Tuesday, August 05, 2014

बेडूक, कोकिळा, गाढव आणि उंट



या चार पशुपक्ष्यांमध्ये काही तरी समान धागा असेल का? बेडूक हा डबक्यांमधल्या चिखलात राहणारा प्राणी आहे तर उंट म्हणजे रुक्ष वाळवंटातले जहाज. रानावनातल्या झाडांच्या फांद्यांमध्ये लपून कोकिळा कुहूकुहू करत असते तर गाढवे गावातल्या उकिरड्यांवर सर्रास लोळत पडलेली दिसतात. त्यांच्यात विरोधाभास असला तरी वैर असायचेही काहीच कारण नाही. त्यासाठी ते एकमेकांच्या संपर्कात येण्याची शक्यताही कमीच असते. मग मी यांना एकत्र का आणले आहे? संस्कृत भाषेतल्या सुभाषितांचा अभ्यास करतांना मला त्यांच्यातले दुवे मिळाले. या सुभाषितांमध्ये अनेक वेळा प्राणीमात्रांचे दाखले दिले असले तरी त्यांचा उद्देश माणसांनी त्यावरून बोध घ्यावा असा असतो. या आणि इतरही सगळ्याच प्राण्यांचे काही गुण आपल्यामध्ये असतात. त्याचे परिणाम कसे होतात किंवा होऊ नयेत याविषयी या सुभाषितांमध्ये सुचवलेले असते.

बेडूक म्हंटले की लगेच लहानपणी शिकलेली कविता आठवते. "लगीन करतो बेडूकराव। डराँव डराँव डराँव डराँव।।" पावसाळा सोडून इतर ऋतूंमध्ये हे प्राणी कुठल्या खबदाडात लपून बसले असतात कोण जाणे, पण पाऊस पडून डबकी साचायला लागली की जिकडे तिकडे त्यांच्या फौजा दिसायला लागतात आणि डराँव डराँव डराँव डराँव च्या गोंगाटाने आसमंताला भरून टाकतात. वसंत ऋतूमध्ये आपल्या कूजनाने सर्वांना मोहवून टाकणा-या कोकिळाने मात्र या काळात आपली कुहूकुहू पार थांबवून टाकलेली असते. या दोन घटनांचा संदर्भ सुभाषितकारांनी असा जोडला आहे.  

भद्रम् कृतम् कृतम् मौनम् कोकिलैः जलदागमे ।
दर्दुराः यत्र गायन्ति तत्र मौनं हि शोभनम् ।।
आभाळात काळे ढग जमायला लागताच (पावसाळा येताच) कोकिळांनी मौन धारण केले हे बरेच झाले. बेडकांची डराँवडराँव सुरू झाल्यानंतर तिथे (कोकिळांनी) गप्प राहण्यातच शोभा आहे. बेसूर गायकांच्या आरडाओरडीमध्ये चांगल्या गायनातली सुरेल तान कोणाला ऐकू येणार आहे किंवा मूर्खांच्या कर्कश कलकलाटात उपदेशाचे सौम्य शब्द कोण ऐकणार आहे? त्यांनी अशा वेळी गप्प बसून राहणेच उचित ठरेल.

वरील सुभाषितात कोकिळेच्या गुणांबद्दल तिची स्तुती केलेली असली तरी तिला इतके डोक्यावर घेण्यासारखे तिने कुणासाठी काय केले आहे? आणि गाढवाचे ओरडणे मधुर नसले म्हणून त्यात त्याने काय पाप केले आहे? गाढव निदान माणसांचे भार तरी वाहतो, कोकिळ पक्ष्याचा कुणाला काय उपयोग होतो? केवळ गोड बोलणारे महत्वाचे नसतात, दुस-यासाठी काही करण्याला अधिक महत्व दिले पाहिजे, पण जगात तसे घडत नाही. सगळीकडे बोलघेवड्यांचेच कौतुक होते, तेच सगळ्यांना आवडतात, परखड शब्द बोलणारे अगदी निरुपद्रवी असले तरीसुद्धा ते कोणाला आवडत नाहीत. अशी जगरहाटी आहे असे खालील सुभाषितात सांगितले आहे.  

वाङ्माधुर्यात् सर्वलोकप्रियत्वम् । वाक्पारुष्यात् सर्वलोकाप्रियत्वम् ।
किंवा लोके कोकिलेनोपकारः । किंवा लोके गर्दभेणाप्रकारः।।
मधुर बोलणारे सर्वांनाच प्रिय होतात, कठोर वचनाने ते लोक सर्वांनाच अप्रिय होतात. कोकिळ पक्ष्याने जगावर असे कोणते उपकार केले आहेत? (तरीही तो सर्वांना आवडतो) आणि गाढवाने कुणाचे काय वाईट केले आहे? (म्हणून ते कोणालाही आवडत नाही.)

गाढवाचा आवाज जसा कोणाला आवडत नाही त्याचप्रमाणे उंटाला कोणी सुरेख म्हणत नाही. त्याचे तोंड, मान, पाठ, पाय वगैरे सगळेच अवयव इतर प्राण्यांशी तुलना करत आउट ऑफ प्रपोर्शन वाटतात. अष्टावक्र किंवा आठ जागी वाकडा अशीही उंटाची भलामण केली जाते. गाढव आणि उंट या समदुःखी प्राण्यांनी आपसात मैत्री केली. "समानशीलव्यसनेषु सख्यम्" असेही एक सुभाषित आहेच. उंटांच्या घरी साज-या होत असलेल्या लग्नसमारंभात गाढवांना भाट म्हणून पाचारण केले गेले. त्यांनी आपल्या आवाजात खूप रेकून घेतले, त्यात उंटांच्या सौंदर्याची तोंड फाटेपर्यंत तारीफ केली. उंटांनीही गर्दभउस्तादांच्या गायनाची स्तुती करून याची परतफेड केली. असे खाली दिलेल्या सुप्रसिद्ध सुभाषितात सांगितले आहे.

ऊष्ट्राणाम् च गृहे लग्नम् गर्दभाः स्तुतिपाठकाः ।
परस्परम् प्रशंसन्ति अहो रूपम् अहो ध्वनिः ।।

दोन अयोग्य व्यक्ती एकमेकांची वाहवा कशी करतात हे या उदाहरणात दिसून येते. हे ऐकणारा जाणकार असेल तर समजायचे ते समजून घेतो, पण अजाण लोक त्या स्तुतिप्रदर्शनात वाहवून जातात असेही काही वेळा दिसते. आपले असे होऊ नये, तसेच आपले हंसेही होऊ नये याची काळजी घ्यावी हे उत्तम.

2 comments:

Unknown said...

your science article are really excellent in Marathi. easy to understand. I read on PUMP in one of Diwali article.

from where other such articles , can I get.

thnx

Anand Ghare said...

पपपुराण या नावाने ही लेखमाला मी २०१० साली फेब्रूवारी ते एप्रिल आणि जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान आनंदघन याच ब्लॉगवर सादर केली होती.
आपल्या विचारण्यासाठी आभारी आहे.