Wednesday, July 28, 2021

जुन्या काळातले वाडे

 

माझे लहानपण जमखंडी नावाच्या गावातल्या 'घारेवाड्या'मध्ये गेले. माझे शाळेतले मित्र, गावातले नातलग आणि इतर बहुतेक सगळी ओळखीची मंडळी आपापल्या लहान मोठ्या वाड्यांमध्येच रहात होती. आमच्या पत्त्याच्या वहीमधल्या सगळ्या पत्त्यांमध्ये नातेवाईकाच्या नावानंतर 'अमूक तमूक वाडा' अशीच दुसरी ओळ असायची. त्या काळात मुंबई सोडून बहुतेक सगळीकडे 'वाडा संस्कृति' होती. मुंबईत मात्र 'चाळ संस्कृति' होती.

श्रीमंत लोकांच्या वाड्यांमध्ये गेल्यावर आधी समोर आंगण असायचे, त्यात फुलझाडे आणि वेली, तुळस वगैरे लहान झाडे लावलेली असत. त्याच्या एका बाजूला गुरांसाठी गोठा असे. पुढे गेल्यावर ओसरी किंवा पडवी, मग सोपा आणि आतमध्ये माजघर, देवघर, स्वयंपाकघर, कोठारे वगैरे अनेक खोल्या असायच्या. घरात राहणारे लोक आणि भेटायला येणारे आप्तेष्ट, मित्र आणि सन्माननीय पाहुणे एवढे लोकच पायऱ्या चढून सोप्यावर येत असत, इतर सगळ्या लोकांनी फक्त पडवीपर्यंतच यायचे आणि घरातल्या लोकांनी तिथे येऊन त्यांच्याशी बोलायचे असा पद्धत त्या काळी होती. काही वाड्यांमधले न्हाणीघर मागच्या बाजूला असे. त्याच्या पलीकडे मागची पडवी आणि तिच्या पलीकडे 'परस' नावाची मोठी बाग असायची, त्यात पालेभाज्या, फळभाज्या वगैरे पिकवत असत आणि फळांची झाडे लावलेली असत.  न्हाणीघर आणि मोऱ्यांमधले सांडपाणी वहात जाऊन त्यातून या झाडांचे सिंचन करण्याची सोय केलेली असे. काही जास्त मोठ्या 'चौसोपी' वाड्यांमध्ये दरवाजातून आत गेल्यानंतर मधोमध एक चौक ठेऊन त्याच्या चारी बाजूंना सोपे बांधलेले असत. सरदार, जहागिरदार वगेरेंच्या जंगी वाड्यांमध्ये दिवाणखाना, जामदारखाना, खलबतखाना, मुदपाकखाना, हमामखाना असली निरनिराळी दालने असत.

माझ्या आजोबांनी सावळगी नावाच्या खेड्यात बांधलेल्या वाड्यात समोरच्या बाजूला आंगण, गोठा आणि पडवी होती. आंगणात एक लहानशी विहीरही होती. आत गेल्यावर फक्त सोपा, माजघर आणि स्वैपाकघर होते. आमच्या जमखंडीच्या घरात नळाने पाणी येत असल्यामुळे विहीर नव्हती आणि गावाजवळ शेत नसल्यामुळे गुरांचा गोठाही नव्हता. आमचे ते प्रशस्त घर दोन हजार चौरस फुटांपेक्षाही मोठे होते, पण बीएचकेच्या हिशोबात ते शून्य बीएचके होते कारण त्या घरात बेडरूम या नावाची एकही खोली नव्हती.  आम्ही सगळे जण कधी सोप्यात तर कधी माडीवर किंवा गच्चीवर जमीनीवरच अंथरूण पसरून त्यावर झोपत होतो. चांगला लांबरुंद पाच खणी सोपा हा त्या घराचा मुख्य भाग होता. तिथल्या भिंतीवर ओळीने पंधरावीस फ्रेम केलेल्या तसबिरी खिळ्यांना टांगल्या होत्या. मधोमध एक लाकडी झोपाळा होता तो आढ्याला लोखंडी कड्यांच्या साखळीने टांगला होता. गरज पडली तर तो पाच मिनिटात काढून ठेवला जात असे आणि सोप्यात पंधरावीस पाट मांडून जेवणाची पंगत घातली जात असे. आम्ही मुले कधी झोपाळ्यावर नाहीतर जिन्याच्या पायरीवर बसत होतो, पण बहुतेक वेळा जमीनीवरच एकादे तरटाचे बसकूर पसरून त्यावर फतकल मारून बसत होतो.  जास्त लोकांना बसण्यासाठी जमीनीवर चटई, सतरंजी किंवा जाजम अंथरले जात असे. ते मळू नयेत म्हणून त्यांच्या खाली एक काथ्याचे मॅटिंग घातले जायचे.

