Monday, September 14, 2020

तेथे कर माझे जुळती - भाग १९ - माझ्या आत्या


मला तीन सख्ख्या आत्या होत्या. सर्वात मोठ्या गंगूआत्या आमच्या जमखंडी गावातच रहात होत्या, मधल्या कृष्णाआत्या कल्याणला होत्या आणि धाकट्या सोनूआत्या आमच्यासोबतच रहायच्या. या वर्षातल्या पक्षपंधरवड्याच्या निमित्याने मी त्यांना ही शाब्दिक आदरांजलि वहात आहे.

गंगूआत्यांचे घर आमच्या घरापासून लहान गावाच्या मानाने थोडे दूर म्हणजे पंधरा मिनिटांच्या अंतरावर होते, पण तो रस्ता बाजारपेठेमधून आरपार जाणारा एक हमरस्ता होता. त्यामुळे आम्हाला तो फार लांब वाटत नव्हता. मी नेहमी त्यांच्या घरी जात येत होतो आणि ती मंडळीही नेहमी आमच्याकडे येत असत. आमचे जवळजवळ एकत्र कुटुंब असल्यासारखेच होते. आमच्या गंगूआत्या मनाने फारच चांगल्या होत्या. त्या शांत, सोज्वळ, प्रेमळ, स्वाभिमानी आणि कमालीच्या सोशिक व समजुतदार अशा होत्या. जुन्या मराठी सिनेमांमधल्या एकाद्या सुस्वभावी आदर्श आईसाठी सुलोचनाबाईंच्या जशा भूमिका असायच्या तशा आमच्या या आत्या प्रत्यक्षात होत्या. त्यांना प्रभावी चेहेऱ्याबरोबरच गोड आवाजाची देणगीही मिळाली होती. त्यांनी संगीताचे प्रशिक्षण घेतले नव्हते तरीही त्या भजने आणि जुनी गाणी अगदी तालासुरात गात असत आणि त्यांचे साधे गुणगुणणेसुद्धा मंजुळ वाटत असे .

आपले मोठे कुटुंब चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि त्यासाठी पडतील तेवढे कष्ट करून आणि त्या ती जबाबदारी खंबीरपणे आणि शांतपणे पेलत होत्या. मी लहान असतांना मला त्याचे महत्व समजत नव्हते, पण मला जाण येऊ लागल्यानंतर त्यांचे मोठेपण समजत गेले.  माझ्या लहानपणी आमच्या एकत्र कुटुंबात माझ्या चुलत बहिणी होत्या आणि माझा एक मावसभाऊही आमच्याकडे रहायचा. त्यात गंगूआत्यांची मुले आल्यावर घराचे गोकुळ होत असे. त्या काळात सख्खी, चुलत, मावस, आत्ते, मामे अशी सगळी भावंडे सगळ्यांसाठी सारखीच असायची. घरातले तसेच घरी आलेले सगळे मुलगे आपले भाऊ आणि सगळ्या मुली आपल्या बहिणी असायच्या. घरातली मोठी माणसेसुद्धा आमच्यात भेदभाव करत नव्हती. आमच्यातली ही आपुलकी पुढेही टिकून राहिली याचे श्रेय माझी आई आणि गंगूआत्या या दोघींना आहेच. त्यातही कुणावर न चिडता, न रागावता मुलांची शांतपणे समजूत घालण्याची अवघड कला गंगूआत्यांना चांगली अवगत होती.  त्यामुळे त्यांचा मोठा वाटा आहे. 

आमच्या गंगूआत्या कामाला वाघ होत्या, त्यांचा कामाचा उरक दांडगा होता. आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा, कुणा पूर्वजांचे श्राद्धपक्ष असे काही कार्यक्रम असले, कोणी पाहुणे आले किंवा दिवाळीचा फराळ करायचा असला तर अशा वेळी  मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करावा लागत असे. त्या वेळी गंगूआत्या पुढाकार घेऊन आणि गरज असल्यास मुलामुलींना हाताशी घेऊन हसत खेळत त्या सगळ्या कामांचा फडशा पाडत असत. स्वयंपाकघरातल्या अशा प्रकारच्या सामुदायिक मोहिमांची दृष्ये अजून माझ्या डोळ्यासमोर येतात.   

गंगूआत्यांचा मोठा मुलगा विद्याधर हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीता कामाला होता. त्यांच्या कंपनीला बीएआरसीतल्या एका मोठ्या बिल्डिंगचे काम मिळाले तेंव्हा विद्याधरची त्या कामावर नेमणूक झाली. त्यांच्यासाठी अणुशक्तीनगरमधल्या एका मोकळ्या जागेत लहानशी तात्पुरती वसाहत बांधली गेली आणि त्यात ते लोक रहायला आले. मी जमखंडी सोडल्यानंतर पंधरासोळा वर्षांनी पुन्हा एकदा गंगूआत्या आमच्या घराच्या जवळ रहायला आल्या आणि आमचे नेहमी एकमेकांकडे जाणेयेणे सुरू झाले. आता त्या प्रेमळ आजीच्या भूमिकेत आल्या होत्या आणि आमच्याबरोबर माझ्या मुलांनाही  त्यांची माया मिळाली. त्या काळात माझी आईही आमच्याकडे रहात होती. त्या दोघींचीही पुन्हा एकदा गट्टी जमली आणि जुन्या काळातल्या आठवणींची उजळणी होत राहिली. अशी तीन चार वर्षे मजेत गेल्यावर ते बीएआरसीमधले बांधकाम पूर्ण झाले. त्यानंतर गंगूआत्या आणि आपल्या कुटुंबासह विद्याधर डोंबिवलीला रहायला गेला, पण आम्हाला जमेल तसे आमचे एकमेकांकडे जाणे येणे होत राहिले.

माझ्या दुसऱ्या आत्या म्हणजे कृष्णाआत्यासुद्धा पूर्वीच्या काळी जमखंडीतच रहात होत्या असे मी ऐकले आहे, पण मला समजायला लागले तेंव्हापासून मात्र त्या मुंबईजवळील कल्याणला स्थाईक झाल्या होत्या. त्यांच्या कुटुंबाची कल्हळ्ळीच्या व्यंकटेशावर अपार श्रद्धा आहे. व्यंकोबाचे दर्शन घेण्यासाठी त्या मुलांसह अधून मधून जमखंडीला येत असत आणि त्यांचे आमच्याकडे काही दिवस माहेरपणही होत असे. प्रत्येक भेटीच्या वेळी त्यांचे अगत्याने स्वागत होत असे आणि त्याही घरातल्याच होऊन जात. तेंव्हा त्या कल्याण मुंबईच्या वेगळ्या शहरी जीवनाच्या गंमती जंमती तेवढ्या आम्हाला सांगत असत. त्यासुद्धा खूप प्रेमळ, अगत्यशील आणि मनमोकळ्या स्वभावाच्या होत्या. आमच्या लीलाताईचे म्हणजे माझ्या चुलत बहिणीचे लग्न दादरला करायचे ठरले तेंव्हा आम्ही सर्व मंडळी कल्याणला जाऊन कृष्णाआत्यांच्या घरातच उतरलो होतो आणि तिथले प्रत्यक्षातले शहरी जीवन पाहिले होते. पुढे मी शिक्षण आणि नोकरीसाठी मुंबईत आलो तेंव्हा कृष्णाआत्या आणि नाना माझे एक प्रकारचे स्थानिक पालक (लोकल गार्डियन) होते. वयपरत्वे त्यांना प्रवास करणे शक्य होत नव्हते, पण मी मात्र तीन चार महिन्यात अचानक कल्याणला एकादी चक्कर टाकून त्यांना भेटून येत होतो आणि हक्काने एकादा दिवस त्यांच्या घरी रहातही होतो. तेंव्हा माझेही अत्यंत प्रेमाने आणि अगत्याने स्वागत होत असे. पुढे मी संसाराला लागल्यावर त्याचे प्रमाण कमी कमी होत गेले.

माझ्या जन्माच्याही आधी आमच्या सोनूआत्यांना दुर्दैवाने वैधव्य येऊन त्या माहेरी परत आल्या होत्या आणि शिक्षण पूर्ण करून जमखंडीच्या मुलींच्या शाळेत शिक्षिकेचे काम करायला लागल्या होत्या. त्यांचे सासरचे आडनाव करंदीकर असले तरी गावात आणि शाळेतही त्यांना 'घारेबाई' याच नावाने ओळखले जात होते. त्या घरातली एक प्रमुख मोठी व्यक्ती म्हणून आमच्याबरोबर  रहात होत्याच, शिवाय त्यांची शाळा, तिथल्या इतर शिक्षिका आणि विद्यार्थिनी यांचे एक वेगळे विश्व होते. त्यांच्या त्या विश्वातली मुळगुंद सोनूताई आणि सुब्बाबाई ही नावे मला साठ वर्षांनंतर अजून आठवतात. सोनूआत्यांचा हा ग्रुप नेहमी भेटून काही ना काही प्लॅन करायचा. एकदा तर त्या मिळून भारताच्या सहलीवरसुद्धा गेल्या होत्या असे मला आठवते.

सोनूआत्यांकडे  विलक्षण  निरीक्षणशक्ती, आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती होती. त्या किती तरी जुन्या घटनांचे अतीशय बारकाईने तपशीलवार वर्णन करून सांगायच्या. त्यांना भेटलेल्या किंवा त्यांच्या माहितीतल्या माणसांची संख्या अमाप होती. "ही शांता म्हणजे आपल्या गोदीच्या नणंदेच्या जावेच्या मावसबहिणीची शेजारीण" अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या साखळ्या त्या बोलता बोलता सहजपणे उलगडून दाखवत आणि त्या नेहमी अचूक असत. मी तर त्यांना 'नात्यांचा काँप्यूटर' असेच म्हणेन. जमखंडीच्या लहान विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीशी काय नाते होते, इतकेच नव्हे तर त्यांचे आपसातले संबंध कसे होते हे त्यांना पक्के माहीत असायचे. त्यांना माणसांची चांगली पारख होती. "कुणीही काही सांगितले तर त्यावर भोळसटपणे विश्वास ठेवायचा नसतो. त्यामागे त्याचा काय हेतू असू शकेल हे आपण त्याला कळू न देता पहायला पाहिजे". वगैरेसारखी मॅनेजमेंटची तत्वे त्यांना चांगली माहीत होती हे त्यांच्या बोलण्या आणि वागण्यामधून अप्रत्यक्षपणे व्यक्त होत असे. लहान मुलांनी मोठे होत असतांना दुनियादारीसुद्धा शिकून घेणे कसे गरजेचे आहे याचे काही धडे आम्हाला त्यांच्याकडून मिळत गेले.      

सोनूआत्या नेहमी घरातल्या सर्वांशी अगदी मिळून मिसळून छान मजेत गप्पागोष्टी करत असत, पण त्यांचे टेंपरामेंट जरा वेगळे होते. त्यांचा पारा जरासा लवकर चढत असे आणि उतरतही असे. कदाचित त्यांच्या लहानपणी त्या घरातल्या सर्वात लहान असल्यामुळे सगळ्यांकडून त्यांची खूप काळजी घेतली जात असणार यामुळे असेल, पण कळत नकळत त्या फटकन दुखावल्या जाऊन त्यांचा मूड जाऊ नये अशी काळजी सर्वांकडून घेतली जात असे.  त्यांच्याशी बोलतांना जरा जपून बोलावे लागत असे. कदाचित त्या माझ्यावर कधीच रागावल्या नसतीलही, पण तरीही मला त्याचाच थोडा धाक वाटायचा. त्यांना घरकामाची किंवा स्वयंपाकपाण्याची मनापासून फारशी आवड नव्हती आणि त्या बाबतीत त्या विशेष पुढाकार घेत नव्हत्या. कदाचित त्या वेळी मला असे वाटणे चुकीचेही असेल, पण माझी लहानपणची आठवण अशीच आहे. 

माझ्या आत्यांना जावई, सुना, नातवंडे वगैरे पहायला मिळाली. माझ्या मनात त्यांच्या कितीतरी खूप जुन्या आठवणी आहेत, त्या सांगाव्या तितक्या कमीच आहेत. माझ्या संस्कारक्षम वयात माझ्या मनाची जी जडणघडण होत गेली त्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या आठवणी आल्यावर आज एवढेच म्हणावेसे वाटते, "तेथे कर माझे जुळती." 


1 comment:

Unknown said...

खूप छान