाहून झाल्यावर पुन्हा बदलला. त्यातच मधून मधून डोळा लागत होता, डुलक्या मारून घेत होतो. ट्रॉलीच्या गडगडण्याच्या आवाजाने जाग आली तर मिळेल ते खाऊन पिऊन घेत होतो. असे चालत राहिले आणि अंगवळणी पडले. इथे गंभीरपणे लक्षपूर्वक संपूर्ण चित्रपट पाहण्याचा उद्देशच नव्हता. कॉमेडी, कॉमिक्स, नॉनस्टॉप नॉनसेन्स, धमाल, धांदरटपणा वगैरेंचा धुडगुस असलेल्या सिनेमांचीच निवड केल्यामुळे त्यांचा जेवढा भाग पाहिला तेवढा पाहतांना वेळ मजेत जात होता। विमानात बसल्याबसल्या सतरा तासात किती आणि कुठकुठले चित्रपट पाहिले ते ही आता सांगता येणार नाही. हिंदी आणि इंग्रजी तर होतेच, कांही सिनेमे कोठल्या भाषेत आहेत ते पण समजले नाही. अधून मधून आपले विमान कुठपर्यंत आले ते पाहण्यासाठी जगाच्या नकाशातला अद्यापपर्यंत मला अज्ञात असलेला भाग पाहून घेत होतो.

मुंबईहून मध्यरात्रीच्या सुमारास प्रयाण केले असले तरी कितीही वेळ गेला तरी रात्र कांही संपत नव्हती. आमचे विमान शीत कटिबंधात पोचल्यानंतर तिथे सहा महिन्यांची रात्र सुरू झाली होती. त्यामुळे प्रवासातला संपूर्ण वेळ खिडकीच्या बाहेर काळ्या कुट्ट अंधाराचे साम्राज्य पसरलेले होते. विमानाच्या हवाई मार्गाच्या अगदी उत्तरेच्या टोकावर गेल्यावर मात्र पूर्वेकडच्या क्षितिजाच्या जवळ थोडासा अंधुक उजेड थोडा वेळ दिसला. दक्षिण दिशेला वळल्यानंतर तो ही दिसेनासा झाला. नेवार्क विमानतळावर आमचे विमान उतरेपर्यंत तिथे नुकतीच पहाट व्हायला लागली होती.

नेवार्क विमानतळ जवळ आल्यानंतर खाली उतरायची तयारी सुरू झाली. सर्व प्रवाशांना डिसएंबार्केशन कार्ड देण्यात आले. आणि ते भरून ठेवायला सांगितले गेले. त्यात आपले नांव, गांव, पत्ता, पासपोर्टचा नंबर, अमेरिकेतला पत्ता, फोन नंबर, विमान कंपनीचे नांव, फ्लाईटचा नंबर अशी बरीच लांबण होती. इतक्या सगळ्या गोष्टी तोंडपाठ थोड्याच असतात. त्यामुळे खिसे आणि बॅगा यामधून कागदपत्रे धुंडाळून ती माहिती शोधण्यात वेळ गेला. अमेरिकेत बाहेरून रोज हजारो विमाने येत असतील आणि त्यातून लाखो प्रवासी उतरत असतील. त्या सर्वांची एवढी माहिती गोळा करून ती कशी साठवून ठेवत असतील कोण जाणे.
विमानातून उतरल्यानंतर काय करायचे यासंबंधीच्या सूचना माईकवरून दिल्या जात होत्या, पण त्या आपल्या भल्यासाठी आहेत असे प्रवाशांना वाटत नसावे. कदाचित "आम्हाला एवढेसुध्दा कळत नाही कां ?" असे त्यांना वाटत असेल. त्यांचे आपापसात वार्तालाप चाललेच होते. "ज्या प्रवाशांना नेवार्क येथे विमान बदलून पुढे जायचे असेल त्यांनीसुध्दा बाहेर पडल्यानंतर आधी चेक्ड बॅगेज आपल्या ताब्यात घ्यावे." एवढे वाक्य मी ऐकले आणि माझ्या मनातला संभ्रम दूर झाला. मुंबईला चेक इन करतांना आम्हाला मुंबई ते नेवार्क आणि नेवार्क ते अॅटलांटा या दोन विमानप्रवासांचे दोन वेगवेगळे बोर्डिंग पास दिले असले तरी सामानाचे एक एकच टॅग दिले होते. त्यामुळे ते सामान कदाचित परस्पर अॅटलांटाला जाईल असे वाटले होते. यापूर्वीचा आमचा अनुभव असाच होता. पण अमेरिकेत मात्र प्रवेश करतांनाच ( म्हणजे नेवार्कला) आपले सामान घ्यावे लागते असेही अनुभवी लोकांकडून ऐकले होते. त्यामुळे नक्की काय करायचे याबद्दल मनात शंका होती.

बॅगेज घेतल्यानंतर पुढील प्रवासासाठी ते कोणाकडे द्यायचे याबद्दलही कांही तरी सांगितले गेले, पण मला ते नीट ऐकू आले नाही. कारण "तुम्हाला माहीत आहे कां, त्या मिसेस शर्मानं एक कुत्री पाळली आहे, तिला चार पिल्लं झाली, त्यातली दोन पांढरी आहेत आणि दोन काळी आहेत ..... " वगैरे दुसरेच आख्यान शेजारी लागले होते, तिकडे लक्ष गेले. "त्या चारही पिल्लांसकट त्या कुत्रीला आणि जमले तर त्या मिसेस शर्मालाही अरबी समुद्रात बुडवून कां टाकू नये?" असा हिंसक विचार मनात आला। पण आता कांही करता येण्यासारखे नव्हते. आकाशवाणी होऊन गेली होती. ती रेकॉर्डेड नसल्यामुळे रिवाइंड करून रिप्ले करता येण्याची सोय नव्हती.

नेवार्कला विमानातून उतरल्यानंतर सगळ्या प्रवाशांबरोबर बॅगेज कलेक्शनकडे गेलो. सामान ठेवून ढकलण्याच्या ट्रॉलीज भारतातल्या प्रमाणे तिथे फुकटात वापरायला मिळत नाहीत. तीन डॉलर मोजून एक ट्रॉली घ्यावी लागते. त्यासाठी एक यंत्र असते. अशी यंत्रे मी युरोपच्या प्रवासात पाहिली होती, ती युरोच्या नाण्यांवर चालायची. माझ्याकडे डॉलरची नाणी नसल्यामुळे ती कुठे मिळतील याचा विचार करीत होतो. तेवढ्यात इतर लोक त्या यंत्रात नोटा घालत असतांना दिसले. एक एक करून मी त्या यंत्राच्या खोबणीत डॉलरच्या नोटा सरकवल्या आणि दोन ट्रॉल्या सोडवून घेतल्या. डॉलरची नोट आणि त्या आकाराचा कागद यातला फरक नक्कीच त्या यंत्राला ओळखता येत असणार. एवढेच नव्हे तर त्यावर लिहिलेला आंकडासुध्दा वाचता यायला हवा, कारण अमेरिकेतल्या आतापर्यंत मी पाहिलेल्या सगळ्या नोटा एकाच आकाराच्या होत्या आणि त्यावरची छपाईसुध्दा सारखीच दिसते. त्या नोटेची किंमत मुद्दाम वाचावी लागते. भारतातल्या नोटेचा आकार आणि रंग पाहून ती किती रुपयांची आहे ते लगेच कळते तसे इथे नाही. आजकाल इथले सगळीकडे सारे व्यवहार क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डाने होतात. त्यामुळे
नोटांचा वापर करणारे बहुतेक परदेशीच असतात ही गोष्ट वेगळी.

भारतातल्या विमानतळावरील कन्व्हेयर बेल्टवर इमारतीच्या बाहेर सामान ठेवले जाते आणि ते त्यावरून आंत येतांना दिसते. नेवार्कच्या विमानतळावर एका मोठ्या दालनात अनेक कन्व्हेयर बेल्ट बाजूबाजूला फिरत होते आणि त्यांच्या चहू बाजूंनी प्रवासी उभे राहिले होते. प्रवाशांचे सामान वरच्या बाजूला असलेल्या एका झरोक्यातून धबधब्यासारखे बेल्टवर कोसळत होते. त्यात बहुतेक बॅगा उलट्या सुलट्या होत होत्या। आमच्या बॅगा दुरूनही चटकन ओळखू याव्यात यासाठी आम्ही त्यावर ठळक लेबले लावली होती, पण वरची बाजूच तळाशी गेल्यामुळे ती कांही दिसली नाहीत आणि एकासारख्या एक दिसणा-या उलट्या बॅगांमधून आपले सामान ओळखून काढण्यात व्हायचा तेवढा त्रास झालाच. पण आमचे सामान येऊन पोचलेले पाहून जीव भांड्यात पडला, कारण आम्हाला लगेच पुढे अॅटलांटाला जायचे असल्यामुळे सामान येण्याची वाट पहात नेवार्कला थांबणे शक्यच नव्हते आणि आम्ही पुढे गेल्यानंतर ते नेवार्कला आले तर त्याची काळजी तिथे कोण घेणार?

सामान ट्रॉलीवर ठेऊन पासपोर्ट तपासणी जिथे करायची होती त्या दालनात प्रवेश केला. यापूर्वी इंग्लंडला प्रत्येक वेळी इमिग्रेशन चेकिंगच्या रांगेत बराच वेळ उभे राहून इंटरव्ह्यू दिल्यानंतर त्या देशात प्रवेश मिळाला होता. अमेरिकेत ही प्रक्रिया अधिकच जटिल असेल अशी कल्पना होती. त्या मुलाखतीत विचारले जाणारे संभाव्य प्रश्न, त्यांची योग्य उत्तरे वगैरेचा गृहपाठ घोटून ठेवला होता, त्याला पुष्टी देण्यासाठी दाखवायची कागदपत्रे एका फायलीत घालून ती फाईल हाताशी ठेवली होती। खूप तयारी केली असली तर तिचा उपयोग करण्याची गरजच पडत नाही हे आपल्या अनुभवाला अनेक वेळा येते. एवढी जय्यत तयारी केलेली असल्यामुळे मी त्या बाबतीत निःशंक होतो. अगदी तसेच झाले आणि अमेरिकेत सुलभपणे प्रवेश मिळाला.

नेवार्कहून अॅटलांटाच्या प्रवासात विशेष कांही सांगण्यासारखे घडले नाही. अॅटलांटाला उतरल्यानंतर मात्र गंमतच झाली. 'बॅगेज क्लेम' असे लिहिलेला फलक पहात आम्ही एका सरळ सोट लांबच लांब कॉरीडॉरमधून चालत राहिलो. दहा पंधरा मिनिटे झाली तरी त्याचा अंत कांही दिसेना. त्या जागी जाण्यासाठी पॅसेजला समांतर धांवणा-या एका ट्रेनने जावे लागते असे कंटाळून चौकशी केल्यावर कळले । त्यातल्या पहिल्या दोन स्टेशनातले अंतर आम्ही चाललोच होतो, उरलेले ट्रेनने गेलो. तोंपर्यंत आमचे सामान आलेले होतेच, एवढेच नव्हे तर इतर प्रवासी आपापले सामान घेऊन गेलेसुध्दा होते. ते देशांतर्गत उड्डाण असल्यामुळे कदाचित तिच्यात फारसे चेक्ड बॅगेज नसावे. आमचे सामान बेल्टवरून उतरवून बाजूला ठेवले गेले होते. आणखी उशीर झाला असता तर ते सिक्यूरिटीच्या स्वाधीन झाले असते.

आम्हाला नेण्यासाठी अजय विमानतळाच्या आंतपर्यंत आला होता. त्याच्याबरोबर कारमध्ये बसून निघालो. थोड्याच वेळात गाडी एका महामार्गावर धांवू लागली. त्याच्या दोन्ही बाजूंना असलेली गर्द वनराई पाहून मला आश्चर्य वाटले. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (जीपीएस) संबंधी मी पूर्वी ऐकले होते. या वेळी प्रत्यक्ष पहायला मिळाले. आपल्याला कुठून कुठे जायचे आहे याचा पत्ता त्या यंत्राला दिला की त्यादोन्ही ठिकाणांमधल्या लहान मोठ्या गल्ल्यासकट आपला संपूर्ण मार्ग हे यंत्र दाखवते. त्यातील प्रत्येक वळणाची पूर्वसूचना देते, एवढेच नव्हे तर आपली गाडी उजव्या किंवा डाव्या लेनमध्ये ठेवण्याचा आदेश देत राहते. वाहन चालकांना हे एक वरदानच मिळाले आहे. आता गावोगांवचे रस्ते, चौक, एकतर्फी रस्ता, नो एंट्रीचे नियम वगैरे लक्षात ठेवण्याची गरज नाही. जीपीएस अगदी शब्दशः संपूर्ण प्रवासात 'मार्गदर्शन ' करते. त्याच्या आधाराने आम्ही अपेक्षित वेळेत अल्फारेटाला येऊन 'सुखरूप' पोचलो. अल्फारेटा हे अॅटलांटाचे
एक उपनगर असावे अशी माझी आतापर्यंत कल्पना होती. ते एक वेगळे टुमदार शहर आहे आणि आमचे राहण्याचे ठिकाण त्या शहराच्या उपनगरात आहे हे इथे आल्यानंतर समजले.

1 comment:

Unknown said...

घारे काका, मुंबई-ते-अल्फारेटा प्रवास वर्णन खुप आवडले. माझ्या आयुष्यातला पहिला विमान प्रवास मीही गेल्याच वर्षी मुंबई-ते-सनफ्रान्सिस्को असा केला. त्या वेळेच्या सर्वच आठवणी ह्या प्रवास वर्णनाने जाग्या केल्या. तेव्हा मीही असेच एक प्रवास वर्णन लिहिले होते, ते आज तुमच्यामुळे आठवले.
ब्लोग छान आहे. आणि तुमची थोड्क्यातली ओळख पण छान वाटली.
- सौ. अवनी