Tuesday, September 01, 2020

गणेशोत्सवाच्या आठवणी

 


मला समजायला लागल्यापासून मी दरवर्षी येणारा गणेशोत्सव उत्साहाने साजरा करत आणि इतरांनी तसा केलेला पहात आलो आहे. या काळात आजूबाजूचे वातावरणसुद्धा आनंदाने भारलेले असायचे. जिकडे पहावे तिकडे सजवलेले मांडव दिसायचे आणि कानावर ढोल, ताशा, आरत्या, भजने, गाणी वगैरेंचे ध्वनि पडत असायचे. गणेशचतुर्थी आणि अनंतचतुर्दशीला सगळे रस्ते भक्तांच्या गर्दीने भरलेले असायचे. या वर्षी गणेशाची इच्छा वेगळी दिसली. कोरोनाच्या संकटामुळे सार्वजनिक उत्सव फारसे साजरे झालेच नाहीत.  जे साधेपणाने आटोपून घेतले गेले ते सुद्धा मला पहायला मिळाले नाहीत,आमच्या  कारण घराबाहेर पडायलाच मनाई होती. या वर्षी मी फक्त आमच्या घरातल्या गणपतीचेच दर्शन घेऊ शकलो. आम्ही घरी आपला गणेशोत्सव दर वर्षीच्या इतक्याच उत्साहाने आणि त्याच परंपरागत रीतीने साजरा केला. पूजा, आरत्या, मोदकाचे नैवेद्य, अथर्वशीर्षाचे पठण वगैरे नेहमीसारखेच केले. मात्र गणपतीबाप्पाचे आगमन आणि विसर्जन साधेपणाने करावे लागले.

या दहा दिवसात मी रोज माझ्या जुन्या आठवणी काढून त्या शब्दबध्द करून फेसबुकवरील माझ्या फलकावर देत आलो. आज त्यांना एकत्र गुंफून या अनुदिनीवर देत आहे.  


गणेशोत्सवाच्या आठवणी - १

माझ्या लहानपणी आमच्या स्वैपाकघरातल्या एका उघड्या कपाटात एक छोटासा देव्हारा ठेवलेला होता आणि त्यात सगळे देव ठेवलेले होते. त्यात एक बाळकृष्णाची आणि एक अन्नपूर्णेची अशा दोन छोट्याशा मूर्ती होत्या आणि काळा शाळिग्राम तसेच नर्मदेतला शुभ्र गोटा असलेला महादेव होता. तो एका चांदीच्या नागाच्या वेटोळ्यात बसवलेला होता. त्या देव्हाऱ्यात गणपतीची मूर्ती नव्हती, गणपतीच्या नावाने एक लहानसा लाल रंगाचा चपटा आणि गुळगुळित असा सुबक खडा होता. या सर्वांची रोज भक्तीभावाने यथासांग पूजाअर्चा आरती वगैरे केली जात असे. याशिवाय इतर काही देवांची किंवा संतांची चित्रे होती, तसेच काही पोथ्या त्यांच्या बाजूला ठेवलेल्या होत्या. या सगळ्या गोष्टी कडक सोवळ्यात असायच्या आणि त्यांना कुणीही ओवळ्याने स्पर्श करणे पूर्णपणे निषिद्ध होते.

