Monday, August 07, 2017

सिंहगड रोड - भाग ५- ६ ( धायरी आणि धारेश्वर मंदिर)

सिंहगड रोड - भाग ५ (धायरी)

लहानपणापासूनच माझ्या मनात सिंहगड या शब्दाभोंवती एक उज्ज्वल ऐतिहासिक वलय होते. कदाचित त्यामुळे सिंहगड रोडबद्दलसुध्दा थोडे कुतूहल निर्माण झाले होते, पण त्या रस्त्यावरून प्रत्यक्षात एक दोन वेळा गेल्यानंतर ते मावळले. पन्नास वर्षांपूर्वी मी पुण्यात शिक्षण घेत असतांनाच्या काळात जसा सिंहगड रोड हा एक पुणे शहराच्या बाहेर जाणारा रस्ता होता त्याचप्रमाणे कर्वे रोड आणि पौड रोड हे सुध्दा त्या काळात गांवाबाहेरचेच रस्ते होते. पण नंतरच्या काळात त्या दोन रस्त्यांच्या आजूबाजूने नवनवीन वस्त्या निर्माण होत गेल्या आणि त्यांचा झपाट्याने विकास होत गेला. एकविसावे शतक उजाडेपर्यंत माझ्या ओळखीतली कांही जुनी मंडळी या भागात रहायला गेली होती आणि पुण्यात नव्याने आलेल्या लोकांनी तिथे घरे घेतली होती. माझे त्यांच्याकडे जाणे, येणे, राहणे व्हायला लागले होते. त्यामुळे पुण्याचे ते नवे भाग माझ्या माहितीतले होत होते. पण त्या मानाने पाहता सिंहगड रोड जरासा मागे राहिला होता. त्या भागात मोठमोठी हॉस्पिटल्स, कॉलेजे, उद्याने, थिएटरे, भव्य इमारती वगैरेसारख्या ठळक दिसणा-या खुणा तयार झाल्या नव्हता. मला कामासाठी तिकडे जाण्याची गरज पडत नव्हती. त्या भागातली दुकाने आणि बाजारपेठांमध्ये तुलनात्मक दृष्ट्या कमी झगमगाट व गजबजाट दिसत होता. २०११-१२ मध्ये मला दिसलेला धायरी भाग तर अजूनही मागास वर्गात मोडण्यासारखा वाटत होता. माझे तोंपर्यंतचे बहुतेक आयुष्य अणुशक्तीनगर आणि वाशीसारख्या सुनियोजित आणि टिपटॉप वसाहतींमध्ये आणि उच्चशिक्षित वर्गामधील लोकांमध्ये गेले असल्यामुळे आपण स्वतः या ग्रामीण वाटत असलेल्या धायरीमध्ये येऊन रहावे असा विचार त्या वेळी माझ्या मनात आला नाही.

पण नियतिची चक्रे आपल्याला अज्ञात अशा पध्दतीने फिरत असतात. तीनचार वर्षांच्या काळात माझा मुलगा धायरीला रहायला गेला आणि आम्ही त्याच्याबरोबर रहायला पुण्याला आलो, त्या भागातले रहिवासी झालो आणि "आम्ही ना, हल्ली सिंहगड रोडवर राहतो." असे सर्वांना सांगायला लागलो.

आपल्या वास्तव्याच्या नव्या भागाची माहिती तर करून घ्यायला हवीच ना ! मी थोडे हिंडून फिरून आणि विचारपूस करून ती करून घेली. धायरी हे पुरातन काळापासूनचे मूळ खेडेगाव सिंहगड रोडपासून काही अंतरावर वसलेले आहे. जुन्या मुख्य पुणे शहराबाहेर पडल्यावर दत्तवाडी, हिंगणे खुर्द, विठ्ठलवाडी वगैरे पूर्वीच्या वस्त्या लागतात. त्यांना मागे टाकून वडगांव बुद्रुक पार केल्यानंतर सिंहगड रस्ता खडकवासल्यावरून सिंहगडाकडे जातो आणि त्याच्या डाव्या बाजूला येऊन मिळालेला रस्ता धायरी गांवाकडे जातो. खरे तर तिकडे जाणा-या त्या रस्त्याचे नाव धायरी फाटा असे होते. पण एकविसाव्या शतकात या जवळ जवळ दोन किलोमीटर लांब रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भरपूर वस्ती वाढत गेली. आता हा सगळाच भाग धायरी या नावाने ओळखला जातो आणि जिथे हे रस्ते मिळतात त्या कोप-याला धायरी फाटा म्हणायला लागले आहेत.

त्या रस्त्यावर अनेक जुनी, नवी देवळे आहेत. फाट्याजवळ आधी गारमाळ नावाची वस्ती लागते. तिथून पुढे गेल्यावर नवशा गणपतीचे देऊळ लागते त्या भागाला गणेशनगर म्हणतात. आणखी पुढे गेल्यावर लागणा-या चौकात उंब-या गणपतीचे देऊळ लागते. तिथून एक रस्ता उजवीकडे डी एस के विश्व, नांदेड गाव वगैरेकडे जातो आणि दुसरा डावीकडे बेणकर वस्ती, रायकर मळा, न-हे गाव वगैरेंकडे जातो. चौकात न वळता समोर थोडेसेच पुढे गेल्यावर भैरवनाथाचे मोठे मंदिर आहे. तिथून जुने धायरी गांव सुरू होते. धायरी ग्रामपंचायतीची हद्द आणि पुणे महापालिकेची हद्द दाखवणारा एक लहानसा फलक त्या रस्त्याच्या कडेला दिसतो. तो दिसला नाही तर आपल्याला काहीही फरक जाणवत नाही इतके पुणे महानगरपालिका आणि धायरी ग्रामपंचायत हे आता सलग झालेले आहेत. धायरी गांवाचा जुना भाग अजूनपर्यंत पुणे महानगराच्या सीमेपलीकडे असला तरी आतासुध्दा पी एम पी एल बसेस धायरी गावात जातातच, लवकरच पूर्ण धायरी भाग पुणे शहरात विलीन होणार असल्याची घोषणा झाली आहे.

या धायरी रस्त्याला दोन्ही बाजूंना फुटत जाणा-या गल्ल्यांना १, २, ३, ४ असे क्रम दिले आहेत. त्यामुळे पत्ता सापडणे सोपे आहे. या गल्ल्यांना एकमेकांना जोडणारे रस्तेच नाहीत. त्यामुळे या भागात गल्लीबोळांचे जाळेही नाही. एकाद्या उभ्या सरळसोट झाडाला आडव्या फांद्या फुटत जातात आणि त्या एकमेकांपासून दूर दूर जातात तशी या गावाची रचना आहे. एका गल्लीमधल्या टोकाच्या घरामधून शेजारच्याच गल्लीच्या टोकाच्या घरी जायचे असेल तर मुख्य रस्त्यापर्यंत येऊन तिकडे जावे लागते. आमचे घर धायरी गांवाकडे जाणा-या या रस्त्यावरील अशाच एका गल्लीच्या टोकाशी आहे.
............. 

सिंहगड रोड - भाग ६ (धारेश्वर मंदिर)




धायरीतल्या रस्त्यांवरून चालत जातांना एक वेगळी गोष्ट जाणवते. धारेश्वर मेडिकल, धारेश्वर प्रोव्हिजन्स, धारेश्वर फॅब्रिकेशन, धारेश्वर एंटरप्राइजेस अशा प्रकारची धारेश्वर या नावाची अनेक दुकाने इथे जागोजागी दिसतात. एक दुकान नजरेआड जायच्या आत बहुधा दुसरे दिसतेच. धायरी हे गावच धारेश्वरमय असल्यासारखे दिसते. याचे कारण इथल्या धारेश्वर या स्थानिक दैवतावर धायरीवासियांची अमाप भक्ती आहे. धारेश्वर हे सुध्दा रामेश्वर, त्र्यंबकेश्वर यासारखेच भगवान शंकराचे एक नाव आहे. धायरी गावाचा अधिपती म्हणून धायरेश्वर किंवा धारेश्वर अशी एक व्युत्पत्ती कदाचित असावी असे काही लोकांना वाटते, पण महादेवाचे हे नांव जास्त प्रचलित नसले तरी महाराष्ट्रात आणि बाहेरही इतर कांही ठिकाणी या नावाची शंकराची देवळे आहेत. त्यामुळे कदाचित आधी धारेश्वराचे देऊळ बांधले गेले असेल आणि त्याच्या सोबतीने आजूबाजूला धायरी गाव वसले असेल अशीही शक्यता वाटते.

धायरी हे गाव आणि धारेश्वराचे देऊळ हे दोन्ही छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळापासून आहेत, राजे आणि त्यांचे शूर मावळे या महादेवाच्या दर्शनाला येत असत असे इथे सांगितले जाते. तसे लिहिलेला फलक किंवा शिलालेख वगैरे काही मला त्या जागी दिसला नाही. धायरी गावाला लागूनच असलेल्या एका उंचवट्यावर हे मंदिर बांधलेले आहे. नक्षीदार खांब, सुबक आकाराच्या कमानी वगैरेंनी नटलेला प्रशस्त सभामंटप, बंदिस्त गाभारा, त्यावर उंच निमुळते शिखर वगैरे पारंपरिक पध्दतीच्या रचनेचे असले तरी ते देऊळ मला तरी खूप पुरातन किंवा ऐतिहासिक काळातले वाटत नाही. पुरातत्वखात्याचा बहुभाषिक माहिती किंवा सूचना फलक या जागेवर दिसत नाही आणि या जागेवर त्यांचे नियंत्रणही नाही.

कदाचित मूळचे मंदिर खूप जुने असेल आणि वेळोवेळच्या राज्यकर्त्यांनी त्यात भर टाकली असेल किंवा त्याचा जीर्णोध्दार केला असेल. रायकर, चाकणकर वगैरेसारख्या धायरीतल्या प्रतिष्ठित धनिक कुटुंबांनी दिलेल्या देणग्या आणि केलेल्या सुधारणा दाखवणा-या संगमरवरी शिला या देवळात बसवलेल्या आहेत. हे मंदिर कुणी बांधले, कधी बांधले, हे किती जुनेपुराणे आहे किंवा नाही याच्याशी इथे येणा-या श्रध्दाळू भक्तजनांना काही देणे घेणे नसतेच. देवदर्शन आणि प्रार्थना करण्यासाठी ते मोठ्या संख्येने इथे येत असतात.

महादेवाचे मुख्य मंदिर मध्यम आकाराचे आहे. देवळाच्या बाहेर समोरच एक सुबक अशी नंदीची काळ्या दगडामधली कोरीव मूर्ती आहेच, शिवाय देवळाच्या आत प्रवेश केल्यावर नंदीची पितळेची आणखी एक प्रतिमा आहे. सभामंटपाचा उंबरा ओलांडून तीन चार पाय-या खाली उतरून गाभा-यात जावे लागते. तिथल्या लादीमध्ये केलेल्या वीतभर खळग्याच्या आत शिवलिंग आहे. ते बहुधा स्वयंभू असावे असे त्याच्या आकारावरून वाटते. नैसर्गिक खडकांच्या आकारानुसार अशी रचना केली असेल. कोणीही भाविक या देवळात थेट गाभा-यापर्यंत जाऊ शकतो. शिवलिंगाला स्पर्श करू नये अशी सूचना मात्र तिथे लिहिली आहे. त्यावर फुले, पाने, माळा वगैरे वाहू शकतात.

महाशिवरात्रीला इथे दर्शनासाठी प्रचंड गर्दी होतेच, पण श्रावणातल्या दर सोमवारीसुध्दा बरीच गर्दी होते. तिचे नियमन करण्यासाठी देवळाच्या बाजूलाच मोठा मांडव घालून त्यात रांगेने उभे राहण्याची व्यवस्था केली जाते. शिवाय गाभा-याच्या भिंतीवर एक मोठा आरसा अशा खुबीने लावून ठेवला आहे की सभामंटपामधूनच आतील शिवलिंगाचे दर्शन घेता येऊ शकते. त्यामुळे काही भाविक फार वेळ रांगेत उभे न राहता ते आरशातले दर्शन घेऊ शकतात.

देवळासमोरील नंदीच्या दोन्ही बाजूंना दोन उंच दीपमाळा आहेत. उत्सवांच्या वेळी रात्रीच्या तिथे दिवे लावले जातात. देवळावरही विजेच्या दिव्यांची रोशणाई करतात. मंदिराच्या सभोवती चांगले प्रशस्त मोकळे आवार आहे. बाजूला इतर देवतांच्या लहान लहान घुमट्या आहेत. एका बाजूला कट्ट्यावर जुन्या काळातले देव मांडून ठेवलेले आहेत. संपूर्ण आवाराला चांगली फरसबंदी केली आहे आणि कठडा बांधला आहे. रस्त्यापासून देवळापर्यंत जाण्यासाठी दोन बाजूंनी चांगल्या पाच सहा मीटर रुंद आणि चढायला सोप्या अशा पन्नास साठ दगडी पाय-या बांधलेल्या आहेत. पाय-या चढून वर गेल्यानंतर पादत्राणे ठेवायची व्यवस्था आहेच, त्याच्या बाजूला पाण्याचे नळ लावून ठेवले आहेत. सगळ्या लोकांनी देवळात प्रवेश करण्याच्या आधी हात पाय धुवून पवित्र होऊन पुढे जावे अशी अपेक्षा असते आणि तशी सूचना लिहिलेली आहे.    

भाविकांची बरीच गर्दी असली तरीही या मंदिराच्या आवारात खूप स्वच्छता बाळगली जाते, कुठेही कचरा पडलेला किंवा साठलेला दिसत नाही. देवळाचे आवार जमीनीपासून बरेच उंचावर असल्यामुळे माथ्यावर भरपूर वारा असतो, आजूबाजूला रम्य निसर्ग आहेच. मुख्य रस्त्यापासून दूर असल्यामुळे तिथपर्यंत रहदारीचा आवाज येत नाही. यामुळे या जागी गेल्यावर मनाला शांत आणि प्रसन्न वाटते. या मंदिरात श्रावण सोमवार आणि महाशिवरात्रीसारख्या दिवशी अनेक धार्मिक कार्यक्रम चाललेले असतात. पाय-यांच्या खालच्या परिसरात छोटी जत्रा भरते. मुलांची खेळणी, फुगे, भाजीपाला, धार्मिक पुस्तके, मिठाई, लहान सहान उपयोगी वस्तू वगैरेंचे तात्पुरते स्टॉल लागतात. मुलांच्या मनोरंजनासाठी गोल फिरणारे हत्ती घोडे (मेरी गो राउंड) आणि तिरप्या प्रचंड चक्राचे पाळणे (जायंट व्हील्स) असतात. हवा भरलेल्या मोठमोठ्या रबरी गाद्यांवर अगदी छोटी मुले नाचत असतात किंवा त्यांच्या घसरगुंड्यांवर घसरत असतात. देवदर्शनाचा धार्मिक आनंद मिळतोच, शिवाय ही सगळी मौज पाहून मन उल्हसित होते.

No comments: