माझे पणजोबा कुठे रहात होते आणि आपला उदरनिर्वाह कसा करत होते याची कणभरही माहिती मला कधीच मिळाली नाही. माझ्या लहानपणीच्या मित्रांमधल्या कुणाच्याच घरी त्यांचे पणजोबा रहात नव्हते. कदाचित 'पणजोबा' हा शब्दच सहसा माझ्या कानावर पडत नसावा. त्यामुळे तेंव्हा मला त्यांच्याबद्दल काही कुतूहलही वाटत नव्हते. माझे आईवडील, काकू, आत्या वगैरे घरातली मोठी माणसे बोलत असतांना त्यांनीही माझ्या पणजोबांबद्दल काही बोललेले ऐकल्यासारखे मला तरी आठवत नाही. पण ते अनेक वेळा माझ्या आजी आणि आजोबांविषयी मात्र भरभरून बोलत असत आणि आम्हालाही वेळोवेळी सांगत असत. त्यावरून माझे आजोबा हे एक सौम्य प्रवृत्तीचे, शांत, सोज्जवळ, हुशार, धोरणी, परोपकारी, कर्तव्यदक्ष आणि अत्यंत आदरणीय व्यक्ती होते अशी त्यांची एक दिव्य प्रतिमा माझ्या मनात तयार झाली. माझ्या आजोबांना सगळे तात्या म्हणत असत. माझ्या जन्माच्या आधीच तात्या निवर्तले होते आणि माझी आजी तर त्यांच्याही आधी देवाघरी गेली होती. त्यामुळे मला त्या दोघांचेही प्रत्यक्ष दर्शन झालेच नाही. आमच्या घरात एक जुना फॅमिली फोटो होता त्यातच मी त्यांना पाहिले आहे. यामुळे तात्यांबद्दल जी काही माहिती माझ्या आठवणींमध्ये साठून राहिली आहे ती मी घरातल्या वडीलधारी लोकांकडून ऐकलेली आहे.
माझे पणजोबा किंवा खापरपणजोबा यांनी पुढील काही पिढ्या बसून खातील अशी गडगंज मालमत्ता जमा करून ठेवली नव्हती. तात्यानी स्वतःच जन्मभर आपली विद्या आणि अक्कलहुषारी वापरून आणि अपार कष्ट करून जे काही कमावले तेच त्यांच्याकडे होते असे मी लहानपणी ऐकत होतो. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ते जमखंडी संस्थानामधल्या सावळगी नावाच्या खेड्यात स्थायिक झाले होते. ते तिथले शाळामास्तरही होते आणि पोस्टमास्तरही होते. शंभर सव्वाशे वर्षांपूर्वीच्या काळात भारतातल्या सगळ्या खेड्यांमधली बहुतेक जनता निरक्षरच होती. त्यामुळे तिथल्या शाळेतही अगदी थोडी मुले येत असणार. त्या काळात बैलगाडीखेरिज वाहतुकीची साधने नव्हती. त्यामुळे बहुतेक लोकांचे सगळे नातेवाईकही त्याच गावात किंवा आजूबाजूच्या खेड्यांमध्ये रहात असत आणि टपाल तरी या गावाहून त्या गावाकडे कसे आणि किती दिवसांनी जात होते कोण जाणे. त्यामुळे त्या काळी पोस्टखात्यालाही ग्रामीण भागात फारसे काम पडत नसावे. हे पाहता दोन्ही हुद्दे सांभाळतांना तात्यांवर कामाचा खूप मोठा भार पडत असेल असे वाटत नाही. सावळगी हे त्या भागातले जरा मोठे खेडे होते म्हणून संस्थानच्या दयाळू सरकारने त्या भागातल्या लोकांसाठी त्या गावात महिन्याला पाच रुपये पगारावर एक शाळामास्तर आणि पोस्टमास्तर नेमला होता. त्या जागेवर माझ्या आजोबांची नेमणूक झाली होती.
सावळगीपासून तीन मैल अंतरावरील तुंगळ नावाच्या खेड्याला जाणाऱ्या रस्त्यावर त्यांनी एक पडीक जमीन विकत घेऊन तिचा विकास केला होता. त्यावर वाढलेली रानटी झुडुपे तोडून आणि उपटून टाकली, थोडी थोडी जमीन खणून तिथले दगडधोंडे बाजूला काढून टाकले, खणलेली माती पसरून सपाट केली आणि खत वगैरे टाकून तिला लागवड करण्यायोग्य केली. तिथे दोन विहिरी खणून पाण्याची सोय केली होती म्हणून आम्ही तिला 'मळा' असे म्हणत होतो. त्या काळात कसली यंत्रे नव्हतीच. हे सगळे काम कुदळ आणि फावडे वापरून मजूरच करत असत. त्यमुळे तात्यांना त्यासाठी वर्षानुवर्षे चिकाटीने मेहनत करून ती सगळी कामे करून घेत रहावे लागले असणार. त्यांचा मळा जसजसा तयार होत गेला, तसतशी त्यावर ते शेती सुरू करत गेले. अगदी माझ्या लहानपणापर्यंत जोंधळ्याची भाकरी हे त्या भागातल्या लोकांचे मुख्य अन्न होते. त्यामुळे ज्वारी हेच तिथले मुख्य पीक असायचे. त्याशिवाय कडधान्ये, भुईमूग, रताळी वगैरेंची लागवड ते करीत असत. त्यांनी मळ्यात अनेक प्रकारची झाडे लावली होती, त्यात आंब्याची झाडेही होती. आमच्या मळ्यात काम करणाऱ्या कुळांना त्यांचा वाटा देऊन झाल्यावरही भरपूर धान्य घरी येत असे. त्यामधून तात्यांच्या कुटुंबाला वर्षभर पुरेसे अन्न मिळत असे तसेच त्यातून सुतार, लोहार, कुंभार आदि बलुतेदारांनाही धान्य दिले जात असे.
त्या काळातल्या ग्रामीण भागातल्या 'कॅशलेस सिस्टम'मध्ये शेतात पिकणाऱ्या आणि खेड्यात तयार होणाऱ्या नेहमी लागणाऱ्या पदार्थांची किंमत आणि सेवांचा मोबदला बहुतेक वेळा धान्याच्या रूपात दिला जात असे. कापडचोपड. भांडीकुंडी, सोनेचांदी यासारख्या कधीतरी घेण्याच्या वस्तूंसाठी रोकड पैसे मोजत असत. काही वेळा गरजू लोकांकडे त्यासाठी पुरेसे पैसे नसले तर ते थोडीशी रक्कम तात्यांच्याकडून उसनी घेत आणि सुगीच्या काळात व्याजासकट तिची परतफेड करत असत. या लहानशा सावकारीच्या व्यवहारातूनही तात्यांची थोडी कमाई होत असे. मवाळ आणि प्रेमळ स्वभावामुळे ते स्वतः तर कुणाला जास्त तगादा करू शकत नव्हतेच आणि पैशांच्या वसूलीसाठी त्यांनी कुणा पठाणाला किंवा रामोशाला पदरी ठेवले नव्हते. त्यांनी कुणावरही कधी जप्ती आणली नाही. त्यांचे बहुतेक कर्जदार उसने घेतलेले पैसे आपणहूनच आणून देत असत आणि एकाद्याने कधी बुडवले तरी ते त्याला दान केले असे म्हणून ते त्या पैशांवर पाणी सोडत असत. आपण कुणाच्या तरी अडीअडचणीत त्याला मदत केल्याचे समाधानच त्यांना महत्वाचे वाटायचे.
एकंदरीत पाहता तात्यांचे जीवन सुरळीतपणे चालले होते. त्यांची गणना गावातल्या 'खाऊन पिऊन सुखी' कुटुंबांमध्ये होत होती. त्यांनी आपल्या कर्तबगारीने त्या गावात एक प्रशस्त घर बांधले होते. मी लहानपणी ते घर पाहिले आहे. त्या घराच्या अंगणामध्ये एक लहानशी विहीर आणि बाजूला गुरांचा गोठा होता, म्हणजे त्यात गुरेढोरेही बांधलेली असणार. त्या खेडेगावातले एक सुशिक्षित, सुजाण आणि माहीतगार सद्गृहस्थ म्हणून त्यांना मानाचे स्थान होते. काही लोक आपल्या अडचणी घेऊन त्यांचा सल्ला घ्यायला त्यांच्याकडे येत असत आणि त्यांच्या अडचणी शांतपणे समजून घेऊन तात्या त्यांना योग्य ते मार्गदर्शन करीत असत.
माझ्या वडिलांचा जन्म १९०३ साली झाला, त्यानंतरच्या १०-१५ वर्षांमध्ये त्यांची लहान भावंडे जन्माला आली असावीत. म्हणजे तात्यांचा काळ हा सुमारे शंभर वर्षांपूर्वीच्या आजूबाजूचा काळ होता. तात्या स्वतःच शाळामास्तर असल्यामुळे त्यांनीच सगळ्या मुलांना लिहायला वाचायला शिकवले. त्या काळात मराठीसारख्या भारतीय भाषांमधल्या शाळांना 'व्हर्नाक्युलर स्कूल' म्हणत आणि त्यात पहिली ते सातवी इयत्तेपर्यंतचे शिक्षण दिले जात असे. सातवीच्या परीक्षेला 'व्हर्नाक्युलर फायनल' असे नाव होते. ती दिली की बहुतेक सगळ्या मुलांचे शिक्षण संपत असे, पण बरीचशी मुले त्याच्याही आधीच शाळा सोडून जात असत. त्याशिवाय त्या काळात काही ठिकाणी "इंग्रजी शाळा" असायच्या. मराठी शाळेच्या चार इयत्ता पास झाल्यानंतर इंग्रजी शाळेत प्रवेश मिळत असे आणि तिथले शिक्षण मॅट्रिकपर्यंत चालत असे. तेंव्हा मॅट्रिक परीक्षा बरीच कठीण समजली जात असे आणि 'मॅट्रिक पास' होणे ही एक मोठी बहुमानाची गोष्ट असायची. कित्येक लोक 'नॉनमॅट्रिक' रहात असत. सावळगीला इंग्रजी शाळा नव्हती. जमखंडीच्या संस्थानिकांनी जमखंडी इथे 'परशुरामभाऊ हायस्कूल' नावाची एक उत्तम संस्था उभी केली होती. तात्यांनी माझ्या वडिलांना म्हणजे आमच्या दादांना त्या शाळेत शिक्षणासाठी पाठवून दिले.
सावळगी गाव जमखंडीपासून बारा मैल दूर आहे आणि दोन्हींच्या मधून कृष्णा नदी वाहते. त्यामुळे सात मैल चालत किंवा बैलगाडीतून गेल्यावर नावेतून नदी ओलांडायची आणि पुन्हा पुढे पाच मैल चालत जायचे असा खडतर प्रवास करावा लागत असे. नदीला पूर आला तर ती पार करणे अशक्य होऊन इकडे लोक इकडे आणि तिकडचे लोक तिकडे राहून जायचे अशी अवस्था होत असे. त्यामुळे आमचे दादा हायस्कूल शिक्षणासाठी जमखंडीला कोणा नातेवाइकांकडे रहात असत आणि जमेल तेंव्हा सावळगीला घरी जाऊन येत असत. ते शाळेतले हुषार विद्यार्थी होते आणि चांगले मार्क घेऊन मॅट्रिक परीक्षा पास झाले.
१९२०च्या सुमारासच्या त्या काळात फार थोड्या शहरांमध्येच कॉलेजे उघडली गेली होती. तिथे जाऊन रहायचे हे खर्चाचे काम होते. तात्यांचे कुटुंब घरात खाऊन पिऊन सुखी असले तरी रोख पैसे उचलून देणे त्या काळात थोडे अवघड होते. पण दादांच्या बहिणींनी तात्यांकडे हट्टच धरला की "वाटले तर आम्हाला एक वेळा जेवायला द्या, पण आमच्या दादाला शिकायला पाठवून द्या." ही गोष्ट मी प्रत्यक्ष दादांच्या तोंडून ऐकली आहे आणि त्या वेळीही त्यांच्या डोळ्यात तरळलेले पाणी मी कधी विसरू शकणार नाही. तेसुद्धा आयुष्यभरात आलेल्या बऱ्यावाईट काळामध्ये सतत आपल्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते.
तात्यांनी काही ना काही करून खर्चाची व्यवस्था केली आणि दादा सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये शिकून बी.ए.ची डिग्री घेऊन आले. त्यानंतर मात्र इकडे तिकडे कुठेही न जाता त्यांनी सरळ जमखंडी संस्थानाच्या कचेरीत नोकरी धरली आणि ते संस्थान भारतात विलीन होईपर्यंत तिथे काम केले. पण त्यासाठी त्यांना सावळगी सोडून जमखंडीला मात्र यावे लागले म्हणून त्यांनी जमखंडीला आपले बिऱ्हाड थाटले. आता तात्या आणि आजी कधी सावळगीला तर कधी जमखंडीला असे रहायला लागले. त्यांच्या दोन मुलींना म्हणजे माझ्या दोन आत्यांनाही जमखंडीतच सासर मिळाले. त्यामुळे जमखंडीत येऊन रहायचे आकर्षण वाढत गेले.
मधल्या काळात तात्यांच्या कुटुंबावर मोठ्या विपत्ती आल्या. तात्यांचा धाकटा मुलगा म्हणजे माझे काका यांनी मला वाटते फारसे उच्च शिक्षण न घेता नोकरी धरली होती. त्यांचे लग्न होऊन त्यांना दोन मुली झाल्या होत्या. पण त्या अजून अगदी लहान असतांनाच अचानक काकांना देवाज्ञा झाली. त्याच सुमाराला आमच्या सर्वात लहान आत्यांचे यजमानही अकस्मात देवाघरी गेले. तरुण मुलगा आणि जावई यांच्या आकस्मकपणे जाण्याचे जबर धक्के तात्यांना सहन करावे लागले. पण त्यांनी सगळ्यांना धीर दिला. मुलीला आपल्या घरी आणले आणि तिची समजूत घालून काही काळानंतर तिला जमखंडीच्या मुलींच्या शाळेत शिक्षिकेची नोकरी लावून दिली. ऐंशी वर्षांपूर्वीच्या सामाजिक परिस्थितीत त्याला विरोधही झाला असेल, पण तात्यांनी त्याला खंबीरपणे तोंड दिले.
पण तात्या आणि आजी या दोघांच्याही प्रकृतीवर अशा तीव्र मानसिक धक्क्यांचे परिणाम झाले असणार. आजींना दम्याचा त्रास व्हायला लागला होता. त्या काळात जी काही औषधोपचारांची सोय होती तिने थोडा आराम पडायचा आणि नंतर हवामानात फरक पडला की तो परत उसळी मारायचा. ज्या वेळी दम्यामुळे त्यांचा श्वास कोंडला जायचा तेंव्हा "आता मी काही यातून वाचणार नाही." असेही त्या कधी कधी म्हणत असत आणि नंतर बऱ्याही होत असत. पण एकदा त्यांनी असे म्हंटले आणि "बरं बाई." असे काही तरी शब्द अनवधानाने तात्यांच्या तोंडून निघाले. पण त्या दिवशी मात्र त्या चालता बोलता अचानक खरोखरीच चालल्या गेल्या. ही गोष्ट तात्यांच्या मनाला फार लागून राहिली आणि वर्षादोन वर्षातच त्यांनीही शांतपणे या जगाचा निरोप घेतला.
त्या काळातल्या आणि त्यांच्या पिढीमधल्या इतर लोकांशी तुलना करता तात्या एक समाधानकारक जीवन जगले होते. त्यांनी आपल्या सगळ्या सांसारिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या होत्या. सर्व मुलामुलींची लग्ने करून देऊन सुना आणि जावई आणले होते. अनेक नातवंडाना मांडीवर खेळवले होते. त्यात माझा समावेश झाला नव्हता हे माझे दुर्दैव. पण तात्यांच्या आयुष्याचे सोने झाले असेच त्या वेळी बहुतेक लोकांनी म्हंटले असेल. "अनायासेन मरणं विनादैन्येन जीवनम्। देहान्ते तव सायुज्यम् देहि मे परमेश्वर ।।" अशी एक प्रार्थना पूर्वीचे लोक नेहमी देवापुढे करत असत. देवाने तात्यांची प्रार्थना ऐकली असणार असे वाटते.
2 comments:
So heartwarming to read about your ancestors. I like such posts/books describing the past and its people. Do you have the records of the traditional "Helavi"? Our Helavis tell us that my ancestors migrated from Karnataka to Maharashtra during Shivaji Maharaj's rule. We can only imagine about those days.
M P
धन्यवाद. हेळावी हे काय असते ते मला माहीत नाही. आमच्या गावात अशी माहिती सांगणारे कोणी नव्हते. मला मिळालेली माहिती माझ्या ज्येष्ठ आप्तांकडून मिळाली. एक घारेकुलवृत्तांत नावाचा ग्रंथ आहे. त्यात अगदी त्रोटक अशी माहिती आहे. ती पाहता असे समजते की दहा बारा पिढ्यांपूर्वी आमचे पूर्वज कोकणातून निघून सध्याच्या कर्नाटकात गेले होते.
Post a Comment