सोप्यापेक्षाही मोठे आतले स्वैपाकघर होते. सोप्यामधून तिथे जाण्यासाठी दोन दरवाजे होते. डाव्या बाजूच्या दाराने आत गेल्यावर लगेच एक मोठे उघडे कपाट होते. त्यातल्या देव्हाऱ्यात सगळे देव मांडून ठेवलेले असत. बाजूच्या भिंतीवरल्या खुंटीला एक मुटका (सोवळे) टांगून ठेवलेला असे. आंघोळ झाल्यावर तो मुटका नेसून पाटावर बसायचे, देवांना ताम्हनात घ्यायचे, त्यांना स्नान घालून पुसून देव्हाऱ्यात ठेवायचे आणि पूजा करायची.  कधीकधी देवासमोर पाटावर बसून कोणी तरी एकादी पोथी वाचत असे आणि बाजूला दोन तीन पाट मांडून ती ऐकणारे बसतील एवढी मोकळी जागा तिथे होती. त्याच्या पलीकडे भिंतीत केलेल्या पोकळीत तीन चार चुली मांडल्या होत्या. त्यांच्यावर असलेल्या उंचच्या उंच धुराड्यातून सगळा धूर थेट छप्पराच्या बाहेर सोडला जाई. भिंतींमध्ये अनेक कप्प्यांची कपाटे आणि कोनाडे होते. त्यात स्वयंपाकाला लागणारे पदार्थ आणि भांडीकुंडी ठेवली जात असत. भिंतीला लागूनच दोन तीन मोठे तांब्याचे हंडे आणि घागरींमध्ये पिण्याचे पाणी भरून ठेवलेले असे. दिवसातून फक्त एकदाच आणि थोडा वेळच नळाला पाणी येत असल्यामुळे ते भरून आणि साठवून ठेवावे लागत असे आणि संपून जाऊ नये म्हणून जपूनच वापरावे लागत असे.  

दुसऱ्या दारातून आत जाताच एका बाजूला लहानशी मोरी होती आणि त्यात पिण्याच्या पाण्याचा नळ होता. रोज नळाला पाणी आले की लगेच तिथे कळशी आणि बिंदगीमध्ये पाणी भरून ते हंड्यामध्ये ओतायचे काम असायचे. दुसऱ्या बाजूला मोठमोठ्या रॅक्समध्ये पत्र्याच्या मोठमोठ्या चौकोनी डब्यांमध्ये धान्ये भरून ठेवलेली असत. त्या काळात सगळ्या धान्यांची वर्षभराची साठवण करून ठेवली जात असे. एका कोपऱ्यात एक भक्कम कोठी होती. महत्वाचे दस्तऐवज आणि चांदीची भांडी वगैरे तिच्यात सुरक्षितपणे ठेवले जात असत. जमीनीतच एक मोठे दगडाचे उखळ बसवून ठेवले होते, तसेच एक पाटा वरवंटा आणि जातेही होते. कुटणे, कांडणे, ठेचणे, वाटणे वगैरे कामे हा रोजच्या स्वयंपाकाचा भाग होता आणि त्यासाठी कसलेही यंत्र नव्हते. स्वयंपाकघरात या सगळ्या वस्तू मांडून ठेऊनसुद्धा एका वेळी सातआठ माणसे पाट मांडून जेवायला बसू शकतील एवढी मोकळी जागा तिथे होती.    

सोप्यामध्ये समोरच्या बाजूला लहान लहान चौकोनी दगडी चौथऱ्यांवर चौकोनी लाकडाचे खांब उभे केले होते. दुसऱ्या बाजूचे खांब भिंतीतच गाडलेले होते. त्या खांबांवर मोठ्या आडव्या तुळया ठेवलेल्या होत्या. त्याच्यावर बांबूचे जंते आणि त्यांच्यावर वेळूच्या चिवाट्या अगदी जवळजवळ एकमेकींना चिकटून रांगेने मांडून त्यावर विटा मांडून मातीचा पातळसा थर पसरवला होता. वर माडी असल्यामुळे तिथे पावसाचे पाणी यायची भीती नव्हती. इतर भागांच्या तुळया, जंते आणि चिवाट्यांवर मातीचा जाड थर देऊन धाब्याचे छत तयार केले होते. त्याच्यावर सिमेंटचा थर घालून वॉटरप्रूफ गच्ची बांधली होती. तिला पुरेसा उतार दिला असल्यामुळे सगळे पाणी एका कोपऱ्यात गोळा होऊन पन्हळीतून खाली पडत असे.    

जेवढा मोठा सोपा होता तेवढीच मोठी माडी त्यावर होती. माडीवर जायचा लाकडी जिना दोन भागात होता. सातआठ पायऱ्या चढून गेल्यावर एक प्रशस्त असा मधला अट्टा होता. तिथून उलट दिशेने आणखी सातआठ पायऱ्या चढून गेल्यावर ऐसपैस माडी होती. तिच्या दुसऱ्या टोकाला एका लोखंडी पट्ट्यांच्या पलंगावर घरातल्या सगळ्या गाद्या, सतरंज्या, चादरी, कांबळी आणि पांघरुणे रचून ठेवलेली असायची. त्याच्या बाजूला एक लाकडी टेबल आणि लोखंडाच्या खुर्च्या होत्या. त्यावर बसून आम्ही लेखन वाचन वगैरे अभ्यास करत होतो. तिथूनच गच्चीला जायचा दरवाजा होता. सोपा सोडून उरलेल्या भागावर सिमेंटची गच्ची होती, तिला तीन बाजूंनी उंच कुंभ्या होत्या. त्यातल्या एका कुंभीवर आणि गच्चीवर पंधरावीस कुंड्या ठेवल्या होत्या. त्यांमध्ये गुलाब, मोगरा यासारखी फुलझाडे आणि तुळस, ओवा, कोरफड यासारख्या औषधी वनस्पती लावल्या होत्या.  ते आमचे 'टेरेस गार्डन' होते. रोज दोन बादल्या पाणी दोन जिने चढून वर नेऊन त्या झाडांना घालायचे हे एक आम्हा मुलांचे काम असायचे.  माडीच्या डोक्यावर कॉरुगेटेड जी आय शीट पत्र्यांचे तिरपे छप्पर होते. त्यावर पडणाऱ्या पावसाचा खूप जोराचा आवाज होत असे. पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी एक अर्धगोलाकार पन्हळ होती आणि तिला एक मोठा पाइप जोडून ते पाणी खाली सोडले जात होते.

स्वयंपाकघराच्या काही भागावरसुद्धा एक माडी होती. पण तिथे पुरेसा उजेड आणि वारा येत नसल्यामुळे तिचा उपयोग अडगळीचे सामान ठेवण्यासाठीच होत होता. घराच्या मुख्य मोठ्या दरवाजातून आत येताच उजव्या बाजूला एक खोली होती. तिचा उपयोग मुख्यतः बाहेरच्या लोकांसाठी किंवा पाहुण्यांसाठीच केला जात असे. डाव्या बाजूला 'नळाची मोरी ' होती. तिथे एक मोठा नळ होता आणि वापरायचे बरेचसे पाणी तिथून भरले जात असे. मोरीच्या बाजूला न्हाणीघर होते. त्यात एक तांब्याचा बंब होता, तसेच एका मोठ्या चुलखंडावर एक अगडबंब आकाराचा पाणी तापवण्याचा हंडा ठेवला होता. तो धुराने इतका काळा झाला होता की मुळात कुठल्या धातूचा आहे ते दिसतच नव्हते. जवळच एका खोल अट्ट्यावर जळाऊ लाकडे ठेवलेली असत. आंघोळीसाठी आम्ही पितळेच्या बारड्यांमध्ये (बादलीला तिथे बारडी म्हणत असत.) ऊन पाणी काढून घेत होतो आणि पितळेच्या तांब्यानेच ते अंगावर घेत होतो.

न्हाणीघराला लागूनच एक दगडी हौद होता. तो पाण्याने भरून ठेवला जात असे. मोठ्या दरवाजातून आत आल्यावर तिथेच पायातल्या चपला काढून ठेवायच्या, तांब्याने हौदातले पाणी घेऊन पाय धुवायचे, ते पायपुसण्यावर पुसून नंतर एक पायरी चढून सोप्यात यायचे असे नियम होता. हौदाच्या बाजूला एक भलामोठा कपडे धुवायचा दगड होता. त्यावर आपटून आणि घासून आमचे कपडे धुतले जात असत. त्या सगळ्या भागातल्या जमीनीवर फरश्या बसवलेल्या होत्या. तिथल्या भिंतीच्या कडेने आणि जिन्याखाली लाकडे, कोळसे, गोवऱ्या, भुसा, रद्दी, केराची टोपली वगैरे गोष्टी ठेवल्या जात असत. घराच्या बाहेरच्या बाजूला पायखाना होता. तिथे जाण्यासाठी मोठ्या दरवाजातून बाहेर जावे लागत असे आणि जातांना टमरेलात पाणी घेऊन जावे लागत असे.  परत आल्यावर पाय धुण्यासाठी तांब्याभर पाणी आधीच काढून ठेवायचे, त्याने पाय स्वच्छ धुवूनच घरात प्रवेश करायचा असा नियम होता.  

आमच्या घरातल्या दगडमातीच्या सगळ्याच भिंती दोनतीन फूट जाडीच्या होत्या आणि त्यात ठिकठिकाणी कोनाडे आणि कपाटे केलेली होती. घरातल्या सगळ्या वस्तू  त्यातच ठेवलेल्या असायच्या. त्याशिवाय फक्त स्वयंपाकघरामध्ये दूधदुभते ठेवण्यासाठी एक जाळीचे फडताळे होते. मांजरांपासून रक्षण करण्यासाठी त्याची गरज होती आणि माडीवर पुस्तके ठेवण्यासाठी एक शेल्फ होते. घरात ठिकठिकाणी भिंतींध्ये मोठ्या लाकडी खुंट्या ठोकलेल्या होत्या आणि त्यांना छत्र्या, टोप्या किंवा पिशव्या टांगून ठेवलेल्या असत.

मुंबईपुण्यातल्या एक/ दोन/ तीन बीएचके सेल्फकंटेन्ड फ्लॅटमध्ये वाढलेल्या मुलांनी अशी घरेच पाहिली नसतील तर या लेखात दिलेल्या तिथल्या जागा आणि वस्तूंची नावे तरी त्यांना कशी माहीत असणार? माझ्या लहानपणी आमच्या रोजच्या बोलण्यात येणारे हे शब्द आता माझ्याही बोलण्यात कधी येतच नाहीत. त्यामुळे नव्या पिठीतल्या मुलांना हा लेख तरी किती समजणार आहे हा ही एक प्रश्न आहे. 

No comments: