Tuesday, February 03, 2026

पंच (PUNCH) प्रपंच

 मी तेरा वर्षांपूर्वी लिहिलेल्या पंचलाइन या लेखाचा विस्तार करून आणि त्यात चित्रे टाकून तो इथे दिला आहे. या कामात थोडी ए आयची मदतही घेतली आहे

पंच (PUNCH) प्रपंच  - १

पंचमहाभूते, पंचप्राण, पंचपरमेश्वर, पंचम, पंचांग वगैरेंमधल्या पाच या अर्थाने येणाऱ्या पंचांचा प्रपंच मला या लेखात करायचा नसून इंग्रजी भाषेमधल्या 'पंच' (PUNCH) या शब्दाचा थोडासा पंचनामा करायचा विचार आहे. मी हा शब्द पहिल्यांदा ऐकला तेंव्हा मी प्राथमिक शाळेत शिकत होतो. माझ्या मोठ्या भावासोबत गणपतीच्या मखराची सजावट करतांना त्यावर काढलेल्या एका डिझाईनला मी ठिपक्याठिपक्यांची बॉर्डर काढली. पण ते ठिपके नीट वर्तुळाकार आले नाहीत आणि शिवाय ते एकसारखे न आल्यामुळे चित्राची शोभा वाढण्याऐवजी कमी झाली असे वाटले. ते ठिपके कसे झाकता येतील असा विचार करतांना माझ्या भावाला एक युक्ती सुचली. 


त्याने वडिलांच्या कपाटातून पकडीसारखे दिसणारे एक हत्यार आणले आणि त्यात एक कागद सरकवून जोराने दाबले. कट्ट असा आवाज आला आणि कागदाला लहानसे गोल भोक पडले आणि पकड सैल करताच तेवढ्या आकाराची कागदाची चकती बाहेर पडली. ते पाहून मला खूप मजा वाटली आणि निरनिराळ्या रंगाच्या कागदांना त्या यंत्राने चावे घेऊन मी खूप रंगीबेरंगी चकत्या पाडल्या. त्यातली एक एक चकती गोंदाने मखराला चिकटवून आम्ही ते खूप सजवले. कोणाला न विचारता त्या औजाराला हात लावला आणि कागदांची नासाडी केली म्हणून आम्ही बोलणी खाल्ली, पण एक नव्या प्रकारची सजावट केल्याचे समाधान मिळाले आणि त्याचे थोडे कौतुकसुध्दा झाले. त्या औजाराला 'पंच' म्हणतात असे समजले, पण कागदाला एका वेळी फक्त एकच भोक पाडणाऱ्या यंत्राला पंच असे का म्हणायचे हे समजले नाही आणि ते समजून घेण्याचा प्रयत्नही करावा असे तेंव्हा वाटले नाही. खरे तर 'पंच' हा एक इंग्रजी भाषेतला शब्द आहे हे सुध्दा मला त्या वेळी माहित नव्हते. माझ्या दृष्टीने ते भोक पाडणे मुळी महत्वाचे नव्हतेच, त्यातून पडलेल्या टिकल्या माझ्या उपयोगाच्या होत्या. माझ्यासाठी ते कागदाला छिद्र पाडण्याचे यंत्र नसून कागदाच्या टिकल्या तयार करण्याचे साधन होते. त्या साधनाला 'सिंगल पंच' असे म्हणतात आणि बरेच कागद एकत्र बांधून ठेवण्यासाठी त्यांच्या वरच्या कोपऱ्यात त्या पंचने भोके पाडली जात असत. कदाचित त्या काळात स्टेपलर हा प्रकार उपलब्ध नसावा म्हणून कागदांना दोऱ्याने बांधून ठेवत असतील. आमच्या घरी आलेली सगळी पत्रे आम्ही त्यांना भोक पाडून एका मोठ्या वाकड्या तारेत अडकवून ठेवत असू. एकाच वेळी अनेक कागदांना ठराविक अंतरावर  दोन गोल भोके पाडणारे 'डबल पंच' सुध्दा असते, त्याचा उपयोग ऑफिसमधल्या कागदांना फाईलमध्ये अडकवून ठेवण्यासाठी होतो वगैरे ज्ञान मला त्यानंतर कित्येक वर्षांनंतर झाले. आजकाल पेपरलेस ऑफिसे झाल्यामुळे ऑफिसांमध्ये फाइलींची कॅबिनेटसुद्धा नसतात, तिथे डबल पंचही ठेवली जात नसतील.

पंच (PUNCH) प्रपंच  - २

इंग्लिश भाषा शिकतांना 'पंच' म्हणजे 'जोराचा ठोसा मारणे' हा अर्थ समजला. 'चलतीका नाम गाडी' सिनेमातल्या अशोककुमारापासून ऑलिंपिकमध्ये पदक मिळवणाऱ्या मेरी कोमपर्यंत अनेक मुष्टीयोध्द्य़ांनी मारलेले जबरदस्त ठोसे आणि त्या खेळामधली गुद्दागुद्दी सिनेमात किंवा टीव्हीवर पाहतांना 'पंच' या शब्दाचे प्रात्यक्षिक पहायला मिळाले. या बॉक्सर लोकांना सराव करण्यासाठी डाव्याउजव्या हातांनी एका मागोमाग एक ठोसे भराभर मारून पाहणे आवश्यक असते, पण त्यांच्यासाठी आपले थोबाड सुजवून घ्यायला कोण तयार होईल?

 त्यांचे ठोसे खाण्यासाठी एक पंचिंग बॅग समोर टांगून ठेवतात आणि हे वीर त्यावर 'दे दणादण' करतात. ही पंचिंग बॅग सहसा चामड्याची, सिंथेटिक लेदरची किंवा कॅनव्हासची बनलेली असते आणि त्यामध्ये वाळू, कापडाचे तुकडे किंवा धान्य भरलेले असते. पंचिंग बॅगवर सराव केल्यामुळे शरीराचा वरचा भाग, हात आणि खांदे मजबूत होतात,  तसेच वजन कमी करण्यास मदत होते. शिवाय रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा मानसिक तणाव कमी करण्यासाठी पंचिंग बॅगवर सराव करणे प्रभावी ठरते आणि पंच मारण्याचे तंत्र आणि ताकद सुधारते, जे स्वसंरक्षणासाठी उपयुक्त ठरते.

यावरून 'पंचिंग बॅग' असा एक वाक्प्रचार तयार झाला आहे. एकादा गरीब बिचारा सोशिक माणूस भेटला तर इतर लोक त्याच्यावर डाफरून आपला राग काढून घेतांना त्याचा वापर 'पंचिंग बॅग' सारखा करतात. 'पंचिंग बॅग' (Punching Bag) हा शब्द जेव्हा एखाद्या व्यक्तीसाठी वापरला जातो, तेव्हा तो अलंकारिक किंवा प्रतिकात्मक अर्थाने वापरला जातो. याचा सोपा अर्थ असा की, अशी व्यक्ती जिचा वापर इतर लोक आपला राग काढण्यासाठी किंवा छळण्यासाठी करतात. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचा राग, चिडचिड किंवा अपयश दुसऱ्यावर काढते, तेंव्हा ज्याच्यावर हा राग काढला जातो त्याला 'पंचिंग बॅग' म्हटले जाते. ती व्यक्ती समोरच्याचे बोलणे किंवा वागणूक निमूटपणे सहन करते. जर एखाद्या ऑफिसमध्ये बॉस किंवा वरिष्ठ कर्मचारी त्यांच्या चुकांचे खापर वारंवार एकाच कनिष्ट कर्मचाऱ्यावर फोडत असतील किंवा त्याला सतत बोलत असतील, तर त्या कर्मचाऱ्याला ऑफिसची 'पंचिंग बॅग' म्हटले जाते. राजकारणात जेव्हा एखादा पक्ष किंवा नेता सर्व समस्यांसाठी दुसऱ्या एखाद्या नेत्याला किंवा पक्षाला सतत जबाबदार धरतो आणि त्यांच्यावर टीका करतो आणि तो त्याला प्रत्युत्तर देत नसेल तर, तेव्हा त्या नेत्याला 'राजकीय पंचिंग बॅग' म्हटले जाते. थोडक्यात सांगायचे तर ज्याप्रमाणे जिममधील पंचिंग बॅगवर कोणीही येऊन प्रहार करू शकतो आणि ती बॅग काहीही न बोलता ते ठोसे सहन करते, त्याचप्रमाणे समाजात जी व्यक्ती इतरांचा अन्याय, राग किंवा टोमणे निमूटपणे सहन करते, तिला 'ह्युमन पंचिंग बॅग' (Human Punching Bag) असे संबोधले जाते. आपल्याला अशा पंचिंग बॅग आजूबाजूला दिसत असतात आणि कधीकधी त्यांची कींव येते. आपण मात्र संधी मिळते आहे म्हणून एखादा पंच (ठोसा) मारून घ्यायचा मोह टाळायला हवा.

पंच (PUNCH) प्रपंच  - ३
मला मेकॅनिकल इंजिनियरिंग शिकत असतांना वस्तूंना आकार देण्यासाठी (मेटल वर्किंगमध्ये) 'डाय आणि पंच' या अवजारांचा वापर करणे शिकायला मिळाले. तापवलेल्या लोखंडाच्या गोळ्यापासून हातोडा, क्रँकशाफ्ट यासारख्या विशिष्ट आकारांच्या वस्तू किंवा पातळ पत्र्यामधून चमचा, झाकण अशासारख्या वस्तू तयार करण्यासाठी त्यांना डाय आणि पंच या जोडीमध्ये ठेवून जोरात ठोकले जाते. एका पत्र्यामधून लहान लहान आकाराच्या अनेक वस्तू काढण्यासाठी किंवा त्या पत्र्याला विविध आकाराची अनेक छिद्रे पाडून त्याची जाळी किंवा चाळण बनवण्यासाठी पंचिंग मशीने असतात. कागदाला भोके पाडायच्या पंचचेच हे मोठे अवतार असतात. कागदाला भोके पाडायचे काम हाताच्या बोटांच्या जोराने करता येते, पण धातूंना आकार देण्यासाठी खूप शक्ती लागते म्हणून कारखान्यामधील पंचवर दाब देण्यासाठी यांत्रिक हातोडे किंवा हायड्रॉलिक सिलिंडर्स असतात. मोटारीच्या किंवा दुचाकीच्या मुख्य आकारांना सगळ्या बाजूने गोलाई दिलेली असते. लोखंडाच्या पत्र्यांना मोठमोठ्या डाय आणि पंच यामधून दाब देऊन वाकवून हे आकार तयार केले जातात. एका डायपंचमधून शेकडो पार्ट तयार होत असतात आणि ते तंतोतंत एकासारखे एक असतात. म्हणूनच आपल्याला कारचे किंवा स्कूटरचे मॉडेल त्यांच्या बाह्य आकारावरूनच पटकन समजते. अर्थातच या सगळ्या कामांमध्ये 'पंच' म्हणजे जोर लावून ठोकणे अथवा दाबणे येते.


डाय आणि पंच (Die and Punch) हे प्रामुख्याने मॅन्युफॅक्चरिंग (उत्पादन) क्षेत्रात वापरले जाणारे अत्यंत महत्त्वाचे टूल्स आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर, एखाद्या धातूच्या शीटला किंवा वस्तूचा ठराविक आकार कापण्यासाठी किंवा देण्यासाठी यांचा जोडीने वापर होतो. पंच (Punch) हा वरचा भाग असतो जो दाब देण्याचे काम करतो आणि डाय (Die): हा खालचा भाग असतो ज्यामध्ये हवा तो आकार कोरलेला असतो. जिथे मोठ्या प्रमाणात (Mass Production) आणि अचूक आकारात वस्तू बनवायच्या असतात, तिथे डाय आणि पंचचा वापर अनिवार्य असतो. यामधून वाहनांचे दरवाजे, बोनेट आणि इतर पत्र्यांचे भाग, इंजिनाचे भाग किंवा हातोडा, रेंच, स्पॅनर यासारखी औजारे तर बनवतातच, पण टाकसाळीमध्ये पाडली गेलेली नाणी आणि औषधांच्या पावडरपासून तयार केलेल्या गोळ्यासुद्धा पंच आणि डायमधून तयार केल्या जातात.

पंच (PUNCH) प्रपंच  - ४
मी नोकरीला लागल्यानंतर अनेक कारखान्यांना भेटी देतांना त्यांच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी (मेन गेटपाशी) असलेले टाईम ऑफीस दिसायचे. पूर्वीच्या काळी तिथे काम करणारे टाईमकीपर प्रत्येक कामगाराच्या नावाचे एक कार्ड बनवून ती सगळी कार्डे एका बोर्डावर लावून ठेवत असत. प्रत्येक कामगाराने कारखान्यात प्रवेश करतांना आणि कारखान्याच्या बाहेर पडतांना आपापले कार्ड तिथल्या पंच कार्ड मशीनवर पंच करून घ्यावे लागत असे. 


रेल्वे तिकीटावर छापतात त्याप्रमाणे त्या कार्डावर तारीख, वेळ वगैरे छापले जात असे. कामगारांच्या शिफ्टची वेळ संपून गेल्यानंतर टाईमकीपर सर्व कार्डे पाहून कोण कोण कामावर आले, वेळेवर आले की उशीराने आले वगैरे माहिती ऑफीसला कळवीत असत. महिनाअखेर कर्मचाऱ्याने किती दिवस काम केले, किती दिवस सुटी घेतली आणि किती ओव्हरटाईम (OT) केला, याची माहिती टाईम ऑफिसकडूनच पगार विभागाला दिली जात असे आणि त्यानुसार कामगाराला पगार मिळत असे. पूर्वीच्या काळी कर्मचाऱ्यांची उपस्थिती हजेरीपटावर (Musters) सही करून घेतली जात असे. परंतु, कामात पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी 'कार्ड पंचिंग' पद्धत सुरू झाली.
आता सगळ्या गोष्टी इलेक्ट्रॉनिक झाल्या असल्यामुळे कामगार आपल्याकडे असलेले स्मार्ट आयडेंटिटी कार्ड तिथल्या यंत्राला फक्त दाखवतात किंवा स्वाइप करतात, ज्यामुळे त्यांची वेळ आपोआप सिस्टिममध्ये नोंदवली जाते.  काही ठिकाणी तर फक्त हाताचा आंगठा उमटवून किंवा आपला चेहेरा दाखवून काम होते. ते पाहून त्या कामगाराच्या येण्याजाण्याची वेळ वगैरे सगळी माहिती आपोआप कारखान्यातल्या मुख्य संगणकात नोंदली जाते. ते काम करण्यासाठी आता वेगळा टाईमकीपर लागत नाही. आता ही डिजिटल प्रक्रिया अधिक प्रचलित असली तरीसुध्दा या प्रणालीला अजूनही  व्यवहारात अजूनही 'पंचिंग' असेच म्हटले जाते. 
अगदी अलीकडच्या काळात म्हणजे कोविडनंतर वर्क फ्रॉम होम सुरू झाले. तिथे मात्र कांप्यूटरवर लॉग इन लॉग आउट केले जाते. त्यामुळे त्यांच्या बाबतीत हे 'पंचिंग' आता कालबाह्य झाले आहे.

पंच (PUNCH) प्रपंच  - ५
मोठ्या हॉटेलात किंवा पार्टीजमध्ये दिल्या जाणाऱ्या पेयांमध्ये अनेक वेळा 'फ्रूटपंच' या पेयाचा समावेश असतो. यात फळांना ठोसे मारून किंवा ठेचून ते काढले जाते की काय असे वाटेल. या पंचमध्ये मद्यार्कयुक्त पेयेसुध्दा असतात, त्यात कशाला ठोकले असेल? ही बहुतेक पेये कॉकटेल्स म्हणजे मिश्रपेये असतात. कदाचित याच्या नावाचा उगम संस्कृतमधल्या पंचवरून पाच पेयांचे मिश्रण असा झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण बहुधा त्यातल्या मद्यार्कामुळे थोडीसी किक येते, त्यालाच पंच म्हंटले असेल.


फ्रूट पंचची काही खास वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
फळांचे मिश्रण: यात संत्री, अननस, सफरचंद, द्राक्षे आणि लिंबू अशा विविध फळांच्या रसांचा वापर केला जातो.
फळांचे तुकडे: पेयाची चव आणि सौंदर्य वाढवण्यासाठी त्यात स्ट्रॉबेरी, टरबूज किंवा अननसाचे बारीक तुकडे टाकले जातात.
गोडवा आणि थंडावा: चवीनुसार साखर किंवा मध वापरले जाते आणि भरपूर बर्फ टाकून ते थंड केले जाते.
तयार करण्याची कृती: एका मोठ्या भांड्यात सर्व फळांचे रस एकत्र करावेत. त्यात चिरलेली फळे आणि बर्फ टाकावा. सर्व्ह करण्याच्या अगदी थोडा वेळ आधी त्यात सोडा किंवा स्प्राइट मिसळावे जेणेकरून त्याचा फसफसाट टिकून राहील.

पंच (PUNCH) प्रपंच  - ६
पन्नास साठ  वर्षांपूर्वी भारतातील उद्योगव्यवसायात काँप्यूटरचा वापर सुरू झाला तेंव्हा ते काम फक्त मेन फ्रेम काँप्यूटरवर होत असे. आज सर्वत्र दिसणारे पीसी, लॅपटॉप,  टॅब्लेट, हार्ड ड्राइव्ह, फ्लॅश ड्राइव्ह, सीडी, डीव्हीडी, डाँगल, पेन्ड्राइव्ह वगैरेतले काहीसुध्दा त्या काळात नव्हते. तेंव्हा काँप्यूटरशी संवाद सांधणारा की बोर्डसुद्धा नव्हता. संगणकाला माहिती पुरवण्यासाठी पंच  केलेल्या कार्डांचा उपयोग केला जात असे. त्यासाठी एबीसीडी सारखी अक्षरे आणि १२३४ सारखे अंक यांसाठी ठरलेल्या कोडनुसार एका कार्डावर निरनिराळ्या अंतरावर चौकोनी आकाराचे लहान लहान स्लॉट्स पाडत असत. इनपुट म्हणून अशा कार्डांचा गठ्ठा काँप्यूटरच्या कार्ड रीडरमध्ये घातल्यावर त्यातले एक एक कार्ड त्यातल्या प्रकाशझोतात आले की छिद्रांमधून पलीकडे गेलेल्या प्रकाशावरून किंवा त्यामधून गेलेल्या विद्युत प्रवाहामधून ती माहिती संगणकाला मिळे आणि त्याचे सॉर्टिंग, बेरजा, वजाबाक्या वगैरे करून अखेर प्रिंटआउटमधून औटपुट मिळत असे. त्यावेळी आमच्या ऑफीसात काँप्यूटर आला नव्हता आणि आमचे डेटाबेसचे संगणकीय काम टीआयएफआर मध्ये होत असे. पण मला त्याची जुजबी माहिती होती. मी अशी काही पंच केलेली कार्डे पाहिली होती.


१९५० ते १९७० च्या दशकात आयबीएम (IBM) सारख्या कंपन्यांचे संगणक चालवण्यासाठी मुख्यत्वे या कार्डांचा वापर होत असे. सुरुवातीला बँका आणि विमा कंपन्यांमध्ये ग्राहकांचा डेटा साठवण्यासाठी आणि हिशोब ठेवण्यासाठी याचा वापर सुरू झाला. पंच कार्ड हे साधारणपणे एका कडक कागदाचे कार्ड असायचे. त्यावर माहिती भरण्याची पद्धत खालीलप्रमाणे होती:
डेटा पंचिंग (Punching): एका विशिष्ट यंत्राद्वारे (Keypunch Machine) कार्डवर ठराविक ठिकाणी छिद्रे (Holes) पाडली जात. प्रत्येक छिद्र एका विशिष्ट अक्षराचे किंवा अंकाचे प्रतीक असे.  कोडिंग (Coding): छिद्र पाडलेले स्थान म्हणजे '१' (On) आणि छिद्र नसलेले स्थान म्हणजे '०' (Off) असा हा बायनरी कोडचा प्राथमिक प्रकार होता. ही कार्डे 'कार्ड रीडर' मशीनमध्ये टाकली जात. मशीनमधील सेन्सर्स किंवा ब्रश त्या कार्डावरील माहिती वाचून ती माहिती संगणकाकडे पाठवत असत आणि संगणक त्या माहितीनुसार गणिते किंवा वर्गीकरण करत असे. एका कार्डवर साधारणपणे ८० अक्षरे किंवा आकडे साठवता येत असत. प्रत्येक डेटाबेससाठी अशा कार्डांचा गठ्ठा तयार केला जात असे. 

पंच (PUNCH) प्रपंच  - ७

त्या काळात मी एकदा माझ्यापेक्षा सर्वच दृष्टीने फार मोठ्या असलेल्या माझ्या नात्यातल्या एका बुजुर्ग व्यक्तीला भेटायला गेलो होतो. समाजसेवा किंवा देशकार्यासाठी ते सारखे भ्रमण करत असत आणि घरी आलेल्या वेळीसुध्दा त्यांना भेटायला आलेल्या लोकांचा वेढा त्यांना पडलेला असे. मी त्यांच्याकडे गेलो होतो त्यावेळीसुध्दा त्यांचा दरबार भरलेलाच होता. मला दारात पाहताच त्यांनी हाक मारून बोलावले आणि समोर बसवून घेतले. चहापान करता करता हवापाणी, तत्कालीन घटना वगैरे सामान्य विषयावर त्यांच्या गप्पागोष्टी चालल्या होत्या. या वार्तालापात बहुतेक वेळा फक्त तेच बोलत होते, त्यांनी विनोद केला की इतरांनी खिदळायचे, ते गंभीर झाले की गंभीर चेहरा करून "आता कसे होईल?, आता काय करायचे?" वगैरे म्हणायचे, त्यावर त्यांनी काही मार्गदर्शन केले की सगळ्यांनी माना डोलवायच्या असे चालले होते. त्या वेळातच आमचे आणखी एक नातेवाईक आत आले, अत्यंत आदरपूर्वक रीतीने एक आमंत्रणपत्रिका आणि अक्षता त्या गृहस्थांच्या हातात ठेऊन म्हणाले, "आपल्या --- रावांच्या मुलाचे लग्न ठरले आहे. खरे तर आमंत्रण देण्यासाठी ते स्वतःच येणार होते, पण आता त्यांना लांबचा प्रवास झेपत नाही म्हणून त्यांनी हे काम माझ्याकडे सोपवले आहे. तरी आपण सर्वांनी या लग्नाला अवश्य यावे."
पत्रिका उघडून पाहता पाहता नेताजींनी विचारले, "हा नवरा मुलगा म्हणजे लहान असतांना आपल्याकडे यायचा तो चंदूच ना? आता तो काय करतो आहे?"
"तो एलआयसीम्ध्ये पंचऑपरेटर आहे."
"म्हणजे...? " असा क्षणभर स्वतःशीच विचार करत आणि इतर कोणालाही त्यावर बोलण्याची संधी न देता ते पटकन उद्गारले, "त्या एलआयसीच्या नोटिशींना दोन्ही बाजूने रांगेत भोके पाडलेली असतात ना? ते करायचे काम असेल."
पंच ऑपरेटर असलेला तो नवरदेव काय काम करतो हे बहुधा त्या नातेवाईकांना ठाऊक असेलही, पण तिथे ते त्यावर काही बोलले नाहीत. मी काही बोलू शकलो असतो पण त्यावर "एवढ्या मोठ्या माणसाला शहाणपणा शिकवणारा हा चोंबडा कोण आला?" असेच दरबारातल्या सर्वांना वाटले असते म्हणून मीही गप्प राहिलो. त्यानंतर दोन तीन वर्षांनी मी पुन्हा एकदा त्यांच्याकडे गेलेलो असतांना योगायोगाने कुणाच्या तरी बोलण्यामधून त्याच मुलाचा विषय निघाला.
"म्हणजे एलआयसीच्या नोटिशींना भोके पाडतो तोच ना?" ते पटकन उद्गारले. त्यांची स्मरणशक्ती तल्लख होती आणि त्यांनी पूर्वी करून घेतलेला पूर्वग्रह अजून सुटला नव्हता. पंच ऑपरेटरचे काम काय असते? हे मधल्या काळात त्यांना कोणी सांगितलेले दिसत नव्हते आणि काँप्यूटर प्रिंटआउटच्या कागदांना दोन्ही बाजूने भोकांच्या रांगा कशासाठी असतात? किंवा ती भोके कुठल्या कारखान्यात पाडली जातात? वगैरे माहितीही त्यांना कुणीच दिली नव्हती.
"आता तो ब्रँच मॅनेजर झाला आहे." हे उत्तर थोडे धक्कादायक होते. कागदाला भोके पाडायचे साधे काम करणारा मजूर एकदम ब्रँच मॅनेजर कसा झाला?
"पुरुषस्य भाग्यम् देवो न जानाति .." किंवा "हल्लीच्या सरकारच्या राज्यात काय काय होईल काही सांगता येत नाही." अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दरबारी मंडळींमधून आल्या.
आता कार्डपंचिंगचे कामही शिल्लक राहिले नाही. त्यामुळे यातला विनोदही कुणाला समजणार नाही.

पंच (PUNCH) प्रपंच  - ८

व्यंगचित्रांना वाहून घेतलेले 'पंच' (Punch) किंवा 'द लंडन चॅरिव्हरी' (The London Charivari) या नावाचे एक ब्रिटीश विनोद आणि उपरोधाचे (satire) अत्यंत प्रभावशाली साप्ताहिक होते. १८४१ ते २००२ या दीर्घ कालावधीत या मासिकाने केवळ ब्रिटनवरच नाही, तर जगातील विनोदी साहित्यावर मोठी छाप पाडली. आज आपण ज्या अर्थाने 'कार्टून' (व्यंगचित्र) हा शब्द वापरतो, तो सर्वप्रथम 'पंच' मासिकाने रूढ केला.'पंच'ने सरकारी कामांमधील उणिवा दाखवण्यासाठी उपरोधाने हा शब्द वापरायला सुरुवात केली. 'पंच' हे केवळ विनोदाचे साधन नव्हते, तर तो व्हिक्टोरियन काळापासून २० व्या शतकापर्यंतच्या ब्रिटीश समाजजीवनाचा आरसा होता. यात ब्रिटीश राजवटीवरही अनेकदा मार्मिक भाष्य केले जात असे.  राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामधला ढोंगीपणा व्यंगचित्रामधून दाखवतांना त्यांनी केलेल्या पंचिंगमुळे ढोंगीपणाचे अनेक फुगे फुटले होते. या मासिकाने जागतिक व्यंगचित्रकलेच्या इतिहासात काही अत्यंत अजरामर चित्रे दिली होती. या मासिकातील चित्रांची शैली ही बारीक रेषांची आणि सखोल अर्थाची (Detailed hatching) असे, ज्याचा प्रभाव आजही अनेक व्यंगचित्रकारांवर दिसून येतो. लंडनच्या 'पंच' (Punch) मासिकाच्या लोकप्रियतेनंतर भारतातही उपरोधिक आणि विनोदी साहित्याची लाट आली. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात 'पंच'च्या धर्तीवर जवळपास ७० हून अधिक छोटी-मोठी साप्ताहिके आणि मासिके सुरू झाली होती.
हिंदु पंच हे मराठीतील पहिले 'पंच' मानले जाते. १८७० ते १९०९ या काळात हे साप्ताहिक मुंबईतून प्रकाशित होत असे. या नियतकालिकाने मराठी साहित्यात विनोदी आणि उपरोधिक पत्रकारितेची सुरुवात केली. यात केवळ विनोदच नव्हते, तर सामाजिक आणि राजकीय विषयांवर मार्मिक भाष्य असायचे.  हे मराठी पत्रकारितेच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि धाडसी साप्ताहिक होते. लंडनच्या 'पंच' मासिकाच्या धर्तीवर भारतात जे अनेक प्रयोग झाले, त्यातील हे सर्वात प्रभावशाली मराठी प्रकाशन ठरले. श्री.धोंडो काशिनाथ फडके हे याचे सर्वात प्रसिद्ध संपादक होते. त्यांच्या धारदार लेखणीमुळे हे साप्ताहिक लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. ब्रिटीश सरकारचे अन्यायकारक कायदे, नोकरशाहीचा अहंकार आणि तत्कालीन समाजातील अनिष्ट प्रथा यांवर हे साप्ताहिक सडकून टीका करत असे. पण त्याकाळी ब्रिटीश सरकारचे कडक सेन्सॉरशिप कायदे होते. त्यामुळे थेट टीका करण्याऐवजी 'हिंदू पंच'मध्ये रूपकात्मक कथा किंवा संवादांचा वापर केला जाई. हे साप्ताहिक प्रामुख्याने लोकमान्य टिळक यांच्या विचारांचे समर्थक मानले जाई. भारतीयांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करावा आणि आपल्या हक्कांबद्दल जागृत राहावे, यासाठी हे साप्ताहिक सातत्याने लिहीत असे. 'हिंदू पंच'ची टीका ब्रिटीश सरकारला इतकी बोचू लागली की, १९०९ मध्ये संपादक धोंडो काशिनाथ फडके यांच्यावर राजद्रोहाचा (Sedition) खटला भरण्यात आला. त्यांच्या काही लेखांमुळे जनतेत असंतोष पसरत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. या खटल्यात फडके यांना तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. संपादकांना अटक झाल्यामुळे आणि सरकारी दडपशाहीमुळे १९०९ मध्ये हे ऐतिहासिक साप्ताहिक बंद पडले.

जगप्रसिद्ध उर्दू कवी अकबर इलाहाबादी यांनी असे सांगितले होते: "खींचो न कमानों को न तलवार निकालो, जब तोप मुकाबिल हो तो अख़बार निकालो।" याचा अर्थ जेव्हा शत्रू समोरून तोफांनी हल्ला करत असेल, तेव्हा धनुष्यबाण किंवा तलवार काढून उपयोग नाही; अशा वेळी 'वृत्तपत्र' (अखबार) काढा. म्हणजेच, शस्त्राच्या लढाईपेक्षा लेखणीची आणि विचारांची लढाई अधिक प्रभावी असते. अकबर इलाहाबादी हे अवध पंच या नियतकालिकाचे एक मुख्य आधारस्तंभ आणि लेखक होते.

नंतरच्या काळातही या अनेक भाषांमधील पंचांवरून प्रेरणा घेऊन शंकर्स वीकली आणि मार्मिक यासारखी अनेक साप्ताहिके देशोदेशी निघाली.  मार्मिककर्ते माननीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांमध्ये जसा पंच होता तसाच किंबहुना त्याहूनही जबरदस्त पंच त्यांच्या लेखनात आणि वक्तृत्वातही होता. 'मार्मिक' हे साप्ताहिक महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासातील एक मैलाचा दगड आहे. विशेषतः मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारे हे एक प्रभावी माध्यम ठरले. 'मार्मिक'चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची व्यंगचित्रे. लंडनच्या 'पंच' मासिकाप्रमाणेच, बाळासाहेबांनी रेषांच्या माध्यमातून राजकारण्यांवर आणि सामाजिक विसंगतीवर ओढलेले आसूड प्रचंड लोकप्रिय झाले. बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांच्या मालिकेला 'फटकारे' म्हंटले जाई, जे आजही राजकीय व्यंगचित्रकलेचा आदर्श मानले जातात. 

पंच (PUNCH) प्रपंच  - ९

लेखनामध्ये, विशेषतः विनोदामध्ये किंवा किस्सा सांगतांना पंचलाईन फार महत्वाची असते. पहिल्या सगळ्या मजकुरामधल्या अर्थाला शेवटच्या एका ओळीने एकदम वेगळे वळण लागते आणि त्यातून हास्याचा स्फोट होतो. पंचलाइन (Punchline) म्हणजे कोणत्याही विनोदाचा, कथेचा किंवा संवादाचा तो शेवटचा भाग, जो श्रोत्यांना हसवतो किंवा थक्क करतो. एखाद्या उत्कृष्ट पंचलाइनमध्ये संपूर्ण संभाषणाचा रोख बदलण्याची ताकद असते. एखादा जोक कितीही लांब असला, तरी लोक वाट पाहतात ती शेवटच्या त्या एका वाक्याची! ते वाक्य म्हणजेच 'पंचलाइन'. साध्या शब्दांत सांगायचे तर, पंचलाइन म्हणजे "अनपेक्षित वळण". जेव्हा श्रोत्यांना वाटते की गोष्ट एका दिशेला जात आहे, तेव्हा अचानक पंचलाइनच्या माध्यमातून तिला वेगळे वळण दिले जाते आणि तिथेच विनोदाचा स्फोट होतो. पंचलाइन नेहमी अनपेक्षित असावी लागते. जर श्रोत्यांनी शेवट आधीच ओळखला, तर तो विनोद फ्लॉप ठरतो. विनोदात 'टायमिंग'ला खूप महत्त्व आहे. योग्य वेळी, योग्य शब्दांत मारलेली पंचलाइनच प्रभावी ठरते. पंचलाइन जितकी छोटी आणि टोकदार असेल, तितकी ती जास्त लक्षात राहते. पंचलाइनचे उपरोधिक (Sarcastic), शाब्दिक कोट्या (Puns), स्वयं-उपहास (Self-deprecating) इत्यादि विविध प्रकार आहेत.

अनपेक्षित वळण देणाऱ्या पंचलाइनचे एक उदाहरण खाली दिले आहे.
ती धावत धावत जिने चढून गच्चीवर गेली. तिला धाप लागल्यामुळे गच्चीवर गेल्यावर ती उभी राहिली. तिच्या पाठोपाठ तोही धावत वर गेला. त्यांनी भराभरा शर्ट, पँट काढली, साडी, ब्लाऊज, पेटीकोट आणि इतर सगळे कपडेही काढले.
.
.
.
दोरीवर वाळत घातलेले सारे कपडे घेऊन पावसाची सर यायच्या आत दोघेही खाली उतरले.

पंचलाईन अशी असते.

(समाप्त)


No comments: