Friday, August 25, 2017

जुने गणेशोत्सव - भाग १- प्रस्तावना, २,३- प्रतिमाभाग १ - प्रस्तावना

ब्रह्मा, विष्णू, शंकर आदि देवतांची एक दोन ठराविक रूपेच त्यांच्या बहुतेक सर्व चित्रांमध्ये किंवा मूर्तींमध्ये आपल्याला दिसतात. गणपती हा मात्र एक आगळा देव आहे, ज्याची अनंत रूपांमध्ये पूजा केली जाते. गजानन, एकदंत, वक्रतुंड, लंबोदर वगैरे नावांमधून त्याच्या साकार रूपाचे वर्णन दिले आहे, शिवाय हिरेजडित मुगुट, रुणझुणती नूपुर वगैरे त्यांचे अलंकारसुध्दा आरतीमध्ये दिले आहेत. तरीसुध्दा गणेशाची चित्रे आणि मूर्ती यांमधून त्याची अगणित वेगवेगळी रूपे दाखवण्याचे स्वातंत्र्य कलाकार घेतात आणि लोकांना ती आवडतात. गणेशोत्सवामध्ये तर कलाकारांच्या कल्पकतेला बहर आलेला दिसतो.

२००६ मध्ये मी हा ब्लॉग लिहायला घेतला त्या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये गणपतीची काही वेगळी रूपे दाखण्याच्या विचाराने ' कोटी कोटी रूपे तुझी ' ही लेखमाला लिहिली. त्यानंतरच्या काळातसुध्दा गणेशोत्सवावर आधारलेले काही लेख मी दर वर्षी लिहित होतो. मला गणेशाच्या या विविध रूपांचा संग्रह करायचा छंदही लागला. आता ११ वर्षांनंतर जुन्या मालिकेमधील कांही लेखांमधला सारांश माझ्या संग्रहामधील  चित्रांसोबत या वर्षी गणेशोत्सवाच्या कालावधीत देण्याचा माझा मानस आहे.

कोटी कोटी रूपे तुझी - पुष्प १

कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे । कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देव्हारे ।।
असे कवीवर्य यशवंत देव यांनी देवाला म्हणजे परमेश्वराला म्हंटलेले आहे. पण श्रीगणेशाला मात्र त्याचे भक्तगण अनेक रूपांत नुसते पाहतातच नव्हे तर त्याच्या विविध रूपांमधील प्रतिकृती बनवून त्याची आराधना करतात. अशाच कांही वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतीबद्दल मी आणि आपण जे रोज वाचतो त्यातलंच थोडे सांगणार आहे.

आपल्याकडे देवदेवतांच्या भिन्न प्रकारच्या मूर्ती असतात. कायम स्वरूपाच्या मूर्तींची देव्हा-यात व देवळांत स्थापना करून त्यांची पिढ्या न पिढ्या, वर्षानुवर्षे पूजा केली जाते. या मूर्ती दगडांपासून किंवा धातूंच्या बनवलेल्या असतात. वातावरणातील आर्द्रता आणि रोजच्या धुण्यापुसण्याने त्यांची झीज न होता त्या दीर्घकाळ टिकतात.  बहुतेक मूर्ती घडवतांना त्यांना सुबक आकार दिलेले असतात. कांही विवक्षित ठिकाणी सापडणा-या खड्यांना वा गोट्यांना विशिष्ट देवतांचे प्रतिनिधी मानले जाते तर कांही ठिकाणी सर्वसामान्य दिसणा-या दगडांना शेंदूर माखून देवत्व प्रदान केले जाते.  शेवटी "भाव तेथे देव" असतो म्हणतात. नैसर्गिक रीत्याच श्रीगणपतीचा थोडाफार भास होत असणा-या स्वयंभू मूर्तीसुध्दा अनेक जागी पहाण्यात येतात. कधीकधी तर त्या एखाद्या मोठ्या खडकाचा अभिन्न भाग असतात व त्यांच्या सभोवती देऊळ बांधलेले असते.

