Thursday, May 29, 2014

आजीआजोबा आणि नातवंडे (भाग - १)

पन्नाससाठ वर्षांपूर्वीच्या आणि त्याआधीच्या काळात आपल्याकडे घरोघरी एकत्र कुटुंब पद्धत असायची, एका कुटुंबातली सगळी माणसे पिढ्या न् पिढ्या एकाच ठिकाणी आणि सगळी मिळून रहात असत. कुटुंबातली सारी मंडळी एकाच घरात रहात असल्यामुळे त्या काळातली बहुतेक सगळी नातवंडे जन्मल्यापासून आजीआजोबांच्या अंगाखांद्यावर खेळतच मोठी होत असत. त्यांच्या दरम्यान एक घट्ट नाते निर्माण होत असे. वयस्क झालेले आजीआजोबा प्रपंचाचा भार पुढल्या पिढीवर सोपवून आपला वेळ हरीहरी करण्यात आणि नातवंडांना खेळवण्यात घालवत असत. नातवंडांना आजीआजोबांचा भरपूर लळा लागत असे आणि आजीआजोबांना नातवंडांशिवाय करमत नसे. घरातल्या मोठ्या लोकांबरोबर आजीआजोबांचे कधी मतभेद झाले, त्यातून तात्पुरते वाद, गैरसमज, थोडा कडवटपणा वगैरे निर्माण झाले तरी नातवंडांशी वागतांना ते मेणाहून मऊ होत असत. त्यांचे आपसातले नाते नेहमी मधुर असेच रहात असे. आजीआजोबांच्या मनात नातवंडांच्याबद्दल अतीव प्रेम, माया, ममता, काळजी अशा भावनाच असत.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात कारखानदारी आणि उद्योगधंद्यांच्या वाढीला वेग येत गेला, तसेच दुस-या महायुद्धानंतरच्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवरही या क्षेत्रांमध्ये मोठे बदल होत गेले. या सर्व घडामोडींमधून नोकरी आणि व्यवसायाच्या अनेक नवनव्या संधी उपलब्ध होत गेल्या. त्या मुख्यतः महानगरांमध्ये निर्माण झाल्या. त्यांचा लाभ घेण्यासाठी खेडी आणि लहान गांवांमधून अनेक युवकांनी शहरांकडे धाव घेतली. तिथे गेलेल्यांना रोजगार मिळाला, पण राहत्या जागांची तीव्र टंचाई असल्यामुळे मिळेल त्या एक दोन खोल्यांच्या खुराड्यांमध्ये त्यांना संसार थाटावे लागले. त्यात रहात असतांना त्यांना आपल्या गावाची आणि कुटुंबातल्या माणसांची सारखी आठवण येत असे. त्यांचे आईवडील आणि इतर बरेच आप्तस्वकीय गावाकडेच रहात असत. त्या लोकांना भेटण्याची ओढ शहरात गेलेल्या लोकांना लागत असे. शक्य तितक्या वेळा गावाकडे जाऊन शक्य तितके दिवस तिथे राहण्याचे प्रयत्न ते करत असत. विभक्त झालेली कुटुंबेसुद्धा त्या काळात शक्य तितकी जवळ येत असत. अजूनही एकत्र असल्यासारखी वागत असत.

नोकरी किंवा व्यवसायासाठी शहरात जाऊन स्थाइक झालेल्या लोकांनी संसारात स्थिरस्थावर होऊन आणि लग्न करून त्यांना मुले होईपर्यंतच्या काळात त्यांच्यातल्या बहुतेकांचे आजीआजोबा काळाच्या पडद्याआड गेले होते, पण गावांकडे रहात असलेले त्यांचे आईवडील आता आजीआजोबा झाले. त्यांची शहरातली नातवंडे त्यांना रोज भेटत नव्हती. पण आपल्या आईवडिलांबरोबर ती अधूनमधून गावाकडे येत असत. दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये काही आठवडे तिथे रहातही असत. आजीआजोबांचे ग्रामीण भागातले प्रशस्त घर, त्याच्या आजूबाजूची मोकळी जागा, गावाजवळील शेते, नदी, डोंगर, त्यावरची झाडेझुडुपे, पानेफुले, फुलपाखरे, चिमण्या, राघूमैना आदि पक्षी, गोठ्यातल्या गायीम्हशी आणि त्यांची वासरे, गावातल्या शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, तिथली मोकळी स्वच्छ हवा, रात्री आकाशात लुकलुकणा-या लक्षावधी चांदण्या या सगळ्यांचे त्या मुलांना अप्रूप वाटत असे.

आजोबा त्यांना आपल्यासोबत फिरायला किंवा देवळात घेऊन जात, आजी छान छान पदार्थ करून खायला घालत असे, दोघेही मजेदार गोष्टी सांगत. वेगवेगळ्या शहरांमधून आलेली नातवंडे आणि त्या गावातच स्थाइक झालेल्या नातेवाइकांची मुले यांची गट्टी जमत असे. आपापल्या गावांतल्या मजा आणि शाळांमधल्या गोष्टी ते एकमेकांना सांगत असत, नवनवे खेळ खेळत, पोहणे, सायकल चालवणे वगैरे शिकून घेऊन त्याचा सराव करत. एकंदरीत त्या काळातली ही नातवंडे त्यांच्या आजीआजोबांवर खूष असत. सुटी संपून आपल्या शहराकडे परत जातांना तीही रडवेली होत असत आणि आजीआजोबांनाही गदगदून येत असे. पण त्या काळातल्या गोड आठवणी ते जपून ठेवत आणि एकमेकांना सांगून जाग्या ठेवत असत. नातवंडांनाही पुन्हा पुन्हा गावाकडे जाण्याची ओढ वाटत असे आणि त्या संधीची ते उत्सुकतेने वाट पहात असत. तिथे जाऊन पोचताच धावत पुढे जाऊन ते  आजीआजोबांच्या गळ्यात पडत.

असाच आणखी पंचवीसतीस वर्षांचा काळ लोटला. आईवडिलांच्यासोबत शहरांमध्ये राहणारी आणि सुट्यांमध्ये गावाकडे जाऊन आजीआजोबांना भेटून येणारी नातवंडे लहानाची मोठी झाली. त्यांच्या आईवडिलांनी काटकसरीने संसार करून आपल्या मुलांना शक्य तितके चांगले शिक्षण दिले होते. शिक्षणाच्या क्षेत्रातही प्रगती होऊन अनेक नवे मार्ग उपलब्ध झाले होते, उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप्स आणि कर्ज मिळू लागले होते. या सगळ्यांचा लाभ घेऊन त्या मुलांनी शिक्षणात खूप प्रगती केली. मोठ्या पदव्या संपादन केल्या आणि त्यांच्या आधारावर त्यांना चांगल्या नोक-या मिळाल्या. काही जणांनी त्याच शहरात रहायचे ठरवले आणि त्यांना तिथेच चांगल्या नोक-या मिळाल्या, काही जण नोकरीसाठी परप्रांतात तर काही जण साता समुद्रापलीकडे परदेशात गेले. काही मुले उच्च शिक्षणासाठी म्हणून परदेशी गेली आणि तिकडेच राहिली. त्या सर्वांनी आपापल्या ठिकाणी संसार मांडले.

मध्यंतरीच्या काळात त्यांच्या कुटुंबांमधील इतरांच्या परिस्थितीतही फरक पडत गेला. ग्रामीण भागातील एकत्र कुटुंबांमधून नोकरीसाठी मोठ्या शहरात आलेल्या बहुतेक लोकांचे आईवडील स्वर्गवासी झाले. त्यांची जुनी घरे मोडकळीला आली आणि दूर राहून त्यांची देखभाल आणि दुरुस्ती करत राहणे शक्य होत नसल्याने ती विकून टाकली गेली. गावातले बरेचसे इतर नातेवाईकसुद्धा आपले गाव सोडून किंवा हे जग सोडून गेले. त्यामुळे शहरात रहायला आलेल्या लोकांना आता गावाकडे जायचे कारण उरले नाही. त्याच्यासाठी तो मार्ग कायमचा बंद झाला. कालांतराने ते लोक नोकरीमधून निवृत्त झाले पण आपल्या मूळ गावी परत जाऊ शकत नव्हते. पूर्वी जेंव्हा ते शहरात रहायला आले होते तेंव्हा त्यांचे आईवडील खेडेगाव सोडून शहरात न येता मागेच राहिले होते. आता ते लोक त्यांच्या मुलांकडे परप्रांतात किंवा परदेशात जाऊ शकत नव्हते. त्यांनी ज्या शहरात सारा जन्म घालवला तिथेच ते स्थाईक झाले. ज्यांना शक्य झाले त्या लोकांनी चांगल्या सदनिका घेतल्या आणि एक दोन खोल्यांच्या जुन्या घरातून ते तिथे रहायला गेले.

