Wednesday, September 22, 2021

स्वामी विवेकानंदांची अमेरिकेतली भाषणे

 

स्वामी विवेकानंदांची अमेरिकेतली भाषणे


स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत जाऊन कुठल्या तरी ठिकाणी एक भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात "माझ्या अमेरिकेतील बंधूभगिनींनो " अशी करून एकदम सगळ्या जगाचे मन जिंकून घेतले असे मी शाळेत असतांनापासून ऐकत आलो आहे. लहानपणी मलाही त्याचे खूप कौतुक वाटले होते, पण समज यायला लागल्यानंतर त्याबद्दल माझ्या मनात अनेक प्रश्न यायला लागले होते.  पण त्याची उत्तरे मिळत नव्हती. उदाहरणार्थ १८९३साली वृत्तपत्रे सोडून इतर कुठलीही प्रसारमाध्यमे नव्हती, विमानेही नव्हती आणि साक्षरता फार कमी होती त्यामुळे वर्तमानपत्रांचा प्रसारही मर्यादितच असणार. मग या भाषणाला प्रसिद्धी तरी कशी मिळाली असेल? या वर्षी मला ते भाषण वाचायला मिळाले तरी त्यातही एवढे खास काय होते ते समजले नाही. आज मला या विषयावरील प्रा.शिवाजीराव भोसले यांचा एक अप्रतिम व्हीडिओ यू ट्यूबवर ऐकायला मिळाला. त्यात मात्र खूप नव्या गोष्टी समजल्या.  

स्वामी विवेकानंदांना अमेरिकेतल्या लोकांनी कुठल्याशा मोठ्या जागतिक परिषदेला येण्यासाठी सन्मानाने आमंत्रण दिले, त्यांची जाण्यायेण्याची सगळी व्यवस्था करून त्यांचे खूप थाटात स्वागत केले, ते एकाद्या सम्राटासारखे ऐटीत तिथे गेले, बोलले आणि जिंकले असे काही झाले असले तर ते कशामुळे झाले असेल? भारतासारख्या पारतंत्रातल्या देशातल्या एका युवकाला अमेरिकेत कुणी कसे ओळखत असेल आणि त्याची निवड कशी झाली असेल? याचेच मला मुख्य गूढ वाटत होते. आज समजले की तसे काहीही झालेच नव्हते. मुळात ज्या धर्मपरिषदेला ते गेले होते तोच कुठला मुख्य कार्यक्रम नव्हता. कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावला या घटनेचा चारशे वर्षे झाली या घटनेच्या निमित्याने शिकागो इथे एक जंगी जत्रा भरवण्याचे ठरवले गेले आणि अमेरिकेने केलेल्या सर्वांगीण प्रगतीचे प्रदर्शन मांडून सगळ्या जगाचे अमेरिकेकडे लक्ष वेधण्याचा बेत होता. त्याचा भाग म्हणून तिथे वीस परिषदा भरवण्यात आल्या होत्या. त्यातच एक धर्मपरिषद भरवायची आणि जगभरातल्या लोकांमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार करायचा असे ठरवले गेले होते. जगामधील इतर धर्मांच्या लोकांनीही त्यात भाग घ्यावा आणि ख्रिस्ती धर्माची महती ऐकून व तो धर्म स्वीकारून आपापल्या देशांमध्ये त्याचा प्रसार करावा या हेतूने त्याला 'जागतिक धर्मपरिषद' असे नुसते नाव दिले होते.  

त्यावेळी स्वामी विवेकानंदांचे भारतभ्रमण चालले होते. सद्गुरु रामकृष्ण परमहंसांच्या आज्ञेवरून त्यांनी ते सुरू केले होते. देशभरातल्या निरनिराळ्या ठिकाणी जाऊन तिथे काही दिवस मुक्काम ठोकायचा आणि तिथले जनजीवन जवळून पहायचे त्यांनी ठरवले होते. ते करत असतांना ते देशामधील जनतेची तसेच हिंदू धर्माची दैन्यावस्था पहात होते. त्यांच्यामध्ये नवीन चैतन्य आणण्याची गरज आहे हे त्यांनी जाणले आणि हे काम आपणच करायचा निश्चय केला. या काळातच अमेरिकेतल्या या धर्मपरिषदेची बातमी त्यांना कळली, पण संन्याशाचे जीवन जगत असलेल्या विवेकानंदांना त्या बातमीचा काहीच उपयोग नव्हता आणि त्यांची तिथे जायची इच्छाही नव्हती. ते देशाचे भ्रमण करत असतांना ठिकठिकाणी भाषणे देत, धर्मावर तसेच इतर महत्वाच्या विषयांवर विद्वानांशी चर्चा करत यातून त्यांचे अनेक चाहते तयार झाले होते. या परिषदेत भाग घेण्यासाठी जो कोणी माणूस जाईल त्याचे इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व असायला हवे तसेच त्याचा धर्मशास्त्राचा दांडगा अभ्यासही हवा. त्या काळात हे दोन्ही गुण असणारे लोक फारच दुर्मिळ होते, त्यात विवेकानंद हे होते. त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे मन वळवले, काही राजेमहाराजे यांच्याकडून देणग्या किंवा वर्गणी गोळा करून त्यांच्या अमेरिकेच्या प्रवासाला लागणाऱ्या खर्चाची व्यवस्था केली आणि त्यांना बोटीत बसवून पाठवून दिले. 

ते कसेबसे शिकागोला जाऊन पोचले, पण तिथले आयोजक त्यांना त्या धर्मपरिषदेत भाग घेऊ द्यायलाच तयार नव्हते. "तुम्ही कोण? कुठले? तुम्हाला इथे कुणी पाठवले? भारताचे किंवा हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करायचा तुम्हाला कोणता अधिकार आहे?" असल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला त्यांच्याकडे कसलीही कागदपत्रे नव्हती. त्यांनी आधीपासून त्यासाठी काही तयारीही केली नव्हती. ते भारतात असतांनाही कुठले पीठाधीश वगैरे नव्हतेच. गावोगाव आणि रानोमाळ भटकत फिरणारे आणि कुठलीही खास ओळख नसलेले संन्यासी होते. त्या काळातल्या संन्याशांना भारतात कुठेही धर्मशाळा  किंवा देवळांमध्ये कसेतरी राहता येणे शक्य असे आणि स्थानिक लोक त्याच्या जेवणाखाण्याची सोय करत. पण अमेरिकेसारख्या परमुलुखात ते तर शक्य नव्हतेच आणि मायदेशी परत येण्यासाठीसुद्धा त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते.   

पण आपल्याला या कामगिरीवर पाठवण्यात देवाची काही योजना आहे आणि ती पार पाडायची शक्तीही तो देईल यावर त्यांचा मनोमन विश्वास होता. त्यांच्याकडे कुशाग्र बुद्धिमत्ता, प्रभावी व्यक्तीमत्व, आत्मविश्वास आणि अथांग विद्वत्ता हे दुर्मिळ गुण होतेच. त्यांना अमेरिकेतही काही विद्वान, गुणग्राहक आणि परोपकारी असे लोक भेटले आणि त्यांनी प्रयत्न करून विवेकानंदांना धर्मपरिषदेत प्रवेश मिळवून दिला. त्यांना अशा मोठ्या संमेलनाचा पूर्वानुभव नव्हताच आणि आपण नेमके काय बोलायचे याची त्यांनी जास्त पूर्वतयारीही केलेली नव्हती. आधी बोललेल्या वक्त्यांची भाषणे ऐकता ऐकताच त्यांनी आपले मुद्दे ठरवले आणि उत्स्फूर्तपणे ठासून मांडले. परिषदेच्या उद्घाटन समारंभात झालेले त्यांचे ते पहिले भाषण जेमतेम पाच मिनिटांचे होते, पण त्यात त्यांनी आपली छाप पाडली. ते संमेलन पंधरा वीस दिवस चालले होते त्यात त्यांना आणखी तीन चार वेळा सविस्तरपणे बोलायच्या संधी मिळत गेल्या. 

