Monday, June 03, 2019

एडवर्ड जेन्नर आणि लसीकरणाची सुरुवात


प्राचीन काळापासून माणसाला आजार होत आले आहेत आणि तो त्यावर उपचारही करत आला आहे. रोगांच्या लक्षणावरून त्यांचे निदान करणे आणि त्यावर योग्य औषधोपचार करणे या बाबतीत भारतीय वैद्यराजांनी खूप मोठे काम करून आयुर्वेद तयार केला. त्यात अनेक रोगांची लक्षणे आणि त्यावरील उपचार सांगितले आहेत. त्यांचा उपयोग आजवर केला जात आहे. योग्य आहार, व्यायाम आणि प्राणायाम वगैरे करून निरोगी राहण्याचे मार्गदर्शनसुद्धा आयुर्वेदामध्ये केले आहे.  चीन, मध्यपूर्व आणि युरोपमध्येसुद्धा डॉक्टर किंवा हकीम या पेशाचे तज्ज्ञ तिथल्या रोग्यांना तपासून त्यांच्यावर निरनिराळ्या पद्धतीचे उपचार करत असत. असे असले तरी एकादा आजार नेमका कशामुळे होतो हे सांगणे त्या मानाने कठीण होते आणि तो होऊ नये यासाठी आधीच प्रतिबंधात्मक उपाय करणे त्याहूनही अवघड होते. त्या बाबतीत फारशी माहितीच उपलब्ध नव्हती. शरीराचे कार्य खाण्यापिण्यामधून किंवा इतर काही कारणाने बिघडले तर व्याधी होतात इथपासून ते पूर्वजन्माचे प्राक्तन असते किंवा चेटूक, करणी वगैरेमुळे रोग होतात इथपर्यंत अनेक कारणे दिली जात होती, पण सूक्ष्मदर्शक यंत्रांचा शोध लागेपर्यंत अतीसूक्ष्म असे रोगजंतू असतात हेच ठाऊक नव्हते. त्यामुळे त्यांच्यामुळे रोग होत असतील असा विचारच कुणाच्या मनात येत नव्हता. गेल्या दोनशे वर्षांमध्ये रोगांना प्रतिबंध करण्याच्या दिशेने बरीच प्रगति झाली आहे आणि जुन्या काळातले बरेचसे साथीचे आजार आता आटोक्यात आले आहेत. इंग्लंडमधले डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांनी या क्षेत्रातले पहिले मोठे पाऊल टाकले. व्हॅक्सिनेशन या रोगप्रतिबंधक क्रियेचे ते जनक मानले जातात.

एडवर्ड जेन्नर (१७४९ ते १८२३) याचा जन्म इंग्लंडमधल्या एका ख्रिश्चन धर्मगुरूच्या घरी झाला. त्या काळातही शिक्षणसंस्था आणि चर्च एकत्र असल्यामुळे त्याला व्यवस्थित शालेय आणि कॉलेजचे शिक्षण मिळाले आणि तो एक तज्ज्ञ डॉक्टर होऊन व्यवसाय करायला लागला. त्याबरोबरच नेहमी इतर डॉक्टरांशी संपर्क ठेऊन आणि त्यांच्याबरोबर चर्चा व विचारविनिमय करून त्या क्षेत्रातल्या संशोधनातही तो भाग घेऊ लागला. त्याशिवाय त्याला पशुपक्ष्यांच्या अभ्यासातही रस होता आणि तो निरनिराळे प्राणी आणि पक्षी बाळगून त्यांच्यासोबत वेळ घालवत असे. त्यांच्यावर त्याने लिहिलेल्या अभ्यासपूर्ण लेखांचे कौतुक होत होते. डॉक्टर असल्यामुळे त्याला माणसाच्या शरीरशास्त्राचे ज्ञान होतेच, पशुपक्ष्यांच्या अभ्यासाबरोबर त्यांची शरीरे, त्यांना होणारे रोग याकडेही त्याने बारीक लक्ष दिले.

अठराव्या शतकातल्या काळात स्मॉल पॉक्स किंवा देवी हा युरोपमधला एक प्रमुख घातक आजार होता. या आजाराच्या साथी येत असत तेंव्हा त्याची मोठ्या प्रमाणात लागण होऊन त्यातले खूप रोगी दगावत असत. बरे झाल्यानंतरही त्याचे व्रण त्यांच्या अंगभर रहात असत. त्यामुळे कायमचा विद्रूपपणा येत असे. या रोगाला कसा आळा घालावा हेच समजत नव्हते. अशक्त, दुर्बळ लोकांचे एकाद्या रोगाला बळी पडणे जरासे समजण्यासारखे असते, पण अनेक निरोगी आणि धडधाकट लोकसुद्धा अचानक या आजाराचे बळी पडत होते. त्यामुळे लोकांमध्ये या रोगाची दहशत होती.

या रोगाचा अभ्यास करतांना असे दिसत होते की जो माणूस एकदा देवीच्या आजारातून जगला वाचला असेल त्याला मात्र हा आजार पुन्हा कधी होत नसे. शिवाय जेन्नर आदि डॉक्टरांच्या असेही लक्षात आले की गवळी, गुराखी यासारख्या गायींच्या जवळ रहाणाऱ्या लोकांना देवीचा आजार कमी प्रमाणात होत असे. त्या काळातल्या जनावरांनासुद्धा काऊपॉक्स या नावाचा एक रोग होत होता आणि संसर्गामुळे हा रोग या गवळ्यांनाही होत असे. तो आजारसुद्धा काही प्रमाणात देवीसारखाच होता, पण त्याची तीव्रता देवीच्या मानाने खूप कमी असायची. तो रोग देवीसारखा प्राणघातक नव्हता. या दोन गोष्टीवर विचार करून जेन्नरने एक निर्णय घेतला आणि तो अंमलात आणला. त्या काळातल्या कायद्यांमध्ये असे प्रयोग करणे शक्य होते.

इसवी सन १७९६मध्ये त्याने एका दूधवालीला (मिल्कमेडला) काउपॉक्समुळे झालेल्या फोडामधला पू काढला आणि तो एका माळ्याच्या मुलाच्या हातावर टोचला. यामुळे त्या मुलाला काउपॉक्स होऊन आधी ताप आला पण त्यातून तो लगेच बराही झाला. त्यानंतर जेन्नरने त्या मुलाला देवीच्या रोग्याशी संसर्ग होऊ दिला, पण त्याला त्या रोगाची बाधा मात्र झाली नाही. त्यानंतर जेन्नरने हा प्रयोग इतर अनेक लोकांवर केला आणि तो पूर्णपणे यशस्वी झाला. लोकांच्या मनात देवीच्या रोगाची प्रचंड भीती बसलेली असल्यामुळे लोकही या प्रयोगासाठी तयार होत होते. त्याने जेन्नरचा आत्मविश्वास इतका वाढला की त्याने स्वतच्या लहान बाळालाही या प्रकारचे लसीकरण करून त्याला देवीच्या रोगापासून संरक्षण मिळवून दिले.

जेन्नरने केलेल्या या प्रयोगांना युरोपातसुद्धा खूप प्रसिद्धी मिळाली. त्या काळात इंग्लंडचा शत्रू असलेल्या फ्रान्सचा राजा नेपोलियन यानेसुद्धा जेन्नरचा सन्मान केला. इंग्लंडच्या राजाने तर त्याला प्रोत्साहन आणि आर्थिक सहाय्य दिलेच. यामुळे आपला वैद्यकीय व्यवसाय सोडून मोठ्या प्रमाणात देवीची लस तयार करणे आणि ती जास्तीत जास्त लोकांना टोचणे हेच त्याचे मुख्य काम झाले. या क्रियेला व्हॅक्सिनेशन हे नावही त्यानेच दिले. लसीकरणाच्या मोहिमेमुळे इंग्लंडमधली देवीची साथ आटोक्यात आणता आली आणि लक्षावधी लोकांचे प्राण वाचले, तसेच त्यामुळे होणाऱ्या यातना आणि येणारी विद्रूपता यातून ते वाचले. म्हणूनच इंग्लंडमधल्या १०० श्रेष्ठ लोकांमध्ये जेन्नरची गणना केली जाते.

इथे हे लक्षात घेणे जरूरीचे आहे की सर्व संसर्गजन्य रोग रोगजंतूंमुळे होतात आणि ते संसर्गामधून इतर लोकांमध्ये पसरतात याचा शोध लुइ पाश्चरने नंतरच्या काळात लावला. पण त्याच्याही आधीच एडवर्ड जेन्नरने प्रयोगामधून  त्यातल्या देवी या एका प्रमुख रोगावर प्रतिबंधक उपाय शोधून काढला होता आणि तो सप्रयोग सिद्ध करून दाखवला होता. असंख्य लोकांना त्याचा फायदा झाला होता. त्यानंतर व्हॅक्सिनेशनचा प्रसार जगभर झाला आणि स्मॉलपॉक्स या रोगाचे संपूर्णपणे निर्मूलन करण्यात आले. शरीरातली रोगप्रतिबंधक शक्ती (इम्यूनिटी) कशा प्रकारे काम करते याचा अभ्यास हे वैद्यकीय शास्त्रामधले एक नवे संशोधनाचे क्षेत्र निघाले आणि त्या संशोधनातून इतरही अनेक रोगांसाठी प्रतिबंधक उपाय योजण्यात आले.

-----------------------------------------------------

2 comments:

unanimous said...

माझ्या माहितीप्रमाणे डॉ.जेन्नरला ही कल्पना मध्य आशियांत केल्या जाणाऱ्या एका उपचारावरून सुचली. प्रत्यक्ष प्रयोगाचा आधार देण्याचे श्रेय मात्र त्याचे आहे

Anand Ghare said...

दोनशे वर्षांपूर्वी कुणाला कोणती कल्पना कशी सुचली वगैरेवर कशाला चर्चा करायची? कल्पना सुचण्यापेक्षा ती अंमलात आणणे अधिक महत्वाचे आहे.