"माझ्या आयुष्यात मला भेटलेल्या ज्या मोठ्या लोकांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे त्यांच्याबद्दल या मालिकेत मी दोन शब्द लिहायचे ठरवले आहे. यातल्या एकेका व्यक्तीबद्दल काही ग्रंथ आणि अगणित लेख लिहिले गेले आहेत. त्या महान लोकांची समग्र माहिती थोडक्यात देणे मला शक्यही नाही आणि माझा तसा उद्देशही नाही. "माझी या थोरांबरोबर ओळख होती." अशी शेखी मारण्याचे माझे वय आता राहिले नाही. मी फक्त माझ्या कांही जुन्या व्यक्तिगत आठवणी या निमित्याने मांडणार आहे." असे मी 'तेथे कर माझे जुळती' या मालिकेच्या पहिल्याच भागात स्पष्ट केले होते. आज मी अशाच एका महान आणि प्रसिद्ध अशा व्यक्तीबद्दलच्या माझ्या वैयक्तिक आठवणी या लेखात लिहिणार आहे. त्यांची अनेक चरित्रे प्रसिद्ध झाली आहेतच, त्यामुळे त्यांच्या जीवनाबद्दल मी आणखी काही लिहिण्याचा प्रयत्न करणे माझ्या कुवतीबाहेर आहे.
मी इंजिनिअरिंग कॉलेजमधून पास होताच माझी अणुशक्तीखात्यात निवड झाली आणि मी त्यांच्या ट्रेनिंगस्कूलमध्ये दाखल झालो. हे वर्षभराचे प्रशिक्षण पोस्टग्रॅज्युएशन करण्यासारखे होते. तेंव्हा आम्हाला क्लासरूममध्ये निरनिराळे अनेक विषय शिकवले गेले. मात्र ते शिकवणारे बहुतेक सर्वजण अणुशक्तीखात्यात आधीच काम करत असलेले वरिष्ठ शास्त्रज्ञ किंवा तंत्रज्ञ होते. आमच्या बॅचमध्ये भारतातल्या सगळ्या राज्यांमधून आलेले निरनिराळ्या भाषा बोलणारे ट्रेनीज होते आणि अशा सर्वांबरोबर राहून एकमेकांना समजून घेण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. आम्हाला शिकवायला येणाऱ्यांमध्येही तामीळ, तेलुगु, बंगाली, पंजाबी वगैरे वेगवेगळ्या भाषा बोलणारे तज्ज्ञ होते, त्यात एकादा मराठी गुरु भेटला तर आम्हा मराठी मुलांना मोठा आनंद होत असे.
काही आठवडे गेल्यावर एके दिवशी एक साधारणपणे आमच्याच वयोगटातले तरुण प्राध्यापक आम्हाला लेक्चर द्यायला आले. त्यांना पाहून वर्गातल्या मुलांना आधी जरासे आश्चर्य वाटले, पण कुशाग्र बुद्धीमत्ता, अपार ज्ञान आणि दांडगा आत्मविश्वास यांच्या जोरावर त्यांनी आपल्या पहिल्याच व्याख्यानात सर्वांवर गडद छाप पाडली आणि सर्वांची मने जिंकून घेतली. या उमद्या सरांचे नाव "अनिल काकोडकर" आहे असे समजल्यावर तर आमचा आनंद गगनात मावेना. ते व्हीजेटीआय या त्या काळातल्या सर्वोत्कृष्ट इंजिनियरिंग कॉलेजचे टॉपर होतेच, बीएआरसी ट्रेनिंगस्कूलच्या त्यांच्या बॅचचेही टॉपर होते. 'अणुशक्तीकेंद्रांमधली यंत्रसामुग्री' हा त्यांचा विषय नाविन्यपूर्ण होता आणि त्यांनी तो अत्यंत मनोरंजक पद्धतीने चांगला समजाऊन सांगितला. त्यांनी दिलेल्या नोट्स पाहून तर आम्ही चकीतच झालो. १९६६ सालच्या त्या काळात फोटोकॉपीइंगचे तंत्र भारतातल्या बाजारात अजून आलेही नव्हते. तोपर्यंत मी तरी झेरॉक्स केलेला एक कागदसुद्धा पाहिला नव्हता किंवा असे काही तंत्रज्ञान अस्तित्वात आहे हेदेखील मी ऐकले नव्हते. बाकीचे सगळे लेक्चरर सायक्लोस्टाईल केलेले करड्या रंगाचे खरखरीत कागद वाटत होते. त्यामुळे काकोडकरांनी दिलेल्या पांढऱ्याशुभ्र आणि गुळगुळीत कागदांवर सुबक अक्षरांमध्ये छापलेल्या सचित्र नोट्स पाहून सर्वांनाच त्याचे मोठे अप्रूप वाटले. बीएआरसीसारख्या उच्च दर्जाच्या संशोधन संस्थेत झेरॉक्सचे एकादे यंत्र आणले गेले असेल आणि तिथेही अगदी निवडक लोकांनाच ते उपलब्ध होत असेल.
आमचे क्लासरूममधले शिक्षण संपत आल्यावर आम्हाला दोन तीन आठवडे बीएआरसीमध्ये प्रात्यक्षिकांसाठी पाठवले गेले. त्यात आम्हा पाचसहा जणांच्या ग्रुपला रिअॅक्टर इंजिनियरिंग डिव्हिजनमध्ये पाठवले. अनिल काकोडकर तिथेच कार्यरत होते आणि सगळ्या इतर सीनियर अधिकाऱ्यांच्या तुलनेत ते नवीन असले तरी त्यांच्याकडे खूप महत्वाची स्वतंत्र कामगिरी दिलेली होती. पण त्यांनी त्यातून वेळ काढून आम्हाला त्या प्रयोगशाळेत होत असलेल्या कामांची माहिती समजाऊन सांगितली. तो कारखाना नसल्यामुळे तिथे सतत चातत राहणारी अशी रूटीन प्रकारची कामे नव्हतीच आणि चार दिवसांसाठी आलेली आम्ही नवखी मुले संशोधनाच्या गुंतागुंतीच्या कामात फारसा काही हातभार लावू शकणार नव्हतो. त्यामुळे एकदा सगळी प्रयोगशाळा पाहून झाल्यानंतर आम्ही लायब्ररीत बसून पुस्तके वाचणे आणि गप्पाटप्पांमध्ये आपला बराचसा वेळ घालवत होतो.
एकदा आम्ही तीनचार मराठी मित्र चहापान करत असतांना अनिल काकोडकरही तिथे आले आणि मोकळेपणे आमच्या वार्तालापात सामील झाले. आम्हाला त्यांच्याबद्दल कुतूहल तर होतेच. आमच्यातल्या एका आगाऊ मुलाने विचारले, "का हो, ते चंद्रकांत काकोडकर तुमचे कोणी नातेवाईक आहेत का?" त्या काळात त्यांच्या पॉकेटबुकमधल्या सवंग कादंबऱ्या खूप खपत असत. काकोडकरांनी हसत हसत म्हंटले, "नाही, ते फक्त आडनावबंधू आहेत." मग दुसऱ्या कुणीतरी म्हणाले, "आणखी एक काकोडकर प्रसिद्ध आहेत, पुरुषोत्तम काकोडकर." त्यांचा गोव्याच्या मुक्तीसंग्रामात मोठा सहभाग होता आणि ते तिथले एक प्रमुख राजकीय पुढारी असल्यामुळे त्यांचे नाव वर्तमानपत्रात नेहमी येत असे. अनिल काकोडकरांनी अत्यंत शांतपणे सांगितले, "ते माझे वडील आहेत." हे उत्तर ऐकल्यावर तर आम्ही सगळे हादरलोच, कारण आमच्यातल्या कुणाचाच कुठल्याही राजकीय पु़ढाऱ्याशी दुरूनही कधीच संबंध आला नव्हता. त्यानंतर त्यांना आणखी काही खोदून विचारायची हिंमत कुणालाच झाली नाही आणि त्यांनीही आम्हाला आपल्या प्रसिद्ध वडिलांबद्दल एक अक्षरही जास्त काही सांगितले नाही.
ट्रेनिंग संपल्यावर मी वेगळ्या ऑफीसात कामावर रुजू झालो, अनिल काको़डकर उच्च शिक्षणासाठी परदेशी गेल्याचे माझ्या कानावर आले. ते परत आल्यानंतर त्यांच्या प्रगतिविषयीच्या बातम्या अधून मधून येत होत्या, पण आमचा थेट संपर्क नव्हता. अनेक वर्षांनंतर मला अणुशक्तीनगरमध्ये रहायला जागा मिळाली आणि अनिल काकोडकरही आमच्या भागातल्या दुसऱ्या इमारतीत रहायला आले. आमचे काही समाईक मित्रही झाले आणि त्यांच्यामार्फत आमची पुन्हा नव्याने ओळख झाली. कधी कधी आम्ही बाजारात, दुकानांमध्ये किंवा रस्त्यावरून हिंडत असतांना ते समोर दिसायचे आणि नमस्कार, हॅलो करत करत आमची ओळख हळूहळू वाढत गेली. पीपीईडीमधल्या माझ्या ऑफीसमध्ये मी फ्यूएल हँडलिंग सेक्शनमध्ये काम करत होतो आणि बीएआरसीमध्ये या विषयावरही संशोधन होत असते. त्यामुळे माझे त्यानिमित्य तिथे जाणेयेणे होत होते. बीएआरसीमधला संबंधित विभाग कालांतराने काकोडकरांच्या हाताखाली आला आणि कामानिमित्य माझीही कधी कधी त्यांच्याशी भेट व्हायला लागली. बीएआरसीमध्ये होत असलेल्या सेमिनार्स, सिंपोजियम्स वगैरे कार्यक्रमांमध्ये अनिल काकोडकरांचा महत्वाचा सहभाग असायचा आणि त्यात ते प्रामुख्याने दिसायचे, तसेच त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे ऐकायची संधी मला मिळत असे. अशा अनेक प्रकारे ते नेहमीच डोळ्यासमोर असायचे.
अणुशक्तीखात्यामधील शास्त्रज्ञ आणि इंजिनियर्स यांना बढती मिळण्यासाठी इंटरव्ह्यू द्यावे लागतात. त्यांनी केलेले काम आणि मिळवलेले ज्ञान तसेच अनुभव वगैरे गोष्टींची यात जरा कसून तपासणी करून योग्य व्यक्तींची पारख केली जाते. अनिल काकोडकर असे इंटरव्ह्यू घेणाऱ्या एका कमिटीचे वर्षानुवर्षे अध्यक्ष होते. त्या काळात काही वेळा मलाही त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली. तेंव्हा ते प्रत्येक कँडिडेटला जशा प्रकारचे प्रश्न विचारायचे त्यावरून मला दिसले की इंजिनियरिंगच्या सगळ्या ब्रँचेसमधल्या सगळ्या विषयांचे त्यांना सखोल ज्ञान होतेच, तसेच अणुशक्तीखात्याच्या भारतात अनेक ठिकाणी असलेल्या प्रयोगशाळांमध्ये आणि कारखान्यांमध्ये काय काय काम चालत होते, कोणत्या बाबतीत नेत्रदीपक प्रगति होत होती, कुठे कोणत्या अडचणी येत होत्या वगैरेंची खडान खडा माहिती त्यांना होती. त्यांच्या आकलनशक्ती आणि स्मरणशक्तीला सीमा नव्हती. पुढे जाऊन या खात्याचे प्रमुख व्हायची तयारी त्यांनी खूप वर्षे आधीपासून केली होती.
एकदा मी पीपीईडी आणि बीएआरसीमधल्या काही सहकाऱ्यांबरोबर एका सेमिनारसाठी रावतभाट्याला गेलो होतो. रात्रीची जेवणे झाल्यानंतर माझे वरिष्ठ (बॉस) आणि एक कनिष्ठ सहकारी यांच्याबरोबर मी तिथल्या वर्कशॉपमध्ये गेलो. अनिल काकोडकरही वेगळ्या जीपमधून तिथे आले. तिथे एक नवीन उपकरण तयार करण्याचे काम चालले होते. ते पाहून परत येतांना काकोडकरांनी मला त्यांच्या गाडीत बसवून घेतले. या उपकरणाच्या बाबतीत त्यांचे माझ्या बॉसशी काही मतभेद आहेत हे मला माहीत नव्हते आणि माझा त्या उपकरणाशी काहीच प्रत्यक्ष संबंध नव्हता हे काकोडकरांना माहीत नसावे. मी त्यांना निव्वळ ऐकीव माहितीवरून काही तरी थातुरमातुर सांगत होतो ते त्यांना पटत नव्हते किंवा मी काही लपवाछपवी करतोय असा त्यांचा ग्रह झाला असावा. त्यामुळे मी ही गोंधळून गेलो होतो आणि तो संवाद सुरळीत होत नव्हता. माझ्या बोलण्यात अनवधानाने काही चूक झाली म्हणा किंवा त्याचा जो अर्थ त्यांनी घेतला तो मला अभिप्रेत नव्हता असे काहीतरी झाले आणि ते माझ्यावर नाराज झाले हे मला जाणवले. दुसऱ्याच्या मनातले ओळखून त्याला रुचेल असे पण आपल्या लाभाचे कसे बोलावे ही कला ज्यांना अवगत असते ते लोक नेहमी यशस्वी होतात, पण माझ्याकडे ती कला नाही म्हणून मी माझ्या ऑफिसातल्या वरिष्ठांशीसुद्धा जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न कधी केला नव्हता. इथे काकोडकर तर परके होते आणि त्या वेळी ते अजून खूप उच्च पदावर पोचले नव्हते. पण त्यांच्या गुडबुक्समध्ये जाण्याची एक आयती मिळालेली संधी मी वाया घालवली याची रुखरुख मात्र माझ्या मनात राहिली.
आणखी एकदा मला शनिवारी का रविवारी फोर्टमध्ये काही कामासाठी जायचे होते म्हणून मी अणुशक्तीनगरच्या बसस्टॉपवर गेलो. योगायोगाने तिथे अनिल काकोडकरही आले आणि आम्ही शेजारी बसून चर्चगेटपर्यत प्रवास केला आणि खूप गप्पा मारल्या. त्यांनी स्वतःची कार घेतली नव्हती कारण कॉलनीमधले इतर अधिकारी रोज उठून जी 'कारसेवा' करतांना दिसायचे ते करणे त्यांना मंजूर नव्हते असे त्यांनीच मला सांगितले. खरे तर काकोडकरांच्या त्या वेळी असलेल्या हुद्द्याप्रमाणे त्यांच्याकडे ऑफिसची गाडी होती, पण ती ऑफिसच्या कामासाठीच वापरायची हा तत्वनिष्ठ दंडक ते पाळत होते. त्या दिवशी तेही कदाचित व्यक्तिगत कामासाठी बाहेर पडले होते, म्हणून त्यांनी बीईएसटी बसने प्रवास करणे पसंत केले. त्यांच्या सुविद्य पत्नींनासुद्धा मी बसने जातायेतांना पाहिले होते. त्या दिवशी झालेल्या बोलण्यात त्यांनी माझ्या ज्ञानामध्ये भरपूर भर घातलीच, त्यांच्या भविष्यकाळातल्या काही योजना आणि स्वप्ने यांचीही थोडीशी चुणूक दाखवली. पुढे मोठ्या पदावर गेल्यानंतर त्यांनी त्यातल्या काही गोष्टी अंमलात आणल्यासुद्धा.
त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर बीएआरसीमध्ये फास्टट्रॅकवर प्रमोशन्स मिळवली तसेच भराभर एक एक पायरी चढत ते बीएआरसीचे डायरेक्टर झाले. त्यानंतर ते लवकरच अणुशक्ती आयोगाचे अध्यक्ष या सर्वोच्च पदावर जाऊन पोचले आणि बरीच वर्षे त्या पदावर राहिले. पोखरण येथे झालेल्या पहिल्या परीक्षणामध्येही त्यांचा सहभाग होता असे नंतर कानावर आले होते, पण तेंव्हा त्याबाबत कमालीची गुप्तता पाळली गेली होती. तिथल्या दुसऱ्या परीक्षणाच्या वेळी मात्र अब्दुलकलामांच्याबरोबर काकोडकरांचेही फोटो नियतकालिकांमध्ये छापून आले. त्यांना सरकारकडून सर्वोच्च पातळीचे सुरक्षाकवच देण्यात आले आणि ते अणुशक्तीनगर सोडून मलबार हिलवरील जास्त सुरक्षित जागेत रहायला गेले. त्यामुळे आम्हाला त्यांचे पूर्वीप्रमाणे सहज जाता येता भेटणे बंद झाले. मीही हळूहळू थोड्या वरच्या पदावर गेल्यामुळे ऑफीसच्या कामासाठी किंवा एकाद्या मीटिंगवगैरेसाठी माझे त्यांच्या ऑफिसात जाणे होत राहिले, पण ते भेटणे वेळेअभावी बहुतेक वेळा फक्त औपचारिक स्वरूपाचेच असायचे.
अनिल काकोडकर उच्च पदावर गेल्यानंतरही त्यांनी सामाजिक किंवा कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा परिपाठ कायम ठेवला होता. माझ्या मुलांच्या लग्नांच्या स्वागतसमारंभाला ते आवर्जून आले होते, तसेच त्यांच्या मुलीच्या विवाहसमारंभाला आम्ही भुलाभाई देसाई रोडवरील आवारात गेलो होतो. तेंव्हा आमच्यात चार शब्द बोलणेही झाले होते. नंतर आम्हाला असे समजले की अनिल काकोडकर त्यांच्या लहानपणी त्यांच्या आईबरोबर मध्यप्रदेशातील ज्या गावी रहात होते त्याच गावात माझ्या सुनेच्या आईचे लहानपण गेले होते आणि त्या काकोडकर कुटुंबाला अगदी जवळून ओळखत होत्या. यामुळे आमच्यातल्या स्नेहसंबंधाला आणखी एक धागा जोडला गेला.
मी सेवानिवृत्त झाल्यानंतर माझा माझ्या ऑफीसशी काहीच संबंध राहिला नाही. अनिल काकोडकर वयाने माझ्यापेक्षा मोठे असले तरी त्यांना एक्स्टेन्शन्स मिळत जाऊन ते आणखी काही वर्षे आपल्या पदावर कार्यरत होते, पण आता त्यांना भेटण्याची संधी मला मिळत नव्हती. त्यानंतर दोनदाच आमची भेट झाली ती दोन पुस्तकांच्या प्रकाशनांच्या निमित्याने. अनिल काकोडकरांच्या मातोश्री श्रीमती कमलाताई काकोडकर यांच्या समर्पित जीवनावर आधारलेला 'एक धागा सुताचा' या नावाचा आत्मचरित्राच्या रूपाचा ग्रंथ प्रकाशित झाला. त्या कार्यक्रमाचे आमंत्रण मला मिळाले आणि मी त्याला हजेरी लावली. त्यावेळी उपस्थित असलेल्या मंडळींमध्ये निरनिराळ्या क्षेत्रांमधली अनेक मोठमोठी माणसे आली होती आणि स्वतःच्या आईचाच कार्यक्रम असल्यामुळे अनिल काकोडकर तर ठळकपणे उपस्थित होतेच.
त्यानंतर आमच्या डॉक्टर अंजली कुलकर्णी आणि त्यांच्या सुविद्य भगिनी डॉ. अनुराधा हरकरे यांनी मिळून 'फुलाला सुगंध मातीचा' या नावाचे एक पुस्तक प्रकाशित केले. यात निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये शिखरावर जाऊन पोचलेल्या पाच प्रसिध्द व्यक्तींच्या जडणघडणीवर त्यांच्या मातापित्यांचा, विशेषतः त्यांच्या आईचा किती प्रभाव पडला होता हे या पुस्तकात त्यांनी दाखवून दिले आहे. यासाठी त्यांनी या पालकांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि या मुलाखतींमधून त्यांचे आगळे वेगळे व्यक्तीमत्व दिसून येते. या पुस्तकातला पहिलाच लेख स्व.कमलाताई आणि डॉ.अनिल काकोडकर यांच्यावर आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनसोहळ्यालाही मी उपस्थित राहिलो होतो. तिथेही माझी अनिल काकोडरांशी भेट झाली. या दोन्ही भेटी अर्थातच क्षणिक होत्या, पण तेवढ्यातही त्यांनी दाखवलेली ओळख आणि आपुलकी मला चांगली जाणवली.
अणुशक्ती आयोगाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाल्यानंतरसुद्धा अनिल काकोडकर प्रकाशाच्या झोतातच राहिले आहेत. ते आता शिक्षण, संरक्षण, आरोग्य यासारख्या देशाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या विविध विषयांशी संबंधित असलेल्या अनेक संस्थांचे काम निरनिराळ्या पातळ्यांवरून पहात आहेत. त्यामुळे अचानक कधी तरी त्यांचे टी व्ही वर दर्शन घडते आणि हे महापुरुष आपल्या ओळखीचे आहेत या भावनेने माझा ऊर भरून येतो. त्यांना तर जगभरातले लक्षावधी लोक ओळखत असतील, पण ते मला ओळखतात याचा मला जास्त अभिमान वाटतो. आणि म्हणावेसे वाटते, "दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती."
No comments:
Post a Comment