जगातले निरनिराळे धर्म या एकाच परमेश्वराकडे जाणाऱ्या वाटा आहेत यावर भर देऊन जगामधील लोकांनी सर्व धर्मांमधील चांगल्या गोष्टी घ्याव्यात असे त्यांनी बहुतेक वेळा सागितले.  ते सांगत असतांना हिंदू धर्मामध्ये सांगितलेले तत्वज्ञान ते मांडत राहिले. समारोपाच्या वेळी केलेल्या भाषणात त्यांनी सांगितले की इथे रोज आम्हाला ख्रिस्ती धर्माची महती वारंवार सांगितली जात आहे आणि त्या धर्माचा स्वीकार करण्याचा आग्रह केला जात आहे. युरोपअमेरिकेतल्या लोकांनी केलेल्या प्रचंड प्रगतीचे कारण त्यांचा धर्म आहे असेही सांगितले जात आहे. पण जगभरात, विशेषतः अमेरिकेत आलेल्या लोकांनी स्थानिक रहिवाशांच्या कत्तली केल्या, इस्लामचा प्रसारही तलवारीच्या जोरावर झाला, तसे काहीही हिंदू धर्मीयांनी कधीही केले नाही. आमचा धर्म हा प्रेमावर आधारलेला आहे. तुम्ही आमचा धर्म स्वीकारावा असेही मी सांगणार नाही, पण आमच्या धर्मातली मूल्ये घेऊन स्वतःचा विकास करावा अशी माझी सूचना आहे.   

त्या भाषणानंतरसुद्धा विवेकानंदांनी एकदम सगळे जग जिंकले असे काही झालेले दिसत नाही. अमेरिकेतही त्यांचे अनेक चाहते निर्माण झाले आणि त्यांना निरनिराळ्या शहरांमध्ये व्याख्याने देण्याच्या संधी मिळाल्या तसेच खर्च भागवण्यासाठी थोडी पैशापाण्याची व्यवस्था झाली. पण त्याचबरोबर असूयेपोटी त्यांचे काही शत्रूही निर्माण झाले आणि त्यांच्यावर गलिच्छ आरोप केले गेले. काही श्रीमंत युवति त्यांच्या रूपाकडे आकर्षित झाल्या होत्या आणि त्यांनी त्यांच्यावर भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला. पावन मनाच्या योगी वृत्तीच्या विवेकानंदांनी यातल्या कशाचे शिंतोडे आपल्या चारित्र्यावर उडू दिले नाहीत.  भारतातील जनता आणि हिंदू धर्म यांचे उत्थान करणे हे त्यांचे ध्येय ठरलेले होते. पण ते कार्य करण्यसाठी त्यांना आर्थिक सहाय्याची गरज होती आणि ते धनिक पाश्चात्यांकडून मिळेल असे वाटल्यामुळे आणखी तीन वर्षे अमेरिकेत व इंग्लंडमध्ये राहून आणि स्वतःचे एक जागतिक पातळीवर गुडविल निर्माण करून ते भारतात परत आले आणि आपल्या पूर्वनियोजित कामाला लागले.   

-----

मन आणि त्याची शक्ती

मी काल 'मन आणि त्याची शक्ती' या विषयावर एक यूट्यूबवरील भाषण ऐकले. https://www.youtube.com/watch?v=OJG46tW2VAE तो स्वामी विवेकानंदांनी सव्वाशे वर्षांपूर्वी परदेशात केलेल्या एका भाषणाचा मराठी अनुवाद होता म्हणे. मनामध्ये इतकी मोठी शक्ती असते की त्या शक्तीच्या जोरावर अनेक अद्भुत कामे केली जाऊ शकतात. योगसाधनेने ही शक्ती अमर्याद वाढवता येते.  कदाचित या कारणाने आपल्या पूर्वजांनी त्या दृष्टीने जास्त प्रयत्न करून अनेक सिद्धी प्राप्त केल्या आणि विज्ञानाकडे तितकेसे लक्ष दिले नसावे अशा रोखाने काही गोष्टी त्यात सांगितल्या आहेत. 

विवेकानंदांनी सव्वाशे वर्षांपूर्वी  केलेल्या भाषणात असे सांगितले होते की जगातल्या सगळ्या लोकांची (कदाचित सगळ्या जीवांची) मने (अदृष्य अशा धाग्यांनी) एकमेकांशी जोडलेली असतात आणि एका मनातले विचार, भावना, कल्पना वगैरे आपोआप दुसऱ्या मनाला परस्पर कळू शकतात. या जगात आज आपल्याला ठाऊक नसलेली काही अदृष्य अशी प्रसारमाध्यमे असू शकतात.

असे असले तरी भौतिक आणि रसायनशास्त्राचे आज ठाऊक असलेले नियमही मोडता येणे शक्य नाही यावर मात्र माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे गुरुत्वाकर्षणाला न जुमानता हवेत तरंगणे किंवा शून्यातून वस्तू निर्माण करणे अशा प्रकारच्या चमत्कारांवर मी विश्वास ठेऊ शकत नाही.  

. . . . . . . . . . . 

आत्मा आणि परमेश्वर

स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत जाऊन ठिकठिकाणी भाषणे दिली हे वाचल्यावर त्यांनी तिथल्या लोकांना काय सांगितले असेल याचे मला कुतुहल वाटत होते. तिकडे त्यांनी दिलेल्या काही भाषणांची हिंदी मराठी भाषांतरे आजकाल यू ट्यूबवर सहजपणे उपलब्ध आहेत. ती तासभर लांबीची असली तरी बिछान्यावर पडल्यापडल्या मोबाइल फोनवर ऐकता येण्याची सोय आहे. त्यामुळे मी हल्ली काही व्याख्याने ऐकली. लहानपणी आपले आईवडील, शिक्षक आणि साधुसंतांचे वाङमय यांच्या सांगण्यामुळे आपल्या मनात आत्मा, परमात्मा यांच्या काही संकल्पना रुतून बसलेल्या असतात, पण तशी काही पार्श्वभूमी नसलेल्या परदेशातल्या लोकांना त्यांच्याबद्दल सांगतांना विवेकानंदांनी ते केवळ तर्काच्या आधाराने समजाऊन सांगितले किंवा तसा प्रयत्न केला एवढे मला समजले.   

माणसाने कपडे बदलावेत तसे आत्मा शरीरे बदलत असतो ही गीतेतली संकल्पना सुप्रसिद्ध आहे, पण विवेकानंद म्हणाले की शरीर वेगळे आणि त्यात जाऊन बसलेला आत्मा वेगळा असे नसते. शरीर आणि आत्मा ही एकाच तत्वाची दोन रूपे आहेत. माणसाला त्याच्या ज्ञानेंद्रियामधून या विश्वाचे जेवढे आकलन होते त्यानुसारच त्याचे विश्व असू शकते, त्यामुळे आपला देव हासुद्धा एक असंख्यपटीने मोठा असा माणूस असतो आणि तोही माणसांप्रमाणे वागतो अथवा त्याने वागावे असे आपण समजून चालतो.  पण आपल्याला माहीत आहे की हे विश्व खूप विशाल आहे आणि आपल्याला ज्यांचे आकलनही होऊ शकत नाही अशा असंख्य गोष्टी (उदाहरणार्थ चुंबकीय लहरी) त्यात भरलेल्या असण्याची शक्यता आहे. मग तो देव कसा आहे?

परमेश्वराने या विश्वाची निर्मिती केली असे आपण समजतो याचा अर्थ परमेश्वर वेगळा आणि त्याने निर्माण केलेले जग वेगळे असा होतो. पण भारतीय ऋषीमुनींनी यावर सखोल विचार करून कुठल्याशा उपनिषदामध्ये असे सांगितले आहे की या दोन वेगळ्या गोष्टी नाहीतच. दृष्य व अदृष्य असे विश्व आणि परमेश्वर हे दोन्ही एकच आहेत. यालाच काही लोक अद्वैत म्हणतात. त्यामुळे आपल्याला बाहेर कुठे देव दिसणार नाहीच, पण अंतरात्म्याला त्याची ओळख पटू शकते. त्यासाठी माणसाने अंतर्मुख होऊन आत्मचिंतन करावे. एकदाका मी म्हणजेच देव आणि सगळे विश्व हे लक्षात आले की आपण कुणाशी वाईट वागणार नाही. 

विवेकानंदांनी हे विचार सव्वाशे वर्षांपूर्वी मांडले होते. सव्वाशे वर्षांपूर्वीच्या हिंदू धर्मपंडितांना तरी ते कितपत पटले होते माहीत नाही. कर्मकांड म्हणजेच धर्म असे समजले जात असतांना धर्माचा इतका खोल विचार कोण करत असेल?

***************************************

कृपया या स्थळालाही भेट द्या.    स्वामी विवेकानंद https://anandghare.wordpress.com/2021/09/22/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6/


No comments: