Sunday, March 23, 2014

माझे शत्रू - १ - पसारा शब्दाचा जनक (भाग ३)

मी लग्न करून संसाराला लागल्यानंतर 'घर' या संकल्पनेचे काही फंडे समजत गेले. आपले घर म्हणजे आपल्या मर्जीप्रमाणे वाटेल तसे आरामात राहण्याची हक्काची जागा आहे असे मला वाटत असले तरी आपल्याकडे येणा-याजाणा-यांनी आपल्या घराला चांगले म्हणणे अतीशय आवश्यक असते. त्यांनी आपल्या घराचे (म्हणजे गृहिणीचे) कौतुक करावे, निदान त्यांना नावे तरी ठेऊ नयेत हे सर्वात जास्त महत्वाचे असते. त्यांना नाव ठेवायला जागाच मिळू न देणे हे गृहिणीचे परमोच्च कर्तव्य तसेच ध्येय असते. अर्थातच आपल्या घराचे बारकाईने निरीक्षण करून त्यातल्या उणीवा दाखवणे हा त्या येणा-याजाणा-यांचा मुख्य हेतू असणार. ते लोक आपल्याला भेटायला किंवा आपल्याशी बोलायला येत असतात असे मला उगीचच वाटते. आपले घर कसे असते यापेक्षा ते कसे दिसते याला जास्त महत्व असते. यात पुन्हा चांगलेवाईट ही विशेषणे सापेक्ष असतात. त्यामुळे "आपलं घर तर किती छान दिसतंय्?" असे मी म्हणून काही उपयोग नसतो. तसे इतरांनी म्हणायला हवे, पण दिवसभर मी कामासाठी बाहेरच असल्यामुळे हे येणारे जाणारे, खरे तर येणारजाणा-या, आपल्या घराबद्दल काय बोलत असतात ते मला कसे समजणार? त्यामुळे मी या विषयावर अधिकारवाणीने बोलू शकत नाही आणि नुसतेच बोललेले कोणाला ऐकण्याची काय गरज? घरासंबंधीच्या तत्वज्ञानाचे थोडे बाळकडू मी लहानपणी प्राशन केले होते, पण हॉस्टेल्समध्ये घालवलेल्या सुवर्णयुगात त्याचा अंमल ओसरला होता. माझा जुना शत्रू म्हणजे पसारा शब्दाचा जनक मी संसार थाटल्यानंतर पुन्हा कलीसारखा माझ्या घरात घुसला.

घर चांगले दिसण्यात 'पसारा' या शब्दाला अवाच्या सव्वा निगेटिव्ह मार्क असतात. केर, कचरा, घाण वगैरेंना घरात थारा देता कामा नयेच हे कोणीही मान्य करेल, पण जगातल्या सगळ्या संदर वस्तू वेचून तुम्ही घरी आणून ते सजवलेत तरी एकाद्या जागी झालेला पसारा त्या सगळ्यावर बोळा फिरवतो. 'पसारा' म्हणजे 'पसरलेल्या वस्तू' असा व्याकरणातला अर्थ असेल, पण घराच्या सौंदर्याच्या संदर्भात या शब्दाला एक वेगळाच व्यापक अर्थ असतो. कोणतीही टुकार, खराब किंवा वाईटच नव्हे, एकादी सुरेख, उपयुक्त आणि तुमची अत्यंत आवडती वस्तूसुद्धा जर का जमीनीवर, गादीवर, सोफ्यावर, खुर्चीवर, खिडकीत वगैरे पडली असेल तर ती वस्तू 'वस्तू' न राहता तिचे रूपांतर 'पसा-या'त होते. 'नो पार्किंग झोन'मध्ये एकादी मर्सिडिज गाडी उभी असली तरी तिला खेचून नेणारे महाभाग असतात, त्याचप्रमाणे कुठेही 'पसारा' दिसला की त्याला उचलून नजरेआड करणारे हात सारखे शिवशिवत असतात. 'टोइंग'वाल्यांनी नेलेली गाडी कुठे मिळेल याची थोडी फार कल्पना असते, पण 'पसारा' म्हणून गायब झालेल्या वस्तूंबद्दल काही सांगता येणार नाही. मिळाल्या तर एका मिनिटात मिळतील नाहीतर त्या कुठल्या ब्लॅकहोलमध्ये गायब झाल्या हे कधीच समजणार नाही. त्यातून जर का हा 'पसारा' घरी आलेल्या पाहुण्याच्या नजरेला पडेल अशी शक्यता निर्माण झाली तर त्याला देहांताची शिक्षा होणे अटळ असते. खरे वाटत नसले तर एक अनुभव सांगतो.

मी जेंव्हा चारपाच वर्षांचा होतो त्या काळात आमच्या घरातल्या एकाद्या कोनाड्याचा एकादा कोपरासुद्धा 'माझा' नव्हता, पण या बाबतीत माझा मुलगा नशीबवान होता. तो तीनचार वर्षांचा झाला होता तोपर्यंत त्याला अनेक खेळणी आणि चित्रमय पुस्तके मिळाली होती. ती सगळी ठेवण्यासाठी आम्ही त्याला घरातली एक खोलीच दिली होती. त्या खोलीत त्याला वाटेल तसे खेळायला मोकळीक दिली होती. ती खोली त्याला 'त्याची' वाटावी म्हणून  भिंतींवर आकर्षक रंगीत चित्रे लावली होती. इतके सगळे करूनसुद्धा त्याला मात्र तसे काही वाटत नसे, कारण तो पठ्ठा 'हे (संपूर्ण) घर माझेचि विश्व' असे मानायचा आणि अर्थातच घरातल्या सगळ्या वस्तू त्याला हाताळून पहायच्या असत. एकाद्या सम्राटाच्या ऐटीत तो घरभर फिरायचा, लाटणे, झारा, टूथपेस्ट, पेन, घड्याळ असले जे काही हाताला लागेल ते उचलून कुठेही नेऊन तो त्याच्याबरोबर खेळत बसायचा. त्याला उचलून त्याच्या खोलीत नेऊन खेळवणे आणि त्याच्या हातातल्या इतर वस्तू काढून घेणे हे काम मला नाइलाजाने करावे लागत असे. एकादा कायदा तत्वतः मान्य नसला तरी जबाबदार नागरिकाला त्याचे पालन करणे आवश्यक असते त्याचप्रमाणे 'पसाराविरोधी' अध्यादेशाची अंमलबजावणी करणे मला भाग होते.

एकदा माझे शासरेबुवा आमच्याकडे आलेले होते. त्यांना त्यांच्या मुलीबरोबर निवांतपणे गुजगोष्टी करायला मिळाव्यात म्हणून मी माझ्या मुलाला त्याच्या खोलीत घेऊन गेलो. पाहुण्यांच्या आगमनापूर्वी सर्व घराबरोबर त्याची खोलीही आवरली गेली होतीच, सगळी खेळणी आणि पुस्तके कपाटात बंद केलेली होती. त्यातले एक चित्रमय पुस्तक काढून मी त्यातली परीकथा सांगायला सुरुवात केली. अनेकदा ऐकून त्याला ती गोष्ट पाठ झालेली होती, मी एक वाक्य बोलताच तो पुढचे वाक्य सांगायचा. अशा प्रकारे ते पुस्तक वाचेपर्यंत तो कंटाळला. त्याला थोड्या प्रॅक्टिकल आणि क्रिएटिव्ह कामात गुंतवण्याच्या दृष्टीने मी पत्त्यांचा जोड काढला आणि आम्ही दोघांनी मिळून बंगला बनवायला सुरुवात केली. दोन पत्त्यांचा त्रिकोण तयार करणे, त्याला धक्का न लावता शेजारी दुसरा त्रिकोण रचणे आणि त्यांना आडव्या पत्त्याने हलकेच जोडणे त्याला जमायला लागले आणि आमचा बंगला मोठा मोठा होत गेला. माझ्या मुलाला त्यात एक प्रकारचा अपूर्व आनंद मिळत होता, त्याच्या वयाच्या मानाने पाहता त्याचे हस्तकौशल्य खरोखरच कौतुक करण्यासारखे होते आणि ते करून मी त्याला प्रोत्साहन देत होतो.

"चहा तयार झालाय् रे" अशी माझ्या आईची हाक कानावर येताच मी उठलो आणि "मी पाच मिनिटात येतोय् हां." असे मुलाला सांगून बाहेर हॉलमध्ये आलो. आम्ही सर्वांनी चहा प्यायला सुरुवात केली. एवढ्यात माझा मुलगाही बाहेर आला आणि "आजोबा, चला, तुम्हाला एक गंमत दाखवायची आहे." असे म्हणत त्यांचे बोट धरून ओढायला लागला. एका हातात कप धरून ते त्याच्याबरोबर गेले असते तरी काही बिघडणार नव्हते आणि त्यांची तशी तयारीही होती. पण "अरे आजोबांना जरा चहा तर पिऊ दे. दोन मिनिटांनी ते येतील." असे म्हणून त्याची समजूत घातली गेली. तो बिचारा निमूटपणे वाट पहात उभा राहिला. यामागचा कावा माझ्याही लक्षात न आल्यामुळे मीही गाफिल राहिलो.

चहाचा शेवटचा घोट घेतल्यावर आम्ही त्याच्याबरोबर त्याच्या खोलीत गेलो आणि तिथले दृष्य पाहून माझ्या काळजाचे पाणी पाणी झाले. माझा मुलगा तर आश्चर्याने आणि दुःखाने सुन्न होऊन गेला कारण तेवढ्यात कोणीतरी तिथे येऊन जमीनीवरचा पसारा हलवायचा म्हणून आम्ही बांधलेला बंगला पार नाहीसा करून टाकला होता आणि पत्त्यांचा जोड उचलून कपाटात ठेऊन दिला होता. कारण काय तर पाहुण्यांनी पहायला ती खोली चांगली दिसायला हवी ना! वर्ल्ड ट्रेड सेंटरचे टॉवर्स कोसळल्यानंतर अमेरिकेच्या जनतेला उद्देशून आषण करतांना जेवढे दुःख अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या चेह-यावर दिसले होते त्याहूनही जास्त आक्रोश माझ्या मुलाच्या डोळ्यांमध्ये मला दिसत होता. पण कुणाला काय हो त्याचे कुणाला काय सांगावे अशी माझी अवस्था झाली.  माझा जुना शत्रू म्हणजे पसारा शब्दाचा जनक माझ्याकडे बघून खदाखदा हसतो आहे असे मला वाटून गेले.

मातेची माया, ममता वगैरेंची थोरवी असंख्य लोकांनी सांगितली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी वगैरे जितक्या भाषा मला येतात त्या सगळ्यांमध्ये मी याबद्दल अनेक वेळा वाचले आहे. स्वाहिली किंवा हिब्रू वगैरे ज्या भाषा मला समजत नाहीत त्यांमध्येसुद्धा तिचे वर्णन असणार याची मला खात्री आहे. "मुलाचा आनंद म्हणजेच आईचा आनंद आणि मुलाचे दुःख म्हणजेच आईचे दुःख, मुलाला कुठे टोचलं तर आईच्या डोळ्यात पाणी येतं आणि मुलाच्या डोळ्यातली चमक पाहून आईचे डोळे चमकायला लागतात." वगैरे जे काही सगळेजण म्हणतात तसे असणारच, पण मला एक गोष्ट समजत नाही. घरात दंगामस्ती करून सगळे सामान इकडेतिकडे टाकणारी लहान मुले सगळ्या काळांमध्ये मी घरोघरी पाहिली आहेत. त्यात मुलांना होत असलेला आनंदही त्यांच्या चेहे-यावर ओसंडतांना दिसत असतो, पण हा आनंद त्यांच्या माउलींच्या तोंडावर मात्र दिसत नाही. मुलाच्या आनंदामुळे आनंदी होण्याऐवजी त्या रागावतात, वैतागतात, मुलांना दटावून त्यांचा विरस करतात किंवा रट्टे देऊन त्यांना रडवतात. असे का होत असावे? आपल्या घरातला पसारा बघून कोणीतरी आपल्याला काय म्हणेल? ही इनसिक्यूरिटी इतकी तीव्र असते की आपल्या मुलाला काय वाटेल? हा विचार त्यावेळी करावासा वाटत नाही,

साक्षात मातेच्या मनावरसुद्धा सत्ता गाजवणारा हा विचार ज्याच्यामुळे निर्माण झाला तो म्हणजे पसारा या शब्दाचा जनक आपला शत्रूच नाही का? मी तर त्याला शत्रूच समजतो.

.  . . . . . . . . . . . . . .  (समाप्त)

No comments: