Friday, July 18, 2014

जसलोक हॉस्पिटल



नोकरीच्या सुरुवातीच्या काळात माझे ऑफिस गेट वे ऑफ इंडियाजवळ होते. मी मित्रांच्यासोबत दादरला रहात होतो आणि कधी ट्रेनने तर कधी बसने ऑफिसला जात येत असे. त्यातल्या काही रूट्सच्या बसेस पेडररोडवरून जात असत. तेंव्हा महालक्ष्मीच्या कोप-यावरून पुढे जातांना पेडर रोडवर एक गगनचुंबी इमारत बांधली जात असलेली बसच्या खिडकीमधून दिसायची. मलबार हिलच्या शेजारीच असलेल्या त्या कंबाला हिलवरही श्रीमंतांची वस्ती होती. त्यांच्या भरवस्तीत कोणाला ऑफिसची इमारत बांधू दिली जाईल असे वाटत नव्हते, त्या इमारतीची रचना राहत्या घरांपेक्षा वेगळी वाटत होती, कुठल्याही कॉलेजला अशी भव्य इमारत बांधणे परवडणे कठीण होते. यामुळे ती कसली इमारत असेल यावर चर्चा होत असतांना ती एका नव्या हॉस्पिटलसाठी बांधली जात असल्याचे समजले. त्याचे नाव 'जसलोक हॉस्पिटल' असे असणार आहे ही माहितीही मिळाली.

पण 'जसलोक' या शब्दाचा काय अर्थ असेल असा नवा प्रश्न उभा राहिला. सर्व विश्वाची विभागणी स्वर्गलोक, मर्त्यलोक आणि पाताळलोक यात झाली आहे अशी पारंपरिक समजूत होती. जसलोक म्हणजे जमीनीवरला स्वर्ग की जमीनीवरून स्वर्गाकडे जाणा-या रस्त्यावरले विसाव्याचे ठाणे असे काही अर्थ अनर्थ लावून त्यावर तर्क कुतर्क केले जात होते. या हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ खुद्द पंतप्रधानांच्या हस्ते मोठ्या दिमाखात झाला. त्यावरून त्याला सरकार दरबारीसुद्धा केवढा मान मिळाला होता याची कल्पना येईल. उद्घाटनाच्या वेळी त्याला जी प्रसिद्धी मिळाली त्यात त्याच्या जसलोक या नावाची कुळकथाही जाहीर केली गेली. सेठ लोकूमल चानराय आणि त्यांच्या पत्नी जसोटीबाई चानराय यांच्या नावातली पहिली तीन तीन इंग्रजी अक्षरे घेऊन जसलोक हे नाव तयार केले गेले होते. कंबाला हिल भागात वीस मजली आलीशान इमारत बांधणे, त्यात सर्व प्रकारची अद्ययावत यंत्रसामुग्री बसवणे, रुग्णांसाठी सा-या सुखसोयी पुरवणे वगैरेंसाठी चाळीस वर्षांपूर्वीच्या त्या काळातसुद्धा कोट्यावधी रुपयांची गरज होती. आता त्याची किंमत अब्जावधींमध्ये होईल. जो माणूस इतके पैसे फक्त एका धर्मादाय कामासाठी खर्च करू शकतो त्याचे उत्पन्न आणि त्याची संपत्ती किती अफाट असेल? टाटा, बिर्ला यांच्यासारखे त्या काळातले मोठे उद्योगपती किंवा निझामासारखे नवाबच ते करू शकले असते. पण चानराय हे नाव यात कुठे बसत नव्हते. ते कोणत्या संस्थानाचे राजे नव्हते किंवा भारतातल्या उद्योगव्यवसायाच्या विश्वातदेखील प्रसिद्ध नव्हते. त्यानंतरही मी जसलोक हॉस्पिटल वगळता इतर कोणत्याच संदर्भात चानराय हे नाव कधीच ऐकले नाही. 

चानराय कुटुंब मूळचे सिंधमधले होते, पण भारताची फाळणी होण्याच्या आधीच त्यांनी सिंगापूर, हाँगकाँग वगैरे ठिकाणी चांगला जम बसवला होता आणि आशियातच नव्हे तर आफ्रिका, अमेरिका, युरोप आदि खंडांमध्ये अनेक ठिकाणी त्यांचे उद्योग होते आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात ते उलाढाल करत होते म्हणे. परदेशांमध्ये राहणा-या भारतीयांच्या आणि त्यांच्या भारतातल्या नातेवाइकांच्या सोयीसाठी युरोपअमेरिकेतल्यासारखे एक अत्याधुनिक हॉस्पिटल मुंबईत उभारायचे आणि चालवायचे असे त्यांनी मनावर घेतले. त्या काळातल्या आघाडीवर असलेल्या डॉक्टरांनी केलेल्या सहाय्यामधून त्यांचे हे स्वप्न साकार झाले. हे हॉस्पिटल पूर्णपणे खाजगी असल्यामुळे ते व्यापारी तत्वावर चालवले जाणार आणि सामान्य माणसांच्या खिशाला परवडणार नव्हते हे ओघाने आलेच

जसलोक हॉस्पिटल सुरू होईपर्यंतच्या काळात मी दादर सोडून चेंबूरला रहायला गेलो होतो त्यामुळे माझा ऑफिसला जाण्याचा रस्ता बदलला होता. मला पेडर रोडच्या वाटेने जाण्याचे काही कारण उरले नसल्यामुळे जसलोक हॉस्पिटल नजरेआड गेले होते. त्याबद्दलच्या बातम्या मात्र नेहमी वाचण्यात येत असत. "अमका अमका नेता, सिनेकलावंत किंवा उद्योगपती असा एकादा प्रसिद्ध माणूस तिथे अॅडमिट झाला आहे", "अमके अमके अत्यंत कठीण आणि गुंतागुंतीचे ऑपरेशन भारतात प्रथमच तिथे करण्यात आले," किंवा "अमक्या अमक्या विशिष्ट प्रकारच्या तपासण्यांची व्यवस्था तिथे केली गेली आहे." असे काही ना काही अधून मधून छापून येत असे. पण त्या काळात त्यातल्या कशातच आम्हाला इंटरेस्ट नसल्याने आपला या इस्पितळाशी कधीच संबंध येणार नाही हेच त्यावरून ध्वनित होत असे. माझ्या आसपास वावरणा-या लोकांच्या वर्तुळात होत असलेल्या चर्चांमध्ये जसलोक हॉस्पिटलचा उल्लेख कधीही येत नसे.

काही वर्षांनी माझे ऑफिस वॉर्डन रोडवरील आनंदभवनमध्ये शिफ्ट झाले. तिकडे जाणारी आमची बस पेडर रोड मार्गाने जात असल्याने आम्ही जसलोकच्या आधीच्या कोप-यावर उतरून चालत ऑफिसला जात असू. यामुळे पुन्हा एकदा जसलोक हॉस्पिटल आमच्या रोजच्या पाहण्यात आले. तिथे जाणारे बहुतेक सगळे लोक कारमधून किंवा टॅक्सीमधून येत असत किंवा जास्तच आजारी रुग्ण अँब्युलन्समधून आणले जात असत. त्या हॉस्पिटलमध्ये चालत चालत जाणारे कोणीही सहसा दिसत नसत. एकदा आत जाऊन निदान पाहून तरी येण्याची उत्सुकता सर्वांना असायची, पण त्यासाठी कोणतेही कारण किंवा निमित्य मिळत नव्हते.   

आम्ही दोघे तीघे मित्र एकदा जसलोक हॉस्पिटलच्या गेटपर्यंत जाऊनही आलो. त्या इमारतीच्या मुख्य दरवाजातच कडक इस्त्रीच्या गणवेशातले दोन धष्टपुष्ट तगडे पहारेकरी उभे होते आणि आत येणा-यांची चौकशी करून त्यांना आत सोडत होते. आमच्याकडे त्यांना सांगता येण्यासारखे काही कारण नव्हते आणि यापूर्वी कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जाण्याचे प्रसंगच आमच्यावर फारसे आलेले नसल्यामुळे अशा वेळी कोणते कारण सांगता येते हेसुद्धा त्या वेळी आम्हाला माहीत नव्हते. आमच्यासारख्या बाहेरून तरी संपूर्ण निरोगी दिसणा-या तरुणांना त्या दरवानांनी नक्कीच आत सोडले नसते. आमच्याच ऑफिसात प्रवेश करू इच्छिणा-या आगांतुक लोकांना आमचे सिक्यूरिटी गार्ड्स कसे हिडीस फिडीस करतात हे आम्ही पहात असल्यामुळे आम्हाला आमची शोभा करून घ्यायची नव्हती. उगाच हात दाखवून अवलक्षण करून घेण्यापेक्षा आल्या पावली परत जायचे आम्ही ठरवले. काही काळानंतर माझे ऑफीस पुन्हा कुलाब्याला गेले आणि जसलोक हॉस्पिटल माझ्या नजरेआड झाले.

त्यानंतरच्या काळातही जसलोक हॉस्पिटलचे नाव वर्तमानपत्रात आणि टेलिव्हिजनवर येतच राहिले. मलाही पदोन्नती मिळत गेल्या आणि पंचतारांकित संस्कृतीचा विस्तार होत तिने मला गाठलेच. सेमिनार्स, वर्कशॉप्स, मीटिंग्ज वगैरेंसाठी मीही ताज, ओेबेरॉय, सेंटॉर वगैरेसारख्या मोठ्या हॉटेलांमध्ये अधून मधून जाऊ लागलो. कधी तिथल्या द्वारपालांच्या नजरेला नजर भिडवून तर कधी त्यांच्याकडे न पाहिल्यासारखे करून सराईतपणे टॉक टॉक करत बेधडक आत शिरण्यात मीही तरबेज झालो. त्या काळात दहशतवाद फोफावला नसल्यामुळे अंगझडती वगैरे घेतली जात नसे आणि त्यासाठी थांबायची आवश्यकता नसायची. त्यामुळे जसलोक हॉस्पिटलच्या दरवानांची भीती उरली नव्हती, पण केवळ उत्सुकतेपोटी मुद्दाम वाकडी वाट धरून हॉस्पिटल पहायला जाण्याएवढी हौसही वाटत नव्हती. ते राहूनच गेले.

वयोमानानुसार नवनवीन दुखण्यांची चाहूल लागल्यामुळे अनेक प्रकारच्या तपासण्या करून घ्याव्या लागत होत्या. अशाच काही कारणासाठी अलकाला थॅलियम टेस्ट करून घ्यायला सांगितले गेले. आमच्या हॉस्पिटलमध्ये त्या टेस्टची सोय नसल्यामुळे त्यासाठी जसलोक हॉस्पिटलला जायला सांगितले गेले. या चाचणीमधून काय निष्पन्न होणार असेल? आणि त्यातून एकाद्या गंभीर आजाराचे निदान तर होणार नाही ना? अशी धुकधुक मनात वाटत होतीच, पण कित्येक वर्षांपासून मनाच्या एका कोप-यात दडलेली उत्सुकताही तिचे डोके वर काढत होती. जसलोक हॉस्पिटलचे पत्र घेऊन आम्ही तिथे जाऊन पोचलो. थॅलियम टेस्ट एवढे दोन शब्द उच्चारणे आत शिरण्यासाठी पुरेसे होते.

दरवाजातून आत शिरताच आम्ही एका प्रशस्त हॉलमध्ये प्रवेश केला. त्याच्या मधोमध स्वागतिकांचे (रिसेप्शनिस्ट्चे) काउंटर होते. काउंटरवरील महिलेला आम्ही हातातले कागद दाखवले. आम्ही प्रथमच त्या ठिकाणी आलेले आहोत हे तिने आमच्या देहबोलीवरूनच नक्की ओळखले असणार आणि कदाचित "लगता है, पहली बार आये हुवे है।" असे ती तिच्या मैत्रिणीच्या कानात कुजुजलीही असेल असे मला वाटले. "पहली बार हैं, मगर आखरी बार नही।" असे तो-यात म्हणायला ते काही महागडे रेस्टॉरेंट नव्हते आणि पुन्हा हॉस्पिटलमध्ये यायची आम्हालाही काही हौस नव्हती. "जसलोक हॉस्पिटलला आमची ही पहिली भेट आहे का?" हा प्रश्न रिसेप्शनिस्टने मला सरळ न विचारता आम्हाला आमचा रजिस्ट्रेशन नंबर विचारला. आमच्याकडे तो नव्हताच. त्यावर तिने हॉलच्या उजव्या बाजूला असलेल्या अनेक कौंटर्सकडे बोटे दाखवत "इथून एक फॉर्म घ्या, तो भरून तिथे द्या, तिच्याकडून व्हाउचर घेऊन कॅशरकडे जा, त्यांनी व्हाउचरवर शिक्का मारल्यानंतर ते अमूक नंबरच्या खिडकीत द्या, तिथला माणूस तुम्हाला कुठे जायचे ते सांगेल." वगैरे मार्गदर्शन केले.  ते पूर्ण केल्यानंतर आम्हाला थॅलियम टेस्ट जिथे करायची होती तिकडे पाठवण्यात आले. मोठ्या हॉस्पिटलमध्ये जातांना ही सगळी धावपळ करणयासाठी रुग्णाच्या सोबतीला एक धडधाकट माणूस असणे किती आवश्यक असते हे कळून चुकले.

हॉस्पिटलच्या मुख्य इमारतीतल्या निरनिराळ्या विभागांकडे जाण्याच्या वाटेवर आणखी दोन पहारेकरी उभे होते. ते मात्र कागदपत्रे किंवा ओळखपत्र पाहिल्याशिवाय कोणालाही आत जाऊ देत नव्हते. बाहेरच्या रखवालदारांवर रुबाब दाखवून किंवा त्याला चकवून कोणी आत आला तरी त्याला मुख्य इमारतीत प्रवेश करता येऊ नये यासाठी ही योजना होती. या वीस मजली इमारतीमधील काही मजल्यांवर तपासण्या होतात, काही मजल्यांवर शस्त्रक्रिया होतात, एकाद्या मजल्यावर ऑफिसे आहेत आणि इतर मजल्यावर रुग्णांना ठेवले जाते. त्यातही निरनिराळ्या प्रकारचे रुग्ण वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये असतात अशी माहिती मिळाली. आम्हाला थॅलियम टेस्टसाठी विशिष्ट खोलीमध्ये जायला सांगण्यात आले. त्यासाठी पाचसहा तरी लिफ्ट होत्या, पण त्यातल्या काही लिफ्ट्स कर्मचा-यांसाठी, काही रुग्णांसाठी आणि काही व्हिजिटर्ससाठी राखून ठेवल्या होत्या. या सगळ्या लिफ्ट्स सर्व मजल्यांवर थांबत नाहीत, विशिष्ट मजल्यावरच थांबतात. त्यामुळे आम्हाला हव्या असलेल्या मजल्यावर जाण्यासाठी आम्ही कोणती लिफ्ट घ्यायची हे शोधून काढले आणि तिथे जाऊन पोचलो. टेस्टचा रिपोर्ट घेऊन जाण्यासाठी वेगळी खेप घालावी लागली. पण सगळे काही अलबेल आहे हे समजल्यावर उसासा टाकला.

त्यानंतर वयोमानानुसार व्याधी आणि त्या अनुषंगाने करायच्या तपासण्या वाढत गेल्या आणि त्यासाठी जसलोक हॉस्पिटलमध्ये अनेक वेळा जावे लागले. काही वेळा तिथे रहावेही लागले. तिथल्या कोणत्या मजल्यावर काय चालते इथपासून ते तिथल्या कँटीनमध्ये कोणकोणते पदार्थ मिळतात आणि त्यातले कुठले चविष्ट किंवा चांगले असतात इथपर्यंत बरेच सामान्यज्ञान प्राप्त झाले. मला सुरुवातीला वाटत होते तसे हे हॉस्पिटल फक्त अतीश्रीमंत लोकांचे नव्हते. तिथे येणा-या लोकांमध्ये अनेक मध्यमवर्गीय दिसत होते. आजकाल अनेक कंपन्या कर्मचा-यांचा आरोग्यविमा काढतात. कदाचित त्यामुळे ते लोक इथे येत असतील. या हॉस्पिटलमध्ये काही परदेशी, विशेषतः अरब आणि आफ्रिकन लोक नेहमी दिसतात. उपचारासाठी इंग्लंड अमेरिकेत जाण्यापेक्षा जसलोक हॉस्पिटलमध्ये येणे त्यांच्या दृष्टीने बहुधा कमी खर्चाचे आणि अधिक सोयिस्कर असावे.

जसलोक हॉस्पिटलमध्ये कोणी अॅडमिट झाला असला तर एका व्यक्तीला त्याच्या सोबत राहण्यासाठी परवानगी असते. त्या सोबत्याला बसण्यासाठी किंवा झोपण्यासाठी रेल्वेतल्या स्लीपरएवढी एक लहानशी गादीसुद्धा असते. जेवणखाण्यासाठी मात्र त्याला कँटीनमध्येच जावे लागते. रुग्णाला भेटायला जाण्यासाठी ठराविक वेळ असते. त्यासाठी एक पास दिला जातो, तो घेऊन त्या वेळेतसुद्धा एका वेळी एकचजण आत जाऊ शकतो. आत जातांना त्या पासची पहाणी होते. लहान मुलांना सोबत घेऊन जाता येत नाही. अतीदक्षताविभागात ठेवलेल्या रुग्णाच्यासोबत एका व्यक्तीने चोवीस तास तिथे राहणे आवश्यक असते, पण ती व्यक्ती त्या दालनात थांबू शकत नाही. तिने बाहेरच्या कॉरी़डॉरमध्ये बसायचे असते. या सोबतींसाठी वीसाव्या मजल्यावर डॉर्मिटरी आहे. रात्री त्यांनी तिथे जाऊन झोपायचे असते. सर्वांकडे मोबाईल फोन असावे लागतात आणि आजकाल असतातच. गरज पडतांच त्यांना बोलावून घेतले जावे यासाठी व्यवस्था असते. सगळ्या मजल्यांवर वायफायची सुविधा आहे. त्यासाठी पासवर्ड घेऊन तो वापरता येतो. त्यामुळे अनेक लोक तिथे बसल्यबसल्या लॅपटॉपवर काम करतांना दिसतात. काळाबरोबर आवश्यक त्या सुधारणा आणि सोयी या ठिकाणी केल्या गेल्या आहेत.

जसलोक हॉस्पिटलशी माझा कसकसा संबंध येत गेला आणि त्याबद्दलचे माझे अनुभव अधिक खोलात न जाता देण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.      

No comments: