Wednesday, December 08, 2021

शाकाहार आणि मांसाहार

 शाकाहार मांसाहार

माणसाने शाकाहार करावा की मांसाहार करावा ? आपल्याकडे या विषयावर अधूनमधून चर्चा, वादविवाद वगैरे होत असतात. युरोप, अमेरिका किंवा चीनजपानमधले सगळेच लोक जन्मजात पक्के मांसाहारी असतात. मांसाहार हा त्यांच्या रोजच्या जीवनातला भाग असतो. तिकडच्या रेस्तरांमध्ये 'व्हेजिटेरियन' म्हणून विचारले तर ते वेटरना समजतही नाही असा माझा आणि माझ्या मित्रांचा अनुभव आहे. आजकाल तिकडचे काही तुरळक लोक मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करून स्वखुशीने शाकाहार करायला लागले आहेत. काही लोक तर 'व्हेगन' झाले आहेत, ते दूध आणि दुग्धजन्य पदार्थसुद्धा वर्ज्य मानतात. पण ती त्यांची वैयक्तिक निवड असते.


भारतातल्या काही विशिष्ट जातीजमाती, समाजांमध्ये गेल्या कित्येक पिढ्यांपासून शाकाहार पाळला जात आला आहे. काही लोक मासे खातात, पण मटण चिकन खात नाहीत, काही लोकांना अंडे चालते. असे लोक सोडल्यास इतर बहुजनसमाजाला मांसाहार चालतो किंवा आवडतो, पण इथे रोजच्या जेवणात मांसाहार घेणे आर्थिक दृष्ट्या परवडण्यासाखे नाही. त्यामुळे इथली बहुसंख्य जनता मुख्यतः शाकाहारी आहे आणि रुचिपालट किंवा चैन म्हणून कधी तरी मांसाहार घेते. पण ते मांसाहारीच समजले जातात.  हे अंशतः मांसाहारी आणि शुद्ध शाकाहारी यांच्यातच झाले तर थोडेसे वादविवाद होतात. भारतातही काही राज्यांमध्ये गोहत्येवर बंदी आहे. वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या हत्येलाही सगळीकडे बंदी आहे. काही धर्मांचे लोक डुकराचे मांस खात नाहीत आणि इतरांनाही ते फारसे आवडत नाही. त्यामुळे बीफ आणि पोर्क हे अमेरिकेत सर्वात जास्त खाल्ले जाणारे खाद्यपदार्थ भारतात सहसा कुठे विकले जात नाहीत. पूर्वी मटण हा इथला मुख्य मांसाहार होता, पण आता त्या मानाने चिकन स्वस्त मिळत असल्यामुळे चिकनवर जास्त भर दिला जातो.    


शाकाहारी लोकांचे असे म्हणणे असते की माणसाच्या शरीराला आवश्यक असणारी सर्व पोषक द्रव्ये शाकाहारातून मिळतात हे पिढ्या न् पिढ्यांच्या अनुभवावरून सिद्ध झालेले आहे. मग त्यासाठी मुक्या प्राण्यांची हत्या करायची काय गरज आहे ? ते पाप आहे. "पापाय परपीडनम्।, अहिंसा परमो धर्मः।" यासारखी संस्कृत वचने ते सांगतात. तर मांसाहार करणाऱ्या लोकांच्या मते काही अपवाद वगळता निसर्गातले सगळेच पशू, पक्षी, कीटक वगैरे जीव इतर जीवांना खाऊन त्यावर जगतात. "जीवो जीवस्य जीवनम्। " अशी एक संस्कृत श्लोकातली ओळ तेही दाखवतात. शिवाय ते असेही म्हणतात की वनस्पतीसुद्धा सजीवच असतात, मग त्यांना मारण्यामध्ये सुद्धा हत्या होतच असते. त्यामुळे तसे पाहता  शाकाहारही अहिंसक नाहीच, त्यातही वनस्पतींना पीडा तर होतेच, काहींचा जीवही जातो.


निसर्गाने जी योजना केलेली आहे त्यात कुठलाही प्राणी फक्त दगडमाती, हवापाणी यावर जास्त काळ जगू शकत नाही. वनस्पती मात्र त्यांच्यापासून स्वतः अन्न तयार करतात आणि ते साठवून ठेवतात. असे वनस्पतींनी तयार केलेले अन्न शाकाहारी प्राणी खातात आणि  हिंस्र पशू त्या प्राण्यांना मारून खातात. भागवतपुराणासारख्या धार्मिक ग्रंथात असे सांगितले आहे.  

अहस्तानि सहस्तानाम् अपदानि चतुष्पदाम् |

फल्गूनि तत्र महतां जीवो जीवस्य जीवनम् ||भागवत-1/13/46||

हात नसलेले जीव हात असलेल्यांना (माणसांना), पाय नसलेले (न चालणारे किंवा वनस्पती) चार पायांच्या प्राण्यांना, लहान जीव मोठ्या जीवांना जगवतात. यात "खातात" असे स्पष्टपणे सांगितले नसले तरी तसा अर्थ त्यातून काढला जातो.


दगडमाती हे अचेतन पदार्थ असतात, वनस्पती सचेतन म्हणजे जीवंत असल्या तरी त्या अचर असतात, एका जागी खिळलेल्या असतात. असे त्यांचे वेगळे वर्गीकरण केले आहे. भागवतामध्ये माणसाला सहस्त म्हणजे हात असलेला असे म्हंटले आहे. निसर्गाने माणसाचे वेगळे वर्गीकरण केलेले नाही. त्याचा समावेश पाठीचा कणा असलेल्या सस्तन प्राण्यांमध्ये होतो. उत्क्रांती होत असतांना माणसाला ज्या प्रकारचे दात मिळाले त्यांनी तो पाने, फळे, मुळे, मांस वगैरे निरनिराळ्या प्रकारचे अन्न खाऊ शकतो आणि त्याची पचनसंस्था या सगळ्यांना पचवू शकते. यामुळे आदिमानव त्याला यातले जे मिळेल ते खात होता. राक्षस किंवा नरभक्षक लोक तर इतर माणसांनाही मारून खात असत. पण माणूस हा एक समूह करून राहणारा प्राणी आहे. संरक्षणासाठी ते सोयीचे किंबहुना आवश्यक होते. कदाचित त्यामुळे त्यांनी एकमेकांना खाणे बंद केले.


अन्नाच्या शोधात रानावनात भटकत राहणारा माणूस शेती करायला लागला, घर बांधून रहायला लागला, आगीचा उपयोग करून घ्यायला लागला. त्यानंतर त्याचे जीवन सर्वांगाने बदलत गेले. तो आता कच्चे मांस तर खात नाहीच, धान्य आणि पालेभाज्यासुद्धा शक्यतो भाजून किंवा शिजवून खातो. त्याअर्थी तो निसर्गापासून दूरच गेलेला आहे.  त्याने भाषा निर्माण केल्या आणि मनात आलेले विचार सांगायची तसेच लिहायची सोय करून घेतली. त्यातून काव्य आणि साहित्य निर्माण झाले. प्राचीन काळातल्या विद्वान आणि विचारवंत ऋषीमुनींनी सर्व लोकांच्या कल्याणासाठी निरनिराळे नीतीनियम सांगितले. गीता, भागवत, उपनिषदे यासारख्या वाङमयातून त्यांचा प्रचार केला गेला. संस्कृतमधल्या या ग्रंथांमधला मजकूर आधी प्रत्यक्ष देवानेच सांगितला आहे असेही समजले जाते आणि त्याला आव्हान देण्याचे धाडस सहसा कुणी करत नाही. 


प्राचीन काळात कदाचित सर्व लोक मांसाहार करत असतील. पण त्या काळातल्या भारतातल्या लोकजीवनात गायीला खूप महत्व होते. तिला साक्षात देवतेचा आणि मातेचा दर्जा दिला गेला होता. त्यामुळे गायीला मारून खाणे हे खूप मोठे पाप मानले गेले आणि हिंदू धर्मीयांमध्ये त्यावर बंदी आली. इतर पशूंनाही चैनीसाठी मारण्याला आळा बसावा म्हणून फक्त यज्ञासाठी किंवा देवाला बळी दिलेल्या पशूंचेच मांस खावे असेही सांगितले गेले. धार्मिक कृत्ये करणाऱ्या वर्गाला पशूहत्या हे पापकर्म वाटायला लागले असेल आणि म्हणून त्यांनी मांसाहार करणे सोडले असेल किंवा त्यांचे वेगळेपण टिकवण्यासाठी त्यांना तसे सांगितले गेले असेल. त्या वर्गाला पूर्वीच्या काळी जास्त मान दिला जात असे. बदलत्या सामाजिक परिस्थितीत तो मान नाहीसा झाल्यानंतर त्यासाठी शाकाहारी राहण्याची गरज उरली नाही.  


हिंदू धर्मामधील शास्त्रांमध्ये, मुख्यतः गीतेमध्ये कर्मसिध्दांत आणि पुनर्जन्म याबद्दल असे सांगितले आहे की माणसाने त्याच्या आयुष्यात केलेली पापे आणि कमावलेले पुण्य यांची फळे त्याला या जन्मात किंवा पुढील जन्मात भोगावीच लागतात. पुढचा जन्म कुठल्या योनीमध्ये मिळेल हेसुद्धा या जन्मातल्या पापपुण्यावर ठरते. प्राण्यांची हत्या करणे हे पाप आहे म्हंटले तर त्याचे वाईट परिणाम त्याला भोगावे लागतील अशी भीती दाखवली जाते. शाकाहारी जातीच्या कुटुंबातल्या एकाद्या माणसाने मांसाहार केला तर त्याला घरातून बाहेर काढणे, त्याच्या कुटुंबावरच त्या जातीच्या इतर लोकांनी बहिष्कार टाकणे अशा प्रकारची कठोर उपाययोजना केली जात असे. या कारणांमुळे या जातींमधले लोक पिढ्यान् पिढ्या शुद्ध शाकाहार करत राहिले. पण गेल्या साठ सत्तर वर्षात सामाजिक जीवनात अनेक बदल झाले आहेत. शिक्षण, नोकरी, धंदा वगैरेंसाठी अनेक लोक आपण होऊनच घर सोडून परगावी, परप्रांतात किंवा परदेशी गेले आणि तिथल्या वातावरणाचा प्रभाव त्यांच्यावर पडला. एकत्र कुटुंबपद्धत राहिली नाही. प्रत्येकजण स्वतंत्र रहायला लागला. त्यामुळे समाजाची किंवा कौटुंबिक बंधने शिथील झाली. पुनर्जन्म, परलोक वगैरेंवर लोकांचा विश्वास राहिला नाही. यामुळे पुढल्या पिढ्यांमधले अनेक लोक आता मांसाहार वाईट मानत नाहीत आणि हौसेने करतात. पण त्या लोकांनाही स्वतःच्या हाताने एकाद्या प्राण्याला मारणे शक्य नसते. ते लोक प्रत्यक्ष हत्या करत नाहीत. त्यामुळे त्यांचा मांसाहार थोडा सौम्य म्हणता येईल.


जैन धर्मामधील शास्त्रांमध्ये सजीवांचे वर्गीकरण असे केले आहे.

एकेंद्रिय जीव  - याना फक्त स्पर्शेंद्रिय असते . ( यात वनस्पती आल्या . ) 

दोन इंद्रिय असलेले जीव - यांना स्पर्श आणि चव अशी दोन इंद्रिये असतात .

तीन इंद्रिये असलेले जीव - यांना वासाचे आणखी एक इंद्रिय असते .

चार इंद्रिये असलेले जीव - यांना चक्षू ही असतात .

पांच इंद्रिये असलेले जीव - यांना कान ही असतात 

आणि 

माणूस - पंचेंद्रिये असलेला आणि खूप विकसित मन असलेला .

मग साधकाचा सर्वात उत्तम आहार कोणता ? एकेंद्रिय जीवांचा आहार घेतल्याशिवाय सुटका नाही आणि थोडीफार हिंसा अटळ आहे. एकेंद्रिय जीवच आपला सर्वोत्तम आहार आहे . एकेंद्रिय जीव हे त्रस जीव ( ज्याना त्रास / यातना होतो असे जीव ) नाहीत. झाडालाही भावना असल्या तरी त्यांचे रडणे, ओरडणे आपल्याला समजत नाही.  हे जीव खाण्यात कमीतकमी हिंसा आहे. त्यामुळे जे काही थोडेसे पाप लागेल त्याची भरपाई माणसाच्या इतर पुण्यकर्मातून होईल.

जैन धर्मामध्ये अहिंसेवर जास्त भर असल्यामुळे अन्नपदार्थ गोळा करतांनाही हिंसा होऊ नये म्हणून ते लोक जमीनीखाली लागणारे कांदा, लसूण, बटाटे वगैरे पदार्थही खात नाहीत. शिक्षण आणि सुबत्ता यांचा त्यांच्या विचारसरणीवर कमी प्रभाव पडला असावा. आजकाल खास 'जैन फूड' नावाचा खाद्यपदार्थांचा वेगळा विभाग निघाला आहे.


मी एकदा एका लग्नाला गेलो होतो. एका काउंटरवरून मी काही विशिष्ट खाद्यपदार्थ वाढून घेतले, वरण भात, भाजी, चपाती वगैरे मिळणाऱ्या जनरल काउंटरवर खूप गर्दी होती, पण एक काउंटर रिकामा दिसत होता म्हणून मी तिथे गेलो. तिथल्या सेवकाने मला सांगितले "हा जैन फूड काउंटर आहे." मी म्हंटले "मला चालेल". पण माझ्या प्लेटमधले पदार्थ पाहून तो म्हणाला, "तुम्ही हे खात असाल तर तुम्ही जैन नाही. हा काउंटर फक्त जैनांसाठी ठेवला आहे. चला निघा इथून."


माझा एक शाकाहारी मित्र एका कॉन्फरन्ससाठी जपानला गेला होता. तिथे पोचल्यावर संध्याकाळच्या भोजनासाठी एका रेस्तराँमध्ये गेला. तिथले मेनूकार्ड पूर्णपणे जपानी भाषेत होते. तिथल्या वेटरला 'व्हेजिटेरियन' हा शब्द समजला नाही. मग त्याने सांगितले, "नो चिकन, नो मटन, नो बीफ, नो पोर्क, नो फिश". वेटरने त्याला एक डिश आणून दिली. त्याने चाखून पाहिली. ती चंव थोडी विचित्र वाटली. कुतूहल म्हणून त्याने त्या पदार्थाचे जपानी भाषेतले नाव लिहून द्यायला वेटरला सांगितले. दुसरे दिवशी कॉन्फरन्समध्ये भेटलेल्या एका इंग्लिश बोलणाऱ्या जपानी माणसाला दाखवून हे काय आहे असे विचारले. तो म्हणाला, "ऑक्टोपस."     

अलीकडच्या काळात शाकाहाराचा पुरस्कार करण्यासाठी एक नवा मुद्दा मांडला जात आहे. कुठल्या कामासाठी किती ऊर्जा खर्च केली जाते याचा कुणीतरी अभ्यास करून असा निष्कर्ष काढला आहे की पाळीव पशुपक्ष्यांना अन्नपाणी खायला देऊन नंतर त्यांना मारून खाण्यामध्ये खूप जास्त ऊर्जा खर्च होते, त्याऐवजी माणसांना अन्नपाणी दिले तर तितक्या ऊर्जेत किती तरी जास्त मणसांचे पोट भरेल. त्यामुळे मांसाहार करण्यामुळे पर्यावरणाचा जास्त ऱ्हास होत आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी शाकाहार उपकारक आहे. आता किती लोक याचा विचार करून शाकाहाराकडे वळतील याची मला शंकाच वाटते.

अशा प्रकारे शाकाहार- मांसाहाराला अनेक बाजू आहेत. त्या थोडक्यात दाखायचा हा एक प्रयत्न आहे.


माझे मित्र श्री. श्यामसुंदर केळकर यांनी या विषयावर लिहिलेले लेख मी या ठिकाणी दिले आहेत.    https://anandghare.wordpress.com/2021/12/06/%e0%a4%85%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0/

   

    

Saturday, December 04, 2021

मी आहे तरी कोण ??? - भाग २

 'मी कोण आहे ?' या विषयावर मी फेसबुकवर लिहीत असलेल्या स्फुटलेखमालेतले पहिले २५ लेख एकत्र करून "मी आहे तरी कोण ??? - भाग १ " मध्ये प्रकाशित केले होते. ते इथे वाचावेत. 

https://anandghan.blogspot.com/2021/04/blog-post.html

पुढील २५ भाग एकत्र करून मी या भागात देत आहे.


मी कोण आहे?

भाग २६

ट्रेनिंग स्कूलमधले आमचे शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशनसारखेच होते, पण आम्हाला शिकवण्यासाठी एकदोन अपवाद सोडता कुठल्याही कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमधले तज्ज्ञ अनुभवी प्रोफेसर येत नव्हते. आम्हाला कुठला लिखित स्वरूपातला असा अभ्यासक्रम (करिक्युलम) दिलेला नव्हता आणि काही अपवाद वगळता त्यासाठी छापील पाठ्यपुस्तके उपलब्ध नव्हती. त्याकाळात इंटरनेटवर जाऊन शोधाशोध करायची सोयही नव्हती. आम्हाला कुठल्या कुठल्या विषयातले कुठलेकुठले टॉपिक्स शिकवायचे ते अणुशक्तीखात्यातील उच्चपदावरील सायंटिस्ट्स आणि इंजिनियर लोकांची एक समिती ठरवीत असे आणि कुठल्या डिव्हिजन किंवा सेक्शनमधल्या लोकांनी ते शिकवायचे याची जबाबदारी त्या त्या विभागाकडे देत असे.

तिथे आधीपासून काम करत असलेले अधिकारी ते काम वाटून घेत असत आणि एक एक जण पाळीपाळीने येऊन चार पाच लेक्चर देऊन जात असे. ते लोक आधी त्या विषयाचा चांगला अभ्यास करून नोट्स काढून आणत असत आणि त्यांचे सायक्लोस्टाइल केलेले दोनतीन कागद सगळ्या मुलांना वाटत असत.  या बहुतेक लोकांना ५-१० वर्षांचा नोकरीतला अनुभव असे. त्या काळात त्या लोकांनी स्वतः केलेला अभ्यास आणि प्रयोगशाळेत किंवा ऑफिसात केलेले काम यावरून ते आपापल्या नोट्स तयार करत असत. कदाचित पुढील काळात यामध्ये बदल झाला असेल आणि काही स्टँडर्डाइज्ड  नोट्स तयार केल्या गेल्या असतीलही, पण पन्नास वर्षांपूर्वी मी ट्रेनिंग घेत असतांना तसे काही नव्हते. लेक्चर द्यायला येणाऱ्या व्यक्ती तितक्या प्रकृती आणि पद्धती होत्या. 

तेंव्हा भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर (BARC) असे नाव दिले नव्हते. त्या केंद्राचे नाव अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट ट्राँबे (AEET) असे होते. हे व्याख्याते मुंबईत जिथे कुठे रहात असतील तिथून ते आधी ट्राँबेला जात आणि तिथून जीपने मरीन लाइन्सला येत असत. ट्राँबेला जाण्यासाठी चेंबूर कँपवरून पुढे सगळ्या रिफायनरीजला वळसे घालत टाटांच्या पॉवरस्टेशनवरून जाणारा एकच रस्ता होता आणि त्याची परिस्थिती नेहमी दयनीय असायची. चेंबूर ते सायनला येणारा रस्ताही खड्ड्यांनी भरलेला असे.  त्यामुळे आम्हाला शिकवायला तिथपर्यंत येणे हेच त्यांच्यासाठी एक दिव्य असे आणि ते त्यात दमून जात असत. पश्चिम किंवा दक्षिण मुंबईत राहणारे काही हुषार लोक मात्र घरातून निघून रेल्वे किंवा बसने थेट येऊन पोचत असत. त्यांना त्यासाठी भत्ता मिळत नसे, पण कष्ट वाचत असत.    

----


मी कोण आहे?

भाग २७

अणुशक्तीखात्यातले एक वरिष्ठ शास्त्रज्ञ आमच्या ट्रेनिंग स्कूलचे मुख्य (हेड) होते. आम्ही या गृहस्थांना प्रत्यक्ष पहायच्या आधीच त्यांच्या तापट आणि जराशा तिरसट स्वभावाबद्दल ऐकले होते. ते शिस्तीचे भोक्ते होते आणि आधीच्या कुठल्याशा बॅचमधल्या दोघातीघांना त्यांनी तडकाफडकी काढून टाकले होते म्हणे. त्यामुळे त्यांचा मोठा दरारा होता. आमचे हे हेडमास्तर रोज शाळेत येत नसत आणि ते एका दृष्टीने चांगलेच होते. आम्हाला शिकवायला येणारे कोणतेच 'सर' किंवा 'मॅडम' त्यांच्या हाताखाली काम करत नसत. किंबहुना त्यांचा एकमेकांशी कधी संबंधही येत नसे. हेड सरांनी रोज शाळेत यायचे काही कारणही नव्हते. ते कधीतरी धूमकेतूसारखे अचानक प्रकट होत आणि कुणाला फैलावर घेऊन तर कुणावर गुरगुरून दम भरत असत. त्यांनी कधी प्रेमाने जवळ येऊन आमची किंवा आमचे प्रशिक्षण कसे चालले आहे याची चौकशी केल्याचे मला तरी आठवत नाही. त्यांना भेटून आपल्या काही अडचणी सांगायचे किंवा सूचना करायचे धाडस तर कुणीच करत नव्हते. 

आमच्या ट्रेनिंग स्कूलच्या दैनंदिन कारभाराची जबाबदारी अणुशक्तीखात्यातल्याच एका प्रशासकीय अधिकाऱ्याकडे दिलेली होती. हे गृहस्थ सरकारी कामकाजात पक्के मुरलेले होते आणि त्यांच्या चेहेऱ्यावरच बिलंदरपणाची झाक दिसायची. कधी कुणाशी वर वर गोड आणि गुळमुळित बोलून झुलवत ठेवायचे आणि कधी कुठल्या तरी सरकारी नियमावर बोट ठेवून तोंडाला पाने पुसायची याचे तंत्र त्यांना उत्तम अवगत होते. हे सद्गृहस्थसुद्धा प्रत्यक्षात क्वचितच आमच्या बाजूला फिरकत असत. ते कधी आले तरी त्यांच्या ऑफिसात बसून कागदपत्रे पहात आणि सह्या वगैरे करून परत जात असत.

आम्हाला चार पाच वर्षांनी सीनियर असलेल्या एका सायंटिफिक ऑफीसरशी आमचा नेहमी संपर्क यायचा. ते मात्र अत्यंत मनमिळाऊ आणि उमद्या स्वभावाचे होते. ते आमच्यात मिळून मिसळून मोकळेपणे गप्पा मारायचे, हास्यविनोद करायचे इतकेच नव्हे तर हिंदी सिनेमातली गाणी पण म्हणून ऐकवायचे. अणुशक्तीकेंद्रातले शास्त्रीय संशोधनकार्य करायचे सोडून ते इथे काय करत आहेत असा प्रश्नही आम्हाला पडत असे. कदाचित त्यांना तात्पुरते इकडे पाठवले असेल असे वाटले होते, पण मला दहा वर्षांनंतर समजले की ते अजूनही ट्रेनिंगस्कूलमध्येच जात होते. 

प्रशासनातल्या एका अगदी बुटक्या अशा कनिष्ठ कर्मचाऱ्याशी आमची रोजच गाठ पडत असे. हा डेढफुट्या' मात्र कमालीचा तत्पर आणि कार्यक्षम तर होताच, पण नेहमी हसतमुख असायचा आणि सगळ्यांशी अदबीने बोलत असे.

---

मी कोण आहे?

भाग २८

मी सायन्स कॉलेजमध्ये जे काही धडे फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये शिकलो होतो त्यांचा प्रचंड विस्तार होऊन त्यातून निघालेले स्टॅटिक्स, डायनॅमिक्स, हैड्रॉलिक्स, थर्मोडायनॅमिक्स, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम, मटीरियल सायन्स, मेटॅलर्जी यासारखे अनेक विषय पुढे इंजिनियरिंग करतांना शिकलो होतो. ट्रेनिंग स्कूलमध्ये सुरुवातीला त्यांची थोडी झटपट उजळणी करत असतांनाच अणुशक्तीशी संबंधित असलेल्या विशेष विषयांचा अभ्यास सुरू झाला. त्यात अॅटॉमिक फिजिक्स, न्यूक्लिअर फिजिक्स, रिअॅक्टर फिजिक्स असे फिजिक्समधलेच एकाहून एक जटिल विषय होते, युरेनियम, थोरियम,  झर्कोनियमसारखे  अनोळखी धातू, हीलियम, आर्गॉन आणि झेनॉनसारखे उदासीन वायू  आणि अनेक अनोळखी रसायने, निरनिराळ्या रासायनिक क्रिया, त्यांच्यासाठी लागणारी उपकरणे, विविध कारखान्यांमधली यंत्रे आणि संयंत्रे वगैरेचा अभ्यास होता. थोडक्यात सांगायचे तर आम्हाला सर्वज्ञ बनवायचा प्रयत्न होता.

 मला इंजिनियरिंग कॉलेजमधले उच्च गणितच भारी किचकट वाटत होते, इथे तर त्याच्या वरताण काहीच्या काहीच शिकवले जात होते. त्यासाठी आय आय टी मधून एक ज्येष्ठ प्राध्यापक येत होते. त्यांनी संशोधनामधला एक काल्पनिक प्रॉब्लेम आणला आणि तो सोडवण्यासाठी चोवीस सायमल्टेनियस इक्वेशन्स मांडली. ती सगळी समीकरणे सोडवता आली की त्यामधून चोवीस अज्ञात गुणधर्मांची मूल्ये मिळतील म्हणे.  पण एवढी प्रचंड आकडेमोड सामान्य माणूस तर करू शकणारच नाही, त्या काळात त्यांनाच उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक संगणकाला ते शक्य होते म्हणे. शास्त्रज्ञांना सुपरकाँप्यूटर कशासाठी लागतात याचा मला त्यातून थोडा बोध झाला आणि आजच्या काळात मोठा शास्त्रज्ञ होणे कसे अवघड झाले आहे तेही समजले.   

आम्हाला या सगळ्यापेक्षा अगदी वेगळा असा एक विषय होता तो म्हणजे रशीयन भाषा. या भाषेची लिपीही वेगळी आहे. त्यातल्या काही अक्षरांचे आकारच वेगळे आहेत आणि काही अक्षरे रोमन लिपीमधली असली तरी त्यांचे उच्चार निराळे आहेत. उदाहरणार्थ त्या काळात त्यांचा देश  USSR या नावाने जगात प्रसिद्ध होता, पण ते नाव CCCP असे लिहिले जात असे आणि त्याचा उच्चार एसेसेर असा होत असे. त्यांची एबीसीडीसारखी आबेव्हेद्ये अक्षरे शिकण्यापासून पुढे शब्द, वाक्यरचना वगैरे शिकणे कठीण काम होते आणि इतर सगळा अभ्यास सांभाळून ते करणे अशक्य होते. कुणाला लगेच तिकडे पाठवतील अशीही काही शक्यता दिसत नसल्यामुळे कुणालाच ती भाषा शिकायची इच्छा नव्हती. पण हा विषय शिकवायला येणारे उपाध्याय गुरूजी मात्र लाखात एक होते. वर्गात कुणीही लक्ष देऊन ऐकत नसतांनाही ते इतक्या तन्मयतेने, प्रेमाने आणि शांतपणे शिकवत असत आणि हास्यविनोद करून वातावरण खेळकर ठेवत असत याची दाद द्यायला हवी. हे काम एकादा योगीच करू शकेल. 

-----

मी कोण आहे?

भाग २९

आमची शाळा बहुतेक दिवशी सकाळी ११ वाजता सुरू होत असे. एक एक तासाचे दोन तास झाल्यावर तासभर जेवणाची सुटी घेऊन दुपारी आणखी २-३ तास असत. एकदा आम्ही रोजच्याप्रमाणे सकाळची कामे आणि नाष्टा आटोपून धावतपळत हरचंदरायहाऊसपर्यंत जाऊन पोचलो, पण जिन्याने वर चढून क्लासरूमपर्यंत गेल्यावर समजले की आज काही कारणाने आमचे पहिल्या क्लासचे सर येऊ शकणार नाहीत. 

तिथे नुसते बसून काय करायचे असे म्हणत आम्ही दोघेतीघेजण खाली उतरून आजूबाजूचा भाग पहात फिरत फिरत लिबर्टी सिनेमा थेटरपर्यंत गेलो. तिथे मॅटिनीशोला राजकपूरचा एक खूप गाजलेला जुना सिनेमा लागला होता. माझ्या लहानपणी आमच्या गावात एक जुने थेटर होते, पण तिथे बऱ्याच वेळा एकादा कन्नड किंवा गल्लाभरू हिंदी सिनेमा लागायचा. कधीकधी एकादा चांगला चित्रपट लागला तरी "सिनेमामुळे बालकांच्या मनावर वाईट परिणाम होऊन ती बिघडतात" असे घरातल्या सगळ्या मोठ्या लोकांचे ठाम मत असल्यामुळे मुलांना ते पहायची परवानगी नव्हती. त्यामुळे सिनेमाचा सुवर्णकाळ समजल्या जाणाऱ्या पन्नाशीतले सिनेमे मला त्या काळात पहायला मिळाले नव्हते. मीही कॉलेजमध्ये गेल्यावर सिनेमे पहायला सुरुवात केली होती आणि तत्कालीन सिनेमांच्या बाबतीत माझे सामान्यज्ञान वाढवले होते. काही गाजलेले जुने सिनेमेही पाहिले होते आणि काही राहून गेले होते.

त्यातलाच एक प्रसिद्ध सिनेमा पहायची ही संधी आयती चालून आली होती. आमचा पहिला क्लास तर रद्द झाला होताच, दुसरा तितकासा महत्वाचा नव्हता आणि नंतर लंचटाइम होता असा विचार करून आम्ही तिकीट काढले आणि आत जाऊन बसलो. चित्रपट संपल्यावर पटकन चार घास खाऊन वेळेवर वर्गात हजर झालो. आमची अनुपस्थिति तिथे कुणालाच खटकली नसावी आणि आम्हाला कुणीच काही बोलले नाही. नंतरच्या काळातही आमच्या व्याख्यात्यांना ट्राँबेहून मरीनलाइन्सपर्यंत येऊन पोचण्यात काही वेळा अडचणी येत गेल्यामुळे पहिला क्लास रद्द झाला. त्यामुळे कधी कधी या प्रकाराची पुनरावृत्ती झाली आणि माझा जुन्या काळातल्या न पाहिलेल्या सिनेमांचा थोडा बॅकलॉग भरून निघाला. इतर मित्रांप्रमाणे मीसुद्धा दिलिपकुमार, राजकपूर आणि देवआनंद यांच्यावर बिनधास्त बोलायला शिकलो.

----


मी कोण आहे?

भाग  ३०

पुण्याच्या इंजिनियरिंग कॉलेजच्या होस्टेलमध्ये पाच मेसेस होत्या आणि त्यांमध्ये मराठी, कानडी, गुजराथी, मारवाडी, पंजाबी, मुसलमानी वगैरे विविध पद्धतींचे भोजन मिळत असे.  ते चविष्ट खाणे खाऊन माझी जीभ चटावलेली होती. अणुशक्तीखात्याच्या ट्रेनिंग स्कूलच्या होस्टेलमध्ये आमच्या काळात एकच कॉमन मेस होती. आम्ही निवडून दिलेली चार मुलेच तिचे संचालन करीत होती. त्यातले दोघे उत्तर भारतीय आणि दोघे दक्षिण भारतीय होते. ते आळीपाळीने मेन्यू ठरवत असत. सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये सर्वानुमते ब्रेडबटरऑमलेट असायचेच, त्याला पर्याय म्हणून पुरीभाजी किंवा इडली दोसा असा एकादा पदार्थ असायचा त्यात काही प्रॉब्लेम नव्हता. रात्रीच्या जेवणात मात्र ताटात काय वाढले जाणार आहे याचा नेहमी सस्पेन्स असायचा. मेन्यूमध्ये काहीही नाव लिहिले असले तरी ते पदार्थ कसे करायचे हे तर किचनमधले कर्मचारी त्यांच्या समजुती आणि आवाक्याप्रमाणे काहीतरी ठरवून तशी पाकसिद्धी करत असत. त्यांचे याबाबतीतले नैपुण्य यथातथाच होते. त्यामुळे वाटीतला पदार्थ हा 'दाल' असला किंवा 'सांभार' असला तरी तो तितकाच बेचव असायचा, भाजी तेलकट असली तर ती पंजाबी समजायची आणि पांचट असली की मद्रासी. पण दोघांनाही ती पसंत पडत नसे. पण आमच्या पोटात सडकून भूक लागलेली असायची आणि "अन्नाला नावे ठेवू नयेत" अशी लहानपणपासूनची शिकवण असल्यामुळे आम्ही पानात वाढलेले सगळे 'अन्न हे पूर्णब्रह्म' असे म्हणत त्याच्या 'उदरभरणाचे' 'पुण्यकर्म' करत असू. स्वच्छता आणि हाायजिनची पुरेशी काळजी तेवढी घेतली जात असावी. त्यामुळे ते अन्न खाऊन सहसा कुणी आजारी पडत नव्हते.

त्या काळात ट्रेनिंग स्कूलमध्ये कँटीनच नव्हते. ज्याने त्याने आपापल्या आवडीचे  दुपारचे जेवण खायला पूर्ण मुभा होती. फक्त ते वेळेत मिळावे आणि खिशाला परवडावे असे दोन बारकेसे निर्बंध होते. त्या हरचंदरायहाऊसमध्येच नव्हे तर त्या रस्त्यावरसुद्धा आजूबाजूला कुठलेही क्षुधाशांतिगृह नव्हते. धोबीतलावपर्यंत चालत आल्यावर मेट्रो आणि लिबर्टी सिनेमाथिएटरांच्या आसपास काही लहान लहान खाद्यगृहे होती. त्यातल्या एकात फुटबॉलसारखा गरगरीत भटूरा आणि लज्जतदार गरमगरम छोले मिळत, तसे मी जगात इतर कुठेही पाहिले नाहीत, कुठे मस्तपैकी भेळपुरी मिळायची तर कुठे छानसा खिमापाव. आणखी पुढे क्रॉफर्ड मार्केट दिशेने चालत गेल्यावर एक दोन चांगली उडुपी हॉटेले होती. वाटेतच लोकमान्य टिळकांमुळे प्रसिद्ध झालेले सरदारगृह होते. तिथे एक जिना चढून वर गेल्यावर चटणीकोशिंबीर आमटी भाजी वगैरेंसह साग्रसंगीत मराठी भोजन मिळत असे, त्याबरोबर श्रीखंड किंवा बासुंदीसारखे पक्वानही असे, आणि तेही मध्यमवर्गाला परवडेल अशा माफक किंमतीत मिळत असे.

या सगळ्यांचा अनुभव घेत असतांना आम्ही मरीन लाइन्सपुरते मर्यादित न राहता आजूबाजूच्या रेल्वेस्टेशन्सच्या भागांचीही पहाणी करत होतोच. चर्चगेट रेल्वेस्टेशनच्या बाहेरच एक अप्रतिम उडुपी हॉटेल होते. तिथे येणाऱ्या ग्राहकांची प्रचंड गर्दी असायची, तरीही तिथला अत्यंत कार्यक्षम नोकरवर्ग त्या सर्वांना जेवण पुरवीत असे. ग्राहक खुर्चीवर बसला रे बसला की लगेच त्याच्या समोर भरलेली राइसप्लेट येई आणि तो उठून बिल भरेपर्यंत ते टेबल स्वच्छ पुसून पुढल्या ग्राहकासाठी सज्ज होत असे. जेवणही बऱ्यापैकी रुचकर असायचे. त्याशिवाय पंजाबी, गुजराथी आणि यूपीच्या भय्यांची विशिष्ट खाद्यालये होतीच, त्यातली काही थोडी महागडी होती, पण अधून मधून त्यांना एकादी भेट देणे शक्य होते. काही दिवस तर आम्ही तीन चार मराठी मुले चर्नी रोडला जाऊन गिरगावमधल्या कोना रेस्टॉरंटमध्ये जेवण घेत होतो. त्याच बिल्डिंगशी माझा पुढील आयुष्यात काही संबंध जुळून येणार होता हे मात्र मला तेंव्हा माहीत नव्हते.

----         


मी कोण आहे ?  

 भाग ३१

"ही नॅशनल डिफेन्स अकॅडमी महाराष्ट्रात आहे, पण या एनडीएमध्ये महाराष्ट्र कुठे आहे?" असे उद्गार माननीय यशवंतराव चव्हाण यांनी खडकवासल्याच्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीला भेट दिली होती तेंव्हा काढले होते असे म्हणतात. १९६६-६७ च्या त्या काळात मार्मिकच्या तोफा जोरात धडधडत होत्या. वांद्र्यातच रहात असलेले पूजनीय बाळासाहेब जर आमच्या हॉस्टेलमध्ये आले असते आणि त्यांनी तिथल्या एकूण मुलांच्या संख्येच्या मानाने मराठी मुलांची संख्या पाहिली असती तर तिथले चित्र पाहून त्यांनी कोणते उद्गार काढले असते कोण जाणे. पहायला गेल्यास त्या काळातल्या भारतातच्या एकूण लोकसंख्येत मराठी भाषिकांचा जो काही टक्का असेल तितपत मराठी मुले तिथे असावीत, पण त्यातली अर्धीनिम्मी मुले कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश अशा इतर राज्यांमधून आली होती आणि मूळच्या इथल्या भूमीपुत्रांचे प्रमाण तसे पाहता कमी होते.  आमच्या बॅचमध्ये चार मुलीही होत्या, पण त्या होस्टेलमध्ये न राहता आपापल्या किंवा नातेवाइकांच्या घरी रहात होत्या. त्यांच्यातल्या दोन म्हणजे पन्नास टक्के मुली मात्र महाराष्ट्रातल्या मराठीभाषी होत्या. सँपलसाइझ कमी असला की स्टॅटिस्टक्समधून असे विसंगत आकडे येऊ शकतात.

 मी स्वतः पुढे अनेक वर्षे निवडसमीतीवर काम केले असल्यामुळे यात कसलाही गैरव्यवहार नसतो हे मला चांगले माहीत आहे. आमच्याच बॅचच्या काळात माझे बरेचसे हुषार मित्र तिथे यायला तयारच नव्हते आणि त्यांनी अर्जच केले नव्हते कारण त्या सगळ्यांना एक तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करायचे होते नाहीतर अमेरिकेला तरी जायचे होते. तरीही आमच्या पुण्याच्या होस्टेलमधल्या ज्या थोड्या मुलांनी इंटरव्ह्यू दिला होता, त्यातल्या तीघांची निवड झाली होती. त्यातल्याही एकाला दुसरा चांगला जॉब मिळाल्याने तो महिनाभरातच सोडून गेला होता. सांगलीच्या कॉलेजमधून कदाचित 'चुकून' आलेल्या एका मुलाने अभ्यासाकडे पूर्ण दुर्लक्ष केले आणि त्याची प्रगति असमाधानकारक दिसल्यामुळे त्याला ट्रेनिंग स्कूल सोडावे लागले होते.

रोजचे हिंदीतून बोलणे उत्तर भारतामधून आलेल्या मराठी मुलांच्याही चांगले अंगवळणी पडलेले होते आणि ज्यांनी मुंबई किंवा नागपूरमध्ये शिक्षण घेतले होते त्यांमुलांनाही हिंदीतून बोलायची बरीच सवय झाली होती. असे करता करता ज्याला ते जमत किंवा आवडत नव्हते असा एकाददुसराच उरला असेल. आमच्यातला कुणीच विशेष कडवा मराठीभक्त नव्हता. किंबहुना कुणालाच मराठी भाषा, साहित्य, वाङमय वगैरेंचीही मनापासून खूप आवड नव्हती. मराठी भाषेतले कवी, काव्य, लेखक, कथाकादंबऱ्या असले गहन विषय आमच्या गप्पागोष्टींमध्ये सहसा कधी येत नसत. 

मराठी गाण्यांचे मात्र बहुतेक सर्वांनाच वेड होते. स्व.बाबूजी, हृदयनाथ, श्रीनिवास खळे आणि तीन वसंत यांनी दिलेल्या एकाहून एक सुरेल गाण्यांनी सजवलेला तो मराठी सुगमसंगीताचा सुवर्णकाळ होता. जोडीला अजरामर असे नाट्यसंगीतही होतेच. मराठी श्रोत्यांसाठी दर सोमवारी रात्रीची 'आपली आवड' बुधवारच्या 'बिनाका' गीतमालेइतकीय चटक लावणारी होती. त्यामुळे मराठी गाणी ऐकणे, गाणे, गुणगुणणे आणि त्यांवर चर्चा  करणे वगैरे मात्र अनेक वेळा होत असे.

----


मी कोण आहे ?  

 भाग ३२

A man is known by the company he keeps. अशी एक इंग्रजी म्हण आहे. समजा एकादा माणूस मला ओळखत नसेल, खरं तर मला सगळ्यांनी ओळखावे असा मी कोणी नाहीच. जर त्या माणसाला कळले की मी बऱ्याच वेळा अमक्यातमक्याबरोबर असतो, तर त्यानुसार त्याच्या मनात माझी एक अस्पष्ट प्रतिमा तयार होईल. कारण सोबत रहाणारे लोक एकमेकांकडून काही शिकत असतात, एकमेकांचे अनुकरण करत असत आणि काही गुण अवगुण घेत असतात. "ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला आणि वाण नाही पण गुण लागला" असे म्हणतात ना ! "समानशीले व्यसनेषु सख्यम्।" असे एक सुवचन आहे. सारखे कॅरेक्टर असणाऱ्यांचे चांगले जमते आणि समान संकट आले तर ते मिळून त्याचा सामना करतात म्हणून त्यांचे सख्य असते. मराठीतले 'व्यसन' लागले असले तर त्यातून मिळत असलेली धुंदी त्यांना एकत्र आणते.

मी कॉलेजमध्ये असतांना आणि ट्रेनिंग स्कूलमध्ये गेल्यावर कुणाच्या संगतीत रहात असे? त्यांच्यामुळे माझी कोणती ओळख तयार होत असे? मेकॅनिकल इंजिनियरिंगचे विद्यार्थी एका क्लासरूममध्ये बसत असत आणि एकच लेक्चर ऐकत असत. काही मुलांना ते चांगले समजायचे, काहीजणांना ते तितकेसे समजत नसे, त्यामुळे त्यांच्या मनात शंका असायच्या त्या ते कुणा मित्राला विचारायचे. प्रॅक्टिकल्स करणे, त्यांची जर्नल्स लिहिणे वगैरे कामे सामूहिकपणे चालत असत. अशा कारणामुळे माझी मेकॅनिकलच्या काही विद्यार्थ्यांशी जास्त जवळीक निर्माण झाली होती.

होस्टेलमधला रूमपार्टनर तर दिवसरात्र नजरेसमोर असायचा, निरनिराळ्या कारणाने आणि विषयांवर त्याच्याशी बोलणे होतच असायचे. कधी वादविवाद, भांडण झाले तरी आपल्याला वर्षभर त्याच्यासोबत रहायचे आहे याची दोघांनाही जाणीव असल्यामुळे लवकरच समेटही व्हायचा. शेजारच्या खोल्यांमध्ये रहाणारी मुलेही एकमेकांकडे जाऊन बसत असत, त्यांच्याशीही दोस्ती होत असे.   

भाषा आणि संस्कृती यांचा जवळचा संबंध आहे. एक भाषा बोलणाऱ्या लोकांच्या रीतीभातींमध्ये बरेच साम्य असते आणि ते आपले विचार किंवा भावना वगैरे आपल्या मातृभाषेमध्ये चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतात. कदाचित यामुळेही आमच्या होस्टेलमध्ये पंजाबी, तामिळ, बांगला वगैरे भाषिकांचे गट तयार झाले होते, तसेच मराठी मुलांचाही एक गट होताच. आम्ही एकमेकांकडे जमून गप्पा मारत असू किंवा मिळून बाजारात किंवा भटकायला जात असू.

माझा बंगाली रूममेट मेकॅनिकलला होता, तर शेजारी रहाणारा इलेक्ट्रिकल ट्रेनी मराठी होता आणि दुसरीकडे रहात असलेले पण  मेकॅनिकल शिकणारे मराठी मित्रही होते. असे दुहेरी कनेक्शन्सही होते. त्याशिवाय मित्रांचे शेजारी, शेजाऱ्यांचे मित्र वगैरेंमध्ये समानशील लोक सापडतच होते. मी आळीपाळीने या निरनिराळ्या मित्रांच्या संगतीत रहात होतो. त्यामधून माझी कोणती प्रतिमा निर्माण होत असेल ?   काही सांगता येत नाही. कुणी माझ्या  एकाद्या सिन्सियर मित्राला ओळखत असेल तर मलाही तसा समजत असेल आणि कुणी एकाद्या भांडखोर मित्राला ओळखत असेल तर तो माझ्यापासूनही चार हात दूर रहात असेल.

---    


मी कोण आहे ?  

 भाग ३३

बँडस्टँडवरील आमच्या झोपडीमधून बाहेर आले की पश्चिमेला अथांग समुद्राचे दर्शन होत असेच. त्या भागात कसले कारखानेही नव्हते आणि रस्त्यावरून धूर ओकणारी फारशी वाहतूकही नव्हती. त्यामुळे हवा छान शुद्ध असायची. त्या छान वातावरणात समुद्रकिनाऱ्यावरून फिरायला खूप मजा वाटायची आणि भेटतील त्या दोन तीन मित्रांबरोबर मीही नेहमी त्याचा आनंद घेत होतो.

त्या समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्यांची संख्या फार जास्त नसली तरी त्यात बाबागाडीत बसून इकडे तिकडे टुकुटुकु बघणाऱ्या गोंडस बालकांपासून ते व्हीलचेअरमध्ये आरामात बसून हातातल्या पॅकेटमधून काही तरी तोंडात टाकत मजेत फिरणाऱ्या सुखवस्तू वृद्धांपर्यंत सगळ्या वयोगटातले लोक असत. तो भागच गडगंज श्रीमंत लोकांच्या वस्तीचा असल्यामुळे बहुतेक लोकांच्या अंगावर सुरेख आणि फॅशनेबल कपडे दिसत. कधी समुद्रातल्या फेसाळत येऊन खडकांवर आदळणाऱ्या लाटा पहात आणि कधी त्या पहायला आलेल्या नमूनेदार माणसांकडे पहात वेळ छान जात असे.

तिथले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक वेळा तिथे सिनेमाचे शूटिंग चालत असे. तेंव्हा मात्र किनाऱ्यावरची पाचपन्नास माणसे गोळा होऊन तिथे थोडी गर्दी करत असत. त्यावरूनच ते दुरूनही लगेच ओळखू येत असे. शिवाय रिफ्लेक्टर्स, लाउडस्पीकर्स वगैरे दिसायचेच. तिथे कुठला फिल्मस्टार किंवा कुठली सिनेतारका आली असेल ते पहायच्या उत्सुकतेने आम्हीही त्यात सामील होत असू. सुरुवातीला मी एक शुटिंग पहात थोडा वेळ उभा राहिलो होतो. एका लहान गल्लीमधून एक मुलगी धावत धावत येते. ज्याक्षणी ती मुख्य रस्त्यावर येऊन पोचते त्याच क्षणी तिथे एक मोटारगाडी थांबते, तिचा दरवाजा उघडतो, ती मुलगी आत बसते आणि ती गाडी लगेच पुढे निघून जाते असे तो सीन असावा.

सिनेमामध्ये हे सगळे दहाबारा सेकंदामध्ये घडलेले दाखवले असेल, पण शूटिंग करतांना त्यांचे टाइमिंग काही केल्या जमत नव्हते. एका वेळी ती मुलगी आधी येऊन पोचायची तर दुसऱ्या वेळी ती गाडी आधी यायची किंवा त्या ठरलेल्या पॉइंटला नेमक्या ठिकाणी थांबायचीच नाही. त्यामुळे त्यांचे कितीतरी वेळा रीटेकवर रीटेक चालले होते. ते पाहून शेवटी मलाच कंटाळा आला. मी म्हणतो ती मुलगी किंवा ती गाडी दोन सेकंद थांबली असती तर काय फरक पडला असता? तेवढेही त्यांना एडिटिंगमध्ये अॅडजस्ट करता आले नसते का? त्यानंतर मी मात्र पुन्हा कधी तसला कंटाळवाणा प्रकार पहात थांबलो नाही.  

----


मी कोण आहे ?  

 भाग ३४

आधीच्या काळात जगभरात बहुतेक सगळीकडे राजेमहाराजांचे राज्य होते, पण विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजे माझ्या लहानपणच्या काळापर्यंत सगळीकडे लोकशाही, हुकुमशाही, साम्यवाद वगैरे प्रकारच्या राजवटी आल्या होत्या. इंग्लंडसारख्या काही देशांमध्ये फक्त नावापुरते किंवा शोभेसाठी राजे, राण्या उरल्या होत्या. मात्र त्या काळात घरोघरी चार राजे आणि चार राण्या असायच्याच, इस्पिक, बदाम, चौकट आणि किलवरच्या ! तेंव्हा पत्त्याचा जोड ही एक आवश्यक वस्तू असायची आणि पत्ते खेळणे हा लहानमोठ्या सगळ्यांचा आवडता विरंगुळा होता. मी तर मला कळायला लागल्यापासून भिकार-सावकार, पास्तींदोन, ३०४, बदाम७, झब्बू वगैरे खेळतच लहानाचा मोठा झालो. कॉलेजमध्ये गेल्यावर ब्रिजचा खेळ शिकलो.

त्या टीव्हीच्या आधीच्या काळात आमच्या ट्रेनिंग स्कूलच्या हॉस्टेलमध्येसुद्धा पत्ते कुटणे हा टाइमपासचा पॉप्युलर मार्ग होता. आता बदाम सात किंवा झब्बू वगैरे खेळ जरा बालिश वाटायला लागले होते. पण ब्रिज खेळण्यासाठी चार सराईत खेळाडू हवेत आणि एका वेळी फक्त चारजणच तो खेळू शकत. त्यापेक्षा रमी हा खेळ कितीही मुले खेळू शकत असल्यामुळे तोच जास्त खेळला जात असे.

"द्यूतामध्ये पांडव हरले" वरून झालेल्या महाभारतापासून बोध घेत "कध्धी कध्धी जुगार खेळू नये" हे माझ्या बालमनावर इतके ठसवले गेले होते की मी तोपर्यंत कधी एक पैसाही जुगारावर लावला नव्हता. त्यामुळे पैसे लावून रमी खेळायला मी तयार होत नव्हतो, पण आमच्या ग्रुपमधल्या लीडरच्या मते कोणीही आणि कधीही फुकट रमी खेळत नसतो. तसे केले तर खेळणारे लक्ष देणार नाहीत, कुणीच पॅक करणार नाही, सगळेजण खेळत राहतील, त्यामुळे कुणालाच हवी असलेली पाने मिळणार नाहीत आणि खेळ कंटाळवाणा होईल. त्याचे म्हणणे बरोबर वाटत असले तरी तोच सर्वात चलाख आणि हुशार असल्यामुळे तो नेहमी आपल्याला लुटेल असे वाटून काही मित्रांनी माझी बाजू घेतली.  शेवटी अशी तडजोड करण्यात आली की अगदी कमी स्टेकवर खेळायचे आणि कुणीही तिथल्या तिथे रोख पैसे द्यायचे घ्यायचे नाहीत. सगळा हिशोब मांडून ठेवायचा आणि जितकी टोटल होईल ती सगळ्यांनी मिळून हॉटेलात जाऊन खाण्यापिण्यात खर्च करायची.  त्यानंतर आमच्या कित्येक संध्याकाळी आणि रात्री रमी खेळण्यात आणि पार्टी करण्यात रंगल्या.

-----


मी कोण आहे ?  

 भाग ३५  (अ)

ट्रेनिंग स्कूलच्या होस्टेलमधला माझा रूम पार्टनर होता मानबेंद्र दास. तो दार्जिलिंगच्या वाटेवर लागणाऱ्या शिलिगुडी, जलपैगुरी वगैरेसारख्या भागातून आला होता. तिकडे त्यांचे चहाचे मळे होते म्हणे. पण हिंदी सिनेमातल्या चायबागानचे मालक जसे अतीश्रीमंत, ऊर्मट आणि निष्ठूर दाखवतात तसा तो अजीबात नव्हता. तो शांत, प्रेमळ, मनमिळाऊ आणि समजूतदार स्वभावाचा होता. त्याच्या राहणीत कुठेही ऐयाशी दिसत नव्हती. तिथल्या बंगाली मुलांचे एक टोळके तयार झाले होते त्यात तो होताच, त्याच्या घनिष्ठ मित्राचे आडनावच 'मित्रा' होते. त्याला बंगाली मुले 'मित्रो' म्हणायचे आणि मानबेंद्राला 'मानोबदा'. त्यांच्याशिवाय सेनगुप्ता, मुखोपाध्याय, बासू, बसाक वगैरे आणखी काही जण होते. त्यातला मानबेंद्र सुरुवातीपासून अखेरपर्यंत माझ्या जोडीला माझ्याच ऑफीसात राहिला. मित्रा तीन वर्षांनंतर नोकरी सोडून परदेशी गेला, सेनगुप्ता आणि मुखोपाध्याय काही वर्षांनंतर अधून मधून अणुशक्तीनगरमध्ये दिसायचे, इतर मुले मात्र ट्रेनिंग संपल्यानंतर मला पुन्हा कधी भेटली नाहीत. 

माझे बालपण कर्नाटकात गेले, तत्वज्ञान विद्यापीठात गुजरात्यांचे प्राधान्य होते, इंजिनियरिंग कॉलेजच्या होस्टेलमध्ये काही सिंधी, पंजाबी, तामीळ, तेलुगू मुलेही होती, पण मला मुंबईत किंवा पुण्याला कोणी बंगाली मुलगा किंवा माणूस कधीच भेटला नव्हता. ट्रेनिंग स्कूलमध्येच ती मुले पहिल्यांदा माझ्या सहवासात आली. पु.ल.देशपांड्यांच्या एका लेखात मी वाचले होते की दोन्ही गालात दोन रसगुल्ले ठेऊन तोंडाचा चंबू करून शोनुला मोनुला असे काहीतरी लहान बाळांशी बोलावे तशी बंगाली भाषा गोड असते. कदाचित त्यांना शांतिनिकेतनमध्ये भेटलेल्या गोड बंगाली मुली तसे गोड बोलत असतील, पण इथले माझे बंगाली मित्र मात्र एकत्र जमले की नाकातोंडातून सिगरेटचा धूर सोडत आणि आग ओकल्यासारखे तावातावात एकमेकांवर कचाकचा किंचाळत असत. मला काही दिवसांनी त्याचीही सवय झाली आणि ते कशावरून वादावादी करत आहेत याचा अंदाजही यायला लागला. त्यांच्यात कसलीच दुष्मनी नव्हती, ती त्यांची स्टाइल होती हे लक्षात आले. 

माझ्यात आणि मानबेंद्रामध्ये मात्र कधीच आणि कुठल्याच बाबतीत वाद झाले नाहीत. आम्ही दोघेही एकमेकांना पूर्ण आचारविचारस्वातंत्र्य देत होतो आणि समजूतदारपणा दाखवत होतो. कोलकात्याला मुंबईच्या मानाने तासभर आधी सूर्योदय आणि सूर्यास्त होतो. त्यामुळे बंगाली लोक लवकर निजून लवकर उठत असतील असे कुणाला वाटेल. पण माझा मित्र तरी त्याच्या विरुद्ध वागायचा. तो रात्री उशीरापर्यंत जागायचा आणि सकाळी मी सगळी कामे आटोपून नाश्ता करून आलो तरी हा गादीवर लोळत पडलेला असायचा. मग तो घाईघाईत तयार होऊन कसाबसा क्लासमध्ये येऊन पोचायचा असे नेहमीच होत असे.

पण नंतर मात्र दिवसभर तो उत्साहाने भरलेला चैतन्यमूर्ती असायचा आणि सगळ्या बाबतीत पुढाकार घ्यायचा. तो मला थोडे बांगला शिकवायचा आणि माझ्याकडून मराठी भाषेचे धडे घ्यायचा. होस्टेलच्या गॅदरिंगमध्ये गाण्यासाठी त्याने मुद्दाम मराठी मित्रांना एक बंगाली गीत शिकवले होते. "बोलो बोलो बोलो शोबे, गीत बीना बेनू रोबे" असे काहीसे त्याचे बोल मला पन्नास वर्षांनी अजून आठवतात.   

मी कोण आहे ?  

 भाग ३५ (आ)

मानबेद्रला भेटायला येणाऱ्या बंगाली मुलांशी माझीही हळूहळू मैत्री झाली आणि तो तर माझ्या मराठी मित्रांचा जिगरी दोस्त होऊन गेला. या सगळ्या मित्रांनी एकदा पिकनिकला जायची टूम काढली.  'आमचे झोपडे' समुद्रकिनाऱ्यावरच असल्यामुळे कुणालाच दुसऱ्या एकाद्या बीचवर जायचे आकर्षण नव्हते, त्यापेक्षा आरे कॉलनीच्या जंगलात जायचे ठरले. तीनचार लोकांनी 'आरे' हे नाव तरी ऐकले होते, बाकीच्यांनी ते ऐकलेसुद्धा नव्हते. फक्त मीच शाळेत असतांना एकदा तिथे रहाणाऱ्या नातलगाला भेटायला गेलो होतो तेंव्हा तो रम्य परिसर पाहिला होता आणि तेंव्हा तो माझ्या मनात भरला होता.  एवढ्या अनुभवावर मी आमच्या टोळक्याचा मार्गदर्शक झालो.

त्यात आम्ही दहाबारा मित्र होतो आणि आमच्या बॅचमधल्या दोन मैत्रिणीही यायला तयार झाल्या. त्या होस्टेलवर रहात नव्हत्या म्हणून आम्ही बांद्रा स्टेशनवर एकत्र जमलो. त्या काळात आरे कॉलनीच्या आरपार जाणारी बससेवा नव्हती, कदाचित तसा रस्ताही नसेल, पण गोरेगाव स्टेशनवरून तिथे जाता येते हे मला पक्के आठवत होते. आम्ही सगळे लोकलने गोरेगावला गेलो आणि तिथून आरे कॉलनीला जाणारी बस घेतली. त्या अवाढव्य पसरलेल्या रानात आपण नेमके कुठे जायचे हे तर मलाही माहीत नव्हते. जिथपर्यंत बस जाते तिथपर्यंत जाऊन बघू असा विचार आधी केला, पण नंतर कंडक्टरलाच विचारले. त्याने आम्हाला वाटेतल्या एका स्टॉपवर उतरवून दिले. 

तिथून जवळच लहान मुलांसाठी घसरगुंड्या, झोपाळे, सीसॉ वगैरे खेळाची साधने दिसली, पण आम्ही तिथे पोचलो तेंव्हा कुणी मुले आली नव्हती. ती बहुधा संध्याकाळी येत असतील. मग आमच्या प्रत्येकाच्यात दडलेले 'मूल' जागे झाले आणि त्यांनी यथेच्छ हुंदडून घेतले. तिथे खूप प्रशस्त असे लॉनसारखे काही तरी होते. म्हणजे उंचसखल जमीनीवर अस्ताव्यस्त गवत वाढलेले होते. त्यात चारपाच किंवा सातआठजणांची दोनतीन टोळकी दूर दूर फतकल मारून बसली होती. ते बहुधा फॅमिलीवाले असावेत, त्यात लहान बाळांपासून आजीआजोबांपर्यंत सगळ्या वयोगटांचे लोक दिसत होते. त्या लोकांनी बसायला चटया किंवा तरटाची बसकुरे आणि मोठमोठे डबे भरून फराळ आणला होता.

आम्हीही एक त्यातल्या त्यात सपाट मोकळी जागा पाहून तिथे रिंगण करून बसून घेतले.  यापूर्वी मी कधीच अशा प्रकारच्या पिकनिकला गेलेलो नव्हतो. हा माझा पहिलाच अनुभव होता. आमच्यातली गिरगावात राहणारी मैत्रिण अनुभवी होती आणि थोडी तयारी करून आली होती. तिने सगळी सूत्रे हातात घेतली आणि काही पार्टी गेम्स खेळवले. त्या निमित्याने कुणाला गाणी गायला, कुणाला नाच करायला, कुणाला जोक सांगायला तर कुणाला नकला करायला लावले. 

तास दीड तास खेळल्यानंतर सगळ्यांना भुका लागल्या, पण आम्ही तर हात हलवतच गेलो होतो. मग एक कँटीन शोधून काढले आणि क्षुधाशांती झाल्यावर तिथला प्लँटही पाहिला. कन्व्हेयर बेल्टवरून रिकाम्या बाटल्या सरकत सरकत पुढे जातात. एका ठिकाणी तोटीने त्यांच्यात अर्धा लीटर दूध भरले जाते, त्यांना टोपण लावून सीलबंद केले जाते आणि त्या पुन्हा पुढेपुढे सरकत जातात हे पहायला तर कुणालाही गंमत वाटेल. आम्ही इंजिनियर असल्याने ती यंत्रे कशी चालतात हेही पाहून घेतले आणि लोकलना संध्याकाळची गर्दी व्हायच्या आत परत फिरलो. 

-----


मी कोण आहे ?  
 भाग ३६

शोले या चित्रपटात एक असा प्रसंग दाखवला आहे. त्यात तुरुंगातून सुटलेले जय आणि वीरू ठाकुरच्या हवेलीत येताच त्यांच्यावर तीन चार धटिंगण हल्ला करतात. त्यांना लोळवून आत गेल्यावर "हे असले कसले स्वागत?" असे ते विचारतात तेंव्हा ठाकूर म्हणतो की तुमच्यातली रग अजून शिल्लक आहे का हे मी आजमावत होतो. 

आम्ही ट्रेनिंग स्कूलमध्ये दाखल झाल्यावर आमचीही थोडी अशीच गत झाली होती. उन्हाने भयंकर तापणाऱ्या पत्र्याच्या झोपडीत रहायचे, टेकडी चढून मेसमध्ये गेल्यावर तिथे पानात काय वाढून ठेवले असेल कोण जाणे, मुंबईच्या लोकलमधल्या गर्दीत घुसून मरीन लाईन्स स्टेशनवर उतरल्यावर दोन तीन जिने चढून क्लासरूममध्ये जायचे आणि अॅटॉमिक फिजिक्स, न्यूक्लिअर फिजिक्स, रिअॅक्टर फिजिक्स यासारख्या एकापेक्षा एक रुक्ष आणि जटिल विषयांवरची भाषणे ऐकायची. ती देणारेही कोणी अनुभवी प्राध्यापक नसायचे. बहुतेक वेळा  मुलांना शिकवण्याचा किंवा समजावून सांगण्याचा विशेष अनुभव नसलेले आमच्याहून जेमतेम चारपाचच वर्षांनी मोठे असलेले कुणी सायंटिफिक ऑफीसर तीनचार पानांच्या नोट्स काढून आणत आणि त्या वाचून दाखवत असत.  

आमचे इंजिनियरिंगचे बहुतेक सगळे विषय मुळात फिजिक्समधूनच निघालेले असले तरी मूलभूत पदार्थविज्ञान हा विषय तेंव्हा आम्हाला नव्हता. आता ते विषय शिकणे जरा जड जात होते. लेक्चर देणाऱ्यांचे मल्याळी किंवा बंगाली अशा कुठल्याशा अनोळख्या अॅक्सेंटमधले उच्चारच आधी पटकन नीट समजायचे नाहीत आणि फिजिक्सच्या परिभाषेतले काही  विशिष्ट शब्द समजले तरी ते आमच्या ओळखीचे नसायचे. यामुळे बरेचसे व्याख्यान डोक्यावरून जात असे आणि डोक्यात शिरलेले तिथे जास्त वेळ रहात नसे.  "हे सगळे आपल्याला झेपणे कठीण आहे" असे म्हणून काही मुलांनी पहिल्या महिन्यातच रामराम ठोकला. त्यांना दुसरी एकादी सोपी वाटणारी किंवा जास्त चांगली नोकरी मिळालीही असेल. आम्हला मिळालेल्या नोट्सचा चिकाटीने अभ्यास करून मी परीक्षेतून कशीतरी सुटका करून घेतली, पण आम्हाला ते गहन विषय तेंव्हा नीट समजले होते असे मला छातीवर हात ठेऊन सांगता येणार नाही.  

पण त्यामुळे निदान मला तरी पुढील आयुष्यात काहीच समस्या आली नाही. अणूभट्टीच्या रचनेपासून पुढे तिला सुरक्षितपणे चालवत ठेवण्यात फिजिक्सचा खूप महत्वाचा वाटा असत  असला तरी त्यासाठी काही तज्ज्ञ आमच्या ऑफीसात तसेच प्रत्येक अणुशक्तीकेंद्रांमध्ये नियुक्त केलेले असत आणि तेच सगळे विश्लेषण करून निर्णय घेत असत. त्यांच्या कामात असेही महत्वाचे काहीतरी असते एवढे आम्हा इंजिनियरांना माहीत असावे एवढाच आम्हाला हे विषय शिकवण्यामागचा उद्देश असावा.

----


मी कोण आहे ?  
 भाग ३७

उच्च गणिताचा अवघड घाट चढून आणि उच्च भौतिकशास्त्राचे अंधारी बोगदे पार करून आमच्या प्रशिक्षणाची गाडी पठारावर आली तेंव्हा मी एक लहानसा सुटकेचा निःश्वास टाकला. समोर आलेले हे रिअॅक्टर इंजिनियरिंगचे पठार खूपच नयनरम्य होते. हा इटरेस्टिंग विषय शिकवण्यासाठी आम्हाला एस आर परांजपे नावाचे एक महापंडित लाभले होते. ते आमच्याहून जवळ जवळ पंधरा वर्षांनी मोठे आणि अनुभवी तर होतेच, बुद्धीमान आणि अभ्यासू वृत्तीचे होते, त्यांनी खूप जग पाहिलेही होते. त्या काळात अणुशक्ती हा फारच गोपनीय विषय समजला जात असे, सगळ्याच देशांनी त्याबद्दल आळीमिळी गुपचिळी धरलेली होती. तशातसुद्धा परदेशातली काही पुस्तके, मॅगेझिन्स, रिपोर्ट्स वगैरेंमधून जेवढी माहिती झिरपत होती ती सगळी या सरांनी टिपून घेतली होती. कुठकुठल्या देशांमध्ये कुठकुठल्या प्रकारच्या प्रायोजिक अणुभट्ट्या (रिसर्च रिअॅक्टर्स) आणि अणुविद्युतकेंद्रे (न्यूक्तियर पॉवर स्टेशन्स) उभारली गेली आहेत किंवा उभारली जात आहेत यांची यच्चयावत माहिती त्यांनी डोक्यात साठवली होती हे त्यांच्या बोलण्यातून दिसून येत होते.  
  
ते इतके सीनियर आणि ज्ञानी असले तरी त्यांच्या वागण्यात मुळीसुद्धा ताठा नव्हता. ते आमच्यात मिसळून अत्यंत प्रेमाने सगळे काही छान हसत खेळत समजावून सांगत असत आणि विचारलेल्या कुठल्याही शंकेचे शांतपणे सविस्तर उत्तर देत असत. फक्त ते बोलत असतांना मध्येच एकाद्या अक्षरावर अडखळायचे आणि न्नन्नन्नन्न असे काहीतरी पुटपुटायचे. म्हणून काही उनाड मुलांनी त्यांना 'न्नन्नन्नन्न' असे टोपणनाव ठेवले होते, पण त्यांनाही मनातून परांजपे सरांबद्दल खूप आदर वाटत होता. त्यांनी रिअॅक्टर इंजिनियरिंगचा अर्धा भाग शिकवून संपवल्यानंतर त्यांचेच सहकारी दिवेकर सर आले. तेसुद्धा हुषार आणि माहीतगार होते, शिवाय स्मार्ट होते. वर्गाला चांगल्या प्रकारे सांभाळत होते. या दोघांनी मिळून आमच्या पुढील वाटचालीच्या दृष्टीने सर्वात जास्त महत्वाच्या या विषयाचा भक्कम पाया घातला आणि तो पुढे मला तरी खूपच उपयोगी पडला.

श्री.परांजपे हे तेंव्हा अणुशक्तीकेंद्रामधील 'रिअॅक्टर इंजिनियरिंग' याच नावाच्या विभागातल्या 'फास्ट रिअॅक्टर' नावाच्या उपविभागाचे प्रमुख होते आणि श्री.दिवेकर उपप्रमुख होते. त्यांच्या हाताखाली आणखी काही सहाय्यक इंजिनियर काम करत होते. पण तोपर्यंत भारतात कुठेच अशा प्रकारचा रिअॅक्टर कार्यरत नव्हता किंवा उभारलाही जात नव्हता. पण लवकरच तो उभारण्याचे आराखडे आणि त्याची पूर्वतयारी करण्याचे काम हे लोक करत होते. ते बहुतेक सगळे काम ऑफिसात किंवा लायब्ररीत बसूनच होत असावे. त्या वेळी भारतातल्या इतर प्रकारच्या प्रायोजिक अणुभट्ट्या काम करत होत्या आणि दोन अणुविद्युतकेंद्रे उभारण्याचे काम सुरू होते आणि अनेक लोक त्यावर प्रत्यक्ष काम करण्यात व्यस्त होते. कदाचित म्हणूनच या दोघा वरिष्ठ लोकांना आम्हाला शिकवण्यासाठी पाठवले गेले असेल. पण ते आमच्यासाठी फायद्याचे होते.  

एकदा आमच्या हॉस्टेलमध्ये ठेवलेल्या मेजवानीला आमच्या काही व्याख्यात्यांना निमंत्रित केले होते, त्यात परांजपे सर आले होते. साहजीकच त्यांच्याभोवती विद्यार्थ्यांचा कोंडाळा जमा झाला. सरांनी आमच्याशी खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या. एका विद्यार्थ्याने त्यांना धिटाईने विचारले, "सर ट्रेनिंग झाल्यावर तुम्ही मला आपल्या सेक्शनमध्ये घ्याल का?" त्यावर त्यांनी हसत हसत मिश्किलपणे विचारले, "अरे, पण तुला चेस आणि ब्रिज खेळायला येतं का?" 

ट्रेनिंग संपून आम्ही नोकरीला लागल्यानंतर काही महिन्यांमध्येच अशी बातमी आली की फ्रान्सच्या सहकार्याने भारतात पहिला फास्ट रिअॅक्टर उभारायला सरकारची मंजूरी मिळाली आहे आणि त्यासाठी एका टीमला फ्रान्सला पाठवायचे ठरत आहे. आता सगळ्यांनाच परांजप्यांच्या सेक्शनमध्ये जायचे होते. त्यासाठी काही अनुभवी लोकांची निवड झाली आणि आमच्या बॅचच्या पाच मुलांनाही घेतले गेले. त्यांना आता एकदम इतके काम आले की चेस आणि ब्रिज खेळायला फुरसतच राहिली नाही. त्या पाचजणात माझे नाव आले नाही म्हणून मी काही काळ खट्टू झालो होतो, पण मला पुढे मिळालेले काम आणि संधी पाहता झाले तेच बरे झाले असे नंतर वाटले. 

-----


मी कोण आहे ?  
 भाग ३८

उच्च गणिताचा अवघड घाट चढून आणि उच्च भौतिकशास्त्राचे अंधारी बोगदे पार करून आमच्या प्रशिक्षणाची गाडी  रिअॅक्टर इंजिनियरिंगच्या नयनरम्य  पठारावर आली तेंव्हा मलाही त्या प्रशिक्षणात मजा वाटायला लागली. त्या काळात म्हणजे सन १९६६-६७मध्ये युरोप आणि अमेरिकेतील प्रगत देशांमध्ये चार पाच प्रकारच्या अणुभट्ट्यांमधून प्रत्यक्ष वीजनिर्मिती होत होती आणि इतर चार पाच प्रकारच्या रिअॅक्टर्सवर प्रयोग चालले होते. आमच्या परांजपे आणि दिवेकर सरांनी यातल्या बहुतेक सगळ्यांची सविस्तर माहिती इतक्या छान प्रकारे रंगवून सांगितली की त्यांनी त्या सगळ्या रिअॅक्टर्सवर काम केले असावे असेच वाटत होते. ते दोघे तेंव्हा अणुशक्तीकेंद्रामधील 'रिअॅक्टर इंजिनियरिंग ' याच नावाच्या विभागात कामाला होते आणि तिथे रिअॅक्टर डिझाइन केले जातात असे सांगत. या सगळ्या प्रकारांच्या अनेक अणुभट्ट्यांचे डिझाइन तिथे चालले असेल अशी आमची भाबडी समजूत झाली.  जेवणात कधी पुलाव, कधी रस्सा, तर कधी पुरीभाजी असावी त्याप्रमाणे हे लोक आलटून पालटून या किंवा त्या रिअॅक्टरचे काम करत असतील असेही वाटून गेले. ट्रेनिंग संपल्यावर आपण तर रिअॅक्टर इंजिनियरिंग डिव्हिजनमध्येच जायचे हे मी मनोमन ठरवूनही टाकले आणि आपला चॉइस मिळवण्यासाठी परिक्षांमध्ये चांगले मार्क्स मिळवायच्या कामाला लागलो.

रिअॅक्टर ही फक्त एक भट्टी असते आणि तिच्यात प्रचंड प्रमाणात ऊष्णता निर्माण होत असते, पण त्या ऊष्णतेचा उपयोग करून घेण्यासाठी आधी तिच्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले जाते आणि तिचे विजेत रूपांतर केले जाते. त्यासाठी इतर अनेक उपकरणांची आवश्यकता असते. एक उदाहरण द्यायचे झाले तर प्रत्येक इंजिनमध्ये अशी व्यवस्था केली असते की एका वेळी पेट्रोलचे फक्त चारपाच थेंबच सिलिंडरमध्ये जातात, त्यांच्या ज्वलनामधून निघालेल्या ऊर्जेमुळे पिस्टन जोरात बाहेर ढकलला जातो, तो एका चक्राला फिरवतो आणि ते चक्रच पिस्टनला पुन्हा सिलिंडरच्या आत नेते. अशा प्रकारे तो पिस्टन पुढे मागे होत रहातो आणि ते चक्र फिरत राहते. पण त्या फिरत्या चाकाला मोटारीची चाके जोडून ती चालवायची असेल तर त्यासाठी इंजिनाशिवाय कार्ब्युरेटर, अॅक्सलरेटर, ब्रेक्स, स्टीअरिंग व्हील, गिअरबॉक्स, अॅक्सल रॉड, बॅटरी यासारखी कितीतरी साधने जोडावी लागतात. इंजिन हा जसा मोटारीचा फक्त एक सर्वाधिक महत्वाचा पण लहानसा भाग असतो, त्याचप्रमाणे अणुविद्युतकेंद्राच्या अवाढव्य पसाऱ्यात रिअॅक्टर हा सर्वाधिक महत्वाचा पण फक्त एक भाग असतो. इतर संयंत्रांची माहिती शिकणेही आवश्यक असते.    

----


मी कोण आहे ?  
 भाग ३९

पणतीमधल्या तेलाचे सूक्ष्म कण भिजलेल्या वातीमधून वर चढून ज्योतीपर्यंत येतात आणि त्यांच्या ज्वलनामधून प्रकाश पडतो.  मोटारीच्या टाकीतले पेट्रोल एका बारीक नळीनधून हळूहळू इंजिनात येते आणि लहानसे स्फोट करून इंजिनाला धडधडत ठेवते. बॉयलरच्या भट्टीत सतत थोडा थोडा कोळसा टाकला जातो, तो जळून निघालेल्या धगीमुळे पाण्याची वाफ होते. या सगळ्या उदाहरणांमध्ये थोडे थोडे इंधन जळून खाक होते आणि जाताजाता ऊष्णता देऊन जाते. जळत असलेल्या इंधनातला प्रत्येक कण जवळच्या दुसऱ्या कणांना पेटवतो आणि ती आग भडकत राहते. 

अणुभट्टीमध्येसुद्धा एका वेळी अगदी थोड्याच अणूंचे विखंडन किंवा भंजन होते आणि त्यातून खूप ऊष्णता बाहेर पडते, पण या भट्टीत कणाकणाने इंधन टाकून ते जाळता येत नाही. एका अणूच्या विखंडनामधून तीन न्यूट्रॉन बाहेर पडतात आणि प्रकाशकिरणांसारख्या प्रचंड वेगाने ते तीन दिशांना फेकले जातात. हजारो अणूंच्या आरपार जात किंवा त्यांना धडकत धडकत इकडे तिकडे जात असतांना त्यातले दोन नाहीसे होतात आणि उरलेला एक न्यूट्रॉन भट्टीमधील इंधनाच्या दुसऱ्या एका अणूचे विखंडन करतो.  तो दुसरा अणू पहिल्या अणूपासून दूर कुठेतरी असू शकतो. त्यामुळे ही साखळी चालू रहाण्यासाठी तिथे मोठ्या प्रमाणात इंधन ठेवलेले असणे आवश्यक असते. हे इंधन कधीच जळून पूर्णपणे नाहीसे होत नाही. फक्त त्यातल्या थोड्या अणूंचे विखंडन होते पण ती इंधनाची कांडी जशीच्या तशीच राहते. विखंडनशील अणूंची संख्या कमी झाल्यानंतर इंधनाची ती कांडी अणूभट्टीच्या बाहेर काढून तिच्या जागेत नवी कांडी ठेवावी लागते.  

प्रत्येक अणूभट्टीचे डिझाइन करतांनाच त्यात किती इंधन ठेवायचे हे ठरलेले असते आणि तितके सगळे इंधन भरल्याशिवाय ती सुरूच होत नाही. बहुतेक सगळ्या अणुभट्ट्या एकदा सुरू झाल्यावर वर्ष दीड वर्ष पूर्ण क्षमतेनुसार काम करत रहातात. त्या काळात त्यांना आणखी इंधन द्यावे लागत नाही. एका प्रकारच्या अणुभट्टीला मात्र दर रोज दोन घास भरवावे लागतात, पण गरज पडल्यास तीसुद्धा महिनाभर उपाशीपोटी काम करत राहू शकते.   हे सगळे थोडे आश्चर्यकारक वाटले तरी खरे आहे. जगातील सर्व अणूभट्ट्या याच तत्वावर चालत आल्या आहेत.  अणूंच्या विखंडनानंतर ते इंधन रेडिओअॅक्टिव्ह होत असल्यामुळे त्याला अणूभट्टीच्या बाहेर काढण्यासाठी आणि त्यानंतरही विशेष काळजी घ्यावी लागते. यासाठी विशेष प्रकारची यंत्रणा उभी केली जाते.  

-----



मी कोण आहे ?  
 भाग ४०

पेटलेल्या निखाऱ्यांवर पाणी टाकले की ते विझतात, उन्हामुळे जमीन तापते पण नदीतले पाणी थंड राहते अशा अनुभवावरून पाणी आणि अग्नि ही एकमेकांविरुद्ध तत्वे आहेत किंवा शीतलता हा पाण्याचा धर्म आहे असे समजले जाते, पण पाण्याला तापत ठेवले की ते अग्नीशी दोस्ती करून स्वतःही तापत जाते आणि चटके देते. उकळून वाफ झाल्यावर तर त्यात एक वेगळीच भन्नाट अशी शक्ती येते. बंद डब्यात कोंडून ठेवलेली वाफ त्या डब्याला फोडून बाहेर येऊ पाहते. तीनशे वर्षांपूर्वी न्यूकॉम, जेम्स वॉट आदि मंडळींनी वाफेच्या शक्तीवर  चालणारी स्टीमइंजिने तयार केली आणि वाफेच्या शक्तीचा उपयोग करून घेण्याची सुरुवात केली तेंव्हा जगातली औद्योगिक क्रांती सुरू झाली. आणखी दीड दोनशे वर्षांनंतर एडिसन आणि टेसला यांनी विजेची निर्मिती करून तिला घराघरात आणि कारखान्यांपर्यंत पोचवल्यावर औद्योगिक क्रांतीला तुफान वेग आला, तिने माणसाचे जीवनच पार बदलून टाकले.

विजेपासून ऊष्णता निर्माण करणे अगदी सोपे आहे. विजेच्या प्रवाहाला विरोध करणाऱ्या धातूच्या तारेमधून विजेचा प्रवाह नुसता नेला तरी ऊष्णता आपोआप बाहेर पडते. दिवे, हीटर, गीजर वगैरेंमधून हे काम घरोघरी रोज केले जाते. पण मोठ्या प्रमाणातल्या ऊष्णतेचे थेट विजेत रूपांतर करण्याची किमया अजून तरी साध्य झालेली नाही. बहुतेक सगळ्या औष्णिक वीजनिर्मितिकेंद्रांमध्ये इंधन जाळून निर्माण होणाऱ्या ऊष्णतेपासून आधी पाण्याची वाफ तयार करतात आणि वाफेच्या शक्तीवर अजस्त्र अशी यंत्रे चालवून वीज तयार करतात. अणुशक्तीमधूनसुद्धा ऊष्णताच बाहेर पडते आणि तिचे विजेत रूपांतर करण्यासाठी हेच सगळे केले जाते. यासाठी त्या केंद्रांमध्ये अनेक प्रकारची यंत्रे बसवलेली असतात.

इतर इंधनांवर पाणी शिंपडले तर असलेली आग विझते, पण अणुभट्टीमधल्या इंधनांना पाण्यात बुडवून ठेवले तर तिथले पाणी मात्र त्यांना ऊष्णता निर्माण करायला मदत करते अशी यात आणखी एक गंमत आहे. ते पाणी मदतही करते, पण त्यात ते स्वतःही तापते, त्यामुळे त्याला सतत रिअॅक्टरच्या आतबाहेर खेळवत ठेवावे लागते. यासाठी एक खूप मोठी यंत्रणा सज्ज केलेली असते. ट्रेनिंग स्कूलमध्ये आम्हाला या सगळ्यांची ओळख एका वेगळ्या विषयामध्ये करून देण्यात आली.    

---- 


मी कोण आहे ?  
 भाग ४१

निरनिराळ्या प्रकारच्या अणुभट्ट्यांची रचना आणि इतर माहिती आम्ही रिअॅक्टर इंजिनियरिंग या विषयात शिकत होतोच. अणुभट्टीमध्ये उत्पन्न होत असलेल्या ऊष्णतेचे विजेत रूपांतर करण्यासाठी जी इतर अनेक उपकरणे (इक्विपमेंट) लागतात त्यांची माहिती आम्हाला पॉवर प्लँट इंजिनियरिंग नावाच्या वेगळ्या विषयात शिकवली गेली.  यातल्या काही उपकरणांचा अभ्यास आम्ही इंजिनियरिंग कॉलेमध्ये केला होता, त्याची उजळणी तर झालीच, पण खूप काही नवेही शिकायला मिळाले. कॉलेजमधले शिक्षण उपकरणांच्या माहितीसाठी होते तर इथले प्रशिक्षण त्यांच्या प्रत्यक्ष वापराशी संबंधित होते. 

१९६६-६७मध्ये मी जेंव्हा ट्रेनिंगस्कूलमधले प्रशिक्षण घेत होतो तोपर्यंत भारतात एकही अणुविद्युतकेंद्र (न्यूक्लियर पॉवर स्टेशन) काम करत नव्हते, पण महाराष्ट्रात तारापूर इथे पहिल्या अशा प्रकारच्या अणुभट्टीची उभारणी केली जात होती आणि राजस्थानमधील रावतभाटाजवळ दुसऱ्या प्रकारच्या अणुभट्टीचे काम नुकतेच सुरू झाले होते. यामुळे या दोन्हींसंबंधी तांत्रिक माहिती मिळायला लागली होती. तुर्भे येथील अनुसंधान केंद्रात ज्या प्रायोगिक अणुभट्ट्या (रिसर्च रिअॅक्टर्स) काम करत होत्या त्यातून निर्माण होणाऱ्या ऊष्णतेचे विजेत रूपांतर होत नसले तरी तिला समुद्राच्या पाण्यात नेऊन टाकण्याची मोठी यंत्रणा होतीच त्यातसुद्धा अनेक पंप, व्हॉल्हज, हीट एक्स्चेंजर्स, आयन एक्सेंजर्स वगैरे उपकरणे होती. त्यांच्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव तिथे काम करणाऱ्या इंजिनियरांना होता.  हे सगळे ज्ञानही रिअॅक्टर इंजिनियरिंग डिव्हिजनमध्येच काम करत असलेल्या अभियंत्यांना होते. त्यातल्या काही लोकांनी येऊन आम्हाला त्या विषयावर व्याख्याने दिली. 
  
---- 


मी कोण आहे ?  
 भाग ४२

मी इंजिनियरिंग कॉलेजातले शिक्षण पूर्ण करून ट्रेनिंग स्कूलमध्ये दाखल झालो तेंव्हा वीस वर्षांचा होतो. माझ्या वर्गातली बरीचशी इतर मुलेसुद्धा माझ्यासारखीच वीस एकवीस वर्षांची असतील. पण काही मुलांनी उशीरा शाळेत जायला सुरुवात केली होती, काही जणांनी आधी बी एस सी करून नंतर इंजिनियरिंग केले होते आणि काहीजणांनी इथे येण्याआधी बाहेर १-२ वर्षे नोकरी केली होती. त्यांची वये आमच्याहून २-३ वर्षांनी जास्त होती. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचा वयोगट २० ते २४ पर्यंत होता. यूपी बिहारमधल्या एकदोघांची तर लग्नेही झाली होती आणि त्यांना आपल्या कुटुंबाला घरी ठेऊन इथे हॉस्टेलमध्ये रहावे लागत होते.

अणुशक्ती विभागात पाचदहा वर्षे काम करून तिथे रुजलेले काही अधिकारी आम्हाला निरनिराळे विषय शिकवायला येत असत ते वयानेही पाचदहा वर्षांनी आमच्याहून मोठे आणि जरा प्रौढ दिसत असत. एके दिवशी साधारणपणे आमच्याच वयोगटातले वाटणारे एक तरुण प्राध्यापक आम्हाला लेक्चर द्यायला आले. त्यांना पाहून वर्गातल्या मुलांना आधी जरासे आश्चर्य वाटले, पण कुशाग्र बुद्धीमत्ता, अपार ज्ञान आणि दांडगा आत्मविश्वास यांच्या जोरावर त्यांनी आपल्या पहिल्याच व्याख्यानात सर्वांवर गडद छाप पाडली आणि सर्वांची मने जिंकून घेतली. या उमद्या सरांचे नाव "अनिल काकोडकर" आहे असे समजल्यावर तर आमचा आनंद गगनात मावेना कारण आम्ही त्यांची कीर्ती ऐकली होती.  ते व्हीजेटीआय या त्या काळातल्या सर्वोत्कृष्ट इंजिनियरिंग कॉलेजचे टॉपर होतेच, बीएआरसी ट्रेनिंगस्कूलच्या त्यांच्या बॅचचेही टॉपर होते. ते पुढे जाऊन किती मोठमोठ्या पदांवर विराजमान होणार आहेत याची मात्र तेंव्हा आम्हाला कल्पना नव्हती.

 'अणुशक्तीकेंद्रांमधली यंत्रसामुग्री' हा त्यांचा विषय तसा नाविन्यपूर्ण होता आणि त्यांनी तो अत्यंत मनोरंजक पद्धतीने चांगला समजाऊन सांगितला. त्यांनी दिलेल्या नोट्स पाहून तर आम्ही चकीतच झालो. १९६६ सालच्या त्या काळात फोटोकॉपीइंगचे तंत्र  भारतातल्या बाजारात अजून आलेही नव्हते. तोपर्यंत मी तरी झेरॉक्स केलेला एक कागदसुद्धा पाहिला नव्हता किंवा असे काही तंत्रज्ञान अस्तित्वात आहे हेदेखील मी कधी ऐकले नव्हते. आमचे बाकीचे सगळे लेक्चरर सायक्लोस्टाईल केलेले करड्या रंगाचे खरखरीत कागद वाटत होते. त्यामुळे काकोडकरांनी दिलेल्या पांढऱ्याशुभ्र आणि गुळगुळीत कागदांवर सुबक अक्षरांमध्ये छापलेल्या सचित्र नोट्स पाहून सर्वांनाच त्याचे मोठे अप्रूप वाटले.  त्या काळात बीएआरसीसारख्या उच्च दर्जाच्या संशोधन संस्थेत झेरॉक्सचे एकादे यंत्र नवीनच आणले गेले असेल आणि तिथेही अगदी निवडक लोकांनाच ते उपलब्ध होत असेल. श्री.काकोडकरांनी मुद्दाम प्रयत्न करून आमच्यासाठी त्या सुबक कॉपीज काढवून घेतल्या असणार.

----  


मी कोण आहे ?  
 भाग ४३ 

यंत्रे तयार करतांनाच त्यांच्या कामावर चांगले नियंत्रण ठेवण्याची तजवीजही केली तरच त्यांचा उपयोग करता येतो. मोटारीला नुसतीच चाके आणि इंजिन बसवून ते सुरू केले तर ती मोटार चालेल पण कुठेही जाऊन धडकेल. तिच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी अॅक्सेलरेटर, ब्रेक्स, क्लच, गीअर्स वगैरे आणि तिला योग्य मार्गावरून नेण्यासाठी स्टीअरिंग व्हील यासारखी अनेक उपकरणे जोडतात आणि ती चालकाला बसल्या जागेवरून सहजपणे वापरता येतील अशा बेताने त्याच्या हातापायांच्या जवळ बसवतात म्हणून तो माणूस मोटार चालवू शकतो. चालकाचे काम सोपे आणि अचूक व्हावे यासाठी या सर्वांमध्ये खूप सुधारणा होत गेल्या आणि आज तर चालकाशिवाय चालणारी मोटारगाडीही तयार झाली आहे. अशी विनापायलट उडणारी छोटी विमाने पूर्वीच तयार केली गेली होती. मोठ्या प्रमाणावर मोटारींचे एकसारखे भाग एकापाठोपाठ तयार करणारी ऑटोमॅटिक यंत्रे मी कॉलेजात शिकत असतांनाच कारखान्यांमध्ये काम करत होती. रासायनिक कारखान्यांमध्ये अनेक द्रवरूप किंवा वायुरूप पदार्थांचे तापमान, दाब, प्रवाह इत्यादींवर सतत काटेकोर नियंत्रण ठेवावे लागते. ते साधण्यासाठी स्वयंचलित यंत्रणाच करावी लागते. अणुभट्टीची रचना साधारणपणे रासायनिक कारखान्यांसारखीच असते. त्यातले शीतनक, मंदयक वगैरेंचे तापमान, दाब, प्रवाह वगैरेंवर काटेकोर नियंत्रण ठेवायचे असतेच. शिवाय अणुविखंडनाची प्रक्रिया नियंत्रणात ठेवणे हे मुख्य काम असते.  

आपल्या टॉयलेटमधल्या फ्लश टँकची साखळी ओढताच किंवा बटन दाबताच त्यातले पाणी खाली वाहून तो रिकामा होतो, पण लगेच आपोआप एक नळ सुरू होऊन तो टँक पाण्याने भरला जातो आणि तो भरला की नळ आपोआप बंद होतो. ही आपल्या ओळखीची सोपी नियंत्रण क्रिया असते. मोठ्या इमारतींच्या तळाशी एक मोठी भूमिगत टाकी असते. महापालिकेकडून नळामधून येणारे पाणी त्या टाकीत पडत जाते. तिथून पंपाने ते गच्चीवरल्या टाकीत चढवले जाते आणि तिथून ते निरनिराळ्या घरांमध्ये पुरवले जाते. या दोन्ही किंवा अशा अनेक टाक्यांमधील पाण्याची पातळी पहाणे आणि त्यानुसार पंप सुरू किंवा बंद करणे कुणालाही कठीण आहे. एकटा माणूस ते करू शकणार नाही. म्हणून यासाठी एक स्वयंचलित व्यवस्था केली जाते.  सोसायटीचा वॉचमन त्यावर फक्त लक्ष ठेवतो.

हे पंप दिवसातून एक दोन वेळाच सुरू आणि बंद करावे लागतात. आपल्या रेफ्रिजरेटरमधले तापमान कमाल मर्यादेवर आले की त्याचा काँप्रेसर आपोआप सुरू होतो आणि ते किमान मर्यादेवर येताच तो बंद होतो असे दिवसरात्र चाललेले असते. अशा प्रकारच्या नियंत्रणाला 'ऑन ऑफ कंट्रोल' म्हणतात. बॉयलरमध्ये एका बाजूने सतत पाणी आत येत असते आणि दुसऱ्या बाजूने वाफ बाहेर पडत असते. त्यांचे नियंत्रण करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे कंट्रोल असतात. कंट्रोल इंजिनियरिंग या नावाचे एक मोठे शास्त्रच विकसित झाले आहे. याच नावाच्या एका वेगळ्या विषयात आम्हाला त्या शास्त्राची ओळख करून देण्यात आली. या नियंत्रणामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा फार महत्वाचा सहभाग असतो म्हणून आम्हाला अगदी मुळापासून तो विषयही शिकवला गेला. या विषयाची थोडी जुजबी ओळख इंजिनियरिंग कॉलेजात झाली असली तरी ती तेवढ्यात कालबाह्य झाली होती. त्यामुळे आम्हाला पुन्हा नव्याने शिकावी लागली.   
-----


मी कोण आहे ?  
 भाग ४४ 

अणुशक्ती या विषयाबद्दल जगभरात अगदी सुरुवातीपासून कमालीची गुप्तता बाळगलेली होती. आज आपल्याला गूगलवरून शोधल्यास खूप माहिती मिळते, पण पन्नास वर्षांपूर्वी तशी परिस्थिति नव्हती. अशा विषयावर भारतात कुणी पुस्तके लिहून ती प्रकाशित करणे तर शक्यच नव्हते. परदेशातले लेखकसुद्धा जरा जपूनच लिहित असत आणि ती पुस्तके भारतातले दुकानदार कुणासाठी आणणार?  त्यामुळे जे लोक परदेशात जाऊन आलेले असत त्यांनी आणलेली माहिती आणि अणुशक्ती विभागासारख्या सरकारी संस्थांना त्यांच्या सूत्रांकडून मिळणारी माहिती यावरच सगळा भर होता.

जिथे माहितीसुद्धा सहजपणे मिळत नव्हती, तिथे यासाठी लागणारे विशिष्ट पदार्थ कसे मिळणार ? ते खुल्या बाजारात विक्रीला ठेवलेले नसत. यामुळे अगदी सुरुवातीपासून सगळ्या बाबतीत आत्मनिर्भरतेवर भर दिला जात होता. युरेनियम, थोरियम, झर्कोनियम यासारखे काही विशिष्ट धातू भूगर्भात कुठे दडलेले आहेत हे शोधणे, त्यांची खनिजे बाहेर काढून त्यांचे शुद्धीकरण करणे, त्या धातूंना किंवा त्यांच्या संयुगांना हवा तसा आकार देऊन त्यांना उपयोगात आणणे अशासारख्या विषयांवरही आमच्या प्रयोगशाळांमध्ये संशोधन चालले होते आणि त्यात लक्षणीय अशी प्रगति झाली होती. या कामांसाठी काही लहान कारखानेसुद्धा उभारले जात होते. ट्रेनिंग झाल्यानंतर आमच्यातला कोण कुठल्या विभागात काम करायला जाणार आहे हे माहीत नसल्यामुळे सगळ्याच विद्यार्थ्यांना थोडे प्रशिक्षण देऊन तयार केले जात होते. यासाठी धातुशास्त्र (मेटॅलर्जी) आणि रासायनिक अभियांत्रिकी (केमिकल इंजिनियरिंग) अशासारखे काही विषयही आम्हाला शिकवले गेले.

-----  


मी कोण आहे ?  
 भाग ४५ 

आमचे क्लासरूममध्ये बसून शिकायचे शिक्षण संपत आल्यावर आम्हाला प्रत्यक्ष कामाच्या अनुभवासाठी बी.ए.आर.सी मध्ये पाठवण्यात आले. मेटॅलर्जी, इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल इंजिनियरिंग यासारख्या शाखांमधल्या प्रशिक्षणार्थींना तशा प्रकारचे काम ज्या विभागांमध्ये केले जात होते तिकडे पाठवले गेले. मेकॅनिकलचे विद्यार्थी संख्येने जास्त होते आणि त्या नावाची कुठली डिव्हिजन तिथे नव्हती. काही मुलांना सेंट्रल वर्कशॉपमध्ये तर काही जणांना रिअॅक्टर ऑपरेशन्स डिव्हिजनमध्ये काम करायला पाठवले. मला आणखी सातआठ मुलांबरोबर इंजिनियरिंग हॉल क्र.३, रिअॅक्टर इंजिनियरिंग डिव्हिजनमध्ये पाठवले गेले. 

श्री.परांजपे, श्री.दिवेकर, श्री.काकोडकर, श्री.वेंकटराज वगैरे आम्हाला शिकवायला येऊन गेलेले बरेचसे सर त्या काळात या हॉल नंबर ३ मध्ये काम करत होते. आमच्यावर त्यांचा मोठा प्रभाव पडलेला होता. मी तर ट्रेनिंग संपल्यावर संधी मिळाली त्यांच्याबरोबरच काम करायचे असे ठरवून टाकले होते. त्यामुळे आम्हालाही त्यांची डिव्हिजन पहाण्याची उत्सुकता होती. आम्हाला प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी तिथे जायचे आहे हे समजल्यावर मला खूप आनंद झाला.

त्या हॉलमध्ये एका बाजूला तीन मजल्यांवर एका ओळीत अनेक लहान खोल्या होत्या आणि त्या खोल्यांमध्ये टेबलांनाच ठोकलेली पाच फुटी पार्टीशन्स घालून खूपच छोट्या केबिन्स तयार केल्या होत्या. तिथे बसून हे लोक काम करत असत.  मुख्य हॉलमध्ये अनेक लहानमोठे लूप होते. प्रत्येक लूपमध्ये पंप, व्हॉल्व्हज, व्हेसल्स आणि गुंतागुंतीचे पाइपिंग व अनेक प्रकारची इन्स्ट्रुमेन्ट्स लावलेली होती. त्यातले थोडेच लूप तेंव्हा काम करत होते आणि बाकीचे अजून अपूर्ण होते, त्यांच्यासाठी काही उपकरणे अजून यायची होती.  जे लूप पूर्ण झालेले होते तेसुद्धा विशिष्ट प्रयोग करण्यासाठी कधी तरी थोडा वेळच चालवले जात असत. यामुळे आम्हाला रोज उभे राहून काही प्रत्यक्ष काम करण्यासारखे तिथे काही कामच नव्हते. आम्ही एकेका इंजिनियरला जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा गाठून त्यांच्याकडून त्यांच्या लूपची माहिती विचारून घेतली. त्यात कसले प्रयोग करणार आहेत आणि त्यातून कोणती नवी माहिती मिळवायची आहे वगैरे त्यांनी अगदी त्रोटकपणे सांगितले. हे बहुतेक सगळे इंजिनियर दिवसभर आपापल्या केबिनमध्ये बसून नव्या रिअॅक्टर्सच्या डिझाइनच्या संबंधित काम करत होते, त्यातला काही भाग गोपनीय होता आणि काही इतका क्लिष्ट होता की तो नवख्या मुलांना समजावून सांगता येण्यासारखा नव्हता. त्यांच्या इवल्याशा केबिनमध्ये बसायला जागाही नव्हती. त्यांना आमच्या मदतीची गरज नव्हती आणि आमचा उपयोगही नव्हता असे दिसत होते. त्यामुळे आम्हाला प्रत्यक्ष कामाचा अनुभव असा मिळाला नाही  पण प्रशिक्षणाचा भाग म्हणून आम्हालाही काहीतरी करायचे होते. तिथल्या कॉन्फरन्स रूममध्ये बसून थोडे वाचन आणि त्यावर चर्चा करत आम्ही ते प्रॅक्टिकल ट्रेनिंग पूर्ण केले. मात्र या काळात तिथल्या महत्वाच्या लोकांच्या ओळखी झाल्या त्याचा पुढे उपयोग झाला.

-----


मी कोण आहे ?  
 भाग ४६

ट्रेनिंग स्कूलमध्ये आम्हाला दरमहा ३०० रुपये स्टायपेंड मिळत होता. खोलीचे भाडे आणि आरोग्य सेवा यासाठी त्यातले थोडे पैसे कापून घेऊन उरलेली रोख रक्कम एक तारखेला आमच्या हातात मिळत असे. त्या दिवशी सगळे जण "खुश है जमाना आज पहली तारीख है।" म्हणत चांगल्या मूडमध्ये असत. आमच्या खात्याचे खजिनदार ज्या खोलीत हे वाटप करीत त्याच खोलीत बाजूला दोन खुर्च्या आणि टेबले मांडून आमचे मेस सेक्रेटरी व कल्चरल सेक्रेटरी बसलेले असत. पगारातले  जवळजवळ अर्धे पैसे महिनाभराच्या मेसमधल्या  जेवणाखाण्याचे बिल देण्यात जात आणि क्रीडा व सांस्कृतिक कार्यासाठी पाच दहा रुपये दक्षिणा देऊन उरलेले सव्वा ते दीडशे रुपये पाकिटात ठेवल्यावर खिसा गरम झाल्यासारखे वाटायचे. इंजिनियरिग कॉलेजमध्ये शिकत असतांना माझे महिन्याचे पूर्ण अंदाजपत्रकच शंभर रुपयांच्या आत असायचे, त्या मानाने हे पैसे जास्तच होते. मुख्य म्हणजे हे सर्वस्वी माझ्या कमाईचे होते, त्यातून बचत करून काही पैसे घरी पाठवण्याची जबाबदारीही माझ्यावर नव्हती आणि ते मी मनासारखे खर्च करू शकत होतो, कुणाला त्याचा हिशोब देण्याची गरज नव्हती, यातला आनंद सर्वात जास्त होता.

ट्रेनिंग स्कूलमधले माझे सगळे मित्र मध्यमवर्गीयच होते. जे माझ्यासारखे ओढाताणीच्या परिस्थितीतून आले होते ते आनंदात होते आणि बऱ्या परिस्थितीतून आलेले थोडी कुरकुर करत होते, पण जमवून घेत होते. दोन चार 'बडे बापके बेटे' आपापल्या पिताश्रींकडून पैसे आणून मजेत रहात होते, पण ते माझे मित्र नव्हते.

वांद्र्यातल्या हॉस्टेलपासून मरीन लाइन्स इथल्या क्लासरूमपर्यंत जाण्यायेण्याची आणि दुपारच्या भोजनाची सोय मला या पैशातूनच करायची होती. काटकसरीने वागून ते शक्य होत होते, पण चैन करण्यासाठी फारसा वाव नव्हता. त्या काळात सिनेमा पाहणे आणि भेळपुरी, शीतपेय किंवा आइसक्रीम एवढीच आमचीही चैनीची मर्यादा होती आणि तेवढी चैन मी करून घेऊ शकत होतो. चर्चगेटपासून मुंबई सेंट्रल पर्यंतच्या भागातच मुंबईतली सगळी मुख्य थिएटरे होती आणि तिथे लागलेले बहुतेक सगळे चांगले सिनेमे आम्ही पहात होतो. त्या काळात एकदा पिक्चर लागला की तो रौप्यमहोत्सव केल्याशिवाय निघत नसे आणि एकच सिनेमा पुन्हा पुन्हा पाहण्याची हौस मला कधीच नव्हती. त्यामुळे प्रत्यक्षात या सगळ्या थिएटरांना मी वर्षभरातून एक दोनच भेटी दिल्या असणार. त्याशिवाय दहा पंधरा वर्षांपूर्वीपासून लागून गाजलेले बरेचसे सिनेमे मी आधी पाहू शकलो नव्हते, ते मॅटिनी शोजमध्ये पाहून मी माझा अनुशेष (बॅकलॉग) भरून काढला. आता मीसुद्धा दिलीपकुमार, देव आनंद, राजकपूर, अशोककुमार वगैरेंवर धडाधड बोलू शकत होतो. माझ्या त्याआधीच्या आयुष्यात मी एकंदर जितके सिनेमे पाहिले होते त्याहून जास्त मी या एका वर्षात पाहिले आणि त्यानंतर पुन्हा कुठल्याही वर्षात मी तितके चित्रपट पाहिले नाहीत. 

 -----


मी कोण आहे ?  
 भाग ४७

ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रवेश घ्यायच्या वेळी आमच्याकडून एक बाँड लिहून घेतला होता. त्यानुसार एक वर्षाचे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर वैज्ञानिक अधिकारी म्हणून तीन वर्षे नोकरी करणे आम्हाला बंधनकारक होते. पण सरकारवर कुठलेच बंधन नव्हते. ते आम्हाला कधीही डच्चू देऊ शकत होते. असा एकतर्फी करार कायद्याला धरून नाही असे कोणा कायदेतज्ञाचे मत आहे असे मला काही वर्षांनंतर समजले. पण बाँडवर सही केल्याशिवाय प्रवेशच मिळणार नसल्यामुळे त्या वेळी तर सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी त्यावर राजीखुशीने सह्या केल्या होत्या.

ट्रेनिंगसाठी प्रवेश घेतल्यानंतर आम्हाला सरकारी नियमांप्रमाणे आचारसंहिता पाळायची होती. त्यात शिस्त आणि गोपनीयता यांना खूप महत्व होते. आमचे हेडमास्तर फारच कडक शिस्तीचे भोक्ते होते. आधीच्या कुठल्याशा बॅचमधल्या दोन तीन मुलांनी त्यांच्याशी वितंडवाद घातला एवढ्या कारणावरून शिस्तभंगाची कारवाई म्हणून त्यांना तडकाफडकी हाकलून दिले गेले होते अशी अफवा प्रशासनातल्या लोकांनीच पसरवून दिली होती, यामुळे सगळी मुले या हेडमास्तरांना टरकून होती. हे ऑफिसमधले लोक आमच्यावर हेरगिरी करतात की काय असा दाट संशयही आम्हाला सुरुवातीला वाटायचा. पण ते लोक चांगले आणि मनमिळाऊ होते, त्यांनी कुणाची चुगली केल्याचे दिसले नाही हे पाहिल्यावर आमची त्यांच्याशी दोस्ती झाली.

सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा आणि परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवावेत अशी अपेक्षा होती. वर्षभराच्या सगळ्या परीक्षांमध्ये मिळून अमूक इतके टक्के मार्क मिळाले तर एस सी टू ही ग्रेड मिळणार होती आणि कमी पडले तर एस सी वन ही. या दोन्ही श्रेणींची सुरुवात ४०० रुपयांवरच होत होती, पण वार्षिक पगारवाढीत थोडा फरक होता आणि पुढील बढतीच्या संधींमध्ये जास्तच फरक पडणार होता. कुणाला फारच कमी मार्क पडले तर त्याला यातली कुठलीच ग्रेड मिळणार नव्हती. पण त्यासाठी ते वर्षभर थांबले नाहीत. पहिल्या तीनचार महिन्यांमध्ये झालेल्या परीक्षांमधील असमाधानकारक कामगिरीवरूनच तीन चार मुलांना घरी पाठवण्यात आले. त्यात माझाही एक मित्र होता.

तो बहुधा टेक्निकल स्कूलमधून पॉलिटेक्निकला आणि डिप्लोमा करून इंजिनियरिंगला आला होता. त्यामुळे त्याचा विज्ञानशाखेतल्या विषयांचा पाया कच्चा राहिला होता आणि त्यातले बरेचसे फंडे त्याला माहीत नव्हते. सूर्याभोवती पृथ्वी फिरते आणि तिच्याभोवती चंद्र, याप्रमाणे कल्पना करून त्याने पेपरात अणूची रचना दाखवतांना मधोमध एक न्यूट्रॉन, त्याच्याभोवती फिरणारा एक प्रोटॉन आणि त्याभोवती एक इलेक्ट्रॉन असे चित्र काढले होते. ट्रेनिंगच्या सुरुवातीलाच असलेले बीएससी किंवा एमएससी लेव्हलचे फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित हे विषय त्याला नीट समजत नव्हते आणि त्याने ते समजून घ्यायचा विशेष प्रयत्नही केला नव्हता. पण त्याचा असा परिणाम होईल अशी कदाचित त्याला कल्पना नव्हती. एका मुलीने मात्र बहुधा मुद्दामच कमी गुण मिळवून बाँडमधून सुटका करू घेतली असावी. ती लग्न करून नवऱ्यासोबत अमेरिकेला चालली गेली असे त्यानंतर काही महिन्यांमध्येच आमच्या कानावर आले. 

------

मी कोण आहे ?  
 भाग ४८

 ट्रेनिंग स्कूलमध्ये दर शनिवारी एक दोन विषयांचे पेपर द्यायचे होते. त्याआधी झालेल्या दहा बारा व्याख्यानांमधून जेवढे शिकवले गेले असेल तेवढ्याच पोर्शनवर प्रश्न येत असत. सगळे व्याख्याते दोन चार पानांच्या नोट्स वाटत असत आणि त्याशिवाय मी काही महत्वाचे मुद्दे, फॉर्म्यूले वगैरे नोटबुकामध्ये लिहून घेत असे. लक्ष देऊन सगळे ऐकले आणि समजले असले तर या गोष्टी एकदा नजरेखाली घालणे पुरेसे असायचे. मी तरी त्याशिवाय रात्री उशीरापर्यंत जागून किंवा भल्या पहाटे उठून काही तयारी केली नाही. आम्ही रमी खेळण्यात रात्री जागवल्या असतील, पण अभ्यासासाठी कधीच नाही.  तरीही मला ७०-७५टक्के मार्क मिळत होते. 

मी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिकत असतांनाच्या काळात आमच्या पुणे विद्यापीठात ६०% गुण मिळाल्यावर पहिला वर्ग मिळत असे आणि ६६% मार्कांवर विशेष गुणवत्ता (डिस्टिंक्शन) मिळत असे ती फारच थोड्या मुलांना मिळत असे. कुणाला ७०% मार्क मिळाले असे आम्ही कधी ऐकले नाही. त्यामुळे ट्रेनिंग स्कूलमध्ये मिळत असलेल्या मार्कांवर मी खूष होतो. आमच्या वर्गातल्या आणखी आठ दहा मुलांनाही माझ्यासारखे गुण मिळत होते. बरीचशी मुले साठीमध्ये असत. इंजिनियरिंग स्ट्रीममध्ये एस सी टू ग्रेड मिळवणे सहज सोपे होते. अपवादास्पद एक दोन मुलांनाच ती मिळाली नाही. सायन्स स्ट्रीममधल्या परीक्षा जास्त कठीण असाव्यात. ती मुले थोड्या टेन्शनमध्ये दिसत असत आणि बऱ्याच मुलांना एस सी वन ग्रेड मिळाली असे कानावर आले.

आमच्या मेकॅनिकल इंजिनियरिंगच्या बॅचमध्ये रामकृष्णन नावाचा एक अत्यंत कुशाग्र बुद्धीचा पण अबोल आणि शांत मुलगा होता. त्याने वर्गात कधीही आपली जास्त हुषारी दाखवली नाही किंवा तो कुठल्याही तात्विक वादावादीत भाग घेत नव्हता. इतर काही मुले तावातावात आपली बाजू मांडत असत, पण या मुलाने आवाज चढवून बोललेले मी कधीच ऐकले नाही. पण या पठ्ठ्याने सुरुवातीपासूनच ८०-८५ टक्क्यांच्याही वर मार्क्स मिळवायला सुरुवात केली आणि त्याचाही कधीच बोलण्यात उल्लेख केला नाही. दुसऱ्या चौकस मुलांनीच त्याची दखल घेतली तोपर्यंत त्याने इतरांवर प्रचंड आघाडी घेतली होती आणि ती शेवटपर्यंत टिकवून धरली. यामुळे पहिला नंबर तोच पटकावणार यात काही शंकाच नव्हती आणि  दुसरा कोणी स्पर्धक त्याच्या जवळपासही नव्हता.

पहिल्या क्रमांकाच्या मुलांना होमी भाभांच्या नावाने एक लहानसे बक्षिस ठेवले होते आणि ट्रेनिंग संपल्यावर त्यांना हव्या असेल त्या विभागात नोकरीची जागा मिळणार होती. पण तिथे रौप्य किंवा कांस्यपदक ठेवलेलेच नव्हते. दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर येणारा आणि सर्वात शेवटी येणारा हे सगळे एकसारखेच होते. आम्हाला ट्रेनिंग स्कूलमधील कामगिरीसाठी कसलेही प्रमाणपत्र किंवा मार्कशीटसुद्धा मिळणार नव्हते आणि मिळालेही नाही. मी ट्रेनिंगस्कूलचा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला असे दाखवणारा कुठलाही कागदोपत्री पुरावा मला कधीच मिळाला नाही.    

------


मी कोण आहे ?  
 भाग ४९

मी इंजिनियरिंग कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकत होतो तेंव्हाच भारताचे एक थोर शास्त्रज्ञ डॉ.होमी जहांगीर भाभा यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले अशी एक धक्कादायक बातमी आली. त्यावेळी डॉ.भाभा आणि अणुशक्ती यांच्याबद्दल वर्तमानपत्रांमध्ये बरेच काही छापून आले होते, पण पुढे माझा त्यांच्याशी जन्मभराचा संबंध जुळणार आहे याची पुसटशी कल्पना मला नव्हती त्यामुळे मी ते जास्त लक्ष देऊन वाचले नव्हते आणि ते मला फारसे समजले नव्हते. मी ट्रेनिंग स्कूलमध्ये दाखल झाल्यानंतर मात्र तिथला जो भेटेल तो डॉ.भाभांची प्रचंड स्तुति करत होता. रोजच या ना त्या विषयावरून त्यांचा उल्लेख केला जात होता.

ते श्रीमंत घराण्यात जन्माला आले होते. शिक्षणासाठी इंग्लंडला गेले आणि तिथे राहून शास्त्रीय संशोधन करायला लागले. त्यांनी नक्की कसले शोध लावले हे मला समजेल अशा भाषेत मला कोणी सांगितले नाही, पण मोठमोठ्या जगप्रसिद्ध अशा शास्त्रज्ञांबरोबर त्यांच्या ओळखी झालेल्या होत्या. भारतात परत आल्यावर त्यांनी टाटांच्या मदतीने बंगळूरु आणि मुंबई इथे संशोधनसंस्था स्थापन केल्या. तिथे विज्ञानावर मूलभूत संशोधन सुरू झाले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी थेट प्रधानमंत्री पं.नेहरू यांच्याशी मैत्री केली आणि त्यांच्या सहाय्याने केंद्र सरकारच्या अखत्यारीतच अॅटॉमिक एनर्जी कमिशन सुरू केले. अणुशक्तीविषयीचे विज्ञान तसेच तंत्रज्ञान यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या आयोगामार्फत अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट ट्राँबे (ए ई ई टी) ही मोठी संस्था स्थापन केली गेली. या एईईटीच्या ट्रेनिंग स्कूलमध्येच आम्ही प्रशिक्षण घेत होतो. 

जानेवारी १९६७मध्ये एक दिवस आम्हा सर्वांना ट्राँबेला नेण्यात आले. तिथे काम करत असलेले बहुतेक सगळे लोक एक मोठ्या लॉनमध्ये जमले होते. व्यासपीठावर डॉ.साराभाई, डॉ.सेठना, डॉ.रामण्णा वगैरे मोठी माणसे होतीच, त्यावेळच्या प्रधानमंत्री माननीय इंदिरा गांधी प्रमुख पाहुण्या होत्या. मी या सर्वांना तेंव्हा पहिल्यांदाच पहात होतो. सर्वांनी डॉ.होमी भाभा यांच्या आठवणी काढून त्यांना आदरांजलि वाहिली आणि एईईटीचे नामांतर बीएआरसी असे केले आहे असे जाहीर केले.  मग आमचे ट्रेनिंग स्कूलही 'बीएआरसी ट्रेनिंग स्कूल' झाले.

------


मी कोण आहे ?  
 भाग ५०

ट्रेनिंग स्कूलमध्ये वर्षभर प्रशिक्षण घेतल्यानंतर आणि त्या काळात असंख्य चाचण्या किंवा परीक्षांना तोंड दिल्यावर शेवटी निकालाचा दिवस आला. आम्हाला निरनिराळ्या पेपरांमध्ये मिळालेले गुण त्यापूर्वीच सर्वांना माहीत झालेले होते आणि त्या सर्वांचा एकत्र असा परिणाम औपचारिक रीत्या देण्याचीही काही योजना नव्हती. त्यामुळे तो परीक्षेचा निकाल नव्हता, एक ऑगस्टपासून कोण कुठे नोकरीला लागणार आहे हे या निकालाच्या दिवशी ठरणार होते. 

त्याच्या आधीच आपल्याला कुठे कुठे पाठवले जाण्याची शक्यता आहे याची माहिती सगळ्यांनी मिळवली होती. त्या सुमाराला राजस्थानमधील कोटा या शहरापासून काही अंतरावर नवे अणुविद्युत केंद्र उभारण्याच्या कामाला सुरुवात होऊन त्या कामाला वेग आला होता. त्यासाठी जितके मिळतील तितके इंजिनियर हवेच होते असे कळले. हे ऐकून सगळ्या उत्तर भारतीय मुलांना लॉटरी लागल्यासारखा आनंद झाला. सगळ्याच मुलांना आईवडिलांच्या शक्य तितक्या जवळ रहायची इच्छा तर होतीच. म्हणजे त्यांना वरचेवर घरी जाणे येणे शक्य होणार होते. त्या काळात मुंबईहून उत्तर भारतात जाण्यासाठी फार कमी रेल्वेगाड्या होत्या आणि त्यांमध्ये स्लीपरचे डबेही अगदी थोडे असायचे. त्यामुळे त्यात आरक्षण मिळवणे हे एक मोठे दिव्य असायचे.  कोट्यापासून पुढे जाणे त्या मानाने सोयीचे असेल असे त्यांना वाटत होते. त्याशिवाय मुंबईत रहाण्याच्या जागेचा मोठा प्रॉब्लेम होता. प्रॉजेक्ट साइटवर काम करणाऱ्या सगळ्यांच्या रहाण्याची व्यवस्था करणे ही सरकारची जबाबदारी होती. तो प्रश्नच नव्हता. यामुळे सगळ्या हिंदी आणि पंजाबी भाषिक मुलांनी कोट्याला जायचे ठरवून टाकले. त्यासाठी तिथे जाऊन रखरखत्या उन्हात काम करायची त्यांची तयारी होती.

केरळमधल्या थुंबा नावाच्या खेड्यात एक लहानसे रॉकेट लाँचिंग स्टेशन होते. तिथे असे किती इंजिनियर हवे असणार ? असे म्हणून इतर राज्यातल्या मुलांनी तिकडे लक्षही दिले नाही. केरळमधून आलेल्या दोन्ही मुलांना मात्र आपल्या घरापासून जवळ म्हणून तिथे जायचे होते. त्या वेळी कल्पकम हे नावही कुणी ऐकले नव्हते आणि तिथे काही मोठे प्रकल्प होणार आहेत याचीही कुणाला माहिती नव्हती. तिथे जाण्याचा पर्याय उपलब्ध नव्हताच. दक्षिण भारतीय किंवा बंगाली मुलांना कोट्यासारख्या ठिकाणाहून आपल्या घरी जाण्यासाठी थेट रेल्वेगाड्या नव्हत्या. त्यांनाही त्यापेक्षा मुंबई बरी वाटत होती.  

निकालाच्या दिवशी आम्ही सगळे अणुशक्तीखात्याच्या मुख्य कार्यालयात गेलो. तिथल्या एका मोठ्या खोलीत खात्यातल्या सर्व विभागांच्या प्रमुखपदी असलेले दहापंधरा मोठे अधिकारी बसले होते. आम्ही बाहेरच एका हॉलमध्ये थांबलो होतो आणि इकडेतिकडे फेऱ्या मारत होतो. एका वेळी एकाच मुलाला आत पाठवत होते आणि त्याला एकच प्रश्न विचारत होते, "तुला कुठे जायचे आहे?" त्याला तिथे का जायचे आहे? तिथे जाऊन काय काम करायचे आहे? त्या मुलाची तिथे जाऊन तिथले काम करायची पात्रता आहे का? वगैरे चौकशी करायला कुणालाच वेळ नव्हता. त्यांना दोन अडीच तासात शंभर सव्वाशे मुलांचा 'निकाल' लावायचा होता. प्रत्येक डिसिप्लिनमधल्या टॉपरला हवी ती प्लेसमेंट मिळणार होती. बाकीच्यांना सस्पेन्स होता. पण त्या लोकांनाही शक्यतोवर त्यांनी मागितलेली डिव्हिजन दिली गेली. कोट्याला जाऊ इच्छिणाऱ्या बहुतेक सगळ्या मुलांना आरएपीपीसाइटवर जागा मिळाली. त्यात आमच्या मेकॅनिकलच्या बॅचमधले आठदहाजण होते. दोघांना वर्कशॉपमध्ये घेतले, तीन चार जणांना रिअॅक्टर ऑपरेशन्समध्ये आणि आठदहा जणांना रिअॅक्टर इंजिनियरिंग डिव्हिजनमध्ये जागा मिळाली. बहुतेक सर्वजण समाधानी होते. क्वचित एकाददुसऱ्याला त्याने मागितलेला विभाग मिळाला नाही. कदाचित त्याचा चेहेरा त्या विभागप्रमुखाला आवडला नसेल किंवा दुसऱ्या एकाद्या विभागप्रमुखाला तो जास्त आवडला असेल. पण ते कळायला मार्ग नव्हता.

मला कामगारांवर अरेरावी करायची हौस नव्हती आणि त्यांच्या युनियनशी संघर्ष नको होते, दिवसभर एकाद्या यंत्रासमोर उभे रहायचेही नव्हते, शांतपणे बसून अभ्यास, डिझाइन, अॅनॅलिसिस यासारख्या डोके चालवण्याच्या गोष्टींवर काम करायचे होते. तसे काम आरईडीमध्ये होते असे ऐकले होते आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंगच्या वेळी पाहिले होते. त्यामुळे मी तीच डिव्हिजन मागितली आणि मला ती मिळाली.

(क्रमशः)    



Wednesday, September 22, 2021

स्वामी विवेकानंदांची अमेरिकेतली भाषणे

 

स्वामी विवेकानंदांची अमेरिकेतली भाषणे


स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत जाऊन कुठल्या तरी ठिकाणी एक भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात "माझ्या अमेरिकेतील बंधूभगिनींनो " अशी करून एकदम सगळ्या जगाचे मन जिंकून घेतले असे मी शाळेत असतांनापासून ऐकत आलो आहे. लहानपणी मलाही त्याचे खूप कौतुक वाटले होते, पण समज यायला लागल्यानंतर त्याबद्दल माझ्या मनात अनेक प्रश्न यायला लागले होते.  पण त्याची उत्तरे मिळत नव्हती. उदाहरणार्थ १८९३साली वृत्तपत्रे सोडून इतर कुठलीही प्रसारमाध्यमे नव्हती, विमानेही नव्हती आणि साक्षरता फार कमी होती त्यामुळे वर्तमानपत्रांचा प्रसारही मर्यादितच असणार. मग या भाषणाला प्रसिद्धी तरी कशी मिळाली असेल? या वर्षी मला ते भाषण वाचायला मिळाले तरी त्यातही एवढे खास काय होते ते समजले नाही. आज मला या विषयावरील प्रा.शिवाजीराव भोसले यांचा एक अप्रतिम व्हीडिओ यू ट्यूबवर ऐकायला मिळाला. त्यात मात्र खूप नव्या गोष्टी समजल्या.  

स्वामी विवेकानंदांना अमेरिकेतल्या लोकांनी कुठल्याशा मोठ्या जागतिक परिषदेला येण्यासाठी सन्मानाने आमंत्रण दिले, त्यांची जाण्यायेण्याची सगळी व्यवस्था करून त्यांचे खूप थाटात स्वागत केले, ते एकाद्या सम्राटासारखे ऐटीत तिथे गेले, बोलले आणि जिंकले असे काही झाले असले तर ते कशामुळे झाले असेल? भारतासारख्या पारतंत्रातल्या देशातल्या एका युवकाला अमेरिकेत कुणी कसे ओळखत असेल आणि त्याची निवड कशी झाली असेल? याचेच मला मुख्य गूढ वाटत होते. आज समजले की तसे काहीही झालेच नव्हते. मुळात ज्या धर्मपरिषदेला ते गेले होते तोच कुठला मुख्य कार्यक्रम नव्हता. कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावला या घटनेचा चारशे वर्षे झाली या घटनेच्या निमित्याने शिकागो इथे एक जंगी जत्रा भरवण्याचे ठरवले गेले आणि अमेरिकेने केलेल्या सर्वांगीण प्रगतीचे प्रदर्शन मांडून सगळ्या जगाचे अमेरिकेकडे लक्ष वेधण्याचा बेत होता. त्याचा भाग म्हणून तिथे वीस परिषदा भरवण्यात आल्या होत्या. त्यातच एक धर्मपरिषद भरवायची आणि जगभरातल्या लोकांमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार करायचा असे ठरवले गेले होते. जगामधील इतर धर्मांच्या लोकांनीही त्यात भाग घ्यावा आणि ख्रिस्ती धर्माची महती ऐकून व तो धर्म स्वीकारून आपापल्या देशांमध्ये त्याचा प्रसार करावा या हेतूने त्याला 'जागतिक धर्मपरिषद' असे नुसते नाव दिले होते.  

त्यावेळी स्वामी विवेकानंदांचे भारतभ्रमण चालले होते. सद्गुरु रामकृष्ण परमहंसांच्या आज्ञेवरून त्यांनी ते सुरू केले होते. देशभरातल्या निरनिराळ्या ठिकाणी जाऊन तिथे काही दिवस मुक्काम ठोकायचा आणि तिथले जनजीवन जवळून पहायचे त्यांनी ठरवले होते. ते करत असतांना ते देशामधील जनतेची तसेच हिंदू धर्माची दैन्यावस्था पहात होते. त्यांच्यामध्ये नवीन चैतन्य आणण्याची गरज आहे हे त्यांनी जाणले आणि हे काम आपणच करायचा निश्चय केला. या काळातच अमेरिकेतल्या या धर्मपरिषदेची बातमी त्यांना कळली, पण संन्याशाचे जीवन जगत असलेल्या विवेकानंदांना त्या बातमीचा काहीच उपयोग नव्हता आणि त्यांची तिथे जायची इच्छाही नव्हती. ते देशाचे भ्रमण करत असतांना ठिकठिकाणी भाषणे देत, धर्मावर तसेच इतर महत्वाच्या विषयांवर विद्वानांशी चर्चा करत यातून त्यांचे अनेक चाहते तयार झाले होते. या परिषदेत भाग घेण्यासाठी जो कोणी माणूस जाईल त्याचे इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व असायला हवे तसेच त्याचा धर्मशास्त्राचा दांडगा अभ्यासही हवा. त्या काळात हे दोन्ही गुण असणारे लोक फारच दुर्मिळ होते, त्यात विवेकानंद हे होते. त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे मन वळवले, काही राजेमहाराजे यांच्याकडून देणग्या किंवा वर्गणी गोळा करून त्यांच्या अमेरिकेच्या प्रवासाला लागणाऱ्या खर्चाची व्यवस्था केली आणि त्यांना बोटीत बसवून पाठवून दिले. 

ते कसेबसे शिकागोला जाऊन पोचले, पण तिथले आयोजक त्यांना त्या धर्मपरिषदेत भाग घेऊ द्यायलाच तयार नव्हते. "तुम्ही कोण? कुठले? तुम्हाला इथे कुणी पाठवले? भारताचे किंवा हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करायचा तुम्हाला कोणता अधिकार आहे?" असल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला त्यांच्याकडे कसलीही कागदपत्रे नव्हती. त्यांनी आधीपासून त्यासाठी काही तयारीही केली नव्हती. ते भारतात असतांनाही कुठले पीठाधीश वगैरे नव्हतेच. गावोगाव आणि रानोमाळ भटकत फिरणारे आणि कुठलीही खास ओळख नसलेले संन्यासी होते. त्या काळातल्या संन्याशांना भारतात कुठेही धर्मशाळा  किंवा देवळांमध्ये कसेतरी राहता येणे शक्य असे आणि स्थानिक लोक त्याच्या जेवणाखाण्याची सोय करत. पण अमेरिकेसारख्या परमुलुखात ते तर शक्य नव्हतेच आणि मायदेशी परत येण्यासाठीसुद्धा त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते.   

पण आपल्याला या कामगिरीवर पाठवण्यात देवाची काही योजना आहे आणि ती पार पाडायची शक्तीही तो देईल यावर त्यांचा मनोमन विश्वास होता. त्यांच्याकडे कुशाग्र बुद्धिमत्ता, प्रभावी व्यक्तीमत्व, आत्मविश्वास आणि अथांग विद्वत्ता हे दुर्मिळ गुण होतेच. त्यांना अमेरिकेतही काही विद्वान, गुणग्राहक आणि परोपकारी असे लोक भेटले आणि त्यांनी प्रयत्न करून विवेकानंदांना धर्मपरिषदेत प्रवेश मिळवून दिला. त्यांना अशा मोठ्या संमेलनाचा पूर्वानुभव नव्हताच आणि आपण नेमके काय बोलायचे याची त्यांनी जास्त पूर्वतयारीही केलेली नव्हती. आधी बोललेल्या वक्त्यांची भाषणे ऐकता ऐकताच त्यांनी आपले मुद्दे ठरवले आणि उत्स्फूर्तपणे ठासून मांडले. परिषदेच्या उद्घाटन समारंभात झालेले त्यांचे ते पहिले भाषण जेमतेम पाच मिनिटांचे होते, पण त्यात त्यांनी आपली छाप पाडली. ते संमेलन पंधरा वीस दिवस चालले होते त्यात त्यांना आणखी तीन चार वेळा सविस्तरपणे बोलायच्या संधी मिळत गेल्या. 

जगातले निरनिराळे धर्म या एकाच परमेश्वराकडे जाणाऱ्या वाटा आहेत यावर भर देऊन जगामधील लोकांनी सर्व धर्मांमधील चांगल्या गोष्टी घ्याव्यात असे त्यांनी बहुतेक वेळा सागितले.  ते सांगत असतांना हिंदू धर्मामध्ये सांगितलेले तत्वज्ञान ते मांडत राहिले. समारोपाच्या वेळी केलेल्या भाषणात त्यांनी सांगितले की इथे रोज आम्हाला ख्रिस्ती धर्माची महती वारंवार सांगितली जात आहे आणि त्या धर्माचा स्वीकार करण्याचा आग्रह केला जात आहे. युरोपअमेरिकेतल्या लोकांनी केलेल्या प्रचंड प्रगतीचे कारण त्यांचा धर्म आहे असेही सांगितले जात आहे. पण जगभरात, विशेषतः अमेरिकेत आलेल्या लोकांनी स्थानिक रहिवाशांच्या कत्तली केल्या, इस्लामचा प्रसारही तलवारीच्या जोरावर झाला, तसे काहीही हिंदू धर्मीयांनी कधीही केले नाही. आमचा धर्म हा प्रेमावर आधारलेला आहे. तुम्ही आमचा धर्म स्वीकारावा असेही मी सांगणार नाही, पण आमच्या धर्मातली मूल्ये घेऊन स्वतःचा विकास करावा अशी माझी सूचना आहे.   

त्या भाषणानंतरसुद्धा विवेकानंदांनी एकदम सगळे जग जिंकले असे काही झालेले दिसत नाही. अमेरिकेतही त्यांचे अनेक चाहते निर्माण झाले आणि त्यांना निरनिराळ्या शहरांमध्ये व्याख्याने देण्याच्या संधी मिळाल्या तसेच खर्च भागवण्यासाठी थोडी पैशापाण्याची व्यवस्था झाली. पण त्याचबरोबर असूयेपोटी त्यांचे काही शत्रूही निर्माण झाले आणि त्यांच्यावर गलिच्छ आरोप केले गेले. काही श्रीमंत युवति त्यांच्या रूपाकडे आकर्षित झाल्या होत्या आणि त्यांनी त्यांच्यावर भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला. पावन मनाच्या योगी वृत्तीच्या विवेकानंदांनी यातल्या कशाचे शिंतोडे आपल्या चारित्र्यावर उडू दिले नाहीत.  भारतातील जनता आणि हिंदू धर्म यांचे उत्थान करणे हे त्यांचे ध्येय ठरलेले होते. पण ते कार्य करण्यसाठी त्यांना आर्थिक सहाय्याची गरज होती आणि ते धनिक पाश्चात्यांकडून मिळेल असे वाटल्यामुळे आणखी तीन वर्षे अमेरिकेत व इंग्लंडमध्ये राहून आणि स्वतःचे एक जागतिक पातळीवर गुडविल निर्माण करून ते भारतात परत आले आणि आपल्या पूर्वनियोजित कामाला लागले.   

-----

मन आणि त्याची शक्ती

मी काल 'मन आणि त्याची शक्ती' या विषयावर एक यूट्यूबवरील भाषण ऐकले. https://www.youtube.com/watch?v=OJG46tW2VAE तो स्वामी विवेकानंदांनी सव्वाशे वर्षांपूर्वी परदेशात केलेल्या एका भाषणाचा मराठी अनुवाद होता म्हणे. मनामध्ये इतकी मोठी शक्ती असते की त्या शक्तीच्या जोरावर अनेक अद्भुत कामे केली जाऊ शकतात. योगसाधनेने ही शक्ती अमर्याद वाढवता येते.  कदाचित या कारणाने आपल्या पूर्वजांनी त्या दृष्टीने जास्त प्रयत्न करून अनेक सिद्धी प्राप्त केल्या आणि विज्ञानाकडे तितकेसे लक्ष दिले नसावे अशा रोखाने काही गोष्टी त्यात सांगितल्या आहेत. 

विवेकानंदांनी सव्वाशे वर्षांपूर्वी  केलेल्या भाषणात असे सांगितले होते की जगातल्या सगळ्या लोकांची (कदाचित सगळ्या जीवांची) मने (अदृष्य अशा धाग्यांनी) एकमेकांशी जोडलेली असतात आणि एका मनातले विचार, भावना, कल्पना वगैरे आपोआप दुसऱ्या मनाला परस्पर कळू शकतात. या जगात आज आपल्याला ठाऊक नसलेली काही अदृष्य अशी प्रसारमाध्यमे असू शकतात.

असे असले तरी भौतिक आणि रसायनशास्त्राचे आज ठाऊक असलेले नियमही मोडता येणे शक्य नाही यावर मात्र माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे गुरुत्वाकर्षणाला न जुमानता हवेत तरंगणे किंवा शून्यातून वस्तू निर्माण करणे अशा प्रकारच्या चमत्कारांवर मी विश्वास ठेऊ शकत नाही.  

. . . . . . . . . . . 

आत्मा आणि परमेश्वर

स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत जाऊन ठिकठिकाणी भाषणे दिली हे वाचल्यावर त्यांनी तिथल्या लोकांना काय सांगितले असेल याचे मला कुतुहल वाटत होते. तिकडे त्यांनी दिलेल्या काही भाषणांची हिंदी मराठी भाषांतरे आजकाल यू ट्यूबवर सहजपणे उपलब्ध आहेत. ती तासभर लांबीची असली तरी बिछान्यावर पडल्यापडल्या मोबाइल फोनवर ऐकता येण्याची सोय आहे. त्यामुळे मी हल्ली काही व्याख्याने ऐकली. लहानपणी आपले आईवडील, शिक्षक आणि साधुसंतांचे वाङमय यांच्या सांगण्यामुळे आपल्या मनात आत्मा, परमात्मा यांच्या काही संकल्पना रुतून बसलेल्या असतात, पण तशी काही पार्श्वभूमी नसलेल्या परदेशातल्या लोकांना त्यांच्याबद्दल सांगतांना विवेकानंदांनी ते केवळ तर्काच्या आधाराने समजाऊन सांगितले किंवा तसा प्रयत्न केला एवढे मला समजले.   

माणसाने कपडे बदलावेत तसे आत्मा शरीरे बदलत असतो ही गीतेतली संकल्पना सुप्रसिद्ध आहे, पण विवेकानंद म्हणाले की शरीर वेगळे आणि त्यात जाऊन बसलेला आत्मा वेगळा असे नसते. शरीर आणि आत्मा ही एकाच तत्वाची दोन रूपे आहेत. माणसाला त्याच्या ज्ञानेंद्रियामधून या विश्वाचे जेवढे आकलन होते त्यानुसारच त्याचे विश्व असू शकते, त्यामुळे आपला देव हासुद्धा एक असंख्यपटीने मोठा असा माणूस असतो आणि तोही माणसांप्रमाणे वागतो अथवा त्याने वागावे असे आपण समजून चालतो.  पण आपल्याला माहीत आहे की हे विश्व खूप विशाल आहे आणि आपल्याला ज्यांचे आकलनही होऊ शकत नाही अशा असंख्य गोष्टी (उदाहरणार्थ चुंबकीय लहरी) त्यात भरलेल्या असण्याची शक्यता आहे. मग तो देव कसा आहे?

परमेश्वराने या विश्वाची निर्मिती केली असे आपण समजतो याचा अर्थ परमेश्वर वेगळा आणि त्याने निर्माण केलेले जग वेगळे असा होतो. पण भारतीय ऋषीमुनींनी यावर सखोल विचार करून कुठल्याशा उपनिषदामध्ये असे सांगितले आहे की या दोन वेगळ्या गोष्टी नाहीतच. दृष्य व अदृष्य असे विश्व आणि परमेश्वर हे दोन्ही एकच आहेत. यालाच काही लोक अद्वैत म्हणतात. त्यामुळे आपल्याला बाहेर कुठे देव दिसणार नाहीच, पण अंतरात्म्याला त्याची ओळख पटू शकते. त्यासाठी माणसाने अंतर्मुख होऊन आत्मचिंतन करावे. एकदाका मी म्हणजेच देव आणि सगळे विश्व हे लक्षात आले की आपण कुणाशी वाईट वागणार नाही. 

विवेकानंदांनी हे विचार सव्वाशे वर्षांपूर्वी मांडले होते. सव्वाशे वर्षांपूर्वीच्या हिंदू धर्मपंडितांना तरी ते कितपत पटले होते माहीत नाही. कर्मकांड म्हणजेच धर्म असे समजले जात असतांना धर्माचा इतका खोल विचार कोण करत असेल?

***************************************

कृपया या स्थळालाही भेट द्या.    स्वामी विवेकानंद https://anandghare.wordpress.com/2021/09/22/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6/


Wednesday, August 04, 2021

महाभारतातला एक प्रसंग

 


माझी आई मला पुराणातल्या अनेक गोष्टी छान रंगवून सांगत असे. त्यातल्या काही गोष्टी मला अजून आठवतात. कधी कधी मीही त्या लक्ष देऊन ऐकत असावा. त्यातलीच ही एक गोष्ट, किंबहुना एक फक्त प्रसंग.  जेंव्हा कौरव आणि पांडव यांच्यामध्ये युद्ध होणारच असे निश्चित झाले तेंव्हा दोन्ही पक्षांनी देशातल्या इतर राजांना त्या युद्धात  आपल्या बाजूने उतरण्याचे आवाहन करायला सुरुवात केली. द्वारकेचा राजा श्रीकृष्ण याला आपल्या बाजूला वळवण्यासाठी कौरवांचा राजा दुर्योधन आणि पांडवांच्या बाजूने अर्जुन हे दोघेही एकाच दिवशी त्याच्या घरी जाऊन पोचले. त्यावेळी कृष्ण मंचकावर गाढ झोपला होता. तिथे दुर्योधन आधी जाऊन पोचला, पण कृष्णाला झोपेतून जागे केले तर कदाचित तो रागावेल आणि मग तो आपल्या बाजूला येणार नाही असा विचार करून तो कृष्णाच्या जागे होण्याची वाट पहात त्याच्या उशाशी बसून राहिला. थोड्या वेळाने अर्जुनही आला आणि तो मात्र कृष्णाच्या पायाजवळ बसला.

कृष्णाने डोळे उघडल्याबरोबर त्याला समोर बसलेला अर्जुन दिसला. त्याला पाहून उठून बसत कृष्णाने बोलायला सुरुवात केली, "अरे अर्जुना, तू केंव्हा आलास ?  घरी सगळे ठीक आहेत ना ?" वगैरे.
दुर्योधन एकदम उसळून बोलला, "हा तर आत्ता इथे आलाय्, मी केंव्हापासून इथे येऊन बसलो आहे. तुम्ही युद्धामध्ये आमच्या बाजूने लढावे अशी विनंति करायला मी आधी आलो आहे." 
अर्जुन म्हणाला, "मीसुद्धा त्याच कामासाठी इथे आलो आहे, तुम्ही आमच्याच बाजूला यावे अशी माझी विनंति आहे."
त्यावर कृष्ण म्हणाला, "तुम्ही दोघेही माझे अतिथि आहात, त्यामुळे मला तुम्हा दोघांचाही विचार करायला हवा. म्हणून मी असे करतो, मी एकाला माझी सर्व सेना देईन आणि दुसऱ्याकडे मी एकटा आणि तोही निःशस्त्र येईन. आता मी आधी अर्जुनाला पाहिले म्हणून यातले निवडायची पहिली संधी मी त्याला देतो."
दुर्योधनाने असा विचार केला की अर्जुनाने सेना मागितली तर कृष्णाकडचे सगळे रथ, हत्ती, घोडे, सैनिक आणि त्यांची सगळी शस्त्रास्त्रे त्याला मिळतील, मग मी या निःशस्त्र कृष्णाला घेऊन काय करू? पण अर्जुन म्हणाला, "हे कृष्णा, तू मला वेळोवेळी सहाय्य करून सगळ्या संकटांपासून वाचवले आहेस, तेंव्हा माझी अशी विनंति आहे की तू या युद्धाच्या प्रसंगीही माझ्यासोबतच रहावेस. पण तू निःशस्त्र असा युद्धभूमीवर येऊन काय करणार आहेस?"   
कृष्ण म्हणाला, "मी तुझा सारथी होऊन तिथे येईन आणि युद्धभूमीवर तुझा रथ चालवेन."
हे संभाषण ऐकून दुर्योधन खूष झाला. तो म्हणाला, "याचा अर्थ तुमची सगळी सेना माझ्या बाजूने युद्धात लढेल असेच ना?"
कृष्ण म्हणाला, "हो. मी तुला वचन देतो की माझी सगळी सेना तुझ्या गोटात येईल आणि तुझा सेनापति जी आज्ञा करेल ती मानेल."
कृष्णाने अशा प्रकारे अर्जुन आणि दुर्योधन या दोघांचेही समाधान केले.

अशी ही गोष्ट. यात दुर्योधन आणि अर्जुन तेंव्हा कुठेकुठे रहात होते ? आणि ते दोघे कुठल्या वाहनांमध्ये बसून कृष्णाकडे एका वेळीच कसे जाऊन पोचले असतील ?  त्यांना थेट कृष्णाच्या शयनकक्षात कसे जाऊ दिले असेल ? असले प्रश्न मला लहानपणी पडलेच नाहीत कारण आमचे घर, शाळा आणि आजूबाजूच्या तीन चार गल्ल्या एवढेच विश्व मी तोपर्यंत पाहिले होते. त्याप्रमाणे हे लोकसुद्धा असे जवळपासच रहात असणार आणि बेधडक कृष्णाच्या झोपायच्या खोलीपर्यंत जाऊन पोचले असणार ! मोठा झाल्यावर मला समजले की पुराणातल्या गोष्टींवर असले फालतू प्रश्न विचारायचेच नसतात.     

पण तरीही एक गोष्ट मला समजत नव्हती. दुर्योधन किती दुष्ट कपटी आहे हे कृष्णाला माहीत होतेच, मग त्याने त्याला सरळ सरळ नकार का दिला नसेल ? उलट त्याला युद्धात मदत का केली असेल ? "ही सगळी देवाची अगाध लीला आहे आणि त्याने ती तशी का केली हे आपल्या समजण्याच्या पलीकडले आहे." असे ठराविक उत्तर देऊन भक्त लोक तो विषय संपवून टाकतात. पण व्यासमहर्षींनीच महाभारताची कथा सांगत असतांना अनेक ठिकाणी काही ना काही कार्यकारणभाव दाखवला आहे, स्पष्टीकरण दिले आहे. 

महाभारतामध्ये या प्रसंगावरच एक असा श्लोक आहे. 
प्रवारणं तु बालानां पूर्वं कार्यमिति श्रुतिः।
तस्मात् प्रवारणं पूर्वमर्हः पार्थो धनंजयः ॥
याचा अर्थ असा आहे. लहानांचे समाधान आधी करावे असे सांगितले आणि ऐकले जाते. म्हणून मी आधी अर्जुनाला काय पाहिजे ते ऐकणार आहे. असे श्रीकृष्णाने दुर्योधनाला सांगितले. या श्लोकात दिलेले हे कारण मी वर दिलेल्या कारणापेक्षा वेगळे आहे. अर्जुनाच्या आयुष्यात त्यापूर्वी येऊन गेलेल्या सगळ्या प्रसंगांची यादी आणि त्यांचा कालावधी पाहता त्याचे वय या वेळी ऐंशीच्या घरात असावे असे मी नुकतेच कुठे तरी वाचले. दुर्योधन त्याच्यापेक्षाही मोठा होता म्हणून अर्जुन या 'लहान' बाळाला कृष्णाने आधी मागायची संधी दिली. पण दुर्योधनाला कसलीही मदतच का केली? या बाबतीत व्यासांनी काय लिहिले आहे हे समजून घेण्याची मला अजूनही उत्सुकता आहे.

मी हा प्रश्न काही मित्रांना विचारला, त्यांनी निरनिराळी कारणे दिली. कुणाला वाटले की आपण पक्षपात करत नाही असे कृष्णाला दाखवायचे होते, कुणी म्हंटले की पांडवांचा पक्ष कमजोर असूनसुद्धा ते जिंकले तरच धर्माचा विजय होतो (यतो धर्मस्ततो जयः) असे सिद्ध होणार होते. पांडवांचीच बाजू बलवान असती तर तो "बळी तो कानपिळी"चा प्रकार झाला असता. कुणी म्हणाला 'शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ' हे दाखवायचे होते म्हणून कृष्णाने "न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तिच्या चार" असा पवित्रा घेतला. काही झाले तरी "यत्र योगेश्वरः कृष्णः यत्र पार्थो धनंजयः। तत्र श्रीर्विजयो भूति धृवा नीतिर्मती मम।।" हे तर होणारच होते असे गीतेत सांगितले आहे. थोडक्यात म्हणजे कृष्णाने काही वावगे केले नाही असेच सर्वांचे विचार होते किंवा तसे सगळ्यांना सांगायचे होते. 

यावर 'कोरा'वर झालेली एक चर्चा वाचली. त्यात एकाने कौरव व पांडव यांच्या सेना तुल्यबळ व्हाव्यात म्हणून कृष्णाने असे केले असे उत्तर दिले, पण ते बरोबर नव्हते कारण पांडवांकडे फक्त सात अक्षौहिणी सेना होती तर कौरवांकडे अकरा अक्षौहिणी सेना होती, यातली किती सेना कृष्णाची होती कोण जाणे. कुणी असे सांगितले की द्वापार युग संपायच्या आधी सगळ्या यादवांचा नाश तर व्हायचाच होता, तो या युद्धात अर्जुन करू शकेल असे कृष्णाला वाटले. आणखी कुणी असेही म्हणाला की कृष्णाच्या सेनेतले यादव फार माजले होते आणि त्यांना शिक्षा व्हायला हवी होती, एकाने तर असेही लिहिले की त्या सैनिकांनाही दुर्योधनच आवडत होता. 

महर्षी व्यासांनी महाभारताची इतकी प्रचंड गुंतागुंतीची कथा मांडतांना त्यात काही धक्कादायक प्रसंग आणि अगम्य प्रश्न ठेवले आहेत एवढे मात्र नक्की.    


Wednesday, July 28, 2021

जुन्या काळातले वाडे

 

माझे लहानपण जमखंडी नावाच्या गावातल्या 'घारेवाड्या'मध्ये गेले. माझे शाळेतले मित्र, गावातले नातलग आणि इतर बहुतेक सगळी ओळखीची मंडळी आपापल्या लहान मोठ्या वाड्यांमध्येच रहात होती. आमच्या पत्त्याच्या वहीमधल्या सगळ्या पत्त्यांमध्ये नातेवाईकाच्या नावानंतर 'अमूक तमूक वाडा' अशीच दुसरी ओळ असायची. त्या काळात मुंबई सोडून बहुतेक सगळीकडे 'वाडा संस्कृति' होती. मुंबईत मात्र 'चाळ संस्कृति' होती.

श्रीमंत लोकांच्या वाड्यांमध्ये गेल्यावर आधी समोर आंगण असायचे, त्यात फुलझाडे आणि वेली, तुळस वगैरे लहान झाडे लावलेली असत. त्याच्या एका बाजूला गुरांसाठी गोठा असे. पुढे गेल्यावर ओसरी किंवा पडवी, मग सोपा आणि आतमध्ये माजघर, देवघर, स्वयंपाकघर, कोठारे वगैरे अनेक खोल्या असायच्या. घरात राहणारे लोक आणि भेटायला येणारे आप्तेष्ट, मित्र आणि सन्माननीय पाहुणे एवढे लोकच पायऱ्या चढून सोप्यावर येत असत, इतर सगळ्या लोकांनी फक्त पडवीपर्यंतच यायचे आणि घरातल्या लोकांनी तिथे येऊन त्यांच्याशी बोलायचे असा पद्धत त्या काळी होती. काही वाड्यांमधले न्हाणीघर मागच्या बाजूला असे. त्याच्या पलीकडे मागची पडवी आणि तिच्या पलीकडे 'परस' नावाची मोठी बाग असायची, त्यात पालेभाज्या, फळभाज्या वगैरे पिकवत असत आणि फळांची झाडे लावलेली असत.  न्हाणीघर आणि मोऱ्यांमधले सांडपाणी वहात जाऊन त्यातून या झाडांचे सिंचन करण्याची सोय केलेली असे. काही जास्त मोठ्या 'चौसोपी' वाड्यांमध्ये दरवाजातून आत गेल्यानंतर मधोमध एक चौक ठेऊन त्याच्या चारी बाजूंना सोपे बांधलेले असत. सरदार, जहागिरदार वगेरेंच्या जंगी वाड्यांमध्ये दिवाणखाना, जामदारखाना, खलबतखाना, मुदपाकखाना, हमामखाना असली निरनिराळी दालने असत.

माझ्या आजोबांनी सावळगी नावाच्या खेड्यात बांधलेल्या वाड्यात समोरच्या बाजूला आंगण, गोठा आणि पडवी होती. आंगणात एक लहानशी विहीरही होती. आत गेल्यावर फक्त सोपा, माजघर आणि स्वैपाकघर होते. आमच्या जमखंडीच्या घरात नळाने पाणी येत असल्यामुळे विहीर नव्हती आणि गावाजवळ शेत नसल्यामुळे गुरांचा गोठाही नव्हता. आमचे ते प्रशस्त घर दोन हजार चौरस फुटांपेक्षाही मोठे होते, पण बीएचकेच्या हिशोबात ते शून्य बीएचके होते कारण त्या घरात बेडरूम या नावाची एकही खोली नव्हती.  आम्ही सगळे जण कधी सोप्यात तर कधी माडीवर किंवा गच्चीवर जमीनीवरच अंथरूण पसरून त्यावर झोपत होतो. चांगला लांबरुंद पाच खणी सोपा हा त्या घराचा मुख्य भाग होता. तिथल्या भिंतीवर ओळीने पंधरावीस फ्रेम केलेल्या तसबिरी खिळ्यांना टांगल्या होत्या. मधोमध एक लाकडी झोपाळा होता तो आढ्याला लोखंडी कड्यांच्या साखळीने टांगला होता. गरज पडली तर तो पाच मिनिटात काढून ठेवला जात असे आणि सोप्यात पंधरावीस पाट मांडून जेवणाची पंगत घातली जात असे. आम्ही मुले कधी झोपाळ्यावर नाहीतर जिन्याच्या पायरीवर बसत होतो, पण बहुतेक वेळा जमीनीवरच एकादे तरटाचे बसकूर पसरून त्यावर फतकल मारून बसत होतो.  जास्त लोकांना बसण्यासाठी जमीनीवर चटई, सतरंजी किंवा जाजम अंथरले जात असे. ते मळू नयेत म्हणून त्यांच्या खाली एक काथ्याचे मॅटिंग घातले जायचे.

सोप्यापेक्षाही मोठे आतले स्वैपाकघर होते. सोप्यामधून तिथे जाण्यासाठी दोन दरवाजे होते. डाव्या बाजूच्या दाराने आत गेल्यावर लगेच एक मोठे उघडे कपाट होते. त्यातल्या देव्हाऱ्यात सगळे देव मांडून ठेवलेले असत. बाजूच्या भिंतीवरल्या खुंटीला एक मुटका (सोवळे) टांगून ठेवलेला असे. आंघोळ झाल्यावर तो मुटका नेसून पाटावर बसायचे, देवांना ताम्हनात घ्यायचे, त्यांना स्नान घालून पुसून देव्हाऱ्यात ठेवायचे आणि पूजा करायची.  कधीकधी देवासमोर पाटावर बसून कोणी तरी एकादी पोथी वाचत असे आणि बाजूला दोन तीन पाट मांडून ती ऐकणारे बसतील एवढी मोकळी जागा तिथे होती. त्याच्या पलीकडे भिंतीत केलेल्या पोकळीत तीन चार चुली मांडल्या होत्या. त्यांच्यावर असलेल्या उंचच्या उंच धुराड्यातून सगळा धूर थेट छप्पराच्या बाहेर सोडला जाई. भिंतींमध्ये अनेक कप्प्यांची कपाटे आणि कोनाडे होते. त्यात स्वयंपाकाला लागणारे पदार्थ आणि भांडीकुंडी ठेवली जात असत. भिंतीला लागूनच दोन तीन मोठे तांब्याचे हंडे आणि घागरींमध्ये पिण्याचे पाणी भरून ठेवलेले असे. दिवसातून फक्त एकदाच आणि थोडा वेळच नळाला पाणी येत असल्यामुळे ते भरून आणि साठवून ठेवावे लागत असे आणि संपून जाऊ नये म्हणून जपूनच वापरावे लागत असे.  

दुसऱ्या दारातून आत जाताच एका बाजूला लहानशी मोरी होती आणि त्यात पिण्याच्या पाण्याचा नळ होता. रोज नळाला पाणी आले की लगेच तिथे कळशी आणि बिंदगीमध्ये पाणी भरून ते हंड्यामध्ये ओतायचे काम असायचे. दुसऱ्या बाजूला मोठमोठ्या रॅक्समध्ये पत्र्याच्या मोठमोठ्या चौकोनी डब्यांमध्ये धान्ये भरून ठेवलेली असत. त्या काळात सगळ्या धान्यांची वर्षभराची साठवण करून ठेवली जात असे. एका कोपऱ्यात एक भक्कम कोठी होती. महत्वाचे दस्तऐवज आणि चांदीची भांडी वगैरे तिच्यात सुरक्षितपणे ठेवले जात असत. जमीनीतच एक मोठे दगडाचे उखळ बसवून ठेवले होते, तसेच एक पाटा वरवंटा आणि जातेही होते. कुटणे, कांडणे, ठेचणे, वाटणे वगैरे कामे हा रोजच्या स्वयंपाकाचा भाग होता आणि त्यासाठी कसलेही यंत्र नव्हते. स्वयंपाकघरात या सगळ्या वस्तू मांडून ठेऊनसुद्धा एका वेळी सातआठ माणसे पाट मांडून जेवायला बसू शकतील एवढी मोकळी जागा तिथे होती.    

सोप्यामध्ये समोरच्या बाजूला लहान लहान चौकोनी दगडी चौथऱ्यांवर चौकोनी लाकडाचे खांब उभे केले होते. दुसऱ्या बाजूचे खांब भिंतीतच गाडलेले होते. त्या खांबांवर मोठ्या आडव्या तुळया ठेवलेल्या होत्या. त्याच्यावर बांबूचे जंते आणि त्यांच्यावर वेळूच्या चिवाट्या अगदी जवळजवळ एकमेकींना चिकटून रांगेने मांडून त्यावर विटा मांडून मातीचा पातळसा थर पसरवला होता. वर माडी असल्यामुळे तिथे पावसाचे पाणी यायची भीती नव्हती. इतर भागांच्या तुळया, जंते आणि चिवाट्यांवर मातीचा जाड थर देऊन धाब्याचे छत तयार केले होते. त्याच्यावर सिमेंटचा थर घालून वॉटरप्रूफ गच्ची बांधली होती. तिला पुरेसा उतार दिला असल्यामुळे सगळे पाणी एका कोपऱ्यात गोळा होऊन पन्हळीतून खाली पडत असे.    

जेवढा मोठा सोपा होता तेवढीच मोठी माडी त्यावर होती. माडीवर जायचा लाकडी जिना दोन भागात होता. सातआठ पायऱ्या चढून गेल्यावर एक प्रशस्त असा मधला अट्टा होता. तिथून उलट दिशेने आणखी सातआठ पायऱ्या चढून गेल्यावर ऐसपैस माडी होती. तिच्या दुसऱ्या टोकाला एका लोखंडी पट्ट्यांच्या पलंगावर घरातल्या सगळ्या गाद्या, सतरंज्या, चादरी, कांबळी आणि पांघरुणे रचून ठेवलेली असायची. त्याच्या बाजूला एक लाकडी टेबल आणि लोखंडाच्या खुर्च्या होत्या. त्यावर बसून आम्ही लेखन वाचन वगैरे अभ्यास करत होतो. तिथूनच गच्चीला जायचा दरवाजा होता. सोपा सोडून उरलेल्या भागावर सिमेंटची गच्ची होती, तिला तीन बाजूंनी उंच कुंभ्या होत्या. त्यातल्या एका कुंभीवर आणि गच्चीवर पंधरावीस कुंड्या ठेवल्या होत्या. त्यांमध्ये गुलाब, मोगरा यासारखी फुलझाडे आणि तुळस, ओवा, कोरफड यासारख्या औषधी वनस्पती लावल्या होत्या.  ते आमचे 'टेरेस गार्डन' होते. रोज दोन बादल्या पाणी दोन जिने चढून वर नेऊन त्या झाडांना घालायचे हे एक आम्हा मुलांचे काम असायचे.  माडीच्या डोक्यावर कॉरुगेटेड जी आय शीट पत्र्यांचे तिरपे छप्पर होते. त्यावर पडणाऱ्या पावसाचा खूप जोराचा आवाज होत असे. पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी एक अर्धगोलाकार पन्हळ होती आणि तिला एक मोठा पाइप जोडून ते पाणी खाली सोडले जात होते.

स्वयंपाकघराच्या काही भागावरसुद्धा एक माडी होती. पण तिथे पुरेसा उजेड आणि वारा येत नसल्यामुळे तिचा उपयोग अडगळीचे सामान ठेवण्यासाठीच होत होता. घराच्या मुख्य मोठ्या दरवाजातून आत येताच उजव्या बाजूला एक खोली होती. तिचा उपयोग मुख्यतः बाहेरच्या लोकांसाठी किंवा पाहुण्यांसाठीच केला जात असे. डाव्या बाजूला 'नळाची मोरी ' होती. तिथे एक मोठा नळ होता आणि वापरायचे बरेचसे पाणी तिथून भरले जात असे. मोरीच्या बाजूला न्हाणीघर होते. त्यात एक तांब्याचा बंब होता, तसेच एका मोठ्या चुलखंडावर एक अगडबंब आकाराचा पाणी तापवण्याचा हंडा ठेवला होता. तो धुराने इतका काळा झाला होता की मुळात कुठल्या धातूचा आहे ते दिसतच नव्हते. जवळच एका खोल अट्ट्यावर जळाऊ लाकडे ठेवलेली असत. आंघोळीसाठी आम्ही पितळेच्या बारड्यांमध्ये (बादलीला तिथे बारडी म्हणत असत.) ऊन पाणी काढून घेत होतो आणि पितळेच्या तांब्यानेच ते अंगावर घेत होतो.

न्हाणीघराला लागूनच एक दगडी हौद होता. तो पाण्याने भरून ठेवला जात असे. मोठ्या दरवाजातून आत आल्यावर तिथेच पायातल्या चपला काढून ठेवायच्या, तांब्याने हौदातले पाणी घेऊन पाय धुवायचे, ते पायपुसण्यावर पुसून नंतर एक पायरी चढून सोप्यात यायचे असे नियम होता. हौदाच्या बाजूला एक भलामोठा कपडे धुवायचा दगड होता. त्यावर आपटून आणि घासून आमचे कपडे धुतले जात असत. त्या सगळ्या भागातल्या जमीनीवर फरश्या बसवलेल्या होत्या. तिथल्या भिंतीच्या कडेने आणि जिन्याखाली लाकडे, कोळसे, गोवऱ्या, भुसा, रद्दी, केराची टोपली वगैरे गोष्टी ठेवल्या जात असत. घराच्या बाहेरच्या बाजूला पायखाना होता. तिथे जाण्यासाठी मोठ्या दरवाजातून बाहेर जावे लागत असे आणि जातांना टमरेलात पाणी घेऊन जावे लागत असे.  परत आल्यावर पाय धुण्यासाठी तांब्याभर पाणी आधीच काढून ठेवायचे, त्याने पाय स्वच्छ धुवूनच घरात प्रवेश करायचा असा नियम होता.  

आमच्या घरातल्या दगडमातीच्या सगळ्याच भिंती दोनतीन फूट जाडीच्या होत्या आणि त्यात ठिकठिकाणी कोनाडे आणि कपाटे केलेली होती. घरातल्या सगळ्या वस्तू  त्यातच ठेवलेल्या असायच्या. त्याशिवाय फक्त स्वयंपाकघरामध्ये दूधदुभते ठेवण्यासाठी एक जाळीचे फडताळे होते. मांजरांपासून रक्षण करण्यासाठी त्याची गरज होती आणि माडीवर पुस्तके ठेवण्यासाठी एक शेल्फ होते. घरात ठिकठिकाणी भिंतींध्ये मोठ्या लाकडी खुंट्या ठोकलेल्या होत्या आणि त्यांना छत्र्या, टोप्या किंवा पिशव्या टांगून ठेवलेल्या असत.

मुंबईपुण्यातल्या एक/ दोन/ तीन बीएचके सेल्फकंटेन्ड फ्लॅटमध्ये वाढलेल्या मुलांनी अशी घरेच पाहिली नसतील तर या लेखात दिलेल्या तिथल्या जागा आणि वस्तूंची नावे तरी त्यांना कशी माहीत असणार? माझ्या लहानपणी आमच्या रोजच्या बोलण्यात येणारे हे शब्द आता माझ्याही बोलण्यात कधी येतच नाहीत. त्यामुळे नव्या पिठीतल्या मुलांना हा लेख तरी किती समजणार आहे हा ही एक प्रश्न आहे.