बहुतेक देवतांच्या वेगळ्या अशा उत्सवमूर्ती असतात. खास उत्सवप्रसंगी कांही काळासाठी त्यांना एका वेगळ्या ठिकाणी आकर्षक रीतीने मांडतात. त्यांना नवनव्या कपड्यांनी सजवतात व दागदागीन्यांनी मढवतात. आजूबाजूला नयनरम्य सजावट करतात. कुठे कुठे त्यांची पालखीमधून किंवा रथातून गाजावाजाने मिरवणूक काढण्यात येते.
मोठ्या देवळांच्या गाभा-यांतील मुख्य देवतेच्या मोठ्या मूर्तीशिवाय आजूबाजूला इतर अनेक देवतांच्या लहान लहान मूर्तींची स्थापना केलेली असते. या शिवाय देवळांच्या भिंती, कोनाडे, शिखरे वगैरेवर देवतांच्या तसबिरी वा प्रतिकृती काढलेल्या असतात. प्रवेशद्वारावर तर गणपतिबाप्पा बसलेले हमखास दिसतात. पूर्वीच्या काळी घरोघरी दिवाणखान्याच्या भिंतीवर मोठमोठी चित्रे लावून ठेवायची पध्दत होती. त्यात गजाननाशिवाय श्रीरामपंचायतन, गोपाळकृष्ण व भगवान शंकर पार्वतीसुध्दा त्या घराण्यातील दिवंगत झालेले पूर्वज, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, संत ज्ञानेश्वर, मेनकेसह ऋषि विश्वामित्र, महात्मा गांधी, पंडित नेहरू वगैरेंच्या सहवासात सुखेनैव विराजमान होत. कालानुसार ही प्रथा मागे पडत गेली असली तरी गणपतीच्या प्रतिमा मात्र अनंत रूपाने जागोजागी मांडलेल्या दिसू लागल्या आहेत. किंबहुना तो एक सजावटीचा भागच होऊन बसला आहे.

कुठलीही शुभकार्याची निमंत्रणपत्रिका गणपतीच्या चित्राला मुखपृष्ठावर घेऊन येते. त्याची महती सांगणा-या ध्वनिफिती धडाक्याने विकल्या जातात. अनेक प्रकारच्या वस्तूंच्या जाहिराती गजाननाच्या नांवाने केल्या जातात.
-----------------------------------------------------------
आजचे विशेष चित्र ः उडीशामधील प्राचीन गणेशमूर्ती

---------------------------------------------
गणपती आणि चंद्र

चन्द्र हा सौन्दर्याचे प्रतीक आहे किंवा मानदंड आहे. चन्द्रमुखी, मुखचन्द्रमा वगैरे शब्दांचा प्रयोग साहित्यामध्ये सढळपणे केला जातो. चन्द्राचे अस्तित्व, त्याचे दर्शन प्रेमभावनेला पोषक आहे. अशा प्रकारे गणपतिचा बुध्दीशी किंवा मेंदूशी संबंध आहे तर चन्द्राचा हृदयाशी आणि भावनांशी.

पुराणात अशी एक कथा आहे की एकदा आपले गणपती बाप्पा त्यांचे वाहन असलेल्या उंदरावर बसून कुठे लगबगीने निघाले असतांना तोल जाऊन पडले. त्या वेळी आकाशात असलेल्या चंद्राने ते पाहताच तो जोराने हंसायला लागला. यामुळे गणपतीला राग आला आणि त्याने चंद्राला असा शाप दिला की जो कोणी त्याला पाहील त्याच्यावर चोरीचा आळ येईल. चंद्राने खूप गयावया केल्यावर गणपतीने त्याला अशा प्रकारचा उःशाप दिला की गणेशचतुर्थीच्या दिवशी त्याला कोणी पाहू नये, पण संकष्टीच्या दिवशी अवश्य पहावे.
http://anandghan.blogspot.in/2011/08/blog-post_28.html


परंपरागत प्रथेप्रमाणे गणेशचतुर्थीचे दिवशी चन्द्राचे दर्शन एकदम वर्ज्य ठरवले आहे तर संकष्टी चतुर्थीच्या व्रचाची सांगता चन्द्रोदय झाल्यानंतरच होते. काय विरोधाभास आहे ना?  थोडा विचार केला तर त्यामागील सुसंगत कारण लक्षात येईल. गणेशचतुर्थीला भक्ताने स्वतःला गणपतिच्या आराधनेमध्ये वाहून घ्यावे. त्या दिवशी एकाग्र चित्ताने निव्वळ ज्ञानसाधना करावी. अत्यंत देखणी अशी चवतीच्या चन्द्राची कोर आकाशातून खुणावत असली तरी निग्रहाने आपले चित्त ढळू न देता तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून ज्ञानसाधनेवर चित्त केन्द्रित करण्याचा प्रयत्न करावा, बुध्दीने मनावर ताबा मिळवावा असा हेतु आहे.

संकष्टी चतुर्थीच्या संध्याकाळी भक्ताचे लक्ष विचलित करायला चन्द्र आकाशात हजरच नसतो. पण माणूस केवळ ज्ञानसाधनेच्याच मागे लागून वाहवत गेला तर तो भावनाशून्य होण्याची शक्यता असते.  माणसातील माणुसकी टिकवून धरण्यासाठी त्याला यापासून वेळीच सावध करणे आवश्यक आहे. चन्द्रदर्शन हाही व्रताचाच एक भाग करून बुध्दी आणि मन, ज्ञान आणि भावना यातील समतोल साधण्याचा सुंदर उपाय आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवला आहे. शुक्लपक्षामध्ये पौर्णिमेपर्यंत चन्द्राचे दर्शन सुलभपणे होत असते. पण कृष्ण चतुर्थीला मुद्दाम चन्द्र उगवण्याची वाट पहात उपाशी रहाण्याने  त्याचे महत्व चांगले लक्षात येते.
------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------


भाग २- गणेशाच्या  प्रतिमामहादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगांची भव्य मंदिरे आहेतच, शिवाय जेजुरीचा खंडोबा, कोल्हापूरजवळचा ज्योतिबा यासारखी अनेक पुरातन देवस्थाने आहेत. बद्रीनारायण, जगन्नाथ, व्यंकटेश, श्रीनाथजी, अनंतस्वामी, वगैरे नावांनी प्रसिध्द असलेली भगवान विष्णू किंवा त्याच्या अवतारांची अनेक मोठी देवळे आहेत. प्रत्येक देवळात प्रथमपूजेचा मान गणेशाला असला तरी फक्त गणपतीची मोठी पुरातनकालीन मंदिरे माझ्या पाहण्यात किंवा ऐकण्यात आली नाहीत. गणेश हे पेशवे आणि त्यांचे सरदार, विशेषतः पटवर्धन यांचे कुलदैवत होते. त्यांनी आपापल्या राज्यांत गणपतीची देवळे बांधली किंवा जुन्या देवळांचे पुनरुज्जीवन केले. सांगली येथील गणपतीचे मंदिर सुंदर आहे. अष्टविनायक हा चित्रपट आल्यानंतर या देवळांची लोकप्रियता खूप वाढली. तिथे भाविकांची खूप गर्दी होत असली तरी ती भव्य म्हणण्यासारखी नाहीत.

जुन्या काळातसुध्दा दिवाणखान्यातल्या भिंती आणि कोनाडे सुशोभित केले जात असत आणि त्यामध्येही धार्मिक चित्रे व मूर्तींचा उपयोग सर्रास केला जात असे. अशीच एक सुंदर गणेशमूर्ती आणि रंगचित्र वर दाखवले आहेत.


कोटी कोटी रूपे तुझी - पुष्प २

आपल्या देशांत जागोजागी पुरातन देवालये आहेत, नवी नवी बांधली जात आहेत. त्यातील प्रत्येक देवळांत मुख्य गाभा-यात नाहीतर एखाद्या वेगळ्या छोट्या गोभा-यात, निदान एका खास कोनाड्यात कुठेतरी श्रीगजाननाची मूर्ती अवश्य दिसते. आधी त्याला वंदन करूनच भक्तजन पुढे जातात. शिवाय खास गणपतीची वेगळी देवळे आहेतच.  पश्चिम महाराष्ट्रात ती जास्त करून दिसतात. सुप्रसिध्द अष्टविनायक आहेतच, त्यात गणना होत नसलेली पण तितकीच लोकप्रिय अशी टिटवाळा व गणपतीपुळे येथील देवस्थाने आहेत. मुंबईमधील प्रभादेवीच्या सिध्दीविनायकाचा प्रचंड भक्तसमुदाय आहे. त्याशिवाय पुण्याचे कसबा गणपती, तळ्यातला गणपती, सांगलीच्या संस्थानिकांचा गणपती वगैरेंची मंदिरे लोकप्रिय तसेच प्रसिध्द आहेत. ही सर्व जागृत व इच्छित फलदायी देवतांची स्थाने आहेत असा त्यांचा लौकिक आहे व या सर्व स्थानी श्रध्दावान भक्तांची मोठी गर्दी असते.

 श्री सिध्दीविनायक, प्रभादेवी, मुंबई

दोन तीन सन्माननीय अपवाद वगळता यातील बहुतेक ठिकाणच्या मूर्ती स्वयंभू आहेत, अर्थातच त्यांत कोरीव कामाचे कौशल्य नाही. गणपतिपुळ्याला अत्यंत विलोभनीय असा समुद्रकिना-याचा परिसर लाभला आहे. इतर ठिकाणे रम्य असली तरी सृष्टीसौंदर्यासाठी फारशी प्रसिध्द नाहीत. कांही मंदिरांच्या इमारती सुध्दा शिल्पकलेचे नमूने म्हणून पहाण्यासारख्या असल्या तरी मदुराई, रामेश्वरम् येथील मंदिरांसारख्या भव्य दिव्य नाहीत. त्यामुळे तेथे येणारे लोक भक्तीभावनेने येतात, कांहीतरी अद्भुत दृष्य पहायला मिळेल या अपेक्षेने प्रेक्षकाच्या भूमिकेतून येत नाहीत किंवा मौजमजा करण्यासाठी निघालेले प्रवासी इथे येत नाहीत.

बहुतेक सर्व आधुनिक देवळांत, विशेषकरून बिर्लांनी देशात ठिकठिकाणी बांधलेल्या सुंदर मंदिरांमध्ये गजाननाच्या मनोरम अशा प्रतिमा स्थापन केलेल्या दिसतातच पण अशा मंदिरांबाहेर सुध्दा कित्येक ठिकाणी गणपतीच्या सुबक मूर्ती पहायला मिळतात. बहुतेक सा-या पुराणवस्तु संग्रहालयात विनायकाच्या प्राचीन कालीन मूर्ती दिसतातच. कधीकधी एखाद्या मोठ्या होटेलांत, इस्पितळांत किंवा मंगलकार्यालयात  प्रवेशद्वाराजवळ त्याच्या आकर्षक व सुशोभित मूर्तीची स्थापना केलेली पाहून सुखद धक्का बसतो. संगमरवर किंवा गारगोटीच्या शुभ्र दगडामध्ये किंवा काळ्याभोर प्रस्तरात त्यांचे कोरीव काम सुबकपणे केलेले असते. कांही ठिकाणी मिश्रधातूंचे ओतीव काम करून हे शिल्प बनवलेले असते.
--------------------------------------------------------------------------------------------------

भाग ३ - शोभेच्या प्रतिमा


प्रसिध्द पुरातनकालीन मंदिरांमधली अंतर्गत सजावट अत्यंत प्रेक्षणीय असते. जुन्या काळातल्या वाड्यांच्या जाड भिंतींमध्ये कोनाडे ठेवलेले असत. त्यातल्या दिवाणखान्यांमधल्या कोनाड्यांमध्ये देवादिकांच्या सुरेख मूर्ती मांडून ठेवत आणि भिंतींवर देवांच्या किंवा पूर्वजांच्या तसबिरी लावत. अशीच एक जुनी मूर्ती आणि तसबीर मी मागील भागात दाखवली होती.

काळाप्रमाणे अंतर्गत सजावटीच्या (इंटिरियर डेकोरेशन) कल्पना बदलत गेल्या. आता घराला कोनाडे नसतात आणि भिंतींवर एकादेच मोठे कलात्मक चित्र लावले जाते, पण कांचेच्या शोकेसेसमध्ये निवडक शोभिवंत वस्तू मांडून ठेवून त्यावर प्रकाशझोताची योजना करतात. यात देशविदेशातून आणलेल्या खास गोष्टी तर असतातच, पण आयफेल टॉवर आणि बिगबेनसारख्यांच्या सोबतीला एकादी गणेशाची मूर्तीसुध्दा विराजमान झालेली दिसते. गृहप्रवेश किंवा आणखी एकाद्या समारंभाच्या निमित्याने ज्या भेटवस्तू दिल्या जातात त्यात एक दोन तरी सुबक गणपती असतातच. या प्रतिमांची पूजा अर्चा केली जात नाही, पण त्यांच्या असण्यामुळे त्या खोलीमधले वातावरण मंगलमय होते अशी श्रध्दा तर असतेच. यामुळे अशा भेटवस्तू आवर्जून हॉलमध्ये ठेवल्या जातात. मुंबईपुण्यातच नव्हे तर परप्रांतात व परदेशात जितक्या मराठी कुटुंबांच्या घरी मी गेलो आहे तिथल्या प्रत्येक घरात मला गणपतीबाप्पा ठळकपणे दिसलेच. आजकाल शोभिवंत वस्तु विकणा-या सा-या दुकानांमध्ये विविध आकारांचे व विविध सामुग्रीपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्ती प्रामुख्याने ठेवलेल्या दिसतात.
अशा काही प्रतिमांची छायाचित्रे या भागात देत आहे.


कोटी कोटी रूपे तुझी - पुष्प ३

इंग्लंडमध्ये प्रत्येक प्रेक्षणीय स्थळ पाहून झाल्यावर बाहेर निघण्याच्या वाटेवर नेहमी दोन प्रशस्त दालने दिसतात. एका ठिकाणी उपाहारगृह असते तर दुस-यात अनेक प्रकारची स्मृतिचिन्हे (सोव्हेनीर्स) विकायला ठेवलेल्या असतात. त्या स्थळी असलेल्या कलाकृतींच्या प्रतिकृती, छायाचित्रे, ग्रीटिंग कार्डे व त्यांचेशी संबंधित चित्रे छापलेली त-हेत-हेची स्मृतिचिन्हे तेथे मांडून ठेवलेली दिसतात. वेगवेगळ्या आकारांचे शो पीसेस तर असतातच, लहान मुलांसाठी रबर, पेन्सिली, फूटपट्ट्या पासून ते मोठ्या माणसांचे टी शर्ट्स, थैल्या, चादरी, गालिचे व रोज वापरावयाचे मग्स, बाउल्स, डिशेस अशा विविध वस्तु तिथे असतात. अनेक ठिकाणी अंगठ्या, पदके, बिल्ले वगैरे अलंकारही दिसतात.

भारतात गणपतीचे चिन्ह असलेल्या अशा त-हेच्या वस्तूंचे मार्केटिंग प्रचंड प्रमाणात होते. मुंबईसारख्या शहरांत प्रमुख देवस्थानांच्या आजूबाजूला अशी दुकाने आहेतच, भेटवस्तूंच्या इतर दुकानांतसुध्दा गणपतीच्या प्रतिमा ठळकपणे दिसतात. गणेशचतुर्थीचे सुमारास मोठमोठाली खास प्रदर्शने भरतात व त्यात भारताच्या विविध राज्यामधून आणलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती विकतात. सिंहासनावर बसलेली रेखीव मूर्ती तर आहेच, त्यांतही गणपतीची मुद्रा, पीतांबर, अंगावरील दागदागीने, हातांत धरलेली शस्त्रास्त्रे, सिंहासनावरील नक्षीकाम यांत सूक्ष्म फरक करून वेगळेपण आणलेले असते. त्याशिवाय उभा ठाकलेला, कुशीवर झोपलेला, आपल्या लाडक्या वाहनावर आरूढ झालेला अशा कितीतरी अवस्थांमधील मूर्ती असतात. गणपती हा कलांचा देव आहे हे दर्शवणारी लेखक, वादक, नर्तक ही विलोभनीय रूपे आजकाल विशेष लोकप्रिय आहेत. तबला, पेटी, सारंगी, पांवा, झांजा वगैरे वादकांच्या रूपातील गणेशांचा संचच मिळतो तसेच आपली तुंदिल तनु सांवरीत अगदी कथ्थक ते दांडिया रास गरब्यापर्यंत नर्तनाच्या विविध मुद्रा दाखवणारी गोंडस रूपेही असतात. शिवाय क्रिकेटपटु, संगणक चालवणारा, शाळकरी मुलगा, रांगणारे बाळ अशी गोड चित्रे कुठे कुठे दिसतात.


ज्या पदार्थापासून ही चित्रे बनतात त्यात मोठे वैविध्य दिसते. आजकाल सर्वाधिक मूर्ती प्लॅस्टर आफ पॅरिस व प्लॅस्टिकमध्ये असतात, पूर्वी दगडाच्या किंवा लाकडाच्या असायच्या. आताही असतात, त्यांतही रोजवुड, चंदन, शिसवी वगैरे विविधता. चिकणमातीचे टेराकोटा आणि विशिष्ट मातीचे सिरॅमिक हे भट्टीत भाजलेले लोकप्रिय प्रकार आहेत. त्याशिवाय विविध धातु, पेपर मॅशे, कांच, पोर्सेलीन, फायबर, रेझिन, कापड, कापूस, काथ्या, ज्यूट वगैरे ज्या ज्या पदार्थापासून कोठलीही वस्तु बनवता येऊ शकेल अशा प्रत्येक पदार्थाचा गणेशाच्या प्रतिमा बनवण्यासाठी कोणीतरी वापर करतो. आणि या सा-याच वस्तु आपापल्या परीने अतीशय सुंदर दिसतात.  नऊ प्रकारची धान्ये किंवा फळभाज्या, पालेभाज्या यांपासून सुध्दा गणेशाची प्रतिमा बनवतात तर कांही मूर्तींवर वाळूचे बारीक कण चिकटवून एक वेगळाच लूक् आणलेला असतो. कांही मूर्ती नाजुक मीनाकारीने मढवलेल्या असतात.

या वस्तु अक्षरशः अगणित प्रकारच्या असतात.  शो केसमध्ये ठेवायच्या मूर्ती वेगळ्या आणि पेडेस्टलवर बसवायच्या वेगळ्या, मोटारीत डॅशबोर्डावर ठेवायच्या त्याहून निराळ्या. भिंतीवर लटकवायच्या संपूर्ण त्रिमिति आकृत्या असतात किंवा नुसतेच मुखवटे. कागद, कापड किंवा ज्यूटपासून बनवलेले वाल हँगिंग्ज वेगळेच.  त्यावरही रंगकाम, विणकाम व भरतकामाची वेगवेगळी कलाकुसर असते. कधी कधी कौशल्यपूर्ण विस्तृत बारीक काम केलेल्या पूर्णाकृती असतात तर कुठे फक्त चार पांच वक्र रेषांमध्ये किंवा साध्या त्रिकोण, चौकोनांच्या रचनेतून त्याचा आकार दाखवलेला असतो आणि कुठे फक्त सोंड व दात दाखवून त्याचा आभास केलेला. गजाननाचे चित्र असलेले खिशांत ठेवायचे किल्ल्यांचे जुडगे तसेच ते भिंतीवर टांगायचा स्टँड दोन्ही असतात. घड्याळे तर सर्रास दिसतात. सराफांच्या दुकानांत दागदागिन्यांबरोबर सोन्याचांदीच्या वस्तूही ठेवलेल्या असतात, त्यात देवदेवतांच्या प्रतिमासुध्दा असतात. दिवाळीमध्ये पूजेसाठी लक्ष्मीचे चित्रांची नाणी घेतात. तशीच गणपतीचे किंवा लक्ष्मी, सरस्वती, गणपती या त्रयींचे शिक्के पण असतात. गणेशाच्या विविध मुद्रांमधील मूर्तीसुध्दा ठेवतात. आजकाल गणपतीच्या हिरेजडित प्रतिमा निघाल्या आहेत. अशी कुठकुठली किती रूपे वर्णावीत?

No comments: