मी पूर्वी कित्येक वर्षे अगदी रोज नाही तरी दोन तीन दिवसात एकदा रोजनिशी लिहून त्या दिवसांमध्ये घडलेल्या महत्वाच्या घटना, केलेले प्रवास, भेटलेली माणसे, केलेले निरीक्षण, विश्लेषण, निष्कर्ष, घेतलेले निर्णय, केलेली कामे किंवा महत्वाची खरेदी वगैरेंच्या सविस्तर नोंदी करून ठेवत होतो आणि वर्षाअखेर त्या वाचून पुनःप्रत्ययाचा आनंद घेत होतो. पण ते दुसऱ्या कुणाला जाहीरपणे सांगत नव्हतो. मी अशा तीस चाळीस डायऱ्या जमा करून ठेवल्या होत्या आणि सेवानिवृत्तीनंतर निवांतपणे त्यातल्या नोंदींवरून पुस्तक(पुस्तके) लिहायचा विचारही केला होता, कारण एके काळी सगळे मोठे लोक तसे काही तरी करत होते असे मी कुठेतरी वाचले होते. पण मी सेवेमधून निवृत्त झाल्यानंतरसुद्धा बदललेल्या परिस्थितीत अनेक व्यवधानांमध्ये गुंतत गेलो. त्यामुळे मला त्या कामासाठी कधी 'निवांत' असा वेळ मिळालाच नाही. शिवाय मी लिहिलेली पुस्तके कुणी वाचावी एवढा मोठा माणूस, लेखक किंवा शास्त्रज्ञही मी कधी झालो नव्हतोच. यामुळे त्या बिचाऱ्या डायऱ्या माळ्यावर तशाच पडून राहिल्या होत्या. अखेर मी मुंबई सोडून पुण्याला आल्यावर इथे त्यांना ठेवायला जागाही नव्हती म्हणून त्या नष्ट करून टाकल्या. असेही आता सगळे जग डिजिटल आणि पेपरलेस झाले आहे.
गेल्या कित्येक वर्षांमध्ये मी एकही डायरी विकत घेतली नाही किंवा कुणाकडून मला भेट म्हणूनही मिळाली नाही. त्यामुळे ती लिहिण्याचा प्रश्नच उद्भवला नव्हता. गेल्या दोन वर्षभरांतल्या काही आठवणी मनात साचून राहिल्या आहेत तेवढ्याच. पण तिथे त्या क्रमाने मांडून ठेवलेल्या नसतात. मी फेसबुकवर अधूनमधून काही स्फुट लेख लिहित असतो, ते संगणकावर साठवले आहेत. माझ्या मोबाइलशी सहज खेळत असतांना पाहिले की त्या डिव्हाइसने माझ्या काही आठवणी ओळीवार जमवून ठेवल्या आहेत किंवा माझ्या आळशीपणामुळे त्या तिथे साचून राहिल्या आहेत. त्यात काही वॉट्सॅप मेसेज, काही फोन कॉल्सच्या नोंदी, असंख्य फोटो हे तर आहेतच, मी यूपीआयने कुणाकुणाला पैसे दिले त्यावरूनही ते कशासाठी दिले होते हे लक्षात येते. त्या सगळ्यांमधून गेली दोन वर्ष कशी गेली याचे एक अंधुक चित्र डोळ्यासमोर उभे राहते. ते या लेखात सांगण्याचा हा प्रयत्न.
२०२४
२०२४ या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात दोन विलक्षण घटना घडल्या, त्या दोन्ही निरनिराळ्या परदेशांमधल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेतील केप टाउन शहरात खेळला गेलेला भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा कसोटी सामना फक्त दोन दिवसातच संपला. या सामन्यात दोन्ही संघांकडून मिळून फक्त ६४२ चेंडू खेळले गेले. हा आतापर्यंतचा जगभरातला सर्वात लहान कसोटी सामना ठरला. दक्षिण आफ्रिका संघाने आधी फलंदाजीला सुरुवात केली, पण जेवणाच्या वेळेपर्यंत त्यांचा संपूर्ण संघ फक्त ५६ धावा काढून बाद झाला. त्यानंतर भारतीय संघाने दमदार सुरुवात केली, पण त्यांचाही डाव गडगडला आणि फक्त १५३ धावा काढून सर्व खेळाडू तंबूत परत आले. खेळाच्या पहिल्याच दिवशी अशा प्रकारे दोन्ही संघांचा पहिला डाव संपला आणि दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावातलेही २-३ खेळाडू बाद झाले. दुसरे दिवशी उरलेले सगळे खेळाडूही बाद झाले तोपर्यंत त्या संघाच्या १७६ धावा झाल्या होत्या. पहिल्या डावातली ९७ धावांची आघाडी लक्षात घेता भारतीय संघाला विजयासाठी फक्त ८० धावा हव्या होत्या. त्यांनी तेवढ्या धावा त्याच दिवशी करून सामना संपवून टाकला.
पूर्वी कसोटी सामने पाच दिवस चालत आणि तरीही बरेच वेळा ते अनिर्णित रहात असत. टीव्ही आल्यानंतर त्यावर पाच दिवसांचे सामने पहाणे फार कंटाळवाणे वाटत असे. त्यामुळे त्याला तितकेसे प्रेक्षक मिळत नव्हते आणि प्रेक्षक नाहीत म्हणून जाहिराती मिळत नव्हत्या. टीव्ही चॅनल्सचे सगळे अर्थकारण जाहिरातींच्या उत्पन्नावरच तर चालत असते. पण एका हुशार माणसाने क्रिकेटला आकर्षक बनवण्यासाठी ५०-५० षटकांचे सामने सुरू केले तर त्यानंतर आणखी कुणी २०-२० षटकांचे सामने सुरू केले. त्यांना क्रिकेटप्रेमी जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि टीव्हीवरील मॅचेसना जाहिरातदारांचे जोरदार पाठबळ मिळाले. त्यात टीव्ही कंपन्या, जाहिरात कंपन्या तसेच खेळाडूंच्या संघटनांनी खोऱ्याने पैसा ओढला आणि काही लोक कोट्याधीश किंवा अब्जाधीशही झाले. क्रिकेट खेळाडूंनाही चांगले दिवस आले. तरीही रुचिपालटासाठी अजूनही पाच दिवसांचे कसोटी सामने सुरू ठेवले आहेतच. पाच दिवस चिकाटीने खेळत राहून दोन दोन इनिंग्जमध्ये धावांचे डोंगर रचणे किंवा सलग दहा वीस ओव्हर गोलंदाजी करणे यातच फलंदाज आणि गोलंदाजांची खरी कसोटी लागते. क्रिकेट या खेळाचा खरा आत्मा यातच आहे, पण दोन वर्षांपूर्वी त्यात एक नवा इतिहास घडला. हे सामने जर असे दोन दिवसात संपायला लागले तर मात्र त्यात काही मजा राहणार नाही.
. . . .
दुसरी विलक्षण घटना जपानमध्ये घडली, ती होती जपानमधला जबरा विमान अपघात.
टोकियोतल्या हेनाडा विमानतळावर जपान एअरलाइन्सचे एक जम्बोजेट विमान (Airbus A350) हवेतून खाली उतरत होते. ते धावपट्टीवर उतरत असतांनाच तिथे आधीच असलेल्या किंवा अचानक आलेल्या कोस्टगार्डच्या छोट्या विमानाला धडकले आणि क्षणार्धात तिथे आगीचा डोंब उसळला. तरीही मोठ्या विमानातले ३६७ प्रवासी आणि १२ कर्मचारी असे एकूण ३७९ लोक सुखरूपपणे विमानाबाहेर येऊ शकले. काही वेळानंतर ते विमान जवळजवळ पूर्णपणे जळून खाक झाले. आगीचे बंब त्या विमानाला वाचवू शकले नाहीत. कोस्ट गार्ड विमान (MA722) आदल्या दिवशी झालेल्या भूकंपग्रस्तांसाठी मदत साहित्य घेऊन निघाले होते. यामध्ये ६ कर्मचारी होते. मात्र, दुर्दैवाने कोस्ट गार्डच्या विमानातील ६ पैकी ५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर वैमानिक गंभीर जखमी झाला.
आगीमुळे मोठ्या विमानातले दिवे मालवले गेले होते, विमानात धूर पसरत होता आणि ध्वनिक्षेपक काम करत नव्हते. विमानातले कर्मचारी टॉर्च दाखवून आणि ओरडून सूचना देत होते. विमानाचे तीन आपातकालिन दरवाजे (इमर्जन्सी एक्झिट्स) उघडले गेले आणि त्यातून घसरगुंड्या खाली सोडल्या गेल्या. सर्व प्रवासी फक्त ९० सेकंदात एका मागोमाग त्यांवरून घसरत जमीनीवर आले.
हा अपघात अत्यंत भीषण असूनही, जपान एअरलाईन्सच्या विमानातील सर्व ३७९ प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. ही घटना जगभरात 'चमत्कार' आणि उत्कृष्ट सुरक्षा प्रशिक्षणाचे उदाहरण मानली गेली. मी जो व्हीडिओ पाहिला त्यात त्यासाठी काही कारणे देण्यात आली होती. पहिले म्हणजे हे जपान-अंतर्गत उड्डाण असल्यामुळे त्यात बहुतेक सगळे जपानी प्रवासी होते. ते अतिशय शिस्तबद्ध होते. त्या प्रवाशांनी कसलाही गडबडगोंधळ किंवा धक्काबुक्की केली नाही, सगळ्या सूचना निमूटपणे ऐकल्या आणि तंतोतंत त्यानुसार त्वरेने हालचाली केल्या. कुणीही रॅकमधले सामान काढण्याचा प्रयत्न केला नाही. ते जवळच्या दरवाजापाशी रांगेने चालत जाऊन घसरगुंडीवरून एका मागोमाग असे करत खाली घसरत गेले. दुसरे म्हणजे जरी विमानाने पेट घेतला असला तरी त्याचा सांगाडा शाबूत होता त्यामुळे दरवाजे उघडता आले. तिसरे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विमानातील पायलट आणि केबिन क्रूने अशा प्रसंगी अजिबात न गांगरून जाता आणि क्षणभराचाही विलंब न लावता विलक्षण धैर्याने सगळी आपत्कालीन कामे व्यवस्थितपणे केली. अर्थातच त्यांचे अत्यंत उच्च दर्जाचे ट्रेनिंग झाले असणार यात शंका नाही. एअरबस A350 सारख्या आधुनिक विमानांमधील आग रोधक साहित्यामुळे प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. शेवटी सगळ्या प्रवाशांचे दैव तर बलवत्तर होतेच.
प्राथमिक तपासानुसार, संवादामध्ये झालेल्या चुकीमुळे (Communication gap) ही दुर्घटना घडली असावी असे समोर आले. कोस्ट गार्डच्या विमानाला धावपट्टीच्या बाहेर थांबण्याच्या सूचना होत्या, परंतु ते विमान धावपट्टीवर आले. त्याच वेळी जपान एअरलाईन्सच्या विमानाला उतरण्याची परवानगी मिळाली होती, ज्यामुळे दोन्ही विमानांची टक्कर झाली. अर्थातच यात काही तरी गंभीर गफलत झाली होती.
---
बहुतेक सगळ्यांनी आयुष्यात कधी ना कधी रस्सीखेच हा खेळ खेळलेला असतोच. पहायला गेल्यास हे करायचे का ते करायचे यामधला रस्सीखेचाचा खेळ रोजच आपल्या जीवनात चाललेला असतो. सध्या थंडीच्या दिवसात सकाळी उठून कामाला लागायचे का उबदार पांघरुणात लोळत पडायचे यामध्ये थोडा वेळ रस्सीखेच चाललेली असतेच. या विश्वामधला प्रत्येक पदार्थ गुरुत्वाकर्षण नावाच्या अद्ष्य दोरीने प्रत्येक दुसऱ्या पदार्थाला आपल्याकडे खेचत असतो, पण लहानसहान पदार्थाने लावलेला जोर नगण्य असल्यामुळे आपल्याला तो जाणवत नाही. पृथ्वीने मात्र आपल्याला जखडून ठेवलेले असते. उडी मारून तिच्यापासून थोडे दूर जायचा प्रयत्न केला तरी ती लगेच खेचून जमीनीवर आणते.
पृथ्वी आणि सूर्यचंद्र हे गोलही गुरुत्वाकर्षणाने एकमेकांना आपल्याकडे ओढत असतात, पण पृथ्वी आधीच प्रचंड वेगाने कुठेतरी जायला निघालेली असते त्यामुळे ती सूर्यावर जाऊन आदळत नाही, तरी या आकर्षणामुळे ती सूर्याभोवती फिरत राहते. अशाच प्रकारे चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो आणि पृथ्वीबरोबर तोही सूर्याभोवती फिरत असतो.
आकाशात पाठवलेले कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे तिच्याभोवती फिरत असतात, पण आकाशात अशा काही जागा आहेत जिथे असलेल्या वस्तूला जितक्या बलाने पृथ्वी तिच्याकडे ओढत असते नेमके तितक्याच बलाने सूर्य त्याच्याकडे ओढत असतो आणि याशिवाय तो सेंट्रिफ्यूगल फोर्समुळे त्याच्यापासून दूर फेकला जात असतो. या तीन्ही बलांच्या रस्सीखेचेमुळे तो पदार्थ पृथ्वीकडे येतही नाही किंवा पृथ्वी भोवती फिरतही नाही. पण तोही पृथ्वीबरोबर सूर्याला प्रदक्षिणा घालत राहतो.
सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताने पाठवलेला आदित्य हा उपग्रह एल १ नावाच्या अशा बिंदूवर जाऊन पोचला आहे. आता तिथे बसून तो संशोधनकार्य करत राहील आणि ती माहिती पृथ्वीवर पाठवत राहील. भारताचा अशा प्रकारच्या संशोधनाचा हा पहिलाच प्रयत्न आहे. आतापर्यंत अमेरिका, युरोप (एकूण देश मिळून), जपान, चीन आणि आता भारत अशा प्रमुख ५ शक्तींनी सूर्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी आपले उपग्रह अंतराळात पाठवले आहेत.
------------
प्राणप्रतिष्ठा
अयोध्येतल्या भव्य नव्या मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हा कार्यक्रम २२ जानेवारीला प्रचंड थाटामाटात साजरा झाला. देवळाचे बांधकाम पूर्ण होण्याचीसुद्धा वाट न पाहता आधीच केलेल्या या कार्यक्रमाची अक्षत महिनाभर आधीच अख्ख्या देशाला (की जगाला) देऊन ठेवली होती. अक्षतांचे हजारो कलश गावागावांमध्ये जंगी शोभायात्रा काढून वाजत गाजत मिरवत नेले होते. लक्षावधी लोक क्षणभर का होईना, तो कलश डोक्यावर घेऊन 'जय श्रीराम'चा गजर करत उन्मादाने नाचले होते आणि त्याचे फोटो काढून त्यांनी आपल्या संग्रहात ठेवले होते. नंतर या अक्षता गोळा करून अयोध्येला पाठवल्या गेल्या होत्या.
या वर्षाच्या सुरुवातीपासूनच या नियोजित कार्यक्रमाची चर्चा सुरू होती. निरनिराळ्या टीव्ही चॅनेल्स आणि यू ट्यूब वरील व्हीडिओज यात रोज चाललेली उलटसुलट चर्चा किंवा बाचाबाची यांचा कंटाळा येण्याइतका अतिरेक होत होता. माझ्या आठवणीत तरी दुसऱ्या कुठल्याही देवळातल्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला इतकी अचाट पूर्वप्रसिद्धी मिळाली नव्हती. उत्साही लोक फक्त चॅनेल्सवरील बातम्या आणि चर्चा पाहून थांबले नाहीत तर गावोगावी त्यांनी मोठ्या मिरवणुका काढल्या, त्यात हौसेने नाचत गात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि त्यांच्या व्हीडिओही पसरवल्या. जिकडे तिकडे दिवाळीसारखी रोषणाई केली. अगदी दुबईच्या बुर्ज खलीफापासून जगभरातल्या अनेक मोठ्या शहरांमध्ये विजेचा झगमगाट केला गेला होता.
देशभरातल्या सगळ्या नामवंतांना या समारंभाचे आमंत्रण दिले होते आणि त्यातले अनेक लोक तिथे व्यक्तिशः हजर झाले होते. इतर असंख्य लोकांना त्या कार्यक्रमाला जायची इच्छा होती, पण परवानगी मिळत नव्हती. त्या समारंभाचे टीव्हीवर होत असलेले थेट प्रक्षेपण लक्षावधी (किंवा कोट्यावधी) लोक डोळ्याची पापणी लवू न देता पहात बसले होते. त्यानंतरही अयोध्येला जाण्यासाठी भाविकांनी रीघ लावली होती. तिथे जाऊन पोचण्यासाठी विमाने, आगगाड्या, बसेस वगैरेंची तसेच तिथे राहण्यासाठी खूप चांगली सोय केली गेली होती आणि या वर्षात अयोध्येला भेट देणाऱ्या लोकांच्या संख्येने पूर्वीचे सगळे उच्चांक मोडून ताजमहाललाही मागे टाकले होते. इतकेच नव्हे तर अयोध्येला भेट देणाऱ्या लोकांची संख्या व्हॅटिकन आणि मक्कामदीना या प्रमुख स्थलांना जाणाऱ्या लोकांच्या संख्येलाही ओलांडून गेली असे ऐकले.
अयोध्येच्या या कार्यक्रमाचा धावता वृत्तांत टीव्हीवर दाखवला जात होता, तो असंख्य लोकांनी आपापल्या घरी बसून तर पाहिलाच, पण अनेक संकुलांमध्ये खूप लोकांनी एका जागी जमून मोठ्या स्क्रीनवर एकत्र पाहिला आणि पाहता पाहता श्रीरामाच्या नामाचा जयघोष केला. श्रीरामाची ही नवी मूर्तीही फारच लोभसवाणी आहे. ती करणाऱ्या शिल्पकाराचे कौतुक करायलाच हवे. हे सगळे जितके अवर्णनीय होते तितकेच अनपेक्षितही होते.
------
हे वर्ष सुरू होण्याच्या आधीपासूनच भारतातल्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेध लागायला सुरुवात झाली होती. कुणी तरी मला विचारले, "का हो, तुमचं नाव व्होटर्स लिस्टमध्ये आहे का?"
मी म्हंटलं, "पाच वर्षापूर्वी तर होतं. आणि मी काही ते काढून टाका म्हणून कुणाला सांगितलं नव्हतं म्हणजे ते असेलच."
त्यानं विचारलं, "कुठे होतं?"
मी सांगितलं, "धायरीला. त्या वेळी मी तिथे रहात होतो"
"आता या वेळी काय करणार? मत द्यायला धायरीचा जाणार की काय?
"बघीन, जमलं तर जाईन."
"पण तुमचं नाव इकडे ट्रान्स्फर करून घ्या ना."
"कसं ?"
"अगदी सोप्पं आहे. एकदा धायरीजवळच्या मामलेदार कचेरीत जा आणि एक फॉर्म भरा म्हणजे तुमचं तिथलं नाव कट होईल. मग एकदा मुळशीच्या मामलेदार कचेरीत जाऊन दुसरा एक फॉर्म भरा, इथल्या रहिवासाचे पुरावे द्या. मग तुमचं नाव हिंजवडीच्या लिस्टमध्ये अॅड होईल."
"बरं बरं !"
मी मनात म्हंटलं की माझ्या सध्याच्या शारीरिक अवस्थेत मी तर आमच्या टाउनशिपच्या गेटपर्यंत एकटा जाऊ शकत नव्हतो. तो इकडे तिकडे चकरा कशा मारणार? त्यापेक्षा एकदाच धायरीला जाऊन मत देऊन आलेलं काय वाईट आहे?
आणखी काही दिवसांनी आमच्या कम्युनिटी सेंटरमध्येच दोन माणसे आली. ते "आम्ही नवीन व्होटर कार्ड करून देऊ" असे म्हणाले. मी आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट वगैरे माझ्या अस्तित्वाचे जेवढे पुरावे माझ्याकडे होते ते घेऊन तिथे गेलो. त्यांच्यातल्या एका मुलाने त्याच्या सेलफोनवरच माझ्या आधार कार्डाचे फोटो काढले, त्यानेच ऑन लाइन कुठलासा फॉर्म भरला आणि माझ्या मोबाइलवर निवडणूक आयोगाकडून एक मेसेज आला. आता दहा बारा दिवसात माझे कार्ड घरपोच येईल असे आश्वासन त्याने दिले.
दहा पंधरा दिवसाने मी इंटरनेटवर चौकशी केली तर उत्तर आले की माझा फोटो स्पष्ट दिसत नव्हता म्हणून माझा अर्ज नामंजूर करण्यात आला होता. आधार कार्डावरचे फोटो कसे असतात? त्याचा सेलफोनवर काढलेला फोटो अस्पष्ट आला असला तर त्यात काही नवल नव्हते. पण हे काम ऑनलाइन कसे करता येते हे मला आता समजले होते. मी घरबसल्या माझ्या लॅपटॉपवरूनच एक नवा फॉर्म भरला आणि एक वेगळा चांगला फोटो अपलोड केला. लगेच तो पोचला असल्याचा मेसेज मला आला. काही दिवसांनी कार्डही मिळाले, पण त्यात मतदानकेंद्र लिहिले नव्हते. थोडे प्रयत्न केल्यावर ती माहितीही इंटरनेटवरूनच मिळाली.
मतदानाच्या दिवशी सकाळी सकाळी त्या मतदानकेंद्रावर जाऊन माझा नागरिकत्वाचा अधिकार बजावून आलो. कहाणी सुफळ संपूर्ण ।
------
अयोध्येला झालेल्या समारंभात राजकीय हेतू असल्याचा आरोप केला होता आणि तो समारंभ करणाऱ्या लोकांनाही हा हेतू सफळ होईल असेच वाटले असेलही. भाजपला तर यशाची खात्रीच होती आणि सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यावर त्यांनी "अबकी बार चारसौ पार" हा नारा दिला होता. त्यावर मग नॅरेशन्सचा खेळ सुरू झाला. "संविधान बचाओ।", "लोकतंत्र बचाओ।", "दलितांचे आणि आदिवासींचे आरक्षण रद्द केले जाईल." अशा वाक्यांचा तुफान प्रचार करण्यात आला. दलित, पिछडे आणि अल्पसंख्य समाजांना जबरदस्त भीती दाखवण्यात आली. निवडणुका जवळ आल्यानंतर विरुद्ध पक्षांमधल्या प्रमुख व्यक्तींवर अगदी वाट्टेल ते आरोप प्रत्यारोप करत जोरजोरात बाचाबाची व्हायला लागली. बातम्या दाखवणाऱ्या वाहिनींवर तासतासभराचे चर्चांचे कार्यक्रम दाखवले जायला लागले त्यात निव्वळ आरडाओरडा आणि गोंगाट व्हायला लागल्यावर माझ्यासारख्या अनेक लोकांनी कंटाळून ते पाहणे बंद केले. टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांवर थोडे तरी निर्बंध असण्याची शक्यता होती. पण या वर्षीच सुरू होऊन अल्पावधीत बोकाळलेल्या यू ट्यूबवरील पॉडकास्टना एकदम मोकळे रान मिळाले होते. टीव्हीवरून दूर गेलेल्या काही लोकांनी आपापल्या चॅनेल्स काढून त्यावर वाट्टेल ते खरेखोटे सांगायला सुरुवात केली आणि त्यांनाही लाखांच्या घरात चाहते मिळायला लागले होते. ते पॉडकास्ट नियमितपणे पहाणाऱ्या लोकांना खात्रीच पटली की या सरकारचे दिवस आता भरत आले आहेत. ते आपापल्या फेसबुक आणि वॉट्सॅपच्या पानांवर तसे लिहायला लागले होते.
निवडणुकीच्या सातआठ महिन्यांच्या आधीच बहुतेक सगळ्या विरोधी पक्षांनी एकजूट करून I.N.D.I.A.नावाची संयुक्त आघाडी केली होती. तर दोन तीन महिने आधी भाजपानेही आपली कुमक वाढवण्यासाठी नीतीशकुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षांना आपल्या एनडीए आघाडीत सामील करून घेतले होते. इंडी आघाडीने काही नॅरेटिव्हजच्या आधाराने आणि महागाई, बेरोजगारी, सामाजिक विषमता यासारख्या नेहमीच्या मुद्यांवर भर देऊन टीकेचा भडिमार करत तुफानी प्रचार चालवला होता, भाजपनेही त्याला उत्तरे देण्याचा प्रयत्न करून गेल्या दहा वर्षांच्या कारभारात केलेल्या काही चांगल्या कामगिरीच्या आधाराने प्रचाराचा धूमधडाका लावला होता. या वर्षी या निवडणुका एप्रिल आणि मे या उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने घेतल्या गेल्या आणि त्या दीड महिना चालल्या होत्या. त्यामुळे या वर्षाचे पहिले पाच महिने सगळीकडे त्याचीच धूमधाम चालली होती.
चार जूनला लागलेले निवडणुकीचे निकाल काही लोकांसाठी अनपेक्षित होते. श्रीराममंदिरामुळे भाजपला निवडणुकीत जास्त मते पडली असे दिसले नाही. उलट त्यांची सदस्यसंख्या कमी होऊन २४०वर आली. त्या पक्षाला बहुमत मिळाले नसले तरी एनडीए या आघाडीला बहुमत मिळाले होते. पण I.N.D.I.A.ला तितक्याही जागा मिळाल्या नसल्या तरीही त्यांनी "जितम् मया"चा जल्लोष सुरु केला. आता एनडीएचे सरकार येणारच नाही आणि ते आले तरी टिकणारच नाही असा घोषा लावला. पण ते सरकार सत्तेवर आले आणि त्याने आपला राज्यकारभार सांभाळला. आता या सरकारकडे मोठे संख्याबळ नसल्यामुळे ते दुर्बल राहील आणि कुठलेही धडाडीचे निर्णय घेऊच शकणार नाही असा नवा नॅरेटिव्ह तयार करण्यात आला. तरीही तिकडे लक्ष न देता या सरकारने आधीच्या दहा वर्षांत न केलेली कामे येत्या पाच वर्षात पूर्ण करायचा मानस जाहीर केला आणि सगळ्यात आधी वक्फबोर्डाच्या कायद्यात सुधारणा करण्याचे बिल आणून ते एका संसदीय समितीकडे पाठवले. त्यानंतर "एक देश एक निवडणूक" या तत्वाखाली देशभरातल्या लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकत्र घेण्याच्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली. संसदेच्या अधिवेशनांमध्ये आधी विपक्षाने अडाणी अडाणीचा घोषा करत काही काम होऊ दिले नाही, तर नंतर सत्ताधारी पक्षाने सोरोस सोरोस करत वेळ काढला. त्यामुळे ही अधिवेशने धांगडधिंगा, धक्काबुक्की आणि सावळागोंधळ यानेच गाजली.
लोकसभेच्या निवडणुका होऊन निकाल लागले तरी त्यानिमित्य उडलेला धुरळा थांबला नाही कारण काही राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका लगेच होणार होत्या, त्यात महाराष्ट्रही होते. महाराष्ट्रातली म.वि.आघाडी I.N.D.I.A.चा भाग होता आणि महायुती हा एनडीएचा. आघाडीने I.N.D.I.A.च्या मुद्यांवरूनच जोरदार प्रचार केला होता, त्याशिवाय काही स्थानिक मुद्दे होते. लोकसभेसाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बहुधा फक्त आपापल्या पक्षाचाच प्रचार केला होता. तिचे मतदारही अति आत्मविश्वासामुळे थोडे सुस्तावले असावेत. तरीही इथे झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या दोघींना जवळजवळ सारखीच एकूण मते पडली होती, त्यांच्या मतांमध्ये फक्त अर्धा किंवा पाव टक्के इतकाच किरकोळ फरक होता, पण आघाडीला जास्त जागा मिळाल्या आणि युतीचे कमी खासदार निवडून आले. यावरून असे रान उठवले गेले की महायुति चारी मुंड्या चीत झाली आहे, जनतेने तिला धुडकावून लावले आहे, विधानसभेच्या निवडणुकीत तिचा सपशेल धुव्वा उडणार आहे वगैरे. आघाडी सोडून युतीमध्ये आलेले लोक आता आघाडीत परत जायला निघाले आहेत अशा अफवाही उडवल्या गेल्या.
दोन निवडणुकांच्या मधल्या काळात युति सरकारने आपली लोकप्रियता वाढवण्यासाठी काही पावले उचलली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी मन लावून जास्त प्रचार केला आणि जास्त मतदारांना मतदान करायला प्रवृत्त केले. आघाडीच्या घटक पक्षांमध्ये कुणाला किती आणि कोणत्या जागा हव्या यावर आपापसात कुरबुर झाली. संविधान, लोकशाही वगैरे त्यांचे मुद्दे या निवडणुकीत कामाचे नव्हतेच. मधल्या काळात काही इतर घडामोडी होऊन गेल्या. यू ट्यूबवर मराठीमधून पॉडकास्ट करणाऱ्या लोकांचा युतीकडे जास्त कल होता. या सगळ्या कारणांमुळे या वेळी जास्त टक्के मतदारांनी मतदान केले. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकांचे निकालही पुन्हा अनपेक्षित लागले.
पण पहायला गेल्यास यावेळीसुद्धा त्यावरून अवास्तव गाजावाजा केला गेला होता. निवडणुकीच्या आधी शिवसेनेच्या उबाठा गटाचे आणि रा.काँ.च्या शप गटाचे मिळून जेवढे आमदार होते त्यापेक्षा दोन जास्तच जागा त्यांना निवडणुकीत मिळाल्या. रा.काँ.चे जे आमदार आघाडीमधून युतीत आले होते त्यातलेच बहुतेकजण पुन्हा निवडून आले. युतीमध्ये आलेल्या शिवसेनेच्या आमदारांच्या संख्येत तर वाढ झाली. फक्त काँग्रेसच्या आमदारांच्या संख्येत घट झाली आणि भाजपची संख्या वाढली.
मी सहसा कधी राजकीय घडामोडींवर लिहित नाही. पण २०२४ हे संपूर्ण वर्ष निवडणुकांवर होत असलेल्या चर्चा आणि अवास्तव गवगवा, नॅरेटिव्हज यातच गेल्यामुळे मी त्यांचा एक निष्पक्ष आढावा घेतला आहे. त्या वर्षभरात या घडामोडींचाच इतका मोठा गदारोळ चालला होता की इतर क्षेत्रांमधल्या घडामोडी तितक्याशा लक्षात राहिल्या नाहीत.
------------------
जीवन प्रमाणपत्र
मी १९९८मध्ये भारत सरकारच्या सेवेमधून निवृत्त झालो होतो तेंव्हापासून मला दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जिवंत असण्याचा दाखला देणे आवश्यक झाले होते. त्यासाठी बँकेत जाऊन एक चार पानांचा फॉर्म भरावा लागत होता. बँकेचे ऑफिस घराजवळच असल्याने येताजाता कधीतरी जास्त गर्दी नाही असे पाहून मी ते काम करून घेत होतो. २००५ मध्ये एनपीसीमधून रिटायर झाल्यानंतर मी वाशीला रहायला गेलो आणि बँक अणुशक्तीनगरलाच होती. त्यामुळे तिथे जाऊन फॉर्म भरणे ही एक वार्षिक कटकट होऊन बसली होती. मी पुण्याला रहायला आलो त्या वर्षीच बँकेने नवी सोय करून दिली होती. आता मी कुठल्याही ब्रँचमध्ये जाऊन हे काम इंटरनेटवरून करू शकत होतो. त्यानंतर दरवर्षी मी एका ब्रँचमध्ये जाऊन जीवनप्रमाण सर्टिफिकेट देऊ लागलो. त्या कामासाठी बँकेत एक मशीन ठेवलेले असते त्यावर आपला अंगठा किंवा दुसरे एकादे बोट ठेवायचे आणि त्या यंत्रामधून गेलेल्या संदेशात त्या बोटांवरच्या रेषांची ओळख पटली तर काम पुढे सरकते. बऱ्याचशा वृद्धांच्या बोटांवरील रेषा वयोमानाने पुसट होतात आणि त्या यंत्राकडून वाचल्या जात नाहीत. माझ्याही बाबतीत तसे होत असे. त्यामुळे या कामात फार वेळ लागायला लागला होता.
२०२३ मध्ये आणखी एक नवी सोय झाली होती. त्यात आंगठ्याच्या ठशाऐवजी चेहेऱ्यावरून ओळख पटवली जाते. मी त्याची माहिती करून घेतली. माझ्या मुलाने ते नवे अॅप सेलफोनवर डाउनलोड करून घेतले आणि थोडे चाचपडत आम्ही दोघांनी मिळून ते चालवून जीवनप्रमाण सर्टिफिकेट मिळवले. २०२४ या वर्षी मात्र मी स्वतःच प्रयत्न करायचे ठरवले, सगळी आवश्यक कागदपत्रे शोधून जवळ ठेवली आणि जीवनप्रमाण अॅप उघडले. त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आवश्यक ती माहिती म्हणजे वेगवेगळे आकडे भरत गेलो, कॅमेरासमोर चेहेरा आणून दोन मिनिटे डोळे मिचकावले आणि सक्सेसफुल झालो आहे असा संदेश मिळाला.
कुठे ते उन्हातानात बँकेपर्यंत जाऊन धक्के खाणे आणि कुठे घरबसल्या पाच मिनिटात सगळे काम होणे? तंत्रज्ञानाचा जयजयकार !!!
------
सन २०२४ हे वर्ष भारतात झालेल्या निवडणुकीच्या धामधुमीचे होते, तसेच अमेरिका म्हणजे यूएसएसाठीसुद्धा होते. २०२०च्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रंप आणि डेमॉक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांच्यात सामना झाला होता त्यात जो बायडेन निवडून आले होते. २०२४मध्ये पुन्हा याच दोन उमेदवारांना त्यांच्या पक्षांकडून नॉमिनेशन मिळाल्यामुळे त्यांच्यातच सामना होईल असे आधी वाटत होते, परंतु वाढते वय आणि आरोग्याच्या कारणास्तव बायडेन यांनी २१ जुलै २०२४ रोजी आपली उमेदवारी मागे घेतली आणि कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला. त्यामुळे वर्षाअखेर झालेल्या त्या वर्षीच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रंप आणि कमला हॅरिस यांच्यात सामना होता. यातले कोणीही निवडून आले असते तरी तो एक विक्रम होणार होता. ट्रंप जिंकले तर आधीची निवडणूक हरलेल्या पूर्व राष्ट्राध्यक्षाने पुन्हा जिंकून परत यावे अशी गेल्या सव्वाशे वर्षांमध्ये न घडलेली घटना घडणार होती आणि कमला हॅरिस जिंकल्या असत्या तर त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष झाल्या असत्या, तसेच भारतीय वंशाची पहिली व्यक्ती त्या पदावर पोचणार होती. हा सामना अटीतटीचा होणार अशी भाकिते होती तरी डोनाल्ड ट्रंप यांनी तो चांगल्या दणदणित फरकाने जिंकला.
----
जहाजाची पुलाच्या खांबाशी टक्कर
टायटॅनिक जहाज हिमनगावर आपटून बुडाले आणि दोन विमानांनी वर्ल्डट्रेडसेंटरच्या टॉवर्सना धडक देऊन जमीनदोस्त केले या ऐतिहासिक दु्र्घटनांची आठवण करून देणारा एक भीषण अपघात वर्षाच्या अखेरीस अमेरिकेतल्या बाल्टिमोर बंदरात झाला. त्यात जास्त जीवितहानी झाली नसली तरी किती मोठी पडझड झाली हे खाली दिलेल्या चित्रांवरून दिसेल. हा पूल आधी कसा होता हे वरच्या चित्रात दाखवले आहे. या पुलाखालून रोजच किती तरी जहाजे जात येत असत. पण त्या रात्री एक मालवाहू जहाज बंदरातून बाहेर निघतांना या पुलाच्या जवळ आले तेंव्हा अचानक त्याचा वीजपुरवठा खंडित झाला, त्यामुळे नियंत्रणावर परिणाम होऊन ते जहाज भरकटत पुढे जात असतांना पुलाच्या एका खांबाला आदळले आणि जवळजवळ दोन किलोमीटर लांबीच्या त्या पुलाचा बराच मोठा भाग धाडकन कोसळून खाली पडला. कार चालवणारा चालक ब्रेक दाबून तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो किंवा स्टीअरिंग व्हील गर्रकन फिरवून धडक टाळायचा प्रयत्न करतो तरीही रस्त्यात कधी कधी अपघात होतातच. पाण्यातल्या जहाजाला थांबवण्याचे किंवा वळवण्याचे कोणते उपाय असतात माहीत नाही, पण त्यांना जास्तच मर्यादा असणार.
हे जहाज सिंगापूरच्या कंपनीचे आहे, पण त्या वेळी ते चालवणारे बरेचसे दर्यावर्दी भारतीय होते. त्यांनी जहाजावरील नियंत्रणाची परिस्थिती पाहून 'मे डे' चा निर्वाणीचा इशारा दिला. तो ऐकून पुलावरची वाहतूक थांबवली गेली आणि बरीचशी प्राणहानी वाचवता आली. याबद्दल त्यांच्या प्रसंगावधानाचे कौतुक केले गेले. तरीही त्यांना जहाजावरच थांबवले गेले होते आणि या अपघाताची चौकशी पूर्ण होईपर्यंत तिथेच रहावे लागण्याची शक्यता होती.
या अपघातात तो पूल पार मोडून गेला आहे आणि त्याचे अवाढव्य सांगाडे पाण्यात पडले आहेत, त्यातले काही भाग तर त्या जहाजावरच पडले आहेत . त्या जहाजाचे किती नुकसान झाले त्याची माहिती समोर आली नसली तरी ते जहाज बुडालेले नाही, ते तरंगत राहिले. त्यावर शिगोशीग लादलेल्या सामानाचे काही नुकसान झाले असेलच. कोसळलेल्या पुलाचे सगळे भाग आणि ते जहाज यांना दूर करेपर्यंत बंदरातली वाहतूक सुरू करणे शक्य नव्हते. पण कोसळलेला पूल पुन्हा बांधायला निदान एकदोन वर्षे लागतील. तोवर तिथली वाहतूक वळसा घालून दूरच्या मार्गाने वळवावी लागेल. यातूनही अप्रत्यक्ष तोटे होतीलच. या दुर्घटनेने कुणाला केवढा मोठा फटका बसला हे ते सगळे हिशोब केल्यानंतर समजेल. तोपर्यंत बहुतेक लोक ही घटना विसरून गेले असतील.
चित्रे गूगलवरून साभार.
------
पर्यावरण विरुद्ध पर्यावरण
या शतकात पर्यावरण या विषयाला अधिकाधिक महत्व आणि प्राधान्य मिळत आहे. पर्यावरणवादी लोकांमध्येही प्रकार आहेत. काही लोकांचे असे ठासून सांगणे असते की माणसाच्या मूर्खपणामुळे आणि अप्पलपोटेपणामुळे तो पर्यावरणाची अपरिमित हानी करत आला आहे. त्यामुळे जगाचे तापमान वाढायला लागले आहे. आताच अनेक ठिकाणचे गरम हवामान असह्य होत आहे. आणखी काही वर्षांनी पृथ्वीवर सगळीकडेच हाहाःकार माजणार आहे वगैरे वगैरे. या निष्कर्षाला काही शास्त्रीय निरीक्षणांची जोड मिळत असल्यामुळे ते सर्वमान्य होऊन जगभरातली सरकारे यावर उपाय शोधत आहेत. कोळसा किंवा खनिज तेल जाळून वीज उत्पादन करणे कमी करून ते अखेर थांबवणे आणि विजेचे उत्पादन सौर ऊर्जा किंवा वायु ऊर्जा अशासारख्या मार्गांनी करणे हा एक मार्ग आहे. त्या दृष्टीने गुजराथ आणि राजस्थानसारख्या राज्यांमधल्या मरुभूमीवर प्रचंड क्षमतेची सौर ऊर्जा केंद्रे स्थापन केली जात आहेत.
दुसऱ्या प्रकारच्या पर्यवरणवाद्यांना निसर्गातले पशुपक्षी, वनस्पती यांची खूप काळजी वाटते. यांच्या काही प्रजाती आतापर्यंत नामशेष झाल्या आहेत आणि इतर अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. गुजराथ, राजस्थान भागातले माळढोक पक्षी कमी होत चालले आहेत. त्याला इतरही काही कारणे आहेत, पण वीज वहन करणाऱ्या तारा आणि त्यांना आधार देण्यासाठी उभे केले जात असलेले मनोरे यांच्यामुळे या पक्ष्यांना धोका आहे असे मानून ते उभारण्यावर बंदी घालावी अशी मागणी काही पक्षीप्रेमी लोकांनी केली. तो वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आणि २०२१ साली त्या न्यायालयाने एक आदेश काढून सुमारे ८०,००० स्क्वेअर किलोमीटर इतक्या मोठ्या विभागात बंदी घातली. पण त्यातल्या काही भागांमध्ये सौर ऊर्जा केंद्रे उभारण्याचे कामही सुरू आहे. तिथे निर्माण झालेली वीज वाहून नेण्यासाठी तारा आणि मनोरे तर हवेतच.
याचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे नवा आदेश काढून काही भागात मनोरे बांधायला परवानगी दिली आहे. आता त्या भागातून उडणाऱ्या माळढोक पक्ष्यांनी स्वतःची काळजी घ्यावी.
--------
या जगात रोज अनेक घटना घडत असतात, त्या तिथे हजर असलेल्या लोकांना थेट समजतात. पण त्या घटनांची माहिती जगातल्या इतर लोकांनाही करून द्यावी यासाठी वृत्तसंस्था, वाहिन्या, वर्तमानपत्रे यासारख्या यंत्रणा काम करत असतात. वाचकांना आश्चर्याचा धक्का बसेल किंवा त्यांना आनंद, दुःख, राग, भीती, काळजी, असूया असे काही वाटेल अशा बातम्या निवडून त्यांना आकर्षक मथळे देऊन त्या रोजच्या वर्तमानपत्रात दिल्या जातात. या शिवाय अमक्या तमक्या प्रसिद्ध लोकांनी कुठकुठल्या ठिकाणी केलेल्या भाषणांमध्ये काय काय सांगितले यांच्याच बातम्या तयार करून त्यांनी वर्तमानपत्रांची अनेक पाने भरली जातात.
पण २०२४साली काही दिवस मला असे दिसत आले की आदल्या दिवशी सुप्रीम कोर्टात किंवा कुठल्या तरी हायकोर्टात काय झाले याचीच बातमी रोजच्या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर ठळक मथळ्यांखाली दिलेली असायची. शहाण्या माणसाने कधीही कोर्टाची पायरी चढू नये असे मी लहानपणीच ऐकले आणि वाचले होते आणि माझ्या नशीबाने मला ती कधीच चढावी लागली नाही. 'कानून' किंवा 'कायद्याचं बोला' अशासारख्या सिनेमांमधूनच मी कोर्टसीन पाहिले आहेत. त्यामध्ये जे खटले दाखवतात त्यात एक न्यायाधीश असतो आणि फिर्यादी, आरोपी, त्यांचे वकील, साक्षीदार, बघे लोक वगैरे लोक असतात. त्यांचे वादविवाद किंवा युक्तिवाद चाललेले असतात आणि मधून मधून "ऑब्जेक्शन", "ऑव्हररूल्ड", "सस्टेन्ड" वगैरे शब्दांची पखरण असते. ते पाहतांना थोडी मजा येते. पण इसवी सन २०२४मधल्या काही काळात सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांच्या ज्या बातम्या वर्तमानपत्रात रोज येत होत्या त्यात रोज काही तरी वेगळेच दिसत होते. यातले बरेचसे खटले केंद्र सरकार किंवा एखादे राज्य सरकार यांच्याच विरुद्ध चाललेले असायचे. सर्वसामान्य माणसाला दोन्ही बाजूंचे म्हणणे बरोबरच वाटायचे. आजकाल सरकारने एक नवा कायदा केला की लगेच त्याच्याविरुद्ध कोर्टात अर्ज दाखल केला जातो. यात कोणी गुन्हेगार नसतोच, त्या कायद्यामुळे देशाचा किंवा देशातल्या जनतेचा काय फायदा होणार आहे हा मुद्दा गौण असतो. तो कायदा घटनेच्या कुठल्या कलमाला धरून आहे किंवा नाही यावरच सगळा काथाकूट चाललेला दिसतो. त्याला बातमी कसे म्हणता येईल आणि ते वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर ठळक अक्षरात का येत होते त्याचेच मला गूढ वाटत होते.
-----
टी ट्वेंटी विश्वकप
२०२४मधील जून महिन्याची सुरुवात निवडणुकीचे काहीसे धक्कादायक निकाल आणि त्यानंतर घडत गेलेले नाट्य यावर होत असलेल्या चर्चांमध्ये झाली. पण ज्यांना राजकारणात फारसा रस नसेल आणि क्रीडाविश्वात असेल त्यांच्यासाठी जूनचा संपूर्ण महिना या विश्वकपाचे सामने पहाण्यात मजेत गेला. हे सामने यू एस ए आणि वेस्ट इंडीजमध्ये खेळले गेले. या वेळेला तब्बल वीस देशांच्या संघांनी या स्पर्धेत भाग घेतला. हे देश जगाच्या पाचही खंडांमधून आले असल्यामुळे ही स्पर्धा खरोखरच जागतिक होती. खाली दिलेल्या नकाशातले गडद आणि फिका निळ्या रंगात दाखवलेले देश पूर्वीपासून क्रिकेट खेळत आहेत, हिरव्या रंगात दाखवलेल्या देशांना या स्पर्धेत नव्याने प्रवेश दिला गेला. पिवळ्या रंगात दाखवलेल्या देशांनाही यायची इच्छा होती, पण प्राथमिक फेरी जिंकू न शकल्यामुळे त्यांना संधी मिळाली नाही.
या वीस संघांना चार गटांमध्ये विभागले गेले, त्यात एकमेकांशी खेळून विजयी झालेले प्रत्येक गटातले दोन दोन संघ पुढे गेले. या आठ देशांना सुपर एट असे नाव दिले गेले. यूएसए आणि अफगाणिस्तान या देशांनी काही धक्कादायक विजय मिळवून त्यात प्रवेश केला, तर न्यूझिलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका मागे राहिले. सुपर एटमधील संघांचे पुन्हा दोन गट पाडून प्रत्येक गटातले दोन संघ सेमिफायनलला गेले. भारताने त्याच्या गटात असलेल्या ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश या तीनही संघांवर विजय मिळवून अव्वल स्थान मिळवले तर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या संघांनी आधी एक एक सामने जिंकले. त्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा केलेला पराभव धक्कादायक होता. अफगाणिस्तान आणि बांग्लादेश यांच्यामधला शेवटचा सामना झाला त्यात बांग्लादेशचा विजय झाला असता तर त्या तीनही देशांचे समान गुण झाले असते. ऑस्ट्रेलियाचा रन रेट चांगला असल्यामुळे त्या संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला असता, पण जर बांग्लादेशाने या सामन्यात खूपच चांगला रनरेट मिळवला असता तर तो ऑस्ट्रेलियाला मागे टाकू शकला असता. त्यामुळे या सामन्यातही कोण जिंकतो आणि किती धावांनी जिंकतो यावर अखेरपर्यंत उत्सुकता होती. अगदी शेवटच्या क्षणी अफगाणिस्तानने हा सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आणि बलाढ्य समजला जाणारा ऑस्ट्रेलिया चक्क एलिमिनेट झाला. तो सेमिफायनलला पोचू शकला नाही. पण अफगाणिस्तानचा संघ मात्र पुढे दक्षिण आफ्रिकेकडून अगदीच सहजपणे हरला. भारताच्या संघाने इंग्लंडवर विजय मिळवून आधी होऊन गेलेल्या विश्वकपातील पराभवाचे उट्टे काढले.
दक्षिण आफ्रिका आणि भारत संघांमधला अंतिम सामना तर कमालीचा अटीतटीचा झाला. भारताने धडाक्यात सुरुवात केली, पण तीन गडी पटापट तंबूत परत गेल्यामुळे त्यांच्या धावांची गती मंद झाली. नंतर आलेल्या खेळाडूंनी थोडी ठोकाठोक करून १७६ धावा जमवल्या. हा टी-२० विश्वचषकाच्या फायनलमधील सर्वाधिक स्कोअर होता. आधी त्या धावा पुरेशा वाटत होत्या कारण दक्षिण आफ्रिकेची सुरुवातही चांगली झाली नाही. त्यामुळे भारत जिंकेल असे वाटत होते. पण नंतर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी तडाखेबंद फलंदाजी करून सामना आपल्या हातात घेतला. त्यांना शेवटच्या पाच षटकांमध्ये फक्त तीस धावा करायच्या होत्या आणि फक्त पाचच खेळाडू बाद झाले होते. अशा परिस्थितीत ते हा सामना सहज जिंकू शकतील असे वाटायला लागले होते. पण आपल्या गोलंदाजांनी धीर न सोडता उत्कृष्ट गोलंदाजी करून त्यांना धावा करू दिल्या नाहीत. हार्दिक पांड्याने टाकलेल्या शेवटच्या शटकातल्या पहिल्याच चेंडूवर डेव्हिड मिलरने मारलेला फटका इतका जोरदार होता तो नक्कीच सीमारेषेच्या बाहेर पडेल आणि फलंदाजाला सहा धावा मिळतील असे वाटत होते. तो सिक्सर मिळाला असता तर त्यांनी हा सामना जिंकण्याची शक्यता बरीच वाढली असती. पण आमच्या अणुशक्तीनगरमध्ये वाढलेल्या सूर्यकुमार यादव याने अशक्यप्राय करामत करून लाँग-ऑफ बाउंड्रीवर एक अविश्वसनीय झेल घेतला. त्याने आधी तो चेंडू हवेत पकडून मागे उडवला आणि स्वतः मागे उडी मारून तो पुन्हा झेलला आणि सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलले. त्याचा हा कॅच ज्याने पाहिला असेल त्याला हा सामना जिंकून देणारा झेल जन्मभर लक्षात राहील.
---------------------
आम्ही सारे पणज्या आणि पणजोबा
या वर्षी मी एका बाळाच्या बारशाला गेलो होतो. पूर्वीच्या काळी बारसे हा अगदी घरगुती कार्यक्रम असायचा. त्यात फक्त जवळचे आप्त येत असत आणि साधा समारंभ असायचा. हे बारसे मात्र एका मोठ्या हॉलमध्ये अगदी थाटामाटात साजरे केले गेले. तो हॉलही पाहुण्यांनी पूर्ण भरला होता. बाळाचा नामकरणविधी साग्रसंगीत पार पडल्यानंतर तिथे आलेल्या सगळ्या पणज्या आणि पणजोबा यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात बाळाचे आजी व आजोबा यांचे काका, मामा, आत्या मावश्या वगैरे सर्वांचा समावेश होता. माझ्यासाठी तरी हा पहिलाच अनुभव होता.
---------
मी वॉट्सॅपवर एक मजेदार लेख वाचला होता, पण मी त्या वेळी लगेच तो कॉपी करून साठवून ठेवू शकलो नव्हतो, पण तरीही मला तो लेख हवाच होता. काही दिवसांनी वेळ मिळाल्यानंतर मी तो शोधायला सुरुवात केली. पण मी तो लेख कुठल्या ग्रुपवर वाचला होता आणि तिथे तो कुणी पाठवला होता तेही आता आठवत नव्हते. अलीकडे मी अशा गोष्टी लक्षात ठेवतच नाही. मी सात आठ ग्रुपवर धुंडाळून पाहिले, पण प्रत्येक ठिकाणी रोज निदान शंभर नव्या पोस्टी येत असतात. मी त्यातल्या बहुतेक फॉरवर्ड्स वाचतही नाही किंवा डिलीटही करत नाही. काही शहाण्या लोकांनी डिसअॅपिअरिंग मेसेजेस लावलेले असते त्यात त्या आपोआपच विरून जातात. मला हवा असलेला लेख तसा फार जुना नव्हता, तरीही मला तो सापडत नव्हता. अरुंधती दीक्षित हे लेखिकेचे नाव लक्षात होते म्हणून गूगलवर शोध घेतला. तिथे अरुंधती रॉयपासून सप्तर्षींमधल्या अरुंधती ताऱ्यापर्यंत शेकडो अरुंधती निघाल्या, फेसबुकवरील एका अरुंधतीचा मराठी फळाही मिळाला, पण ही अरुंधती वेगळी असावी.
अखेर वॉट्सॅपवरचा हिरवा ठिपका मला दिसला. मी यापूर्वी त्याचा उपयोग करून पाहिला नव्हता. त्या दिवशी प्रयत्न करायचे ठरवले आणि अरुंधती एवढा एक शब्द लिहिला.
. . . आणि अहो आश्चर्यम् , मला हवा असलेला लेख क्षणार्धात समोर हजर!
-----------------
अम्मीजान !!!
साठआठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या वेळी माझी पत्नी अंथरुणाला खिळलेली होती आणि तिच्या सेवासुश्रुषेसाठी तिच्यासोबत एक अटेंडंट असायची. त्या दोघी टेलिव्हिजन पहात असतांना टीव्हीवर कसली तरी जाहिरात लागली होती. ती पाहून माझी पत्नी बोलून गेली, "हे बरे दिसते आहे. आणून पहायला पाहिजे, हे कुठे मिळत असेल?"
"अम्मीजानसे मँगवाइने ना।" ती अटेंडंट बोलून गेली. आम्हा दोघांचीही ट्यूब काही लगेच पेटली नाही. तिला विचारलं,"तुम्हारी अम्मी ये बिजनेस करती है क्या?"
"जी, मेरी अम्मी नही, वो मोबाइलवाला अम्मीजान!" तेंव्हा माझ्या लक्षात आलं की ती अमेझॉन बद्दल बोलत होती.
त्या काळात 'ऑनलाइन' बाजार इतका बहरला नव्हता. मला तर दुकानात न जाता, तिथली वस्तू डोळ्याने न पाहता विकत घ्यायचा विचारही विचित्र वाटत होता. शिवाय त्याचे पैसे कसे द्यायचे असतील हेसुद्धा समजत नव्हते. आमचे ते घर भरवस्तीत होते आणि पाचदहा मिनिटे चालत गेल्यावर आम्हाला लागणाऱ्या सगळ्या वस्तू मिळायच्या. त्यामुळे मी कधीच असे काही फोनवरून मागवले नव्हते. त्यावेळी माझ्याकडे असलेला सेलफोन पुरेसा स्मार्ट नव्हता. मी त्यावरून अम्मीजानपर्यंत पोचू शकत नव्हतो. पण अमेझॉन नावाच्या एका परदेशी आणि काही भारतीय कंपन्यांनीसुद्धा घरबसल्या वस्तू पुरवायच्या सोयी केल्या होत्या असे ऐकत होतो आणि त्यामुळे किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानदारांचा धंदा बसायची भीती आहे असे वर्तमानपत्रात वाचत होतो. तेंव्हा मला ते खरे वाटत नव्हते.
पण काळ झपाट्याने बदलत गेला होता. सन २०२४मध्ये मला इथल्या एका दुकानदाराचा माणूस लिफ्टमध्ये भेटला. तो मालाची होम डिलिव्हरी करायला आला होता. त्याने सांगितले, "आजकाल सब लोग सभी चीजे ऑनलाइन मँगवा रहे है, हमें तो अपने दुकान का भाडा भी परवडता नही है। " खरे तर मला त्याच्या दुकानात नेहमीच गर्दी दिसायची, पण तो सांगतो आहे त्या अर्थी त्याला थोडा तरी फटका बसत असणार. कदाचित घरपोच सामान पोचवणे त्याला पसंत नसेल म्हणूनही त्याचा ऑनलाइन शॉपिंगवर राग असेल.
सगळेच लोक ऑनलाइन खरेदी करायला लागले आहेत हे पाहिल्यानंतर मलाही वाटले की आपल्यालाही निदान हे तंत्र माहीत असायला हवे. मला नवे बनियान घ्यायचे होते. या साध्या वस्तूच्या खरेदीत दुकानात जाऊन तिला प्रत्यक्ष बघण्याची गरज नव्हती आणि झाली तरी त्यात अशी किती फसवणूक होणार आहे? असा विचार करून मी इंटरनेटवर अमेझॉनला गाठले, लगेच त्यांच्याकडल्या असंख्य वस्तूंची नावे, त्यांचे फोटो आणि किंमती अत्यंत आकर्षक पद्धतीने स्क्रीनवर दिसायला लागल्या. त्यातली मला हवी असलेली वस्तू निवडून मी त्यावर टिचकी मारली. त्यावर एक छोटासा फॉर्म समोर आला. मला हे असले फॉर्म भरून ढीगभर माहिती देण्याचा भयंकर कंटाळा आहे, पण या वेळी धीर धरून मी तो भरला आणि मग माझे एक खाते उघडले गेले आणि त्याचाही एक आयडी आणि पासवर्ड लक्षात ठेवण्याचे नवे झंझट मागे लागले. ऑनलाइन पेमेंट कसे करायचे ते ही मला तोपर्यंत समजले होते, त्याप्रमाणे ते केले.
त्यानंतर मात्र चक्रे फिरत राहिली. "तुमची ऑर्डर स्वीकृत केली आहे", "तुमचा माल पाठवला गेला आहे", "तुमचा माल घरपोच पोचवला गेला आहे", "आम्हाला या सेवेची संधी दिल्याबद्दल आभारी आहोत" असे संदेश येत राहिले आणि मला हवी असलेली वस्तूही रास्त किंमतीत घरबसल्या घरपोच मिळाली.
------
हिंजवडी, बारामती आणि भोर
साठ वर्षांपूर्वी मी इंजिनियरिंग कॉलेजमधील शिक्षणासाठी तीन वर्षे पुण्यात वास्तव्य केले होते. त्या काळात मला मुंबईच्या वाटेवरील दापोडी, पिंपरी, चिंचवड ही गावे माहीत होती आणि पुणे विद्यापीठाच्या गेटवरून एक रस्ता औंधला आणि दुसरा पाषाणला जातो एवढे माहीत होते. त्यांच्या पलीकडे असलेल्या ग्रामीण भागाची मला कणभरही माहिती नव्हती. पुढे मुंबई पुणे महामार्ग तयार झाल्यानंतर मी बसने पुण्याला जायला लागलो. तेंव्हा वाकड, बालेवाडी, बाणेर, बावधन, वारजे वगैरे नावे समजली. या सगळ्या पूर्वीच्या खेडेगावांमध्ये भरपूर वस्ती वाढून ती आता आधुनिक पुण्याचा भाग झाली आहेत. मुंबईहून पुण्याला जातांना वाकड फाट्यावर उजव्या दिशेला एक लहानसा रस्ता जातांना दिसायचा. या रस्त्यावरून पुढे गेल्यावर दूर कुठेतरी हिंजवडी नावाचे एक गाव आहे, तिथे आयटी पार्क होणार आहे असे ऐकले होते.
पाहता पाहता तो राजीव गांधी इन्फोटेक पार्क तयार झाला. टीसीएस, वायप्रो, टेकएम सारख्या कंपन्यांनी तिथे मोठमोठी ऑफिसे उघडली आणि हजारो इंजिनियर नोकरीला लागले. त्यांना राहण्यासाठी कित्येक टोलेजंग इमारतींची संकुले तयार झाली आणि लोकवस्तीने गजबजून गेली. रस्त्यांवर अनेक अत्याधुनिक हॉटेले, दुकाने, थिएटरे, मॉल्स वगैरेंनी झगमगाट केला. या आधुनिक भागात फिरतांना आपण कुठल्या देशात आलो आहोत असा प्रश्न पडायला लागला.
सध्या माझेही वास्तव्य या भागात आहे. मी निवडणुकीसाठी व्होटर कार्ड काढले तेंव्हा समजले की माझा मतदारसंघ भोर आहे. मी भोर हे नाव पूर्वी ऐकले होते आणि ते पुण्याहून साताऱ्याला जाणाऱ्या रस्त्याच्या आसपास कुठे तरी आहे एवढेच मला समजले होते. आम्ही राहतो तो पॉश शहरी भाग या मुख्यतः ग्रामीण भागात सामील केला गेला आहे कोण जाणे! हिंजवडीहून भोर गावाला जातांना वाटेत चिंचवड, कोथरूड आणि खडकवासला हे इतर मतदारसंघ लागतात. पण ते सगळे पार करून गेल्यावर येणारे भोर आणि हिंजवडी हे मात्र एकाच मतदारसंघात आहेत.
मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेंव्हाच मला आमचा भाग बारामती मतदारसंघात आहे असेही समजले होते. बारामती आणि हिंजवडी यांचा तरी कुठे काय संबंध आहे? आमचे सगळे पुणेकर नातेवाईक आणि मित्र पुणे किंवा पिंपरीचिंचवड या शहरांमध्ये राहतात. इथला पिन कोडही पुणे 411056 असा आहे. इथे राहून कॉलेजला किंवा नोकरीवर जाणारे सगळे लोक हिंजवडीच्या बाहेर गेले तर ते पुणे किंवा पिंपरीचिंचवडलाच जातात. बहुतेक लोक बाजारहाटासाठी किंवा सरकारी ऑफिसातल्या कामासाठी तिकडेच जातात तसेच गरज पडली तर तिथल्याच हॉस्पिटलमध्ये जातात. बाहेरगावी प्रवासाला जाण्यासाठी रेल्वे स्टेशन किंवा विमानतळ पुण्यातच आहेत. इतकेच काय, देवदर्शन करायचे असले तरी सगळी प्रसिद्ध किंवा जागृत देवस्थाने पुण्यात किंवा चिंचवड भागात आहेत. इथे रहाणाऱ्या कुणालाही कधी बारामतीला जायची गरजच पडत नाही. हे प्रसिद्ध झालेले गाव कसे आहे हे पहायलासुद्धा माझ्या ओळखीतला कोणी तिथे गेला नाही. हिंजवडी पुण्याच्या वायव्येला आहे तर बारामती पूर्वेला. म्हणजे तिथे जायचे असेल तर संपूर्ण पुणे शहर आरपार ओलांडून पलीकडे काही किलोमीटर जावे लागते. असे असले तरी निवडणुकीसाठी आमचा भाग पुणे किंवा पिंपरीचिंचवडला न जोडता बारामती मतदारसंघात का ठेवला आहे ते समजत नव्हते.
आमचा बारामतीशी काही संबंध नाही, तिथे जायची काही गरज नाही असे जरी आम्हाला वाटत असले तरी बारामतीकर राजकारणी लोकांना आमची आठवण होती. लोकसभा निवडणुकीला उभ्या असलेल्या माननीय सुप्रियाताई आणि सुनेत्राताई या दोघीही आमच्या कॉलनीमध्ये येऊन आम्हाला भेटून त्यांना मत देण्याचे आवाहन करून गेल्या होत्या. त्यामुळे आम्हाला जरा बरे वाटले होते.
पण नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी असलेल्या भोर मतदारसंघातल्या दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना आमच्याकडे यायची गरज वाटली नाही. घरोघरी जाऊन पत्रके वाटणारे कार्यकर्तेही आमच्या भागात फिरकले नाहीत. सभा, मिरवणुका वगैरे काहीही नाही. तिथे निवडणुकीचे वारेच पोचले नव्हते. मला तर या वेळी आपण अमेरिकेत रहात आहोत की काय असे वाटायला लागले होते. पण तरीही मी निवडणूक केंद्रावर जाऊन मतदान करून आलो.
-
जगज्जेते
पूर्वीच्या काळात भारतातले काही सम्राट अश्वमेध यज्ञ करायचे. त्यासाठी मोकाट सोडलेल्या घोड्याला कुणीही आडकाठी केली तर त्या सम्राटाचे सैन्य युद्ध करून त्याचा पराभव करायचे. अशा रीतीने तो घोडा त्या काळात माहीत असलेल्या सगळ्या जगात फिरून परत आला तर त्या राजाने सगळे जग जिंकले असे समजले जायचे. इतिहासकाळात ग्रीसमधल्या अलेक्झँडर या राजाने सगळे जग जिंकायचे असे ठरवले आणि तो आपले बलाढ्य सैन्य घेऊन पूर्वेच्या दिशेने निघाला. मध्यपूर्वेतील सगळ्या राजांना हरवून तो भारतापर्यंत आला, पण इथे आपली डाळ शिजणार नाही हे ओळखून परत जायला निघाला आणि वाटेतच मरण पावला. तरीही काही पाश्चात्य इतिहासकार त्याला जगज्जेता म्हणतात. पूर्वीच्या काळात फक्त लढाईमधूनच जिंकणे आणि हरणे होत असावे.
शेदीडशे वर्षांपूर्वी जागतिक स्तरावर क्रीडास्पर्धा व्हायला लागल्या आणि त्यात जो पहिल्या नंबरावर येईल त्याला विश्वविजेता किंवा जगज्जेता या पदाचा मान दिला जायला लागला. इतर बहुतेक खेळांमधले सगळे क्रीडापटु एका ठिकाणी जमून सामने खेळतात आणि त्यात जो अजिंक्य राहतो तो त्या खेळासाठी जगज्जेता ठरतो, पण बुद्धीबळाच्या बाबतीत थोडी वेगळी पद्धत आहे. यात तत्कालिन जगज्जेता वगळून इतर खेळाडू आधी एकमेकांबरोबर खेळतात आणि त्यांच्यात सर्वश्रेष्ठ ठरलेला खेळाडू जगज्जेत्याला आव्हान देतो. मग त्या दोघांमध्ये दीर्घकाळ चालणारे अनेक सामने होतात आणि त्यात जो जिंकतो तो जगज्जेता होतो. दुसरा कोणी त्याला आव्हान देऊन हरवेपर्यंत तोच जगज्जेता म्हणवला जातो.
मला समजायला लागल्यापासून अनेक वर्षे कोणीतरी रशियन माणूसच बुद्धिबळातला जगज्जेता असायचा. बॉबी फिशर या अमेरिकन माणसाने त्यांचा एकाधिकार संपवून हा खिताब जिंकला, पण कारपोव्ह आणि कॅस्पारोव्ह यांनी पुन्हा रशियाचे वर्चस्व सिद्ध केले. सन २००७मध्ये विश्वनाथन आनंद या भारतीयाने हे जगज्जेतेपद मिळवून इतिहास घडवला. त्याने हे पद सहा वर्षे आपल्याकडे ठेवले. सन २०१३मध्ये मॅग्नस कार्लसन याने आनंदला पराभूत करून हे पद जिंकले. २०२२मध्ये तो अपराजित असतांनाच त्याने हे पद सोडले आणि इतर उत्सुक खेळाडूंना हरवून मागच्या वर्षी चीनचा डिंग वॉन जगज्जेता झाला.
विश्वनाथन आणि कार्लसन यांचा चेन्नै इथे झालेला सामना पहाणाऱ्या प्रेक्षकांमध्ये एक लहानसा भारतीय मुलगा होता, तो तेंव्हा थोडा उदास झाला होता, पण या महत्वाकांक्षी मुलाने बुद्धीबळाचा ध्यास घेतला. तो बद्धिबळ खेळत राहिला आणि सामन्यामागून सामने जिंकत राहिला. २०२४ या वर्षी त्याने इतर खेळाडूंना हरवून डिंगला आव्हान दिले आणि सिंगापूरमध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्याच्या अखेरच्या डावात विजयश्री खेचून आणली, त्याचे नाव आहे गुकेश दोम्माराजू. अवघ्या अठरा वर्षांचा असतांना बुद्धिबळातला जगज्जेता झालेला हा सर्वात लहान चँपियन आहे. गुकेशचे मनःपूर्वक अभिनंदन.
मी असे वाचले होते की गुकेशला सुमारे साडेअकरा कोटी रुपये बक्षिस मिळणार आहेत. त्यातले साडेचार कोटी रुपये आयकर भरावा लागेल. तामिळनाडु सरकारने पाच कोटी रुपये बक्षिस जाहीर केले आहे. आणखी कोण कोण त्याला किती बक्षिसे देणार आहेत हे काही दिवसात कळत जाईल. त्यातून त्याला किती कर भरायचा आहे हे ठरवण्यासाठी त्याला आधी एक टॅक्स कन्सल्टंट शोधावा लागेल.
जगज्जेते -२
इंग्लंडचे साम्राज्य जगभरात सर्वात जास्त पसरलेले होते. त्यावर कधीही सूर्य मावळत नाही अशी प्रौढी मारली जात होती. इंग्रज लोकांनी लढाईत जिंकलेल्या राजांचे खजिने लुटून आणि प्रजेवर कर लावून संपत्ती गोळा केलीच, शिवाय वसाहतींमधला कच्चा माल आपल्या देशातल्या कारखान्यांना पुरवून आणि तिथे तयार झालेला पक्का माल जगभर अवाच्या सवा भावाने विकून त्या व्यापारामधूनसुद्धा ते आणखी संपत्ती मिळवत गेले. यामधून ब्रिटन हा जगातला सर्वात संपन्न देश आणि लंडन हे सर्वात समृद्ध शहर झाले होते आणि तिथला राजा किंवा राणी सर्वात जास्त श्रीमंत आणि शक्तिशाली व्यक्ती झाली होती.
विसाव्या शतकात सगळीकडे लोकशाहीचे वारे पसरले आणि इंग्लंडमधले राजे नुसते नामधारी राहिले. दोन महायुद्धांमध्ये त्या देशाची बरीच वाताहात झाली आणि त्याला साम्राज्यामधल्या सगळ्या देशांना स्वातंत्र्य द्यावे लागले. अमेरिकेने म्हणजे यूएसए या देशाने शेती, कारखानदारी, सैनिकी सामर्थ्य आणि व्यापार या सर्व क्षेत्रांमध्ये प्रचंड वेगाने घोडदौड करून तो जगातला सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली देश झाला आणि गेली कित्येक दशके राहिला आहे. पण तिथला राष्ट्राध्यक्ष दर चार वर्षांनी बदलत असतो. तेवढ्या काळात तो सत्ताधीश असतो पण तो सर्वात श्रीमंत माणूस नसतो. किंबहुना त्या देशातला सर्वात श्रीमंत माणूस आपल्या उद्योगधंद्यात मग्न असतो, तो राष्ट्राध्यक्ष होण्याच्या शर्यतीत भाग घेत नाही.
फोर्ब्स कंपनीने प्रसिद्ध केलेली सन १९००सालापासून जगामधील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची नावे उपलब्ध आहेत. ही यादी तयार करतांना देशोदेशीचे महाराजे, सुलतान, हुकुमशहा वगैरेंचा विचार केला जात नाही. तसेच ही संपत्ती ठरवतांना त्या माणसाकडे असलेल्या शेअर्सची बाजारातली किंमत विचारात घेतली जाते आणि ती दररोज कमीजास्त होत असते. सध्याच्या युगात उद्योगधंद्यामधून संपत्ती निर्माण होते आणि वाढत जाते. यामुळे या यादीत कार्नेजी, रॉकेफेलर, फोर्ड, गेट्टी आदि अमेरिकन कारखानदारांची नावे आहेत. विसाव्या शतकाच्या अखेरीला संगणक उद्योगाने कमालीच्या वेगाने प्रगती केली आणि मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्सने श्रीमंतीचे शिखर गाठले. तो सलग वीस वर्षे त्या स्थानावर टिकून होताच, आजही त्याच्या आसपास आहे. अॅमेझॉन या व्यापार करणाऱ्या सर्वात मोठ्या जागतिक कंपनीचा मालक जेफ बेझोस याने बिलगेट्सची जागा घेतली होती. बर्नार्ड आर्नोल्ड नावाचा एक फ्रेंच माणूस काही दिवस टॉपवर होता, पण गेली काही वर्षे सतत ठळक बातम्यांमध्ये असणारा एलॉन मस्क हा सध्या जगामधला सर्वाधिक श्रीमंत माणूस झाला आहे. इतकेच नव्हे तर आतापर्यंत जितके सर्वात श्रीमंत लोक होऊन गेले त्या सर्वांच्यापेक्षा मस्कची आजची संपत्ती जास्त आहे असेही बातमीमध्ये म्हंटले आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
वर्ष २०२५
२०२५: आकड्यांच्या दुनियेतील एक 'मॅजिकल' वर्ष! गणिताच्या भाषेत सांगायचे झाले तर, प्रत्येक आकड्याचे स्वतःचे एक व्यक्तिमत्व असते. पण २०२५ हे वर्ष संख्याशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत देखणे आणि शिस्तबद्ध आहे. या संख्येमध्ये लपलेली गणितीय जादू पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
१. घन आणि बेरीज यांचा सुंदर संगम: गणितात १ ते ९ या अंकांच्या घनाची (Cubes) बेरीज केली, तर त्याचे उत्तर अचूक २०२५ येते.1^3 + 2^3 + 3^3 + 4^3 + 5^3 + 6^3 + 7^3 + 8^3 + 9^3 = 2025
२. स्वतःची फोड आणि स्वतःचाच वर्ग: २०२५ ची एक गमतीदार फोड करून पहा. या संख्येचे दोन भाग करा: २० आणि २५.आता यांची बेरीज करा: 20 + 25 = 45.आणि जर तुम्ही ४५ चा वर्ग केला तर उत्तर पुन्हा २०२५ येते! अशा प्रकारचा गुणधर्म खूप कमी संख्यांमध्ये आढळतो.
३. त्रिकोणी संख्यांशी नाते : त्रिकोणी संख्या' (Triangular Numbers) म्हणजे अशा संख्या ज्या ठिपक्यांच्या साहाय्याने एक समभुज त्रिकोण तयार करू शकतात. ९ वी त्रिकोणी संख्या ४५ आहे (कारण 1+2+3+4+5+6+7+8+9 = 45). २०२५ हा याच ४५ चा वर्ग आहे. म्हणजेच, पहिल्या नऊ घनांची बेरीज ही ९ व्या त्रिकोणी संख्येच्या वर्गाइतकी असते.
४. शेवटचा आकडा ५ असण्याचे वैशिष्ट्य: ज्या संख्यांच्या शेवटी ५ असतो, त्यांचा वर्ग काढण्याची एक सोपी पद्धत आहे. ४५ चा वर्ग काढताना: शेवटच्या ५ चा वर्ग २५ लिहा. उरलेला अंक ४ आहे, त्याला त्याच्या पुढच्या अंकाने (५) गुणा: 4 times 5 = 20. दोन्ही एकत्र करा: २०२५.
५.२०२५ हा आकडा दोन वर्गांचा गुणाकार आहे 5^2X9^2 = 25X81 =2025
६. २०२५ हा आकडा तीन किंवा चार वर्गांची बेरीज आहे. 40^2=1600, 20^2=400, 5^2=25, 3^2=9 and 4^2=16.. . . 1600+400+25 आणि 1600+400+16+9 =2025
एक लेखक म्हणून जेव्हा आपण शब्दांशी खेळतो, तेव्हा कधीकधी या आकड्यांच्या खेळाकडे पाहणेही तितकेच आनंददायी असते. २०२५ हे केवळ एक वर्ष नसून निसर्गातील आणि गणितातील समतोलाचे एक उत्तम उदाहरण आहे.
इसवी सन २०२५च्या आठवणी -१
१ जानेवारी २०२५ला मी माझ्या कुटुंबियांसह श्रीगजाननमहाराजांच्या शेगावला होतो. त्यामुळे त्या वर्षाची सुरुवात मंगलमय आणि भक्तिरसपूर्ण झाली होती. जानेवारीच्या मध्याला मी आमच्या कॉलनीमधल्या 'आनंदयात्री' या ज्येष्ठ नागरिकांच्या समूहाबरोबर यवतजवळील दरेकर वाड्यातल्या हुरडा पार्टीला गेलो होतो, तिथे खाणेपिणे, गाणी गाणे, खेळ, मौजमस्ती आणि धमाल केली होती. त्यानंतर महिना अखेरीला माझे मुंबईत राहणारे एक आप्त अरुण पटवर्धन मला पुण्याला येऊन भेटून गेले. पन्नास वर्षांपूर्वी आमचे एकमेकांकडे बरेच जाणे येणे होत होते. पुढे दोघेही आपापल्या क्षेत्रात अधिकाधिक गुंतत गेल्यामुळे आमच्या भेटणे कमी होत होत थांबून गेले होते. पण या वर्षी आमच्या भेटीचा योग आला होता.
इंग्लंडमध्ये फार चांगली सार्वजनिक आरोग्यसेवा आहे. तिला कार्यक्षम ठेवणाऱ्या डॉक्टरांमध्ये अनेक भारतीय वंशाचे आहेत. त्यातच आमच्या जमखंडीचे डॉ.रवी आपटे आहेत. इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले पण मराठी भाषेवर मनापासून प्रेम करणारे डॉ.बाळ ऊर्फ रविंद्र विश्वनाथ आपटे तिकडे राहूनही विविध विषयांवर मराठी भाषेत पुस्तके लिहितात आणि ती भारतात छापून घेऊन प्रकाशित करतात. २०२५ या वर्षी ते भारतात आलेले असतांना त्यांनी आपण होऊन माझ्या घरी येऊन माझी भेट घेतली आणि तासभर मनमोकळ्या गप्पा मारल्या. वयाने तसेच अनुभव आणि ज्ञान या सगळ्याच बाबतीत मला ज्येष्ठ असलेल्या या बाळदादांनी माझ्यासारख्या अनोळखी, अप्रसिद्ध आणि कनिष्ठ व्यक्तीला भेटायची इच्छा का व्यक्त करावी याचे मला कुतूहलच होते. पण गप्पा मारता मारता माझ्या हे लक्षात आले की आम्हा दोघांची व्यावसायिक क्षेत्रे पूर्णपणे भिन्न असली तरी आमच्या स्वभावात काही साम्यस्थळे आहेत. "काय, कुठे, केंव्हा, कसे याबद्दलचे प्रचंड कुतुहल व जिज्ञासा यांची सुंदर सांगड घातली गेल्यामुळे सर्वच विषयांकडे पाहण्याची दृष्टी बदलून गेली." असे त्यांचे मनोगत एका पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये लिहून ते पुढे लिहितात, "आपणास जे नवीन आणि निश्चित ठाऊक आहे ते लिहून, लहान थोरांना सांगून त्यांची जिज्ञासा वाढवावी या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे." कदाचित अशाच प्रकारच्या विचारांचे काही कण जमखंडीच्या मातीमधून माझ्यातही उतरले असावेत म्हणून माझ्या परीने मी चार ओळी लिहित असतो, त्या योगायोगाने त्यांच्या वाचनात आल्या असाव्यात. या वेळी त्यांनी मला भेटून त्यांचे 'अनाहत' हे नवे पुस्तक मला भेट दिले आहे. निरनिराळ्या विषयांवरील अनेक सुंदर लेखांचा हा एक वाचनीय असा संग्रह आहे. या वर्षी मला मिळालेला हा एक अनमोल असा आशीर्वाद आहे.
इसवी सन २०२५च्या आठवणी -२
मी रायगडाबद्दल असंख्य वेळा वाचले आणि ऐकले होते, त्यामुळे हा किल्ला पहायची उत्सुकता होती. ती इच्छा यावर्षी पूर्ण करून घेतली. आम्ही सकाळी लवकर निघून कारने रायगडावर जाणाऱ्या रोपवेच्या स्टेशनला पोचलो आणि त्या झोपाळ्यात बसून गडावर गेलो. मला काठी टेकत चालत येतांना पाहून एक शिलेदार पुढे आला तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही पालखीत बसवून गड दाखवून आणू असे सांगितले. तिथे जवळजवळ दोनशे पायऱ्या चढाव्या उतराव्या लागतील असे त्याने सांगितले. ते काम मला बरेच अवघड वाटले आणि मध्येच मला दम लागला असता तर सगळ्या प्रोग्रॅमचा विचका झाला असता. शिवाय माझ्या गतीने थांबत थांबत चालायचे झाल्यास सगळ्यांनाच खूप जास्त वेळ लागला असता म्हणून आम्ही थोडा विचार केला आणि पालखी ठरवली. त्याने आणलेली पालखी हॉस्पिटलमधल्या स्ट्रेचरसारखी दिसत होती आणि एकजण पुढे आणि दुसरा मागे उभा राहून त्याच्या दांड्यांना उचलत होता. त्या पालखीचे वजन आणि त्यात बसलेल्या उतारूचे वजन उचलून त्या गडाच्या उंच पायऱ्या चढणे कठीण काम होते, पण ते मावळे जिद्दीने करत होते. मला त्यांची दमणूक दिसत होती म्हणून सपाट जागा आल्यावर मी मधून मधून पालखीतून उतरून थोडे थोडे अंतर चालत जायचे ठरवले. असे करत मुख्य भाग पाहून घेतल्यानंतर मी एका ठिकाणी बाकड्यावर बसून घेतले. मुलगा आणि नातवंडे दूर दूरची ठिकाणे पाहून आले. तिथे एके काळी बांधलेल्या भव्य महालांचे आता काही अवशेषही शिल्लक नाहीत. रिकाम्या जागांवरच इथे अमूक महाल आणि तिथे अमूक महाल असे सगळे सांगितले जाते. त्याने मनाचे समाधान होत नाही. पर्यटकांसाठी त्या भागात कुठेतरी एखाद्या ऐतिहासिक सिनेमाच्या सेटसारखे महाल उभे करून ठेवले असते तरी ते पहायला मजा आली असती.
आमच्या मित्रमंडळींमधल्या ज्यांचे वाढदिवस होऊन गेले होते त्यांनी मिळून व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी वाकडमध्ये नव्याने उघडलेल्या एका हॉटेलात पार्टी दिली होती. सगळ्यांनी मिळून हसत खेळत आणि गाणी म्हणत केलेल्या या स्नेहभोजनाने मैत्रीचे संबंध जास्त मजबूत झाले.
इसवी सन २०२५च्या आठवणी -३
मला आमच्या नात्यातल्या एका समारंभासाठी एरंडवणे भागातल्या बोगनविला फार्ममध्ये जायचे होते कारण दूरदूरहून येणारे काही आप्त मला तिथे एकत्र भेटणार होते. मी या जागेचे नावही कधी ऐकले नव्हते त्यामुळे ती नेमके कुठे आहे याची मला काही कल्पना नव्हती. गूगलवरून शोध घेतला तर मी मुळा नदीच्या किनाऱ्यावर हिंजवडीला राहतो तिथून मुठा नदीच्या किनाऱ्यावरील कुठल्याशा जागी जायचे होते इतका अंदाज आला. दहापंधरा वर्षापूर्वीच्या काळात मी यासाठी घरातून निघाल्यावर आधी चालत चालत एक किलोमीटरावर असलेल्या ऑटोरिक्शा स्टँडवर जाऊन तिथून हिंजवडीच्या बसस्टॉपपर्यंत जाण्यासाठी रिक्शा घेतली असती. तिथून मला मनपाला जाणारी बस मिळाली असती. तिथून दुसऱ्या बसने नळ स्टॉपपर्यंत जाऊन पुढे पत्ता शोधत शोधत त्या जागेवर पोचेपर्यंत दीड दोन तास वेळ गेला असता आणि मी दमून घामाघूम होऊन गेलो असतो. कार्यक्रम संपल्यावर घरी परत येण्यासाठी पुन्हा ही सगळी त्रिस्थळी यात्रा करावी लागली असती. माझ्या सध्याच्या शारीरिक क्षमतेमध्ये तर एवढी दगदग करणे मला शक्यच नव्हते, त्यामुळे मी तिथे जायचा विचारही केला नसता.
पण आता तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे परिस्थिती किती बदलली आहे पहा! मी कपडे घालून तयार झाल्यावर हातातल्या मोबाइलवर दोन चार बटने दाबली, कुठे जायचे त्या जागेचे फक्त नाव टाकले आणि क्षणभरात माझ्यासाठी एक कॅब बुक झाली. लिफ्टमधून खाली आल्यावर दोन तीन मिनिटात ती समोर येऊन उभी राहिली. माझ्या घरापासून कुठकुठल्या रस्त्यांवरून जाऊन त्या पत्त्यावर पोचायचे आहे याचे सगळे मार्गदर्शन त्या गाडीचालकाचा त्याच्या मोबाइलवर दिसत होते. त्याप्रमाणे जाऊन त्याने मला त्या बोगनविला फार्मच्या गेटपाशी नेऊन सोडले. त्यानंतर मी पुन्हा माझ्या मोबाइलवर दोन चार बटने दाबली आणि त्याला भाड्याचे पेमेंट केले. तीसपस्तीस मिनिटे कारमध्ये आरामात बसून काढून मी त्या ठिकाणी जाऊन पोचलो आणि पूर्ण उत्साहाने तिथल्या कार्यक्रमात सहभागी झालो, सगळ्या पाहुणेमंडळींना भेटून त्याच्याशी वार्तालाप केला. सुग्रास भोजन केले आणि दुसरी कॅब बोलावून आरामात घरी परत आलो. गूगल, ओलाअॅप, जीपीएस आणि यूपीआय यांनी जीवन किती सोपे केले आहे ना?
. . . . . . ..सध्या अमेरिकेत राहणाऱ्या माझ्या मुलाला असे वाटत असते की मी त्याच्याकडेही रहायला जावे, पण मी या वयात सामान उचलून प्रवास करू शकत नाही. म्हणून तोच इकडे येऊन मला घेऊन जातो. या वर्षी उन्हाळ्यात मला त्याच्याकडे जायचे आहे असे तो कधीपासून म्हणत होताच. त्याने या एप्रिल-मे मध्ये प्रवास करायचा बेत ठरवून मला तयार रहायची सूचना केली. मला कुठला आजार नव्हता, माझा रक्तदाब आणि रक्तातल्या साखरेचे प्रमाण नियंत्रणाखाली होते तरीही माझ्या अंगातली शक्ती हळू हळू कमी होत चालली आहे अशी एक जाणीव होत होती.
आमच्या डॉक्टर मित्राने काही तपासण्या सुचवल्या त्या नॉर्मल आल्या, मग त्याने प्रोटीन्स आणि जीवनसत्वे घ्यायला सांगितली. ओळखीतल्या दुसऱ्या एक डॉक्टरीणबाई दहा बारा वर्षे परदेशात राहून वृद्धांचे आजार यावर काम करून आल्या आहेत. त्याच्याकडे गेल्यावर त्यांनी मला न्यूरॉलॉजिकल, कार्डिअॅक आणि ऑर्थोपीडिक इव्हॅल्युएशन करून यायला सांगितले. मी धायरीला रहात असतांना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलात अनेक वेळा जाऊन अशा प्रकारच्या चाचण्या केल्या होत्या. त्या सगळ्यांचा निष्कर्ष असा होता की वयोमानानुसार शरीरात काही बदल होत असतात, त्यावर काही औषधे नाहीत. नियमित आहार, व्यायाम आणि विश्रांती घेऊन आपणच आपली क्षमता टिकवून ठेवायचा प्रयत्न करायला पाहिजे. ते सगळे तर मी करत होतोच. हिंजवडीला राहून शहरातल्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन या चाचण्या करणे जास्तच अवघड काम होते आणि त्यातून काही उपाय निघायची शक्यता धूसर होती.
अमेरिकेला जाण्यापूर्वी मी रक्ततपासणी करून ते रिपोर्ट घेऊन माझ्या कार्डिओलॉजिस्टकडे गेलो. त्याने एक टूडीएको टेस्ट करून मला प्रवास करायला काही हरकत नाही, हातापायातला अशक्तपणा कदाचित सार्कोपीनियामुळे असेल. त्यावर उपाय म्हणून त्यांनी फिजिओथेरपी घ्यायला सांगितले. मी लगेच एका फिजिओथेरेपिस्टला गाठले. तिने घरी येऊन पंचवीस प्रकारचे व्यायाम सांगितले आणि दहा बारा दिवस ते माझ्याकडून करवून घेतले. त्यात झोपून, बसून आणि उभे राहून हातापायांचे एक एक सांधे वाकवायचे आणि पाच पाच सेकंद त्या अवस्थेत धरून ठेवायचे असतात. ते रोज करून माझे काही स्नायू जरा बळकट झाले आणि माझ्या अंगातली शक्ती हळू हळू वाढायला लागली आहे असे वाटले. तोपर्यंत प्रवासाला जायची वेळ आलीच.
इसवी सन २०२५च्या आठवणी -४
या वेळी माझे अमेरिकेला जाणे एप्रिलमध्ये ठरले, त्या वेळी सगळीकडे सामसूम होते. कमी दगदग व्हावी म्हणून आमचे पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते नेवार्क असे डिजिटल तिकीट काढले गेले. पण महिनाअखेरपर्यंत वातावरण तापत गेले आणि कधीही काही गंभीर घटना होऊ शकेल अशी भीती पडली. या अनिश्चिततेमुळे मी माझ्या मित्रांना आणि आप्तांना माझ्या परदेश प्रवासाबद्दल काही सांगितलेच नाही. मी सांगितले असते तर बहुधा त्यांनी मला नाउमेद केले असते. सात मे ला संघर्ष सुरू झाल्यावर आम्ही सगळ्या बातम्या जास्तच लक्ष देऊन ऐकायला लागलो. आधी असे समजले की दिल्लीहून अमेरिकेला जाणारे विमान मार्ग बदलून गेले आणि सहा सात उशीराने तिकडे जाऊन पोचले. पुण्यातल्या घरातून निघून अमेरिकेतल्या घरी पोचेपर्यंत नाही तरी २४-२५ तास लागणार होतेच याची मनाची तयारीही होती. त्याऐवजी ३०-३२ तास लागतील एवढेच असे वाटले.
पण माझा प्रवास ११ तारखेला होणार होता आणि ९ तारखेला देशातली एकंदर परिस्थिती जास्त तणावपूर्ण होती. काही शहरांमध्ये संभाव्य विमानहल्ल्याला तोंड देण्याच्या नागरिकांच्या तयारीच्या चाचण्या घेण्यात येत होत्या. त्या दिवशी सकाळी चौकशी केल्यावर असे समजले की दिल्ली विमानतळावरील त्या दिवसातली ऐंशी उड्डाणे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे ११ तारखेच्या आमच्या उड्डाणाबद्दल मनात शंका निर्माण झाली. आम्ही पुण्याहून दिल्लीला गेलो, पुढले विमान रद्द झाले आणि तिथली स्थानिक परिस्थिती जास्तच चिघळली तर आम्ही कुठे जाणार होतो? काय करणार होतो? त्यापेक्षा मुंबईला जाऊन तिथून अमेरिकेला गेलेले बरे असे वाटले. मग ज्या एजन्सीकडून विमानाची तिकीटे घेतली होती त्यांना फोन करून चौकशी केली. त्यांनी सांगितले की आधीचे बुकिंग रद्द करण्याची काही कँसलेशन फी द्यावी लागेल आणि आयत्या वेळी मुंबईहून नेवार्कच्या तिकीटाचा दरही आता जास्त असेल त्याचे जास्तीचे पैसे द्यावे लागतील असा दुहेरी धक्का होता, पण दिल्लीला जाणे टाळायचे असेल तर तो सोसायला पाहिजे म्हणून आम्ही होकार दिला, पण थोड्या वेळानंतर त्यांनी सांगितले की हा बदल करण्यासाठीसुद्धा त्यांना एअरलाइन्सचा फोनच मिळत नाही आहे, तुम्हाला जमलं तर तुम्ही प्रयत्न करा. आम्हीही प्रयत्न करून पहात होतो, पण तो फोन लावल्यानंतर आणि "हे बटन दाबा", "ते बटन दाबा" वगैरे सोपस्कार केल्यानंतर संवाद पुढे सरकतच नव्हता. त्या दिवशी अनेक उड्डाणे रद्द झाल्यामुळे त्यांना हजारोंच्या संख्येने फोन येत असतील तर त्याला ती फोनची यंत्रणा तरी काय करणार? त्यामुळे त्या वेळी आम्हाला काहीच करता येत नव्हते. बहुतेक माझी ही ट्रिप रद्द होणार की काय असे दिसायला लागले होते. मी तरी अमेरिकेत जाऊनसुद्धा कुठले मोठे काम करणार होतो? या आधी ही माझे जगभर फिरणे झालेले होतेच. त्यामुळे मलाही या वेळी जायची मनापासून फार ओढ नव्हतीच. पुढे जे होईल ते पहावे असा विचार केला.
दुसऱ्या दिवशी सकाळी इंटरनेटवर फ्लाइटची चौकशी करता अशी माहिती मिळाली की विमानांचे टाइमटेबल तात्पुरते बदलले असून आमचे विमान दिल्लीहून आम्हाला दिलेल्या वेळेच्या ५-६ तास आधीच सुटणार आहे. तसे असेल तर आमच्या पुण्याहून निघणाऱ्या फ्लाइटने दिल्लीला जाऊन ती पुढील फ्लाइट गाठणे शक्यच नव्हते. पण हा बदल एअरलाइन्सने केलेला असल्यामुळे आम्हाला कँसलेशन चार्ज न लागता ते तिकीट रद्द करता येणे शक्य होईल असे वाटले. एजन्सीला ई मेल पाठवून खात्री करून घेतली आणि मग मुंबईहून निघणाऱ्या दुसऱ्याच एअरलाइन्सचे तिकीट काढले. यातली एक गंमत म्हणजे ते तिकीट रद्द केलेल्या तिकिटापेक्षा जराशा कमी किंमतीत मिळाले. त्या परिस्थितीत दिल्लीला जाण्यातला धोकाही टळला आणि थोडे पैसेही वाचले. मात्र या नव्या तिकिटासाठी आधी संपूर्ण किंमत भरावी लागली. कँसलेशनचे पैसे कधी मिळतील तेंव्हा मिळतील, पण आधी तर दुप्पट खर्च करावा लागला.
इसवी सन २०२५च्या आठवणी -५
मी पंधरा वर्षांपूर्वी अमेरिकेतला स्वातंत्र्यदेवीचा पुतळा तिच्या बेटावर जाऊन अगदी जवळून पाहिला होता. या वर्षी अमेरिकेत गेल्यावर पहिल्याच आठवड्यात न्यू जर्सीतल्या जर्सी सिटीमध्ये असलेल्या लिबर्टी पार्कमध्ये गेलो. हे पार्क म्हणजे एक प्रचंड आकाराचे लॉन आहे. त्यात रस्त्यांच्या कडेकडेला बसायला काही बेंच ठेवले आहेत. काही लोक तिथे येऊन जॉगिंग करत असतात, काही लोक पिकनिक करायला येतात. आम्ही तिथे गेलो तेंव्हा फारच तुरळक लोक दिसत होते, पार्किंगमध्येही सगळी रिकामीच जागा होती. या पार्कच्या एका भागातून खाडीच्या पलीकडे असलेला स्वातंत्र्यदेवीचा पुतळा आणि मॅनहॅटनमधल्या टोलेजंग इमारती यांचे दर्शन होते.

न्यूजर्सीमधील मराठी विश्व या संस्थेने इथल्या पिस्कॅट्वा गावाजवळच्या एका पार्कमध्ये गावजत्रा या नावाने एक पिकनिक आयोजित केली होती. तिथे आमच्या भागातल्या लहान बाळांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातले मराठी खूप लोक उत्साहाने आले होते. आयोजकांनी तिथे खाण्यापिण्याची बऱ्यापैकी सोय ठेवली होती पण ज्यांना पाहिजे असेल त्यांनी त्यांना पाहिजे असलेले पदार्थ आधीपासूनच मागवून ठेवणे आवश्यक होते. आयत्या वेळी काही कमी पडले किंवा शिल्लक राहिले आणि वाया गेले असे होऊ नये याची काळजी घेतली होती. आम्हाला हे ठाऊकच नव्हते म्हणून आम्ही घरून जेवण करूनच तिथे गेलो होतो.
या निमित्याने ओळखीच्या मराठी लोकांच्या एकमेकांशी भेटी व्हाव्यात आणि काही नव्या ओळखी व्हाव्यात हा मुख्य उद्देश होता. त्यानुसार लोक एकमेकांना भेटून गप्पा मारत होते. माझ्यासारख्या भारतातून गेलेल्या पाहुण्यांना तिथले कोणी ओळखीचे लोक भेटण्याचा प्रश्नच नव्हता. तिथे सामूहिक खेळ, नाच गाणी वगैरे चालले होते, त्यातही ज्यांना हौस असेल त्यांनी सहभागी व्हावे, नसेल त्यांना बसायला जागा ठेवल्या होत्या. तरुण मंडळी अर्थातच उत्साहाने सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत होती. आम्ही चार बुजुर्ग एका बाकड्यावर बसून गप्पा मारता मारता तिथे चाललेली मजा पहात होतो. त्यातले तीघेजण प्रवासी आणि एक निवासी होता. बोलता बोलता आमची मैत्री जमली आणि नंतर संपर्कात राहण्यासाठी आम्ही एक वॉट्सॅप ग्रुपही तयार केला.
महाराष्ट्रामध्ये आषाढी वारीसाठी भाविक वारकरी पंढरीच्या वाटेवर चालत जातात. आळंदी आणि देहूहून निघालेल्या वाऱ्या मधल्या काही मुक्कामांमध्ये रिंगण घालतात. न्यूजर्सीमधल्या आमच्या भागातल्या मराठी लोकांनी एका पार्कवर जमून एक प्रतीकात्मक रिंगण घातले होते. त्याला खूप लोक हजर राहिले होते. त्यातल्या बहुतेक पुरुषांनी भारतीय पोशाख घातला होता, निदान अंगात टी.शर्टच्या ऐवजी कुर्ता घातला होता. महिलांमध्ये भारतीय वस्त्रांची फॅशन परेड होती. कुणी तर नऊवारी लुगडे, नाकात नथ, केसांचा अंबाडा घालून, त्यावर फुलांचा गजरा माळून आल्या होत्या. लहान लहान मुलामुलींनाही निऱ्या करून शिवलेले रेडीमेड धोतर किंवा साडी 'घातली' होती. एका लहान रिंगणामध्ये ढोलताशांच्या गजरात अनेक लोक लेझिम खेळत होते आणि फुगड्या घालत होते तर एका खूप मोठ्या रिंगणामध्ये शेकडो लोक "विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल" च्या तालावर चालत चालत फेऱ्या घालत होते. एका ठिकाणी विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती ठेवल्या होत्या. रिंगणाचा कार्यक्रम संपल्यावर सर्वांनी रांगेत उभे राहून त्यांचे दर्शन घेतले. सर्वांना प्रसादाचे पुडके मिळाले. त्या दिवशी तिथे बरेच ऊन होते तरी लोक उत्साहाने आले होते. त्यांच्यासाठी थंडगार लिंबू सरबत विनामूल्य वाटत होते. शिवाय एक आयस्क्रीमवाल्याची गाडी आली होती, त्यांचा धंदाही जोरात चालत होता. अमेरिकेत एक भारतीय आणि त्यातूनही खास मराठी लोकांचा मेळावा पाहून मजा आली.
मी अणुशक्तीनगरमध्ये रहात असतांना आमच्या समोरच्या घरातच माझा ऑफिसमधला सहकारी मित्र अरविंद देशपांडे रहात होता. त्याची धाकटी मुलगी पिंकी तेंव्हा शाळेत शिकत होती. पुढे तिने इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले आणि ती लग्न करून अमेरिकेला गेली. त्यानंतर कधीच तिची भेट झाली नव्हती. पण मी अमेरिकेला आलो आहे हे तिला कुणाकडून तरी समजले आणि तिने माझ्या मुलाशी संपर्क करून आम्हाला तिच्या घरी भेटायला यायचे आमंत्रण दिले. कनेक्टिकट राज्य तसे न्यूजर्सीहून जास्त दूर नाही म्हणून आम्हीही तिच्याकडे जायचे ठरवले. जीपीएस लावून आम्ही गाडीने निघालो. का कुणास ठाऊक, पण त्या यंत्राने आम्हाला हायवे सोडून लहान रस्त्यांवरून न्यायचे ठरवले. त्या ग्रामीण भागातले अनुपम सृष्टीसौंदर्य पहात वळणा वळणांच्या रस्त्याने जात असतांना मध्येच कुठे तरी आम्ही चुकीचे वळण घेतले आणि काही किलोमीटर पुढे गेल्यानंतर ते आमच्या लक्षात आले. पण त्या जागी कुठलेही नेटवर्क चालत नव्हते. आम्ही नेमके कुठे आहोत हे सुद्धा समजत नव्हते. मध्ये एका ठिकाणी लहानशी वस्ती दिसली म्हणून तिथल्या एका दुकानात जाऊन चौकशी केली तर समजले की त्या भागात कुठे ट्रान्स्मिशन टॉवर नव्हता आणि इंटरनेट चालत नव्हते. अमेरिकेत अशीही जागा असेल असे आम्हाला वाटले नव्हते. त्या दुकानातल्या माणसाने सांगितले की आलेल्या रस्त्याने परत जावे आणि दहा बारा मैलावर एक हायवे लागेल, तिथे डाव्या बाजूला वळावे. त्यानंतर आम्ही कुठे न हरवता पण तासभर उशीराने पिंकीच्या घरी जाऊन पोचलो. तिथे आमचा छान आदरसत्कार आणि खूप गप्पा झाल्या.
इसवी सन २०२५च्या आठवणी -६
न्यूयॉर्क शहराच्या मेट्रोपोलिटन भागात असलेल्या पण न्यूजर्सी राज्यातल्या लिंडहर्स्ट नावाच्या गावात स्थायिक झालेल्या श्री.भाऊसाहेब कुलकर्णी यांनी त्यांच्या बंगल्याच्या आवारातच एका प्रशस्त खोलीत, खरे तर गॅरेजमध्ये, विठ्ठल व रखुमाई यांच्या मूर्ती ठेऊन एक लहानसे देऊळ केले आहे. ते दरवर्षी पुढाकार घेऊन आषाढ एकादशीच्या ३-४ दिवस आधी एडिसन शहराजवळच्या एकाद्या पार्कमध्ये विठोबाच्या वारीचे मोठे रिंगण घडवून आणतात. या वर्षी मी इथे असल्यामुळे या रिंगणाला हजर राहिलो होतो. एकादशीच्या दिवशी त्यांनी त्यांच्या गावातच पालखीचे आयोजन केले होते. त्यात विठ्ठलरखुमाईच्या प्रतिमा आणि पादुका एका पालखीत ठेवून ती विठ्ठलनामाच्या गजरात लिंडहर्स्टच्या परिसरातच फूटपाथवरून एकदीड मैल फिरवून देवळात परत आणली. त्यानंतर तिथे धार्मिक नृत्यगायनाचा कार्यक्रम आणि आरती झाली. या कार्यक्रमालाही सुमारे दीडदोनशे भक्तजन आले होते. श्रमपरिहारासाठी सर्वांना उपवासाचा फराळ देण्यात आला. मला भारतात असतांना एकादशीच्या दिवशी तिथल्या कुठल्या विठ्ठलाच्या देवळात जायला सहसा जमत नाही, पण न्यूजर्सीमध्ये मात्र दोन वेळा तसा योग आला.
अमेरिकेत रहाणाऱ्या भारतीय लोकांनी ठिकठिकाणी हिंदू देवतांची मंदिरे बांधली आहेतच. श्री व्यंकटेश (बालाजी), पंचमुखी हनुमान किंवा महालक्ष्मी यासारख्या मुख्य देवतांच्या मंदिरांमध्येच श्रीगणेश, श्रीराम, श्रीकृष्ण, महादेव, दुर्गामाता वगैरे इतर अनेक देवतांच्या सुंदर प्रतिमा ठेवलेल्या असतात. स्वामीनारायण संप्रदायाने जगभरातील अनेक देशांमध्ये बांधलेल्या अक्षरधाम यासारख्या भव्य आणि सुरेख अशा मंदिरांमध्येही अनेक हिंदू देवतांच्या सुबक मूर्ती ठेवलेल्या असतात. शेगावचे संत श्रीगजाननमहाराज यांचा भक्तसंप्रदाय जगभर पसरला आहे. मुंबईपुण्यासारख्या शहरांमध्ये त्यांची मंदिरे आहेतच, पण अमेरिकेतल्या न्यूजर्सीतल्या न्यूब्रुन्सविक या गावी त्यांच्या भक्तगणांनी त्यांचे लहानसे मंदिर तयार केले आहे. तिथल्या एका दालनात श्रीगजानन महाराजांची मूर्ती ठेवली आहे आणि बाजूच्या दालनांमध्ये त्यांची भव्य चित्रे लावली आहेत. तिथे रोज पूजा आणि आरती होते, काही सण आणि प्रगटदिनाच्या दिवशी विशेष कार्यक्रम असतात. तिथे श्रीगजाननविजय ग्रंथाच्या अनेक प्रती ठेवल्या आहेत आणि तिथे येणारे भक्त तिथल्या एका दालनात बसून त्याचे पठण करतात. मी तिथे असतांना एकदा सार्वजनिक सत्यनारायण पूजा ठेवली होती, त्याचे पूजाविधि आणि कथावाचन हिंदीमध्ये केले होते. या मंदिरासाठी शेगावहून चांदीच्या पादुका आणल्या होत्या. आधी त्या पादुकांना निरनिराळ्या भक्तांच्या घरी समारंभपूर्वक फिरवून आणले. त्या प्रत्येकाच्या घरी एका विशिष्ट क्रमाने त्यांची पूजा आरती आणि भजन करण्यात आले. त्यानंतर एका मुहूर्तावर त्यांची मंदिराच्या सभोवती मिरवणूक काढून त्याची श्रीगजाननमहाराजांच्या मूर्तीच्या शेजारी विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. या काळात मी तिथे असल्यामुळे मला हे सोहळे पहायची संधी मिळाली.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आम्ही घरी गणेशोत्सव साजरा केला. आमच्या घरापासून जवळ असलेल्या एडिसन शहरात खूप मोठ्या संख्येने भारतीय लोक राहतात. तिथल्या पटेल स्टोअरमध्ये एकूण एक सगळ्या 'देशी' वस्तू मिळतात. तिथेच शाडू मातीची सुबक मूर्ती आणि पूजेचे सर्व सामान मिळाले. गणेशोत्सवाच्या अखेरच्या दिवशी सत्यनारायणपूजाही करून घेतली आणि ओळखीतल्या सर्वांना संध्याकाळी दर्शनाला बोलावले. न्यूजर्सीमधल्या त्या गावातही पंचवीस तीस लोक आले होते. "गणपतिबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" च्या गजरात सगळ्यांनी गणरायाला निरोप दिला. परसात ठेवलेल्या एका टबातच मूर्तीचे विसर्जन केले. मी भारतात असतांनापेक्षा अमेरिकेतच थोडा जास्त धार्मिक झालो होतो.
इसवी सन २०२५च्या आठवणी -७
मी दोन वर्षांपूर्वी न्यूजर्सी स्टेटमधील त्या खेडेगावातल्या बंगल्यात चार महिने राहून आलो होतो. तिथे मला चोवीस तास निसर्गाच्या सहवासात रहायचा एक आगळा वेगळा अनुभव आला होता. आमच्या अंगणातल्या आणि परसातल्या अनेक झाडांना फुलांचा बहर आला होता. त्यामुळे सगळीकडे प्रसन्न वातावरण होते. आमच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला एक प्रशस्त पडवी होती. तिथे आणि बागेतही खुर्च्या ठेवल्या होत्या. मी दिवसातला बराचसा वेळ तिथेच बसून रहात असे. पण यावर्षी तिथे पोचल्यापासून पावसाची पिरपिर चाललेली असल्यामुळे मला तिथल्या वृक्षवल्ली आणि वनचरांना भेटायची संधीच मिळत नव्हती. एकदा थोडी उघडीप पडली होती म्हणून आसमंतात एक फेरफटका मारून आलो तर इथे आणखी कोण नवीन आले आहेत हे पहायला आलेले एक गोंडस हरीणही दुडदुडतांना दिसले. ससे तर नेहमीच दिसायचे. मला तिथे एक काट्यावाचून गुलाब पहायला मिळाला. या फोटोत दिसणारे झाड गुलाबासारखे अजीबात दिसत नाही. लक्ष देऊन पाहिले तर त्यावर एक वेल चढलेली दिसते. तीसुद्धा गुलाबासारखी दिसत नाहीच. दोन्ही झाडांना एकही काटा नाही, पण तिला आलेले एक तळहाताएवढे मोठे फूल थेट गुलाबासारखे दिसते. एका बंगल्यासमोर सूर्यफुलांचा प्रसन्न असा लहानगा ताटवा फुलला होता. नंतरच्या काळातही कधी ऊन कधी पाऊस असा खेळ चालला होता. त्यामुळे रोज नियमितपणे प्रभातफेरी आणि सायंफेरी होत नव्हती. या वर्षी आम्हाला परसामध्ये भाजीपाला लावायला वेळ मिळाला नव्हता, त्यामुळे त्या रोपांची वाढ आणि रोज त्यांना आलेली नवी पाने, फुले आणि फळे वगैरे पहाण्याची मजा नव्हती. शिवाय या वर्षी त्या गावातच सगळीकडे अतोनात डास झाले असल्यामुळे उघड्यावर बसायची सोय नव्हती. या सगळ्या कारणांमुळे या वर्षी मला जास्त वेळ घरीच बसून रहावे लागत होते.
जुलै महिन्यात एकदा दिवसभर ढगाळ वातावरण होते, पण प्रत्यक्ष पाऊस पडत नव्हता. रस्तेही कोरडे होते आणि ऊन नव्हते. म्हणून मी संध्याकाळच्या फेरीसाठी घराबाहेर पडलो. पंधरा वीस मिनिटात एक आवर्तन पूर्ण करून घराकडे परत येत होतो. आणखी एक बंगला ओलांडला आणि रस्ता क्रॉस केला की मी घरी पोचणार होतो. एवढे अंतर धावत धावत पाच दहा सेकंदात पार करता येईल. मला काठी टेकत टेकत चालतांनासुद्धा एक मिनिट लागले असते इतक्या जवळ मी येऊन पोचलो होतो. पण एकाएकी भयानक जोरात सोसाट्याचा वारा सुटला आणि मुसळधार पाऊस पडायला लागला. वाऱ्याचा इतका भयानक जोर होता की मला एका जागी उभे राहणेसुद्धा अवघड झाले होते, मग चालत पुढे जायचा प्रश्नच नव्हता. मी कसाबसा जवळच्या विजेच्या खांबापाशी गेलो आणि त्याला धरून त्याच्या आधाराने उभा राहिलो. अमेरिकेत विजेचे खांब उंच झाडांच्या सरळसोट खोडांचे असतात आणि ते दणकट असतात.
मी तिथे उभा असतांना बाजूच्या बंगल्यातली मालकीण मोटारीतून तिच्या घरी परत येत होती. ती मला पाहून जवळ आली, तिने पटकन कारचा पलीकडला दरवाजा उघडला आणि मला कारमध्ये यायची खूण केली. मी ते चार पावलांचे अंतर कसेबसे कापले आणि कारमध्ये शिरलो. मी तिला सांगितले की मला फक्त समोरच्या घरापर्यंतच जायचे आहे. तिने म्हंटले काही हरकत नाही आणि मला घरापर्यंत आणून सोडले. तोपर्यंत मी कुठे असेन याच्या काळजीने माझा मुलगा आणि सून दरवाजाच्या बाहेर पावसात आले होते आणि त्यांची गाडी सुरू करून मला शोधायला निघणार होते तेवढ्यात मी समोरून एका शेजारणीच्या गाडीत बसून येत होतो. त्यांनी लगेच मला हाताला धरून घरात आणले. इतक्यात एक मोठा आवाज आला आणि आमच्या शेजारच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला एक पन्नास साठ फूट उंच झाड काडकन मोडून खाली पडलेले दिसले. नशीब चांगले की ते पूर्णपणे मोकळ्या जागेत पडले, त्यामुळे दुसरी कसली हानी झाली नाही.
त्यानंतर एका संध्याकाळी पुन्हा जास्तच जोराचा झंझावात आला. यावेळी आम्ही घरीच होतो. तिथल्या हवामान खात्याने सगळ्या लोकांच्या मोबाइलवर चक्री वादळाच्या धोक्याचा कडक इशारा पाठवला. त्यात असे स्पष्ट लिहिले होते की ही जिवाला धोका असणारी धोकादायक परिस्थिती आहे. जर तुम्ही पूरग्रस्त भागातून पळून जात नसाल किंवा तुम्हाला जागा सोडून जायचा सरकारी आदेश दिलेला नसेल तर तुम्ही घराबाहेर पडून कुठेही जाण्याचा प्रयत्नसुद्धा करू नये. घराची सगळी दारे आणि खिडक्या बंद कराव्यात आणि तळमजल्यावर किंवा तळघरात जाऊन थांबावे. आम्ही तसेच केले, सगळेजण तळमजल्यावरील एका खोलीत जीव मुठीत धरून बसून राहिलो. या झंझावातामध्ये आमच्या भागातल्या काही रस्त्यांवर बरेच पाणी साठले होते आणि काही घरांच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरून तिथे ठेवलेल्या सामानाचे नुकसान झाले होते.
. . . . .
अशाच एका झंझावाताचा व्हीडिओ कुणीतरी आमच्या पुणेरी डीएई ग्रुपवर टाकला होता. तो पाहून मला ते वादळ तंतोतंत जसे मी प्रत्यक्ष पाहिले होते तसेच वाटले. तो व्हीडिओ पाठवणाऱ्या आरएम भोर यांना मी वॉट्सॅपवर मेसेज पाठवून तुम्ही कुठे राहता असे विचारल्यावर त्यांनी साउथ प्लेन फील्ड असे सांगितले. मी पण त्याच गावात होतो. आम्ही पुण्यातल्या एकाच ग्रुपमध्ये असलो तरी प्रत्यक्षात कधी भेटलो नव्हतो. आता साता समुद्रापार एकाच वेळी त्या लहानशा अनोळखी गावात आलो होतो हा एक विलक्षण योगायोग होता. मग आम्ही टेलिफोनवर बोलणे करून एकमेकांचे पत्ते विचारून घेतले. आमच्या घरांमध्ये साडेचार मैल इतके अंतर असल्यामुळे सहज चालत चालत जाऊन भेटता येण्यासारखे नव्हते. पण एकदा आम्ही आमच्या घरी भेटलो आणि खूप गप्पा मारल्या. मला एक विलक्षण धडपड्या आणि कर्तृत्ववान मित्र मिळाला. त्याने हेल्पर या पायरीवरून सुरुवात करून नोकरी करता करता उच्च शिक्षण घेतले होते आणि बढत्या घेत फोरमन या पदापर्यंत मजल मारली होती. आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन इंजिनियर केले होते आणि या वेळी तो आपल्या इंजिनियर मुलीच्या घरी अमेरिकेला आला होता.
इसवी सन २०२५च्या आठवणी -८
या वर्षाच्या सुरुवातीपासूनच मला अगदी हळू हळू अंगात थोडा अशक्तपणा वाटायला लागला होता आणि मी त्याबद्दल दोन तीन डॉक्टरांना विचारून काही उपचार सुरू केले होते. वयोमानाने असे होत असेल असेच मला आणि इतरांनाही वाटत होते. माझ्या डॉक्टर मित्राने तर थट्टा मस्करी करतांना आता दोन चार महिने अमेरिकेला जाऊन चांगले धष्टपुष्ट होऊन या असे सांगितले होते. मी अमेरिकेला गेलो तेंव्हा तिथे सतत पावसाची पिरपिर सुरू होती आणि थंडगार वारे वहात होते. कदाचित मला ते हवामान सोसले नाही आणि सर्दीखोकला सुरू झाला तो १०-१५ दिवस चालला. त्यामुळे अंगात पुन्हा थोडा अशक्तपणा आला. चांगले खाऊन पिऊन आणि व्यायाम करून माझी तब्येत सुधारण्याच्या मार्गावर लागली होती. पण दीड दोन महिने गेल्यावर अचानक बरे वाटेनासे झाले. मला काय होते ते सांगता येत नव्हते पण मधूनच डिस्कम्फर्ट वाटायचा आणि विश्रांती घेतल्यावर तो आपोआप हळू हळू कमी व्हायचा. त्यानंतर पुन्हा हातापायातली शक्ती कमी व्हायची असे दोन तीन वेळा झाल्यानंतर मी तिथल्या पटेल नावाच्या अनुभवी डॉक्टरकडे गेलो. त्याने मला तपासले आणि ईसीजी काढला. त्यात त्याला काहीतरी शंका आली म्हणून त्याने कार्डिऑलॉजिस्टकडे जाऊन शंका निरसन करून घ्यायला सांगितले. तोपर्यंत मला तिथे जाऊन साडेतीन महिने झाले होते. माझा तिथे पाच महिने रहायचा कार्यक्रम होता, तो आवरता घेऊन मी आधीच भारतात यायचे ठरवले आणि तिकिट प्रिपोन करून घेतले.
इथे आल्यावर हॉस्पिटलमध्ये कार्डिऑलॉजिस्ट आणि न्यूरॉलॉजिस्ट यांच्या अॅपॉइंटमेंट्स घेतल्या. दोघांनीही दोन दोन वेगवेगळ्या चाचण्या करून घेतल्या. हृदयरोगतज्ञांनी दिलासा देत सांगितले की ईसीजीमधला शंकास्पद दोष विशेष गंभीर नाही. त्यांनी माझी औषधे थोडी बदलून दिली. मज्जासंस्थेच्या डॉक्टरांनी कुठले औषध दिले नाही, फक्त पायामध्ये स्टॉकिंग्ज घाला आणि हातात काठी असू द्या अशा सूचना दिल्या. पण दरम्यान माझे रोजचे व्यायाम आणि फिरायला जाणे बंद झाले होते. डॉक्टरांना विचारून ते सुरू करून हळू हळू वाढवले. अशा प्रकारे दोन तीन महिने या घालमेलीत गेले.
या काळात माझा वाढदिवस आणि दिवाळी येऊन गेली ती आम्ही नेहमीसारखी उत्साहातच साजरी केली. आमच्या जमखंडी या गावातून बाहेर पडलेल्या लोकांचे दरवर्षी पुण्यात एक स्नेहसंमेलन भरते. मी त्याला उपस्थित राहिलो आणि तिथे आलेल्या जुन्या मित्रांना आणि आप्तांना भेटलो.
आमच्या कॉलनीतल्या ज्येष्ठ नागरिकांची कासारसाई धरणाशेजारी असलेल्या स्नेह रिसॉर्टमध्ये हुरडा पार्टी होती. दोन लहान बसेसमधून आम्ही साठ लोक तिथे जाऊन पोचलो. तिथली व्यवस्था वाखाणण्यासारखी होती. नाश्ता, जेवण आणि चहापानाची व्यवस्था उत्तम होती. सगळे खाद्यपदार्थ चविष्ट आणि भरपूर होते. मनोरंजनासाठी राजस्थानी नाच, कठपुतली नाच, जादूचे प्रयोग वगैरे होते. नौकानयन आणि रेनडान्सही होतेच. एक लहानसे चिडियाघर होते. निरनिराळ्या मिनिथिएटर्समध्ये एका ठिकाणी हॉरर शो, दुसरीकडे मिसाइल्सवर फिल्म तर तिसऱ्या सभागृहात ऑपरेशन सिंदूरवर डॉक्युमेंटरी दाखवली. तिथे मिळालेल्या हुरड्याबरोबर भाजलेला सोलाणा (हिरवा हरभरा) आणि वाफवलेली मक्याची कणसे (स्वीट कॉर्न) आणि गोड जाड शेव होती. लहान लहान गटांमध्ये इकडे तिकडे फिरण्यात आणि तिथले निरनिराळे खेळ पहाण्यात आमचा वेळ छान गेला. सर्वांनी आळीपाळीने मिनिट्रेनमध्ये बसून रिसॉर्टला फेरी मारून घेतली. आम्ही अंताक्षरी खेळण्यासाठी सगळी यंत्रसामुग्री नेली होती, पण त्यासाठी मोकळा वेळच मिळाला नाही. बसमधून जातायेतांनाच थोडी गाण्याची हौस भागवून घेतली.
इसवी सन २०२५च्या आठवणी -९
गेल्या वर्षभरात माझ्या व्यक्तिगत आयुष्यात होऊन गेलेल्या काही लक्षात राहिलेल्या बारीक सारिक घटना मी आधील भागात सांगितल्या. या वर्षभरात मी रोज काय करत होतो? सकाळी थोडा प्राणायाम, व्यायाम आणि फिरणे, संध्याकाळी फिरणे आणि कट्ट्यावर बसून गप्पा मारणे, रोज एक नवे सुभाषित मराठी भाषांतरासह फेसबुकवर देणे, अधून मधून काही स्फुट लेखन करणे, ते फेसबुकवर किंवा ब्लॉगवर चढवणे, महिन्यात एक लेख तयार करून तो विज्ञानधारा मासिकाला पाठवणे, फेसबुक, ईमेल आणि निरनिराळ्या वॉट्सॅप ग्रुपवर फेरफटका मारून येणे, दिवसातून तीन वेळा खाणे पिणे आणि औषधे घेणे वगैरे. मी हेच काम मागील चारपाच वर्षे करत आलो आहे. या वर्षी वेगळे काय केले?
मी जन्मभर एकट्याने चिकार प्रवास केला आहे, पण आता मला बस किंवा ट्रेनमध्ये चढताउतरतांना आधार लागतो यामुळे मी हल्ली एकट्याने कुठेही जाणे येणे सोडून दिले आहे. गरज पडते तेंव्हा माझा मुलगा मला कार किंवा स्कूटरवरून घेऊन जातो. हिंजवडीला आल्यापासून मी या वर्षी पहिल्यांदाच आमच्या ज्येष्ठ नागरिकसंघातल्या मित्रांबरोबर दोनदा दिवसभराच्या सहलीला जाऊन आलो. ओला उबरच्या कॅब आणि मोबाइल फोनवरील त्यांच्या अॅप्स येऊन काही वर्षे झाली असतील, पण मी त्यांचे तंत्र मागच्या वर्षी पहिल्यांदा शिकून घेतले. या वर्षी मी तीन चार वेळा स्वतः सराइतपणे कॅब बुक केली, एकट्याने प्रवास केला आणि त्याचे यूपीआयने पेमेंट केले. या अगदी सरळ साध्या वाटणाऱ्या गोष्टी असल्या तरी माझ्या वयाच्या अनेक लोकांना अजून जमत नाहीत. त्या मी या वर्षी केल्या. मला रोजच्या जीवनात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी न मागताच मिळत असतात. ज्या गोष्टी माझ्याकडे नसतील त्यांची मला गरजच नाही असे मी म्हणत असतो. यामुळे मी फारसा बाजारात जातच नाही. पण आता ऑल लाइन मार्केटिंगमुळे घरबसल्या खरेदी करता येते. याचे तंत्रही मला इतके दिवस माहीत नव्हते. ते मी यावर्षी कुणालाही न विचारता ट्रायल अॅड एरर करून शिकून घेतले आणि मला गरज नसतांनाही अॅमेझॉनवरून हौस म्हणून नवे कपडे मागवून घेतले. मला भेंड्या खेळायची आवड असल्यामुळे शेकडो हिंदी आणि मराठी गाण्यांच्या सुरुवातीच्या दोन दोन ओळी चालीसकट पाठ होत्या, पण मी पूर्ण गाणे गायचा प्रयत्न करत नव्हतो कारण मला मधली कडवी माहीतच नसायची. इथल्या ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यावर बसल्या बसल्या गप्पागोष्टींच्या शिवाय गाणी म्हणायचीही टूम निघाली. आमच्यातला कुणीच खरा गायक नसल्यामुळे बहुतेक सगळे एकाच पातळीवर आहेत आणि कुणी कुणाला नावे ठेवत नाही कुणी कुणाच्या चुका काढत नाही. आता गूगल करून संपूर्ण गाण्याचे शब्द मिळायची आणि यू ट्यूबवर त्या गाण्याची रेकॉर्ड ऐकायचीही सोय आहे. तिचा उपयोग करून मीही गाणी गायला लागलो होतोच. या वर्षी आम्ही आणखी एक पाऊल पुढे टाकून एक कराओके ग्रुप केला आणि दर ८-१० दिवसांनी एकत्र जमून व्यवस्थित माइक आणि स्पीकरवर किंचित जास्त चांगल्या प्रकारे गाणी म्हणायला सुरुवात केली. या वर्षातली आणखी एक उपलब्धी म्हणजे मी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून घेणे शिकून घेतले आणि माझ्या लेखनासाठी तिचा उपयोग करायला सुरुवात केली.
इसवी सन २०२५च्या आठवणी -१०
मी खूप दिवसांपासून कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल ऐकत होतो. "तू त्याचा उपयोग का करत नाहीस?" असे एकदा माझ्या मित्राने विचारलेही होते. त्यामुळे मलाही काही तरी चुकल्यासारखे वाटायला लागले होते. पण त्यासाठी एक नवे अॅप डाउनलोड करून त्याचा वापर करणे शिकायचे हेच मला थोडे अवघड वाटत असल्यामुळे मी इतके दिवस आळस करत होतो. पण या वर्षाअखेर मी ठरवले की आपण हे करून पहायचेच आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते फारच सोपे काम होते. मी त्या एआयला एक गोष्ट लिहायला सांगितली आणि त्याने ती काही सेकंदांमध्ये लिहून दिली. त्यानंतर त्यासाठी चित्र हवे का? असे विचारले आणि लगेच ते काढूनही दिले. त्यानंतर मी माझ्या लेखनासाठी एआयचा उपयोग करायला सुरुवात केली.
आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाने या वर्षी असे ठरवले की वयाची पंच्याहत्तर वर्षे उलटून अमृतकालात गेलेल्या लोकांना एक सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा. मी ही पायरी पूर्वीच ओलांडली असल्यामुळे मलाही ते मिळालेच. त्यानंतर काही लोकांना ते माझ्या हस्ते देण्यात आले.
गेल्या ४०-५० वर्षांपासून मी जिथे जिथे रहात होतो तिथल्या जवळच्या बँकेत माझा एक सेफ डिपॉझिट व्हॉल्ट लॉकर असायचा. त्यात जपून ठेवण्यासाठी माझ्याकडे कधीच मोठा खजिना नव्हता, पण आपले किडूकमिडूक घरी ठेवण्यापेक्षा तिथे सुरक्षित ठेवायची आम्हाला सवय झाली होती. मी धायरीला रहात असेपर्यंत ते चालत आले होते, पण हिंजवडीला आल्यावर इथल्या बँकेत खाते उघडले तेंव्हा मला लॉकर मिळाला नव्हता. सात आठ वर्षांनंतर एका बँकेत तो एकदाचा मिळाला. यापूर्वी फक्त एक फॉर्म भरून दिला की लॉकर घ्यायचे काम अर्धापाऊण तासात होत होते. पण आता सगळे काम डिजिटल झाले आहे आणि त्यासाठी स्टँपपेपरवर करारपत्र करावे लागते तसेच एक घसघशित रकमेचे फिक्स्ड डिपॉझिट करावे लागले. त्यांच्या डिजिटल प्रोसेसमध्ये चार वेळा कसकसले ओटीपी आले, ते घेण्यासाठी तुमच्याकडे स्मार्ट फोन असायला हला, त्याचप्रमाणे ई मेल आयडीसुद्धा असायला हवा. माझ्याकडे दोन्हीही होते, नसते तर हे काम झालेच नसते. या वेळी मला त्या कामासाठी सलग तीन दिवस लागले.
अशा प्रकारे मी या वर्षी थोडी प्रगती केली आणि किंचित जास्त आत्मनिर्भर झालो.
(समाप्त)




















No comments:
Post a Comment