Tuesday, May 20, 2014

काकतालीय, कावळा आणि कलहंस

एकाद्या झाडाच्या एकाद्या फांदीवर एक कावळा बसला आणि लगेच ती फांदी कट्कन मोडून गेली. एवढ्या दोनच घटनांचा एकत्र विचार केला तर त्यात एक कार्यकारणभाव दिसतो. फांदीवर एक कावळा बसला हे कारण आणि त्यामुळे फांदी मोडून गेली हे कार्य. पण जगातल्या असंख्य झाडांवर अनंत कावळे नुसते बसत नाहीत तर घरटी करून राहतात आणि त्यांचा सगळा भार त्या फांद्या सहजपणे सहन करत असतात हे सर्वांनीच अनेक वेळा पाहिलेले असते. त्यामुळे "एका कावळ्याच्या बसण्यामुळे झाडाची फांदी मोडेल" असे कोणताही शहाणा माणूस म्हणणार नाही. बहुतेक सगळ्या झाडांची पाने, फुले सुकून गळत असतात, त्याचप्रमाणे काही जुन्या लहान फांद्याही दुबळ्या होऊन कुठल्या कावळ्याचा स्पर्शही झाला नसतांनासुद्धा आपल्या आपच तुटून पडत असतात. अशा जर्जर झालेल्या फांदीवर कावळ्याचे बसणे आणि तिचे तुटून पडणे या दोन्ही गोष्टी एकत्र घडल्या तर मात्र कावळ्याचे त्या फांदीवर बसणे हे मोडण्याचे एक निमित्य ठरते. 'कावळा बसायला आणि फांदी मोडायला गाठ पडणे' या म्हणीमधून अशा प्रकारचा योगायोग दाखवला जातो. या योगायोगाला संस्कृतमध्ये 'काकतालीय न्याय' असे नाव दिले गेले आहे. त्यात एवढाच फरक आहे की कावळ्याच्या झाडावर बसण्यानंतर त्याची फांदी तुटण्याऐवजी त्याने तालवृक्षावर बसताच त्या वृक्षाचे फळ गळून खाली पडते. यातसुद्धा दोन स्वतंत्र घटना एकाच वेळी घडत असल्यामुळे त्यांच्या दरम्यान एक आभासी (खोटा) कार्यकारणभाव दिसतो.

एकाद्या दिवशी प्रत्यक्ष कावळ्यांच्याच बाबतीत अशा प्रकारच्या भिन्न घटना योगायोगाने घडत गेल्या तर त्याला काय म्हणावे? मागच्या महिन्यात एकदा मला याचाच अनुभव आला. अलीकडे मी चेपू(फेसबुक)वर रोज एक संस्कृत सुभाषित देण्याचा सपाटा लावला होता. त्यात एकदा मी खालील सुभाषित दिले होते.
काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेद पिककाकयोः।
वसंतसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः ।।
याची अर्थ असा आहे. कावळाही काळा असतो आणि कोकिळही काळा, मग दोघांमध्ये फरक तो काय? दोघेही सारखेच. पण कोणता कावळा आहे आणि कोणता कोकिळ? हे वसंत ऋतू आला की आपोआप त्यांच्या आवाजावरून समजते. कावळा "काव काव" करत राहतो आणि कोकिळ किंवा कोकिळा मात्र "कुहू कुहू" गायला लागतात. याचा खरा अर्थ असा आहे की कोणाच्याही फक्त बाह्य रूपावर जाऊ नये, प्रत्येकाच्या अंगातले सुप्त गुण वेगळे असतात. वेळ आल्यावर ते समजतात. कावळ्याच्या बाबतीत पहायला गेल्यास तो दिसायलाही काळा आणि कुरूप आणि त्याचा आवाजही कर्कश असतो, पण कोकिळा मात्र काळी सावळी दिसत असली तरी वसंत ऋतू आला की अत्यंत सुरेल आवाजात गाऊ लागते. इतर ऋतूंमध्ये ती कशा प्रकारचा आवाज काढते की मौनव्रत धरते कोण जाणे!

खरे सांगायचे झाल्यास कावळा, कावळीण, कोकिळ, कोकिळा वगैरे पक्ष्यांच्या बाह्य रूपातला फरक मलासुद्धा फारसा समजत नाही. मला तरी ते सगळेजण एकजात काळे कुळकुळीत दिसतात. दुर्बीण घेऊन पक्ष्यांचे निरीक्षण करणारे पक्षीप्रेमीच कदाचित त्यांना ओळखू शकत असतील. "त्यांच्या आवाजावरून त्यांना ओळखणे सोपे आहे" असे सुभाषितकार म्हणतात. पण एकाच झाडावर कावळे आणि कोकिळा एकत्र किंवा समोरासमोर जमलेले आहेत. त्यातल्या कावळ्यांच्या कर्कश कलकलाटाला वैतागून गेलेले कोकिळपक्षी कुहू कुहू करून त्यांची समजूत घालत आहेत. अशा प्रकारची जुगलबंदीची मैफिल जमलेली आहे असे दृष्य पाहण्याची संधी मला तरी कधीच मिळाली नाही. त्यामुळे पक्ष्यांचे आवाज ऐकून त्यांच्यातला "हा कावळा" आणि "हा कोकिळ" असा भेदही मला तरी करता आला नाही.

जेंव्हा मी हे सुभाषित फेसबुकावर दिले होते त्या काळात वसंत ऋतू सुरू होता, अधून मधून दुरून कुठून तरी कोकिळेची "कुहू कुहू" अशी साद ऐकू येत होती, पण तो मंजूळ ध्वनि नेमका कुठून येत आहे हे समजत नव्हते. सहजासहजी त्याचा वेध घेता येत नव्हता आणि त्यामुळे झाडावरच्या पानात लपून गाणा-या कोकिळाचे प्रत्यक्ष दर्शन होत नव्हते. आमच्या भागात कावळ्यांची संख्या मात्र भरपूर आहे. आमच्या घराच्या आसपासच कुठे तरी त्यांची रोज सकाळसंध्याकाळची शाळा भरते आणि त्यांची कर्कश कावकाव सारखी कानावर पडत असते. आमच्या गॅलरीत किंवा खिडकीत येऊन आशाळभूतपणे घरात डोकावणारा आणि एकादा खाद्यपदार्थ दिसला रे दिसला की झपाट्याने त्यावर धाड घालून अन्नात चोच खुपसणारा द्वाड पक्षी हा कावळाच असणार यात शंका नाही. आमच्या घरात संगीताचे सूर अनेक वेळा घुमत असले तरी त्याने आकृष्ट होऊन एकादा कोकिळपक्षी खिडकीत येऊन बसला आणि त्याने वरचा षड्ज लावला असे मात्र आजतागायत कधीसुद्धा घडलेले नाही.

कुठल्याही कोकिळेचे आमच्याकडे लक्ष नसावेच, पण कावळ्यांची तीक्ष्ण नजर मात्र आमच्या घरावर असायची. मी आंतर्जालावर चढवलेला मजकूरसुद्धा त्यांना माय 'क्रो' वेव्हजमधून परस्पर समजत असतो की काय अशी शंका यावी असे त्या रात्री घडले. झोपण्यापूर्वी मी तो श्लोक फेसबुकावर दिला आणि भल्या पहाटेच्या सुमारास आमच्या घरापाशी कावळ्यांचा प्रचंड कलकलाट झाला. त्यांच्या कर्कश ओरडण्याचा मोठा आवाज ऐकून आमच्या गृहमंत्री झोपेतून जाग्या झाल्या आणि त्यांनी समस्त काकजातीवर चरफडत घराच्या सगळ्या खिडक्या फटाफट लावून घेतल्या. बाहेरून येणारा गोंगाटाचा आवाज थोडा कमी झाला तरी उडालेली झोप परत येण्याचे नाव घेत नव्हती. त्यामुळे घरातले अंतर्गत ध्वनिप्रदूषण होतच राहिले. आदल्या रात्री झोपण्यापूर्वी मी कावळ्यांबद्दल थोडे वाईटसाइट लिहिले होते त्याचा सगळ्या कावळेवर्गाकडून अशा प्रकारे जाहीर निषेध चालला असेल अशी एक शंका माझ्या मनाला चाटून गेली. मी काही ती बोलून मात्र दाखवली नाही.

कालांतराने उजाडल्यावर मी रोजच्या संवयीप्रमाणे उठून फिरायला गेलो. परत घरी येऊन बाल्कनीत उभा राहिलो आणि समोरचे दृष्य पाहून आश्चर्याने थक्क झालो. आमच्या बाल्कनीच्या बरोबर समोरच्या रस्त्याच्या मधोमध पण हवेतल्या हवेतच अधांतरी होऊन एक कावळा जागच्या जागी तडफडतो आहे असे दिसत होते. तो आपले पंख जरासे फडफडायचा, पण त्यामुळे हवेत वर उडत नव्हता किंवा बाजूलाही जात नव्हता. आणि गुरुत्वाकर्षणाने खाली जमीनीवरही पडत नव्हता. तो मधल्यामध्येच कशात तरी अडकलेला होता हे निश्चित होते, पण कशात हे समजत नव्हते. आमच्या घरात येणारी वीज जमीनीखालून घातलेल्या केबल्समधून येते आणि टेलीफोनच्या तारासुद्धा जमीनीखालूनच घातल्या आहेत. टेलिव्हिजन आणि इंटरनेट कनेक्शन्सच्या काही वायरी आहेत त्या चार मजले उंचीवरून जोडलेल्या आहेत. आणि हा कावळा मात्र जेमतेम दुस-या मजल्याच्या उंचीवर जागच्या जागी हवेत तरंगत होता.

खाली रस्त्यावर जाऊन जवळून पाहिल्यावर असे लक्षात आले की तो कावळा एका पतंगाच्या मांज्यात अडकून तडफडत होता, तो मांजा इतका बारीक होता की डोळ्यांना सहज दिसतही नव्हता, पण तो अतीशय मजबूत असावा. आमच्या घरासमोरील रस्त्यावर दोन्ही बाजूंना लावलेल्या झाडांच्या फांद्यांमध्ये हा मांजा अडकलेला होता आणि कावळ्याचे पंख त्याच्यात अडकले होते. आम्हाला ते दृष्य पाहवतही नव्हते आणि आपण नेमके काय करावे, फायर ब्रिगेडला कसे बोलवावे वगैरे सुचतही नव्हते. रस्त्यावरून जात असलेल्या एका मुलाने जवळच्या झाडावर चढायचा प्रयत्नही करून पाहिला पण तो त्या मांज्य़ापर्यंत पोचू शकला नाही. सुदैवाने शेजारच्या इमारतीची दुरुस्ती चालली होती. त्यासाठी काही बांबूंचे स्कॅफोल्डिंग बांधले होते, एक दोन बांबू खाली पडले होते. एका माणसाने प्रसंगावधान राखून त्यातला एक बांबू आणला आणि त्याने हलवून मांज्याला जोरात धक्के देताच कावळ्याची (आणि आमची) सुटका झाली.

हा कावळा कदाचित पहाटेच्या अंधारात त्या मांजामध्ये अडकला असेल आणि त्याचे विव्हळणे ऐकून इतर कावळे तिथे जमले असावेत आणि ते सुद्धा ओरडू लागले असावेत. त्यांच्या कलकलाटाने आमची झोपमोड झाली होती. पण त्या वेळी त्याचे कारण समजले नव्हते. किंबहुना त्याला काही कारण असू शकेल असा विचारही त्या वेळी मनात आला नव्हता. अर्धापाऊण तासभरानंतर ते सगळे कंटाळून इकडे तिकडे उडून गेले होते आणि मांजात अडकलेला एकटा कावळा दमून भागून दीनवाणे थोडासा रडत होता. आपण सर्वांनी चतुर कावळ्याची गोष्ट वाचलेली असते. मडक्यातले पाणी चोचीत येत नाही असे पाहून तो त्यात दगड आणून टाकतो आणि त्यामुळे पाण्याची पातळी वर येताच ते पिऊन घेतो. मी पाहिलेल्या या सत्यकथेतले कावळे मात्र असे चतुर नव्हते. त्यांनी जर एकजुटीने तो मांजा चोचीने तोडायचा किंवा चोचीत धरून हलवायचा प्रयत्न केला असता तर कदाचित ते आपल्या बांधवाची सुटका करू शकलेही असते. पण आरडाओऱडा करण्यापलीकडे त्यांनी आणखी काही केलेले दिसले नाही. जी काही दहा पंधरा मिनिटे मी हे दृष्य पहात होतो त्या वेळात दुसरा कोणताही कावळा त्या बाजूला फिरकलासुद्धा नाही. बहुधा ते सगळे भयभीत झाले असावेत. 

यावरून एक जुनी अजरामर रचना आठवते.
कलकल कलहंसे फार केला सुटाया । फडफड निजपक्षी दाविलीही उडाया ॥
नृपतिस मणिबंधी टोचिता होय चंचू । धरिल दृढ जया त्या काय सोडील पंचू?
तदितर खग भेणे वेगळाले पळाले । उपवन-जल-केली जे कराया मिळाले ॥
सजण गवसला जो याचपासी वसे तो। कठिण समय येता कोण कामास येतो ! ॥

कलहंस असो किंवा कावळा असो (किंवा मनुष्यप्राणी), सगळे 'फेअर वेदर फ्रेंड्स' असतात हेच खरे.
2 comments:

Anonymous said...

शुद्धलेखन आवरा !!!!

D V Patwardhan said...

खूपच छान ! आपण संस्कृत सुभाशितांवर असेच आपल्या ओघवत्या भाषेत व्यक्त होत राहा. आम्ही नित्य भेट देण्यास येऊ.
http://abhivyakti-india.blogspot.in/