प्रत्येक माणसाला आत्मा किंवा रूह किंवा सोल ( Soul) असतोच असे हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मांमध्ये सांगितले आहे. यातल्या रूह किंवा सोलचे स्वरूप नेमके कसे असते हे मला माहीत नाही, पण आत्मा आणि परमात्मा याबद्दल भगवद्गीतेत खूप काही सांगितले आहे. काही सोपी उदाहरणे दिली आहेत. "हा आत्मा अमर असतो, त्याला शस्त्रांनी तोडता येत नाही, आग त्याला जाळू शकत नाही. .. माणूस कपडे बदलतो त्याप्रमाणे तो एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जात असतो." यावरील "नैनम् छिन्दन्ति शस्त्राणि नैनम् दहति पावकः । .. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृण्हाति नरोपराणि।" वगैरे श्तोक प्रसिद्ध आहेत. पण या जन्मात केलेल्या पापपुण्याचे गाठोडेही तो आपल्याबरोबर घेऊन जात असतो. याशिवाय त्याच्यासाठी स्वर्ग आणि नरकही आहेत. इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मांमध्ये पुनर्जन्म नाही, पण जन्नत आणि जहन्नुम, हेवन आणि हेल् (Heaven and Hell) या संकल्पना आहेत. माणसाने पुण्यकर्मे केलीत तर त्याला स्वर्ग मिळण्याची लालूच आणि त्याने पापे केलीत तर नरकात जायचा धाक दाखवून या तीन्ही धर्मांनी माणसाला सन्मार्गाला लावण्याचा प्रयत्न केला आहे.
पण असे असले तरी माणसांच्या हातून मोहापायी काही वाईट गोष्टी घडतात आणि देवाकडे परत जायच्या वेळी त्याला त्याची लाज वाटते. तो देवाकडून येतो आणि देवाकडे परत जातो, यावरून काही कवी लोकांना मुलीच्या माहेरी आणि सासरी जाण्याची कल्पना सुचली. देवाचे घर म्हणजे माहेर आणि हे जग म्हणजे सासर अशी ही कल्पना आहे. पाचशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या संत कबीरांनी असे लिहिले आहे:
मेरी चुनरीमें पर लग गयो दाग पिया
पांच तत्त्वकी बनी चुनरिया, सोरहसे बंध लागे पिया...
ये चुनरी मोरे मायकेसे आयी, ससुरेमे मनवा खोये दिया
मल मल धोये, दाग ना छुटे, ग्यानका साबून लाये पिया
कहत कबीर, दाग तब छुटी है, जब साहिब अपनाये लिया
कबीर म्हणतो... परमेश्वराच्या घरून येताना मी ही पंचमहाभूतांनी बनलेली ओढणी / उपरणे (शरीर) घेऊन आलो... त्यावर सोळा संस्कारांचे विणकाम केले. मूलत: हे उपरणे पवित्र होते... पण मोहाला बळी पडून मी अनेक पापे केली आणि ते उपरणे पार मलीन करून टाकले. जेव्हा हे लक्षात आले तेव्हा मी रगडून रगडून स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. (पुण्य केले) पण काहीच उपयोग झाला नाही. (म्हणून कबीर परमेश्वराकडे प्रार्थना करतो की...) हे पापाचे डाग धुवून काढण्यासाठी ज्ञानाचा साबण दे...
कबीराला माहित होते की याचा फारसा उपयोग होणार नाही. यावर एकमेव उपाय म्हणजे परमेश्वराला शरण जाणे. जेव्हा परमेश्वर आपल्याला स्वीकारेल तेव्हाच हे डाग जातील.
कबीराच्या या दोह्यांच्या आधारावर गीतकार साहिर लुधियानवी यांनी 'दिल ही तो है' या चित्रपटासाठी एक प्रसिद्ध गाणे लिहिले.
लागा चुनरीमें दाग, छुपाऊँ कैसे ? घर जाऊँ कैसे?
हो गई मैली मोरी चुनरिया, कोरे बदन सी कोरी चुनरिया
जाके बाबुल से नज़रें मिलाऊँ कैसे, घर जाऊँ कैसे
लागा चुनरी में दाग...
भूल गई सब बचन बिदा के, खो गई मैं ससुराल में आके
जाके बाबुल से नज़रे मिलाऊँ कैसे, घर जाऊँ कैसे
लागा चुनरी में दाग...
कोरी चुनरिया आत्मा मोरी, मैल है माया जाल
वो दुनिया मोरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल
जाके बाबुल से नज़रे मिलाऊँ कैसे, घर जाऊँ कैसे
लागा चुनरी में दाग...
https://www.youtube.com/watch?v=gMT5-nTq5Jo
हे गाणे ऐकल्यावर प्रथमदर्शनी गाण्याचा अर्थ साधा व सरळ वाटतो... पण प्रत्यक्षात हे एक आध्यात्मिक गाणे आहे. 'चुनरी' हे शरीराचे रूपक म्हणून वापरले आहे. परमेश्वराचे घर हे आपले मूळ स्थान. ते आपले माहेर आणि पृथ्वी म्हणजे सासर. (माझ्या उपरण्याला / ओढणीला डाग पडलेत... हे लपवू कसे?) हे शरीर पवित्र होते. पण अनेक पापं करून मी ते भ्रष्ट करून टाकले आहे. आता परमेश्वराच्या दारी मी कसा जाऊ...? परमेश्वराच्या घरून पृथ्वीवर येताना मी वचन दिले होते की, मी या शरीराचे पावित्र्य राखीन; पण पृथ्वीवर आल्यानंतर मी हे पार विसरून गेलो... आता परमेश्वराला तोंड कसं दाखवू ? आत्मा पवित्र आहे, पण त्यावर मायेचे आवरण पडले आहे... (मैल है मायाजाल) ते जग माझे माहेर आहे आणि हे पृथ्वीवरील जग हे सासर आहे. आता माहेरी जाऊन वडिलांना (परमेश्वराला) काय सांगू...?
खरं तर पृथ्वीवर आपण पर्यटकासारखे आहोत. जास्तीत जास्त शंभरएक वर्षे इथे काढायची, सुख-दु:ख उपभोगायची, जीवनाचा आनंद घ्यायचा, त्रास सहन करायचा आणि एक दिवस आपल्या मूळ स्थानी परत जायचे...! तेंव्हा आपल्याला लाज वाटायला नको ना?
संत कबीराच्या दुसऱ्या एका भजनात त्याने सासर माहेरचा उल्लेख केला नाही, पण चादरीचे रूपक घेतले आहे. त्यात ते म्हणतात :
चदरिया झीनी रे झीनी, ये राम नाम रस भीनी
चदरिया झीनी रे झीनी
अष्ट-कमल का चरखा बनाया, पांच तत्व की पूनी ।
नौ-दस मास बुनन को लागे, मूरख मैली किन्ही ॥
चदरिया झीनी रे झीनी...
जब मोरी चादर बन घर आई, रंगरेज को दीन्हि ।
ऐसा रंग रंगा रंगरे ने, के लालो लाल कर दीन्हि ॥
चदरिया झीनी रे झीनी...
चादर ओढ़ शंका मत करियो, ये दो दिन तुमको दीन्हि ।
मूरख लोग भेद नहीं जाने, दिन-दिन मैली कीन्हि ॥
चदरिया झीनी रे झीनी...
https://www.youtube.com/watch?v=93zw9h53zmk
कबीराच्या पहिल्या गीतासारख्या अर्थाचे प्रसिद्ध भजनगायक रघुवीर ओम् शरण यांचे एक भजन असे आहे:
मैली चादर ओढ़ के कैसे, द्वार तुम्हारे आऊँ।
हे पावन परमेश्वर मेरे, मन ही मन शरमाऊँ॥
तूमने मुझको जग में भेजा, निर्मल देकर काया।
आकर के संसार में मैंने, इसको दाग लगाया।
जनम् जनम् की मैली चादर, कैसे दाग छुड़ाऊं॥
निर्मल वाणी पाकर तुझसे, नाम न तेरा गाया।
नैन मूंदकर हे परमेश्वर, कभी ना तुझको. ध्याया।
मन वीणा की तारें टूटी, अब क्या गीत सुनाऊँ॥
इन पैरों से चल कर तेरे, मंदिर कभी न आया।
जहां जहां हो पूजा तेरी, कभी ना शीश झुकाया।
हे हरिहर मैं हार के आया, अब क्या हार चढाऊँ
मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊँ।।
https://lyricspandits.blogspot.com/2019/07/hari-om-sharan-bhajan-lyrics-hindi.html
साहिर आणि रघुवीर या दोघांच्याही आधी आपल्या कवीवर्य भा.रा.तांबे यांनी असेच एक गर्भित आध्यात्मिक अर्थ असलेले काव्य लिहिले आहे, पण यात सासर आणि माहेर यांची अदलाबदल केली आहे. या गाण्यात इथले जग या माहेरातून निघून परमेश्वराकडे सासरी जायला निघालेला माणूस हा एकाद्या नववधूसारखा बिचकत आहे असे दाखवले आहे. या गीतामध्ये पापपुण्याचा काही संदर्भ येत नाही, फक्त माहेरची ओढ आणि सासरला गेल्यानंतरची किंचित अनिश्चितता यामुळे ही नववधू बावरली आहे.
नववधू प्रिया, मी बावरते; लाजते, पुढे सरते, फिरते
कळे मला तू प्राण-सखा जरि, कळे तूच आधार सुखा जरि
तुजवाचुनि संसार फुका जरि, मन जवळ यावया गांगरते
मला येथला लागला लळा, सासरि निघता दाटतो गळा,
बागबगीचा, येथला मळा, सोडिता कसे मन चरचरते !
जीव मनीचा मनी तळमळे वाटे, बंधन करुनि मोकळे
पळत निघावे तुजजवळ पळे, परि काय करू ? उरि भरभरते
चित्र तुझे घेऊनि उरावरि, हारतुरे घालिते परोपरि,
छायेवरि संतोष खुळी करि, तू बोलविता परि थरथरते
अता तूच भय-लाज हरी रे ! धीर देउनी ने नवरी रे :
भरोत भरतिल नेत्र जरी रे ! कळ पळभर मात्र ! खरे घर ते !
https://www.youtube.com/watch?v=aSMzPWNAD5c
कवीवर्य भा. रा. तांबे म्हणजे महान प्रतिभेचा कवी. आपल्या कवितेतून त्यांनी मृत्युलाही सुंदर बनवलं. जन्माला आलेला प्रत्येकजण कधी ना कधी मरणारच.तरीही मृत्युला सामोरं जाताना प्रत्येकाच्या जीवाची घालमेल होते. ती व्यक्ती गांगरून जाते, बावरून जाते; अगदी तशीच जशी सासरी जाणारी एखादी नववधू बावरलेली असते. नववधू आणि मृत्यूची चाहूल लागलेली व्यक्ती या दोघांच्या मनातील भावनांचा कल्लोळ खोलवर पोहोचणारा आहे. भा. रा. तांबेंच्या या कल्पनाविष्कारालाच सलाम करायला हवा.
---
या लेखातले काही भाग मी वॉट्सॅपवरून आलेल्या निरनिराळ्या ढकलपत्रांमधून घेतले आहेत. त्यांच्या मूळ लेखकाचे मनःपूर्वक आभार.
1 comment:
jay ho
Post a Comment