 या लोकांचा जन्म जुन्या काळातल्या एकत्र कुटुंबांमध्ये झाला होता. त्यांचे बालपण माणसांनी गजबजलेल्या घरांमध्ये व्यतीत झाले होते. नोकरीत असतांना दिवसाचा सगळा वेळ कामातच जात होता आणि घरी आल्यावर मुलांची गोड संगत होती. आता वार्धक्यात मात्र जेंव्हा त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे त्या वेळी त्याच्या सोबत कोणीही नाही. लहानपणच्या आठवणी व्याकूळ करतात. काही घरी तर आजी किंवा आजोबा यांच्यातला फक्त एकच शिल्लक राहिला आहे. त्यांना तर अगदीच एकाकी रहावे लागत आहे.

काही लोक या बाबतीत सुदैवी आहेत. त्यांची मुले आणि नातवंडे त्यांच्या सोबतीला रहात आहेत. पण त्यांचे वेगळे प्रश्न आहेत. पूर्वीच्या म्हणजे या लोकांच्या आजोबांच्या काळात एकत्र कुटुंबात राहणा-या मंडळींचा उदरनिर्वाह मुख्यतः शेती, दुकानदारी किंवा पारंपरिक व्यवसायांमधून होत असे. त्यामधून मिळणारे उत्पन्न त्यांच्या घरात येत असे आणि सगळ्या कुटुंबावर खर्च होत असे. कुटुंबप्रमुख किंवा घरातील वडीलधारी मंडळींच्या सांगण्यानुसार घरातले व्यवहार चालत असत. त्या काळातले जीवन चाकोरीबद्ध असायचे. दिवस उजाडताच उठल्यापासून ते रात्र पडल्यानंतर झोपी जाईपर्यंत सगळ्यांनी कोणकोणत्या क्रमाने काय काय करायचे हे परंपरेने ठरलेले असायचे. स्वयंपाकघरात जे काही शिजवलेले असेल ते अन्न सारेजण जेवणाच्या वेळी एकत्र जमून खात असत. वडीलधारी लोकांसमोर लहानांनी आवाज चढवायचा नाही अशी सर्वांना सक्त ताकीद असे आणि ती पाळली जात असे. त्या काळातल्या आजीआजोबांना कुटुंबात सर्वोच्च अधिकाराचे, मानाचे आणि महत्वाचे स्थान असायचे.

आजची परिस्थिती वेगळी आहे. सेवानिवृत्त झालेल्या आजीआजोबांकडे उत्पन्नाचे स्वतःचे फारसे स्त्रोत नसतात. त्यांची मुले आणि सुना यांची कमाई परस्पर त्यांच्या खात्यांमध्ये जमा होते आणि त्या पैशांचा विनियोग कसा करायचा हे तेच ठरवतात. व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पना विस्तारल्या आहेत. झोपणे, उठणे, खाणे, पिणे, बाहेर जाणे, घरी परत येणे वगैरेंसाठी ठराविक नियम पाळले जात नाहीत. आजीआजोबांची काळजी घेतली जाते, त्यांची विचारपूस केली जाते, पण घर चालवण्यातल्या इतर बाबतीत त्यांना फारसे विचारले जात नाही.  त्यांची जागा कुटुंबप्रमुखाची राहिली नाही. तिचे काही प्रमाणात अवमूल्यन झाले आहे.

 . . . . . .  . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)


No comments: