Monday, July 10, 2017

सिंहगड रोड - भाग ३


त्या गोष्टीनंतर आणखी कांही वर्षांच्या काळात माझ्या माहितीतली काही कुटुंबे सिंहगड रोडवरील आनंदनगर, वडगांव, धायरी वगैरे भागात रहायला गेली किंवा तिकडे रहात असलेल्या काही लोकांशी माझा नव्याने परिचय झाला. त्यांच्या बोलण्यातून तो परिसर माझ्या ओळखीचा होऊ लागला. पंधरासोळा वर्षांपूर्वी मला आमच्या अगदी जवळच्या आप्तांकडून एक आगळ्या स्वरूपाची लग्नाची आमंत्रणपत्रिका आली. त्या विवाहसोहळ्यात फारसे धार्मिक विधी नव्हते, मुहूर्ताची वेळसुध्दा दिलेली नव्हती. अमूक तारखेला सकाळपासून सर्वांनी एका ठिकाणी जमायचे, यजमान कुटुंबाला आणि एकमेकांना भेटायचे, वधुवरांना आशीर्वाद द्यायचे आणि दिवसभर मजेत घालवायचा असा झकास कार्यक्रम होता. त्या अजब कार्यस्थळाचा पत्ता दिला होता 'अभिरुचि कॉटेज रेस्टॉरेंट, भिडे बाग, वडगांव बुद्रुक, सिंहगड रोड'. आम्हाला तिथे जायलाच तर हवेच होते, शिवाय हा एक नवा अनुभव, ती वेगळ्या प्रकारची लग्नसमारंभाची जागा आणि अजून न पाहिलेला सिंहगड रोड या सगळ्यांचे मला आकर्षण होते. आम्ही ठरल्याप्रमाणे पुण्याला जाऊन तिथला सिंहगड रोड गाठला आणि तो पहात पहात, विचारपूस करत वडगांवपर्यंत गेलो. तिथून पुढे जातांना आमची गाडी एका मोठ्या फ्लायओव्हरच्या खालून पलीकडे गेली. वरून जाणारा रस्ता म्हणजे मुंबईपुणे द्रुतगति महामार्गाचाच पुढे बंगलोरकडे जाणारा विस्तार होता असे समजले. तो महामार्ग कात्रजला जाऊन जुन्या सातारा रोडला मिळत होता. कात्रजच्या घाटालाच टाळणारा (बायपास करणारा) नवा बोगदा त्यानंतरच्या काळात तयार झाला.

बंगलोर हायवे पार करून पुढे गेल्यावर थोड्याच अंतरानंतर भिडे बाग आली. ते एक निसर्गसुंदर असे रिसॉर्ट होते. त्यात एकाद्या खेड्याचा देखावा तयार केला होता. खूप लहान मोठी झाडे होती, त्यांच्या आड एक दोन खोल्या असलेली लहानगी कॉटेजेस थोड्या थोड्या अंतरावर जराशी अस्ताव्यस्त वाटतील अशी बांधलेली होती, फुलझाडांचे अनेक ताटवे होते, त्यांना आणि झाडांना वळसे घालत वळणावळणाने जाणा-या अरुंद पायवाटा होत्या. स्वादिष्ट खाण्यापिण्याची छानशी व्यवस्थादेखील मोठ्या झोपडीसारख्या दिसणा-या जागेत केली होती. त्या जागेतले एकंदर वातावरणच एकदम शांत आणि प्रसन्न होते. आपण एका महानगराच्या आसमंतात आहोत हे विसरायला लावणारे होते. व्यवस्थित निगा राखलेली निरनिराळ्या प्रकारची आणि आकारांची झाडे, त्यांची विविध आकाराची पाने, रंगीत सुंदर फुले, त्यावर भिरभिरणारी फुलपाखरे, मधूनच दिसणारे रंगीबेरंगी पक्षी, शांत वातावरणात स्पष्टपणे ऐकू येणारी त्यांची गोड किलबिल वगैरे सगळे काही आम्हा शहरवासियांसाठी विलक्षण होते.

पुण्यातल्या जुन्या काळातल्या पारंपरिक पध्दतीच्या सुप्रसिध्द मंगल कार्यालयांमधला गोंगाट, गर्दी आणि तिथे दरवळणारे वास किंवा धूर यांनी भरलेल्या कोंदट वातावरणापेक्षा हा खूप वेगळा अनुभव होता. आमच्यासाठी राखून ठेवलेल्या झोपडीमध्ये आमचे सामान ठेऊन आम्ही बाहेर पडलो, यजमान आणि वधूवरांना भेटून झाल्यावर इतर कोण कोण पाहुणे आले आहेत ते पहात आणि त्यांच्या गाठी भेटी घेत त्या विस्तीर्ण बागेतले निसर्गसौंदर्य न्याहाळत मनसोक्त फिरत राहिलो. आम्हाला ती निवांत जागा इतकी आवडली की एकादा दिवस आपल्या परिवारासह पिकनिकसाठी तिथे जायचे आणि मुक्तपणे फिरत वेळ घालवायचा असे ठरवून आम्ही तिथून बाहेर पडलो. त्या वेळी आम्ही मुंबईला परत गेलो आणि नंतर तो योग जुळून आला नाही, पण ती कल्पना मात्र मनात रुजून राहिली.

सात वर्षांपूर्वी आमच्या विस्तारित परिवारातल्या म्हणजे चुलत, आते, मामे, मावस वगैरे जवळच्या नात्यातल्या सगळ्या लोकांनी लग्नमुंजीसारखे कुठलेही निमित्य नसतांना फक्त मौजमजा करण्यासाठी म्हणून एका ठिकाणी जमायचे आणि दोन दिवस एकमेकांच्या सहवासात गप्पागोष्टी करत, गाणी गात, नाचत, खेळत घालवायचे असे ठरले. टेलीफोनवरूनच साठसत्तर लोकांनी तयारी दाखवली आणि हा आकडा शंभरावर जाण्यासाऱखा असल्याने तितक्या लोकांची एकत्र राहण्याची व्यवस्था होऊ शकेल अशी निवांत जागा पाहणे आवश्यक होते. थोडी चौकशी केल्यावर खडकवासला धरणाच्या पलीकडे त्यासाठी एक योग्य स्थान सापडले आणि त्या रिसॉर्टचे दोन दिवसांसाठी फक्त आमच्या ग्रुपसाठी बुकिंग करून ठेवले. पुण्यात राहणा-या काही लोकांनी कार पूलिंग करून आपापल्या गाड्यांनी आधी एका ठिकाणी जमायचे आणि सर्वांनी मिळून पुढे जायचे म्हणजे प्रत्येकाला ती आडवळणातली नवी जागा शोधत बसावे लागणार नाही असे विचारांती ठरवले.

मध्यंतरीच्या काळात मुठा नदी ओलांडून जाण्यासाठी राजाराम पूल बांधला गेला होता आणि तिथून म्हात्रे पुलापर्यंत नदीच्या काठाने चांगला प्रशस्त नवा रस्ता बांधला गेला होता. त्यामुळे कोथरूड, कर्वे नगर पासून औंध, पाषाण वगैरे सगळ्या भागांमध्ये रहात असलेल्या लोकांना सिंहगड रोडवरील बराचसा दाट वस्ती आणि रहदारीचा भाग टाळून थेट विठ्ठलवाडी गाठता येत होती. त्य भागांमधून येणारे आम्ही दहापंधराजण आधी ठरवून राजाराम पुलाच्या कर्वेनगरकडच्या टोकाला जमलो. पुलाच्या पलीकडे समोरच एक मोठा पहाड दिसत होता. त्यामुळे आपण आता नदी ओलांडली की लगेच गावाबाहेर पडून निसर्गाच्या कुशीत प्रवेश करणार असे वाटून मी खूष झालो होतो.

त्याप्रमाणे राजाराम पूल ओलांडून आम्ही सिंहगडरोडला लागलो, पण मला वाटले होते त्याप्रमाणे आम्ही अजून शहराबाहेर पडलो नव्हतो. समोर दिसणा-या डोंगराला डाव्या बाजूला ठेऊन आम्ही तो डोंगर आणि मुठा नदी यांच्या मध्ये असलेल्या भागातून पुढे जात राहिलो. विठ्ठलवाडी, आनंदनगर, माणिकबाग, वडगाव, धायरी वगैरे वस्त्या एकामागून एक येत गेल्या. त्यात काही अगदी जुनी मातीची कौलारू किंवा पत्रे लावलेली घरे, काही दुमजली चाळी, काही टुमदार बंगले, कांही गगनचुंबी आधुनिक इमारती असे सर्वांचे मिश्रण दिसत होते. रस्त्याच्या कडेला नाना प्रकारची आधुनिक पध्दतीची दुकाने थाटलेली होती आणि ती गि-हाइकांनी गजबजलेली होती. या रस्त्यावरून मी सात आठ वर्षांपूर्वी भिडे बागेत गेलो होतो, पण तेवढ्या काळात बराच बदल झालेला दिसत होता. पूर्वी विरळ वाटणारी वस्ती दाट झाली होती आणि आधी वेगवेगळ्या असलेल्या वस्त्या सलग झाल्या होत्या. रस्त्यावरून जाणा-या वाहनांची संख्या अनेक पटीने वाढली होती. पुणे शहराचा विस्तार जवळ जवळ खडकवासल्यापर्यंत येऊन पोचलेला होता. पुढे विस्तीर्ण जलाशय आणि मिलिटरीचे साम्राज्य असल्याने नागरी वस्तीला पसरायला वाव नव्हता. आमचे शांतिवन मात्र त्यांच्याही पलीकडच्या बाजूला होते. तिकडल्या एका खेडेगावात पोचल्यानंतर आम्ही सिंहगडकडे जाणारा रस्ता सोडून दिला आणि शांतिवनाकडे जाणारा रस्ता धरला.                                                                                          
--------------------------------------------------------------------------------------------------

No comments: