Thursday, May 30, 2019

आवारा ते . . . . . Avengers


तारकासुर, नरकासुर, बकासुर, अमकासुर, तमकासुर असा एकादा दैत्य अतीशय बलवान आणि उन्मत्त होतो आणि सज्जन लोकांना पिडायला लागतो, त्यांच्यावर जुलुम जबरदस्ती करायला लागतो. ते बिचारे काही करू शकत नाहीत अशा दयनीय अवस्थेत सापडलेले असतांना एकादी देवता किंवा देव अवतार धारण करतो आणि त्या दुष्टाचा संहार करून गरीब लोकांना त्याच्या तावडीतून सोडवतो. अशा प्रकारच्या अनेक गोष्टींनी आपली पुराणे भरलेली आहेत. रामायण व महाभारत या खंडकाव्य़ांमध्ये दुष्ट आणि सुष्ट प्रवृत्तींचे अधिक सविस्तर वर्णन केले आहे आणि त्यांच्यामधील संघर्षातल्या एकेका प्रसंगाचे तपशीलवार वर्णन केले आहे.

पाश्चात्य पुराणातसुद्धा गोलियाथसारखे राक्षस आहेत आणि अरबी सुरस कथांमध्ये अल्लाउद्दिनचा दुष्ट काका तसेच अलीबाबाच्या गोष्टीतले चाळीस चोर आहेत. ते आधी यशस्वी होत असतात, पण गोष्टींचा शेवट त्यांच्या संहाराने होतो. ख्रिश्चन धर्मात अवतार या कल्पनेला थारा नसल्यामुळे रॉबिनहूडसारख्या वीरांच्या दंतकथा तयार झाल्या. या सगळ्या कथांमधली मुख्य गोष्ट दुष्ट वृत्तीचा पराभव आणि सुष्टांचा विजय इथे संपते कारण लोकांना तसाच शेवट हवा असतो. लोक अशाच गोष्टी  आपल्या मुलांना किंवा शिष्यांना सांगतात आणि ते त्यांच्या मुलांना आणि शिष्यांना सांगतात अशा तीन पिढ्या तर मीच पाहिल्या आहेत. या प्रकारे होत असलेल्या प्रसारातूनच अशा गोष्टी गेली हजारो वर्षे टिकल्या आहेत.

मुद्रणाची सोय नसतांना सगळे हातानेच लिहावे लागत असल्यामुळे पुराणांच्या पोथ्या दुर्मिळ असायच्या. कोणी शास्त्री, पुराणिक त्या वाचून दाखवत असत, तसेच कीर्तन किंवा प्रवचनांमधून गावातल्या लोकांना सांगत असत. ग्रामीण भागात लोकप्रिय असलेले पोवाडे किंवा वग यामधूनसुद्धा अशाच आशयाच्या गोष्टी तिखटमीठ लावून सांगितल्या जात असत आणि तिथे प्रेक्षक त्यांना टाळ्याशिट्यांनी दाद देत असत.

पुस्तकांची छपाई सुरू झाल्यानंतर कथा, कादंबऱ्या, नाटके आदिंमधून नवनव्या गोष्टी लिहून प्रसिद्ध करण्याला बहर आला. मराठी नाट्यसृष्टी निर्माण झाल्यानंतर त्याचच्या सादरीकरणाची नवी सोय झाली. त्यानंतर सिनेमा आला आणि मनोरंजनाचे मुख्य साधन झाला. पुढे टेलिव्हिजन, इंटरनेट वगैरे माध्यमे येत गेली. या सर्व ठिकाणच्या गोष्टींमधला तपशील बदलला तरी सुष्टदुष्ट हा मुळातला गाभा तसाच राहिला. काही ठिकाणी याच्या विपरीत झालेले दाखवले गेले तरी ते लोकांच्या मनाला भावत नाही.

माझ्या लहानपणच्या काळात म्हणजे साठपासष्ठ वर्षांपूर्वी दिलीपकुमार आणि राजकपूर हे नट आघाडीवर होते. त्यातल्या आजाद, गंगाजमुना यासारख्या दिलीपकुमारच्या सिनेमांना उत्तर भारतातल्या ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असायची तर आवारा, श्री ४२०, अनाडी यासारख्या राजकपूरच्या सिनेमातल्या बहुतेच घटना मुंबईतच घडत असत. बदल म्हणून कधी राजकपूरही चंबळच्या खोऱ्यात जाऊन "जिस देश में गंगा बहती है" म्हणायचा किंवा थंड हवेच्या ठिकाणी 'आह' भरायचा तर दिलीपकुमार सुटाबुटात स्मार्टपणे वावरायचा. ते काहीही असले तरी कथानकांमध्ये नायकनायिकांच्या जोडीला खलनायक हवाच. मग तो खेड्यातला जमीनदार, साहूकार किंवा डाकूंचा सरदार असेल किंवा शहरातला दादा, बदमाश, स्मगलर किंवा धनाढ्य व्यापारी, कारखानदार असेल. सुरुवातीपासून पहिल्या नव्वद टक्के भागात खलनायकाची सरशी आणि शेवटी काही चमत्कार होऊन त्याचा पाडाव हा ठरलेला फॉर्म्यूला असायचा.

प्रेक्षकांना काही वेगळी प्रेक्षणीय स्थळे दाखवण्यासाठी गोष्टींमध्ये सिमला, दार्जिलिंग, उटी वगैरे हिल स्टेशन्स किंवा गोवा, केरळ, लक्षद्वीप यासारखे सागरकिनारे आणले गेले. सिनेमा उद्योगाची आर्थिक परिस्थिती जरा बरी झाल्यानंतर थेट काश्मीरची पार्श्वभूमी आणली. त्यात आणखी सुधारणा झाल्यावर स्विट्झर्लंड, पॅरिस, लंडन, टोकियो करत सिनेमा इंटरनॅशनल झाला आणि त्यासोबतच खलनायकांचेसुद्धा प्रमोशन होऊन ते आंतरराष्ट्रीय टोळ्यांचे म्होरके झाले. वेगळ्या जागीही सिनेमातला सुष्टदुष्टांचा संघर्ष राहिलाच.

पण हे फक्त भारतातच होत असते असे नाही. मला जेंव्हापासून इंग्रजी वाचायला यायला लागले त्या काळापासून मी फँटम आणि मँड्रेकच्या कॉमिक्स वाचत आलो आहे. पुढे अॅस्टेरिक्स आणि टिनटिन आवडायला लागले. त्यातच हीमॅन, बॅटमॅन, सुपरमॅन आणिक कोणकोणते मॅन यांचे दौरे आले. या सगळ्या गोष्टींमध्ये 'गुड व्हर्सेस ईव्हिल' याच गाभ्यावर आधारलेल्या निरनिराळ्या गोष्टी असायच्या आणि अखेरीस गुडने बॅडवर मात केली की वाचक खुश ! इंग्रजी सामाजिक सिनेमांच्या गोष्टी त्याच तालावर असायच्या. युद्धपटांमध्ये जर्मनीजपान हे व्हिलन असल्यामुळे ते सगळे वाईट आणि ब्रिटिश अमेरिकन हीरो असे दाखवले जायचे.

युरोपअमेरिकेमधले लोक आपल्या दृष्टीने 'फॉरेन'मधे रहातच असल्यामुळे त्यांना बर्फाचे डोंगर किंवा उंच इमारती, प्रशस्त रस्ते वगैरेंचे काय कौतुक असणार? त्यांच्यासाठी अमेझॉनचे घनदाट जंगल किंवा पॅसिफिक महासागराच्या तळाशी असलेली झुडुपे अशा गोष्टी दाखवल्या गेल्या, पण त्या तरी किती पाहणार? मग त्यांची नजर अवकाशाकडे वळली. परग्रहावरून उडत्या तबकड्यांमधून आलेले माणसांसारखे एलियन्स किंवा विचित्र आकारांचे प्राणी यांच्या फिल्म्स आल्या. जुरासिक पार्कमध्ये लक्षावधी वर्षांपूर्वी नष्ट झालेले अजस्त्र डायनोसॉरस आणि इतर काही सॉरस पुन्हा भूमीवर अवतरले. 

पंचवीस वर्षांपूर्वी आलेली स्टार ट्रेक ही सीरियल चांगली हिट झाली. त्यातले कॅप्टन कर्क, मि.स्पॉक, डॉ.मॅकॉय आणि इतर क्र्यू मेंबर्स स्टारशिप यू एस एस एंटरप्राइज या स्पेसशिपमध्ये बसून निरनिराळ्या ग्रहावरील राक्षसांचे दमन करत असत. त्यांच्याकडे अनेक नवनव्या प्रकारची शस्त्रे असत तसेच हवे तेंव्हा एका ठिकाणी अदृष्य होऊन दुसऱ्याच ठिकाणी जाऊन प्रगट होण्याची कला असायची. या मालिकेत सायन्स फिक्शनचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला.

आल्बर्ट आइनस्टाइनने सापेक्षतावादाचा शोध लावल्यावर त्यातून निघालेल्या निष्कर्षांमधून टाइम मशीनची अफलातून कल्पना निघाली. या मशीनमध्ये बसून नायक, नायिका तसेच खलनायक क्षणार्धात शेकडो वर्षे भविष्यात किंवा भूतकाळात जाऊन वावरायला लागले. मग त्या काळात त्यांनी केलेल्या उचापतींचे वर्तमानकाळात काय परिणाम होतात यावर कल्पनेच्या भराऱ्या मारल्या गेल्या. हेही एक प्रकारचे सायन्स फिक्शन होते.

संगणकक्रांतीमुळे इतर क्षेत्रांप्रमाणेच मनोरंजनाच्या क्षेत्रातही उलथापालथ झाली. पूर्वी निरनिराळ्या पात्रांसाठी चित्रविचित्र पोशाख करावे लागत असत आणि त्याला मर्यादा असायच्या. ट्रिकसीन्ससाठी काही चमत्कार अरेंज करून दाखवावे लागायचे त्यासाठी भरपूर कष्ट करावे लागत असत. आता कॉंप्यूटर ग्राफिक्सच्या सहाय्याने कुठल्याही आकाराचे विचित्र प्राणी आणि पक्षीसुद्धा तयार करून त्यांना वाटेल तसल्या हालचाली करतांना दाखवता येतात.

सुपरमॅन, बॅटमॅन वगैरे हीरो एकएकटे संघर्ष करत असत. मार्वेल कॉमिक्सने अॅव्हेंजर्स नावाची अशा वीरांची टोळीच तयार केली. कॅप्टन अमेरिका, ब्लॅक विडो, हल्क, ठोर, आयर्नमॅन, ब्लॅक नाइट इत्यादी अनेक सुपर हीरोज मिळून अख्ख्या गॅलॅक्सीचे रक्षण करत असतात. मार्वेलने अॅव्हेंजर्सच्या सिनेमांची एक मालिका सुरू केली. मागील महिन्यात रिलीज झालेल्या अॅव्हेंजर्स - दि एंड गेम या सिनेमात सगळा मसाला ठासून भरला होता. निरनिराळ्या उपग्रहांवरील विचित्र आणि भयानक आकारांचे पशुपक्षी, किडेमुंग्या आणि टाइममशीनमधून हवे तेवढे भूतकाळात किंवा भविष्यकाळात जाण्यायेण्याची सोय, अनेक प्रकारची महाभयंकर शस्त्रास्त्रे वगैरेंमुळे त्यात प्रचंड वैविध्य आले आहे, थ्रीडीव्हिजन, सराउंड साउंड वगैरेमुळे ते सगळे चित्तथरारक प्रकार अगदी आपल्या आसपास घडत असल्याचा भास होतो. अशा सगळ्या गुणांनी युक्त असा हा सिनेमा जगातल्या हजारो थेटरांमध्ये एकदम प्रदर्शित झाला आणि तो पाहणाऱ्यांच्या गर्दीचे आणि उत्पन्नाचे जागतिक रेकॉर्ड्स मोडत चालला. पुण्यातल्याच अनेक मॉल्समधील मल्टिस्क्रीन थिएटरमधील सगळे ५-६ पडदे या सिनेमाला दिले होते आणि एरवी दिवसाकाठी होणारे चार पाच खेळसुद्धा हाउसफुल होत असल्याने शनिवार रविवारी आणखी जादा खेळ ठेवले होते.

थॅनोस नावाचा महाविध्वंसक राक्षस अद्भुत शक्तीशाली इन्फिनिटी स्टोन्सच्या सहाय्याने सगळ्या विश्वामधील अर्धी जीवसृष्टी गायब करतो तेंव्हा टोनी स्टार्क, नेब्यूला, बॅनर, स्टीव्ह, ठोर, नताशा, लँग्ज वगैरे अनेक अॅव्हेंजर्स एकत्र येऊन लढा देतात. टाइम मशीनमधून मागे जाऊन ते स्टोन्स काबीज करतात आणि नष्ट झालेल्या जीवांना परत आणतात, पण थॅनोस आपल्या सैन्यानिशी त्यांच्या ग्रहावर हल्ला करतो. त्याच्याशी घनघोर लढाई होते त्यात अनेक उलथापालथी झाल्यानंतर अखेरीला स्टार्क हा अॅव्हेजर त्या स्टोन्सचाच उपयोग करून थॅनोसला नष्ट करतो, पण त्यातून निघालेल्या अपार ऊर्जेमुळे त्याचाही बळी जातो. मात्र बाकीचे विश्व सुरक्षित राहते. अशा प्रकारे शेवट गोड होतो आणि सगळे प्रेक्षक आनंदात घरी जातात.

मी या मालिकेतला हा पहिलाच चित्रपट पाहिला असल्यामुळे अनभिज्ञ होतो, पण मुख्यतः किशोरवयातले आणि युवा प्रेक्षक प्रत्येक अॅव्हेंजर हीरो पडद्यावर दिसला रे दिसला की टाळ्या आणि किंकाळ्यांनी त्याचे स्वागत करत होते आणि त्याने केलेल्या प्रत्येक प्रहारावर गलका करून थिएटर डोक्यावर घेत होते. अशा प्रकारचा प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मी पहिल्यांदाच पहात होतो. मला मात्र मुख्य पात्रेच ओळखीची नसल्यामुळे थेटरमधल्या आरडाओरडीमधूनच आलेले पात्र सुष्ट आहे की दुष्ट आहे त्याचा अंदाज होत होता. मला तर सगळेच अक्राळ विक्राळ दिसत होते किंवा त्यांनी तसले मुखवटे लावले होते. जे त्यातल्या त्यात जास्त भयानक आणि हिडीस आणि कुत्सित किंवा विकराल हास्य करणारे ते दुष्ट राक्षस अशी मी एक खूणगाठ बांधून घेतली होती, पण केंव्हा केंव्हा माझा अंदाज चुकतही होता. मुख्य खलनायकाने कितीही विध्वंस केला तरी शेवटी त्याचा नाश होणारच हा माझा अंदाज मात्र बरोबर ठरला.


No comments: