Thursday, May 02, 2019

मराठीतली विरामचिन्हे (. , ? ! ' ")माझे शिक्षण मराठी माध्यमात झाले. अर्थातच मी आधी मराठी भाषा शिकलो. मला मराठीमधली अक्षरे, शब्द, वाक्यरचना, विरामचिन्हे वगैरे समजायला लागली आणि मी त्या भाषेतील पुस्तके वाचायला लागलो. त्यानंतर अनेक वर्षांनी मी मराठीमधून इंग्रजी शिकलो आणि त्या भाषेतले वाचन आणि लेखन सुरू केले. या दोन्ही भाषांच्या लिपी अगदी भिन्न आहेत. मराठीमध्ये कखगघ या सारखी अनेक व्यंजने आहेत आणि त्यांना काना, मात्रा आणि वेलांट्या लावून बाराखड्या केल्या असल्याने अक्षरशः शेकडो निरनिराळी अक्षरे आहेत, त्याशिवाय जोडाक्षरे निराळीच. इंग्रजीत फक्त २६ अक्षरे आहेत आणि स्पेलिंग हा एक वेगळा प्रकार आहे. असे असले तरी पूर्णविराम (.), स्वल्पविराम,(,) प्रश्नचिन्ह (?), उद्गारवाचक चिन्ह (!), कंस () वगैरेंसाठी मात्र तीच चिन्हे कां असतात या एका गोष्टीचे मला आश्चर्य वाटायचे. इतकेच नव्हे तर ती इंग्रजांनी आपल्याकडून उचलली असतील का असेही वाटायचे.

मराठी भाषेचा इतिहास पहायला गेला तर तो अनेक शतकांचा आहे आणि संस्कृत भाषेपासून सुरुवात करायची झाली तर तो हजारो वर्षांचा म्हणावा लागेल. शिलालेख, ताम्रपट, भूर्जपत्रे, खलिते, बखरी वगैरेंमधून इतिहासाबद्दल माहिती मिळते. पण मी पुराणवस्तूसंग्रहालयांमध्ये किंवा पुरातन देवळे, किल्ले वगैरे जागी असले जितके अवशेष पाहिले त्यातून मला तरी काही बोध झाला नाही. एक तर ती लिपीच माझ्या ओळखीची नसायची, असलीच तरी त्यातले सगळे शब्द सलग लिहिलेले असायचे, त्यातून ते वेगळे करून काढले तरी ते अनोळखी असायचे आणि एकादा ओळखीचा शब्द मिळाला तरी त्याचा संदर्भ लागायचा नाही. म्हणजे माझ्या अक्कलखात्यात काहीही भर पडायची नाहीच. माझ्या लहानपणी आमच्या घरी काही जुन्यापुराण्या जीर्ण जर्जर पोथ्या होत्या. त्यांची सगळी पाने सुटी असायची आणि दोन चपट्या लाकडी फळ्यांमध्ये ठेवलेली असायची. आजोबा, पणजोबांच्या काळातले काही दस्तऐवज होते ते मोडी लिपीत होते. मी त्या पोथ्या एक एक अक्षर करून आईला वाचून दाखवत असे आणि हळू हळू मलाही त्या थोड्या समजायला लागल्या होत्या. जुन्या काळातल्या मोडी दस्तऐवजाला हात लावायला मुलांना परवानगी नव्हती.

या सगळ्या जुन्या काळातल्या मराठी लेखनामधून मला एक गोष्ट दिसली की यात कुठेही विरामचिन्हे नसायची. सगळे संतवाङमय तर पद्य रूपातच होते. त्यात प्रत्येक चरणाच्या शेवटी एक दंड किंवा उभी रेघ आणि श्लोक किंवा ओवीच्या अखेरीला दोन उभ्या रेघा मारून त्यांना वेगळे करत असत. पण पद्यातली वाक्यरचना कर्ता, कर्म, क्रियापद या क्रमानुसार असण्याची गरज नसते. त्यामुळे मराठी गद्य ज्या स्वरूपात वाचण्याची आपल्याला संवय आहे किंवा ज्या स्वरूपात हा लेख लिहिला आहे अशा प्रकारचे लेखन इतिहासकाळात होत नसावे. त्या काळातल्या लेखनाचे काही नमूने वरील चित्रात दिले आहेत. यातले हजार बाराशे वर्षे जुने शिलालेख वाचून ते मराठी भाषेतलेच आहेत असे ठामपणे सांगू शकणाऱ्या पंडितांचे मला प्रचंड कौतुक वाटत आले आहे. 

आपल्या ओळखीची मराठी भाषासुद्धा निदान दीडशे वर्षे तरी जुनी आहेच कारण टिळक - आगरकर यांचे लेख किंवा देवल - किर्लोस्कर यांची नाटके या स्वरूपात आहेत. मग हे प्रत्येक शब्द सुटा लिहिलेले आणि विरामचिन्हांनी युक्त असलेले मराठी भाषेतले लेखन कधीपासून सुरू झाले असेल? पूर्वीच्या काळी अशा प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी खास वाचनालयांमध्ये जाऊन विशिष्ट पुस्तके धुंडाळावी लागायची आणि हे माझ्यासाठी शक्यच नव्हते. पण आता गगलबुवांच्या कृपेमुळे कसलीही पायपीट न करता घरबसल्या बरीच माहिती अगदी सहजपणे आणि फुकटात उपलब्ध होते.  त्यावरून माहिती घेता समजले की या बाबतीतसुद्धा आपल्याला इंग्रज साहेबांचे आभार मानायला हवेत.

आपल्याकडल्या पेशवाईचा ऱ्हास चालू असतांनाच इंग्रजांनी मुंबईला आपले ठाणे वसवले होते आणि इथला प्रदेश गिळंकृत करायचा उद्योग सुरू केला होता. त्या काळात भारतात पाठवल्या जाणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांना इंग्लंडमध्येच मराठी भाषेचे धडे देऊन पाठवत असत. त्यांच्यातल्या मोल्सवर्थ, कँडी आदि काही लोकांना मराठी भाषेची गोडी लागली आणि त्यांनी या भाषेतला शब्दकोष, व्याकरण इत्यादींवर मन लावून आणि कंबर कसून काम केले. त्यांनीच युरोपियन भाषांमध्ये प्रचलित असलेली विरामचिन्हे मराठीत वापरायची पहिल्यांदा सुरुवात केली आणि तशा प्रकारे काही पुस्तके लिहिली. यामागे मराठीभाषिक लोकांना इंग्रजी शिकवून आपल्या बाजूला वळवणे आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणे ही त्यांची उद्दिष्टे असली तरी त्यांच्या प्रयत्नांमुळे गद्य मराठी लेखनाला एक नवे स्वरूप प्राप्त झाले. छापखाने सुरू झाल्यामुळे त्याचा प्रसार झपाट्याने होण्याला मदत झाली. त्याच काळात होऊन गेलेले दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी या इंग्रजांच्या कल्पना उचलून घेऊन आणि त्यांचा उपयोग करून घेऊन मराठी भाषेतले व्याकरण लिहिले आणि गद्य लेखन अशा प्रकारे लिहिण्याचा जो पायंडा पडला तो आपण दीडशे वर्षे पाळत आलो आहोत. स्वातंत्र्यानंतर सरकारी प्रयत्नामधून काही समित्या स्थापन झाल्या आणि त्या मराठी भाषेच्या वापराबद्दल काही सूचना देत असतात पण त्याच्या स्वरूपात मूलभूत बदल होण्याची शक्यता मला तरी दिसत नाही. किंबहुना तसे करण्याचे काही कारणही नाही.

No comments: