विज्ञानाची कहाणी
ऐका कृपया लक्ष देउनी, विज्ञानाची अजब कहाणी ।
कधी बाष्प तर बर्फ ही कधी, विविध रूपे धरते पाणी ।।
हिमालयावर अति थंडीने, बर्फाचे थर किति जमती ।
सूर्यकिरण पडता त्यांवरती, गंगा यमुना सरिता होती ।।
पृथ्वीवरल्या या पाण्याची, वाफ होयि जायी वरती ।
नभी पुन्हा एकत्र येउनी, ते कण ढग रूपे धरती ।।
थंड होउनी त्यांच्यातुनही, कोसळती त्या जलधारा ।
कधी गोठुनी बर्फ होउनी, गारांचाहि होतो मारा।।
जल असे पारदर्शक जरी, सूक्ष्म कण त्यांचे होती ।
दाट धुक्याच्या रूपाने ते, हवेलाच धूसर करती।
हवेतल्या या सूक्ष्म कणांचे, सुंदर दंवबिंदूही होती ।
प्रभातकाळी फुलांफुलांवर, किती पहा ते चमचमती ।।
या पाण्याने जरी व्यापली, आहे अपुली अवघी धरती ।
परि चांदोबाच्या ओढीने, नित्य सागरा येई भरती।।
आर्किमिडिजने या पाण्याचे, कथिले उद्धरण धर्म ।
बर्नौलीने दाखवले काही, जल प्रवाहाचे नियम ।।
* * *
भारत देशी प्राचिन काळी, होते महान ऋषी कणाद ।
विचार आगळे कथावयाचा, त्यांना होता हो भारी नाद ।।
जन म्हणती आहे वेदातच, भरलेले सगळेही ज्ञान ।
पण कणाद यांनी मांडियले, अपुले वैशेषिक तत्वज्ञान ।।
या विश्वाचा भव्य पसारा, निर्माण हा कसा हो झाला ।
याचा सखोल शोध घेण्याचा, दृढनिर्धार तयांनी केला ।।
अतिविशाल जे पर्वत असती, माती वायू अथवा नीर ।
सजीव पक्षी अन् प्राण्यांचे, वा किड्यांचे असे शरीर ।।
जे काही दिसणारे किंवा, असणारेही या जगतात ।
सारे अतिसूक्ष्म कणांचे गट, हा कथिला अणुसिद्धांत ।।
* * *
आर्यभट्ट प्राचीन भारती, झाले एक महान शास्त्रज्ञ ।
खगोल गणित या शास्त्रांचे, त्यांना होते अगाध ज्ञान ।।
बहु संशोधन करुनी तयांनी, संस्कृत ग्रंथ नवे लिहिले ।
वैज्ञानिक सिद्धांत अन् सूत्रे, यांना काव्यातचि रचिले ।।
नौकेमधुनी तीरावरली, जन जी झाडे बघतात ।
ती तर त्यांना मागे मागे, पळतांना हो दिसतात ।।
तद्वत सारे या नभातले, तारे ते स्थिर असतात ।
परि पृथ्वीच्या गतीमुळे ते, भासे आकाशी फिरतात ।।
अंशाच्या 'ज्या' 'कोज्या' यांचे, त्यांनी कोष्टक होते केले ।
परीघ आणिक त्रिज्या यांचे, मुख्य सूत्र ही सांगितले ।।
त्यांच्या संबंधातचि असतो , 'पाय' नावे विशिष्ट अंक ।
मूल्य तयाचे आर्यभटांनी, सांगितले अगदी अचुक ।।
मूढ जनां परि महत्व या, विज्ञानाचे नाही कळले ।
काळाच्या ओघात सर्व ते, ज्ञानच झाकुनिया गेले ।।
* * *
दीर्घ काळ विज्ञानसाधना, जगात लोपुनिया गेली।
पण काही शतकांच्या नंतर, युरोपात जागृत झाली ।।
कोपरनिकस नावाचा होता, पोलंड या युरोपी देशी ।
ज्ञानी धर्मगुरू होता पण, सदा लक्ष देइ आकाशी।।
ग्रह ताऱ्यांचे सूक्ष्म निरिक्षण, करतांना बहु वर्षे त्याने ।
कुठला ग्रह कोण्या राशीत, नोंद ठेवली नित नेमाने ।।
सूर्य चंद्र बुध शुक्र तारका, मंगळ बृहस्पती व शनी ।
भ्रमण कसे करतात नभी, अभ्यासाचा या ध्यास मनी ।।
रविची होई एका वर्षात, बारा राशींतून भ्रमंती।
बुध शुक्र हे सदा सर्वदा, त्याच्या जवळच वावरती।।
गुरू घेतसे बारा वर्षे, शनी शनैःशनैः फिरतो ।
तो तर तब्बल तीस वर्षे, एका भ्रमणाला घेतो ।।
मंगळ मोठा कलंदर ग्रह, नसतो त्याचा नेम कधी ।
जलद कधी तर हळू जातसे, मार्गी किंवा वक्रि कधी।।
ग्रहांच्या भ्रमणामधली ही, विसंगती त्याला खुपली ।
या विश्वाच्या निर्मात्याने, चूक नसेल अशी केली।।
होता दृढ विश्वास तयाचा, मग अपुले कोठे चुकते ।
सूर्य मधोमध असे कल्पुनी, त्याने सगळी केली गणिते ।।
सुसंगती त्यातली पाहुनी, त्याची पक्की खात्री झाली ।
सूर्यमालिका नवी कल्पना, त्याने निजग्रंथी मांडियली ।।
अज्ञ जनांना दोन शतके, तरिही ती नव्हती पटली ।
परी जाणत्या शास्त्रज्ञांनी, नंतर ती उचलुनि धरली ।।
प्रत्यक्षात या सर्व ग्रहांचे, सूर्य भ्रमण न दिसे कोणा ।
पण विज्ञानाच्या किमयेने हे, झाले जगती मान्य जना ।।
* * *
- आनंद घारे




No comments:
Post a Comment