दर वर्षी गणेशोत्सवासाठी मातीची गणपतीची मूर्ती आणली जात असे. ती तयार करायचे काम आमच्या जमखंडी गावातल्या दत्तोबा तांबटाकडे होते. पोस्टावरून जाणाऱ्या गावातल्या हमरस्त्यावरच त्याचे वर्कशॉप होते. त्यात समोरच्या बाजूलाच एक लहानशी भट्टी होती आणि "ऐरणीच्या देवा तुला" या गाण्यात दाखवला आहे तसला तिचा भाता दत्तोबाची बायको खालीवर करत असे. फुललेल्या निखाऱ्यांवर तांब्यापितळेची भांडी तापवून दत्तोबा त्यांच्यावर ठोकाठोकी करत असे.  हे मी अनेक वेळा पाहिले असल्यामुळे अजून लक्षात आहे. त्याशिवाय तो इतर उद्योगही करत असे त्यात गणपतीच्या मूर्ती करणे हे मुख्य होते. त्याच्याकडे लहानमोठ्या आकाराचे काही साचे होते. शाडू मातीला चाळून, भिजवून, चांगली घोटून आणि त्यात चिकटपणा आणण्यासाठी काही द्रव्ये मिसळून तयार झालेला मऊसूत लगदा त्या साच्यांमध्ये थापून तो मूर्ती बनवायचा, त्यांना साच्यामधून काढून सुकत ठेवायचा आणि सुकल्यानंतर त्यांना ब्रशने रंगवायचा. हे सगळे काम आम्हाला रस्त्याने जाता येता दिसत असे आणि आम्हीही मुद्दाम तिथे थांबून त्याचे हस्तकौशल्य कौतुकाने पहात असू.

आम्ही दरवर्षी घेत असलेल्या गणपतीचा आकार ठरलेला होता. त्याबद्दल दत्तोबाला सांगायची गरजच नव्हती, उलट "हा बघा मी तुमचा गणपती करतोय्" असे तोच आम्हाला सांगून दाखवायचा.     


गणेशोत्सवाच्या आठवणी - २

आमच्या वाड्याच्या मोठ्या दरवाजातून आत आल्यावर उजव्या बाजूला बैठकीची खोली होती आणि डाव्या बाजूला न्हाणीघर, पाण्याचा हौद आणि लाकडे, कोळसे वगैरे ठेवायच्या जागा होत्या. त्यांना पार करून गेल्यावर समोर एक पायरी चढून वर पाच खणी सोपा होता. त्याच्या समोरच्या भितीवर मधोमध जागी कंबरेएवढ्या उंचीवर बराचसा खोल असा आमचा 'गणपतीचा कोनाडा' होता. एरवी त्याचा उपयोग आलेली पत्रे, बिले, पावत्या, सामानाच्या याद्या, औषधाची बाटली अशासारख्या गोष्टी लगेच मिळाव्यात म्हणून तात्पुरत्या ठेवण्यासाठी होत असे. गणपतीचे दिवस जवळ आले की तो कोनाडा स्वच्छ करून आणि चुन्याचा एक हात फिरवून गणपतीच्या आगमनासाठी सज्ज केला जात असे. आम्ही दरवर्षी आमच्या गणपतीबाप्पाची स्थापना त्या कोनाड्यातच करत असू.  गणपतीच्या एका बाजूला नारळ आणि दुसऱ्या बाजूला दिवा ठेवायला जागा सोडून उरलेल्या जागेत बसेल एवढ्याच आकाराची गणपतीची मूर्ती आणणे आवश्यक होते. म्हणून आम्ही साधारणपणे वीतभर रुंद आणि त्याहून थोडा उंच असा मूर्तीचा एक आकार ठरवून ठेवला होता आणि दत्तोबा तांबट दरवर्षी तेवढ्या आकाराची मूर्ती आमच्यासाठी तयार करून देत असे.कोनाड्याच्या आत सजावट करायला फारशी जागा नव्हती आणि ती बाहेरून दिसलीही नसती म्हणून आम्ही एक सुंदर मखर तयार करून ते बाहेरच्या भिंतीवर टांगून ठेवत असू. त्यात मध्यभागी कमान आणि आजूबाजूला नक्षीकाम करून सुंदर सुंदर चित्रे चिकटवत असू. हे सगळे काम आम्हा मुलांचेच होते. त्या काळात 'आत्मनिर्भरता' असला बोजड शब्द कोणी वापरत नव्हते, पण आम्ही ही सगळी सजावट स्वतःच करत होतो. त्यासाठी सोनेरी कागद सोडून इतर काहीही बाजारातून न आणता घरातल्याच वस्तू वापरून ही सजावट केली जात होती.  पुढच्या वर्षीच्या मखरात लावण्यासाठी म्हणून आम्ही वर्षभर चित्रे गोळा करून ठेवत होतो आणि त्यातली चित्रे निवडून ती चिकटवणे, कमान, कमळे आणि नक्षी वगैरे काढणे, सुबक अक्षरात 'श्रीगणेशायनमः' लिहिणे वगैरे कामे गणेशचतुर्थी जवळ आल्यावर करत होतो.

 

गणेशोत्सवाच्या आठवणी - ३

गणेशचतुर्थीचा दिवस उजाडायच्या आधीच पहाटे उठून आम्ही कामाला लागत होतो. पाण्याच्या हंड्याखालचे चुलखंड पेटवून पाणी तापायला ठेवायचे, दारासमोर सडा घालून सुबक रांगोळी काढायची, आंब्याच्या पानांचे तोरण तयार करून ते दाराला बांधायचे, गच्चीवरच्या बागेतली फुले तोडून आणायची, एकवीस एकवीस दुर्वांच्या जुड्या बनवायच्या वगैरे वगैरे किती कामे असायची. आंघोळी करून झाल्यावर ठेवणीतले त्यातल्या त्यात बरे कपडे आणि डोक्यावर टोपी घालून आणि कपाळावर कुंकवाचा उभा पट्टा लावून सगळे तयार झाले की टाळ, झांजा, चिपळ्या वगैरे जे मिळेल ते वाद्य आणि एक मोठे ताट घेऊन दत्तोबाकडे जायचे आणि आमच्या नावाने ठेवलेली गणपतीबाप्पाची मूर्ती त्याचा जयजकार करत आणि वाजत गाजत घरी आणून ठेवायची.   

मग एकजण मुकटा नेसून पूजा करण्यासाठी तयार होऊन बसायचा. पळी, फुलपात्र, ताम्हन, समई,  फुलांचे हार, पूजेचे तबक वगैरे सगळी तयारी करून आणि पाट मांडून नारायणभटजींची वाट पहात बसायचे. ते आले की एकही क्षण गप्पा मारण्यात न दवडता पूजाविधी सुरू करायचे. त्या दिवशी त्यांना अनेक घरी जायचे असल्यामुळे वाया घालवायला मोकळा वेळच नसायचा. मंत्रोच्चारासहित गणपतीबाप्पांची साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा करून आरत्या, मंत्रपुष्पांजली वगैरे म्हणून झाले की मग दुपारच्या जेवणातल्या उकडीच्या मोदकांची आतुरतेने वाट पहायची.


गणेशोत्सवाच्या आठवणी - ४


घरातल्या गणपतीची प्रतिष्ठापना झाली की आम्ही आमच्या हायस्कूलकडे पळत होतो. हे परशुरामभाऊ हायस्कूल जमखंडीच्या संस्थानिकांनी जनतेच्या कल्याणासाठी बांधून शिक्षणाची उत्कृष्ट सोय केली होती. आम्हा विद्यार्थ्यांना सर्वथा अभिमान वाटावा अशीच ही शाळा होती. पूर्वी त्याचे व्यवस्थापनही संस्थानचे सरकारच करत असे. जमखंडीचे संस्थानिक पटवर्धन हे गणपतीचे भक्त असल्यामुळे त्यांच्या काळात तिथला गणेशोत्सव चांगला दणक्यात साजरा होत असेल. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर संस्थान त्यात विलीन झाले आणि आमचे हायस्कूल राज्य सरकारची शाळा झाली. तरी आमचे मुख्याध्यापक आणि वरिष्ठ शिक्षक हे 'संस्थानिकोंके जमानेके' असल्यामुळे त्यांनी जमतील तेवढ्या प्रमाणात जुन्या प्रथा सुरू ठेवल्या होत्या.    आमच्या या शाळेच्या सुंदर इमारतीच्या मधोमध एक मोठा सेंट्रल हॉल आहे. त्या काळात त्या हॉलमध्ये आणि त्याच्या बाजूच्या प्रशस्त कॉरीडॉरमध्ये शाळेतली सगळी मुले दाटीवाटी करून उभी राहू शकायची. त्या हॉलमध्येच एका बाजूला स्टेजवर गणपतीबाप्पाची स्थापना व्हायची. समोरच्या सुंदर बागेतल्या कण्हेरी, जास्वंदी, सोनचाफा वगैरेसारख्या फुलांनी त्याला सजवले जायचे. पूजा, आरती, काही मुलांची गाणी, शिक्षकांची भाषणे वगैरे व्हायची. त्या हॉलमध्ये आवाज खूप घुमत असल्यामुळे आणि मुलांच्या गलक्यात त्यातले थोडेच समजत असेल. अखेर प्रसादाचा पेढा घेऊन तो खात खात आम्ही घरी यायचो.  

आमचा हा उत्सव अर्ध्याच दिवसाचा, किंबहुना फक्त काही तासांचाच असायचा. सगळ्या मुलांच्या आणि मास्तरांच्या घरी गणपती बसवले जात असल्यामुळे ते काम पूर्ण करून त्यांना शाळेत पोचायला साडेदहा अकरा वाजून गेले असायचे आणि संध्याकाळी सूर्य मावळायच्या वेळी शाळेच्या पटांगणाच्या कडेलाच असलेल्या 'अप्पासाहेबांच्या' विहिरीत त्या मूर्तीचे साग्रसंगीत विसर्जनही केले जात असे.  पायऱ्या आणि कमान असलेली ही विहीर चांगली  मोठ्या आकाराची होती. त्या वेळी गावातले पट्टीचे पोहणारे दोन तीन युवक मिळून पोहत पोहत त्या मूर्तीला विहिरीच्या मध्यभागी नेऊन पाण्यात डुबकी मारायचे आणि तिला अलगद तळाशी ठेऊन वर यायचे. आम्ही हे दृष्य काठावर उभे राहून आणि डोळे विस्फारून पाहून घेत होतो.


गणेशोत्सवाच्या आठवणी - ५

काही लोक गणेशचतुर्थीच्या दिवशी एकवीस गणपतींचे दर्शन घेण्याचा संकल्प करतात. लहानपणी संकल्प वगैरे शब्दच माहीत नसतात. आम्ही तर पहाटे उठल्यापासून आधी घरातला गणपती आणि नंतर शाळेतला गणपती बसवण्याच्या कामात गुंतलेले असायचे. दुपारी मोदकाचे जेवण केल्यावर थोडी सुस्तीही यायची. संध्याकाळी पुन्हा शाळेतल्या गणपतीचे विसर्जन आणि रात्री घरातल्या आरतीसाठी लवकर घरी पोचायचे असे. त्यामुळे गावभर फिरायला वेळच कुठे होता? शिवाय जिथे जाऊ तिथल्या काकू हातावर मोदक ठेवणार. एका दिवसात खाऊन खाऊन असे किती मोदक खायचे? तरीही जे जवळचे नातेवाईक होते आणि त्यांच्या घरी आमचे नेहमी जाणेयेणे होत असे अशा काकामामांकडे जाऊन त्यांच्याकडल्या गणपतींचे दर्शन घेऊन येत होतो. पुढच्या दोन तीन दिवसात गावातले सगळे सार्वजनिक गणपती पाहून आणि सगळ्या मित्रांच्या घरी जाऊन एकवीसचा कोटा सहज पूर्ण होत असे.  तसेच ठिकठिकाणी केलेली सजावटही पहायला मिळत असे. माझ्या आठवणीत तरी त्या वेळी करमणुकीचे जाहीर कार्यक्रम आमच्या गावात होत नसत किंवा कदाचित रात्रीच्या वेळी ते पहायला जायची परवानगी मुलांना मिळत नसेल म्हणून त्यातले काहीच आठवत नाही.

आमच्या घरी रोजच संध्याकाळी मुलांनी शुभंकरोति, परवचे आणि रामरक्षा म्हणून झाल्यावर धुपारती करायची प्रथा होती. त्यात सुखकर्त दुखहर्ता आणि दुर्गे दुर्घट भारी या आरत्या रोज म्हणायच्या आणि सोमवारी शंकराची, गुरुवारी दत्ताची आणि शनिवारी हनुमंताची अशा आरत्या म्हंटल्या जात. त्यामुळे त्या तोंडपाठ झाल्या होत्या. गणेशोत्सवात रोज सर्वांनी मिळून या सगळ्या आरत्या तर म्हणायच्याच, शिवाय पुस्तकात पाहून आणखी काही नवनव्या आरत्या चढाओढीने म्हणायचा कार्यक्रम अर्धापाऊण तास चालत असे.  


गणेशोत्सवाच्या आठवणी - ६


मी तीन वर्षे पुण्याच्या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतांना शिवाजीनगर स्टेशनच्या जवळ असलेल्या त्या कॉलेजच्या वसतीगृहात रहात होतो. तिथून जंगली महाराज रोडने चालत चालत डेक्कन जिमखान्यापर्यंत जायचा आमचा नेहमीचाच छंद होता. गणेशोत्सवाच्या काळात आम्हा मित्रांचे टोळके त्या रस्त्याच्या आजूबाजूला असलेले सगळे गणपती तर पाहून घेत होतोच, कधीकधी शिवाजीनगर स्टेशनपासून ते नव्या पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावरल्या मांडवातल्या देखाव्यांचे दर्शन घेत होतो. पन्नास वर्षांपूर्वीसुद्धा पुण्याचा गणेशोत्सव मुख्यतः आकर्षक आणि  मनमोहक अशा देखाव्यांसाठी प्रसिद्ध होता आणि हे सगळे अद्भुत  देखावे लक्ष्मी रोड, टिळक रोड, बाजीराव रोड या परिसरातच मांडलेले असत. एकादा सोयीचा आणि कोरडा दिवस पाहून त्या संध्याकाळी आम्ही त्या भागातही तीन चार तास फिरून येत होतो. पुण्यात जितके विविध प्रकारचे  कल्पक असे देखावे एकाच परिसरात पहायला मिळतात तसे मला तरी आणखी कुठेच दिसले नाहीत, मुंबईला तर नाहीच नाही.  तिथे एकाच मांडवातल्या गणपतीचे दर्शन मिळायला लांबच लांब रांगेत उभे रहावे लागायचे आणि त्यात दमछाक होत असे. मात्र मुंबईला जितक्या अगडबंब आकाराच्या भव्य मूर्ती पहायला मिळायच्या तशा पुण्याला नसायच्या. 

मी पुण्याला शिकत असतांना एका वर्षी गणेत्सवाच्या काळातच हिंसक दंगली झाल्या. त्यामुळे शहरभर कर्फ्यू लावला गेला होता. त्यावर्षी आम्हाला तिथला उत्सव पहायला मिळाला नाही. त्यानंतर अनेक वर्षांनी पुन्हा एकदा या वर्षी मी हा उत्सव पहायला कुठे बाहेर पडू शकत नाही आणि यंदा टी व्ही वर ही तो फारसा पहायला मिळत नाही असे झाले आहे.


गणेशोत्सवाच्या आठवणी - ७

मी नोकरीला लागल्यावर पहिली तीन चार वर्षे माझ्या मित्रांबरोबर दादरला रहात होतो. त्या काळातल्या सज्जन, सुविद्य, सुसंस्कृत, रसिक अशा सुखवस्तू मध्यमवर्गीयांचे आगर म्हणजे दादर अशी त्या भागाची ओळख होती. दादर, माहीम, शिवाजी पार्क या भागात अनेक कलाकार, साहित्यिक वगैरे मंडळींचे वास्तव्य होते.  अशा भागात रहायला मिळणे हीच कौतुकाची गोष्ट होती.  गणेशोत्सवाच्या काळात तर तिथे धमाल येत असे. ठिकठिकाणी मोकळ्या जागांमध्ये किंवा रस्त्यातच मांडव घालून श्रींची स्थापना केली जात असे आणि त्याची सुंदर आरास केली जात असे. ती पहायची मजा तर होतीच, पण माझ्या विशेष लक्षात राहिले आहेत ते काही ठिकाणी होणारे करमणुकीचे कार्यक्रम. हमरस्त्यांवर होणाऱ्या गोंगाटामुळे तिथे काही कार्यक्रम ठेवण्यात अर्थ नसायचा, पण जरा आतल्या बाजूला निवांतपणा मिळत असे. डी.एल.रोडवर अशी एक जागा होती. तिथे रात्री सगळी रहदारी बंद करून रस्त्यातच ठिय्या मारून खूप लोक बसत आणि तितकेच किंवा त्याहून जास्त लोक शांतपणे मागे उभे राहून कार्यक्रमांचा आनंद घेत असत. हिंदू कॉलनीतला सार्वजनिक गणेशात्सव एका मोकळ्या मांडव घालून जागेत होत असे, पण त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम रुइया कॉलेजजवळच्या एका लहानशा सभागृहात तिकीट लावून ठेवत असत. जितेंद्र अभिषेकी यांच्यासारखे गायक, मंगेश पाडगावकरांसारखे कवि आणि रमेश मंत्री यांच्यासारखे विनोदी लेखक अशा अनेक प्रसिद्ध लोकांना जवळून पहायची संधी मला दरवर्षी होणाऱ्या या जाहीर कार्यक्रमांमध्ये मिळाली. 

एकदा तर एका ठिकाणी चक्क माननीय बाळासाहेब ठाकरेच सन्मान्य पाहुणे म्हणून आले होते. तेंव्हा अजून शिवसेनेचा उदय झालेला नव्हता पण एक कुशल व्यंगचित्रकार आणि तडफदार लेखक -संपादक बाळ ठाकरे म्हणूनच ते लोकप्रिय झाले होते. आपल्या कुंचल्याच्या आणि लेखणीच्या जोरावर त्यांनी मार्मिक या साप्ताहिकाला अल्पावधीत यशाच्या शिखरावर नेले होते. आपल्या लहानशा पण प्रभावी भाषणाने आणि प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना चातुर्याने खणखणीत उत्तरे देऊन त्यांनी सर्वांची मने जिंकून घेतली होती. 


गणेशोत्सवाच्या आठवणी - ८


मी लग्न करून चेंबूरला घर थाटल्यानंतर गणपतीची पिटुकली मूर्ती आणून आमचा वेगळा घरचा गणेशोत्सव सुरू केला.  वन रूम किचनच्या  त्या इवल्याशा सदनिकेत टेबलावरच एक छोटासा पाट ठेऊन त्यावर गणपतीबाप्पांना विराजमान केले आणि आजूबाजूला थोडी फुले आणि दिवे यांची सजावट केली. तेंव्हा चेंबूर स्टेशनला लागूनच पाटील स्टोअर्समध्ये सर्व पूजासाहित्य मिळत असे.  त्याच दुकानात गणेशोत्सवामध्ये गणपतीच्या सुबक मूर्ती मिळत असत. तिथे पेणच्या खास मूर्तीसुद्धा येत असत. आयत्या वेळी आपल्याला हवी तशी मनाजोगती मूर्ती मिळेल न मिळेल म्हणून आम्ही आधीच जाऊन मूर्ती घेऊन येत असू. काही वर्षांनी त्यांनी अग्रिम आरक्षणाची सोय केली. मग आम्ही ते कधी सुरू होते याची वाट पाहून शक्य तितक्या आधी जाऊन गर्दी नसतांना निवांतपणे गणपतीच्या मूर्ती पाहून त्यातली निवड करून तिला रिझर्व करून ठेवायला लागलो. आम्ही अणुशक्तीनगरला रहायला गेलो तरी पुढील तीस वर्षेसुद्धा आम्ही दरवर्षी चेंबूरच्या पाटील स्टोअर्समधूनच गणपती आणत असू. सजावटीची व्याप्ती आणि आकारमान मात्र कालानुसार बदलत आणि वाढत गेले. आधी साध्या पुठ्ठ्याच्या कमानीचे मखर, त्यानंतर चौकोनी देऊळ, त्यावर कळस, झोपाळा, रथ, देखावा अशी प्रगती होत गेली. मधली काही वर्षे पुठ्ठ्याच्या जागी सर्रास थर्मोकोल आले आणि पर्यावरणाचा मुद्दा पुढे आल्यानंतर त्याचा वापर बंद केला गेला.


गणेशोत्सवाच्या आठवणी - ९

आम्ही लहानपणी बैलपोळ्याच्या दिवशी चिकणमातीचे छोटे छोटे बैल तयार करत होतो.  ते करतांना त्याच मळलेल्या चिकणमातीतून गणपतीचे आकारही बनवत होतो. आता "करायला गेला गणपती आणि झाला मारुती" असेही होत असे, निदान दुसऱ्या मुलांनी केलेल्या आकारांना तसे चिडवले जात असे. पण हे गणपती कधीच सुकवून घरात ठेवले मात्र जात नसत कारण ते सुकेपर्यंत त्यांना तडे जायचीच शक्यता असायची. त्यामुळे ते तात्पुरते आकार संध्याकाळपर्यंत पुन्हा बागेतल्या कुंड्यांमधल्या मातीत विलीन होऊन जात असत. दत्तोबा तांबट मात्र शाडू मातीपासून गणपतीच्या मूर्ती तयार करायच्या. ही खास प्रकारची माती तो कुठून आणत होता असा प्रश्न त्या काळात मला कधी विचारावासा वाटला नाही. पण त्या मातीचा गुणधर्म असेल किंवा त्याने त्यात मिसळलेल्या रसायनांचा असेल, ते गणपती मात्र अभंग रहात असत. बाजारातून आणलेले पेणचे गणपतीही असेच टिकाऊ असायचे.


आमच्या लहानपणी मी 'प्लॅस्टर ऑफ पॅरिस' हा शब्दसुद्धा ऐकला नव्हता किंवा हा पदार्थ डोळ्याने पाहिला नव्हता. ही एक पांढऱ्या रंगाची भुकटी असते हा शोध मला मुंबईला आल्यानंतर लागला. आधी जेंव्हा त्याचे निरनिराळे उपयोग पाहिले तेंव्हा तर तो एक अद्भुत पदार्थ वाटायचा. कदाचित त्या पदार्थाचे गणपतीसुद्धा मी अनेक वेळा कळत नकळत आणलेही असतील. पण काही वर्षांपूर्वी पर्यावरणस्नेह्यांनी पीओपीच्या विरुद्ध प्रचाराची मोठी मोहीम सुरू केली. त्यानंतर मी सखोल चौकशी करून मृत्तिकेच्या मूर्ती आणायला लागलो. या वर्षी तर कुठेही बाजारात जायची सोयही नव्हती. आमच्या बिल्डिंगमध्येच असलेल्या दुकानात थोडे तांबड्या मातीचे गणपती ठेवले होते. ते पूर्णपणे पाण्यात विरघळण्याच्या गॅरंटी होती इतकेच नव्हे तर त्यासाठी एक रिकामी कुंडी, तुळशीच्या बिया आणि जास्तीची माती देऊन त्या कुंडीत  तुळशीची रोपे लावण्याची व्यवस्था करून दिली होती. असा सगळा विचार करणे हेच धन्य आहे. ते करणाऱ्याचे कौतुक करायला हवे म्हणून आम्ही या वर्षी त्या प्रकारचा गणपती आणला.


गणेशोत्सवाच्या आठवणी - १०


माझ्या लहानपासूनच्या गणेशोत्सवाच्या आठवणी सांगता सांगता आज अनंतचतुर्दशीचा म्हणजे या उत्सवाचा शेवटचा दिवसही आला. मी दादरला रहात असतांना तिथेच समुद्रकिनाऱ्यावर अनेक गणेशमूर्तींचे विसर्जन होत असे. आम्ही दर वर्षी शक्य तितका वेळ किनाऱ्याच्या आसपास हिंडून निरनिराळ्या मिरवणुका आणि गणपतीच्या सजवलेल्या मूर्ती पाहून घेत होतो. पण मुंबईतल्या लालबागच्या राजासह अनेक मोठमोठे राजे महाराजे असलेल्या सगळ्या महत्वाच्या गणपतीबाप्पांचे विसर्जन गिरगाव चौपाटीवरच केले जात आले आहे. आमच्या चेंबूरचे आरकेस्टूडिओ आणि ड्यूक्स यांचे प्रसिद्ध गणपतीसुद्धा विसर्जनासाठी चौपाटीलाच नेत असत.  तिथे होणारी तुफान गर्दी पाहता आणि परत घरी कसे यायचे या विवंचनेमुळे मी चौपाटीला मात्र प्रत्यक्षात कधी गेलो नाही. नंतरच्या काळात  तिथली दृष्ये रसभरीत धावत्या वृत्तांतासह  टेलिव्हिजनवर पहायला मिळायला लागली. त्यामुळे आपण फारसे काही चुकवले असेही वाटले नाही. 

 पहिली अनेक वर्षे माझे ऑफिस दक्षिण मुंबईत होते. अनंतचतुर्दशीच्या दिवशी मीटिंग किंवा व्हिजिटसाठी बाहेर कुठेही जाण्याचा प्रश्नच नसायचा, आमच्या ऑफिसातही त्या दिवशी महत्वाच्या बैठका ठेवल्या जात नसत. रस्त्यावरील तुडुंब वाहणारी गर्दी, त्यामुळे होणारी वाहतुकीची प्रचंड कोंडी वगैरेंचा विचार करून आम्हाला ऑफीसातून दोन तीन तास आधीच सुटी मिळत असे. लग्न व्हायच्या आधी आम्ही तीनचार मित्र मिळून इकडे तिकडे हिंडत असू आणि ठिकठिकाणाहून चौपाटीकडे जायला निघालेल्या मिरवणुका पहात असू. संसार थाटल्यानंतर आधी सरळ घरी येऊन सहकुटुंब  एकादी लहानशी चक्कर मारून यायला लागलो.  लहानमोठे असंख्य गणपती आणि त्यांचे देखावे वगैरेंमधून बाप्पाची कोटीकोटी रूपे त्या काळात मला पहायला मिळाली. 

आमचा योजना प्रतिष्ठानशी संबंध आल्यानंतर दर वर्षी अनंतचतुर्दशीला एक वेगळा कार्यक्रम निश्चित झाला. परळच्या ऑव्हरब्रिजला लागूनच असलेल्या एका चाळीतल्या खोलीत या प्रतिष्ठानातर्फे दरवर्षी अनंतचतुर्दशीच्या दिवशी संगीत भजनाचा लहानसा घरगुती पण चांगल्या दर्जाचा कार्यक्रम केला जात असे आणि त्यात स्व.शिवानंद पाटील, योजनाताई आणि त्यांचे निवडक शिष्यगण भक्तीपूर्ण गायनसेवा मनापासून सादर करीत असत. बाहेरील रस्त्यावरून जात असलेल्या मिरवणुकांमध्ये चाललेला ढोलताशांचा गजर आणि त्यांच्यावरताण आवाज काढून बंदिस्त खोलीत केलेले ते उच्चरवातले गायन यात एक वेगळा रंग येत असे. संध्याकाळच्या सुमारास घरी परत येतांना आमची बस मुंगीच्या पावलाने चालत असे आणि आम्हाला उलट दिशेने समुद्राकडे जाणारे खूप गणपती पहायला मिळत असत.   त्यासाठी आम्ही मुद्दाम डबलडेकर बस घेऊन वरच्या मजल्यावर चढून बसत होतो.

आज या वर्षीच्या गणेशोत्सवाबरोबर या लघुलेखमालिकेची सांगता होत आहे. गणपतीबाप्पा मोरया । मंगलमूर्ती मोरया । No comments: